डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारतात धर्मनिरपेक्षता तत्त्वाबाबत बऱ्याचदा गफलत होताना दिसते. भारतातील धर्मनिरपेक्ष संकल्पनेबाबत स्पष्टीकरण देताना सर्वधर्म सहिष्णुता, सर्वधर्म समभाव असे शब्द वापरले जातात. धर्मनिरपेक्षता ही संकल्पना एतद्देशीय नसून ती पाश्चात्त्य, आयातीत असल्याचे सांगितले जाते, तेव्हा आपणास आपल्या इतिहासाचे सोईस्कर विस्मरण होते. (खरं तर इतिहासाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते.) सम्राट अशोक, अकबराच्या काळातील बौद्ध, हिंदू, मुस्लिम धर्मांचे एकत्व व सामंजस्य याकडे काणाडोळा करणे, म्हणजे झोपेचे सोंग घेणेच नाही का? धर्मनिरपेक्षता (सेक्युलॅरिझम)च्या मूळ संकल्पनेत धर्मसत्ता व राज्यसत्तेचे विभाजन गृहीत आहे. रोमन संस्कृती काळात या दोन सत्तांमध्ये संघर्ष सुरू झाला, तेव्हा ‘देवाचे देवाला व राजाचे राजाला (सीझर)’ देण्याच्या प्रथेत धर्म नि राज्य सत्तेच्या भूमिकांचे विभाजन आहे. धर्माचरणा-संदर्भात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. 

तो दिवस माझ्या अजून चांगला आठवणीत आहे. दिवस होता 27 फेब्रुवारी 2019. औचित्य होतं मराठी भाषादिन. कविवर्य कुसुाग्रज जन्मदिनाचं. मी विकिपीडियावर माझी मराठी पुस्तके विक्रमी संख्येने प्रकाशित करण्याच्या (अपलोड) गडबडीत होतो. विकिपीडियावरील माझ्या उपक्रमामुळे विकिस्रोतावरील मराठी पुस्तकांची संख्या शतक ओलांडणार होती, म्हणून मी आणि विकिपीडियाचे समन्वयक सुबोध कुलकर्णी- दोघांत उत्साहाचं उधाण संचारलं होतं. महाजालावर (इंटरनेट) त्या दिवशी ‘सर्फ एक्सेल कंपनी’ची होळीपर्वाच्या पूर्वकाळी प्रबोधनपर अशी नवी जाहिरात प्रकाशित झाली. ती झळकताच बहुप्रचारित (व्हायरल) झाली. अवघ्या पंधरा दिवसांत ही जाहिरात 8583942 (सुारे 86 लाख) प्रेक्षकांनी पाहिली, ऐकली. इतकेच नव्हे, तर यू-ट्यूब वाहिनीवर 26000 (26 केबी) प्रेक्षकांनी पसंती (लाईक) दर्शवली. काय आहे ती सर्फ एक्सेलची जाहिरात? 

ती नुसती जाहिरात नाही, ती आहे एक मोठी जाहिरातशृंखला. तिच्यामागे आहे एक विचार, तत्त्वज्ञान- भारत अखंड ठेवण्याचे, तो धर्मसहिष्णु, जातीय सलोख्याचे... एकात्म भारत घडवण्याचे. या जाहिरातशृंखलेची सुरुवात झाली ऐंशीच्या दशकात. टीव्हीच्या छोट्या पडद्यावर नि चित्रपटगृहांतून, रेडिओवर त्या वेळी निरमा वॉशिंग पावडरची धूम होती. प्रत्येक प्रेक्षकाला निरमाची ती जाहिरात पाठ असायची. 
वॉशिंग पावडर निरमा 
वॉशिंग पावडर निरमा 
दूध सी सफेदी 
निरमा से आये 
रंगीन कपडे भी खिल खिल जाये 
सबकी पसंद निरमा 
वॉशिंग पावडर निरमा निरमा! 

या जाहिरातीला शह देण्यासाठी सर्फ एक्सेलनी पांढऱ्या शुभ्र साडीतील ललिताजींचा अवतार छोट्या पडद्यावर आणला तो तर्जनी गोल फिरवत नि हे म्हणत- ‘दाग ढूँढते रह जाओगे!’ या जाहिरातीने ‘सस्ते और अच्छे’ (चीप अँड गुड) यामधील फरक जनतेच्या लक्षात आणून दिला. ललिताजींनी मोठ्या पडद्यावरील हेमामालिनी, रेखा, जया भादुरी, सुश्मिता सेन अशा सर्वांना मागे टाकलं. या जाहिरातीने मग पाण्याच्या बचतीचं प्रबोधन करायला सुरुवात केली. सर्फ वापरला की दोन बादली पाणी वाचतं; कारण सर्फ पावडर इतकी प्रभावी की कमी पाण्यात कपडे स्वच्छ, डागमुक्त... ‘दाग ढूँढते रह जाओगे।’ 

वर्ष 2005 उजाडलं. बाबरी मशिद विध्वंस, मुंबई दंगल, हिंदुत्वाचा वाढता प्रचार-प्रसारानं जातीय, धार्मिक तेढ वाढत जाऊन राजकारण असहिष्णू बनत गेलं. पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्रींच्या काळातील एकात्म भारताचं स्वप्न भंग होण्याच्या उंबरठ्यावर येऊन उभं असल्याची जाणीव झाल्याने सामाजिक नकारात्मकतेस सकारात्मकतेचा मुलामा देण्याच्या उद्देशाने सर्फ एक्सेलने ‘दाग अच्छे है’ असं सूत्र घेऊन 2019 पर्यंत स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्यांचं समर्थन करणाऱ्या अनेक जाहिराती प्रकाशित करण्याचा सपाटा लावला. त्यामागे बार्टल बॉग हेगार्टी (बीबीएच) कंपनीने जागतिक पातळीवर चालवलेल्या ‘डर्ट इज गुड’ या जाहिरातसूत्राची पार्श्वभूमी होती. (खरं तर ते अनुकरण होतं!) पण ह्या सूत्रवाक्याने सर्फ एक्सेलला डिटर्जंट मार्केटचा सूत्रधार बनवलं. लिंटास या जाहिरात कंपनीनं हे करून दाखवलं. त्याची सुरुवातच त्यांनी मुळात लहान मुलांच्या खेळण्या-बागडण्यात असलेल्या माती, मळ, डाग, धुळवड इत्यादीतून केली. त्यात भाऊ-बहीण, जिवलग मित्र, मित्र-मैत्रीण अशी निरागस नात्यांची वीण तयार करत नात्यातील आपलेपण वृद्धिंगत केलं नि समजावलं की- भारतासारख्या बहुभाषी, बहुवंशी, बहुधार्मिक, बहुजातीय, बहुप्रांतीय देशात भेदांचे डाग- वैविध्य हेच सौंदर्य, सद्‌भाव, सहिष्णुता आणि सौजन्य होय. 

परवाच्या ताज्या जाहिरातीत ‘सर्फ’नं म्हटलंय- ‘अपनेपन के रंग से औरों को रंगने में दाग लग जाए तो दाग अच्छे है!’ परवाच्या होळीच्या पूर्वसंध्येस (फेब्रुवारी 2019) प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत होळीनिमित्त चाललेली रंगपंचमी दाखवलीय. एक लहान हिंदू मुलगी आपल्या मित्रांचे रंग स्वत:वर ओढवून घेऊन त्यांचे रंग संपवते आणि आपल्या दुसऱ्या मुसलमान मित्रास त्यांच्यावर रंगाचा थेंब उडवू न देता मशिदीत बेदाग पोहोचवते. असं दाखवून ‘सर्फ’नी सिर्फ धार्मिक सलोखा काय सूचित केला... 

तिकडे हिंदू मूलतत्त्ववादी विचारसरणीच्या लोकांध्ये पोटशूळ उठला. बाबा रामदेव यांच्या पतंजली  साबणाच्या खपात घसरण होणार हे पाहताच त्यांनी सर्फला विदेशी कंपनी ठरवून तिच्यावर बहिष्काराचे आवाहन केले. कुंभमेळ्याच्या वेळी अशीच एक जाहिरात ‘रेड लेबल’ चहाने केली. बाप- मुलाच्या गर्दीतील ताटातुटीची... त्यावरही अशीच हिंदू मूलतत्त्ववादी विचारसरणीच्या लोकांनी टीका-टिप्पणी (टि्‌वट) केली, पण कंपनीनं न जुमानता जाहिरात चालू ठेवली. ओढून-ताणून समाजात दरी, दुही माजवणारे सर्वच काळात दिसून येत असतात. अशा वेळी सहिष्णू, समभावी, एकात्मता विचारसमर्थकांनी प्रतिबद्धपणे समाज एकसंध रहील हे पाहिलं पाहिजे. प्रश्न केवळ हिंदू-मुस्लिम दुहीचा नाही. ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी इत्यादी सर्व धर्मांच्या इतिहासात व मानवी समाजाच्या विकासकाळात असे दिसून येत आहे की, प्रत्येक धर्मात परंपरेने कर्मठ विरुद्ध सुधारवादी वा उदारमतवादी विचारांचे लोक यांच्यात मतभेद होत आले आहेत. पण समाज अंतिमत: मानवी कल्याणाच्या बाजूनेच न्यायाच्या तराजूत आपला पासंग टाकत आला आहे. 

तमस पत्की यांनी आपल्या अलीकडे प्रकाशित लेखनात मूलतत्त्ववादी वृत्तीची वैशिष्ट्ये विशद केली  आहेत. त्यांच्या मतानुसार, मूलतत्त्ववादी आधुनिकतेच्या विरोधी या अंगाने पारंपरिक कर्मठ, कर्मकांडसमर्थक असतात. भूतकाळास सुवर्णकाळ ठरवत ते गतकाळाचे गौरवीकरण करत राहतात. सामान्यत: मूलतत्त्ववादी हे उन्मादी (ॲसर्टिव्ह), उच्चारवी वा घोषणावादी (क्लामरस) आणि हिंसक (व्हायोलंट) असतात. ते स्वत:स सामान्यांपेक्षा वेगळे, उच्च नि विशेषाधिकारी (प्रिव्हिलेज्‌ड) मानत असतात. त्यांचा शब्द, कृती हाच त्यांचा न्याय नि कायदा असतो. जन्म, वंश, जात, धर्म इत्यादींचे वर्चस्व व श्रेष्ठत्व त्यांच्या लेखी अहंकार व अस्मितेची बाब असते. 

आपण जनसामान्यांपेक्षा वेगळे नि श्रेष्ठ आहोत, हे दर्शविण्यासाठी वा सिद्ध करण्यासाठी कावेबाजपणे ते समाजात रूढी, परंपरा, अधिकार इत्यादी माध्यमातून श्रेष्ठ-कनिष्ठता बेमालूपणे रुजवत असतात. एका अर्थाने त्यांचा हा व्यवहार आत्मगौरवी वा आत्मरत असतो. आपण म्हणू ते सत्य वा पूर्व असा त्यांचा बाणा असतो. मध्यम मार्ग, तडजोड, सामंजस्यपूर्ण व्यवहार, आचरण त्यांना मान्य नसते. जे आपणाशी असहमत, ते आपले शत्रूविरोधक मानतात. तसा त्यांचा व्यवहार, वर्तन असते. धर्मगुरू (पोप, मौलवी, जगद्‌गुरू इ.) आज्ञा त्यांच्या लेखी प्रमाण असते. यातून फतवे, फर्मान, फैसला अशी एक चालकानुवर्ती न्यायव्यवस्था (खरं तर अन्याय्य यंत्रणा) निर्माण करण्यावर त्यांची अधिक भिस्त असते. 

अशी माणसं स्वत:स मग ईश्वराचे प्रेषित, प्रतिनिधी मानत पापपुण्याचा निवाडा, स्वर्ग-नरक प्रवेशाचा अधिकार असल्याची बतावणी करत चक्क पापमोचक प्रवेशपत्रे वाटतात, विकतात. यातून मग धर्मांध समाज निर्माण होत राहतो. दुर्बल-सबल, स्पृश्य-अस्पृश्य, स्त्री-पुरुष असे विषमता निर्माण करणारे अनेक वर्ग, वर्ण यातून निर्माण होतात. तेच समाजाच्या अध:पतनास, अन्यायास निमंत्रण देत राहतात. लिंगभेदाधारित विषम समाजरचना या भेदातूनच जन्मास येत असते. राष्ट्रवाद, धर्मवाद, मूलतत्त्ववाद इत्यादी प्रेरणांच्या निर्मितीमागे उन्मादी मानसिकता निर्माण करण्याचे षड्‌यंत्र असते, हे या संदर्भात लक्षात घ्यायला हवे. 

या पार्श्वभूमीवर भारतीय संविधान जेव्हा आपल्या सरनाम्यात भारतीय गणराज्य हे सार्वभौम, समतावादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून घोषित करते; तेव्हा सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय देण्याचे आश्वासन ते देत असते. भारतीय संविधान जेव्हा विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास, पूजाविधींचे स्वातंत्र्य बहाल करते; तेव्हा ते भारतीय बहुसांस्कृतिकतेचं समर्थन करत त्याच्या संरक्षणाची एका परीने हमीच देत असते; हे आपणास विसरून चालणार नाही. भारतीय संविधान संधी व दर्जा यांची समानता अधोरेखित करत कोणत्याही भेदाच्या आधारे विषमता खपवून घेतली जाणार नाही, याचाच उच्चरवात पुरस्कार करत असते. बंधुतेच्या तत्त्वात प्रतिष्ठा अंतर्भूत  असते. व्यक्ती वा समुदाय एकतेचे समर्थन या बंधुभावातूनच समाजात आकारते आणि रुजते, हे आपण विसरून चालणार नाही. राष्ट्रीय एकात्मतेचा पाया जर काय असेल, तर तो सर्वधर्मी समानतत्त्व हाच आहे. 

भारतात धर्मनिरपेक्षता तत्त्वाबाबत बऱ्याचदा गफलत होताना दिसते. भारतातील धर्मनिरपेक्ष संकल्पनेबाबत स्पष्टीकरण देताना सर्वधर्म सहिष्णुता, सर्वधर्म समभाव असे शब्द वापरले जातात. धर्मनिरपेक्षता ही संकल्पना एतद्देशीय नसून ती पाश्चात्त्य, आयातीत असल्याचे सांगितले जाते, तेव्हा आपणास आपल्या इतिहासाचे सोईस्कर विस्मरण होते. (खरं तर इतिहासाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते.) सम्राट अशोक, अकबराच्या काळातील बौद्ध, हिंदू, मुस्लिम धर्मांचे एकत्व व सामंजस्य याकडे काणाडोळा करणे, म्हणजे झोपेचे सोंग घेणेच नाही का? धर्मनिरपेक्षता (सेक्युलॅरिझम)च्या मूळ संकल्पनेत धर्मसत्ता व राज्यसत्तेचे विभाजन गृहीत आहे.
 
रोमन संस्कृती काळात या दोन सत्तांमध्ये संघर्ष सुरू झाला, तेव्हा ‘देवाचे देवाला व राजाचे राजाला (सीझर)’ देण्याच्या प्रथेत धर्म नि राज्य सत्तेच्या भूमिकांचे विभाजन आहे. धर्माचरणासंदर्भात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. धर्माचरण ही व्यक्तिगत गोष्ट आहे की, सार्वजनिक? तर त्याचे उत्तर- ती शुद्ध व्यक्तिगत बाब असून त्याचे स्वातंत्र्य ज्या-त्या व्यक्तीस घटनेने दिलेले आहे. त्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आदरसन्मान करणे हे प्रत्येक लोकशाही मानणाऱ्या नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतु जेव्हा त्या स्वातंत्र्याची अभिव्यक्ती सामूहिकरीत्या वा सार्वजनिक ठिकाणी करण्याचा प्रश्न येतो; तेव्हा याची काळजी घेणे अशा अंगाने महत्त्वाचे ठरते की, पूजास्वातंत्र्याचा उपमर्द दुसऱ्या सहनागरिकाच्या पूजास्वातंत्र्याला होता कामा नये वा त्यावर आक्रमण होऊ नये. सक्तीच्या धर्मांतरास विरोधामागे हेच तत्त्वज्ञान आहे; परंतु स्वेच्छा धर्मांतराचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे, त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. 

अमेरिकेसारख्या विविध देशीय लोकसमूहाने बनलेल्या राष्ट्रात धर्माच्या सार्वजनिक प्रदर्शनास असलेल्या बंदीमागे धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आहे, हे लक्षात घ्यायला हवे. वर्तमान भारतात जात, धर्म इत्यादींवरून वा धर्माचरणासंबंधी कट्टर पंथीयांकडून वारंवार हल्ले, हत्या, ‘ऑनर किलिंग’सारख्या घटना घडतात; तेव्हा जात, धर्मसंबंधी सहिष्णुता, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा वारंवार ऐरणीवर येणे हे काही एकात्म राष्ट्राचे लक्षण नव्हे. एक विशिष्ट धर्म, जात, विचारधारेचा आग्रह वा देशास एका रंगाने रंगविण्याचे रंजन हा देशास एकाच एक विचारधारेचे बनवण्याचा (मोनोलिथिक स्ट्रक्चर) घाट हा संविधानविरोधीच ठरतो. बहुसंख्याकांची एकाधिकारशाही (डिक्टेटरशिप ऑफ एनी सिंगल लार्ज ब्लॉक ऑफ सोसायटी) ही लोकशाहीविरोधी संकल्पना होय. 

समाज धर्मनिरपेक्ष बनवणे म्हणजे देशाच्या प्रशासनाने देशातील सर्व जात, पंथ, धर्म मानणाऱ्या लोकांचे समानपणे कल्याण व विकास करणे होय. अन्न, पाणी, निवारा, आरोग्य, शिक्षण, सेवायोजन, मानवाधिकार, साधनांचे समान विभाजन व वितरण या सर्वांची समान शाश्वती व संरक्षण धर्मनिरपेक्ष संकल्पनेत अनुस्यूत आहे. भारत हा परंपरेने बहुवंशीय, बहुधार्मिक, बहुजातीय, बहुभाषी, बहुप्रांतीय समाजाने बनलेला देश असून ‘बहुजिनसी सहअस्तित्व (हेट्रोडॉक्स को- एक्झिस्टन्स) मान्य करण्यानेच देशाचे एकत्व सुरक्षित राहू शकते. हे सहअस्तित्व जात-धर्मापेक्षा समान नागरिकत्व नाही तर सहनागरिकत्व (को-एक्झिस्टन्स ऑफ सिटिझनशिप) या मार्गाने जाईल; तर आपण धर्मनिरपेक्ष भारत म्हणून नवी उभारणी करू शकू’, या रोमिला थापर यांच्या विचारांचा या संदर्भात विचार व्हायला हवा. 

हे सर्व लिहीत असताना निदा फाजली यांचा एक शेर सारखा आठवत राहतो नि लक्षात येतं की- माणूस जन्माला येताना देव, जात, धर्म, पंथ, भाषा काहीच घेऊन येत नसतो. ही सारी बिरुदावली आपण त्यास चिकटवतो तरी, नाही तर निर्माण तरी करतो. 
हमेशा मंदिर - और मस्जिद में वो नहीं रहता। सुना है, बच्चों में छुप कर वो खेलता भी है।। 

संदर्भ - 
1) Dag Acche Hai - A lowe lintas brain child that challenged the face of Surf Excel's brand identity. - https://socialsamosa.com 
2) Ten characteristics of religious fundamentalism - https://vridar.org 
3) Redefining the secular mode of India - Romila Thaper. - https://himalmag.org

Tags: जाहिरात सुनीलकुमार लवटे advertisement dag ache hai sunilkumar lavate weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनीलकुमार लवटे,  कोल्हापूर, महाराष्ट्र

माजी प्राध्यापक, प्राचार्य, लेखक, हिंदी भाषा प्रचारक, समाजसेवक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके