डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हे सर्व साहित्य मी वेळोवेळी, प्रसंगपरत्वे वाचले आहे. ते वाचून जे आकलन झाले, त्यावरून असे म्हणता येते की- या सर्व पुस्तकांची धडपड अंधश्रद्धामुक्तीची नि सामाजिक घडणीची आहे. तुम्हाला माणूस बदलायचा असेल; तर त्याच्या परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा, भ्रम, स्वप्न, धारणा यांना हात घालावाच लागतो. ‘सापही मरू नये नि काठीही तुटू नये’ असा बचावाचा खेळ खेळणारा समाज धर्मश्रद्धा, अनिष्ट प्रथा, शोषणावर उभ्या चाली-रीती, देव, दैव, नशीबग्रस्त समाजाचा उद्धार कधीच करू शकणार नाही. डॉ.नरेंद्र दाभोलकरांचे साहित्य ‘नरो वा कुंजरो वा’ पठडीतले नाही. ‘हा सूर्य - हा जयद्रथ’ असा स्पष्ट पवित्रा घेणारे आहे. हे साहित्य म्हणजे भिडभाड न बाळगता विवेकाच्या कसोटीवर केलेले लेखन आहे.

 

भारताच्या स्वातंत्र्याला 73 वर्षे पूर्ण झाली. आपल्यापेक्षा कमी स्वातंत्र्यकाळ असणारे अनेक देश जगात आहेत. पण त्या देशांतील नागरिकांची घडण नि आपण असा मेळ घ्यायला लागतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात आल्यावाचून राहत नाही; ती अशी की, इथल्या शिक्षणाने माणूस-घडणीकडे द्यावे, तितके लक्ष दिले नाही. आपल्या शिक्षणाचे लक्ष्य मिळकत-स्वावलंबन राहिले. इथल्या राजकीय पक्षांनी ज्या राज्य नि केंद्रसत्ता भोगल्या, त्यांचे धोरण सवंग लोकानुनयाचेच राहिले. साऱ्या कारभाराची मदार सत्ता मिळवणे व टिकवणे या दोन उद्दिष्टांभोवतीच फेर धरत राहिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या भारतीय घटनेच्या पंचशील मूल्यांना बांधील राहून आपण देश घडवला, असे म्हणता येत नाही. असं का व्हावं? याचा शोध घेता लक्षात येते की- शिक्षण, साहित्य, संस्कृती, कला, सुधारणा या क्षेत्रांत आपण सुमार उपलब्धींवरच समाधान मानत आलो. मराठी साहित्याचा प्रदेश रंजकतेने जितका व्यापलेला दिसतो, त्या तुलनेने वैचारिक साहित्याचा प्रदेश आखूडच राहत आलेला आहे. वैचारिक लेखनास आवश्यक चिंतनशीलता, व्यापक जीवनदृष्टी, व्यासंग, नवनवे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याची कृतिशील बांधिलकी मराठी प्रांतात उत्तरोत्तर कमी होत जाणे- हा समाजाच्या चिंता नि चिंतनाचा विषय महाराष्ट्र घेताना दिसत नाही. यास लेखकांचा निराशवाद जितका जबाबदार आहे, तितकीच वाचकांची रंजक वाचनपसंतीही. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या साहित्याचा विचार करतो, तेव्हा मात्र वरील समजुतीला धक्के बसत राहतात. त्यांच्या साहित्याची मराठी समीक्षेने दखल घेतली नसली, तरी ऑक्सफर्ड प्रेसने त्यांचे कार्य व विचारांची दखल घेत जॉन क्वॅक यांचे संशोधन व समीक्षेवर आधारित ‘डिसएन्चांटिंग इंडिया’ नावाचा प्रबंध प्रकाशित करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. डॉ.दाभोलकरांचे कार्य व विचार भारतातील सर्वाधिक प्रभावी व खेड्यापाड्यांतील सर्वसामान्यांना प्रभावित केलेल्या चळवळीच्या रूपात पाहता येणं, याचं गमक कार्याइतकंच लेखनात असलेलं दिसतं.

डॉ. दाभोलकर यांच्या जीवनकार्याची सुरुवात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून झाली आणि शेवट  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता, संपादक, संघटक, साहित्यिक म्हणून. कबड्डीसारखा सामूहिक खेळ- त्यात ते एक-दोन नव्हे, तब्बल वीस वर्षे रमले होते. त्यात ही सर्वोच्चच राहिले. क्रीडा संघटक, क्रीडा स्तंभलेखक, क्रीडा निवेदक म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव ‘शिवछत्रपती पुरस्कार’ देऊन केला. ‘कबड्डी’ हे डॉ.  नरेंद्र दाभोलकरांचे पुस्तक सन 1980 ला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केले, तेव्हा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या पुस्तकाला दुहेरी प्रस्तावना देऊन गौरविलं होतं. माणूस नुसता खेळाडू असून चालत नाही, त्याच्यात खिलाडूवृत्ती असणं महत्त्वाचं. ती डॉ.दाभोलकरांमध्ये असल्याने ते सामूहिक-सामाजिक परिघात सतत फिरत राहिले. तरुणपणी त्यांनी ‘समाजवादी युवक दल’ स्थापलं. सन 1970 ते 1980 हा कालखंड महाराष्ट्राच्या दृष्टीने युवक संघटनांचा सुवर्णकाळ होता. युवक क्रांती दल, दलित पँथर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ‘एक गाव-एक पाणवठा’ आंदोलन, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, मुस्लिम सत्यशोधक मंडळ आदी कार्यांतून महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा ठळक झाला. याच काळात बी. प्रेमानंद नावाचे केरळचे बुद्धिवादी कार्यकर्ते विज्ञान यात्रेमार्फत बुवाबाजीचे चमत्कार दाखवून त्यामागील विज्ञान स्पष्ट करत. जादू आणि चमत्कार या दोन स्वतंत्र गोष्टी असून दोन्हीचे प्रभाव चकित करणारे असतात. जादूत रंजन असते, तर चमत्कार उलगड्यातून वैज्ञानिकता वाढीस साह्य होते, हे डॉ.दाभोलकरांच्या लक्षात येऊन त्यांनी सन 1982 मध्ये श्याम मानव यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन कार्य सुरू केले. मतभेद होऊन स्वतंत्रपणे सुरू केलेले कार्य 1989 पासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावाने करत त्यांनी भाषणे, संवाद, प्रात्यक्षिके, शाखांचे संघटन, आक्रमक आंदोलने, जाहीर वादविवाद आदींद्वारे समाजात विवेक व विज्ञान रुजवले. ते करत लेखनात सातत्य राखल्याने आजवर 15 ग्रंथ प्रकाशित होऊ शकले.

डॉ.दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांचे समग्र मराठी साहित्य हिंदी भाषांतरित झाल्याने त्यांचे जीवन-कार्य व विचारास राष्ट्रीय परिमाण लाभले. डॉ. दाभोलकर यांच्या 15 ग्रंथांपैकी आता अकरा ग्रंथ हिंदीत आल्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचे आणि समाज विवेकशील व वैज्ञानिक बनवण्याचे कार्य या देशाच्या राष्ट्रीय आचार-विचाराचा अंगभूत भाग बनतो आहे. त्यांचं साहित्य सर्वसामान्य मराठी समाज ज्या आस्थेने आत्मसात करतो आहे, त्यास राष्ट्रीय धोरणाची जोड मिळाली; तर युरोपातील प्रबोधन पर्वानंतर (रेनेसाँ) जसा तो खंड प्रगल्भ, विवेकशील, वैज्ञानिक, धर्मनिरपेक्ष झाला तसा उपखंडसदृश भारत देशही होण्यास वेळ लागणार नाही. पुरोगामी महाराष्ट्राचा जीवनव्यवहार गेल्या काही वर्षांत झपाट्याने जातीय व धार्मिक लोकव्यवहाराकडे अग्रेसर होतो आहे. याला कारण राज्याचे राजकारण वेगाने प्रादेशिक, स्थानिक बनत संकुचित नि संकीर्ण होत आहे.

महाराष्ट्रातील बुद्धिजीवी वर्गाने समाजनेतृत्व सोडल्याने व वैचारिक साहित्याची उपेक्षा केल्याने हे अरिष्ट ओढवले आहे. मराठी साहित्य, समीक्षा व संशोधनाच्या पानावर डॉ.नरेंद्र दाभोलकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. नरहर कुरुंदकर, डॉ. बाबा आढाव, हमीद दलवाई, डॉ. भा. ल. भोळे, गं. बा. सरदार हे सतत रकान्यात राहण्याने महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा धूसर बनतो आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहूमहाराजांचे जीवन, कार्य व विचारांचा उद्‌घोष एका दिशेस व लोकव्यवहार दुसऱ्या दिशेस, यातूनही ही विसंगती ठळक होते आहे. याला उपाय डॉ.दाभोलकर यांच्यासारख्या कृतिशील विचारकांची चरित्रे, साहित्य, विचारसाहित्य, समीक्षा-संशोधनाचा मध्यच नव्हे, तर मुख्य प्रवाह बनणे हाच त्यावरचा हुकूमी उपाय व उतारा होय. डॉ. दाभोलकरांचे साहित्य हे वर्तमान समाजव्यवहाराचे विश्लेषण आहे. ते भारतीय राज्यघटनास्वीकृत पंचशील तत्त्वांवर उभे आहे. ज्यांना महाराष्ट्र पुरोगामी व्हावा असे आतून-बाहेरून वाटते, अशा प्रामाणिक सचोटीच्या बुद्धिवादी वर्गाने आपली बुद्धी, हृदय यात गुंतवण्याची गरज आहे. उद्‌घोषणा, उच्चारव उन्माद निर्माण करतो; तर कृती मानवी जीवनाचा कायाकल्प घडवत असते, हे विसरून चालणार नाही.

लेखक म्हणून डॉ.दाभोलकरांचे पहिले पुस्तक ‘कबड्डी’ (1980) आले. सुमारे दीडशे पानांच्या या पुस्तकात डॉक्टरांनी या खेळाचा इतिहास, चढाई, बचाव, संघनायकत्व, खेळाचे मानसशास्त्र, खेळाचे नियम, दुखापती, पूर्वतयारी, आंतरराष्ट्रीय प्रांगण हे सर्व समजाविले आहे. हे पुस्तक सध्या अनुपलब्ध असून त्याच्या पुनर्मुद्रणाची गरज आहे. ती अशासाठी की, या खेळावर इतके सर्वस्पर्शी पुस्तक बाजारात नाही. शिवाय नवी एकलकोंडी झालेली आणि घरकोंबडी पिढी नव्या काळात मैदानात उतरवून मर्दानी बनवायची असेल, तर कबड्डीसारख्या देशी सामूहिक खेळाच्या पुनरुज्जीवनास पर्याय नाही. हा खेळ माणसास संघर्षशील स्पर्धक बनवतो. स्पर्धा परीक्षेच्या नादी लागलेली तरुणाई आत्मविश्वासाच्या ध्यासात तारुण्य गमावत मोठ्या संख्येने बेरोजगार-बेकार बनत आहे. बौद्धिक स्पर्धांचा जीवघेणा पाठलाग दमछाक करणारा आहे. नोकरीच्या रोज आखडत जाणाऱ्या प्रांताच्या पार्श्वभूमीवर कबड्डीची स्पर्धा त्याला परिस्थितीवर मात करण्याची जीवनशैली देईल. तो कृतिशील, उत्पादक, समाजशील नागरिक बनेल.

अंधश्रद्धा निर्मूलन कार्यावरील डॉक्टरांचे पहिले पुस्तक ‘भ्रम आणि निरास’ (1985) हे दैवी शक्ती नि चमत्कारात गुंतलेल्या समाजास त्यांच्या संभ्रमित स्थितीस छेद देत वैज्ञानिक वास्तव समजावते. देशात अंधश्रद्धेच्या दृष्टीने 1985 चा काळ एका अर्थाने आणीबाणीचा होता. बुवाबाजीविरुद्ध बंड करणे, दंड थोपटणे आजच्या इतके खासच सोपे नव्हते. अशा काळात या पुस्तकाद्वारे डॉ.दाभोलकर यांनी अंधश्रद्धारूढ व बद्ध समाजास वशीकरण, भानामती, पुनर्जन्म यांच्या विश्वासातून मुक्त होता येते, हे वैज्ञानिक सत्याच्या आधारावर सांगून ते सर्व कसे भ्रम आहे, हे पटवून दिले. या पुस्तकाला थोर विचारवंत, स्वतंत्रता सेनानी ना.ग. गोरे यांची प्रस्तावना असून त्यांनी त्यात स्पष्ट म्हटले आहे की, ‘अंधश्रद्धेचे भारताला लागलेले खग्रास ग्रहण श्री. दाभोलकरांच्या प्रयत्नाने अंशत:च जरी सुटले, तरी ते इष्टच ठरणार आहे. विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आलेला असताना अंधश्रद्धेची झापडे बांधून ठेचकाळत राहण्यात शहाणपणा तो काय?’ त्यांच्या या प्रश्नातच या पुस्तकाचे सर्व महत्त्व सामावलेले असल्याने या पुस्तकातील विचार आपला आचारधर्म बनायला हवा.

डॉ.दाभोलकरांनी यानंतर ‘अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ (1989) हे पुस्तक लिहिले, ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे वर्तमान संपादक प्रा. प. रा. आरडे यांच्यासह. समाजात प्रामुख्याने संमोहन, अंगात येणे, प्लँचेट, फलज्योतिषसारख्या अंधश्रद्धांच्या आधारे विविध प्रकारचे अवैज्ञानिक दावे करत श्रद्धाळू माणसांचं शोषण करणारी जी यंत्रणा समाजात सक्रिय असते; अशांचे भांडे फोडण्याचे कार्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विविध प्रात्यक्षिके, लेखन, शिबिरे, मेळाव्यांतून करत जे लोकप्रबोधन केले, त्याच्या दस्तावेजीकरणाच्या रूपात हे पुस्तक पुढे येते. ‘आधी केले, मग सांगितले’ हे डॉ.दाभोलकरांच्या समग्र वाङ्‌मयाचे सूत्रवाक्य म्हणून सांगता येते.

‘अंधश्रद्धा विनाशाय’ (1995) हे बोलका पत्थर, लंगरचा चमत्कार, भानामती, करमअली दरवेश, निर्मलामाता, भुताचा शोध, जटा निर्मूलन आदी पर्दाफाश व प्रबोधनकार्य, आंदोलन शब्दबद्ध करणारे पुस्तक आहे. डॉ.दाभोलकरांच्या सर्व पुस्तकांना अनेक आवृत्त्या होण्याचा लोकाश्रय लाभला, त्यामुळे त्यांचे वाङ्‌मय सर्वसामान्य माणसांच्या अंधश्रद्धामुक्तीचे वरदान सिद्ध झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य नवशिक्षित सर्वसाधारण माणूस ज्या असोशीने वाचतो, त्याच आस्थेने ही माणसं डॉ.दाभोलकरांचे साहित्य वाचताना दिसतात. त्यांना यात त्यांचा भ्रमनिरास करण्याचा मार्ग जसा सापडतो, तसेच सत्य काय हे कळण्याची शक्यता त्यातून त्यांना उमजते. समाजाच्या सर्व स्तरांत व प्रांताच्या काना-कोपऱ्यात अंधश्रद्ध समाजाचे शोषण, नाडवणूक, नागवण्याचे जे प्रकार या साहित्यवाचनातून सर्वसामान्यांच्या हाती येतात; त्यातून त्यांचे शोषण, गुलामी नष्ट होते. हे या साहित्याचे मानवी परिवर्तनसंबंधी योगदान होय.

‘विचार तर कराल?’ (1994) हे शीर्षकाप्रमाणेच वाचकास विचारप्रवृत्त करणारे पुस्तक आहे. हे चौथे पुस्तक दैनिक पुढारी आणि दैनिक लोकमतमधील लोकप्रबोधनार्थ केलेल्या स्तंभलेखनाचा संग्रह होय. वृत्तपत्रीय लेखनात कॉलम, सेंटिमीटर, शब्दसंख्या यांच्या आटोपामुळे या लेखनास संक्षिप्त शैलीचे रूपडे आले आहे. या स्तंभमजकुरापूर्वी डॉ.दाभोलकर यांनी या पुस्तकास पार्श्वभूमी व प्रस्तावनेसदृश लिहिलेले दोन दीर्घ लेख ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ आणि ‘धर्मचिकित्सा व विवेकवाद’ हे वाचताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या लेखांची वा प्रा.नरहर कुरुंदकरांच्या तार्किक लेखनपद्धतीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. हा प्रारंभिक सुमारे पन्नास पानांचा मजकूर विषयाच्या सर्वांगांना स्पर्श करणारा, खंडनमंडन शैलीने युक्त असा आहे. नि:संदिग्ध प्रतिपादन हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या लेखनाचे असलेले बलस्थान, त्याची प्रचिती देणारं हे लेखन ठरतं. आपलं लेखन आकर्षक करण्याकडे दाभोलकर कधीच लक्ष पुरवत नाहीत. उलटपक्षी, ते विचारदृष्ट्या तर्कसंगत आणि सुस्पष्ट कसे होईल, असा प्रयत्न त्यांच्या समग्र साहित्यातून आढळतो. अस्वस्थ होऊ इच्छिणाऱ्यांसाठीच डॉ. दाभोलकर लिहीत राहिले, हे मात्र खरं! स्तंभलेखनाचे 28 तुकडे आजचे ‘ब्लॉगलेखन’. त्याचा हा सुंदर वस्तुपाठ.

मन, मनाचे आजार, देवकल्पना यांचा विचार मानसशास्त्राच्या अंगाने करण्याचा डॉ.दाभोलकरांचा प्रयत्न ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ (1996) या पाचव्या पुस्तकात दिसून येतो. ही त्यांच्या लेखनाच्या वैज्ञानिक बैठकीची निजखूण होय. डॉ. दाभोलकर यांनी महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून भाषणे दिली. त्या भाषणांना लेखरूप देऊन हे पुस्तक आकाराला आलं. नशीब, नीती, देव यांनी भारतीय समाज ग्रासलेला आहे. त्याची भय-भ्रम-मुक्ती हा दाभोलकरांच्या लेखनाचा ध्यास नि ध्येय आहे. नव्वदोत्तर कालखंडात त्यांच्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या येत राहणे, पुस्तकांना पुरस्कार लाभणे, प्रश्नांचा भडिमार, कार्य रोखण्यासाठी सनातनी-धर्मांधांचे न्यायालयात खटले दाखल होणे; भाषण, आंदोलन संचारबंदीचा पोलिसांचा चौकशीचा लकडा नि ससेमिरा यातून कार्य नि लेखन निरंतरता राखणं हे प्रतिबद्ध कार्यकर्ताच करू शकतो. त्यांच्या हत्येचं मूळ या अपराजेय सातत्यात आहे. दहशतवादी एक तर आत्महत्या करतात, नाही तर दुसऱ्याची हत्या.

‘लढे अंधश्रद्धेचे’ (1999) आणि ‘तिमिरातुनी तेजाकडे’ (2010) ही दोन पुस्तके अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा इतिहास, विचार, आचार, सिद्धान्त याचे ग्रंथ होत. त्यांचं वाचन व तसा व्यवहार या राष्ट्रात घडेल, तर खऱ्या अर्थाने हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष बनेल. यास जोडूनच ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ (2002) या बुवाबाजीचा समग्र पंचनामा करणाऱ्या ग्रंथाकडे पाहता येतं. हे क्रमाने दहावं पुस्तक. पुस्तकांची दशकपूर्ती करत डॉ.दाभोलकर आपल्या साहित्यलेखनाची चरमसीमा गाठतात. हे पुस्तक बुवाबाजीच्या वस्त्रहरणास वाहिलेलं आव्हानात्मक लेखन होय. दाभोलकर हे आवेश नि आवेगाच्या पलीकडे सतत संयत राहत. ‘तेच पतित की, जे आखडती प्रदेश साकल्याचा’ म्हणणाऱ्या केशवसुतांना (कृ. के. दामले) जो पंथहीन देश अपेक्षित होता, त्याची पुढची पायरी वैज्ञानिक व विवेकशील भारतनिर्मितीचे स्वप्न म्हणून डॉ.दाभोलकरांचे लेखन हा मराठी साहित्य क्षितिजाचा जाणीव विस्तार म्हणून पाहावा लागतो.

‘विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’ (2009) हा सन 2003 ते 2008 या काळात लिहिलेल्या विविध वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह आहे. यात वरील पाच वर्षांच्या काळात ‘अंनिस’ने केलेले विविध उपक्रम, लढे यांची विविध समकालीन घटना-प्रसंगांची प्रतिक्रिया प्रतिबिंबित झाली आहे. यात अघोरी प्रथांविरुद्ध कायदा करण्याची मागणी लावून धरण्याचा आग्रह अधोरेखित होतो. ‘ठरलं... डोळस व्हायचंच!’ (2010) या शीर्षकात जी प्रतिज्ञाबद्धता आहे, त्या जिद्दीने डॉ. दाभोलकरांनी ‘विवेकवाहिनी’च्या माध्यमातून महाविद्यालयीन युवक-युवतींपुढे जी भाषणे दिली, त्याचं हे लेखरूप. सुमारे 40-43 भाषणांचे सार या पुस्तकात आहे. तरुणाईचं हे प्रेरक पुस्तक. ‘प्रश्न मनाचे’ (2012) हे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकरांबरोबर लिहिलेलं पुस्तक. याला समुपदेशनशैली लाभली आहे. मानसिक आरोग्य, शंका-समाधान, संकटमोचन अशा अंगांनी लिहिलेलं पुस्तक मानसिक आरोग्य जपण्याचं व मनोविकारांचा निरास करण्याचं कार्य करतं. निराशा, व्यसन, फिट्‌स, लैंगिक समस्या, स्त्रियांचे आजार, वृद्धांचे विकार, लहानांचे प्रश्न- असा मोठा पैस या पुस्तकास लाभला आहे. ‘मती-भानामती’ (2013) हे पण ‘अंनिस’ कार्यकर्ते माधव बागवेंंसह केलेलं लेखन. यात मराठवाड्यातील भानामती (भुंकणारी)चा संबंध अंगात येण्याशी कसा असतो, त्याचे प्रामुख्याने विवेचन आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर ‘साधना’ने काढलेलं नि विनोद शिरसाठ यांनी संपादिलेलं ‘समतासंगर’ (2014) आणि ‘प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे’ (2016) ही दोन्ही पुस्तके म्हणजे लेख, मुलाखती, भाषणे, भाष्य आदींचा संग्रह होय.

हे सर्व साहित्य मी वेळोवेळी, प्रसंगपरत्वे वाचले आहे. ते वाचून जे आकलन झाले, त्यावरून असे म्हणता येते की- या सर्व पुस्तकांची धडपड अंधश्रद्धामुक्तीची नि सामाजिक घडणीची आहे. तुम्हाला माणूस बदलायचा असेल; तर त्याच्या परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा, भ्रम, स्वप्न, धारणा यांना हात घालावाच लागतो. ‘सापही मरू नये नि काठीही तुटू नये’ असा बचावाचा खेळ खेळणारा समाज धर्मश्रद्धा, अनिष्ट प्रथा, शोषणावर उभ्या चाली-रीती, देव, दैव, नशीबग्रस्त समाजाचा उद्धार कधीच करू शकणार नाही. डॉ.नरेंद्र दाभोलकरांचे साहित्य ‘नरो वा कुंजरो वा’ पठडीतले नाही. ‘हा सूर्य - हा जयद्रथ’ असा स्पष्ट पवित्रा घेणारे आहे. हे साहित्य म्हणजे भिडभाड न बाळगता विवेकाच्या कसोटीवर केलेले लेखन आहे. एकविसाव्या शतकाचा धर्म, जात, पंथ, अंधश्रद्धा, रूढी, चाली-रीती यांना छेद देत नवमानवतावाद रुजवणारे हे साहित्य आहे. यात समाजधारणांमध्ये मूलभूत (बेसिक/रॅडिकल) बदल, परिवर्तनाचा आग्रह स्पष्ट आहे. हे वैचारिक साहित्य बोलघेवडे प्रवचन नाही, तो कृतिप्रवण वस्तुपाठ आहे.

हे साहित्य नव्या युगाचा अभ्यासक्रम बनेल, तर नव्या पिढीत युगांतर-मन्वंतर घडून येईल. ते आले पाहिजे. कारण कोणत्याही शोषणापासून मुक्त समाज जोवर निर्माण होणार नाहीत, तोवर मानव अधिकारांचे रक्षण होणार नाही. माणसाचं वंचितपण व शोषण हे जात, धर्म आदींपेक्षा जाणिवांच्या आधारावर अधिक खोल व दीर्घ काळ होत राहतं. हे साहित्य ते भान देतं. ते एक असं लोकशिक्षण आहे, जे व्यक्तीला बदलत समाजपरिवर्तनाचा परिघ व फेर रुंदावत राहतं. ते भाकरी परतत राहतं, म्हणून परिवर्तनशील बनतं. हे सारं दाभोलकर कुणाचा अनादर न करता अहिंसक मार्गाने करतात. कारण महात्मा गांधींइतका कुणाचाच प्रभाव त्यांच्यावर नाही, हे त्यांनी मान्य केलं आहे. म्हणून कायदा झाला नाही, म्हणून ‘थोबाडीत मारो’ आंदोलन करत आत्मक्लेश करून घेतात; पण दुसऱ्याचा उपमर्द, अनादर त्यांनी कधी केला नाही. विचारविरोध व व्यक्तिद्वेष/क्लेश यात त्यांनी कायम विवेकशील सुरक्षित अंतर पाळले. ती त्यांची सभ्यता-संस्कृती होती आणि संस्कार- सभ्यताही! मूलतत्त्ववादास त्यांचा विरोध माणसाच्या अज्ञानाधारित शोषणावर उभा होता. सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्त मानव समाजाचं स्वप्न हा त्यांच्या साहित्याचा मूलाधार, पाया व स्वप्न होते. ते पूर्ण करणे म्हणजे त्यांचे कृतिशील स्मरण होय.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनीलकुमार लवटे,  कोल्हापूर, महाराष्ट्र

माजी प्राध्यापक, प्राचार्य, लेखक, हिंदी भाषा प्रचारक, समाजसेवक 


Comments

  1. DEEPAK DIGAMBAR MANWAR- 23 Aug 2020

    खरं च शिक्षण क्षेत्रात जो पर्यंत हया गोष्टी अंतर्भूत होणार नाही तोपर्यंत समाजमन पूर्णतः बदलणे अतिशय कठीण काम आहे,

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके