डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वाईचे शास्त्रीजी : रेषांच्या बाहेरचं व्यक्तिचित्र

वाईचे शास्त्रीजी खासगी बैठकीत गोष्टीवेल्हाळ, तर समाजजीवनात मनुष्यसंग्रही. या संग्रहात राजकारणी, बुद्धिजीवी, कार्यकर्ते, संपादक, पत्रकार तसेच नि तितकेच सर्वसामान्यही, पण रोजची ऊठबस ज्ञानवंत, प्रज्ञावंतांतच. सतत ग्रंथ, कोश, वृत्तपत्रे, नियतकालिकांत गढून जाणारे शास्त्रीजी सभा, समारंभ, परिषदा, बैठका आदींमध्ये तितकेच समरस. लिहिण्याची समाधी शिस्तीची. पूर्ववाचन, संदर्भ संग्रह, चिंतन-मननानंतर त्यांचं लेखन साकारायचं. स्मरणशक्ती तल्लख, तितकाच तर्कही! लेखनात मुद्देसूदपणा ठरलेला. पण पांडित्यास मात्र त्यांना फाटा नाही देता आला.   

गेल्या शतकाच्या आठव्या दशकात (1970-80) मी शिक्षक होतो, तेव्हा शालान्त परीक्षेसाठी हिंदीला असलेल्या निम्नस्तरीय पाठ्यपुस्तकात असलेला ‘कृष्ण- भक्ती’ निबंध शिकवत असे. तो निबंध आचार्य विनोबा भावे यांचा होता. त्यात सृष्टी निर्मिती, मनुष्य आणि त्याच्या घडण्या-बिघडण्याची चर्चा आहे. आत्मपरीक्षण, मौन आणि कर्मयोगाने माणसाचं जीवन मधुर होतं, असं विनोबा त्यात समजावतात. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचं जीवन, कार्य, विचार समजून घेत असताना, मला तो निबंध वारंवार आठवत राहतो नि त्यामुळेच कदाचित वाईच्या या शास्त्रींचं ‘फेअर स्केच’ माझ्यापुढे उभं राहतं. 

हा माणूस बहुप्रज्ञ खरा. अखंड जीवन ज्ञानसाधना. वाईस ते शास्त्री, पंडित होण्यासाठी आले. इथे ते संस्कृत शिकले. गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणातून व्युत्पत्ती, व्याकरण, न्याय, वेदान्त, तर्कशास्त्र शिकत ते समांतर इंग्रजी, इतिहास, भूगोल, भौतिकशास्त्र, गणित शिकले. मूळ भारतीय शिक्षण पद्धती ही आंतरविद्याशाखीयच होती. आज ‘नवे शिक्षण धोरण - 2020’मध्ये ज्या ‘लिबरल आर्ट्‌स’चं समर्थन आहे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्याचं रोलमॉडेल व प्राज्ञ पाठशाला तत्कालीन नालंदा, तक्षशीलाची प्रतिकृती आहेत. वाईच्या या शास्त्रींचं जीवन म्हणजे निरंतर मतांतर, वेषांतर नि परिवर्तनाचा ध्यास. त्यांच्या बालपणीपासून ते मृत्यूपर्यंतच्या नुसत्या छायाचित्रांवरून नजर फिरवली तरी या माणसाचा कायाकल्प लक्षात यायला वेळ लागत नाही. वाईस तेरा वर्षं पूर्ण झाल्यानंतर ज्ञानलालसेनं आलेला बटू लक्ष्मण, वाठार रेल्वे स्टेशनपासून वाईस बैलगाडीतून आला तेव्हा जटाधारी, कटीस लंगोटी, अंगावर तिरके जानवे, गळ्यात ताईत, हातात काठी असलेला साक्षात ज्ञानसाधक होता (1914). पुढे धोतर, अंगरखा नि खांद्यावर शाल आली (1926). पुढे जटा, अंगरखा गेला नि चक्क गोटा, शेंडी  नि अंगावर उपरणे, धोतर आले. हा काळ 1930च्या कायदेभंग चळवळीचा. पुढे डोक्यावर गांधी टोपी, अंगावर नेहरू शर्ट नि कमरेला धोतर आले. डोळ्यांवर चश्मा आला. हा काळ ‘चले जाव’ चळवळीचा; पण तर्कतीर्थांसाठी रॉयवादी होण्याचा. सन 1960 नंतर म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते अध्यक्ष झाले. लाल दिव्याची गाडी आली, तसे अंगावर जॅकेट आले. त्या वेळच्या बहुधा सर्व मंत्र्यांचा तो अघोषित पोशाख होता, तो पुढे कायम राहिला. माणसात आधी मतांतर घडतं. वेषांतर ही मतांतराची परिणती असते. 

लक्ष्मणशास्त्री जोशी सन 1923 ला ‘तर्कतीर्थ’ पदवी प्राप्त करून वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत शिक्षक झाले. शिक्षक झाल्यावर आपले गुरू नारायणशास्त्री मराठे यांच्याबरोबर धर्मसभा, पंडित, परिषदा इत्यादींमध्ये भाग घेत वादविवाद करू लागले. वादविवादात प्रारंभीपासून त्यांनी जात, धर्म, परंपरा, रूढी आदींच्या सुधारणांचा आग्रह धरला. सन 1925 च्या दरम्यान नारायणशास्त्री मराठे यांच्या पुढाकार नि मार्गदर्शनाखाली जे धर्मसुधारक मंडळ अस्तित्वात आले, त्यात तर्कतीर्थ शास्त्रीजी सक्रियतेने आघाडीवर होते. शुद्धी आणि प्रायश्चित्तसंबंधी त्यांची मते पुरोगामी असल्याने सनातन्यांचा त्यांना विरोध राहिला. अल्पमतात असूनही ते स्वमतावर दृढ राहत आले. पण पुढे त्यांच्या लक्षात आले की हिंदू धर्मातील पंडित, पुरोहित, वेदविद्यासंपन्न, महामहोपाध्याय म्हणवून घेणारे आचार्य, शंकराचार्य, प्रभृती- शब्दप्रामाण्य, वेद अपौरूषेय आहेत, या मतापलीकडे जाण्यास तयार नाहीत. त्यांच्याशी वादविवाद करणे म्हणजे कपाळमोक्ष करून घेणे होय, हे लक्षात घेऊन त्यांनी धर्मक्षेत्र सोडून स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला गुंतवून घेतले. 

1930 ते 1940 हा तर्कतीर्थ शास्त्रीजींच्या जीवनातील स्वातंत्र्यलढ्याचा काळ. प्राज्ञ पाठशाळेत तळेगावच्या समर्थ विद्यालयातील जे शिक्षक, विद्यार्थी आले होते, ते राष्ट्रीय बाण्याचे होते. ते क्रांतिकारी विचारांचे समर्थक होते. सन 1921 पासूनच खरे तर तर्कतीर्थ महात्मा गांधींच्या विचारांकडे आकृष्ट झाले. त्या वेळी बारडोली लढ्याच्या दरम्यानचा महात्मा गांधी आश्रमातील निवासकाळ व सहवास हेही या परिवर्तनाचे एक कारण होते. त्या आधी ते लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रभावीत होत असत. सन 1930 च्या कायदेभंग चळवळीत प्राज्ञ पाठशाळेचे विद्यार्थी वाई, कराड येथे प्रभातफेऱ्या काढत. भूपाळ्या म्हणत. ‘आम्ही पांडवांसारखी शिस्त पाळू’, अशी प्रतिज्ञा घेत. शिक्षक स्वातंत्र्य-जागृतीची व्याख्याने देत. त्या तर्कतीर्थांची व्याख्याने श्रोत्यांत क्षोभ निर्माण करीत. ती प्रभावी असायची. त्यातून लोकजागृती व लोकसंघटन घडून यायचे. मिठाच्या सत्याग्रहानंतर स्वातंत्र्य आंदोलन खेड्यापाड्यांत पोहोचवण्याचा निर्णय ‘वॉर काउन्सिल’नी घेतल्यावर तर्कतीर्थ आपले सहकारी मित्र श्री.शं.नवरे, द्वा.भ.कर्णिक, वसंतराव कर्णिक प्रभृतींसह नगर, नाशिक, धुळे परिसरात जनसंघटन कार्यात सक्रिय झाले. त्यातून कळवण, बागला, नागपूरचे जंगल सत्याग्रह यशस्वी झाले. या लढ्यातच तर्कतीर्थांना दोनदा अटक झाली व तुरुंगवास भोगावा लागला. 

तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांनी 1932 च्या दरम्यान धर्मसुधारणा प्रयत्नांना सामाजिक उपक्रमाची जोड देऊ केली. 24 सप्टेंबर 1932 या दिवशी डॉ. आंबेडकर आणि म.गांधी यांच्यामध्ये दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याबाबत एकमत झाले. या पुणे करारानंतर महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता निवारणाकडे लक्ष केंद्रित केले. हिंदू धर्म व प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून महात्मा गांधी सनातनी आणि पुरोगामी विचारांच्या धर्मपंडितांशी येरवडा कारागृहात चर्चा करीत. त्या वेळी नारायणशास्त्री मराठे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रकृतिधर्माचा व ग्रंथांचा आधुनिक अन्वय म.गांधींना समजावून सांगत. त्यातून गांधींच्या अस्पृश्यता निवारणासंबंधी दृष्टिकोन तयार झाला. या विचारांचा प्रभाव गांधींवर इतका पडला की त्यांनी आपले लक्ष राजकीय आंदोलनाकडून सामाजिक कार्याकडे केंद्रित केले. सेवाग्राम येथे सन 1936 मध्ये आश्रम स्थापन करण्यापूर्वी सन 1933 मध्ये येरवडा तुरुंगातून बाहेर आल्यावर ‘हरिजन यात्रा’ करून या प्रश्नाचे राष्ट्रीय स्वरूप समजून घेतले. सेवाग्रामला आल्यावर तपभर महात्मा गांधींनी खादी, ग्रामोद्योग, सफाई आदी सामाजिक उपक्रमांद्वारे भारतघडणीचा कार्यक्रम हाती घेतला. या दरम्यानच सन 1933 मध्ये आपला सर्वांत धाकटा मुलगा देवदास याचा राजाजी यांची कन्या लक्ष्मीशी आंतरजातीय विवाह करून महात्मा गांधी यांनी एक पाऊल पुढे उचलले व पुढे आयुष्यभर जपले. त्याची प्रेरणा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीच होते. त्यांनी या विवाहाचे पौरोहित्य केले, म्हणून  सनातनी ब्रह्मवृंदानी तर्कतीर्थांवर बहिष्कार टाकला होता. असेच पौरोहित्य त्यांनी सन 1955 मध्ये सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण कार्यक्रमप्रसंगी केले होते, ते एकाच कारणासाठी की- ते मंदिर हरिजनांना खुले करण्यात येणार होते. त्या वेळीही ब्रह्मवृंदाने तर्कतीर्थांवर बहिष्कार टाकला होता. इतकेच नव्हे तर या विरुद्ध वाईच्या वसंत व्याख्यानमालेत पुण्याच्या अभ्यंकर शास्त्री यांची व्याख्याने योजली होती; तेव्हाही तर्कतीर्थांनी एक व्याख्यान देऊन सनातनी धर्मग्रंथांतील संदर्भ सोयीस्कर व अनुकूल तेवढेच सांगून समाजाला कसे फसवतात, ते सप्रमाण मांडून आपले मत धाडसाने व्यक्त करण्याची परंपरा कायम राखली होती. धर्म म्हणजे ‘बाबा वाक्यं प्रमाणम्‌’ नव्हे; तर परिस्थितीप्रमाणे धर्म परिवर्तनाचा अधिकार समाजास असतो, हे कृतिशील पद्धतीने समाजात रुजविण्याचे कार्य करणारे ते ‘कर्ते धर्मसुधारक’ होते. 

तर्कतीर्थांचे चित्र, चरित्र नि चारित्र्य ते कसे दिसत, काय पोशाख करीत, काय खात-पीत यांवर रेखाटणं हे त्यांचं ‘रफ स्केच’च. ‘फेअर स्केच’ म्हणाल तर त्यांचं लेखन,  वाचन, भाषण, संपादन, परीक्षण, प्रस्तावना, मुलाखती, भाषांतरे, पत्रव्यवहार हेच. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सन 1927 ते 1994 अशा सुमारे सात दशकांत दोनशेहून अधिक लेख लिहिले. ते धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, राजकारण, समाजकारण, संस्कृती, इतिहास, मानसशास्त्र, नीतिशास्त्र, कला, भाषा, साहित्य, विज्ञान, विविध वाद, व्यक्ती, विचार, काव्यशास्त्र, तंत्र, मंत्र, तंत्रज्ञान अशा परस्पर पूरक व परस्पर विरोधी विषयांवर. कोणताही विषय मुळात समजून घ्यायचा व मग लिहायचा हा त्यांचा वस्तुपाठ. त्यांना मानसशास्त्रातील पंथ, संप्रदाय, शाखा माहीत होत्या. ‘मानसशास्त्रातील दोन आधुनिक संप्रदाय’ यावर त्यांचं भाषण मिळू शकतं आणि ‘मानस-लिंगपूजा’ विषयावर लेखही. विश्वकोशांतील नोंदींवर नजर फिरवली तरी लक्षात येतं, ते त्यांचं बहुश्रुतपण व बहुआयामी वाचन आणि चिंतन. लेखनात आणि व्याख्यानात कशाचंच वावडं नसतं. वेद, वाद, व्यक्ती, संस्कार, श्रद्धा, अंधश्रद्धा, ईश्वर, भूत-प्रेत, संत यांवर ते समरसून लिहिताना दिसतात. ‘प्राचीन भारतीय संस्कृतीतील मद्यविषयक आचार संहिता’ विषयावर तर्कतीर्थ लिहून आपण सोवळे शास्त्रीजी नाही हे सिद्ध करतात, तर दुसरीकडे ‘गांधीवादाच्या थडग्यावर उभारलेला नेभळा सुधारणावाद’ लिहून आपण कोणा व्यक्ती वा विचाराचे अंध भक्त नाही, हे स्पष्ट करतात. सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवात विचारापेक्षा व्यवहार, कृती, श्रेष्ठ असल्याचे बजावत मानवेंद्रनाथ रॉय यांना काय वाटेल याचा ते विचार करत बसत नाहीत. ते धर्मांध नव्हते. म्हणून ‘हिंदू धर्म समीक्षा’सारखा ग्रंथ लिहू शकले. मौलिक विलक्षणतेचं त्यांना अमर्याद आकर्षण होतं. ‘मूलत: विरोध उत्पन्न करून ती मला विचारास प्रवृत्त करते’, असं त्यांनी एके ठिकाणी लिहिलं आहे. श्रद्धा आणि विचारांचं द्वंद्व घेऊन ते जगले. पण त्यांच्याशी कठोर फारकत मात्र त्यांना घेता आली नाही. शंकराचार्य भेट, मंडल आयोग आदी प्रसंगांतून ते स्पष्ट होतं. ते पुरोगामी होते, असं म्हणण्यापेक्षा ते स्वतंत्र मताचे बुद्धिवादी होते, असं म्हणणं अधिक सयुक्तिक होईल. त्यामुळे समकालाशी विरोध करण्याचं धारिष्ट्य ते दाखवू शकले; ही त्यांची स्वतंत्र प्रज्ञा होती. 

वाईचे शास्त्रीजी खासगी बैठकीत गोष्टीवेल्हाळ, तर समाजजीवनात मनुष्यसंग्रही. या संग्रहात राजकारणी, बुद्धिजीवी, कार्यकर्ते, संपादक, पत्रकार तसेच नि तितकेच सर्वसामान्यही, पण रोजची ऊठबस ज्ञानवंत, प्रज्ञावंतांतच. सतत ग्रंथ, कोश, वृत्तपत्रे, नियतकालिकांत गढून जाणारे शास्त्रीजी सभा, आठवण माधवराव बागल यांनी लिहिली आहे. त्यांनी तर्कतीर्थलिखित ‘जडवाद’ हे पुस्तक वाचले. पण त्यांना जडवादावर लिहिलेली इंग्रजी पुस्तके सोपी समारंभ, परिषदा, बैठका आदींमध्ये तितकेच समरस. लिहिण्याची समाधी शिस्तीची. पूर्ववाचन, संदर्भ संग्रह, चिंतन-मननानंतर त्यांचं लेखन साकारायचं. स्मरणशक्ती तल्लख, तितकाच तर्कही! लेखनात मुद्देसूदपणा ठरलेला. पण पांडित्यास मात्र त्यांना फाटा नाही देता आला. त्याची एक वाटली. जडवादातील मराठी शब्द समजण्यासाठी इंग्रजी डिक्शनरी उघडावी लागली, हे ऐकून तर्कतीर्थ म्हणाले, ‘‘हे काहीच नाही. मी हे पुस्तक एका मित्रास पाठवले, तर तो चक्क म्हणाला की, पुस्तक वाचनीय, मननीय व अभ्यासनीय आहे, पण आपण ते मराठीत लिहिले असते, तर बरे झाले असते.’’ माधवराव बागल यांची टीका त्या मित्रापेक्षा किती तरी सौम्य असल्याचे मान्य करून तर्कतीर्थ म्हणाले होते की, प्रयत्न करूनही सोपे लिहायला येतच नाही मला!- हा प्रांजळपणा तर्कतीर्थांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता. 

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे स्नेही, सहकारी, उत्तराधिकारीही म्हणता येईल असे प्रा.मे.पु.रेगे या उभयतांना मी अनेकदा ऐकले, पाहिले आहे. वाचलेही आहे. प्रश्न पडतो की, हे दोघे एकत्र असतील, तेव्हा कोण कोणाशी काय बोलत असेल? कोण कोणाचं काय ऐकत असेल? उभयता एकमेकांच्या तर्कास महातर्क कसा देत असतील? विशेषत: प्रा.मे.पु.रेगे यांनी तर्कतीर्थांवर लिहिलेले लेख वाचत असताना पडलेले हे कोडे अद्याप न सुटलेले. ‘सुटलेली कोडी’ या शीर्षकाची मुलाखत वाचताना तर हे कोडं अधिक गूढ, न सुटणारं, न उकलणारं होत राहतं अन्‌ वाटत राहतं, अशा माणसांची तुम्ही कितीही रफ, फेअर अँड लव्हली अशी रेखाचित्रं रेखाटत राहा, त्यांचं खरं व्यक्तिमत्त्व, व्यक्तिचित्र रेषांच्या बाहेर राहतं, हेच खरं! 

(27 मे रोजी लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा 27 वा स्मृतिदिन आहे, त्यानिमित्ताने हा लेख प्रसिद्ध केला आहे.)  

Tags: नारायणशास्त्री मराठे संस्कृती साहित्य वाई प्राज्ञ पाठ शाळा लक्ष्मणशास्त्री जोशी तर्कतीर्थ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनीलकुमार लवटे,  कोल्हापूर, महाराष्ट्र

माजी प्राध्यापक, प्राचार्य, लेखक, हिंदी भाषा प्रचारक, समाजसेवक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके