डिजिटल अर्काईव्ह

तर्कतीर्थांनी आत्मकथा लिहिली नाही आणि ते चरित्राबद्दलही स्वतःला आरक्षित समजायचे, पण त्यांनी वेळोवेळी स्वतःबद्दल आत्मपर असे साधारण पंधरा लेख लिहिले आहेत - उदा. माझं वेदवाचन, मी रॉयवादी का झालो? पत्नी वारल्यानंतर त्यांनी सत्यवती बाईंबद्दल जे लिहिलं आहे ते - त्यां लेखांचं संपादन केलं, तर ते त्यांचं छोटं आत्मचरित्रच ठरेल. मला महाराष्ट्रातले दोन असे वैचारिक पुरुष दिसतात, ज्यांनी आपल्या पत्नीबद्दल अत्यंत उदारपणे पण वस्तुनिष्ठपणे लिहिलं - नरहर कुरुंदकर आणि तर्कतीर्थ. त्या दोघांनी पत्नीचं महत्त्व कळल्यानंतर, पत्नीबद्दलची अंतर्मुखता आल्यानंतर जे लिहिलेलं आहे, ते वर्तमानातील सगळ्या लोकांनी वाचलं पाहिजे.
 

प्रश्न : समग्र तर्कतीर्थ या अठरा खंडांच्या प्रकल्पातील पहिल्या खंडात तर्कतीर्थांनी विश्वकोशमध्ये केलेल्या नोंदी आहेत. त्या दीडशेहून अधिक नोंदी अवाचनीय असतील किंवा दुर्बोध असतील, असा अनेकांचा समज होण्याची शक्यता आहे; तर त्या नोंदीचं काय वैशिष्ट्यं तुम्हाला जाणवतं?

- तर्कतीर्थांनी स्वतःला नोंदींची एक शिस्त लावून घेतली आहे. ती अशी की, प्रारंभीच्या काळात त्या नोंदींचं ते संज्ञापन करतात. उदाहरणार्थ, अंतयात्रा. अंतयात्रा कशाला म्हणतात हे सर्वसाधारण माणसाला कळेल. असं ते स्पष्ट करतात. त्यानंतर अंतयात्रेची परंपरा केव्हापासून आहे इथपासून ते वर्तमानात अंतयात्रा कशी काढली जाते, हे ते स्पष्ट करतात. हे एक उदाहरण म्हणून सांगतोय. हा विस्तार त्या नोंदींमध्ये नाही, पण तर्कतीर्थांच्या subconscious मध्ये आहे. पूर्वी अंतयात्रा निघायची, तर 'राम नाम सत्य है' असा एक घोषा अंतयात्रेमध्ये सतत असायचा. पण महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर 'राम नाम सत्य है' हा घोषा बंद झाला आणि 'रघुपती राघव राजाराम' हे सुरू झालं.

काळाचं भान आपल्या नोंदींमध्ये ठेवण्याची एक लकब आणि शैली तर्कतीर्थांच्या नोंदींमध्ये दिसेल. त्या नोंदी त्या विषयाची पार्श्वभूमी सांगतात, इतिहास सांगतात आणि वर्तमानाचं रूपदेखील सांगतात. म्हणून त्या सार्वकालिक ठरतात, अशी माझी धारणा आहे. भाषेबद्दल म्हणाल, तर त्यांची वाक्यं अत्यंत सुटसुटीत आहेत. त्यांनी रचनाशास्त्रामध्ये, परिचय ग्रंथामध्येच असं लिहिलंय की, 'हा कोश एकाच वेळी सर्व विषय संग्राहक कोश आहे.' सर्व विषय संग्राहक कोशाचं वैशिष्ट्य असं आहे की, त्याचे वाचक सर्व स्तरांतले असतात. म्हणजे सर्वसाधारण वाचकही असतो, अज्ञही असतो आणि सुज्ञही असतो. तर ती नोंद अज्ञाला ज्ञान देणारी पाहिजे आणि सुज्ञाला प्रगल्भ करणारी पाहिजे. असा एक मेळ घालत सगळ्या नोंदी त्यांनी लिहिलेल्या दिसतात.

प्रश्न : तर्कतीर्थांनी लिहिलेल्या या 159 नोंदी आहेत आणि त्या विश्वकोशाच्या वेगवेगळ्या खंडांमध्ये विखुरलेल्या आहेत. मात्र समग्र तर्कतीर्थच्या या प्रकल्पाच्या पहिल्या खंडामध्ये एकत्र केल्या आहेत. त्यामुळे कोणाही जिज्ञासू वाचकांना आता ती चांगली सोय झाली आहे.

- नुसत्या एकत्रित केल्या नाहीत, तर अकारविल्हे दिलेल्या आहेत. ही पण एक विश्वकोशाची किंवा ज्ञानशाखेची शिस्त आहे. आपण शब्दकोश पाहतो की, (A) आधी असतो आणि Z शेवट असतो. तुमच्या मनातला शब्द नक्की कोणत्या क्रमाने असेल त्याचं एक भान येतं. म्हणजे अ शेवटी नाही बघायचा आणि क्ष पहिला नाही बघायचा, हे शास्त्रज्ञानही विश्वकोश सर्वसामान्यांना देतो.

प्रश्न : हा झाला पहिला खंड, जो विश्वकोशातल्या नोंदींचा आहे. दुसरा, तिसरा, चौथा नि पाचवा हे चार खंड हे भाषणांचे खंड आहेत. दुसऱ्या खंडात लक्ष्मण शास्त्रींनी 'व्यक्ती आणि विचार' यावर केलेली भाषणं आहेत. तिसऱ्या खंडात 'धर्मा'च्या संदर्भात केलेली भाषणं आहेत. चौथ्या खंडात 'साहित्या'च्या संदर्भात केलेली भाषणं आहेत आणि पाचव्या खंडामध्ये 'संस्कृती'च्या संदर्भात केलेली भाषणं आहेत. ही विभागणी तुम्ही जरा सोयीनुसार केली आहे. काही भाषणं दोन्ही तिन्हींचा संगम म्हणता येतील अशी आहेत. तर हे चार खंड म्हणजे तर्कतीर्थांनी महाराष्ट्रात आणि देश- विदेशात केलेल्या भाषणांचं एकत्रीकरण आहे. त्यांची हजारो भाषणं आहेत, तुम्ही त्यातली दोनशे भाषणं या खंडांमध्ये आणली आहेत. या भाषणांमधून दिसलेले तर्कतीर्थ आपल्याशी संवाद करतात, त्यांचा आवाज ऐकू येतो, असं काही जाणवतं?

- तो अनुभव नक्की येतो. वि.स. खांडेकर आणि तर्कतीर्थ हे महाराष्ट्रातले असे दोन सांस्कृतिक वक्ते आहेत, जे बोलताना, सर्व स्तरांतील लोकांना आपल्याबरोबर घेऊन जातात. खांडेकरांची तर मी अनेक भाषणं वाचली. 'हे मी तुम्हाला सांगतो', असं म्हणत ते श्रोत्याला आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतात. तर्कतीर्थ बोलताना श्रोत्यांमध्ये एक जिज्ञासा निर्माण करतात, त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतात. तर्कतीर्थांचं कुठलंच भाषणं हे तशा अर्थाने सामान्य भाषण होत नाही. ज्याला आपण प्रेषितांची प्रवचने म्हणतो, अशा स्वरूपाचं ते बोलणं आहे. अनेक लोकांनी तर्कतीर्थांच्या भाषणांबद्दल असं लिहिलंय की, त्यांची कितीही भाषणं ऐकली तरी आपली ज्ञानपिपासा संपत नाही. एकाच विषयावरची अनेक भाषणं ते देतात, तेव्हा त्यातलं प्रत्येक भाषण स्वतंत्र असतं. पहिल्या भाषणाचा प्रभाव दुसऱ्या भाषणावर असत नाही. सर्व विषय आकलनाची प्रचंड शक्ती त्यांच्यात होती. ती त्यांनी स्वतःच्या वाचनातून, चिंतनातून विकसित केली होती. पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे म्हणजेच ज्याला आपण प्राच्यविद्या म्हणतो त्याचे ते जितके पंडित होते, तितके आंग्लविद्या पंडितही होते. आंग्ल युगातील सर्व ज्ञान- विज्ञान शाखा आणि वादांचा अभ्यास त्यांनी केला होता. त्यामुळे केवळ भारतविद्येचं विवेचन त्यांच्या भाषणांमध्ये कधी आलं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राचीन, आधुनिक आणि समकालाबद्दल समीक्षा केल्याशिवाय त्यांचं एकही भाषण पूर्ण होत नाही.

तर्कतीर्थ मानायचे की, जेव्हा एखादी जुनी गोष्ट सांगता, तेव्हा तिचा संदर्भ वर्तमानाशी जोडल्याशिवाय त्याला अर्थ राहत नाही. नाहीतर मग ते कीर्तन होतं. कीर्तन न होता ते प्रवचन झालं पाहिजे. प्रवचन हे प्रबोधक असलं पाहिजे. प्रबोधनातून ऐकणारा श्रोतृ समाज प्रगल्भ झाला पाहिजे. अशी मांडणी करत ते भाषण द्यायचे. त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यात जवळजवळ दोन हजार भाषणं दिल्याची नोंद माझ्याकडे आहे. त्यातली अवघी दोनशे भाषणं या चार खंडांमध्ये देऊ शकलो. कारण, भाषणांच्या तितक्याच अधिकृत संहिता माझ्या हाती लागल्या. हे भाषण संग्रह करताना मी स्वतःलाच अशी शिस्त लावून घेतली, की ज्याच्या पूर्ण लिखित संहिता आहेत, तीच भाषणं आपण घ्यायची आहेत. ज्याची वृत्तं आहेत, किंवा संक्षेपाने आहेत अशी भाषणं आपण घेतलेली नाहीत. अर्थात, त्यांचा एक स्वतंत्र संग्रह करायला पाहिजे. मला या गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटतं की, तर्कतीर्थ पानाच्या टपरीच्या उद्घाटनालाही जातात आणि पान-सुपारीवर बोलतात. प्राच्यविद्येमध्ये जातात आणि तिथे ते नुसतं संस्कृतबद्दल बोलत नाहीत, तर जगातील प्राच्यविद्या काय आहे, स्पॅनिशमध्ये काय आहे, ग्रीकमध्ये काय आहे यावर बोलतात. ग्रीक मिथक काय आहे आणि भारतीय मिथक काय आहे हे समजावून सांगतात. त्यामुळे त्यांचं प्रत्येक भाषण श्रवणीय आणि विचार करण्यास भाग पाडणारं व्हायचं. 

आपण भाषणांचे चार खंड केलेले आहेत, त्यातला पहिला खंड विचार आणि तत्त्वज्ञानाचा आहे, त्यात आणखी दोन भाग केलेले आहेत स्वातंत्र्यपूर्व काळातील भाषणं आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भाषणं. असं विभाजन करण्याचं कारण असं की, त्यांचं स्वातंत्र्यपूर्व काळातील आकलन आणि स्वातंत्र्योत्तर काळातील आकलन यामध्ये जमीन-अस्मानाचं अंतर दिसेल. स्वातंत्र्यपूर्व काळातील भाषणांमध्ये सनातनी विचारांचं द्वंद्व त्यांच्या मनात दिसतं. स्वातंत्र्योत्तर काळातील सगळी भाषणं मात्र फ्रान्समध्ये झालेल्या पुनरुज्जीवनच्या (Renaissance) सावलीतली दिसतात; त्यामुळे त्या भाषणांना एक विश्वव्यापकता आलेली दिसते. त्यांची धर्मावरची काही भाषणे आहेत. उदा., हिंदुधर्मसमीक्षा, सर्वधर्मसमीक्षा, शीख पंथ आणि इतिहास आणि अशी छोटी छोटी भाषणं आहेत.

ती वाचताना असं लक्षात येईल की, हिंदू धर्माची मार्क्सवादातून समीक्षा, सर्वधर्मसमीक्षेमध्ये सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास, शीख धर्म हा धर्म नाही पंथ आहे अशी मांडणी ते करतात. कोणतीही मांडणी करताना पुराव्यानिशी, सप्रमाण विवेचन करणं हा त्यांच्या भाषणांचा एक परिपाठ असल्याचा दिसेल. त्यांची जी साहित्यविषयक भाषणं आहेत, ती प्रामुख्याने साहित्य संमेलनातील आहेत. ती वाचत असताना आपल्या असं लक्षात येईल की, साहित्य म्हणजे केवळ ललित नाही, ललितेतर साहित्याला एक वेगळं परिमाण आहे आणि त्याची समाजाला मोठी गरज आहे; वैचारिक संपन्नतेशिवाय समाज प्रगल्भ होत नाही, अशी एक धारणा घेऊन ते लिहितात. मी एक उदाहरण तुम्हाला सांगेन.

तर्कतीर्थ 1954 ला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, तेव्हा काही लोकांनी असा प्रश्न विचारला की, 'त्यांनी कादंबरी, कथा, कविता कुठे लिहिल्या आहेत ?' तर याला त्यांचे एक मित्र प्रा. गोवर्धन पारीख यांनी सुंदर उत्तर दिलंय. 'असे प्रश्न विचारणाऱ्या लोकांनी हा गैरसमज दूर करून घ्यावा की केवळ ललित म्हणजे साहित्य नव्हे. खरं तर साहित्याची वरची पातळी कशात प्रतिबिंबित असते, तर ती वैचारिकतेत आहे.' तर्कतीर्थांनी ललित साहित्य लिहिलं नाही. यावर आक्षेप घेणाऱ्यांना त्यांनी समजावलं आहे की, ललित साहित्याचा आग्रह, अभिमान हा सर्जनशीलतेचा माफकपणा (Mediocrity) आहे. म्हणून तर्कतीर्थांनी त्या काळामध्ये 'नवभारत' हे मासिक चालवलं. त्या मासिकाचं वैशिष्ट्यंच असं होतं की, तर्कतीर्थांच्या पूर्वी त्यामध्ये कथा, कविता यायच्या, पण तर्कतीर्थांनी घेतल्यावर त्याचं स्वरूप पूर्णतः वैचारिक केलं. तर विचार व्यवहाराशी बांधिलकी हे तर्कतीर्थांच्या सर्व साहित्य व्यवहाराचं एक सूत्र होतं, असं मला त्यांची भाषणं वाचताना लक्षात येतं. 

प्रश्न : आता तुम्ही उल्लेख केलात, त्याप्रमाणे त्यांची ही भाषणं पान टपरीच्या उद्घाटनाचीही आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्येही आहेत. साहित्य संमेलनामधील आहे आणि धर्म परिषदांमधीलसुद्धा आहेत. त्यातली काही भाषणं ही अतिशय लहान म्हणजे दोन, तीन, चार परिच्छेदांची आणि काही भाषणं अगदी 55 ते 60 पानांची. इतकी विविधता त्यामध्ये आहे. अशाच प्रकारची विविधता या प्रकल्पातील सहाव्या खंडात आहे; तो खंड म्हणजे वेगवेगळ्या निमित्ताने झालेल्या त्यांच्या मुलाखती वर्तमानपत्रातील, टीव्हीवरच्या किंवा व्यक्तींच्या संदर्भातील असतील. तर भाषणांकडून आपण मुलाखत खंडांकडे आलो, तर या मुलाखतींमधील विविधता आणि त्यांचं वैशिष्ट्यं काय?

- मुलाखतींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की, समकालीन प्रश्नांवरचं भाष्य असं स्वरूप आहे. तर्कतीर्थ काळाला तोडून कधीच जगले नाहीत. मला नेहमी असं वाटतं की, ज्यांना आपण सोशल लीडर म्हणतो किंवा थॉट लीडर/थॉट प्रोसेसर म्हणतो किंवा समाजातील वैचारिक शिलेदार म्हणतो, अशा सर्व लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की, आपली मतं व्यक्त करत असताना समाजातील सर्व प्रश्नांवर भाष्य करता आलं पाहिजे. लोक असं म्हणतील की, कुणीही सर्वज्ञानी असत नाही. सर्वज्ञानी नसला तरी तो सर्वस्पर्शी असू शकतो, याचं भान तर्कतीर्थांच्या मुलाखती देतात. त्यांच्या मुलाखती अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या आहेत, विशेषतः मंडल आयोगावरची त्यांची मुलाखत. सकाळमध्ये आलेली ही मुलाखत इतकी वादग्रस्त झाली होती की (आपण साधनेमध्ये बसलो आहोत), नरेंद्र दाभोलकरांनी वाईमध्ये त्यांची प्रेतयात्रा काढली होती. तर्कतीर्थांवर, त्यांच्या वाद-वक्तव्यांवर कितीदा तरी त्यांच्या मूळगावी वाईमध्ये अनेक वर्षे बहिष्काराचं शस्त्र उपसण्यात आलं होतं. कशाचीही पर्वा न करता आपल्या विचार विवेकाशी बांधील राहून, प्रसंगी एकांतवास सहन करून, तर्कतीर्थांनी आपलं वैचारिक स्वातंत्र्य जपलेलं आहे. वैचारिक स्वातंत्र्याचं व्यवच्छेदक उदाहरण म्हणजे त्यांच्या मुलाखती.

प्रश्न : त्यांच्या मुलाखती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. वेगवेगळी निमित्तं आहेत. पण प्रश्न विचारणारा आणि उत्तरं देणारे या दोन्हींमध्ये, विशेषतः मुलाखतींमध्ये उत्तरं देताना त्यांची काही वैशिष्ट्यं उदाहरणार्थ, त्यात सेन्स ऑफ ह्युमर, तत्परता किंवा हजरजबाबीपणा अशी काही वैशिष्ट्ये जाणवली ?

- अलीकडच्या काळात, तुम्ही टीव्हीवर कॉफी विथ करण असा एक मुलाखतींचा कार्यक्रम पाहत असाल, त्यात रॅपिड फायर प्रश्न असतात. वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वस्तुनिष्ठ उत्तर उदा. देव मानता का? नाही. इतकं स्वच्छ विचारांचं अधिष्ठान तर्कतीर्थांनी आपल्या मुलाखतीतून स्पष्ट केलेलं आहे. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता उत्तर देण्याचं धाडस courage of con- viction त्यांच्यात होतं. मला असं वाटतं की, ज्ञानी माणसाची लिटमस टेस्ट काय, तर आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणं. पर्वा, परिणाम यांचा विचार न करता तर्कतीर्थ मुलाखती देत राहिले. त्यामुळे महाराष्ट्राने त्यांच्या मुलाखती वाचल्या आणि सोडल्या असं कधी झालं नाही.

दुसऱ्या बाजूला, त्यांच्या मुलाखतींच्या प्रतिमुलाखती आलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या मुलाखतींवर वाद-विवाद झालेले आहेत. अगदी साधी गोष्ट सांगतो, तर्कतीर्थांनी विश्वकोशाचा परिचय ग्रंथ प्रकाशित केला. त्या परिचय ग्रंथावर महाराष्ट्रामध्ये तीन महिने वाद-विवाद चालले होते. तर्कतीर्थ इतके उदारमतवादी होते की, त्यांनी टीका करणाऱ्यांच्य टीकाही छापल्यात आणि आपली उत्तरंही छापलीत. एक मुलाखत तर 'केसरी'मध्ये त्यांनी खुलासेवजा उत्तरे देणारी पाठवली होती. 'केसरी'ने ती संक्षिप्त करून छापली. तर्कतीर्थांनी नवभारतमध्ये परत मूळ छापली आणि खाली लिहिलं, 'यात अधोरेखित केलेल्या ओळी 'केसरी'च्या संपादकांनी गाळलेल्या होत्या.' ही विचारांबद्दलची प्रतिबद्धता तर्कतीर्थांनी आपल्या सगळ्या ज्ञान व्यवहारांमध्ये जपलेली आहे. म्हणून त्या मुलाखतींचं असाधारण महत्त्व आहे.

वर्तमानात मी पाहतो, अलीकडच्या मुलाखती फार गुळमुळीत असतात. राजकीय असू देत, सामाजिक असू देत, साहित्यिक असू देत. मला असं वाटतं की, प्रत्येकाने आपलं विचार वैशिष्ट्य स्वीकारून समाजासाठी confrontation करण्याचं धारिष्ट्य दाखवलं पाहिजे. जोपर्यंत आपण विचारांबद्दल प्रतिबद्ध असत नाही, तोपर्यंत समाजामध्ये परिवर्तन येणार नाही. 

प्रश्न : या समग्र वाङ्गय प्रकल्पामध्ये पुढचे तीन खंड

- खंड क्रमांक सात, आठ आणि नऊ हे लेखसंग्रह आहेत. त्यांचंही विभाजन तुम्ही तीन प्रकारांमध्ये केलेलं आहे. सातवा खंड राजकीय आणि तात्त्विक, आठवा सांस्कृतिक आणि नववा खंड आहे तो संकीर्ण. या सगळ्या लेखांमध्ये आशयाबरोबरच विषयाची आणि मांडणीचीही विविधता आहे. खूप लहान ते खूप मोठे असे लेख आहेत. या तीन खंडांमधून त्यांच्या लेखांची व्याप्ती कळते. अगोदर आपण जे बोललो नोंदी, भाषणं आणि मुलाखती या तिन्हींपेक्षा त्यांनी स्वतः लिहिलेलं हे लेखन आहे. या लेखसंग्रहाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल?

- तर्कतीर्थांनी जे लेख लिहिले आहेत, त्यात तात्त्विक, सांस्कृतिक, व्यक्तिलेख आणि ऐतिहासिक विषय आहेत. एक माणूस समाजाबद्दल किती व्यापक आणि उदार असू शकतो, ते यातून जाणवते. या लेखांमध्ये पन्नास व्यक्तिलेख आहेत. या व्यक्ती त्यांच्या विचारांच्या नव्हत्या, ओळखीच्या नव्हत्या. त्यांनी गांधी, नेहरू, स्टॅलिन, मार्क्स, सावरकर, यशवंतराव चव्हाण, मारूतराव कन्नमवार, अत्रे, पु.लं., सेनापती बापट, योगी अरविंद आणि मानवेंद्र रॉय यांच्याबद्दलही लिहिलंय. वैचारिक सोवळं न पाळता सर्वांना आपलं मानणं आणि त्यांच्याबद्दल समभावाने लिहिणं, ही माझ्या दृष्टीने वैचारिक उदारतेची एक लिटमस टेस्ट आहे.

तर्कतीर्थांनी आत्मकथा लिहिली नाही आणि ते चरित्राबद्दलही स्वतःला आरक्षित समजायचे, पण त्यांनी वेळोवेळी स्वतःबद्दल आत्मपर असे साधारण पंधरा लेख लिहिले आहेत उदा. माझं वेदवाचन, मी रॉयवादी का झालो? पत्नी वारल्यानंतर त्यांनी सत्यवती बाईंबद्दल जे लिहिलं आहे ते त्यां लेखांचं संपादन केलं, तर ते त्यांचं छोटं आत्मचरित्रच ठरेल. मला महाराष्ट्रातले दोन असे वैचारिक पुरुष दिसतात, ज्यांनी आपल्या पत्नीबद्दल अत्यंत उदारपणे पण वस्तुनिष्ठपणे लिहिलं - नरहर कुरुंदकर आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. त्या दोघांनी पत्नीचं महत्त्व कळल्यानंतर, पत्नीबद्दलची अंतर्मुखता आल्यानंतर जे लिहिलेलं आहे, ते वर्तमानातील सगळ्या लोकांनी वाचलं पाहिजे. आपल्या पत्नीला गृहीत न धरता तिला मित्र, सहकारी, सहयोगिनी आणि प्रतिष्ठित जीवनसाथी म्हणून मानण्याचा एक वस्तुपाठ तर्कतीर्थांनी आपल्या या लेखामधून दिलेला आहे. याच लेखाचा उत्तरार्ध नंतरच्या 'स्मृती आणि गौरव' या लेखामध्ये आहे.

'व्यक्ती स्वतःबद्दल लिहितो, तेव्हा विसंगतीचं अंतर कमी असेल, तर तो मनुष्य पारदर्शी समजावा.' या कसोटीवर तर्कतीर्थ पारदर्शी होते, असं मला वाटतं. त्यांच्या मुलाने, सुनेने, नातीने, मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी लिहिलेले तर्कतीर्थ आणि तर्कतीर्थांनी स्वतःबद्दल सांगितलेलं यामध्ये फार कमी अंतर दिसेल. त्यांनी अनेक भाषांतरे केलेली आहेत. प्रवासवर्णनं लिहिली आहेत. पण प्रवासवर्णन म्हणजे 'आयफेल टॉवरवरून मला पॅरिस कसा दिसला' हे लिहिलेलं नाही; तर पॅरिसची संस्कृती कशी दिसली, रशियामध्ये धर्म परिषदेला गेल्यावर तिथलं शिक्षण कसं दिसतं याबद्दल लिहिलेलं आहे. त्यांना रशियामध्ये असं विचारण्यात आलं होतं की, 'तुम्हाला हॉटेलमध्ये राहायला आवडेल की होस्टेलमध्ये?' ते म्हणाले, 'होस्टेलमध्ये.' होस्टेलमध्ये गेल्यावर ते म्हणाले, 'मला मुलं आणि मुली दोन्ही सेक्शन्समध्ये जाण्याची परवानगी द्यावी.' त्या काळामध्ये मुला-मुलींची होस्टेल्स स्वतंत्र होती. तर्कतीर्थांनी असं सांगितल्यानंतर रशियाने होस्टेलमधील भिंती काढल्या आणि मुला-मुलींना कॉमन अॅक्सेस दिला. एक माणूस छोट्या छोट्या सूचना करून कसा क्रांती करू शकतो याचा वस्तुपाठ म्हणूनही तर्कतीर्थांकडे पाहिलं पाहिजे.

तर्कतीर्थांच्या ज्ञान मांडणीला झागोरच्या परिषदेमध्ये standing ovation मिळतं, ज्यात रशियामधील सर्व धर्मशास्त्र पंडित आलेले असतात. हे आपल्या हिंदू धर्मशास्त्राची श्रेष्ठता नि परंपरा तिथे सांगतात. ते ऐकून युरोपियन, रशियन लोकांना असं वाटतं की, भारताचा धर्म हा तत्त्वज्ञानावर उभा आहे. त्याचं छोटं उदाहरण सांगतो. आपण जगाला 'बुद्ध' दिलेला आहे. पण आपण तो सोडून दिलेला आहे. मी भारतीय शिष्टमंडळातून जपानमध्ये, तिथल्या किंकाकुजी नावाच्या जगातल्या मोठ्या बुद्धशिल्पामध्ये गेलो होतो. जगातले सगळे प्रतिनिधी माझ्याबरोबर होते. तिथला भिक्कू पंडित माझ्याशेजारीच उभा होता. त्याने सहज मला प्रश्न केला की, 'यू आर फ्रॉम ?' मी म्हटलं, 'इंडो.' तो म्हटला, 'कम विथ मी.' आणि त्यानं मला एवढ्या सगळ्या लोकांतून गुपचूप नेलं. त्या काष्टशिल्पाला, पुतळ्याभोवती परिक्रमा करणारा एक मार्ग आहे. त्याच्यावर आजपर्यंत दोनच लोक फिरलेले होते. एक जपानचा राजा आणि दुसरा हा भिक्कू आणि तिसरा मी होतो. मी त्यांना विचारलं, 'हा सन्मान तुम्ही मला का दिलात ?' यावर त्याने दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे 'You have given Budha to us!' आपण हे समजून घेतलं पाहिजे की, भारताचं सर्व वैभव प्राचीन वाङ्गयात आहे. वेद म्हणजे कालबाह्य, अशा प्रकारे जे लोक आपल्या प्राचीन वाङ्गयाकडे बघतात; त्याकडेही आपण नव्या शास्त्राने, नव्या विचाराने बघितलं पाहिजे. हे आकलन तर्कतीर्थांचे लेख देतात.

प्रश्न : खंड क्रमांक दहा आणि अकरा हे दोन्ही पुस्तकांशी संबंधित आहेत. दहाव्या खंडात तर्कतीर्थांनी वेगवेगळ्या लोकांच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना आहेत. अकराव्या खंडामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांचे लहान-मोठे परिचय किंवा परीक्षणं आहेत. प्रस्तावना लिहितानाचे आणि परिचय करून देतानाचे तर्कतीर्थ, या दोन्हींमध्ये तुम्हाला काहीतरी फरक आणि साम्य जाणवलं असेल?

- एक फार मोठा फरक तर्कतीर्थांनी आपल्या जीवनामध्ये पाळला. त्यांचे सहकारी, सन्मित्र असे सांगतात की, तर्कतीर्थ दोन गोष्टींना कधी नकार द्यायचे नाहीत भाषणाचं निमंत्रण आणि प्रस्तावना लेखन. अलीकडे थोरा-मोठ्यांना प्रस्तावना लिहा म्हटल्यावर अनेकांचे अनेक संवाद ऐकतो की, 'मी व्यापात आहे, मला जमणार नाही. मला अनेक महिने, दिवस लागतील.' तर्कतीर्थांनी अशा सबबी कधीच सांगितल्या नाहीत. नैमित्तिक कामं करत त्यांनी साहित्य संस्कृती मंडळाच्या पावणे दोनशे पुस्तकांच्या प्रस्तावना लिहिल्या आहेत. जवळपास तितक्याच प्रस्तावना त्यांनी इतरांच्या पुस्तकांना लिहिलेल्या आहेत. सगळ्याच मी मिळवू शकलो नाही, पण अधिकाधिक प्रस्तावना देण्याचा प्रयत्न केला आहे.

पुस्तक परीक्षणांच्या बाबतीत मात्र ते चोखंदळ होते. ते म्हणायचे की, 'समीक्षा माणसाने तेव्हाच लिहावी, जेव्हा ते पुस्तक तुम्हाला हृदयस्पर्शी वाटतं.' 'तृणपर्णे' नावाच्या पुस्तकात वॉल्ट विटमनचं एक आशयसमृद्ध वाक्य आहे - 'Who touches the book, touches the heart.' ही कसोटी पाळून तर्कतीर्थानी लिहिलेली केवळ तीस पुस्तक परीक्षणं किंवा समीक्षा आहेत. ज्याला आपण मराठीचं अभिजात साहित्य म्हणू, अशा पुस्तकांची समीक्षा त्यांनी केलेली आहे. त्यांची वाचनाची बैठक अत्यंत विचारपूर्वक, समाधीस्त असायची. त्याचं एक छोटं उदाहरण सांगतो. त्यांच्या कन्येचं लग्न होतं. मांडवात कन्यादान झालं आणि तर्कतीर्थ आत वधूच्या खोलीमध्ये जाऊन लिहित बसलेले होते. त्यांचे सेक्रेटरी येऊन म्हणतात, 'हे जरा अतिच झालं असं वाटत नाही का तुम्हाला?' तर ते म्हणाले, 'अति झाल्यामुळेच मी काहीतरी करू शकलो. आता कन्यादान झालं. बापाचं काम काय उरलं ? माझा कार्यभाग संपलेला आहे. पंगती तुम्ही वाढा. माझी पंगत सुरू आहे.'

आपली पंगत काय आहे हे माणसाला कळायला पाहिजे. या दोन्हींमध्ये एकीकडे सर्वसामान्यांचा आदर आणि दुसरीकडे अभिजाततेचा गौरव या दोन खंडांमध्ये झालेला आहे.

प्रश्न : बारावा खंड, सर्वसामान्य सोडाच, मराठीतल्या चांगल्या वाचकांनाही डोक्यावरून जाणारा वाटेल. त्या खंडात संस्कृत आणि मराठी या दोन्हीतील प्रबंध आणि चरित्रे आहेत. मात्र ती चरित्रं रूढ अर्थाने असतात तशी नाहीत. तर या अवघड खंडाबद्दल लोकांचं कुतूहल शमेल व वाढेल असं काय सांगता येईल? 

- तर्कतीर्थांनी जे संस्कृत प्रबंध लिहिलेत, त्यातील एकाचं नाव आहे, 'अस्पृश्यता मीमांसा.' ज्याचा आपण पूर्वी उल्लेख केला आहे. दुसरा आहे, 'सर्वधर्मसमीक्षा' आणि 'शुद्धीसर्वस्वम्'. शुद्धीसर्वस्वम्मध्येही प्रायश्चित्त विधान आहे. या प्रबंधामध्ये त्यांनी धर्माला उदार करण्याचा प्रयत्न केलाय. पूर्वी आपल्याकडे कर्मकांडे, कर्मफल होतं. पुनर्जन्माची धारणा होती, रूढी होत्या, रीती होत्या. यांचं एक वर्तमानकालीन आकलन त्यांना होतं. ते म्हणायचे, 'ठीक आहे, आपण परंपरेच्या आधाराने कुणाला पतित मानतो, कुणाला पापी मानतो; पण ज्यांना पापी किंवा पतित मानलंय, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात घेण्याचं विधान धर्मशास्त्राने दिलंय ते म्हणजे प्रायश्चित्त. पण ते प्रायश्चित्त रोगापेक्षा इलाज भयंकर अशा स्वरूपाचं आहे, ते सुसह्य कसं होईल ? नुसतं सुसह्य नाही, तर ते कालसंगत कसं होईल, असं आपण पाहिलं पाहिजे. एक तर पतित मनुष्य बहिष्कृत असतो - उदाहरणार्थ, विधवेला कुंकू लावायचं नाही. एवढ्या छोट्या गोष्टीने तिच्या मनावर उठणारे ओरखडे कमी करायचे असतील, तर तुम्ही तुमच्या परंपरा आणि प्रायश्चित्तं उदार व माफक केली पाहिजेत. तुम्ही आजन्म प्रायश्चित्त सांगता म्हणजे ती व्यक्ती आजन्म पतितच राहणार. आजन्मच्या ऐवजी वर्षावर या, दोन वर्षांवर या. तर पतितता संपेल. पतितता संपवणं हा जर प्रायश्चित्ताचा उद्देश असेल, तर प्रायश्चित्तं ही संक्षिप्त असली पाहिजेत.

त्यांनी मराठीमध्ये 1928-30 च्या दरम्यान 'आनंदमीमांसा' आणि 'जडवाद' असे आणखी दोन प्रबंध लिहिलेले आहेत. 'आनंदमीमांसा' भारतीय दर्शनाला छेद देणारा आहे. भारतीय दर्शनाचं वर्णन समीक्षक 'दुःख दर्शन' असं करतात. उदा. बौद्ध दर्शन, जैन दर्शन किंवा सांख्य दर्शन घ्या. सगळ्या दर्शनांमध्ये दुःख आहे, मोक्ष आहे आणि दुःखातून मोक्षाकडे असा सारा प्रवास आहे. त्यांनी 'आनंदमीमांसा'मध्ये असं सांगितलंय की, 'दुःख कवटाळून मोक्षाची साधना करण्यापेक्षा आनंद कवटाळून जीवन साधना करा, म्हणजे जीवन अधिक समृद्ध होईल. कुणी बघितलाय स्वर्ग आणि नरक ? वर्तमानात जगा आणि आनंदी जगा.'

याचा अर्थ चंगळवादी व्हा, असं ते अजिबात सांगत नाहीत. आनंदालाही एक सौजन्य आणि सौंदर्य असलं पाहिजे. याचं सुंदर वर्णन त्यात आहे. ज्यांना कुणाला वर्तमानात हरवलेला आनंद मिळवायचा असेल, त्यांनी आनंद मीमांसा वाचावी. ज्यांना कुणाला ईश्वर आहे की नाही हे समजून घ्यायचं आहे, त्यांनी 'जडवाद अर्थात अनिश्वरवाद' प्रबंध सप्रमाण अभ्यासावा.

प्रबंधांचं जसं आहे, तसं चरित्रांचंही आहे. तर्कतीर्थ हे कुणावरही चरित्र लिहित नाहीत. त्यांनी केवळ दोघांची चरित्रे लिहिलेली दिसतात. एक आहेत, त्यांचे गुरू, 'केवलानंद सरस्वती'. त्यांचं संक्षिप्त चरित्र संस्कृतमध्ये आणि मराठीमध्येही तीर्कतीर्थांनी लिहिले आहे. त्याचाही उद्देश माझे गुरू कसे पुरोगामी होते, हे सांगणे हा आहे. त्यामध्ये गुरुभक्ती, अंधभक्ती, गुरुनिष्ठा असं अजिबात दिसणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं चरित्र आहे 'महात्मा फुलेंचं'. त्यांनी 1947 मध्ये 'ज्योती निबंध' लिहिलेला होता. माझं एक आकलन आहे की, महात्मा जोतिबा फुले यांच्याबद्दल प्रारंभीच्या काळात लेखन करणाऱ्यांपैकी एक तर्कतीर्थ आहेत. 'परंपरेविरुद्ध बंड करणारा पहिला पुरुष' असं त्या निबंधाचं उपशीर्षक आहे. फुले हे किती बंडखोर होते याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तो निबंध लिहिल्यानंतर लोक असं म्हणाले की, 'फुलेंचं हे फारच संक्षिप्त चरित्र झालं, तुम्ही विस्ताराने का लिहित नाही, जेणेकरून फुले आम्हाला आणखी विस्ताराने कळतील.' ते लक्षात ठेवून त्यांनी 1991 मध्ये महात्मा फुल्यांची स्मृती शताब्दी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी येत होती, तेव्हा राष्ट्रीय पुस्तक न्यास (नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया) साठी एक विस्तृत 'ज्योती चरित्र' लिहिलं. हे ज्योती चरित्र आज हिंदीमध्ये, इंग्रजीत आणि मराठीतही उपलब्ध आहे. ज्यांना जोतीबा फुले समजून घ्यायचे आहेत, त्यांनी तर्कतीर्थांचं हे वस्तुनिष्ठ चरित्र अवश्य वाचलं पाहिजे. 

प्रश्न : तेरावा खंड तुलनेने सोपा आहे. कल्पनेला वाव देणारा, वेगवेगळ्या दिशा दाखवणारा खंड म्हणजे पत्रसंग्रह ! तर्कतीर्थांना आलेली आणि त्यांनी इतरांना लिहिलेली पत्रं. स्वाभाविकच, त्या पत्रांचे सर्व संदर्भ आता आपल्याला लागतीलच असं नाही. तुम्ही तुमच्या प्रास्ताविकात, तळटिपांमध्ये शक्य तेवढं दिलं असेल. तर या पत्रसंग्रहाचं, त्यांना आलेली उत्तरं आणि त्यांनी दिलेली उत्तरं याचं वैशिष्ट्य काय आहे?

- तर्कतीर्थांनी कुणाकुणाला पत्रं लिहिली, हे आपण आधी पाहू. महात्मा गांधींना लिहिलेली पत्रं, मोठ्या प्रमाणात यशवंतराव चव्हाण साहेबांना लिहिलेली पत्रं. त्यांनी जो पत्रव्यवहार केला आहे, त्यापैकी अत्यंत प्रातिनिधिक पत्रं या संग्रहात दिलेली आहेत. तर्कतीर्थांचं चरित्र हे संस्था पुरुषाचं चरित्र होतं. हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर यातला संस्थात्मक पत्रव्यवहार पाहिला पाहिजे. यामध्ये प्राज्ञ पाठशाळेचा, धर्मकोशाचा, नवभारतचा, मराठी ग्रंथ संग्रहालयाचा पत्रव्यवहार आहे. रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टीचा, 'क्वेस्ट'चा पत्रव्यवहार आहे. म्हणजे एकीकडे संस्थात्मक पत्रव्यवहार आणि दुसरीकडे व्यक्ती पत्रव्यवहार असं सामंजस्य यात दिसतं. रूढ अर्थाने लोक तर्कतीर्थांना यशवंतराव चव्हाणांचे राजकीय गुरू मानतात. हे वस्तुस्थितीला धरून नाही. हे दोघे एकमेकांचे अत्यंत सुहृद मित्र होते. दोघं एकमेकांना प्रिय या नावानेच पत्र लिहितात. यातून ती राजकीय गुरू असण्याची धारणा संपूर्णपणे संपुष्टात येते. दुसरं, या दोघांमधलं मैत्र इतकं अद्वैत होतं की, ते आपल्या प्रत्येक व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील प्रश्नांबद्दल एकमेकांची मतं जाणून घ्यायचे. मी तर असं म्हणेन की, हे दोघं सहचर होते, सहयोगी होते, सहकारीही होते, आणि सहविचारी, सहप्रवासीही होते.

एका पत्राबद्दल एक छोटं उदाहरण सांगेन आणीबाणीच्या काळात यशवंतराव चव्हाण काँग्रेस पक्ष सोडतात आणि रेड्डी काँग्रेसमध्ये जातात. तुम्हाला माहीत आहे, की प्रत्येक राजकीय पुरुष हा सत्तेवर आणि साधनांवर जगत असतो. यशवंतराव चव्हाण यास अपवाद नव्हते. नंतर त्यांना असं वाटलं की, सत्तेच्या बाहेर राहून आपण फार सामाजिक आणि परिवर्तनाचं काम करू शकणार नाही. तेव्हा तर्कतीर्थांशी विचार विनिमय करून अत्यंत विचारपूर्वक ते इंदिरा काँग्रेसमध्ये परत जातात. इंदिरा गांधींना ते होकाराचं पत्र पाठवतात. इंदिरा गांधी त्यावेळी चढावर होत्या. त्यांनी यशवंतराव चव्हाणांना उत्तर देण्याचं सौजन्यही दाखवलं नाही. पत्र येऊन तीन महिने लोटल्यावर चव्हाण साहेब तर्कतीर्थांना एक खाजगी पत्र लिहितात. (या खंडात काही खाजगी पत्रंही छापली आहेत. ती छापावीत की नाहीत हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण मला वाटतं की, काळ ओसरल्यानंतर आणि व्यक्ती निवर्तल्यानंतर खाजगी आणि सार्वजनिक असं काही राहत नाही. तुम्ही लिखिताकडे जाता, तेव्हा इतिहास दुसरा-तिसरा काय असतो ? इतिहास त्याच्या काळामध्ये खाजगी असतो, नंतर तो सार्वजनिक होतो. तसंच पत्र व्यवहारांकडे आपण पाहिलं पाहिजे.) ते तर्कतीर्थांना प्रश्न विचारतात, 'आता काय करावे?' तर्कतीर्थ तितक्याच निखळपणे त्यांना उत्तर देतात. 'दार ठोठावले ना, उघडेपर्यंत अंगणात बसावे. नाही तरी महाराष्ट्राची हवा समशीतोष्ण आहे, बाधणार नाही.' मला असं वाटतं की, सूचकतेमध्ये जे सौंदर्य भरलेलं असतं, ते तर्कतीर्थांच्या प्रत्येक पत्रामध्ये तुम्हाला दिसेल.

या संदर्भात 'यशवंतराव अद्याप चाचपडतच आहेत,' अशी एक मुलाखत मुलाखतीच्या खंडात आहे. कालखंड हाच आहे. त्यात इंदिरा गांधींबद्दलही त्यांनी खूप स्पष्टपणे विधाने केलीत, ती फारच इंटरेस्टिंग आहेत. इंदिरा गांधींशी तर्कतीर्थांचं फार सख्य होतं, असंही तुम्हाला दिसेल.

प्रश्न : चौदाव्या आणि पंधराव्या खंडात वाचकांना अजिबात रस वाटणार नाही. मात्र ते नजरेखालून घातले, तर कोणताही वाचक स्तिमित होईल. ते दोन खंड म्हणजे संस्कृत हस्तलिखितांची व ग्रंथांची केलेली विवरणात्मक सूची. त्या पोथ्या आणि अन्य हस्तलिखितं आणि त्याची सूची त्याबद्दल थोडक्यात सांगता येईल का ?

-आपलं सगळं वैभव म्हणजे साहित्य, भाषा, संस्कृती याचं सगळं सौंदर्य आणि त्याचा तत्कालीन इतिहास कुणाला शोधायचा असेल, तर त्यासाठी उत्तम साधन म्हणजे त्या त्या काळची हस्तलिखितं. शिवाजी महाराजांबद्दल आज आपण इतका आदरपूर्वक उल्लेख करतो, पण त्या काळातील कागदपत्रं नसती तर छत्रपती शिवाजी महाराजांनी लोक कल्याणाचे केलेले कार्य, आपल्यासमोर आलं नसतं. तसंच आपली संस्कृती विकसित कशी झाली, हे पाहायचं असेल, तर तत्कालीन हस्तलिखितं पाहिली पाहिजेत.

तर्कतीर्थ आणि त्यांचे गुरू केवलानंद सरस्वती यांनी 'तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषद' स्थापन केली होती. नंतर तिचं नाव त्यांनी 'धर्म निर्णय मंडळ' असं केलं. त्यातून धर्मकोशाची निर्मिती झाली. या दोघांनी त्या काळामध्ये भारतभरातून पन्नास हजार पोथ्या संकलित केल्या होत्या, यातून एखादा माणूस किती व्यासंगी असावा हे कळते. आजही त्या पोथ्या प्राज्ञ पाठशाळेमध्ये जिज्ञासूंना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. यातील फक्त अकरा हजार पोथ्यांचं वर्णन आहे. वर्णन पंधरा रकान्यांमध्ये आहे. ते रकाने पाहिले, तरी तर्कतीर्थांनी किती कष्ट केलेत हे कळेल. कुणाकुणाच्या पोथ्या आहेत - बृहस्पतीची, कौटिल्यची, व्यासांची, वाल्मिकींची अशा अनेकांच्या आहेत. कित्ता करण्याची एक मोठी पद्धत धर्मशास्त्रामध्ये आहे. कित्ता करणे म्हणजे पूर्व साहित्य उतरून काढणे. ते लिहून काढत असताना पोथी लेखक किंवा हस्तलिखित लेखकाचे नाव, त्या काळची वर्णने आहेत. आपण सगळ्यांनी वर्तमानात अभ्यास करताना ती समजून घेतली पाहिजेत. मी त्याविषयी प्रस्तावनेत विस्ताराने लिहिलंय की, पोथी लिहिणारा काय काय करायचा, तो कागद तयार करायचा, तो शाई तयार करायचा, तो चित्र काढायचा, तो कॅलीग्राफी सुंदर हस्ताक्षरात लिहायचा. असा माणूसच पोथी लिहू शकायचा. ऐरागैरा पोथी लिहायचा नाही. पोथ्या नुसत्या बघितल्या, तरी अक्षरांची वळणं तुम्हाला कळतील. पूर्वी ज्या 64 कला आपल्याकडे सांगितल्या जातात, त्यातील एक लेखनकला आहे. या लोकांसाठी ती कला असं म्हटलं गेलंय. तुम्ही आम्ही जे करतो, ती कला नाही. आपण उपरे कलाकार आहोत, कट-पेस्ट करणारे लोक आहोत. त्यांनी केलेलं काम हे खरं काम आहे.

दुसरा रकाना आहे शीर्षकाचा पोथीचं शीर्षक, तिसरा रकाना आहे - लेखकाचा, चौथा रकाना आहे भाष्यकाराचे म्हणजे पोथीची समीक्षा करणाऱ्याचे नाव. कोणतं भाष्य केलं त्याचं नाव म्हणजे शंकर भाष्य असेल तर त्याचं वर्णन. पोथीचा आकार सेंमीमध्ये आहे. नंतर पृष्ठ संख्या आहे. पृष्ठावरच्या ओळी आहेत. ओळीतली अक्षरं आहेत. असा तेरा हजार पोथ्यांचा इतिहास आहे. त्याची लिपी, त्याचा काळ, त्याची स्थिती, त्याचं माध्यम, (चामड्यावर लिहिलंय, कागदावर/कापडावर लिहिलंय, भुर्जपत्रावर लिहिलंय.) पोथीची सद्यःस्थिती (आता ते जीर्ण आहे का सुरक्षित आहे, सुस्थितीत आहे इथपर्यंत). पुढे एक शेष रकाना आहे, त्यामध्ये त्या पोथीचं वैशिष्ट्य, या पोथीचं हे विवरण का दिलेलं आहे याबद्दल लिहिलं आहे.

ह्या पन्नास हजार पोथ्यांचा अभ्यास हा वर्तमानातील इंडोलॉजीचा अभ्यास नाही का? वर्तमानामध्ये हिंदू धर्म आणि हिंदू धर्मशास्त्र यांबद्दल फार गांभीर्याने विचार होतो, असं सांगितलं जातं. हे सगळं बघितल्यावर आपल्या गांभीर्याची पातळीपण जिज्ञासूंच्या लक्षात यावी. कष्टसाध्य असे हे खंड आहेत. म्हणूनच म्हटलं, की हे दोन खंड आपल्याला वाचनात फार पुढे घेऊन जाणार नाहीत, पण स्तिमित होण्यासाठी प्रचंड उपयुक्त आहेत.

प्रश्न : सोळावा खंड अनेक लोकांना सुखद आश्चर्याचा धक्का देणारा, पहिल्यांदाच आम्ही हे ऐकलंय असं म्हणायला लावणारा आहे. तो म्हणजे भारतीय संविधानाच्या पहिल्या प्रारूपाचं संस्कृतमध्ये पहिलं भाषांतर (1952) करण्यामध्ये लक्ष्मण शास्त्री कसे होते आणि ते भाषांतर याबद्दल थोडं सांगा.

- आपल्याला माहीत आहे, की भारताची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झाली 1949 ला, त्याच्या आठव्या परिशिष्टामध्ये असं लिहिलं होतं की, 14 भाषा या राज्यभाषा/प्रांतभाषा असतील. घटनेमध्ये अशी तरतूद होती की, तयार होणाऱ्या घटनेचं या भाषांमध्ये भाषांतर केलं जावं. 1950-52 च्या दरम्यान 13 भाषांचे भाषांतरकार मिळाले. संस्कृतमध्ये भाषांतर करायला मिळाले नाहीत. राजेंद्र प्रसाद त्यावेळी राष्ट्रपती होते आणि दादा मावळणकर सभापती होते. महात्मा गांधींमुळे या दोघांनाही तर्कतीर्थांचा संस्कृतचा व्यासंग माहीत होता. राजेंद्र प्रसादांनी मावळणकरांमार्फत तर्कतीर्थांना अडचण सांगितली. मग तर्कतीर्थांनी तीन चतुर्थांश आणि मंगलदेव शास्त्रींनी एक चतुर्थांश असं भाषांतर केलं.

हजारो वर्षांपूर्वीची संस्कृत भाषा आणि 1952 ची भारतीय राज्यघटना. 1952 च्या वर्तमान जीवनामध्ये कितीतरी गोष्टी अशा होत्या की, त्या प्राचीन काळात नव्हत्याच. त्या काळात इंजिनिअर, शिल्पी, काष्ठशिल्पी वगैरे असतील; पण अभियांत्रिकी नावाची विद्याशाखा नव्हती तर्कतीर्थांच्या पुढे प्रश्न असा आला की, याचं संस्कृत संज्ञापन कसं करायचं? ते सगळ्या ज्ञान व्यवहारांमध्ये अत्यंत व्यवहारी गृहस्थ होते. त्यांनी पाहिलं की, हिंदीमध्ये केलेली जी भाषांतरे आहेत, ती वर्तमानाच्या प्रमाणाकडे जवळपास जाणारी आहेत. तो आदर्श मानून त्यांनी संस्कृतमध्ये त्याला पर्यायी आणि समांतर असे नवे शब्द तयार केले आणि भाषांतर केलं. हे भाषांतर नऊ जणांच्या विद्वत समितीपुढे मान्यतेसाठी आलं. त्यामध्ये भारतरत्न होते, आंतरराष्ट्रीय भाषा वैज्ञानिक होते आणि राष्ट्रीय संस्कृत पंडित होते. या नऊ जणांनी 22 दिवस कलमवार वाचन करून, फारसा बदल न करता मंजूर केलं. एखाद्याची प्रज्ञा अशी असते! 

मग सरकारपुढे एक नवाच प्रश्न निर्माण झाला की, हे छापायचं कुठे? या काळात वाराणसी सोडून कुठेच संस्कृत टाक नव्हता. टाक म्हणजे फॉन्ट, खिळे. तर्कतीर्थांना त्यांनी सांगितलं की, 'तुम्ही भाषांतर करून दिलंत, पण मुद्रणाचा प्रश्न आहे.' तर्कतीर्थ म्हणाले, 'मी छापून देतो.' म्हणजे घटनेचे संस्कृत भाषांतर वाईत झालं आणि पहिलं मुद्रणही वाईत झालं. तर्कतीर्थांनी घटनेची केलेली प्रुफ रीडिंगची प्रतही उपलब्ध आहे. माणूस किती व्यासंगी आणि किती कष्टपूर्वक एखादं काम करतो. समर्पण नावाची गोष्ट म्हणजे तर्कतीर्थ !

प्रश्न : खंड क्रमांक 17 आणि 18 दोन्हींच्या संदर्भात तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये उत्तर देता येईल. सतरावा खंड हा तर्कतीर्थांवर लिहिले गेलेल्या लेखांचा आहे. यामध्ये स्मृतिलेख, गौरवपर लेख, श्रद्धांजली लेख असतील. अठराव्या खंडात त्यांच्या लेखनाची, त्यांच्या साहित्याची वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांनी केलेली समीक्षा आहे. या दोन्ही खंडांबद्दल म्हणजे त्यांच्याविषयी, त्यांच्या लेखनाविषयी आणि त्यांच्या विचारांविषयी काय सांगाल ?

- या प्रकल्पाने एक नवं परिमाण किंवा नवी परंपरा निर्माण केली, असं मला वाटतं. आजवर महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये जे समग्र वाङ्घयीन प्रकल्प झाले, ज्याला आपण प्युअर टेक्स्ट म्हणतो, त्यावरच काम झालेलं आहे. Textual criticism वर आजपर्यंत काम झालेलं नाही. हा महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे, जो textual criticism वर काम करतो. भाषणं, मुलाखती, ग्रंथ, भाषांतरे अशा अनेक अंगांनी लोकांनी लिहिलेलं आहे आणि ते जवळजवळ एका शतकभराच्या कालखंडातील लेख आहेत. त्यामध्ये ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतात म्हणून गौरव आहे, त्याच वेळी 'वाया गेलेला विद्वान' असं एक गृहस्थ त्यांच्याविषयी लिहितो. समकालामध्ये एकीकडे प्रशंसा आहे, तर दुसरीकडे कुत्सिततासुद्धा त्यांनी भोगलेली आहे. पण ते कधी विचलित झालेत असं मला दिसत नाही. त्यांचं गुणवैशिष्ट्यं असं होतं की, जे लोक त्यांच्यावर टीका करायचे, त्यांना ते अत्यंत उदारपणे आणि कठोरपणे पुराव्यानिशी उत्तर द्यायचे. समोरच्याला पुराव्यानिशी नामोहरम करण्याची विद्वत कला त्यांनी विकसित केली होती. मला वाटतं, ती त्यांनी ज्ञान तपस्येतून निर्माण केलेली होती.

या दोन खंडांमध्ये समीक्षा खंड घेतला, तर साहित्यसम्राट न. चिं. केळकरांपासून ते विद्यमान समीक्षकांपर्यंत वेळोवेळी ज्या ज्या लोकांनी समीक्षा केल्या, त्या सर्वांचा समावेश यामध्ये आहे. गौरव आणि स्मृती लेखांमध्ये नातीनेही आजोबांबद्दल लिहिलेलं आहे, मुलाने वडिलाबद्दल लिहिलं आहे. तर्कतीर्थांनी आपल्या मित्रांबद्दल लिहिलंय. सहकाऱ्यांबद्दल लिहिलंय, सहकाऱ्यांनी तर्कतीर्थांच्या वेगवेगळ्या अंगांबद्दल लिहिलंय. म्हणजे 'तर्कतीर्थ : शास्त्र आणि शस्त्र' या नावाचा एक लेख यशवंतराव चव्हाणांनी लिहिलेला आहे. ते तर्कतीर्थांची भाषणं वाचून स्वातंत्र्यलढ्यात उतरले. त्याची आठवण त्यांनी लिहिली, "कृष्णेच्या काठावर हा पंडित सलग आठ दिवस भाषणं देतो. भाषण देताना आम्हा सगळ्या तरुणांना असं सांगतो, की आजवर मी माझ्या गुरूकडे शास्त्र शिकलो, मला आता इथून पुढे त्या शास्त्रांचे रूपांतर शस्त्रात करायचे आहे." त्यांनी असं लिहिलंय की, 'त्या एका वाक्याने माझा कायाकल्प झाला आणि मी माझ्या शाळेच्या झाडावर जाऊन तिरंगा झेंडा फडकवला.' ते अवघ्या सोळाव्या वर्षी तुरुंगात गेले. म्हणून कदाचित 'कृष्णाकाठ'ची समीक्षा तर्कतीर्थांना लिहावीशी वाटली असेल.

माणसाची घडण समजून घ्यायला हे दोन खंड उपयुक्त आहेत. मला असं वाटतं की, टेक्स्ट किंवा संहिता तुम्ही देत असताना समीक्षेसह संहिता दिली, तर त्या संहितेला एक काळाची चौकट, काळाची मेघडंबरी निर्माण होते आणि मग वर्तमानाला त्याची पुनः समीक्षा करण्याची प्रेरणा मिळते. मला असं वाटतं, हे खंड आल्यानंतर नवे समीक्षक नव्या विचारांनी तर्कतीर्थांकडे बघायला लागतील.

प्रश्न : हे खंड लवकरच साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रकाशित होतील, लोकांपर्यंत जातील. मला पूर्ण खात्री आहे, की केवळ सामान्य वाचकच नाही; तर अभ्यासक, संशोधक यांना अनेक वाटा खुल्या होतील. यांचा आधार घेऊन लोक कितीतरी ज्ञानाची क्षेत्रं धुंडाळतील. याचा आधार घेऊन संशोधनाचे अनेक प्रकल्प पुढे येतील का ?

- तर्कतीर्थ 1994 मध्ये गेले. आज 2024 मध्ये आपण विचार करीत आहोत. मधल्या तीस वर्षांच्या काळात आणि खरं म्हणजे ते जिवंत असतानाच्या काळातही आपल्याकडे संशोधन हे विचार व्यवहारात फार कमी होतं. तर्कतीर्थांवर महाराष्ट्रामध्ये अपवादात्मक पीएचडी झालेल्या आहेत. त्या हातांच्या बोटांपेक्षा कमी आहेत. या प्रकल्पाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये नवसंशोधन, पुनर्व्याख्या व्हाव्यात. तसे झाले, तर मराठी अभिजाततेकडे जाईल.

प्रश्न : ज्यांना एकूण पीएचडीच्या अभ्यासाचं स्वरूप माहीत आहे अशा कुणीही हे सर्व खंड तास-दोन तास नजरेखालून घातले तरी ते खात्रीने सांगतील की, 'शंभराहून अधिक पीएचडी करण्याइतका ऐवज, इतक्या वाटा पुरवण्याची क्षमता या अठरा खंडांमध्ये आहे.' सगळे खंड संशोधनाच्या शिस्तीत सादर केलेले आहेत. तो तर सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. तर्कतीर्थांच्या एकूण कामाची व्याप्ती, खोली, पद्धती ही तर यातून कळतेच, परंतु सुनीलकुमार लवटे यांनी केलेलं संपादन यासाठीही हे सर्व खंड आवर्जून पाहावेत. संपादनाचे सगळे निकष, मांडणी, सादरीकरण, तळटिपा, प्रस्तावना, मागचे- पुढचे संदर्भ हे सगळं ज्या अचूक पद्धतीने केलं आहे की; अशा प्रकल्पाचं संपादन कसं करावं याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे.

- या प्रकल्पाच्या शेवटी मला न मिळालेले अप्राप्त संदर्भही दिलेत, जेणेकरून नव्या पिढीने ते मिळवावेत. याचं नाव समग्र असलं, तरी ते संदर्भ जोपर्यंत मिळणार नाहीत, तोपर्यंत हा समग्र वाङ्गय प्रकल्प पूर्ण होणार नाही. तो नव्या पिढीने करावा असं या निमित्ताने मी आवाहन करतो.

प्रश्न : या अठरा खंडांचा परिचय देणारी पुस्तिका आहे, त्यात समारोपाच्या भागात तर्कतीर्थांचं सचित्र आणि वस्तुनिष्ठ असं एखादं चरित्र लिहिण्याचा संकल्प तुम्ही सोडलेला आहे. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो की, हा संकल्प तुमच्याकडूनच सिद्ध व्हावा.

- इतके संदर्भ मला मिळाले आहेत की ते जर मी माझ्याकडेच ठेवले, तर योग्य होणार नाही. त्याचा योग्य वापर करून एक सचित्र विस्तृत चरित्र लिहिण्याचा विचार आहे. हे चरित्र एक हजार पानांचं तरी नक्की होईल....

संवादक : विनोद शिरसाठ
शब्दांकन : प्राजक्ता धुमाळ


या मुलाखतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनीलकुमार लवटे,  कोल्हापूर, महाराष्ट्र ( 16 लेख )

माजी प्राध्यापक, प्राचार्य, लेखक, हिंदी भाषा प्रचारक, समाजसेवक 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी