अधिवेशनात मी, जिजा (ॲड.एकनाथ आवाड, संस्थापक मानवी हक्क अभियान), मनिषा तोकले यांची भाषणं ऐकली. ती ऐकून मी भारावले. अधिवेशनाला सगळ्या जाती-धर्मांची लोकं होती. कुणी कुणाला परक्या जातीचा मानत नव्हतं. मला ते आवडलं. पहिल्यांदाच मी पारधी नसून माणूस आहे, याची जाणीव झाली. मी थेट जिजांना भेटले. त्यांना विचारलं, ‘‘मलाही कार्यकर्ता व्हायचंय. किती फी लागते?’’ जिजा हसले. ते म्हणाले, ‘‘फी नाही लागत. तू आजपासूनच कार्यकर्ता झालीस.’’ तेव्हापासून मी मानवी हक्क अभियान संघटनेत सामील झाले. माझ्या जीवनाला नवी दिशा मिळाली.
भटक्या विमुक्त समाजासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. पण शिक्षणाचं अत्यल्प प्रमाण, पारंपरिक समजुती, उदरनिर्वाहाची साधनं नाहीत, नागरिकत्वाचे पुरावे नाहीत अशा कोंडीत सापडलेल्या या समाजापर्यंत योजना पोहोचतच नाहीत. सुनीता भोसलेंनी लहान वयातच हे दुष्टचक्र भेदलं. त्या कार्यकर्त्या झाल्या. केवळ पाचवी शिकलेल्या सुनीता भोसलेंचं ‘विंचवाचं तेल’ हे पुस्तक गाजतंय. या पुस्तकात पारधी समाजाच्या चालीरीती नि त्याविरोधातील संघर्षांची साद्यंत हकिकत आहे. संघर्ष व रचनात्मक कार्याची सांगड घालून समाजाच्या विकासासाठी त्या झटताहेत. महाराष्ट्र फाउंडेशन व अन्य मान्यवर व्यासपीठांनी या कार्याचं महत्त्व ओळखून त्यांना सन्मानितही केलंय. वंचित घटकातील एका महिला कार्यकर्तीचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.
प्रश्न - सुनीताताई, बालपणातली एखादी आठवण अजूनही तुमचा पाठलाग करते का?
- हो, बाबा गेला तो दिवस मधूनमधून डोळ्यांपुढे येतो. एक पोरगी दिसते. तीन-चार वर्षांची. फुलाफुलांचा फ्रॉक नेसलेली. ती मी. उंबऱ्यात उभी.
माझी थोरली बहीण अनिता. ती शाळेत गेलेली. धाकटा भाऊ अविनाश. तो बालवाडीत असंल. आईही नव्हती घरात. आई-बाबांचं भांडण झालेलं. बाबानं आईच्या हातावर दगड घातलेला. तिचा हात मोडलेला. आई हातावरच्या इलाजासाठी एकटीच कुठंतरी गेलेली. बाबा व मीच घरी होतो त्या दिवशी.
आई सांगते, ‘‘त्या काळात बाबा लय निराश झालेला. पोलिसांनी त्या खोट्या गुन्ह्यात अडकवलेलं. तो निर्दोष सुटून आला, पण खचला होता.’’ बाबाचा चेहरा मी आठवला, तर तो अजून उदास-निराशच दिसतो.
माझ्या आईला लेकरू होत नव्हतं. म्हणून बाबानं दोन लग्नं केली होती. पण पुन्हा आईकडंच आला. नंतर आम्ही तिघं जन्माला आलो. आईनं बाबाची साथ दिली. अशा बाईला मारताना पुरुषाच्या मनातही काहीतरी तुटत असंलच ना? या सगळ्यामुळं बाबा त्या दिवशी उदास असणार.
बाबा मला म्हणाला, ‘‘मी जातो रांजणगावला.’’ हे त्याचं शेवटचं बोलणं लक्षात आहे. तो दूर दूर जाताना मी बघत राहिले. कधीकधी वाटतं, मीही गेले असते त्याच्या सोबत, तर कदाचित पुढचं टळलं असतं.
दुसऱ्या दिवशी बाबाची खबर आली.
त्या दिवशी सण होता. पोळा असल्यानं बैलांची मिरवणूक निघालेली. रंगीबेरंगी बैलांपुढं ताशा-हलगी वाजत होती. तेवढ्यात रांजणगावहून आज्जी आली. ती आईशी भांडायला लागली. तिकडं ताशा वाजत होता, हिकडं आज्जी आईला शिव्या देत होती. ती आईला म्हणत होती- ‘‘तुझा न्हवरा कुठंय? तुला न्हवऱ्याची खबर ठिवता येत न्हाई का?’’ आज्जी लय शिव्या देत होती. मी तिच्याकडं टकमका बघत होते. ती म्हणाली, ‘‘रांजणगावच्या रेल्वे रुळावर मढं घावलंय. त्ये एक्यासारकं दिसतंय.’’ आम्ही सगळे रांजणगावला निघालो. आम्ही तिथे पोहोचलो, तोवर बाबाचं प्रेत पोलिसांनी बेवारस म्हणून दफनही केलं होतं. आईला व मला अजूनही वाटतं, बाबानं जीव दिला नसणार, त्याचा खूनच झाला.
प्रश्न - वडिलांचा खून झाला असेल असं तुम्हाला ठामपणे का वाटतं?
- माझा बाप हरहुन्नरी माणूस होता. तो गायीवर बसून गावराखण करायचा. पारधी समाजाचं हे कामच असतं शिकार व गावच्या शेतशिवारांची राखण करणं. ते माझा बाप करायचा. गावकरीही बाबाला मान देत. बाबा लाव्हरं-तितरांची शिकार करून आणायचा. तेव्हा गावातलेही चार-दोन लोक घरी यायचे. आई पाखरांचं मटन करायची. मटन शिजस्तवर बाबाचे गावातले दोस्त आम्हा पोरांचा खेळ बघत, बापाशी गप्पा मारत बसलेले मला आठवतात. चार-चौघांत मान मिळवलेला गडी एकाएकी जीव देईल असं मला वाटत नाही.
मला वाटतं, पारधी समाजातल्या वाईट चालीरीतींनी माझ्या बापाला मारलं. तो कसा व का मेला, याची चौकशी झाली नाही. रेल्वे रुळावर प्रेत सापडलं. पण ते तिथं कसं आलं याचा शोध कोण घेणार? मी व माझी भावंडं लहान होतो. आई एकटी पडलेली.
त्या खुनामागं एक कारण असू शकतं, बाबानं जातपंचायतीत घेतलेला पुढाकार. बाबानं सख्ख्या बहिणीच्या नात्याला जातपंचायतीत उभं केलेलं. माझ्या आत्याचं ज्या कुटुंबात लग्न झालं, त्या कुटुंबातच ती नवऱ्याला सोडून सासऱ्यासोबत बायकोसारखी राहायला लागली. तिनं नवरा सोडला. माझ्या बापाला हे नातं मान्य नव्हतं. त्यानं तिच्या सासऱ्याला जातपंचायतीपुढं आणलं. यामुळं तो माणूस चिडून होता. जात पंचायतीत निवाडे होतात, पण दुश्मनी मिटत नाय. जातपंचायतीला जेवण-दंड मिळतो... पण या निवाड्याचा परिणाम वाईटही होऊ शकतो. त्याची जबाबदारी जातपंचायत घेत नाही. दुसरं कारण असू शकतं. पारधी समाजाच्या मनातली वैरभावना.
पारधी समाजावर एक कलंक आहे. गुन्हेगारीचा. ब्रिटिशांनी भारतातल्या 200 जातींना गुन्हेगार ठरवलं. महाराष्ट्रातील पारधी, कैकाडी, रामोशी, गोपाळ अशा 14 जमाती त्यात आहेत. या जमातींना सेटलमेंटमध्ये बंदिस्त केलं. भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर पाच वर्षांनी, 1952 ला या जमातींवरचा कलंक मिटला. या जमाती विमुक्त झाल्या. पण पोलिस यंत्रणा अजूनही या जमातींना ब्रिटिशांसारखं चोरच मानते.
त्या काळी या जमातींकडं जगायचं साधन नव्हतं, आजही नाही. त्यामुळं काही पारधी चोऱ्या करतही असतील. अशा चोऱ्यांचा छडा लावण्यासाठी ब्रिटिशकाळात पारधी जमातीतच खबरे नेमायची पद्धत होती. ती अजूनही आहे. चोरी झाली, की आधी पोलिस पारध्यांना ताब्यात घेतात. पारधी समाजातले खबरे पोलिसांना टिप देत. पण हे खबरे कधी कधी ‘आपसी दुश्मनी’ काढायचे. भावबंदकीत आपली कोणाशी खुन्नस असेल, तर त्याचं नाव खबरे पोलिसांना सांगत. पोलिसांना गुन्हेगार पकडल्याचं दाखवण्यासाठी कुणी तरी हवंच असतं. अशाच एका खोट्या केसमध्ये माझ्या बाबाला व चुलत्याला अटक झालेली. बाबा निर्दोष सुटला. पण भावबंदकीतल्यांचा आत्मा अजून थंड झाला नव्हता. बाबाचा काटा काढायला ते टपलेले होते. त्यामुळं मला वाटतं, जमातीतल्या चालीरीतींनीच तो खून केला.
प्रश्न - वडिलांचं छत्रं हरवलं तेव्हा तुम्ही खूपच लहान होता, आईवर तर मोठंच संकट आलं असेल ना?
- इतर समाजांतल्या विधवा कल्पनाही करू शकत नाहीत, अशी गत माझ्या आईची झाली. पारधी समाजात लगेचच पुनर्विवाह केला जातो. पण आईनं तसं केलं नाही. तिला तिच्या लेकरांची काळजी होती. माझा एक चुलता दांडगा होता. त्याच्याबरोबर आईनं लग्न करावं असं टुमणं आज्जी-आजोबानं सुरू केलं. कारण त्यांना जमिनीची मालकी हवी होती. पारधी समाजात नवरा मेल्यावर काही दिवसांतच बाई मोहतूर लावते, म्हणजे दुसरं लग्न करते. कारण एकट्या बाईला जगूच दिलं जात नाही. तिची इज्जतच ठेवली जात नाही. माझा तो चुलताही आईच्या मागावर ऱ्हायला लागला. रात्री-बेरात्री घरात घुसायचा. आईवर हात टाकायचा. आई खूप घाबरली. ती आम्हा लेकरांना रात्रीची झोपू द्यायची नाही. आम्हाला नीज यायला लागली की, आई आमच्या डोळ्यांत बोटं घालायची. आमची झोप उडवी, तिला सोबतीला कुणी असावं, दिराला धाक असावा, यासाठी आईनं आमची ढाल केली.
तिचा हात मोडलेला, त्यामुळं ती शेतात राबू शकत नव्हती. घरी राहणंही सुरक्षित नव्हतं. म्हणून मग आम्हाला घेऊन ती वणवण भटकली. रस्त्याकडंला पाल घालून राह्यली. ह्या काळात माझं वय असेल पाच-सहा वर्षांचं. पण पोटाची भूक भागवण्यासाठी मलाच पुढाकार घ्यावा लागला.
प्रश्न - एवढ्या लहानश्या वयात भावंडांची भूक भागवण्यासाठी तुम्ही काय करू होतात?
- भीक मागण्याशिवाय दुसरा काय पर्याय होता? बहीण शाळेत जात होती. तिला भीक मागायची लाज वाटत होती. भाऊ लहान. त्यामुळं मीच दारोदार मागायला जाऊ लागले. मला आठवतं, एखाद्या हॉटेलापुढं मी भावाला कडेवर घेवून थांबलेय. तिथं भजी खाणाऱ्यांकडं पाहून तोंडाला पाणी सुटायचं. वडे तळल्याचा वास, पोटात अग्नी जागवायचा. मी व अविनाश अधाश्यासारखं भज्यांकडं बघत उभं राहायचो. कधीतरी त्या हॉटेलवाल्याला कीव यायची. मग तो भज्यांचा चुरा द्यायचा.
एक प्रसंग मी विसरू शकत नाही. गावात लग्न होतं. पंगती बसलेल्या. पण भिकाऱ्यांना कोण पंगतीत जेवू देणार? पंगत उठली की उकिरड्यावर उष्ट्या पत्रावळ्या पडायच्या. मी अविनाशला बाजूला उभं करायचे. पत्रावळ्यातली उष्टी बुंदी पिशवीत भरायचे. ती पिशवी एका झाडाखाली दडवून ठेवलेली. अविनाशला गोड आवडायचं. पण मी त्याला धीर धरायला सांगितलेलं. मला आईसाठीही बुंदी न्यायची होती. पण थोड्या वेळानं पाहिलं, तर पिशवी गायब. अविनाश ‘‘माझी बुंदी, माझी बुंदी’’ म्हणत भोकाड पसरून रडायला लागला. मीही रडू लागले. पिशवी कुत्र्यांनी पळवली असंल. आम्हांला रडताना लग्नघरातल्या कुणीतरी पाहिलं. त्यांना दया आली. मग त्यांनी आम्हांला जेवण दिलं.
प्रश्न - अन्नाला मोताद अशी दशा असताना, तुम्ही पाचवीपर्यंत शिकलात, शाळेत कसं जाऊ लागलात?
- मी भीक मागायचे. गायीला सांभाळायचे. पण अनिता व अविनाश शाळेत जायचे. त्यांना आराम मिळतो, मला नाही, याचा मला राग यायचा. म्हणून मी आईला म्हणायचे, ‘‘मलाही शाळेत घाल.’’ अनिता व अविनाश शाळेत शिकवलेली गाणी म्हणायचे. ‘‘मलाही गाणी म्हणायचीत’’, मी हट्ट करायचे. पण आईचा नाइलाज होता. मीही शाळेत जायला लागले तर आमची उपासमार झाली असती. आई मोलमजुरी करायची. पण नेहमी तिलाही काम मिळायचं नाही. त्यामुळं मला शाळेत घालणं आईला जमत नव्हतं.
अनिता पाचवीला नापास झाली. तेव्हा आईच्या मनात काय आलं काय की, मी त्या दिवशी आमच्या काजळी गायीला घेऊन रानात गेलते. आई मला शोधत आली. म्हणाली, ‘‘चल तुला शाळंत घालते.’’ अनिताचं डोकं चालत नाही, ह्या पोरीला तरी शिकवू, असं आईला वाटलं असंल. मला लय आनंद झाला. तोंड-हातपाय धुवून मी आईच्या मागं उड्या मारत शाळेत आले. मास्तरांनी जन्मदाखला मागितला. आईकडं तो नव्हता. मग काय करणार? मास्तरांनी मला उलट्या हातानी कान धरायला सांगितला. कानापर्यंत हात पोहोचला की पोरांना पहिलीत घेत, अशी ती टेस्ट होती. त्या टेस्टमध्ये मी पास झाले. मास्तरांनीच माझं जन्मसाल 1987 घातलं. अनिताचं व अविनाशचंही शाळेतलं जन्मसाल 1987 च आहे. शाळेच्या नोंदबुकात एकाच सालात जन्मलेली तीन सख्खी भावंडं फक्त आम्हीच असू...
मी शाळेत जायला लागले. शाळेतून नवा फ्रॉक मिळाला. तो निळा ड्रेस व पांढरा शर्ट मी जपायचे. कारण तोच एक नवा कपडा माझ्याकडं होता. रात्री आईच्या जुन्या साडीचा पदर पांघरून झोपायचे व सकाळी तो ड्रेस घालून शाळेत जायचे. पण आम्हांला ना अंघोळ ना डोक्याला तेल. अवतारच असायचा. शाळा भरायच्या आधी व सुटल्यानंतर मी भीक मागायचे. वर्गातली पोरंपोरी मला पाहायची. ती पोरं मला ‘भिकारी भिकारी भिकारी’ म्हणून चिडवायचे. लाज वाटायची. पण करणार काय?
दुपारच्या सुट्टीत भूक लागायची. मग मी अविनाशला घेऊन शाळेबाहेर जायचे. शाळेजवळ सीताफळाचं झाड होतं. त्यावर चढून मी अविनाशला सीताफळं द्यायचे. पण सीताफळांनी पोट भरतं का? रस्त्यानं कारखान्याला जाणाऱ्या उसाच्या ट्रॉल्या दिसायच्या. आम्ही त्या गाड्यांमागं धावून ऊस पळवायचो. दौंडकर गुरुजी व बेंद्रे मुख्याध्यापकांनी आम्हांला एकदा असं बघितलं. मग कधीकधी ते त्यांच्या डब्यातलं जेवण द्यायला लागले.
मी चुणचुणीत-धाडसी होते, त्यामुळं मास्तर लाड करायचे. एकदा 26 जानेवारी की 15 ऑगस्ट होतं, आठवत नाही. गुरुजींनी मला भाषण करायला सांगितलेलं. मी काय भाषण केलं आठवत नाही, पण दोन सिसपेन्सिली बक्षीस मिळालेल्या आठवतात. एखादं काम केल्यावर मिळालेलं त्या काळातलं ते एकमेव बक्षीस.
एरवी गावातल्या एका घरचं मी पाणी भरायचे. दोन टिपाडं, हांडे-भगुली भरायला हापशी मारून-मारून हात दुखायचे. त्या बदल्यात दोन शिळ्या चपात्या मिळायच्या. मोलमजुरीला जायचे, त्याचे पैसे मिळत, पण बक्षीस-शाबासकी फक्त शाळेत मिळाली. मी भीक मागते याचं मला वाईटही वाटायचं. पोरं चिडवायची, शरम वाटायची. शाळा किंवा भीक यातली एकच निवड करणं भाग होतं. भुकेला पर्याय असतो का? मी भीक मागणं निवडलं. पाचवी पास होऊन सहावीच्या वर्गात मी दोन-तीन महिने शिकले व शाळा सोडली.
प्रश्न - लहान वयातच तुम्ही समाजकार्याकडे वळलात, ते कसं घडलं?
- शाळा सोडून दोन-तीन महिनेच झाले असतील. आमच्या घरी एकदा पारधी समाजातले एक कार्यकर्ते आले. ‘मानवी हक्क अभियान’ या संघटनेच्या अधिवेशनाला पारधी लोकांनी यावं यासाठी निरोप द्यायला ते आलेले.
या घटनेच्या आगंमागंच, आमच्या घरी पोलिसांची रेड पडलेली. माझे मामा घरी आलेले. त्यांच्या मागावर पोलिस आले. दुसऱ्या जिल्ह्यातल्या पारध्यांनी पुण्याच्या हद्दीत प्रवेश केला म्हणून ती धाड पडलेली. पोलिसांनी घराची झडती घेतली. मामाला अटक केली. याला ‘‘पेंडिंग गुन्ह्यात जेलमध्ये टाकतो,’’ असा दम पोलिसांनी आईला दिलेला. आई घाबरली. त्याच वेळी आईला शेळ्या विकून सोळा हजार रुपये मिळाले होते. ते सगळे पैसे पोलिसांनी घेतले. मामा पोलिसांच्या ताब्यातून सुटला. पण मामाचा गुन्हा काय हे मला कळलं नव्हतं. अनिताच्या नवऱ्याकडंही शेळ्या होत्या. हे माझे दाजी बाजारात शेळ्या विकायला गेलेले. तिथे पोलिसांनी त्यांना अटक केली. श्रीगोंदा तालुक्यात एक दरोडा पडला होता, त्या गुन्ह्यात आरोपी म्हणून दाजींना पकडून नेलं. पण दाजींचा त्या गुन्ह्याशी काहीही संबंध नव्हता. नंतर त्यांना निर्दोष सोडलं.
या घटनांमुळं माझ्या मनात पोलिसांबाबत चीड होती. पारधी समाजावर अन्याय होतो, तो दूर करण्यासाठी मानवी हक्क संघटना काम करते, असं त्या कार्यकर्त्यानं सांगितलेलं. अन्याय दूर करण्यासाठीच ते अधिवेशन होतं. पण अधिवेशनाला जायला गाडीभाडं नव्हतं. मग मी गवंड्याच्या हाताखाली मजुरी केली. साठ रुपये रोज मिळाला.
मी अधिवेशनाला गेले. अधिवेशनात जिजा (ॲड. एकनाथ आवाड, संस्थापक मानवी हक्क अभियान), मनिषा तोकले यांची भाषणं ऐकली. ती ऐकून मी भारावले. अधिवेशनाला सगळ्या जाती-धर्मांची लोकं होती. कुणी कुणाला परक्या जातीचा मानत नव्हतं. मला ते आवडलं. पहिल्यांदाच मी पारधी नसून माणूस आहे, याची जाणीव झाली. मी थेट जिजांना भेटले. त्यांना विचारलं, ‘‘मलाही कार्यकर्ता व्हायचंय. किती फी लागते?’’ जिजा हसले. ते म्हणाले, ‘‘फी नाही लागत. तू आजपासूनच कार्यकर्ता झालीस.’’ तेव्हापासून मी मानवी हक्क अभियान संघटनेत सामील झाले. माझ्या जीवनाला नवी दिशा मिळाली.
प्रश्न - लहान वयातच तुम्हांला समज आली असं म्हणता येईल?
- समज मला दोन अर्थांनी आली. एक- समाज कळायला लागला. दुसरं- एक मुलगी म्हणून लोकं कसं बघतात, त्यातून कसं मोकळं व्हायचं हे कळायला लागलं.
मानवी हक्क अभियानाने त्या काळात गायरान जमिनींवर अतिक्रमणाची चळवळ सुरू केलेली. जगायचं साधन नाही अशा गरिबांना गायरान जमिनी मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्न करत होती. पारधी समाजात खूपच थोड्या लोकांकडे जमीन होती, आहे. त्यामुळं पारधी समाज या चळवळीत भाग घेऊ लागला. पण गावकरी जोरदार विरोध करायचे. गायरान ताब्यात घेतलं की, आम्ही कार्यकर्ते अतिक्रमणाचा पंचनामा करायचो. निवेदन तयार करायचो. मी फक्त चौदा वर्षांची होते, त्यामुळं मी ग्रामपंचायत, फॉरेस्ट खातं, पोलिस चौकीत निवेदनं पोहोचवायची कामं करायचे. पण कार्यकर्त्यांचं काम जोखमीचं असतं हे कळायला लागलं. हाणामाऱ्यांची वेळ यायची.
म्हशे गावात 50 पारध्यांनी अतिक्रमण केलेलं. गावकऱ्यांनी पारध्यांवर हल्ला केला. केस झाली. पोलिसांनी गावकऱ्यांची बाजू घेतली. कार्यकर्त्यांना अटक झाली. खरं तर गायरान अतिक्रमणाची केस होणं चांगलं, त्यामुळं अतिक्रमणाचा पुरावा तयार होतो. तो पुरावा पुढं वहिवाट सिद्ध करायला कामी येतो. पण म्हशे गावातल्या घटनेत पोलिसांनी चालबाजी केली. त्यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना सोडलं, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. अशा घटनांमधून समाज व पोलिस गरिबांची साथ देत नाहीत हे कळायला लागलं.
पोलिसांचा पारधी समाजावरील अन्यायही मी अनुभवत होते. अशा अनेक केसेस आहेत, त्यातली एक सांगते- एका गावात दरोडा पडला. त्याच गावात एक पारधी पोरगं भीक मागायला गेलेलं. पोलिसांनी या पोरालाच संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलं. कस्टडीत गुन्हा कबूल करवून घेण्यासाठी पोलिस भयानक प्रकार करतात. सूर्यनारायण तेल हा त्यातलाच एक भयंकर प्रकार. एका जमादाराने त्या पोराच्या अवघड जागेत ते तेल घातलं. हे विषारी तेल असतं. हा अमानुष प्रकार समजल्यावर मोर्चा निघाला. मी त्यात सामील झाले. पोलिसांचे अत्याचार व मोर्चे निघणं, जाब विचारणं, यातून मला मी माणूस असल्याची नवी जाणीव होऊ लागली. हे सगळं मी माझ्या ‘विंचवाचं तेल’ या पुस्तकात तपशीलवार नोंदवलंय.
प्रश्न - स्त्री कार्यकर्ता म्हणून वेगळी समज आली, असंही तुम्ही म्हणालात, त्याबद्दल सांगा...
- मी वयात येत होते. कार्यकर्ता म्हणून मी गावोगाव फिरायचे. त्यामुळं आधीसारखं गबाळं राहणं सुटलं. मी टापटीप राहायला लागले. हे वरकरणी झालं. पण शरीराच्या आतूनही माझ्यात बदल घडत होते. वयात येताना बाई असण्याची जाणीव व बाईच्या नशिबी काय येतं, याचीही जाणीव भोवतालाकडं बघून झाली.
एक दिवस मला पाळी आली. त्या दिवशी मी घरी होते. दिवसभर काय होतंय, काय करावं कळेना. रात्री जास्तच रक्तस्राव झाला. मग मी आईला सांगितलं. आईनं साडीचा पदर फाडून तो लावायला सांगितला. पण कापड भिजल्यावर बदलायचं असतं हेही मला माहीत नव्हतं. आईनं फक्त फडकं दिलं. बाकी ती काहीच बोलली नाही.
गोंधळून मी माझ्या मावळणीकडे गेले. तिने मला कापड बदलण्याची माहिती दिली. पण ती वेगळ्याच कारणानं खूश झाली. माझी ती पहिली पाळी, लगेचच माझं लग्न लावायचा विचार मावळणीनं सुरू केला. तिच्या मुलासाठी पोरगी भेटली असं तिला वाटलं. आमच्या जमातीत अजूनही बालविवाह होतात. पण आईनं मावळणीला नकार दिला. मी वाचले. फक्त बालविवाहाची बळी होण्यापासूनच नाही, तर इतर पारधी बायांसारखं जनावरांसारखं जगणंही मला नाकारता आलं.
प्रश्न - जनावरांसारखं जगणं म्हणजे?
- आपल्या मर्जीनं बाईनं जगणं समाजाला मान्य नाही. पारधी समाजात तर बाईला माणूसही मानलं जात नाही. तिला पुरुषांच्या कायद्यानं जगावं लागतं. माझ्या बहिणीबाबतचा किस्सा सांगते- ती बाळंत होतानाची ही घटना आहे. तिला कळा येत होत्या. ती तळमळत होती. अशा प्रसंगात एक पुरुष तिला विचारत होता- ‘‘लग्नाआधी तुझा परपुरुषाशी संबंध आलता का? कबूल हो, कबूल हो!’’ ही प्रथा जमातीत सर्रास चालते. एखादी मुलगी कबूल झाली, तर तिच्या कुटुंबाला जात पंचायत दंड लावते. नवरा त्या मुलीला सोडतो. तिच्या बाळाची कुणी पर्वा करत नाहीत.
एरवीही बाईला संशयातच जगावं लागतं. बाई नवऱ्यावर विषप्रयोग करेल म्हणून तिला नवऱ्याच्या ताटातच जेवावं लागतं. बाई इतकी अपवित्र मानतात की तिला शौचाला-लघवीला वेगळ्या जागी जावं लागतं. बाईच्या कपड्यांचाही विटाळ मानतात. परपुरुषाचा स्पर्श झाला तरी वाळीत टाकतात. मी तर कार्यकर्ती होते. त्यामुळं माझ्या बाबतही वावड्या उठल्या. ‘‘ही मांग-महार पोरांच्या स्कूटरवर जाते, ही बाटलीय.’’ अशा वावड्या उठल्या.
असल्या समजुतींमुळं माझ्या हातचं पाणीही न घेणारे अनेक आहेत. मी स्त्री आहे, कार्यकर्ती आहे. असल्या अडाणीपणाला भीक घालायची नाही, ही जाणीव मला झाली. वेगळं भान आलं. मला संशयी जोडीदार नको होता. शिकलेला, संवाद करणारा, समानतेनं वागवणारा जोडीदार हवा होता. तो मिळणं मुश्कीलच. त्यामुळं माझ्या संसाराचा विचार बाजूला ठेवून, मी फुले-आंबेडकर-अण्णा भाऊंचा विचार रुजवायला महत्त्व देऊ लागले. क्रांती संस्थेची स्थापना केली.
प्रश्न - संस्थेच्या माध्यमातून तुम्ही काय करता?
- कार्यकर्त्यांना आधार देणं सर्वांत महत्त्वाचं. मला सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियानमधून मानधन मिळालं. नंतर स्वीस एड, दलित फाउंडेशन, माणुसकी, इकोनेट, कोरो या संस्थांकडून फेलोशिपमधून आर्थिक आधार मिळाला. त्यातून मी माझ्यासह कार्यकर्त्यांनाही उभं केलं. पारधी समाजात कार्यकर्ते नाहीत. या समाजाचे खायचे वांधे. मग समाजाच्या विकासासाठी कोण पुढं येणार? त्यामुळं मी 2010मध्ये संस्था स्थापन केली. संस्थेचे पदाधिकारी व सदस्य पारधी समाजातलेच आहेत. या कार्यकर्त्यांना मानधन मिळावं, त्यांच्या मार्फत समाजापर्यंत नवे विचार पोहोचवावेत ही माझी धडपड आहे.
पारधी व भिल्ल समाजांना मोलमजुरीशिवाय जगण्याचं दुसरं साधन नाही. भटकं जीवन असल्यानं या समाजांकडं आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदानाचं कार्डही नसतं. जातीचा दाखला तर अत्यंत महत्त्वाचा. पण सरकारी नियमांमुळं तो मिळत नाही. माणिक काळे नावाचा एक माणूस आहे, तो पंचविशीत होता, तेव्हा त्यानं घरकुलासाठी अर्ज केलेला. पण जातीचा दाखला नाही, म्हणून त्याला घरकुल योजनेतून मदत मिळत नव्हती. शासनाचा नियम आहे, 60 वर्षांपूर्वीचा पुरावा हवा. आजोबा-पणजोबाचा शाळेचा दाखला किंवा जन्ममृत्यूचं प्रमाणपत्रं पुरावा म्हणून लागतं. आमच्या समाजात आत्ता कुठं पहिली-दुसरी पिढी शाळेत जाऊ लागलीय. दवाखान्यातली बाळंतपणंही गेल्या दहा वर्षांत होऊ लागलीत. पुरावे आणणार कुठून?
मग आम्ही स्थानिक मंडल अधिकाऱ्यांची मदत घेऊन कँप घेतला. मंडल अधिकाऱ्यांनी गृहचौकशी अहवाल दिला तर जातीचा दाखला मिळू शकतो. या कँपमुळं माणिक काळेला वयाच्या साठाव्या वर्षी दाखला मिळाला. त्याच्यासारख्या दीड हजार लोकांना आम्ही दाखले मिळवून दिले. निलेश घोडके या अधिकाऱ्यांनी जातीच्या दाखल्यासाठी ॲफिडेव्हिट-अर्ज दाखल करायचा खर्च उचलला. गरीब समाजाबद्दल कणव दाखवणारे असे अधिकारी मी जोडू शकले हे मला संस्थेचं मोठं यश वाटतं.
पारधी व भिल्ल समाजांतील 50 कुटुंबांना गायरान मिळवून देण्यात संस्थेनं मदत केली. 500 लोकांना रेशनकार्ड काढून दिलं. 35 गावांत ग्रामसभांचे ठराव घेऊन पारधी व भिल्ल समाजांतील कुटुबांना घराखालची जमीन नावे करून द्यायला मदत झाली. हजार लोकांना संस्थेनं आधार कार्डर्ं काढून दिली. 60 कुटुंबांना उज्वला गॅस योजनेची मदत मिळवून दिली. या योजनांची मदत खरं तर सहज मिळायला हवी. पण पारधी-भिल्ल कुटुंबं अजूनही रानात-गावाबाहेर राहतात. सरकारी कचेरीत जाणं, पाठपुरावा करणं त्यांना जमत नाही. म्हणून संस्थेचे कार्यकर्ते ही मदत मिळवून देतात.
अन्याय-अत्याचारांच्या केसमध्ये मदत करणं हे तर आमचं रोजचं काम. पण मला वाटतं, शिक्षणातूनच समाजाचा विकास होईल. त्यामुळं मुलं ड्रॉप आउट होणार नाहीत, यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करतोय. एकदा मी करडे नावाच्या गावात गेलेले. पारधी वस्तीवरची पोरं शाळेतून घरी येत होती. मी पाहिलं तर एकाही पोराच्या पायात चप्पल नव्हती. ही समस्या मी फेसबुकवर मांडली. तर पुण्यातील ॲड. संजय जाधव यांनी 300 बूट मुलांसाठी पाठवले.
भिल्ल समाज मासेमारी करतो. अलीकडे गावाजवळच्या पाणवठ्यात लिलाव लावून मासेमारी करणाऱ्या संस्थांनाच मासेमारीची परवानगी दिली जाते. कोटी-दोन कोटींच्या लिलावात भिल्ल समाजाचा निभाव कसा लागणार? त्यामुळं हा समाज मागं पडतोय. दिवसाकाठी चार-पाच किलो मासे पकडणारी ही जमात. मुश्किलीनं त्यांना दीड-दोनशे रुपये मिळू शकतात. असा समाज आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा उचलणार? पारधी-भिल्ल समाजांतल्या पोरांना झेडपीच्या शाळेतून ड्रेस व पुस्तकं मिळतात. पण वह्या-कंपास, दप्तराची बॅग नसते. एका चांगल्या स्कूल बॅगची किंमत असते 500 रुपये. एवढा खर्च भिल्ल-पारध्यांना कसा पेलवणार?
कितीतरी मुलं ह्या वस्तू नाहीत म्हणून शाळा सोडतात. म्हणून संस्थेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी दीडशे मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलतो. त्यासाठी मदतीचं आवाहन करतो. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शासकीय अधिकारी यांच्याकडून लोकवर्गणी जमवतो. या पैशांतून पोरांसाठी शालेय साहित्य पुरवलं जातं. वेळोवेळी पारधी वस्त्यांवर आंबेडकर, सावित्रीबाई-जोतिबा फुलेंची जयंती असे कार्यक्रम करतो. त्या निमित्ताने शासकीय अधिकारी पारधी-भिल्लांच्या पाड्यांवर येतात. लोकांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. अधिकारीही मुलांची प्रत्यक्ष परिस्थिती पाहून मदत करतात.
मलाही अशाच कार्यक्रमांमुळं पाचवी पासचा कलंक मिटवण्याची प्रेरणा मिळाली. मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बारावीची पूर्वपरीक्षा दिली. पास झाले. मग मी बी.ए.साठी मुक्त विद्यापीठातून प्रवेश घेतला. समाजात असे अनेक आहेत, ज्यांना उच्च शिक्षणाची गरज वाटते. संस्थेच्या मदतीने सध्या 18 मुलं मुक्त विद्यापीठातून पदवी घेत आहेत. ही मुलं किरकोळ कामं-रोजंदारीवर करतात. त्यांना फी भरणंही शक्य नव्हतं. शिरूरचे पोलिस उपनिरिक्षक संजय राऊत यांनी सहा विद्यार्थ्यांची फी भरली. शाहीर संदेश उमप यांनी अलीकडे संस्थेच्या गावात भेट दिली. त्यांनीही विद्यार्थ्यांची गरज ओळखून शालेय साहित्यासाठी मदत दिली. अशा प्रकारे सध्या संस्थेच्या माध्यमातून मी रचनात्मक कार्य करत आहे. शिक्षणातूनच समाजाचा विकास होऊ शकतो हे मला पटलंय. वावटळीत पाय रोवून उभं रहायचं तर शिक्षणाला पर्याय नाही. मी अजूनही त्यासाठीच शिकत आहे. समाज मला अजूनही शिकवत आहे. मला माझ्या नावापुढं एकतरी डिग्री लावायचीय. डॉ.आंबेडकरांच्या नावापुढं किती डिग्ऱ्या आहेत, माझ्या नावापुढं एक तरी नको का? पारधी-भिल्ल पोरापोरींनाही शिक्षणामुळं काय होऊ शकतं, हे कळावं यासाठी तरी मला डिग्री मिळवायचीय.
(प्रिय वाचकहो, सुनीताच्या कामासंदर्भात आठ वर्षांपूर्वीही साधनातून एक लेख प्रसिद्ध केला होता, तो प्रशांतनेच लिहिला होता. तेव्हापासूनचा तिचा प्रवास आम्हाला माहीत आहे. ही मुलाखत वाचून, सुनीताच्या संस्थेला आर्थिक किंवा वस्तूरूपात मदत करावी अशी इच्छा कोणाच्या मनात निर्माण झाल्यास जरूर करावी. त्यासाठी थेट तिच्याशी संपर्क साधावा. - संपादक)
मुलाखत व शब्दांकन :
प्रशांत खुंटे, पुणे
prkhunteg@mail.com
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या