डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लोखंडी पिंजऱ्यातून 
पोलिसांच्या पहाऱ्यात 
बडव्यांच्या धाकात 
तुझ्यापर्यंत पोचणं, 
विठुराया, किती अवघड! 
त्याहीपेक्षा तुझी चांदीने मढवलेली दारं, 
तुझी चांदीची, रेशमी गाद्या-गिरद्यांची पालखी, 
तुझ्या जेवणा-झोपण्याच्या, दर्शनाच्या वेळा 
आणि तुझं सोन्याच्या मुगुटातलं दागिन्यांनी जखडलेलं 
काळं कुळकुळीत रूप- रखुमाईविना! 

विठोबा, 
तुझ्या दारी आले एका ओढीने- 
तुझ्या कुळकुळीत काळ्या वर्णात 
या भूमीचा वंशवृक्ष शोधायला। 

तुझ्या ओबडधोबड मूर्तीत 
लेकरांच्या पाठीवरून फिरणारा 
खडबडीत, खरखरीत, रापलेल्या, कष्टणाऱ्या 
बापाच्या हाताचा स्पर्श मिळेल म्हणून। 

तुझ्या मूर्तीत दिसेल 
नामदेवाचा नैवेद्य प्रेमाने खाणारा देव, 
कावडीतलं पाणी गाढवाच्या मुखी घालणाऱ्या 
एकनाथाची करुणा, 
तुझ्या ‘द्वारीचा महार’ अशा चोख्याला 
‘जीवाबरोबरी’ कवटाळणारं 
तुझं ‘समचरणी’ रूप। 

जनीबरोबर दळणारा, 
रखुमाईबरोबर लटकं भांडणारा श्रीहरी। 

मी शोधत होते तुझ्या दर्शनासाठी आतुर 
चोखामेळ्याने प्राण सोडला ती पायरी, 
मी शोधत होते पुंडलिकाने फेकलेली वीट, 
मी शोधत होते गोरा कुंभाराचं नादब्रह्म, 
मी शोधत होते शेख महंमदाचं सगुण-निर्गुणाचं 
एकरूपत्व... 
मी शोधत होते तुझ्या शेजारी उभी, 
कमरेवर हात ठेवलेली, 
आईची आई रखुमाई। 

शैव-शाक्ताच्या भांडणात 
मधे कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला तू- 
दोहोंना गुंफून घेत, 
संस्कृत-प्राकृताच्या सीमेवर संगम झालेला तू- 
आर्य-द्रविडांचं द्वैत मिटवणारा तू- 
भक्ताचा देव नव्हे, सखा-सहचर झालेला तू। 

बैलाचे घुंगरू टाळ हो वाजे। 
मोटेचा मंगल मृदंग गाजे। 
विठ्ठल माझा हो नांगर राजा। 
रखुमाई माझी हो कुदळ राणी।
  
श्रमणार आम्ही वारकरी हो- 
असा, लोकजीवनात घुसलेला 
शेतकऱ्याच्या शेतात पिकलेला 
कष्टकऱ्याच्या घामात मिसळलेला 
बाईच्या दु:खापमानाला झेललेला तू। 

असा तू, ज्याने दुष्काळात तुकोबाला 
सावकारीच्या चोपड्या बुडवून टाकण्याची प्रेरणा दिली, 
ज्याने गोरा कुंभाराला 
मातीत प्राण फुंकण्याची रीत शिकवली, 
समभाव आणि सहिष्णुतेची दिंडी घेऊन 
शेकडो वर्षं वारी निघाली 
- असा विठुराया मी शोधत होते. 
असा विठू साऱ्यांना भेटावा 
म्हणूनच साने गुरुजींनी लावला होता ना जीव पणाला? 

काल तिथे रांगेत ताटकळणारे राबणारे, 
कष्टलेले, रापलेले तुझे भक्त- 
बाया-बापड्या, हडकुळ्या, सुकलेल्या, सुरकुतलेल्या... 
पांढऱ्या दाढीचे खुंट वाढलेले म्हातारे 
तुझ्या ओढीने आलेले, 
तुझ्या पायी माथा ठेवण्यासाठी आसुसलेले... 
तुझ्या दर्शनाने सारी दु:ख निवतील या आशेने, 
की त्यानेच जगण्याचं बळ मिळेल या श्रद्धेने?- 
ठाऊक नाही। 

लोखंडी पिंजऱ्यातून 
पोलिसांच्या पहाऱ्यात 
बडव्यांच्या धाकात 
तुझ्यापर्यंत पोचणं, 
विठुराया, किती अवघड! 
त्याहीपेक्षा तुझी चांदीने मढवलेली दारं, 
तुझी चांदीची, रेशमी गाद्या-गिरद्यांची पालखी, 
तुझ्या जेवणा-झोपण्याच्या, दर्शनाच्या वेळा 
आणि तुझं सोन्याच्या मुगुटातलं दागिन्यांनी जखडलेलं 
काळं कुळकुळीत रूप- रखुमाईविना! 

- या सर्वांत तू कुठे होतास विठुराया? 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनीती सु. र.
sunitisr@gmail.com

सामाजिक कार्यकर्त्या 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके