स्त्रियांचा प्रश्न आपल्या राजकीय कामाच्या केंद्रस्थानी यावा, यासाठी आंबेडकर सतत झगडत राहिले. स्त्रियांना मातृत्वकाळामध्ये पगारी रजा द्यावी, यासाठीच्या विधेयकाला 1928 मध्ये मुंबई विधी मंडळामध्ये त्यांनी जोरकस समर्थन दिलं होतं. त्यांचे सहकारी पी. जे. रोहम यांनी 1938 मध्ये जन्मनियंत्रणाचं समर्थन करणारं विधेयक आंबेडकरांच्या वतीने मुंबई विधी मंडळात मांडलं होतं,6 पण दुर्दैवाने हे विधेयक मतदानात पराभूत झालं. प्रजननाचा अधिकार पूर्णतः स्त्रियांचाच असतो, अशी आंबेडकरांची धारणा होती. 1930-40 च्या दशकांमध्ये ते स्त्रीमुक्तीशी संबंधित विविध विधेयकांसाठी सातत्याने लढत होते. पण जतनवादी राजकारण्यांनी अखेरीस अपरिहार्यपणे ही विधेयकं मवाळ करून टाकली.
भारतीय चित्रपटांचं प्रेमावर प्रेम आहे. गरीब व श्रीमंत यांच्यातील प्रेमाचा, धर्म-प्रदेश व भाषा यांच्या सीमा पार करणाऱ्या प्रेमाचा, लिंगभाव व लैंगिकता यांच्या प्रचलित संकल्पनांना उलटं-पालटं करणाऱ्या प्रेमाचा उत्सव भारतीय चित्रपटांमध्ये साजरा केला जातो. अशा चित्रपटांच्या कोणा परदेशी प्रेक्षकाला भारतीय समाज प्रेमळ आहे असं वाटलं, तर त्या प्रेक्षकाचा दोष नाही. पण याचा सत्य परिस्थितीशी काहीच संबंध नाही. कारण, भारतातील सर्व रोमँटिक व वैवाहिक संबंधांच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘जात’ या क्रूर सामाजिक वास्तवाची प्रामाणिक चर्चा बॉलीवुडमध्ये कधीही होत नाही.
उदाहरणादाखल बॉलीवुडमधील लोकप्रिय ‘कौटुंबिक चित्रपट’ पाहावेत. ते मुख्यत्वे पैसे असलेल्या मध्यमवर्गाला डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेले असतात, पण त्यांचा प्रेक्षकवर्ग व्यापक असतो. आम्हाला केबल कनेक्शन परवडत नव्हतं आणि आमच्याकडचा ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही पाहताना फारसा आनंद मिळायचा नाही, त्यामुळे मी शेजाऱ्यांकडे जाऊन दिवसेंदिवस टीव्ही पाहत असे. सुमारे तीन तास चालणारे हे चित्रपट सर्वसाधारणतः कोणाचा तरी विवाह होऊन संपतात. पण त्याआधी प्रेक्षकाला अनेक पात्रांची ओळख करून दिली जाते. सर्वसाधारणतः ही पात्रं म्हणजे प्रेमात बुडालेल्या जोडप्याचं विस्तारित कुटुंब असतं. मग यात आणखी काही शेवट नसल्यासारखी भासणारी उपकथानकं असतात. प्रत्येक कुटुंबाच्या व्यावसायिक समस्या, वारसाहक्कावरून कुरबुरी, कावेबाज मोठा भाऊ, हिंदू उत्सवांचं साजरीकरण (सर्वसाधारणतः याला संगीताची जोड असते) आणि ही उपकथानकं मध्यवर्ती असलेल्या प्रेमाला बाधक असतात किंवा उपकारक असतात. अपरिहार्यपणे शेवटी वर आणि वधू आनंदी वातावरणात एकत्र येतात.
हे सगळं वरकरणी निरुपद्रवी वाटतं. पण जवळ जाऊन पाहिलं असता आपल्या लक्षात येतं की, संबंधित चित्रपटामध्ये अरेंज्ड मॅरेजचंच छुपं समर्थन केलेलं असतं आणि ही वस्तुस्थिती लपवण्यासाठी किंवा ती किमान निवळवण्यासाठी अथवा सौम्य करण्यासाठी विस्तृत कौटुंबिक उपकथानकांचा वापर केला जातो. अरेंज्ड मॅरेज (जुळवून केलेला विवाह) ही भारतीय परंपरा आहे आणि त्यात तरुण माणसं स्वेच्छेने त्यांच्या पालकांच्या किंवा कौटुंबिक ज्येष्ठांच्या अधिकाराला शरण जातात, मग ही ज्येष्ठ मंडळी तरुणांसाठी योग्य जोडीदार निवडतात- असा भारताबाहेरच्या वाचकांचा समज होण्याची शक्यता आहे. काही जण कदाचित याचा संबंध उदात्त आदर्शांशीही जोडतील. पण ते गोष्टींच्या पुस्तकांमध्ये शोभणारं कथन आहे. वास्तवात मात्र अरेंज्ड मॅरेज हा जातीय विवाह असतो. म्हणजे एकाच जातीतल्या दोन माणसांचा कौटुंबिक पोलिसांनी- पालक, ज्येष्ठ, चुलते, आत्या, व दूरचे नातेवाईक यांनी- जुळवलेला हा विवाह असतो. जातीय वंशावळ शुद्ध राहावी आणि कनिष्ठ जातीयांच्या किंवा देव न करो, पण पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांच्या रक्ताने- अशुद्ध रक्ताने ती दूषित होऊ नये, याची तजवीज या मंडळींना करायची असते.
सौम्य रूपातले कौटुंबिक चित्रपट एका विशिष्ट कारणामुळे अस्तित्वात आहेत, ते कारण असं : भारतीय लोकसंख्येमध्ये सुमारे 18 टक्के उच्च जातीय- किंवा तथाकथित द्विज हिंदू आहेत. त्यांनी बॉलीवुडवर स्वतःची सत्ता प्रस्थापित केलेली आहे. ते स्वतःच्या संकुचित, अभिजन, भपकेबाज जातीय संस्कृतीला अखिल भारतीय जीवनाचं विडंबनात्मक चित्रण म्हणून सादर करतात (वास्तवात पंजाबी खत्री जातीचे विवाह ही विवाहाची भारतीय संस्कृती असल्याप्रमाणे चित्रण केलं जातं). या चित्रपटांमधील अन्नपदार्थ, कपडे, झकपकीत घरं, अंतर्गत सजावट, कार्पेट, साड्या, बिंदी, उत्सव आणि त्यांचे देव हे सगळं प्रभुत्वशाली जातीच्या जीवनविश्वामध्ये बसणारं असतं. भारतीय लोकसंख्येमध्ये सुमारे 70 टक्के असलेले दलित, आदिवासी व मागासवर्गीय हिंदू यांची संस्कृती आणि त्यांचं अस्तित्त्वच बॉलीवुडमध्ये मुख्यत्वे दडपलेलं आहे. विभक्तपणाची संस्कृती अपायकारक स्थितिशीलतेला बळकटी देते. या संस्कृतीमध्ये द्विज जातींचे सदस्य आपल्याच जातीत लग्न करून आणि त्याद्वारे आपल्या मुलाबाळांना- विशेषतः मुलींना- त्यांच्याच गटामध्ये ठेवून उमरावी लाभ उठवतात. असं करत असताना या सगळ्याखालचा रचनात्मक हिंसाचार पुसला जातो.
शिवाय, काही वेळा बॉलीवुडमध्ये कुटुंबाशी संबंधित नसलेल्या प्रेमविवाहांचं चित्रण येतं, तेव्हा लक्षणीय जातआंधळेपणा त्यात दिसतो. वास्तव जीवनामध्ये प्रेमविवाहाचं- विशेषतः जातीय सीमा ओलांडणाऱ्या प्रेमाचं- धाडस केलेल्या लोकांना सामोरं जावं लागणारी अनागोंदी आणि हिंसाचारही अशा चित्रपटांमधून गाळलेला असतो.
बॉलीवुडच्या कल्पनारम्य जगापेक्षा वास्तव भयंकर आहे. या वास्तवामध्ये आंतरजातीय संबंधांचं निमित्त होऊन अजूनही दंगली घडू शकतात आणि खुनशी हल्ले होऊ शकतात. संपूर्ण ग्रामीण भारतात हे चित्र दिसतं (प्रसारमाध्यमांमध्ये यासाठी प्रतिष्ठेसाठी हत्या/ ऑनर किलिंग असा मूळ अर्थ सौम्य करणारा शब्द वापरला जातो). बहुतेकदा जातीय रचनेत खालच्या पातळीवर असलेल्या व्यक्तीवर हल्ला होतो; काही वेळा तर प्रभुत्वशाली जातीतील व्यक्तीचे कुटुंबीय खालच्या जातीतल्या व्यक्तीचा जीवही घेतात. मी हा लेख लिहीत असताना एका बातमीचा मथळा माझ्या इंटरनेट-फीडमध्ये डोकावला, तो असा : दलित माणसावर प्रेम करणाऱ्या महिलेची तिच्या पालकांकडून व भावाकडून हत्या... एका दलित पुरुषाशी नातं ठेवल्याबद्दल तिच्या स्वतःच्याच कुटुंबीयांनी तिची गुदमरवून हत्या केली. तपास अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, भारतीची आई रश्मी तिच्या छातीवर बसली आणि तिनं उशी तिच्या चेहऱ्यावर दाबली, तर मनीषने तिचे हात धरून ठेवले. भारतीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या बापाने व भावाने तिचं प्रेत तिच्या खोलीतल्या छताला टांगलं, जेणेकरून तिने आत्महत्या केल्याचं भासावं. केवळ कौटुंबिक वंशावळीचं जतन करण्यासाठी हा निर्घृण खून झाला. मुलीच्या जीवनापेक्षा ही वंशावळ अधिक महत्त्वाची मानली जाते. दलितांच्या शरीरातील द्रव्याने संपूर्ण जातरचनेला धोका निर्माण होतो.
अशी रानटी कृत्यं निष्ठूरपणे सुरूच आहेत, हे लक्षात घेतल्यावर तरी आपण जुळवलेल्या विवाहाशी निगडित तथाकथित पारंपरिक गुणांचा किंवा बॉलीवुडमध्ये लपलेल्या अंधाराचा पुनर्विचार करायला हवा. तसंही जुळवलेल्या विवाहांची पद्धत समजून घेतल्याशिवाय कोणालाही भारतीय समाज समजून घेता येणार नाही. दुर्दैवाने सर्वच जातींमध्ये विवाहाची ही पद्धत प्रचलित आहे. ताज हॉटेल समूहाने1 अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, 75 टक्के तरुण भारतीयांनी जुळवलेल्या विवाहाला पसंती दिली आणि उत्तर भारतातील 82 टक्के महिलांनी आपले जोडीदार आपल्या पालकांनीच निवडावेत, या पर्यायाला पसंती दिली. या लाखो दुर्दैवी स्त्रियांसमोर कोणत्या प्रकारचं वैवाहिक आयुष्य वाढून ठेवलेलं असेल? त्यांच्या कुटुंबातल्या ज्येष्ठांनी त्यांच्यासाठी कोणत्या यातनांची तयारी केलेली आहे?
विक्रीसाठी ठेवलेलं प्रेम
अरेंज्ड विवाह वेगवेगळ्या मार्गांनी होतात. सर्वांत साधा-सोपा मार्ग म्हणजे आपल्या कुटुंबातील किंवा जातीतील किंवा आपलं कुटुंब ज्या सांस्कृतिक वा धार्मिक संघटनेचा भाग आहे, तिथल्या ज्येष्ठांनी सगळं जुळवून आणणं. बहुतेकदा दोन्ही संभाव्य जोडीदारांच्या पत्रिका तपासल्या जातात. त्यानुसार हे नातं चांगलं राहील की नाही, याचा अदमास बांधला जातो. पत्रिका न जुळल्यामुळे अनेकांचा प्रेमभंग होतो. अंधश्रद्ध समाजातील विस्मयजनक गोष्टी या अशा असतात.
तुमच्या कौटुंबिक वर्तुळांमधून तुम्हाला साजेशी जोडीदार व्यक्ती मिळणं शक्य झालं नाही, तर विवाहमेळेसुद्धा असतात. तिथे आपली मालमत्ता दाखवल्याप्रमाणे मुला-मुलींचं प्रदर्शन मांडलं जातं (अलीकडेच लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्समध्ये2 युन शेंग यांनी चिनी विवाह-बाजारपेठांबद्दल लिहिलं होतं, साधारण त्यासारखाच हा भारतीय प्रकार असतो).
परंतु, विवाह जुळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक पद्धतींच्या तुलनेत अशा प्रकारचे पारंपरिक मार्ग अगदीच फुटकळ वाटतात. कोणतंही भारतीय वर्तमानपत्र उघडलंत, तर त्यात तुम्हाला एक किंवा दोन पानं विवाहविषयक जाहिरातींसाठी (मॅट्रिमोनिअल) राखून ठेवल्याचं दिसेल. हे पान निर्लज्जपणे जातिनिहाय लहान चौकटींमध्ये विभागलेलं असतं, जेणेकरून आपल्याच जातीतलं कोणी तरी आपल्याला सापडावं आणि विटाळाच्या धोक्यापासून आपला बचाव व्हावा. अशा खुळचटपणाशी लढण्यासाठी टाइम्स ऑफ इंडिया या भारतातील सर्वांत मोठ्या इंग्रजी दैनिकामध्ये जातीचा व जातिआधारित निवडींचा उल्लेख न करणाऱ्या विवाहविषयक जाहिरातींवर 25 टक्के सवलत दिली जाते. आंतरजातीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी जातीची अट नाही (कास्ट नो बार) असा एक स्वतंत्र विभागही त्यांनी केलेला आहे.
पण उच्चजातीय भारतीयांनी यातूनही पळवाटा शोधलेल्या आहेत. ‘जातीची अट नाही’ या विभागामध्ये जाहिराती करणाऱ्यांपैकी काही जण छुप्या पद्धतीने स्वतःच्या जातीचा उल्लेख करतात. हा त्यांच्या अभिजन सहजातीयांना दिलेला संकेत असतो. जातीची अट नाही या विभागामध्ये केवळ उच्च जातीय या मथळ्याखाली एका व्यक्तीची जाहिरात होती, हा या संदर्भातला खास वेडसर दाखला नोंदवता येईल (द्विज किंवा उच्च जातीय प्रकारामध्येही अगणित जाती येतात, या वस्तुस्थितीद्वारे कदाचित सदर जाहिरातीमधील विरोधाभासाचं स्पष्टीकरण केलं जाईल). अशा प्रकारचा भेदभाव उघडपणे हीन पातळीवर जाण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ- एखादी इच्छुक व्यक्ती ‘जातीचं बंधन नाही, पण एससी/एसटी क्षमस्व’ असं नमूद करते (एससी : शेड्युल्ड कास्ट्स/ अनुसूचित जाती; एसटी : शेड्युल्ड ट्राइब्ज/ अनुसूचित जमाती).
आता तर विवाह जुळवण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचाही वापर केला जातो. अलीकडच्या काही वर्षांमध्ये विवाहविषयक संकेतस्थळांचा सुळसुळाट झाला आहे- ‘भारत मॅट्रिमोनी’ व ‘शादी-डॉट-कॉम’ ही बहुधा सर्वांत लोकप्रिय संकेतस्थळं असावीत. नातेसंबंध, जात व वंशावळ यांच्या नाजूक जाळ्यासंदर्भात मदत करण्यासाठी प्रगत चाळण्या उपलब्ध करून देण्याचं काम ही संकेतस्थळं करतात. निमशहरी अवकाशामध्ये जातीचं निनावीपणे उल्लंघन करण्यासाठी ही संकेतस्थळं आदर्श जागा ठरू शकतात. पण त्याऐवजी ही रानटी वैदिक नियमांच्या पुनर्स्थापनेची नवी स्थळं ठरली आहेत. आता तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट या भारतातील कथित अग्रणी उच्च शिक्षण संस्थांच्या विविध शाखांमधील पदवीधरांनाच सेवा पुरवणारी विवाहविषयक संकेतस्थळंसुद्धा आहेत. जात व वर्ग यांच्यातला जोम टिकवून ठेवण्यासाठी सुरू झालेल्या या संकेतस्थळाची टॅगलाइन मात्र उपरोधाने ‘आपलं गुरुकुल महत्त्वाचं’ (आल्मा माटर मॅटर्स) असं जाहीर करते.
या सगळ्याचा एकत्रित विचार केला असता भारतामध्ये जुळवलेल्या विवाहांची पद्धती हा एक मोठा व्यवसाय असल्याचं स्पष्ट होतं. मध्ययुगीन पूर्वग्रह आणि जागतिक भांडवल यांच्यातील अपवित्र युतीही या रूपात दिसते (या संदर्भात कृत्रिम प्रज्ञा सामूहिक कौटुंबिक ज्येष्ठांसारखी कार्यरत असते). भारतातील जुळवलेल्या विवाहांचा उद्योग वार्षिक 50 अब्ज डॉलरांच्या घरात गेलेला आहे आणि कोणत्याही विशिष्ट वेळी 6 कोटी 30 लाख भारतीय व्यक्ती आनंदहीन भवितव्यासाठी या पद्धतीमध्ये सक्रियरीत्या सहभागी झालेले असतात, असं अलीकडेच ‘द इकनॉमिस्ट’ने नमूद केलं होतं.3 ही प्रतिगामी प्रथा केवळ आपल्या मायदेशापुरती मर्यादित नाही. अनेक परदेशस्थित भारतीय व्यावसायिक एखादा भारतदौरा करतात, त्या थोडक्या वेळेत शक्य तितके पर्याय चाचपतात आणि संभाव्य वधू किंवा वरासह विमानातून माघारी जातात. (न्यू जर्सीतल्या रहिवाशांना असे काही लोक नक्कीच भेटले असतील!)
आमचा एक मित्र अमेरिकेमध्ये माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतो. त्याला ऑनलाईन सापडलेल्या किंवा त्याच्या कुटुंबाने निवडून ठेवलेल्या संभाव्य जोडीदार व्यक्तींना भेटण्यासाठी तो दर सहा महिन्यांनी भारतात जा- ये करतो. हा व्यवहार पार पाडायला त्याला तीन वर्षं लागली. त्याला अंतिम निर्णय घ्यायला भाग पाडण्यामध्ये अंशतः त्याच्या वयाचाही हातभार होता. तो तिशीच्या मध्यावर होता आणि त्याला अपेक्षित आदर्श साच्यातली पत्नी मिळावी, यासाठी तो अस्वस्थ होता. आपला मुलगा समलिंगी नाही, हे कळल्याने त्याच्या धर्मांध पालकांनाही मोठंच सुख लाभलं असेल, यात काही शंका नाही.
जुळवलेल्या विवाहांचं दडपण स्त्रियांना प्रमाणाबाहेर सहन करावं लागतं, हे वेगळं नोंदवायला नकोच. जुळवलेल्या विवाहांच्या अर्थव्यवस्थेमध्ये मुलगी दुसऱ्याची संपत्ती मानली जाते. मुलगी म्हणजे भावी नवऱ्याच्या कुटुंबाला परत करायचं कर्ज किंवा गुंतवणूक- अशा पातळीवरचा हा विचार आहे. नवऱ्याचं घर हेच तिचं खरं घर मानलं जातं. भारतातील केवळ पाच टक्के उपवर मुलींनी स्वतःच्या विचाराने आपल्या नवऱ्याची निवड केलेली असते, असं ‘भारतीय मानव विकास सर्वेक्षणा’मध्ये आढळलं.4 केवळ पाच टक्के कुटुंबं अशी जोडी जुळवण्यापूर्वी त्यांच्या मुलीचं म्हणणं विचारात तरी घेतात; 65 टक्के मुली त्यांच्या भावी नवऱ्यांना लग्नाच्या दिवशीच किंवा त्या दरम्यानच प्रत्यक्ष भेटतात किंवा तेव्हाच त्यांची परस्परांशी ओळख होते. लग्नाच्या किमान महिनाभर आधीपासून आपल्या जोडीदाराला ओळखणाऱ्या मुलींची संख्या जेमतेम 15 टक्के होती. शिवाय, लग्नाआधी आपल्या जोडीदाराशी आपण संपर्क ठेवलेला नव्हता, असं या सर्वेक्षणातील सुशिक्षित स्त्रियांपैकी 62 टक्के जणींनी सांगितलं.
थोडक्यात, जुळवलेल्या विवाहांची पद्धती लैंगिकतेवर व इच्छेवर संपूर्ण नियंत्रण ठेवत असते. पूर्वनिर्धारित आयुष्य कसं जगायचं याची तरुण-तरुणींसाठीची हस्तपुस्तिका म्हणून किंवा तरुणाईने अज्ञात प्रदेशात भटकू नये यासाठी त्यांना तुरुंगात फिरवणारी व्यवस्था म्हणून जुळवलेले विवाह कार्यरत असतात.
या सगळ्याचं समर्थन कसं केलं जातं? ‘आपल्या मुला- मुलींसाठी जोडीदार शोधायचे कष्ट आपण का घेता?’ असा प्रश्न तुम्ही तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांना विचारलात, तर त्यावर काही अर्धवट उत्तरं अवघडलेल्या सुरात दिली जातील. एकाच जातीय संस्कृतीमध्ये लग्न करणं सोपं असतं : सवयी, आहार, रूढी व धर्म हे सगळं जुळून येतं; त्यामुळे अनोळखी व्यक्तीच्या घरामधील परिस्थितीशी जुळवून घेणं सोपं जातं, असा युक्तिवाद अनेक जण करतील. (मुलगी लग्न होऊन ज्या कुटुंबात जाते त्या संदर्भात इथे अनोळखी हा उल्लेख आहे). दोन कुटुंबांमधील सदस्यांचे संबंध सौहार्दाचे ठेवण्यासाठी सजातीय नातेसंबंध योग्य असतात, असाही दावा काही जण करतील.
या युक्तिवादांबद्दल आपली मतं काहीही असली, तरी व्यक्तींपेक्षा संपूर्ण कुटुंबांमधील नाती जुळवणं, हे अरेंज्ड मॅरेजचं मुख्य कार्य असतं, हे निश्चितपणे खरं आहे. भारतातील 95 टक्के जोडपी लग्नानंतर त्यांच्या पालकांसोबत आणि विस्तारित कुटुंबासोबत राहतात, असं अलीकडेच एका सर्वेक्षणात आढळलं आहे. सुमारे 70 टक्के जोडपी दहा किंवा अधिक वर्षं त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. याचा अर्थ, एखाद्या जोडप्याच्या छोट्या-मोठ्या निर्णयांवर त्यांच्या कुटुंब- सदस्यांचा प्रचंड प्रभाव असू शकतो (तुम्हाला मुलं केव्हा व्हावीत, किती मुलं व्हावीत, इत्यादी). या संदर्भात विवाहाचा विचार केला, तर व्यापक कौटुंबिक अर्थव्यवस्थेतील हे केवळ एक क्षेत्र असतं. जातीय जुळवलेल्या विवाहामध्ये संबंधित व्यक्ती समाजाच्या व आपल्या कुटुंबाच्या इच्छांची पूर्ती करते. एका जुनाट रूढीचं प्रचंड ओझं तरुण पिढीला वाहून न्यावं लागतं.
मानवी उतरंड
इथपर्यंतचा मजकूर वाचून तुम्ही (अमेरिकास्थित ‘बॅफलर’ नियतकालिकाचे वाचक) पुरेसे धास्तावले असाल. तुम्ही भारताची जोड बहुधा आध्यात्मिकता, हत्ती, रंगीबेरंगी पोषाख अशा घटकांशी घातली असेल; तर अशा देशामध्ये विवाहाची इतकी उघड उतरंडीची सरंजामी पद्धत कशी टिकून राहिली? भारत आत्ता आहे तिथे कसा पोचला, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला जातिव्यवस्थेविषयी काही जाणून घ्यावं लागेल. अज्ञानाच्या अंधारात अडखळणाऱ्या या देशाचा पाया ‘जात’ या मूलभूत सामाजिक व्यवस्थेवर रचलेला आहे. जातीचा उगम अभिजात हिंदू धार्मिक संहितांमध्ये सापडतो, असा सर्वसाधारण समज आहे. आपण चातुर्वर्ण्याचे जनक असल्याचं भगवद्गीतेमध्ये खुद्द भगवान म्हणतो. ब्राह्मण (किंवा उच्च स्थानावरील पुरोहित), क्षत्रिय (लढवय्ये), वैश्य (व्यावसायिक) व शूद्र (शेतमजूर किंवा हाती कामं करणारे) अशा चार वर्णांमध्ये समाजाचे विभाजन करणारी ही व्यवस्था आहे. या चार ढोबळ विभागांखाली हजारो जाती आहेत. प्रत्येक जात विशिष्ट पेशाशी (मासेमार, माळी, शिक्षक, इत्यादी) जोडलेली आहे. शिवाय, अस्पृश्य जातीही होत्या- विविध जाती व उप-जातींचा हा एक जातीय गट असून परंपरेने त्यांना सर्वांत हीन व अशुद्ध कामं करणं भाग पाडलं जात होतं आणि त्यांना जातीय रचनेच्या बाहेरचे मानण्याची नाममात्र पद्धत होती.
वर्गाप्रमाणे जातसुद्धा श्रमाचं निष्ठूर विभाजन करते आणि परिघावरील लोकांच्या असुरक्षिततेचा फायदा उठवते. आर्थिक परिणामांवर कठोर निर्बंध ठेवून ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या (द्विज) जाती उत्पादनसाधनांवरील वर्चस्व टिकवून ठेवतात. घट्ट रचनेमध्ये ही साधनं निश्चित स्थानी जखडून ठेवण्यात आलेली आहेत (आजही या जातींचं भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रचंड नियंत्रण आहे). पण जातीच्या हिंसाचारामध्ये एक आधिभौतिक घटकही आहे. ही अवमूल्यनाची उतरंडीवर आधारित रचना आहे. विटाळ व शुद्धता या संकल्पनांनी तिचं संयोजन केलं जातं. यामध्ये उतरंडीच्या प्रत्येक स्तरावरील लोक खालच्या लोकांकडे तुच्छतेने पाहतात अथवा त्यांच्यावर लाथा झाडतात.
जातीय उतरंडीच्या सर्वांत तळामध्ये असलेल्यांची विटाळलेली शरीरं समाजामधून शब्दशः बहिष्कृत ठेवली जातात- त्यांना मंदिरांसारख्या पवित्र ठिकाणी प्रवेशाला बंदी असते, राजकीय व सांस्कृतिक चर्चांपासून त्यांना दूर ठेवलं जातं आणि अगदी सामूहिक स्मशानांमध्येही त्यांना प्रतिबंध असतो. अतिशय रानटी पद्धतीने त्यांच्यावर कलंक लावला जातो. या लोकांमध्ये विविध प्रकारचा विटाळ आहे, अशी सवर्ण हिंदूंची धारणा असते.
अगदी टोकाच्या प्रसंगांमध्ये तर एखाद्या दलिताची सावली, थुंकी व नजर हे सगळंच अशुद्ध मानलं जातं. या अडथळ्यांवर मात करू पाहणाऱ्या कोणत्याही दलिताला सवर्ण हिंदूंच्या हिंसाचाराला सामोरं जावं लागत होतं आणि अजूनही जावं लागतं. सवर्ण हिंदू अनधिकृत पोलीस असल्याप्रमाणे वागतात आणि खाप पंचायतीद्वारे आपल्या रूढींनुसार स्थानिक व्यवहार व्हायला हवेत, असं त्यांना वाटतं. व्यक्तिगत व्यवहारांमध्ये सरकारी संस्थांपेक्षा या खाप पंचायतींच्या म्हणण्याचं वर्चस्व असतं.
दलित शरीरांमध्ये हिंसाचाराची खूण कायमस्वरूपी वास करत असते. स्त्रियांच्या श्रेणीबद्ध दडपणुकीच्या सक्षम पायावर जात उभी आहे, यालाच ‘ब्राह्मणी पितृसत्ता’ असं विदुषी उमा चक्रवर्ती म्हणतात. आर्यांनी भारतीय उपखंडावर आक्रमण केलं, त्यादरम्यान ही सामाजिक व्यवस्था उदयाला आली. या आक्रमणांद्वारे एतद्देशीय लोकांना- स्त्री-पुरुषांना- गुलाम किंवा अंकित केलं गेलं. कालांतराने त्यांना कनिष्ठ जाती ठरवण्यात आलं, तर आर्य उच्च जातीय ठरले. ऋग्वेद या प्राचीन संस्कृत संहितेमध्ये लैंगिक गुलामगिरीच्या स्वरूपाचे पुरावे सापडतात, असं चक्रवर्तींनी नोंदवलं आहे. विविध जातींच्या महिलांना वेगवेगळे श्रम करण्यास सांगणारी ही गुलामगिरी होती. सर्वांत वरती असलेल्या ब्राह्मण स्त्रिया उच्च जातीय वारसदारांच्या प्रजननासाठी अस्तित्वात होत्या. प्रभुत्वाच्या या रूढीबद्ध उतरंडीमध्ये आर्य स्त्रियांना लाभ होत असे. त्या गुलामांवर व गाई- गुरांवर नियंत्रण ठेवत असत. सर्वांत कनिष्ठ बहिष्कृतांमधील कैदी एतद्देशीय जमातींना गुलाम केलं गेलं. दुसऱ्या बाजूला, कनिष्ठ जातींमधील स्त्रिया हाती श्रम करणाऱ्या असल्यामुळे अशुद्धतेचा स्रोत मानल्या गेल्या. उच्च जातीय पुरुष खालच्या स्तरातील स्त्रियांशी विवाह करण्याच्या विचाराने भयग्रस्त होऊन जात, कारण आंतरजातीय लैंगिक संभोगाने जातीय शुद्धता गमावण्याचा धोका होता. या भयग्रस्ततेला नियमामध्ये बांधण्यासाठी त्यांनी शूद्रांना वरच्या स्तरावरील व्यक्तीशी लग्न करण्यापासून बंदी घालणारे धार्मिक कायदे केले.
आंतरजातीय शरीरसंबंध नव्हतेच, असा याचा अर्थ नव्हे. उलट, ब्राह्मण पुरुषांना प्रत्येक जातीतील स्त्रिया निर्विवादपणे उपलब्ध होत्या. फक्त या संबंधांची- बहुतेकदा बलात्काराच्या रूपातले हे संबंध असत- पूर्तता लग्नामध्ये होत नसे. अगदी टोकाच्या प्रसंगांमध्ये- जिथे वेठबिगारी प्रचलित होती तिथे- उच्च जातीय जमीनदार कनिष्ठ जातीय स्त्रियांवर बलात्कार करायचे. त्यातून भविष्यातील मजूर तयार केले जात असत. अगदी विसाव्या शतकामध्येही ग्रामीण भारतातील काही भागांमध्ये दलित वधूला तिच्या कायदेशीर नवऱ्याशी जवळीक साधण्यापूर्वी उच्च जातीय जमीनदाराकडून होणाऱ्या बलात्काराला शरण जावं लागत होतं. एखाद्या दलित स्त्रीच्या शरीरावर बलात्कार करणं हा तिच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर नियंत्रण राखण्याचा प्रकार असतो. तिला स्वतःकडे घेऊन संबंधित जमीनदार त्या मजूर कुटुंबाच्या विवेकबुद्धीवर स्वतःचं वर्चस्व टिकवून ठेवतो. आपल्या स्त्रीची चव दुसऱ्या पुरुषाने घेतलेली आहे, यामुळे संबंधित नर स्वतःची प्रतिष्ठा गमावून बसतो. त्याचा संताप दडपून टाकून जमीनदार त्या दडपलेल्यांच्या शरीरावर नवीन प्रदेशाच्या खुणा निर्माण करतो. त्याच्या शोषणाची ही कायमस्वरूपी खूण असते. मूलगामी अर्थाने जातीचं बांधकाम स्त्रियांच्या शरीरावर आणि शरीरामध्ये केलं जातं. संबंधित स्त्रीच्या शरीरावर जातीची अंमलबजावणी होते.
गेल्या हजारो वर्षांमध्ये भारतीय समाज अर्थातच बराच बदलला आहे आणि देशाच्या राज्यघटनेने सर्व प्रकारच्या जातीयवादावर बंदी घातली असली, तरी भारतीय संस्कृती व राजकीय रचना अजूनही पारंपरिक जातिनिहाय चौकटीतच वावरतात, ही खेदजनक व धक्कादायक बाब आहे.
गुजरातमधील ‘नवसर्जन’ या दलित संघटनेने 2010 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, त्यांनी केलेल्या सर्वेक्षणामधील 98.4 टक्के गावांमध्ये आंतरजातीय विवाहांवर प्रतिबंध होता. विशेष विवाह अधिनियम- 1954 या कायद्यातील तरतुदी अस्तित्वात आहेत आणि आंतरजातीय जोडप्यांना आर्थिक मोबदला देऊन भारत सरकारही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देतं, तरीही वस्तुस्थिती ही अशी आहे. ‘नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च’ (एनसीएईआर) व मेरीलँड विद्यापीठ यांनी केलेल्या ‘भारतीय मानव विकास सर्वेक्षणा’नुसार 5, भारतातील शहरी व ग्रामीण भागांमधील केवळ 5 टक्के विवाह आंतरजातीय मानता येतात. ग्रामीण भारतातील 30 टक्के लोक व शहरी भारतातील 20 टक्के लोक अस्पृश्यतेची प्रथा पाळतात, असंही याच सर्वेक्षणातून समोर आलं. आजही अनेक गावं खाप पंचायतीच्या नियमांनुसार चालतात. ही पंचायत जातीयवादी ज्येष्ठांकडून चालवली जाते आणि सरकारी संस्थांपेक्षा या पंचायतींचा निर्णय व्यक्तिगत व्यवहारांमध्ये प्रभावशाली ठरतो. अनेक दलित वधूंना या जातीच्या काटेरी कुंपणामध्ये स्वायत्तता मिळालेली नाही, हे वेगळं नोंदवायची गरज नसावी.
या रानटी अवस्थेमध्ये काही शोकात्म विनोदाचेही क्षण असतात. उत्तर प्रदेशातील अलीकडची एक बातमी पाहा : राज्य विधी मंडळातील एक ब्राह्मण आमदार आणि हिंदू- फॅसिस्ट, भारतीय जनता पक्षाचे नेते राजेश मिश्रा यांची चोवीस वर्षांची मुलगी साक्षी ही एकोणतीस वर्षांच्या अजितेश कुमार या दलित पुरुषाच्या प्रेमात पडली. या संबंधांविषयी कळल्यानंतर साक्षीच्या वडिलांनी या नात्याचा जाहीररीत्या धिक्कार केला आणि त्यांना या प्रदेशातील संपूर्ण मिश्रा जातसमूहाचा पाठिंबा मिळाला. स्वतःच्या मुलीला खुनाच्या धमक्या देण्यापर्यंत राजेश यांची मजल गेली आणि त्यांनी अजितेशला मारण्यासाठी गुंडही पाठवल्याचं सकृत्दर्शनी कळतं.
पण या घटनाक्रमाला धाडसी वळण देत साक्षी व अजितेश त्या भागातून पळून गेले आणि त्यांनी समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसिद्ध करून पोलिसांच्या संरक्षणाची मागणी केली. ‘मला आनंदी व स्वतंत्र राहायचं आहे’, असं साक्षी या व्हिडिओमध्ये म्हणते. दोघांनी धावत्या कारच्या मागच्या सीटवर बसून हा व्हिडिओ तयार केला आणि लवकरच समाजमाध्यमांवर तो बराच पसरला. यात साक्षी तिच्या धर्मांध वडिलांना संबोधून अजितेशच्या कुटुंबाचा बचाव करते : ती माणसं आहे, जनावरं नाहीत असं ती म्हणते. तुम्हाला तुमची मनोवृत्ती बदलावी लागेल. ते चांगले लोक आहेत. त्यांच्यासोबत मी आनंदात राहीन. एका ब्राह्मण स्त्रीच्या लैंगिकतेशी जवळीक साधायचा उद्धटपणा करणाऱ्या दलित पुरुषाने जातीयवादी समाजाचा रोष ओढवून घेतला. ब्राह्मण स्त्रियांच्या कथितरीत्या असुरक्षित शुद्ध स्थानाचा वापर कौटुंबिक प्रतिष्ठेचं चलन म्हणून केला जातो. ही प्रतिष्ठा काढून घेऊन अजितेशने खुनशी चूक केली होती, त्यामुळे त्याच्यासोबत ती स्त्रीसुद्धा मरणास पात्र ठरली होती.
मरेपर्यंत एकमेकांची सोबत करावी लागणाऱ्या- एवढंच नव्हे, तर सात जन्मांसाठी एकच पती मिळावा असा पर्याय देणाऱ्या एकनिष्ठ विवाहारूपांमध्ये हे अंतर्विरोध उत्पन्न होतात. या प्रवासाच्या दरम्यान संबंध तुटणं स्वाभाविक असतं, परंतु हा पती वा पत्नीचा दोष असल्याचं मानलं जातं. भारतामध्ये जातिबद्ध समाजातील घटस्फोटित महिलांकडे पुरुष व स्त्रिया आणि त्यांची कुटुंबंही तुच्छतेने पाहतात. एकल स्त्रियांना स्वतःच्या नवऱ्याच्या चितेवर सती देण्याचा किंवा तिचं केशवपन करून तिला कुरूप करण्याचा इतिहास भारताला आहे, त्यामुळे घटस्फोटित स्त्रीची स्वायत्तता हा भारतीय मूल्यं जतन करण्याच्या मार्गातला एक मोठा धोका मानला जातो. भी. रा. आंबेडकरांनी मानववंशशास्त्रासंदर्भात ‘कास्ट इन इंडिया’ हा निबंध 1916 मध्ये लिहिला. त्यात त्यांनी केलेल्या युक्तिवादानुसार, ही भारतीय मूल्यांची व्यवस्था वरकड स्त्रिया निर्माण करते. कोणत्याही वैवाहिक नात्यात नसलेल्या किंवा विधवा झालेल्या या स्त्रिया जातीय समाजाला धोकादायक वाटतात. त्यामुळे त्यांना समाजामध्ये अस्पृश्य ठरवलं जात होतं.
सभ्यतेशी युद्ध
आधुनिक भारतामध्ये काही सामाजिक प्रगती झाली असेलच, तर ती दलित व कनिष्ठ जातीय नेत्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आहे. हे नेते स्त्रियांच्या मुक्तीसाठी कायमच कटिबद्ध राहिले आहेत (ही वाटचाल करत असताना त्यांना अनेकदा तथाकथित राष्ट्रवादी चळवळीच्या उच्च जातीय नेत्याचा विरोध सहन करावा लागला. या नेत्याला परंपरेच्या नावाखाली शक्य तेवढी हिंदू धर्मांधता जोपासायची होती).
एकोणिसाव्या शतकातील कनिष्ठ जातीय सुधारकांपैकी जोतिबा व सावित्रीबाई फुले हे बहुधा आज सर्वाधिक परिचित असावेत. थॉमस पेन यांना आदर्श मानणारे जोतिबा कार्यकर्ता म्हणून पुस्तिका लिहीत आणि याद्वारे त्यांनी हिंदू ब्राह्मणी सनातनी व्यवस्थेवर कडवट टीका केली. अशा टीकेचे उद्गाते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्या काळी हिंदू धर्माने स्त्रियांच्या शिक्षणाला निषिद्ध ठरवलेलं होतं, पण जोतिबा व सावित्रीबाई यांनी स्त्री-शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तुंग कार्य केलं. त्यांनी मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. ब्राह्मण स्त्रियांनी विवाहेतर संबंधांमधून जन्म दिलेल्या बालकांसाठी त्यांनी अनाथालयही सुरू केलं (सनातन्यांच्या भीतीने अशा अनेक मुलांना वाऱ्यावर सोडलं जात असे किंवा मारूनही टाकलं जात असे). त्यांनी विधवा पुनर्विवाहाचंही जोरदार समर्थन केलं होतं.
यानंतरच्या पिढीतील दक्षिण भारतीय विचारक पेरियार ई. व्ही. रामासामी नायकर हे ब्राह्मणविरोधी आत्मसन्मान चळवळीचे संस्थापक मानले जातात. ते स्त्रीहक्काचेही जोरकस कैवारी होते. एका मागून एक पुस्तकं लिहून त्यांनी ब्राह्मणी संहितांमधील अतार्किकता उघड केली. इतर गोष्टींसोबतच स्त्रियांना त्यांचा जोडीदार निवडण्याचं, गरजेनुसार घटस्फोट देण्याचं आणि मुलं व कुटुंब यापलीकडचं जीवन जगता यावं यासाठी गर्भनिरोधकांचा वापर करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असावं- अशी मांडणी केली. किंबहुना, पेरियार यांचं पहिलं पुस्तक जन्मनियंत्रणावरचंच होतं. स्त्रियांना स्वतंत्र जीवनमार्ग नाकारणारी दुर्दैवी स्थिती म्हणजे गरोदरपणा होय, असं त्यांचं मत होतं.
पेरियार यांनी केलेली ब्राह्मणी पितृसत्तेची चिकित्सा संघटित राजकारणाच्या अवकाशापर्यंत विस्तारणारी आहे. ते कुटुंबनियोजनाचे कट्टर समर्थक होते. जतनवादी धर्म व रूढी यांवर कुटुंबनियोजन हा सर्वोत्तम तोडगा आहे, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे मूल सांभाळणं व स्वयंपाक या ओझ्याचं सामाजिकीकरण करण्यासाठी सामुदायिक स्वयंपाक व बालसेवा केंद्र सुरू करावीत, असा प्रस्ताव त्यांनी सरकारसमोर ठेवला. कट्टर आधुनिकतावादी असलेले पेरियार यांनी पाश्चात्त्य देशांकडे निर्देश करून कुटुंबनियोजनाला पाठिंबा दिला. या बाबतीत त्यांनी जतनवाद्यांच्या विरोधालाही तोंड दिलं. पालक अधिकाधिक मुलांना जन्म देत जातात, त्यानुसार त्यांच्या स्वतःच्या सोई व सुविधा कमी होतात, असं त्यांनी लिहिलं आहे. त्याचप्रमाणे एखाद्या देशात लोकसंख्या वाढतच गेली तर त्या राष्ट्राला दुष्काळ, गरिबी आणि सरासरी जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा तुटवडा भासणं- या अडचणींना सामोरं जावं लागतंच. मूलतः मोठी कुटुंबं कल्याणकारी राज्य निर्माण करण्यातील अडथळा ठरतात (सार्वजनिक जीवनामध्ये मूल उपद्रवी ठरतं, असं त्यांनी अधिक बोचऱ्या शब्दांत लिहिलं होतं). लग्न आणि अव्यभिचार या मुळात पितृसत्ताक व स्त्रीविरोधी संस्था आहेत, या धारणेतून त्यांनी बहुपतित्वाच्या पुरस्काराची जहाल भूमिका घेतली. जातीविषयी त्यांना जितका तिरस्कार वाटत होता, तितकाच स्त्रीद्वेष्टेपणाबद्दलही वाटत होता.
परंतु, भीमराव रामजी आंबेडकर या भारतातील अग्रेसर आधुनिक विचारवंताने व मुत्सद्द्याने ब्राह्मणी पितृसत्तेच्या मुळावर खऱ्या अर्थाने घाव घातला. आंबेडकरांचं व्यक्तिमत्त्व अनन्यसाधारण होतं. महाविद्यालयात जाऊन पदवी घेतलेले मुंबई प्रांतातील पहिले अस्पृश्य ठरलेले आंबेडकर कोलंबियामध्ये जाऊन पदवीचा अभ्यास करणारे त्यांच्या जातीतील पहिलेच होते. भारतातील दलित चळवळीचे ते जनक आहेत आणि बहुधा आज भारतातील सर्वांत आदरणीय विचारवंताचं स्थान त्यांना दिलं जाईल. मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, धर्म इथपासून ते फ्रेंच इतिहास व इंग्रजी वाङ्मय, इत्यादी अनेक विषयांचा त्यांचा व्यासंग होता आणि ते बहुभाषाविद होते (कोलंबियात असतानाच्या काळात त्यांनी तब्बल साठ अभ्यासक्रमांमध्ये नाव नोंदवलं होतं).
त्यांनी 1915 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून एम. ए.ची पदवी घेतली (तिथे ते डुई यांच्या अध्यापनाखाली शिकले), नंतर 1916 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून त्यांनी डी.फिल.ची पदवी संपादन केली, त्यानंतर आणखी एक डॉक्टरेट करण्यासाठी 1928 मध्ये ते कोलंबियाला परत आले. हा कालावधी संपल्यानंतर ते राजकीय कारकिर्दीची वाट चोखाळण्यासाठी भारतात आले आणि या त्यांच्या वाटचालीने देशाचा चेहरामोहराही बदलला. वर्तमानपत्रांचं संपादन, कामगारांचं संघटन, पक्षउभारणी, निवडणुका लढणं- अशा पातळीवर त्यांनी कनिष्ठ जातीय सामाजिक व राजकीय चळवळी सुरू केल्या आणि टिकवल्या. त्यासाठी ते अथक प्रयत्नशील राहिले. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदाही त्यांनी तयार केला. दरम्यान, रात्रीच्या वेळात काटेकोर संशोधन करून, संतप्त स्थितीत ते एकामागून एक पुस्तकं लिहीत राहिले (स्वातंत्र्य चळवळीतील जातीयवाद्यांकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांपासून बचाव करण्याचंही काम त्यांना करावं लागत होतं).
स्त्रियांचा प्रश्न आपल्या राजकीय कामाच्या केंद्रस्थानी यावा, यासाठी आंबेडकर सतत झगडत राहिले. स्त्रियांना मातृत्वकाळामध्ये पगारी रजा द्यावी, यासाठीच्या विधेयकाला 1928 मध्ये मुंबई विधी मंडळामध्ये त्यांनी जोरकस समर्थन दिलं होतं. त्यांचे सहकारी पी. जे. रोहम यांनी 1938 मध्ये जन्मनियंत्रणाचं समर्थन करणारं विधेयक आंबेडकरांच्या वतीने मुंबई विधी मंडळात मांडलं होतं,6 पण दुर्दैवाने हे विधेयक मतदानात पराभूत झालं. प्रजननाचा अधिकार पूर्णतः स्त्रियांचाच असतो, अशी आंबेडकरांची धारणा होती. 1930-40 च्या दशकांमध्ये ते स्त्रीमुक्तीशी संबंधित विविध विधेयकांसाठी सातत्याने लढत होते. पण जतनवादी राजकारण्यांनी अखेरीस अपरिहार्यपणे ही विधेयकं मवाळ करून टाकली. हिंदू संहिता विधेयक (हिंदू कोड बिल) हा बहुधा आंबेडकरांचा सर्वांत मोठा व सर्वांत शोकात्मक वारसा असावा. त्यांनी या विधेयकाचा मसुदा तयार करून 1951 मध्ये संसदेत मांडला. लग्न, घटस्फोट, दत्तक घेणं व मालमत्ता या संदर्भात हिंदू स्त्रियांना संपूर्ण समान अधिकार देऊन हिंदू धर्मातील स्त्रियांच्या दडपणुकीच्या प्राथमिक रचना दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. संसदेमधील व संसदेबाहेरील प्रतिगामी शक्तींनी या विधेयकाला विरोध केला आणि अखेरीस या मुद्द्यावरून आंबेडकरांनी भारताच्या कायदामंत्रिपदाचा राजीनामा दिला (नंतर अनेक वर्षांनी या विधेयकाचं मवाळ केलेलं रूप मंजूर करण्यात आलं).
आंबेडकर अजूनही जातीचे अग्रणी सिद्धांतकार मानले जातात. त्यांच्या जातीच्या संकल्पनेनुसार या सामाजिक व्यवस्थेच्या पहिल्या बळी आणि वाहक स्त्रिया असतात. जातिआधारित लिंगभावात्मक रुढीबद्धतेमुळे हिंदू ब्राह्मणी व्यवस्था टिकून राहिली आहे, असं त्यांचं निरीक्षण होतं. संघटित आचारसंहितेद्वारे स्त्रियांना आध्यात्मिक साक्षात्कारासंदर्भात अकार्यक्षम ठरवण्यात आलं. अनुसूचित जातीय विद्यार्थ्यांच्या एका परिषदेला संबोधित करताना 1 डिसेंबर 1938 रोजी त्यांनी शिक्षण, रोजगार आणि वैवाहिक संबंधांमधील लिंगभावात्मक समतेचं महत्त्व मांडलं. ‘अनेक सुंदर मुली कुरूप पुरुषांच्या ताब्यात दिल्या जातात, हे मी पाहिलेलं आहे’, असं ते म्हणाले. ‘या देशाचा मला उबग आलेला आहे... इथला धर्म, सामाजिक व्यवस्था, सुधारणा व संस्कृती- या सगळ्याचा मला अतिशय उबग आलेला आहे. या सभ्यतेशीच मी युद्ध करतोय.’
या प्रसंगाच्या एक दशक आधी, 1927 मध्ये त्यांनी मनुस्मृतीचं सार्वजनिक दहन केलं होतं. सर्वांत भीषण स्त्रीद्वेष्टेपणाला नियमांची चौकट बहाल करणारी ही प्राचीन हिंदू संहिता आहे (मनुस्मृतीमधील तिसऱ्या प्रकरणातील आठव्या विभागामध्ये टाळण्याजोग्या स्त्रियांची एक यादी आहे, ती अशी : शरीरावर अजिबात केस नसलेल्या किंवा खूप केस असलेल्या स्त्रिया, खूप जास्त बोलणाऱ्या स्त्रिया, सरळसोट पिंगट केसांच्या स्त्रिया). तर, एकीकडे महान पुरुषांची यादी देत असताना जातीविरोधात लढलेल्या दलित स्त्रियांकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. अभ्यासक मीनाक्षी मून व उर्मिला पवार यांनी ‘आम्हीही घडवला इतिहास’ या पुस्तकाद्वारे दलित स्त्रियांच्या स्त्रीवादी कामगिरींचं कथन नोंदवलं आहे. आंबेडकरी चळवळीच्या आधी आणि त्यानंतर दलित स्त्रियांनी केलेल्या कार्याची अभिलेखागारांमधील सामग्री आणि मानवशास्त्रीय तपशील वापरून या लेखिकाद्वयीने हे पुस्तक लिहिलं आहे.
विवाहसंस्थेला लागलेली कीड
भारतातील स्त्रीवादी लढाईमध्ये जातीय भेदभावाविरोधातील लढा मध्यवर्ती स्थानी राहिला आहे. ब्राह्मणी विवाह स्त्रियांना मूलतः दडपतात, हे आपण पाहिलं. त्याहून वाईट म्हणजे, घटस्फोट हे पाप असल्याप्रमाणे पाहिलं जातं आणि त्यातून स्त्रियांच्या (पुरुषांच्या नव्हे) चारित्र्याला तडे जातात, असं मानलं जातं. त्यामुळे अनेक जणी त्यांच्या नवऱ्यांचं क्रौर्य व दडपशाही सहन करतात आणि स्वतःच्या अतिरिक्त ताकदीची जाणीव असल्यामुळे स्त्रियांचं नियंत्रण पुरुष करतात, त्यांचा सोईने वापर करतात.
यातून बाहेर पडण्याचा मार्ग प्रेमातून सापडू शकतो का? भारतामध्ये अजूनही आंतरजातीय किंवा प्रेमविवाह लज्जास्पद आणि मोहक ठरताना दिसतो. प्रेम करून लग्न करणाऱ्या जोडप्यांकडे कुतूहलाने पाहिलं जातं. त्यांनी हे कसं जमवलं? का जमवलं? हे कसं असतं? चित्रपटांमधील प्रेमाच्या चित्रणामध्ये जातीचा मुद्दा टाळलेला असतो, हे मी नमूद केलेलं आहेच; त्यामुळे संदर्भबिंदू मोजकेच राहतात.
प्रेमविवाह निखळ भावनांवर आधारित असतात, हे खरंच आहे. त्यात वारशावर किंवा शुद्ध गुणसूत्रांवर दावा सांगण्यासाठी काही केलेलं नसतं. पण आपण याचं आदर्शीकरणही करायला नको किंवा भारतामध्ये एका रात्रीत गोष्टी बदलतील, असंही मानायला नको. शेवटी, हिंदू धर्माचं विष भारतीय समाजामध्ये खोलवर गेलेलं आहे. ब्राह्मणी पितृसत्तेच्या रचना उलथवल्या जात असल्या (संथ गतीने हे होतंय), तरी हिंदू मानसिकता- विशेषतः प्रेमासंदर्भातील मानसिकता- बदलायला बराच लढा द्यावा लागेल. सध्याच्या हिंदू मिथकव्यवस्थेमध्ये पती-पत्नींच्या नात्यातील प्रेम उतावीळ व अविश्वासार्ह असतं. व्यक्तीच्या मनातील साशंकता व उसळत्या उत्कट इच्छा यांमुळे मानसिक व शारीरिक हिंसाचार घडतो.
भारतीय घरांमध्ये ‘जोरू का गुलाम’ हा शब्दप्रयोग सर्रास वापरला जातो. स्वतःच्या पत्नीबाबत समर्पित भावना बाळगणाऱ्या पुरुषांविरोधात हा शब्दप्रयोग होतो. पत्नीला जाहीर दाद देणाऱ्या पुरुषांची चेष्टा केली जाते. पत्नीवर प्रेम करणं हे दुबळेपणाचं किंवा शरणवृत्तीचं चिन्ह मानलं जातं. हा पितृसत्ताक वारसा आहे : समाजाच्या कठोरपणाला सामोरं गेल्यावर पुरुषामधील ममत्व विरून जातं आणि तो एक माथेफिरू, बेलगाम पुरुष होतो- समाजाने हाच आदर्श त्याच्यामध्ये रुजवलेला असतो.
नातेसंबंध आणि विवाह यांचं स्तोमही माजवायची गरज नाही. शेवटी, जुळवलेल्या पद्धतीने किंवा प्रेमाद्वारे विवाह करण्याचा दबाव पारंपरिक समाजांमध्ये अतिशय तीव्र असतो आणि तरुण मनांवर याचा मोठा आघात होतो. समाजाचा दबाव, त्यात भर म्हणून नातेवाइकांकडून होणारा छळ, यांमुळे विवाहाचा पारंपरिक मार्ग स्वीकारण्यासाठी पालक त्यांच्या मुलांवर सक्ती करतात. विवाहाच्या व्यक्तिगत गाभ्याऐवजी तो पालकांचाच विवाह होऊन जातो. लग्नसमारंभावेळी पालक त्यांच्या मुलांच्या भवितव्याबाबत विचार करून ताणाखालीसुद्धा असतात आणि आनंदीसुद्धा असतात, हे अगदी कधीही पाहता येतं.
भारतातील विवाहाचं सरासरी वय सुमारे बावीस वर्षं इतकं आहे. त्या तुलनेत अनेक विकसित राष्ट्रांमध्ये हे वय तीसच्या दरम्यान आहे, ही बाब इथे लक्षात घेणं आवश्यक वाटतं. कुटुंबसंस्कृतीमध्ये लवकरात लवकर प्रवेश करणं, हा भारतातला नियम आहे आणि आपण जगामध्ये प्रजननासाठी आलो आहोत, अशी सार्वत्रिक धारणा आहे. त्यातही मुलगा जन्माला घालणं म्हणजे यशाचं शिखर मानलं जातं. भारतासारख्या रोगग्रस्त समाजामध्ये एकटी व्यक्ती हाच आजार मानला जातो. ज्येष्ठांना जगण्याचं विषमलिंगीकरण (आणि अगदी दुर्मिळ संदर्भांमध्ये समलिंगीकरण) साधणारी सर्वसामान्य स्थिती सोडून दुसरं काहीही नको असतं. एकट्या व्यक्तीकडे आदर्श म्हणून किंवा आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून क्वचितच पाहिलं जातं. आर्थिक दृष्ट्या, विशिष्ट वयातील एकल व्यक्तीकडे साशंकतेने पाहिलं जातं. सरधोपट विधींची स्पर्धा टाळून स्वतःच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याची निवड कोणी का करेल?
भांडवलशाहीने या समस्या आणखी उग्रच केल्या आहेत. संरक्षित जीवनशैलीच्या नियमांवर वर्चस्व गाजवणाऱ्या कर्ज-उद्योगामध्ये प्रजननाची संकल्पना सुसंगत ठरते. बँकांच्या नियमपुस्तिकांनुसार व्यक्तीने आपल्या इच्छा व स्वप्नांना मर्यादा घालाव्यात, त्यासाठीची बचतप्रक्रिया स्वीकारावी अशी ही पद्धत आहे. अनेकदा कर्जाच्या कचाट्यातून आपण स्वप्न पाहत असतो. कशाचं सर्वांत तीव्र आस्था व चिंतांची मोकळेपणाने चर्चा करायला हवी. विषमलिंगी नसलेल्या विवाहांच्या बाबतीत नव्या वाटा शोधल्या जातील. विषमलिंगी जाहीरनाम्यामध्येस्त्रीने तिच्या गरजा, इच्छा, तिचे लैंगिक अग्रक्रम, बदलती मन:स्थिती व बदलत्या भूमिका हाताळण्याचे मार्ग यांचा आराखडा काढावा. पुरुषानेही हे अनुसरावं. प्रेम सर्वांच्या आवाक्यात येणं गरजेचं आहे. केवळ स्वप्नाळू इच्छांसारखं प्रेम आवाक्याबाहेर असता कामा नये.
पंधराव्या शतकातील गूढकवी कबीर हे भारतातील एक सर्वांत महान जातविरोधी विचारक होते. ‘ऑन द साँग्ज ऑफ कबीर’ या पुस्तकामध्ये ओशो लिहितात: तुम्हाला एखाद्या स्त्रीवर खरोखरच प्रेम करायचं असेल, तर तिच्याशी कधीही लग्न करू नका. तुम्हाला एखाद्या पुरुषावर निरतिशय प्रेम करायचं असेल, तर शक्य तितकं त्याच्यापासून दूर पळून जा. मग तुम्ही कायम प्रेम करत राहाल. पण तुम्हाला सगळं प्रेमाचं नातंच कोलमडून टाकायचं असेल, तर लग्न करा. कबीराने त्याच्या मुक्त व सुगम वाङ्मयात इतर एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे : प्रेमाचं घर उंचावर असतं नि एकाकी असतं. त्यामुळे प्रेम टिकवणं अवघड असतं. सर्वांना ते जमत नाही. म्हणूनच लग्न किंवा विवाह ही एक अकाली घडणारी घटना असते.
*
(हा मूळ इंग्रजी लेख ‘बॅफलर’ या अमेरिकास्थित मासिकाच्या एप्रिल 2020 च्या अंकात प्रकाशित झाला होता. या मासिकाच्या व लेखकाच्या परवानगीने सदर मराठी अनुवाद प्रकाशित होतो आहे. इंग्रजी लेखासाठी पाहा : Apartheid in Fancy Dress )
अनुवाद : प्रभाकर पानवलकर
टिपा :
1. https://www.deccanherald.com/content/ 316016/indians-swear-arranged-marriages.html
2. https://www.lrb.co.uk/the-paper/v40/ n19/sheng-yun/diary
4. https://ihds.umd.edu/sites/ihds.umd.edu/ files/publications/papers/Marriage%20Brief.pdf
6. https://www.mea.gov.in/Images/attach/ amb/Volumeš02.pdf
Tags: सुरज येंगडे बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृती जातीयवाद babasaheb ambedkar hindu religion castism castiest dalit suraj yengade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
Manoj Sahare- 02 Dec 2020
गहन...
save