डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सार्क युनिव्हर्सिटीमध्ये असताना मी अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. हिमाचल प्रदेश, मनाली, सिमला, मसुरी, हृषीकेश इथे आम्ही गेलो तेव्हा तर अक्षरशः स्वर्गात असल्याचाच भास मला होत होता. तिथला निसर्ग आणि वृक्षराजी तर अप्रतिमच. एका बाजूला बर्फाळ डोंगर, देवदारचे वृक्ष, छोटे झरे आणि हिरवे गवत; तर दुसऱ्या बाजूला मैदाने, छोट्या-मोठ्या टेकड्या आणि डोंगर. तुम्ही सूर्यास्ताचा मनमुराद आनंद तिथे लुटू शकता.


दोन वर्षे फारच लवकर संपली. सार्क युनिव्हर्सिटीमध्ये माझा प्रवास सुरू झाला, तेव्हापासून अनेक गोष्टी बदलल्या आहेत. तो एक अविस्मरणीय अनुभव होता. मी सार्क युनिव्हर्सिटीमध्ये कशी आले, हे सुरुवातीलाच सांगायला हवे. मी श्रीलंकेतील एका पारंपरिक-प्रेमळ आणि मध्यमवर्गीय घरातून आलेली मुलगी. कोलंबो युनिव्हर्सिटीमधून International Relations मध्ये मी पदवी घेतली आणि त्याच विभागात असिस्टंट लेक्चरर म्हणून रुजू झाले. तोच माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. पदवीच्या शेवटच्या वर्षात असताना ‘आपण परदेशात शिक्षण घ्यायला हवे,’ याची जाणीव मला झाली होती. पण त्यासाठी काय करावे किंवा कसे पुढे जावे, याविषयी काहीच माहिती नव्हती. आपल्याला ते हवे आहे, इतकेच माहीत होते.

कोलंबो युनिव्हर्सिटीतील International Relations डिपार्टमेंटमुळे मला सार्क युनिव्हर्सिटीची माहिती मिळाली आणि प्रवेशपरीक्षा दिल्यानंतर मला तिथे IR मध्ये एम.ए. करण्याची संधी मिळाली. दिल्लीतील सार्क युनिव्हर्सिटीमध्ये जाणे हा माझ्यासाठी फार मोठा टप्पा होता. मी कायमच कुटुंबात राहिलेली, त्यामुळे कुटुंबापासून दूर राहावे लागणे हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. सार्क युनिव्हर्सिटीच्या अकबर भवनच्या पाचव्या मजल्यावर मुलींसाठीचे होस्टेल होते. मी तिथे माझ्याच वयाच्या पण वेगवेगळे इंटरेस्ट आणि दृष्टिकोन असणाऱ्या दक्षिण आशियाई मुलींबरोबर राहिले. तो एक अप्रतिम ‘सामाजिक अनुभव’ होता. या दोन वर्षांच्या काळात माझी अनेकांशी दृढ मैत्री झाली. आयुष्यातला पहिला ‘हिवाळा’ मी दिल्लीतच अनुभवला. (श्रीलंकेत उन्हाळा व पावसाळा हे दोनच ऋतू असतात.) त्याशिवाय पाऊसरहित उन्हाळ्यातले ३५ ते ४० डिग्री तापमानही मी इथेच अनुभवले.

भारताच्या वेगवेगळ्या भागांत प्रवास केला आणि दक्षिण आशियातल्या अनेक प्रकारच्या लोकांना भेटले. युनिव्हर्सिटीत तुम्ही केवळ शिक्षण घेत नाही, तर अनेक आठवणी जमा करीत असता. आपण आपल्या आयुष्यात आलेली माणसे आणि विविध प्रेक्षणीय स्थळे काढून टाकली, तर जगण्यात रसच शिल्लक राहणार नाही. मी सार्क युनिव्हर्सिटीत आले, तेव्हा एकाच वेळी नर्व्हसनेस आणि उत्साह अशा दोन्ही भावना दाटून आल्या होत्या. मला इथे खूपच स्वातंत्र्य मिळाले, चॉईस मिळाला; परंतु त्यांचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन मात्र मिळत नव्हते. काही वेळा मला खूप एकटे-एकटे वाटत असे; तर काही वेळा विविध प्रकारची दृश्ये, गंध, आवाज आणि चवी यामुळे दिशाहीन झाल्यासारखेसुद्धा वाटले. मी इथे लोकांशी कशी मैत्री करणार आणि माझे म्हणणे त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवणार, असाही प्रश्न पडला होता. एका विशिष्ट टप्प्यावर मला माझ्या ॲकॅडमिक परफॉर्मन्सविषयी पण चिंता होती आणि माझ्या कुटुंबाशिवाय मी इथे कशी राहणार याची खात्री नव्हती.

माझे यापूर्वीचे सर्व शिक्षण मातृभाषेत (सिंहलीत) झालेले असल्याने, इथे इंग्रजीत शिकणे हे माझ्यासाठी एक आव्हान होते. सुरुवातीला इंग्रजीची भीती वाटली. पण सार्क युनिव्हर्सिटीत IR  शिकणे फारच Insightfull  आहे, असे नंतर जाणवले. या सर्व प्रक्रियेत दक्षिण आशियातील उत्तमोत्तम शिक्षकांकडून मला शिकता आले. इथे मला माझ्या वर्ग  मित्रांविषयी लिहिताना फारच आनंद होत आहे. आम्ही सर्व जण एखाद्या कुटुंबाप्रमाणेच होतो. तीस जणांच्या आमच्या बॅचमुळे मला अनेकांशी बोलता आले आणि दक्षिण आशियातील विविध संस्कृतींची माहिती करून घेता आली.

आमच्या गप्पांमध्ये दक्षिण आशियाचे राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण, धर्म, रोजचे आयुष्य इत्यादी अनेक विषय असायचे. या चर्चांमधून माझी विचारक्षमता विकसित झाली आणि जगाविषयीचे एकूण आकलन वाढले. आमचे ॲकॅडेमिक शेड्यूल- (सततचे वाचन, गृहपाठ आणि परीक्षा यामुळे) फारच भरगच्च होते. अक्षरशः श्वास घ्यायला पण वेळ नसायचा. सुरुवातीला हा ताण असह्य व्हायचा, नंतर मात्र सवय होत गेली. युनिव्हर्सिटीतले सर्व विद्यार्थी ब्रेकफास्ट-लंच आणि डिनरच्या काळात एकमेकांना जास्तीत जास्त भेटण्याचा प्रयत्न करायचे. सुरुवातीला मला हलके आणि साधे भारतीय जेवण पाहून धक्काच बसला. श्रीलंकेत आम्हाला नेहमी भात आणि करी असे हेवी जेवण घ्यायची सवय असते. मात्र भारतीय जेवण हे श्रीलंकन जेवणापेक्षा अधिक चविष्ट, आरोग्यदायी आणि खूपच वेगळे असते असे मला वाटू लागले आहे. शिवाय, भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये वैविध्यपूर्ण अशा प्रादेशिक पदार्थांचा समावेश होतो.

एकदा मी कढाई पनीर हा प्रकार खाल्ला आणि तेव्हापासून मी पनीर असलेल्या पदार्थांच्या प्रेमातच पडले. हैदराबादी दम- बिर्याणी, छोले-भटुरे, पाणी-पुरी, कचोरी आणि भारतीय मिठाया यांची चव अप्रतिमच... मला भारतीय ‘स्ट्रीट फूड’नेही असेच वेड लावले होते. अन्न वाया घालवू नये, हा महत्त्वाचा धडा मी भारतात शिकले. मला वाटते, आम्ही श्रीलंकन लोक खूप अन्न वाया घालवतो. सार्क युनिव्हर्सिटीतील आयुष्याने मला स्वातंत्र्याचे मोल कळले आणि जबाबदारीची जाणीव दिली. मला आयुष्यातले निर्णय पहिल्यांदाच एकटीनेच घ्यायचे होते, स्कॉलरशिपचे पैसे काळजीपूर्वक खर्च करायचे होते, एकटीनेच प्रवास करायचा होता आणि स्वत:ची काळजीही घ्यायची होती.

सार्क युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्याने आणि राहण्याने मी दक्षिण आशियातील लोकांशी जोडले गेले. इथे अनेक भाषा बोलल्या जातात, ज्यांतील इंग्रजी ही सर्वांत कॉमन भाषा. प्रत्येकाची भाषा आणि शब्दसंग्रह अगदी थोड्याच काळात (इथे राहिल्याने) फार झपाट्याने सुधारला. माझ्या बोलीत इंग्रजीची फार वेगाने प्रगती झाली. आम्ही इथे अनेकविध धार्मिक आणि सांस्कृतिक सण साजरे केले. त्यांपैकी दिवाळी, ईद, होळी, मातृभाषादिन (२१ फेब्रुवारी) मी कधीच विसरणार नाही. या सर्व सणांमुळे मला विविध संस्कृतींना समजून घेण्याचे महत्त्व लक्षात आले.

सार्क युनिव्हर्सिटीमध्ये असताना मला याची जाणीव झाली की, जगातल्या सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आणि आकर्षक देशांपैकी भारत हा एक आहे. भारतातच मला गरीब आणि संघर्षमय आयुष्य जगणाऱ्या लोकांना पाहता आले. तिथे मिळालेली शिकवण मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. सार्क युनिव्हर्सिटीमध्ये असताना मला Save The Children India  या संस्थेच्या दिल्ली शाखेबरोबर काम करण्याची संधी मिळाली. माझ्या कामाचा भाग म्हणून मला ‘सराय काले खा’ नावाच्या गावातील शाळा सोडून गेलेल्या पौगंडावस्थेतील मुलींना सक्षम करायचे होते.

या कामामुळे मला प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्याचा आणि स्थानिकांना  भेटण्याचा अविस्मरणीय अनुभव घेता आला. याच कामामुळे माझे हिंदीसुद्धा सुधारले. इथे मला त्या गावातील लोकांविषयी एक गोष्ट आवर्जून नोंदवावीशी वाटते. त्यांतले अनेक जण आर्थिक दृष्ट्या गरीब आणि दु:खी होते, पण त्यांचे अंतःकरण फार श्रीमंत आणि प्रेमळ होते. ते माझ्याशी फारच उदारपणे वागले, त्यांनी त्यांचे अनुभव माझ्याशी शेअर केले.

सार्क युनिव्हर्सिटीमध्ये असताना मी अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. हिमाचल प्रदेश, मनाली, सिमला, मसुरी, हृषीकेश इथे आम्ही गेलो तेव्हा तर अक्षरशः स्वर्गात असल्याचाच भास मला होत होता. तिथला निसर्ग आणि वृक्षराजी तर अप्रतिमच. एका बाजूला बर्फाळ डोंगर, देवदारचे वृक्ष, छोटे झरे आणि हिरवे गवत; तर दुसऱ्या बाजूला मैदाने, छोट्या-मोठ्या टेकड्या आणि डोंगर. तुम्ही सूर्यास्ताचा मनमुराद आनंद तिथे लुटू शकता.

तसेच ताजमहाल, आग्र्याचा किल्ला, दिल्लीतील पुराना किल्ला आणि अक्षरधाम मंदिर यांमुळेही मी प्रभावित झाले. रात्री बारा वाजता स्विमिंग पूलजवळ होणारी वाढदिवसांची सेलिब्रेशन्स मी विसरू शकत नाही. इथला सर्वांत महत्त्वाचा अनुभव म्हणजे आमची प्रत्येकाची मते वेगवेगळी होती आणि तरीही आम्ही एकमेकांशी गप्पा मारायचो. विविध देशांतील मुलांच्या संस्कृती, सवयी आणि दृष्टिकोन यांमुळे माझा एकूण अवेअरनेस खूपच वाढला. माझी कल्पनाशक्तीही विकसित व्हायला मदत झाली.

सार्क युनिव्हर्सिटीतील अनुभवामुळे मला स्वतःवर लक्ष केंद्रित करता आले आणि आपल्याला आयुष्यात नेमके काय करायचे आहे याची स्पष्टता आली. भारतात राहण्याने माझ्या वैयक्तिक विकासाला खूपच मदत झाली. भारतातून परत जाताना माझा जीवनविषयक दृष्टिकोन फारच बदललेला होता. पूर्वी गृहीत धरल्या जाणाऱ्या अनेक छोट्या गोष्टींवर मी लक्ष द्यायला लागले. प्रवास, परकीय भाषा बोलणे, लोकांशी मैत्री आणि जगाचा अनुभव यामुळे मी अंतर्बाह्य बदलले. त्यामुळे सार्क युनिव्हर्सिटीतील माझ्या प्रवासात भेटलेल्या सर्वांची मी ऋणी आहे. मी आज जी काही आहे ती त्यांच्यामुळेच आहे. जर मला सार्क युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळाली नसती, तर हे सर्व शक्यच झाले नसते!

सुरंगिकाने International  Relations मध्ये एम.ए. (२०१२-१४) केले असून, सध्या ती श्रीलंकेतील चेंबर ऑफ कॉमर्समध्ये नोकरी करीत आहे.                     

Tags: सार्क विद्यापीठ श्रीलंका चेंबर ऑफ कॉमर्स श्रीलंका सुरंगिका जयरत्ने Saarc University. Swathvar Laksha Kendrit karta aale Shrilanka chember of commerce Shrilanka Surangika Jayratne weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके