डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एका डोळ्यात आनंदाश्रू, दुसऱ्या डोळ्यात दुःखाश्रू!

15 तारखेला सकाळी निरनिराळ्या संस्थांचे निरनिराळे कार्यक्रम झाले. सामान्यपणे मिठाई वाटणे. मुलांच्या खेळांच्या शर्यती घेणे आणि सार्वजनिक ठिकाणी सभा आयोजित करणे यापेक्षा काही विशेष झाले नाही. आमच्या उत्साहाला उधाण आलेले होते, पण त्या उत्साहाचा जसा उपयोग करून घ्यायला पाहिजे होता तसा तो करून घेतला गेला नाही, असे त्याही वेळी मला वाटले.

मी अनुभवलेला पहिला स्वातंत्र्यदिन...

इंग्रज लोक जून 48 ला हिंदुस्थान सोडून जाणार ही गोष्ट त्या वेळचे ब्रिटिश पंतप्रधान मेजर अॅटली यांनी 20 फेब्रुवारी 1947 ला जाहीर केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भराभर घटना घडत गेल्या आणि जून 1948  च्या आतच म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांनी स्वातंत्र्य आमच्या हातात दिले. त्या वेळी पंजाब, बंगाल किंवा सिंध या तीनही प्रांतात मुस्लिम लीगच्या हातात सत्ता नव्हती. आणि वायव्य सरहद्द प्रांतात तर सत्ता काँग्रेसच्या हातात होती. त्यानंतर परिस्थिती इतकी बदलली की पुढे थोड्याच काळात पंजाब, बंगाल, सिंध, राजपुतान्याचा वायव्य भाग आणि आसामच्या सिलचर भागात दंग्यांचा डोंब उसळला. गांधीजींनी नौखालीची पदयात्रा सुरू केली. त्या काळात नागपूरचे आम्ही काही तरुण 'इन्किलाब' नावाचे पत्र काढीत होतो. समाजवादी चळवळ नागपुरात कधीच मूळ धरू शकली नाही, याची अनेक कारणे आहेत. 

एक कारण 1938 पासून कम्युनिस्टांनी जी संघटना बांधावयास सुरुवात केली त्यात स्वातंत्र्यासाठी झटणारा कॉलेजमधील तरुण वर्ग सामील झालेला होता. या वर्गाचे नेतृत्व के. भूपेन्द्रनाथ मुखर्जी यांच्याकडे होते. ते नागपूर कटाच्या खटल्यातील प्रमुख आरोपी होते आणि त्यांना त्या खटल्यात दहा वर्षांची शिक्षा झालेली होती. खटल्याचे दुसरे आरोपी श्री. मगनलाल बागडी हे मुखर्जीचे मित्र होते त्यांची कॉंग्रेसजनांशीही मैत्री होती. त्यांनी हिंदुस्थानी लालसेना नावाची निमलष्करी संस्था काढली होती. याच काळात काँग्रेसमधील युवकवर्ग, राष्ट्रीय युवक संघ नावाची संघटना उभारीत होता. संत तुकडोजी महाराजांचे गुरुदेव सेवा मंडळही त्याच वेळी सुरू झाले होते. शिवाय काँग्रेस सेवादल पण या चळवळीतील एक घटक होते. शिवाय कॉलेज तरुणांचा एक ग्रुप होता.

मी, शंकरराव गेडाम, मधुसूदन वैराळे, डॉ. भास्कर फडणीस, मनोहर पाध्ये, चिंतामणी चिंचाळकर हे प्रमुख होतो. 1942 च्या चळवळीत माझा संबंध अच्युतराव पटवर्धन, एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे, साने गुरुजी, भाऊसाहेब नेवाळकर या महाराष्ट्रातील आणि अरुणा असफअली, बाबा राघवदास, मोहनलाल गौतम, डॉ. केसकर, मुंबईतील मिनू मसानी, अशोक मेहता इत्यादींशी आला होता. डॉ. लोहिया, जयप्रकाश ही तर आमची दैवते होती. त्यातून आमचा इन्किलाबचा गट उत्पन्न झाला. सुरुवातीस श्री. दांडेकर, घटवाई आदी लोक आमचे नेते होते. आचार्य दादा धर्माधिकारी, वीर हरकरे, कानेटकर, इ. आमची आणखी दैवते. अशा पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याची पहाट झाली. 15 ऑगस्टचा 'इन्किलाब' चा अंक काढण्यात आम्ही दंग होतो. 

14 तारखेलाच आमचा अंक बाहेर पडला पाहिजे अशी आमची इच्छा होती. 3 ऑगस्टच्या अंकात ‘आता तरी नवी दृष्टी येऊ या' या लेखाचा तिसरा भाग मी प्रकाशित केला होता 15 ऑगस्टच्या लेखाचा मथळा होता- 'स्वतंत्र भारता, तुझा जयजयकार असो.' त्या काळात मराठी माणसाचे तत्वगुरू आचार्य जावडेकर हे बहुधा लोकशक्ती साप्ताहिकाचे संपादन करीत असत. त्यांच्या त्या वेळच्या लेखाचा मथळा होता, 'स्वतंत्र भारताचा जयजयकार, त्यांच्या आणि माझ्या लेखांच्या मथळ्यातील सहज साम्य पाहून मी तर हवेत उडालो होतो. 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर गव्हनमेंट हाऊसमध्ये (राजभवन हे आताचे नाव) एक मोठा समारंभ होता. इन्किलाबचा संपादक या नात्याने मला तिथे निमंत्रण होते. 

मध्यप्रदेशातील मोठे नेते तिथे जमले होते. त्यांची माझी जवळीक होती. पं. रविशंकर शुक्लांना मी काकाजी म्हणत असे. दादा धर्माधिकारी तर आमचे दुसरे दादाच. हरि विष्णु कामत तेव्हा रा. कृ. पाटील यांच्या घरी राहत असत. पाटलांचा आणि कामतांचाही घरोबा होता. खरे म्हणजे आमच्या प्रांतात त्या काळी चार दादा प्रसिद्ध होते. मी तेव्हा प्रांतिक काँग्रेस कमिटीच्या शेतकरी समितीचा सेक्रेटरीही होती. आम्हांला वगळणे काँग्रेसच्या नेत्यांना जमणारे नव्हते. आमची किसान काँग्रेसची चळवळही जोरात होती. श्री. पु. य. देशपांडे आमचे मार्गदर्शक होते. रात्री बारा बाजून एक मिनिटाने गव्हर्नर श्री मंगलदास पक्कासा यांच्या हस्ते ध्वजवंदन कार्यक्रम झाला. काही भाषणे झाली. पुढे स्वराज्यात आपण काय केले पाहिजे यासंबंधी भाषणे झाली. 

15 तारखेला सकाळी निरनिराळ्या संस्थांचे निरनिराळे कार्यक्रम झाले. सामान्यपणे मिठाई वाटणे. मुलांच्या खेळांच्या शर्यती घेणे आणि सार्वजनिक ठिकाणी सभा आयोजित करणे यापेक्षा काही विशेष झाले नाही. आमच्या उत्साहाला उधाण आलेले होते, पण त्या उत्साहाचा जसा उपयोग करून घ्यायला पाहिजे होता तसा तो करून घेतला गेला नाही, असे त्याही वेळी मला वाटले. गोऱ्या इंग्रजांचा कारभार जाऊन आमचा कारभार आला, पण जुन्याच प्रकारची नोकरशाही कायम राहिली, ही आमची खंत होती. आणि 'इन्किलाब' मधून आम्ही याला वेळोवेळी वाचा फोडली होती. आमच्या प्रांतातले डावे नेतृत्व, आपण संघटित कसे व्हावे यापेक्षा आम्हाला विधानसभेत कसे जाता येईल याचाच विचार अधिक करीत होते. त्या काळात माउंटबॅटन योजनेने लोकांच्या मनाचा ठाव घेतला होता. 

पंडितजी, राजाजी, पं. पंत, सरदार वल्लभभाई इत्यारी सारे लोक फाळणीला अनुकूल झाले होते. एकदा जाऊ द्या लीगची कटकट असा सर्वांचा पवित्रा होता. कम्युनिस्ट, हरिजन कार्यकर्ते आणि संस्थानिकही फाळणीस अनुकूल होते. फक्त गांधीजी, अब्दुल गफारखान आणि मौलाना आझाद मात्र फाळणीस अनुकूल नव्हते, पण फाळणी करण्याकरिता तुम्हांला माझ्या प्रेतावरून जावे लागेल असे म्हणणारे महात्माजी सुद्धा फाळणीविरुद्ध चळवळ करू शकले नव्हते. अशा चळवळीस जनतेचा पाठिंबा मिळणार नाही हे त्यांनी ओळखले होते. गांधीजी जातीय सलोखा घडवून आणण्याकरिता नौखालीत पोचले होते. पण देशव्यापी चळवळ करावयास आपण आता अपुरे पडू याची जाणीव गांधीजींना झाली असावी. कारण त्या वेळी त्यांनी लढा केला असता तर तो जेवढा इंग्रजांविरुद्ध झाला असता तितकाच तो, पंडितजी, सरदार, राजाजी इत्यादी स्वकीयांविरुद्धही झाला असता. 

ही सारे नेतेमंडळी त्या वेळी द्विराष्ट्रवादी झाली होती. बॅरिस्टर सावरकर आणि बॅरिस्टर जीना हेही आपापल्या परीने द्विराष्ट्रवादीच होते. या साऱ्या द्विराष्ट्रवादांचा प्रकार वेगळा असला तरी हे सर्व द्विराष्ट्रवाद जनतेच्या नाडीत शिरले होते आणि त्यामुळे गांधीजी पण व्यथित होते. त्यामुळे 15 ऑगस्टला समारंभास गांधीजी हजर राहणार नव्हते. ह्या साऱ्या घटना एका रीतीने मन व्यथित करणाऱ्या होत्या. हिंदु आणि मुसलमान एकमेकांचे एवढे वैरी झाले होते की, दिल्लीसारख्या ठिकाणी हिंदूंनी मुस्लिम बालकांना तिसऱ्या मजल्यावरून फेकून देण्याच्या घटना घडत होत्या. इतरत्र मुस्लिमही याच घटनांची परतफेड करीत होते. 15 ऑगस्ट 1947 ला या साऱ्या घटनांची पार्श्वभूमी होती, त्यामुळे एका डोळ्यातून आनंदाश्रू आणि दुसऱ्या. डोळ्यातून दुःखाश्रू गळण्याचा प्रकार होता. आम्ही तरुण अशा साऱ्या घटनांचे शिकार झालो होतो. पुढे पन्नास वर्षांत घडलेल्या ज्या घटना आम्ही अनुभवल्या, त्यावरून 15 ऑगस्टची आमची मनःस्थिती वास्तववादी होती असेच म्हणावे लागेल.

Tags: सावरकर  जिना  सरदार वल्लभभाई पंडित नेहरू गांधी सुरेंद्र बारलिंगे Sawarkar Jina Sardar Vallabhabahi Patel Pandit Neharu Gandhi Surendra Barlinge weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेंद्र बारलिंगे

(1919 - 1997)

तत्त्वज्ञानाचे अभ्यासक. याच विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. प्रामुख्याने मराठवाडा, नांदेड आणि तेलंगण विभागात यांनी शिक्षण प्रसाराचं मोठं काम केलं आहे. त्यांनी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं होतं. ‘क्रांतिपूजा’, ‘सौंदर्याचे व्याकरण’, ‘तर्करेखा’, ‘माझे घर माझा देश’, ‘गोष्टीचं गाठोडं’, ‘अवकाशाच्या सावल्या’, ‘मी-पण माझे’ अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके