डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

देशी समाजसेवकांचे विदेशी देणगीदार त्यांच्या सेवाकार्याची दिशा व हेतू ठरवितात की नाही हे त्या बापड्यांकडून कधी सांगितले जात नाही आणि त्यांना मिळणारा पैसा कायदेशीर कामावरच खर्च होतो याची खात्री सरकारलाही देता येत नाही. धार्मिक कट्टरवाद्यांपर्यंत हा पैसा पोहोचतो अशी शंका सरकारने उघड केलेल्या माहितीत समाविष्ट असणे हा या स्वयंसेवी संस्थांविषयी संशय जागवणारा प्रकार आहे. सरकार हतबल होते तेथे समाजालाच सबळ व्हावे लागते. विदेशी पैशावर पुष्ट होणाऱ्या समाजसेवकांविषयी जनतेलाच कधीतरी जागे व्हावे लागणार आहे. 

विदेशी पैशावर स्वदेशात समाजसेवेची दुकाने मांडून बसलेल्या 33 हजार 979 समाजसेवकांना गेल्या पाच वर्षांत त्यांच्या अज्ञात देणगीदारांकडून 50 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. ही माहिती सरकारनेच जाहीर केल्यामुळे समाजसेवा हा धर्म न राहता धंदा झाला आहे हे आपल्या लक्षात यावे. 2005-6 या एकाच वर्षात या सेवेकऱ्यांना मिळालेल्या 7878 कोटी रुपयांच्या देणग्यांमध्ये 2006-7 मध्ये 50 टक्क्यांएवढी प्रचंड वाढ होऊन त्या 12 हजार 290 कोटींवर पोहोचल्या. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, आरोग्य, महिला-बालकल्याण, शेती व पर्यावरणविषयक क्षेत्रांत आपण काम करतो हे सांगणाऱ्या अशा सेवेकऱ्यांना मदत देणाऱ्यांत अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, स्वित्झर्लंड, इटली, स्पेन, नेदरलँड, बेल्जियम, कॅनडा आणि फ्रान्स या देशांसोबत पाकिस्तानचाही समावेश असणे हे गंभीर वास्तव आहे. जगभरच्या शंभर गरीब देशांना मिळून या देशांनी जेवढे अर्थसाहाय्य या काळात केले त्याहून अधिक या भारतीय समाजसेवकांना त्यांनी केले असल्याची बाब अंतर्मुख व चिंतातुर करणारी आहे. भारत सरकारला 4 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे अर्थसाहाय्य ज्या काळात मिळाले त्या काळात या समाजसेवकांनी त्या देशाकडून 3 अब्ज डॉलर्स मिळविले ही बाब त्यांचे विदेशातील वजन सरकारएवढेच असल्याचे सांगणारी आहे. हे देणगीदार देश व त्यांतील अज्ञात दाते या सेवेकऱ्यांकडून काय साधू इच्छितात हेही लक्षात घ्यावे असे हे वास्तव आहे. अशा सेवा संस्थांची सर्वाधिक संख्या तामिळनाडूत तर दुसऱ्या क्रमांकाची महाराष्ट्रात आहे हा मराठी माणसांच्याही चिंतेचा विषय व्हावा. सरकारने जाहीर केलेली ही आकडेवारी हिशेबातली आहे. त्याखेरीज या समाजसेवकांच्या खिशात जमा होणारा बेहिशेबी पैसा केवढा असेल याची आपण केवळ कल्पनाच करायची आहे. 

धर्माचा धंदा मांडून बसलेले उपदेशक, प्रवचनकार, भागवतकथाकार, बुवा, बाबा, बापू आणि श्री श्री यांसारखे दयाघन संस्कारांचा घनघोर पाऊस पाडताना आणि त्या बळावर हजारो कोटींच्या खाजगी इस्टेटी उभ्या करताना देशाने पाहिले आहेत. त्यांच्या राहणीवर, बडदास्तीवर, प्रवासावर आणि अनुयायांना माहिती नसलेल्या ऐषांवर होणाऱ्या खर्चाविषयी जाब विचारणाऱ्याला पाखंडी ठरविण्याएवढा आंधळा भक्तिभावही येथे आहे. त्यांना सरकार हात लावीत नाही, अनुयायांचा डर नाही आणि इतरांच्या लहानशाही चुकीवर तुटून पडणाऱ्या माध्यमांना त्यांच्या लेखण्या वा कॅमेरे त्यांच्याकडे वळवावेसे वाटत नाही. या बाबालोकांएवढेच भगतांचे तांडे त्या पन्नास हजार कोटीवाल्या समाजसेवकांभोवतीही आता उभे झाले आहेत. त्यांची व त्यांच्या संस्थांची संपत्ती केवढी, वर्षाकाठची मिळकत किती याची साधीही चौकशी न करता त्यांच्या घरात व संस्थेत पैसा ओतणाऱ्या त्यांच्या भक्तांची मानसिकताही बुवाबाबांच्या चेल्यांहून वेगळी नाही. त्यांचे वाजिंत्र वाजविण्यात आमची माध्यमेही धन्यता मानणारी व त्यांच्या सेवाकार्याला साहाय्य केल्याचे पुण्य पदरात पाडून समाधान मानणारी... या प्रकारात कोण कोणाची फसवणूक करतो? ते बुवाबाबा आणि हे समाजसेवक आपल्या भक्तांना बनवितात की त्यांच्या झोळीत आपला घामाचा पैसा टाकायला धावत निघणारी माणसेच स्वतःची फसवणूक करीत असतात? एरव्ही ज्ञानविज्ञानावर चौकसपणे बोलणारी माणसे अशा भजनांत नाचताना किंवा तशा सेवांवर फारशी चौकशी न करता पैसे उधळताना दिसतात तेव्हा तो दिङ्‌मूढ करणारा प्रकार होतो. सामाजिक चळवळी, कार्यकर्ते व संस्था यांना मिळणारे विदेशी अर्थसाहाय्य हा मानवधर्माचा भाग नाही. 

जगभरच्या उद्योगपतींचे व संपत्तिधारकांचे वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करणारा तो धंदेवाईक उपक्रम आहे. 1910 च्या दशकात रॉकफेलर फाऊंडेशनने सुरू केलेला हा उद्योग पुढे फोर्डसारख्या धनवंतांनी पुढे नेला. आर्थिक विषमतेवरील सामान्य माणसांचा व वंचितांचा संताप बोथट करणे आणि संभाव्य चळवळ्यांना पगारदार सेवेकरी बनवणे हा त्यामागचा हेतू आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी किंवा फ्रान्ससारख्या धनवंत देशांतील उद्योगपतींनी अतिशय पद्धतशीरपणे स्वतःभोवती उभी केलेली ही संरक्षक यंत्रणा आहे. टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासारख्या भारतीय धनवंतांनीही या उद्योगाच्या शाखा आता देशात काढल्या आहेत. अमेरिकेतील अशा फाऊंडेशन्सची संख्या दोन डझनांहून मोठी असून त्यांची कार्यालये त्या देशाच्या विदेश व संरक्षण मंत्रालयांच्या शेजारीच उभी आहेत. त्यांची उलाढाल 455 अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड आहे. या फाऊंडेशन्सनी दिलेली बक्षिसे व अनुदाने सेवावृत्ती म्हणून स्वीकारणारे व आनंदात राहणारे अनेक समाजसेवक महाराष्ट्रालाही त्याच्या पूजास्थानी वाटणारे असणे हा त्या दात्यांचा धनविजय आहे. मॅगसेसेसारखे देशी जनतेला परमपूज्य वाटणारे पुरस्कारही या धंदेवाईक दानवंतांच्या देणग्यातून कसे येतात व ते स्वीकारणारी माणसे स्थानिक सरकारांविरुद्ध आंदोलने उभी करून विकासाच्या योजनांना कशी खीळ घालतात याचा वेगळा पाढा येथे वाचता येण्यासारखा आहे. नर्मदा आंदोलनापासून नक्षलवादापर्यंतच्या लोकांना मिळालेल्या देणग्या जशा यात पाहता येतात तशा केजरीवाल, किरण बेदी या अण्णा-ख्यात लढवय्यांची त्यांनी चालविलेली पाठराखणही त्यातून तपासता येते. सेवाभावी म्हणविणाऱ्या आणि जगातल्या धनवंतांएवढीच देशी भांडवलदारांची अनुदाने मानधन म्हणून लाटणाऱ्या अशा सेवेकऱ्यांची मोठी यादी येथे देताही येईल... मात्र तसे न करता त्यांचा छडा लावणे व ती माणसे ओळखणे हा अभ्यास मी-साधनाच्या सूज्ञ वाचकांवर सोपविणे इष्ट मानून थांबतो. 

धरणे नकोत, कारखाने नको, अणुप्रकल्प नको आणि कोणतीही नवी योजना नको, अशी विकासाला नकार देणारी व रोजगार थांबविणारी जेवढी आंदोलने देशात आज होताना दिसतात ती सगळी या विदेशी पैसा घेणाऱ्या समाजसेवकांकडून चालविली जातात. सरदार सरोवरापासून गोसीखुर्दपर्यंतच्या किती योजना त्यांच्या आंदोलनांमुळे वर्षानुवर्षे रेंगाळल्या आणि त्यांच्यावर आरंभी ठरलेला खर्च त्या पूर्ण होईपर्यंत किती पटींनी वाढला याचा हिशेब कधीतरी आर्थिक अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाने केला पाहिजे. त्या रखडल्याने कृषी, विद्युत आणि उद्योग या क्षेत्रांत आपण किती मागे राहिलो व परिणामी बड्या देशांतील उद्योगपतींवर या देशाला किती काळ अवलंबून रहाणे भाग पडले याचाही विचार कधीतरी येथे होणे गरजेचे आहे. विकास थांबला की देश थांबतो आणि देश थांबला की माणसे दरिद्री राहतात. विकास रोखून देशाचे दरिद्रीकरण करणाऱ्या या विदेशी अनुदानावर स्वदेशी सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अर्थकारणाचा हिशेब आपला समाज कधी मागणार की नाही? भ्रष्टाचारावरील संताप हा समाजाचा स्वाभाविक उद्रेक आहे. मात्र समाजाचा असा संताप त्याचा विकास असा रोखणाऱ्यांवर उफाळताना न दिसणे हा आपल्याही एकांगी विचारशैलीचा भाग आहे. 

सध्याचे भ्रष्टाचारमुक्ती आंदोलन, मानवाधिकारवाल्यांची नक्षलसेवा आणि बहुतेक पर्यावरणवाद्यांचे उद्योग व बहुतेक धरणविरोधी चळवळी यांचा आधारही विदेशातून येणारा हा पैसा आहे. सरकारने योजना आखाव्या आणि या समाजसेवकांनी त्यांना विरोध करावा हा आपल्या नित्याच्या पाहण्यातलाही प्रकार आहे. या पैशातून काही चांगली कामे उभी राहिली हे कोणी नाकारणार नाही. मात्र त्याचा चांगल्या कामांवर झालेला खर्च आणि त्या नावावर विदेशातून आलेला पैसा यांचा ताळमेळ कधी मांडला जाईल की नाही? प्रसिद्धी माध्यमांतील माणसे या आंदोलक-सेवकांच्या ओरड्याला जेवढी प्रसिद्धी देतात तेवढी त्यांच्या मिळकतीच्या साधनांवर प्रकाश टाकत नाहीत. सामान्य माणसांना मग ही देशबुडवी माणसेच आपले खरीखुरे सेवक आहेत असे वाटू लागते. धरणे नको म्हणणारी ही माणसे त्यावाचून शेतीचा विकास कसा होणार हे सांगत नाहीत आणि पर्यावरणासाठी उद्योग नको असे म्हणताना उद्योगावाचून रोजगार कसा वाढेल हे सांगत नाहीत. सरकारविरुद्ध होणाऱ्या प्रत्येकच चळवळीत ती भाग घेतात आणि तेवढ्यावर न थांबता थेट नक्षलवाद्यांसारख्या हिंस्र चळवळीच्या मागे मानवाधिकाराचे रक्षण करण्याच्या बहाण्याने उभी होतात. देशी समाजसेवकांचे विदेशी देणगीदार त्यांच्या सेवाकार्याची दिशा व हेतू ठरवितात की नाही हे त्या बापड्यांकडून कधी सांगितले जात नाही आणि त्यांना मिळणारा पैसा कायदेशीर कामावरच खर्च होतो याची खात्री सरकारलाही देता येत नाही. धार्मिक कट्टरवाद्यांपर्यंत हा पैसा पोहोचतो अशी शंका सरकारने उघड केलेल्या माहितीत समाविष्ट असणे हा या स्वयंसेवी संस्थांविषयी संशय जागवणारा प्रकार आहे. 

सरकार हतबल होते तेथे समाजालाच सबळ व्हावे लागते. विदेशी पैशावर पुष्ट होणाऱ्या समाजसेवकांविषयी जनतेलाच कधीतरी जागे व्हावे लागणार आहे. त्यांना देशात आणि विदेशात पुरस्कार मिळतात. त्यांच्यावर लेख लिहिले जातात आणि त्यांच्या नावामागे समाजसेवक, मानवाधिकार रक्षक, पर्यावरणाचे संरक्षक यासारखी खोटी बिरुदे लावली जातात. या माणसांना त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत कुणी विचारीत नाही आणि त्यांनाही ते सांगावे लागत नाहीत. त्यांची बिंगे बाहेर आली तर त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्याचा आपण आजवर केलेला बावळटपणा उघड होतो या भयाने मग सगळेच मौनाचा आश्रय घेतात. विदेशात दडविलेल्या स्वदेशी पैशाविषयी जेवढे बोलले व लिहिले जाते तेवढे स्वदेशात उघडपणे येणाऱ्या या विदेशी पैशावर बोलले वा लिहिले जात नाही याचे कारणही याच मौनात दडले आहे.

Tags: नर्मदा बचाव आंदोलन विदेशी पैशावर स्वदेश सेवा ? सामाजिक चळवळी सेंटर पेज सुरेश द्वादशीवार Narmda Bachav Andonan Samajik Chalvali Videshi Paishavr Swadesh Seva? Centre Page Suresh Dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके