डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपला डावा विचार पुढे नेण्याची जबाबदारी माओवाद्यांनी उचलली असल्याच्या विश्वासानेही त्याला त्याचे आजचे आश्वस्त सुस्तपण आले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यातून आपले तत्त्वज्ञान हे जगातले अंतिम शहाणपण असल्याची श्रद्धा पुढाऱ्यांना आणि पक्षांनाही राजकारणातल्या वारकऱ्यांचीच कळा आणते. आपल्या भूमिका हीच जगाच्या कल्याणाची एकमेव गुरुकिल्ली आहे अशी ही श्रद्धा आहे आणि ती कम्युनिस्टांची गेल्या शतकातली एकमेव वैचारिक कमाई आहे. कालानुरूप न बदलणारे धर्मच कालबाह्य होत नाहीत, राजकारणातले पक्षही तसे होतात. त्यातून केरळातले त्याचे पुढारी कमालीचे उर्मट आणि तुच्छतावादी तर बंगालातले नेते जास्तीचे लोकविन्मुख व आत्मतुष्ट आहेत... या स्थितीत प्रकाश करातांना पुन्हा टर्म मिळाली आहे आणि आता वृंदा करातांना राज्यसभेत कुठून व कसे पाठवायचे व त्यासाठी कोणत्या जुन्या पुढाऱ्याचे पंख कापायचे याचीच चिंता त्यांना करायची आहे.  

डाव्या कम्युनिस्टांना (यात उजवेही येतात) वाढायचे नाही आणि त्यांना काही शिकायचेही नाही. त्यांचे नेते त्यांच्या सध्याच्या जीवनशैलीत आणि मर्यादित भूगोलात संतुष्ट आहेत. काही आठवड्यांपूर्वी केरळातील कोझीकोडे येथे भरलेल्या पक्षाच्या सहा दिवसांच्या चर्चाग्रस्त अधिवेशनाने आत्मपरीक्षणाचा, आजवरच्या चुकांच्या दुरुस्तीचा वा भविष्यातील वाढीच्या योजनांचा कोणताही निर्णय घेतला नाही. शिवाय त्याला त्याच्या आजच्या दयनीय स्थितीपर्यंत आणून पोहोचविणाऱ्या प्रकाश करातांना व त्यांच्या नेतृत्वातील स्थितिशील व कर्मठ चौकडीला साधा जाब विचारण्याचेही धाडस झाले नाही. पक्षातील लोकप्रिय नेते अपमानित करून बाजूला सारायचे आणि पुस्तकी पुढारी उचलून धरायचे हे धोरण कम्युनिस्टांनी करातांच्या नेतृत्वात स्वीकारले. प्रथम ज्योती बसू व नंतर सोनाथ चॅटर्जी या लोकाभिमुख नेत्यांचे वजन कमी करण्याचा व त्यांना राजकारणाच्या व्यासपीठावरून दूर करण्याचा प्रयत्न झाला. पुढे बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि केरळचे मुख्यमंत्री के. अच्युतानंदन यांना पक्षाच्या पॉलिट ब्युरोधून घालविण्याचा व त्यांची मानखंडना करण्याचा उद्योग झाला. त्यांच्या सरकारांविरुद्ध पक्षातल्या माणसांना बळ देण्याचे व त्यांना अडचणीत आणण्याचे राजकारण करातांच्या हस्तकांनी केले.

बुद्धदेव सरकारविरुद्ध ममता बॅनर्जींनी उभ्या केलेल्या सिंगूर व नंदीग्रामच्या आंदोलनाच्या काळात प्रकाश करात आणि त्यांचे सहकारी बुद्धदेवांची होणारी कुचंबणा दूरस्थ प्रेक्षकासारखे पाहत राहिले. तर अच्युतानंदन यांचे पाय ओढण्याचे राजकारण करणाऱ्या पिनारायी विजयन या केरळच्या पक्षसचिवाला बळ देण्याचेच राजकारण करात करताना दिसले. या साऱ्याचा परिणाम होऊन त्या दोन्ही राज्यांत पक्षाच्या वाट्याला दारुण पराभव आला. तरीही हे सारे घडवून आणणाऱ्या करातांचा झेंडा उचलून धरण्याचा व त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे चालण्याचा आत्मघातकी निर्णय पक्षाने त्या अधिवेशनात घेतला... जाता जाता अच्युतानंदन यांनी ज्या पिनारायी विजयनने केलेल्या 300 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे निर्देश त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात दिले त्याला बढती व जास्तीचे संरक्षण देण्याचे संशयास्पद राजकारणही केले. 

कॉ.श्रीपाद अमृत डांगे, ए.के. गोपालन, हिरेन मुखर्जी, भूपेश गुप्ता आणि ई.एम.एस. नंबुद्रिपाद यांच्यासारख्या नेत्यांची नेत्रदीपक प्रभावळ असणारा हा पक्ष एकेकाळी संसदेत पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष होता. बंगाल आणि केरळसारखाच उत्तर प्रदेश, आंध्र, बिहार, ओरिसा व मुंबई इलाख्यात त्याचा प्रभाव मोठा होता.त्याच्या वरिष्ठ नेत्यांध्ये मुस्लिम समाजाचे अनेकजण असल्याने त्या समाजाचा त्याच्याकडे ओढा होता आणि काँग्रेस पक्षाच्या संघटनांहून त्याच्या कामगार संघटना मोठ्या व अधिक शिस्तबद्ध होत्या. पं. नेहरूंसह त्या काळच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या टीकेचा पहिला रोखही तेव्हा कम्युनिस्टांवर असायचा. 1959 च्या निवडणुकीत केरळमध्ये निवडून आलेले पहिले कम्युनिस्ट विधिमंडळ बरखास्त करण्यात तेव्हाच्या काँग्रेसाध्यक्ष इंदिरा गांधी यांनी जो पुढाकार घेतला त्याचेही कारण तेच होते... जनसंघ लक्षात न घेण्याएवढा लहान आणि त्या काळात उदयाला येऊन अस्त पावलेल्या स्वतंत्र पक्षाला त्याच्या धनवंत असण्याची मर्यादा होती. राजकारणाचे स्वरूप राष्ट्रीय असल्याने प्रादेशिक पक्षांचा उदय झाला नव्हता आणि जे तसे होते त्यांची तेव्हा चलतीही नव्हती. 1967 पासून हे चित्र बदलायला सुरुवात झाली असली तरी 1977 पर्यंत कम्युनिस्टांच्या दोन नंबरच्या स्थानाला धक्का लागला नव्हता. 

1962 मध्ये झालेल्या चीनच्या आक्रमणाचे समर्थन करण्याच्या पक्षातील कर्मठांच्या भूमिकेवरून त्यात डावे व उजवे अशी पडलेली पहिली फूट आणि 1975 च्या आणीबाणीला पाठिंबा देण्याच्या धोरणामुळे सामान्य व मध्यमवर्गाच्या मनातून ढळलेले त्याचे स्थान यामुळे त्याला उतरतेपण आले आणि तो बंगाल आणि केरळ या दोन राज्यांपुरता मर्यादित बनला. अन्यत्र त्याचे समर्थन ओसरले आणि त्याच्याकडे असलेला तोवरचा तरुणांचा ओढाही ओसरला... आणीबाणीवर संतापलेल्या जनतेने जयप्रकाशांच्या जनता पार्टीसोबत कम्युनिस्टांनाही केरळ व बंगालात पुन्हा सत्तेवर आणले. नंतरच्या काळात ज्योती बसूंच्या अनुभवसिद्ध व कणखर नेतृत्वाच्या बळावर तो पक्ष बंगालमध्ये परवापर्यंत सत्तेवर राहिला.

केरळात मात्र त्याने आणि काँग्रेसने आळीपाळीने सत्ता ताब्यात घेतली आणि अनुभवली. ज्योती बसू हे देशाचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते ठरले. मात्र त्यांच्या 23 वर्षांच्या कारकीर्दीत बंगालचे 18 जिल्हे अखेरपर्यंत दारिद्य्ररेषेच्या खालीच राहिले. बुद्धदेव भट्टाचार्यांनी त्या राज्याला औद्योगिक चेहरा देण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रथम करातादिकांनी व पुढे ममता बॅनर्जींनी त्या साऱ्या योजनांनाच सुरुंग लावला. याच काळात रिकाम्या होत गेलेल्या आरंभीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या जागा नव्यांना भरता आल्या नाहीत आणि त्यांच्या पश्चात राष्ट्रीय नेतृत्त्वाची सगळी स्थाने रिकामीच झाली. जी माणसे त्यावर नव्याने आली त्यांच्याजवळ जनाधार नव्हता आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी त्यांचे नातेही नव्हते. या नेत्यांचा भर पुस्तकी विचारावर तर त्या कार्यकर्त्यांना त्यांचे स्थानिक पातळीवरचे राजकारण आणि त्यातले विजय महत्त्वाचे वाटत आले... करात आणि कम्युनिस्ट यांच्यातले आताचे अंतर असे आहे.

तरीही 2004 ते 2008 या काळात डॉ.मनमोहन सिंगांच्या पहिल्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याच्या धोरणामुळे आणि त्या पाठिंब्याची मोठी किंमत मिळविण्याच्या कार्यक्रमामुळे त्याचा राष्ट्रीय राजकारणावरचा प्रभाव मोठा होता. एवढा की, ‘ते मला आपला वेठबिगार समजतात’ अशी तक्रार जाहीरपणे करण्याची पाळी पंतप्रधानांवर आली. आघाडीधर्माच्या पालनाची जबाबदारी असलेल्या त्या सरकारवर कम्युनिस्टांचा पाठिंबा टिकवून ठेवण्याची जास्तीची जोखीम होती. त्याच काळात कम्युनिस्ट पक्षातील लोकाभिमुख नेत्यांना बाजूला सारण्याचे, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आलेल्या नव्या पोथीनिष्ठ पुढाऱ्यांचे राजकारण सुरू झाले. प्रकाश व वृंदा करात आणि त्यांच्या साथीदारांनी प्रथम ज्योती बसू, नंतर सोमनाथ चॅटर्जी व पुढे अच्युतानंदन यांचे पंख कापायला सुरुवात केली. बुद्धदेवांचा पाया अस्थिर करण्याचे राजकारणही त्यांनी तेव्हाच सुरू केले. 

नव्या पुढाऱ्यांजवळ जनाधार नव्हता आणि पक्षातील पदांच्या बळावर जनाधार असणाऱ्यांचे मोठेपण त्यांना सलतही होते. त्यातून कम्युनिस्ट पक्षात त्याच्या सरचिटणीसाच्या पदाला एखाद्या हुकूमशहाला असावे तेवढे अधिकार आहेत. परिणामी त्याच्या चुका त्याला सांगण्याचे धाडस कोणी करीत नाही. सीताराम येच्युरीसारख्या लोकप्रिय माणसाची बोलती करातादिकांनी ज्या तऱ्हेने बंद केली तो प्रकार असा लक्षात घ्यावा... पक्षावर नियंत्रण मिळवित गेलेल्या करातांनी मग काँग्रेस व मनमोहन सिंगांच्या सरकारलाच वेठीला धरण्याचे राजकारण केले. अमेरिकेशी केलेल्या अणुकराराला विरोध करताना त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतानाच भाजपासोबत जाऊन लोकसभेत मतदान करण्याचे आत्मघातकी पाऊल उचलले... परिणाम व्हायचा तोच झाला. करातांच्या तोवरच्या ब्लॅकमेलिंगवर न संतापलेले मनमोहन सिंगच केवळ संतापले नाहीत, डाव्या पक्षांविषयी आत्मीयता असणारा केरळ व बंगालातील मध्यमवर्गही त्याच्यावर संतापला. याच काळात ममता बॅनर्जींना कमी लेखून त्यांच्या वाढत्या बळाकडे दुर्लक्ष करण्याचे त्याचे अदूरदर्शीपणही त्याच्यावर उलटले. 2009 च्या निवडणुकीत या साऱ्याचा परिणाम दिसला. लोकसभेतील 63 खासदारांची डाव्यांची संख्या जवळपास दोन तृतीयांशने घसरून 23 झाली. 

शहाण्या व पदवीधर माणसांचा हा पक्ष आपल्या या अपयशाची परखड चिकित्सा करील, त्यासाठी नुसते धोरणच नव्हे तर नेतेही बदलील आणि केरळ व बंगालच्या कुंपणात अडकलेले पक्षाचे काम देशाच्या इतर राज्यांत नेण्याचे धोरण आखील असे त्याच्या चाहत्यांना वाटले होते. जुने व दूर गेलेले लोकप्रिय नेते पुन्हा जोडण्याचा, पुस्तकी कर्मठांचे बळ कमी करण्याचा आणि समाजातील वंचितांच्या आकांक्षा संघटित करण्याचा पुन्हा एकवार संकल्प करील अशी आशाही अनेकांनी बाळगली होती. पण तसे झाले नाही. बाकीचे बूर्ज्वा पक्ष ज्या वळणाने जातात त्याच वळणाने स्वतःला क्रांतिकारी म्हणवणारा हा पक्षही जाताना दिसला. करातांचे अपयशी पुढारीपण कायम राहील, जनतेने लाथाडलेली तीच पुस्तकी धोरणे आणखी घट्टपणे उराशी बाळगेल आणि जुन्याच मार्गावरून पूर्वीपेक्षा अधिक वेगाने तो वाटचाल करीत राहील असेच निर्णय त्याने घेतले...

आपला डावा विचार पुढे नेण्याची जबाबदारी माओवाद्यांनी उचलली असल्याच्या विश्वासानेही त्याला त्याचे आजचे आश्वस्त सुस्तपण आले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यातून आपले तत्त्वज्ञान हे जगातले अंतिम शहाणपण असल्याची श्रद्धा पुढाऱ्यांना आणि पक्षांनाही राजकारणातल्या वारकऱ्यांचीच कळा आणते. आपल्या भूमिका हीच जगाच्या कल्याणाची एकमेव गुरुकिल्ली आहे अशी ही श्रद्धा आहे आणि ती कम्युनिस्टांची गेल्या शतकातली एकमेव वैचारिक कमाई आहे. कालानुरूप न बदलणारे धर्मच कालबाह्य होत नाहीत, राजकारणातले पक्षही तसे होतात. त्यातून केरळातले त्याचे पुढारी कमालीचे उर्मट आणि तुच्छतावादी तर बंगालातले नेते जास्तीचे लोकविन्मुख व आत्मतुष्ट आहेत... या स्थितीत प्रकाश करातांना पुन्हा टर्म मिळाली आहे आणि आता वृंदा करातांना राज्यसभेत कुठून व कसे पाठवायचे व त्यासाठी कोणत्या जुन्या पुढाऱ्याचे पंख कापायचे याचीच चिंता त्यांना करायची आहे. 

Tags: पक्ष सरचिटणीस लोकविन्मुखता पुस्तकी नेते पुस्तकी विचार न बदलाचे धोरण पोथीनिष्ठ राजकारण डावी विचारसरणी कम्युनिस्ट पक्ष प्रकाशाने अंधारात लोटलेला पक्ष सुरेश द्वादशीवार सेंटर पेज Bookish Leaders Communist left alliance Leftist Thoughts Prakash Karat CPI Communist Party of India Prakashane Andharat Lotlela paksh Suresh Dwadashiwar Centre page weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके