डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

भारताला सत्ता देणे वा स्वातंत्र्य देणे हे चर्चिल यांना अजिबात मान्य नव्हते. इंग्रजांचे नियंत्रण जाईल त्या दिवशी तो देश विखुरलेला असेल आणि त्याचे तुकडे झालेले असतील, असे ते म्हणत. भारत पुन्हा त्याच्या जुन्या व जंगली संस्कृतीमागे जाईल आणि इंग्लंडने केलेले त्याचे आधुनिकीकरण लयाला जाईल. त्याच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे; मात्र आपलीच माणसे ती वाऱ्यावर सोडायला निघणार असतील तर त्यांचे ते कृत्य मी कधीही क्षम्य मानणार नाही,’ असा त्यांचा संताप होता... कोणतेही पद, सत्ता, संतत्व वा यातले काहीही सोबत नसणाऱ्या एका माणसाला भारत एवढा सन्मान का देतो याचाच त्यांना राग होता. त्यांनी गांधींच्या इंग्लंडमधील सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार घातला होता. गांधींनी मागूनही चर्चिल यांनी त्यांना भेटीची वेळ दिली नव्हती.

देशाचे पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर पं. नेहरूंनी इंग्लंडला भेट दिली, तेव्हा चर्चिल हे त्या देशाच्या पंतप्रधानपदावर दुसऱ्यांदा विराजमान झाले होते. नेहरूंसोबत इंदिरा गांधीही होत्या. आपल्या पहिल्याच भेटीत इंदिरा गांधींना चर्चिल म्हणाले, ‘‘तुमच्या वडिलांना आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांना मी अनेक वर्षे तुरुंगात डांबले होते. तुमच्या मनातला त्याचा राग आता संपला की नाही?’’... एका क्षणाचाही विचार न करता इंदिरा गांधींनी त्यांना उत्तर दिले, ‘‘आम्ही गांधीजींचे अनुयायी आहोत. त्यांनी आमच्यावर राग, द्वेष वा सूडाचा संस्कार केला नाही...’’- इंदिरा गांधींचे ते उत्तर चर्चिल यांना नक्कीच आवडले नसणार, कारण गांधींचा केला तेवढा तिरस्कार आणि राग चर्चिल यांनी दुसऱ्या कोणाचा केला नाही.

त्याआधी 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेच्या सोहळ्याला भारतीय प्रतिनिधी मंडळाच्या प्रमुख म्हणून विजयालक्ष्मी पंडित उपस्थित होत्या. त्यांच्या शेजारच्याच खुर्चीवर चर्चिल बसले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता चर्चिल त्यांना म्हणाले, ‘‘तुमच्या पतीला आम्हीच मारले, नाही का?’’ (विजयालक्ष्मींचे पती रणजित पंडित हे स्वातंत्र्य- लढ्यातील सहभागासाठी ब्रिटिशांच्या तुरुंगात असतानाच मृत्यू पावले होते.) विजयालक्ष्मी म्हणाल्या, ‘‘प्रत्येकाच्या मृत्यूचा क्षण ठरलेला असतो. तो कोणामुळे येत नाही आणि टळत नाही. त्यांच्या मृत्यूचे ओझे तुम्ही मनावर बाळगू नका.’’ चर्चिल त्याही वेळी अवाक्‌ झाले होते. भारतीय माणसे गीता आणि गांधी यांच्यामुळे एवढी प्रभावित झाली असतील, हे त्यांच्या स्वप्नातही कधी आले नव्हते. त्या खेपेला एक गोष्ट मात्र त्यांनी मान्य केली. ते विजयालक्ष्मींना म्हणाले, ‘‘तुमचे भाऊ हे फार थोर नेते आहेत. त्यांनी माणुसकीच्या दोन शत्रूंना जिंकले आहे- राग आणि द्वेष. असा भाऊ तुम्हाला मिळाला म्हणून तुमचे अभिनंदन.’’

विन्स्टन लिओनार्ड स्पेन्सर चर्चिल अशा वजनदार नावाच्या या नेत्याचा जन्म 30 नोव्हेंबर 1874 रोजी त्यांच्या परंपरागत मालकीच्या, समुद्रतटावर असलेल्या तीन हजार एकरांवरील बागेतल्या आलिशान महालात झाला. वैभव आणि कीर्ती, सन्मान आणि पद यासोबतच उज्ज्वल इतिहासाचा मोठा वारसा लाभलेल्या त्या महालाला जॉन चर्चिल या इंग्लंडच्या पहिल्या सेनापतीने  प्रतिष्ठा व अहंतेच्या पातळीवर पोहोचणारा सन्मान मिळवून दिला होता. फ्रान्सला रणांगणावर धूळ चारलेल्या या जॉन यांच्या रेन्डॉल्फ चर्चिल या चिरंजीवांना ‘मी बॉस आहे’ असे म्हणणे आवडायचे. विन्स्टन आपल्या याच वडिलांच्या परंपरेत वाढले असल्याने त्यांचीही स्वतःविषयीची व आपल्या प्रतिष्ठेबाबतची धारणा तीच असायची.

तसाही त्यांचा काळ हे इंग्लंडच्या इतिहासातले सुवर्णयुग होते. नेपोलियनचा अस्त झाला होता. इंग्लंडला जगात दुसरा प्रतिस्पर्धी उरला नव्हता आणि सर्व खंडांत त्याच्या वसाहती होत्या. शिवाय राणी व्हिक्टोरियाचा दीर्घ काळचा राजपदावरील वावर त्याला शांततेएवढाच समृद्धी प्राप्त करून देणारा होता. विन्स्टनची मानसिकता त्या काळाने आणि त्यांच्या कुटुंबाला दिलेल्या सन्मान व समृद्धीने घडविली होती. इंग्लंडच्या सर्व वसाहतींत भारत हा सर्वाधिक मोलाचा व इंग्लंडच्या समृद्धीत प्रचंड भर घालणारा प्रदेश होता. त्याचमुळे 1936 मध्ये चर्चिल म्हणाले, ‘‘इंग्लंडच्या साम्राज्याचे विसर्जन करणारा पंतप्रधान अशी अपकीर्ती मला मिळवायची नाही.’’

नेमक्या त्याच काळात भारतात- त्यांच्याच शब्दातला- एक ‘नंगा फकीर’ त्या साम्राज्याच्या विसर्जनाचे बळ आपल्या निःशस्त्र हातांत व हडकुळ्या देहात घेऊन जन्माला आला होता. त्या साम्राज्याच्या विसर्जनाची व्यवस्थाच त्याने पूर्ण करीत आणली होती. चर्चिलने इटलीच्या मुसोलिनीचा पराभव केला, रशियाच्या मदतीने हिटलरला नेस्तनाबूत केले व पुढे अमेरिकेच्या साह्याने जपानच्या सम्राटालाही शरण आणले. जगातल्या तीन शक्तिशाली हुकूमशहांना पराभूत करू शकलेला चर्चिल भारतातल्या या नंग्या फकिराला मात्र कधी हरवू शकला नाही. जनरल स्मट्‌स या दक्षिण आफ्रिकेच्या व्हाईसरॉय पदावर राहिलेल्या आपल्या सहकाऱ्याला त्याचमुळे तो एकदा म्हणाला, ‘‘हा गांधी तुझ्या तुरुंगात असताना त्याला तू संपविले असतेस, तर आपले साम्राज्य आणखी काही दशके या जगावर राहिले असते.’’

हिटलर आणि मुसोलिनीसारख्या युद्धखोर शत्रूंवर त्यांचा जेवढा रोष नव्हता तेवढा तो या शस्त्रहीन सत्याग्रह्यावर होता. ही त्यांच्या रोषाची कमाल तीव्रता आणि गांधींच्या विनम्रतेची थोरवी सांगणारी बाब आहे. सन 1931 मध्ये हिंदुस्थानचे व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी गांधींना चर्चेसाठी आपल्या निवासस्थानी (आजचे राष्ट्रपती भवन) येण्याचे निमंत्रण दिले, तेव्हा चर्चिल संतापाने म्हणाले, ‘‘सम्राटाच्या प्रतिनिधीशी बरोबरीच्या नात्याने चर्चा करायला एक अर्धनग्न फकीर असलेला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दर्जाचा सामान्य वकील त्या भवनाच्या पायऱ्या चढून येतो आणि व्हाईसरॉयशी बरोबरीच्या नात्याने वाटाघाटी करतो, याएवढी इंग्लंडच्या  नामुष्कीची व त्याच्या साम्राज्याला कलंक फासणारी गोष्ट दुसरी नाही.’’ त्यातून चर्चिल वर्णवर्चस्व आणि वंशवर्चस्वाचे चाहते होते, तर गांधी या भेदांच्या विनाशकाच्या रूपात अवतरले होते.

चर्चिल आणि गांधी हे दोघेही दीर्घ काळ दक्षिण आफ्रिकेत राहिले होते. चर्चिल एक युद्ध पत्रकार म्हणून, तर गांधी त्यांचे वकिलीतले नशीब अजमावून पाहायला आले म्हणून. त्या दोघांची तिथे व पुढे कधीही भेट झाली नाही. त्यांची क्षेत्रे वेगळी आणि त्यांच्या कामाचे स्वरूपही वेगळे होते... आफ्रिकेत 1906 मध्ये दुसऱ्यांदा जाण्यापूर्वी गांधींनी त्या प्रदेशातील भारतीयांचा ब्रिटिश राजवटीने चालविलेला अमानुष छळ एका जाहीर पत्रकाद्वारे जगासमोर आणला होता. परिणामी, त्यांच्यावर संतापलेल्या आफ्रिकेतील गोऱ्या लोकांनी त्यांना आपल्या देशात पाय ठेवू न देण्याची प्रतिज्ञा केली. त्यासाठी त्यांची बोट त्यांनी समुद्रात 21 दिवस अडवून धरली. किनाऱ्यापासून दूर व समुद्रातच नांगरलेल्या बोटीवर गांधी व कस्तुरबा त्यांच्या मुलांसोबत तेव्हा राहिले होते. जेव्हा ते किनाऱ्यावर आले, तेव्हाही तेथील लोकांनी त्यांच्यावर दगड-धोंड्यांचा मारा करून त्यांना रक्तबंबाळ केले.

नंतरही त्यांच्या घराभोवती त्यांचे मारेकरी रात्रीचे जमून त्यावर दगड-धोंडे भिरकावायचे. ‘गांधीला फासावर चढवा’, अशा घोषणा द्यायचे. अखेर पोलिसांच्याच सूचनेवरून गांधी काही काळ पोलीस ठाण्यात मुक्कामाला गेले. मात्र सरकारी यंत्रणेने सांगूनही त्यांनी आपल्या मारेकऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली नाही. जगभरच्या साऱ्या माणसांची सहनशीलता हीच त्यांच्यात समता व आपलेपण निर्माण करणारी शक्ती आहे आणि ही शक्तीच साऱ्या हिंसाचाऱ्यांचा पराभव करू शकते, हा त्यांचा विश्वास याच काळात दृढ झाला. अखेर हल्लेखोर हरले आणि तेथील गोऱ्या समाजालाही गांधीत इतरांची दुःखे व यातना सहन करीत ताठ मानेने पण विनम्र मनाने आपली मूल्ये जपणारा येशू दिसायला लागला.

गांधींवरील या हल्ल्याने लंडनही अस्वस्थ झाले. जोसेफ चेंबरलेन या सरकारी अधिकाऱ्याने गांधींना संरक्षण देण्याची सरकारकडे जाहीर मागणी केली. जनरल स्मट्‌स यांना पत्र लिहून गांधींवरील हल्लेखोरांवर कारवाई करण्याचीही त्यांनी सूचना केली. गांधींनीही आपल्या हल्लेखोरांविरुद्ध फौजदारी खटले दाखल करावेत, असे त्यांना पाठविलेल्या पत्रात चेंबरलेन यांनी लिहिले. गांधींनी मात्र तसे काही केले नाही. ज्यांच्यासोबत आयुष्य काढायचे, त्यांना वैरी करणे त्यांच्या मानसिकतेत बसणारेही नव्हते. मात्र याच काळात त्यांचा निर्धारही कायम झाला- ‘ही भूमी भिऊन न सोडण्याचा.’ गांधी पुढली अनेक वर्षे तिथे राहिले आणि एक चांगले कायदेपंडित व लोकलढ्याचे मान्यताप्राप्त नेते असा लौकिकही त्यांनी तेथे मिळविला.

दक्षिण आफ्रिकेत पत्रकार म्हणून काम करताना चर्चिल यांनी गांधींची व त्यांच्या लढ्यांची दखल कधी घेतली नाही. ब्रिटिश साम्राज्याने आपल्या सगळ्या प्रजाजनांना समान अधिकार व सन्मानाची वागणूक द्यावी यासाठी गांधीजींचा लढा होता. मात्र दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना मिळणारी वागणूक अन्यायाची, अपमानाची व दुय्यम दर्जाची होती. त्यांच्यावर अनेक निर्बंध होते. सार्वजनिक जागी त्यांच्या प्रवेशाला मज्जाव होता. त्यांना त्यांचे विवाह स्थानिक कायद्याप्रमाणे नोंदवून घ्यायला लावणारा व तसे जे करणार नाहीत त्यांचे विवाह बेकायदा ठरविणारा कायदा तेथील सरकारने केला होता. या अन्यायाविरुद्ध गांधींनीच स्थापन केलेल्या नाताळ काँग्रेसने सत्याग्रही आंदोलनाला सुरुवात केली व त्यासाठी सश्रम कारावास पत्करला. या आंदोलनात पुरुषांसोबत स्त्रियाही सहभागी होत्या, शिवाय त्याचे स्वरूप सर्वधर्मी होते. या आंदोलनाची नोंद चर्चिल यांना कधी घ्यावीशी वाटली नाही.

द. आफ्रिकेच्या तुरुंगात गांधींना सामान्य कैद्याची वागणूक दिली गेली. त्या कैद्यांसोबतच त्यांनी चामडी कमावण्याचे व चपला शिवण्याचे तंत्र शिकून घेतले. अखेरच्या वेळी तुरूंगाचा निरोप घेताना त्यांनी आपल्या हातांनी जनरल स्मट्‌ससाठीच चपलांचा एक जोड तयार केला व तो त्यांना भेट म्हणूनही दिला. त्याच काळात साम्राज्याचे नागरिक म्हणून आपलीही त्याविषयीची एक जबाबदारी अंगावर घेण्याचा निर्णय गांधींनी घेतला. बोअर युद्धात त्यांचे मन इंग्रजांविरुद्ध होते, तरीही इंग्रज सैन्यासाठी त्यांनी एका शुश्रूषा पथकाची स्थापना केली. प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन तेथील जखमी सैनिकांना सुरक्षित जागी पोहोचविण्याचे काम त्यांनी हाती घेतले. अशा सैनिकांना कधी स्ट्रेचरवरून, तर कधी खांद्यावर घेऊन त्यांनी कित्येक मैलांची रपेट तेव्हा केली. त्यांच्या या सेवेची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना ‘हिंदकेसरी’ या किताबाने गौरविले. मात्र युद्ध पत्रकारिता  करणाऱ्या चर्चिलने त्यांच्या याही सेवेची दखल कधी घेतली नाही.

चर्चिल लेखक होते, पत्रकार होते, चित्रकार होते आणि त्यांना संगीताची चांगली जाण होती. शेक्सपिअर हा त्यांचा आवडता नाटककार होता. पण एवढी विलक्षण सांस्कृतिक अभिरुची असलेल्या या पुढाऱ्याला ‘खालच्या’ माणसांविषयी जराही माया नव्हती. त्या सेवेकऱ्यांनी आपला सेवाधर्म सांभाळण्यातच त्यांचे कल्याण आहे आणि त्यांच्याकडून सेवा करून घेण्याचा आपल्याला ईश्वरदत्त अधिकार आहे, असे ते प्रत्यक्षात म्हणतही.

गांधी आणि चर्चिल यांच्या भूमिकांत दोन ध्रुवांएवढे अंतर होते. गांधी माणसांतला माणूस होता, चर्चिल सत्ताधाऱ्यांतला पदाधिकारी होता. त्यांच्यातला संघर्ष सत्ताशौर्य आणि सहनशक्ती यांतला होता. पुढे चर्चिल हे ब्रिटिश साम्राज्याचे सर्वशक्तिशाली नेते झाले आणि गांधी हा निःशस्त्र लोकशाहीचा शक्तिशाली प्रतिनिधी बनला. ही लढाई डेव्हिड आणि गोलियाथ यांच्यातली नव्हती, मात्र या लढाईतला डेव्हिडही शस्त्रधारी नव्हता. ब्रिटिश साम्राज्य हे आपल्या सर्व नागरिकांना समान लेखत नाही, या निष्कर्षावर द.आफ्रिकेतील अनुभवाने गांधी आले होते. त्या सरकारच्या दडपशाहीविरुद्ध त्यांनीच तिथे एक मोठे आंदोलन उभे केले. एका शक्तिशाली साम्राज्याला एक परका व एकटा माणूस निःशस्त्र आव्हान देतो, यातले रौद्रभीषण काव्यही चर्चिल यांच्या दृष्टीने दखलपात्र ठरले नाही.

चर्चिल 1909 मध्ये ब्रिटिश आरमाराचे प्रमुख झाले आणि जगातल्या सर्वांत मोठ्या नौदलाचे आधिपत्य जाणवून घेतानाच त्यांचा स्वतःविषयीचा आत्मविश्वासही मोठा झाला. तो काळ विमानांच्या आगमनाचा आणि त्याविषयीची भीती असण्याचा होता. तरीही घरातल्या साऱ्यांचा सल्ला धुडकावून वैमानिकाचे प्रशिक्षण घ्यायला चर्चिल सज्ज झाले. त्यांच्या पहिल्या उड्डाणानंतर त्यांचा प्रशिक्षक लगेचच मृत्यू पावला, पण चर्चिल यांची जिद्द त्यांना ते प्रशिक्षण चालू ठेवायला भाग पाडणारी ठरली. हा काळ गांधींच्या आफ्रिकेतील तुरुंगवासाचा होता. ब्रिटिशांचे जुलमी कायदे आशियायींना त्या देशाबाहेर घालवतील म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न अपुरे पडत होते. सत्याग्रहाला नेहमीच प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र गांधी निराश नव्हते. ते नव्या मार्गांचा शोध घेत असतानाच नामदार गोखले आफ्रिकेत आले. गोखल्यांना सरकारही भारतात मान देत होते. त्याच्या सूचनेवरून जनरल स्मट्‌स यांनीही त्यांचे यथोचित स्वागत केले. गोखल्यांनी गांधींची भेट घेतली आणि त्यांच्या अनुयायांसमोर व्याख्याने दिली. सरकारी अधिकाऱ्यांशीही गांधींच्या मागण्यांबाबत त्यांनी चर्चा केली. ते भारतात परत जायला निघाले, तेव्हा त्यांना निरोप द्यायला आलेले गांधी त्यांच्या वकिली सुटाबुटात नव्हते. देशी व गुजराती पेहरावात होते. यापुढे तोच पोशाख वापरण्याचा निर्धारही त्यांनी केला होता.

चर्चिल 1919 ते 1922 या काळात इंग्लंडचे युद्धमंत्री झाले. हवाईदलाचे प्रमुख आणि पंतप्रधानांचे वसाहतविषयक सल्लागार हे पदही त्यांना मिळाले होते. 1922 च्या अखेरीस ते इंग्लंडचे अर्थमंत्री झाले. त्यांच्या पक्षाचा 1929 मध्ये पराभव होऊन ते दीर्घ काळ सरकारबाहेर राहिले. दि.3 सप्टेंबर 1939 ला इंग्लंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले, तेव्हा त्यांची कॅबिनेट मंत्रिपदावर व आरमार खात्याचे प्रमुख म्हणून पुन्हा नियुक्ती झाली. या काळात ते पंतप्रधान चेंबरलेन यांनी हिटलरच्या चालविलेल्या तुष्टीकरणाच्या प्रयत्नांवर टीकेची झोड उठवत होते. पुढे 10 मे 1940 या दिवशी ते इंग्लंडचे पंतप्रधानच झाले.

पदे बदलली, जगात नावही मोठे झाले, पण चर्चिल मनाने बदलले नाहीत. त्यांचा भारतद्वेष आणि गांधीद्वेष तसाच राहिला. नव्हे तर तो उत्तरोत्तर वाढतही गेला. गांधींनी 1915 पर्यंत द.आफ्रिकेतील भारतीयांची मानसिकता बदलली होती. साम्राज्याच्या इतर वसाहतींतील नागरिकांना मिळणारे अधिकार गांधींनी त्यांना मिळवून दिले होते. त्यासाठी तुरुंगवास आणि मारहाण सहन केली होती. व्हाईसरॉय जनरल स्मट्‌स हे एक चांगले प्रशासक होते. त्यांना गांधींचे सामर्थ्य व अधिकार कळला होता. अखेरच्या काळात त्यांनी गांधींना सन्मानानेही वागविले होते. दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी गांधींनी इंग्लंडला भेट दिली, तेव्हा ते स्मट्‌सना भेटले होते. त्या वेळी स्मट्‌स म्हणाले, ‘‘आफ्रिकेत असताना तुम्ही मला जेवढा त्रास दिला, त्यापेक्षा मी तुम्हाला दिलेला त्रास कमी होता की नाही?’’ यावर दोघांनीही हंसून ते संभाषण संपविले.

गांधी 1915 मध्ये भारतात आले आणि 1920 पर्यंत सारा भारत त्यांच्या नेतृत्वाच्या छायेत गेला. केंद्रीय विधी मंडळात त्यांचा पक्ष बहुमतात होता. राजकारण बदलले, जगही बदलले; मात्र गांधी तसेच राहिले होते आणि  चर्चिलनेही कात टाकली नव्हती. गांधीजींना दुसऱ्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण 1932 मध्ये आले, तेव्हा चर्चिलच्या भाषेतला हा नंगा फकीर प्रत्यक्ष ब्रिटिश सम्राटाशी व सम्राज्ञीशी बरोबरीच्या नात्याने बोलणी करायला तशाच वेशात त्यांच्या महालात गेला होता. त्या भेटीनंतर एका पत्रकाराने गांधींना विचारले, ‘‘एवढ्या कमी वस्त्रांनिशी सम्राटांना भेटताना तुम्हाला कसे वाटले?’’ गांधींनी उत्तर दिले, ‘‘पण सम्राटांच्या अंगावर आम्हा दोघांनाही पुरून उरतील एवढे कपडे होते की!’’

गांधींची ती लंडनभेट फार ऐतिहासिक ठरली. त्या वेळी गांधींना भेटायला सारे लंडन उलटले होते. सारे लेखक, कलावंत, राजकीय नेते, तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञ अशा साऱ्यांची त्यांच्या भेटीसाठी रीघ लागली होती. चार्ली चॅप्लिनसारख्याला त्यांच्या भेटीनंतर ‘मॅन ॲन्ड द मशीन’ हा चित्रपट काढावासा वाटला. गांधीजींच्या स्वदेशीमुळे व विशेषतः खादीमुळे ज्यांच्यावर बेकारी ओढवली, त्या मॅन्चेस्टरच्या कापड गिरण्यांमधील कामगारांचा वर्गही त्यांच्याकडे विनवण्या घेऊन आला होता. बर्नार्ड शॉ यांनी त्यांच्याशी दोन तास चर्चा केली. त्या ज्येष्ठ विनोदी नाटककाराने गांधींना फारसे प्रभावित मात्र केले नाही. हा माणूस शब्दांवर जास्तीचे प्रेम करणारा आहे, अशी गांधींची त्याविषयीची प्रतिक्रिया होती. ज्या एका नेत्याने त्यांच्याकडे त्या काळात पाहूनही दुर्लक्ष केले, तो पुन्हा चर्चिलच होता. नाही म्हणायला आपले चिरंजीव रेन्डॉल्फ यांना त्यांनी गांधींच्या एका बैठकीला पाठवले होते.

भारताला सत्ता देणे वा स्वातंत्र्य देणे हे चर्चिल यांना अजिबात मान्य नव्हते. इंग्रजांचे नियंत्रण जाईल त्या दिवशी तो देश विखुरलेला असेल आणि त्याचे तुकडे झालेले असतील, असे ते म्हणत. ‘भारत पुन्हा त्याच्या जुन्या व जंगली संस्कृतीमागे जाईल आणि इंग्लंडने केलेले त्याचे आधुनिकीकरण लयाला जाईल. त्याच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे; मात्र आपलीच माणसे ती वाऱ्यावर सोडायला निघणार असतील तर त्यांचे ते कृत्य मी कधीही क्षम्य मानणार नाही,’ असा त्यांचा संताप होता... कोणतेही पद, सत्ता, संतत्व वा यातले काहीही सोबत नसणाऱ्या एका माणसाला भारत एवढा सन्मान का देतो याचाच त्यांना राग होता.

त्यांनी गांधींच्या इंग्लंडमधील सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार घातला होता. गांधींनी मागूनही चर्चिल यांनी त्यांना भेटीची वेळ दिली नव्हती. मात्र, गांधींच्या लंडनभेटीने त्यांनाही त्यांच्या सरकारएवढेच गांधींच्या शब्दांतले वजन समजले. गोलमेज परिषदेला गांधींसोबत गेलेल्यांनाही त्यांच्या तुलनेत आपण काय आहोत ते कळून चुकले होते. गांधी म्हणजे देश, त्यांचा शब्द हाच देशाचा आवाज याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली. हा नेता शांततेने सारे मिळवतो आणि शस्त्रधारकांनाही शरण आणून आपलेसे करतो, हे सरकारला कळले. गांधींची लोकशाहीनिष्ठा वादातीत होती. शस्त्रांना असलेला त्यांचा नकारही साऱ्यांच्या परिचयाचा होता. एका राष्ट्राचे नायकत्व करणाऱ्या गांधींचा विनय साऱ्यांना नम्र करणारा ठरला. पुढे 1944 च्या जुलैमध्ये गांधींनी चर्चिल यांना एक पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, ‘प्रिय पंतप्रधान, माझ्यासारख्या नागव्या फकिराला चिरडून टाकण्याचा विचार तुमच्या मनात आहे, हे मला ठाऊक आहे. आमच्याकडे फकीर असणे व तोही नागवा असणे, ही बाब काहीशी अवघडही आहे. त्याचमुळे तुमचे शब्द बोचणारे असले, तरी ते मी गौरवार्थानेच घेतो. तुम्ही माझा उपयोग जनतेच्या व साम्राज्याच्या कल्याणासाठी जसा करता येईल तसा करून घ्यावा, अशी माझी आपल्याला विनंती आहे.’ चर्चिलना ते पत्र मिळाले नाही आणि मिळाले असते तरी त्यांनी त्याची दखल घेतली असती असे नाही.

चर्चिलचे हे वर्तन नंतरच्या काळात काहीसे बदललेले दिसले. गोलमेज परिषदेला आलेल्या गांधींना आपण भेटलो नाही या गोष्टीचा त्यांना पुढे अनेक दिवस पश्चात्ताप होत राहिला. त्यांनी तो वेळोवेळी बोलूनही दाखविला. गांधीजींच्या शिष्या मीराबेन (मॅडेलाईन स्लेड) यांनी त्यांची 1934 मध्ये भेट घेतली. मीराबेन या ब्रिटिश ॲडमिरल स्लेड यांच्या कन्या होत आणि स्लेड यांच्या घरी चर्चिल यांचे येणे-जाणे होते. ‘मी गांधींसोबत आयुष्याची नऊ वर्षे घालविली आहेत. माझा त्यांच्याविषयीचा अनुभव तुम्हाला सांगायचे मनात आहे,’ असे आपल्या पत्रात लिहून मीराबेन यांनी चर्चिलना म्हटले, ‘‘तुम्ही म्हणता, तुमची मते परस्परविरोधी असताना गांधींना कशाला भेटायचे? पण तुम्हा दोघांनाही आवडणारा व आपला वाटणारा हिंदुस्तान हा एक विषय आहे...’’ चर्चिलने मग त्यांना भेटीला बोलावले.

दि.2 नोव्हेंबर 1934 या दिवशी हाऊस ऑफ कॉमन्समधील आपल्या दालनात खादीच्या वेशात आलेल्या मीराबेनला पाहून चर्चिल काहीसे गहिवरले. मात्र तिच्याशी बोलताना  ते म्हणाले, ‘‘भारत हे राष्ट्र नाही. तशी कोणती बाब अस्तित्वातही नाही.’’ त्यावर मीराबेन त्यांना म्हणाल्या, ‘‘त्या सबंध देशाला बांधून ठेवणारे एक सांस्कृतिक सूत्र आहे. ते बाहेरच्यांना दिसायचे नाही. पण तिथे राहणाऱ्यांना ते अनुभवता येणारे आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत कुठेही जा- तो देश आता स्वातंत्र्याच्या आकांक्षेने भारला आणि बांधला गेला आहे.’’ त्यावर गांधींविषयी बोलताना चर्चिल म्हणाले, ‘‘गांधींच्या सामाजिक व नैतिक कामांविषयीचे मला कौतुक आहे. पण मी त्यांना माझ्या विमानात मात्र कधी बसू देणार नाही.’’ तेव्हा मीराबेन उत्तरल्या, ‘‘बापू कृतिशील आदर्शवादी आहेत व त्यांच्यावर कोणत्याही वादाचा प्रभाव नाही...’’ नंतर भारताला द्यावयाच्या नव्या कायद्याबाबत (1935) चर्चिल अनिच्छेने म्हणाले, ‘‘भारताला घटना राबविता येईल, असे मला वाटत नाही. त्याऐवजी तेथील हिंदू, मुसलमान व ख्रिश्चन यांनी एका मजबूत सत्तेच्या (म्हणजे ब्रिटनच्या) अधीन राहणेच त्यांच्या हिताचे आहे.’’ मीराबेनने त्याविषयीचे त्यांचे विस्तृत मत विचारले, तेव्हा ते काहीसे गांगरले. मात्र मीराबेनचा निरोप घेताना ते म्हणाले, ‘‘गांधींना माझी कृतज्ञता सांग. ते इंग्लंडमध्ये असताना मी त्यांना भेटलो नाही याचे मला असलेले दुःखही त्यांना सांग.’’

नंतरच्या काळात चर्चिल यांनी याच विषयावर बोलायला घनश्यामदासजी बिर्ला या गांधीजींचे स्नेही असलेल्या भारतीय उद्योगपतींना बोलवून घेतले. घनश्यामदासजी त्यांच्या उद्योगांनिमित्त इंग्लंडला वारंवार जात असत. तेथील राजकीय वर्तुळातही त्यांच्या मित्रांचा वर्ग मोठा होता. तरीही चर्चिल यांनी आपल्याला दुपारच्या भोजनाचे निमंत्रण दिल्याचे पाहून ते काहीसे चकित झाले. त्या भेटीत एकटे चर्चिलच फार काळ बोलत राहिले. मात्र त्यांचे बोलणे गांधी आणि भारताविषयीचे होते. चर्चिलना भारताची फारशी माहिती नाही, हे बिर्लांच्या तत्काळ लक्षात आले. भारतात रेल्वे आहे, मोटारी आहेत आणि त्यातली शहरे ग्रामीण भागाशी जुळली आहेत, शिवाय त्यांच्यात व्यापार आहे, या साध्या गोष्टीही चर्चिलना ठाऊक नव्हत्या. त्यांनी गांधींच्या दलितोद्धाराच्या कार्याविषयी विचारले, तेव्हा घनश्यामदासजींनी त्यांना त्याविषयीची सविस्तर माहिती दिली. ती ऐकून चर्चिल म्हणाले, ‘‘माझ्या मनातले गांधींचे स्थान आता फार उंचावले आहे.’’

गांधींच्या ग्रामीण क्षेत्रातील कामाविषयी व विशेषतः लघु व गृह उद्योगांविषयीही त्यांनी जाणून घेतले. तरीही त्यांनी भारताविषयीची एक शंका बोलून दाखविलीच. ‘‘आम्ही तुम्हाला घटना दिली तर गांधी ती मोडून तर नाही ना टाकणार?’’ त्यावर बिर्ला म्हणाले, ‘‘गांधीजींना घटनेपेक्षाही ग्रामीण भागातील दरिद्री वर्गाच्या आणि दलितांच्या उत्थानाविषयीची तळमळ मोठी आहे. त्यांना स्वातंत्र्य हवे आहे आणि भारताचे भवितव्य फक्त भारतीयच घडवू शकतात यावर त्यांना विश्वास आहे.’’ त्यावर चर्चिल म्हणाले, ‘‘जनतेला भौतिक विकास हवा, गांधींनी त्यावर भर दिला पाहिजे. भारतीय जनतेला लोण्यासारखे पदार्थ उपलब्ध झाले पाहिजेत.’’ बिर्लांना निरोप देतानाही आपण गांधींची भेट टाळल्याचे दुःख चर्चिल यांनी व्यक्त केले. पुढे जाऊन ‘मला मरणाआधी भारतात येऊन गांधींना भेटण्याची इच्छा आहे’, असेही ते म्हणाले. त्याच वेळी ‘‘भारत हे इंग्लंडवरील एक ओझे आहे. तिथे आम्हाला लष्कर ठेवावे लागते. त्यासाठी सिंगापूर आणि इतर वसाहती राखाव्या आणि पोसाव्या लागतात’’ असे सांगून ते म्हणाले, ‘‘भारत स्वतःची काळजी वाहू शकला, तर ते इंग्लंडसाठीही एक वरदानच ठरेल.’’

बिर्ला आणि चर्चिल यांची दुसरी भेट 1937 मध्ये झाली. या वेळी इंग्लंडभोवती दुसऱ्या महायुद्धाचे ढग गोळा होऊ लागले होते. ‘‘या काळात भारताने इंग्लंडसोबत राहावे असे मला तीव्रतेने वाटते’’ असे चर्चिल म्हणाले. त्या वेळी बिर्लांनी चर्चिल यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले. चर्चिल म्हणाले, ‘‘व्हाईसरॉय लिनलिथगो यांनी मला तसे निमंत्रण दिले आहे. मात्र गांधी मला भेटू इच्छित असतील, तर तिथे येण्याची मी तयारी करेन.’’ या वेळी त्यांनी बिर्लांसोबत गांधीजींना शुभेच्छाही पाठवल्या. ते म्हणाले, ‘‘भारत समृद्ध करा. त्यासाठी त्यातले प्रांत आर्थिक दृष्ट्या संपन्न करा. भारत लोकशाहीच्या नियमानुसार चालेल, तर आम्हीही तसे चालू. भारतातील हिंसाचार थांबवा. तिथे होणाऱ्या ब्रिटिशांच्या हत्या थांबवायला गांधींना सांगा.’’ त्यावर बिर्लांनी ‘भारतातील ब्रिटिश नागरिक सुरक्षित असल्याचे’ सांगतानाच ‘गांधींचा विरोध तुमच्या राजवटीला आहे, तुम्हाला नाही’, हेही चर्चिलना ऐकवले.

1935 च्या प्रांतिक स्वायत्तता कायद्यानुसार 37 मध्ये झालेल्या निवडणुकांत सात प्रांतांत काँग्रेसची सरकारे अधिकारारूढ झाली. त्यांनी कृषी व अन्य क्षेत्रांत चांगल्या कामांना सुरुवात केली. मात्र दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा भारताच्या संमतीवाचूनच इंग्लंडने त्यात त्याला सहभागी करून घेतले, त्यावेळी काँग्रेस सरकारांनी त्या कारवाईच्या निषेधार्थ राजीनामे दिले. व्हाईसरॉयने काँग्रेसची युद्धाला मदत मिळविण्यासाठी केलेल्या सगळ्या वाटाघाटीही त्याचमुळे फसल्या. पुढच्या काळात चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले, तेव्हा मात्र त्यांची दरम्यानच्या काळातील वृत्ती काहीशी बदलली होती. ते 1942 मध्ये म्हणाले, ‘‘मी या देशाचा पंतप्रधान त्याच्या साम्राज्याच्या विसर्जनाचे अध्यक्षपद सांभाळायला झालो नाही.’’

त्याच वेळी ॲटलांटिक करारानुसार त्यातील सहभागी देशांना द्यावयाच्या सवलती व संरक्षण भारताला तो देश त्या करारात नसल्याने देता येत नाहीत, हेही त्यांनी जाहीर केले. मात्र युद्धाचे विरुद्ध दिशेला जाणारे पारडे व अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांचा सल्ला लक्षात घेऊन चर्चिल यांनीच भारताला स्वराज्य देण्याच्या तयारीने क्रिप्स मिशन भारतात पाठविले. गांधींनी या मिशनची भेट घ्यायलाच प्रथम नकार दिला व नंतर झालेल्या भेटीत ‘आल्या पावली परत जा,’ असे त्यांनी क्रिप्सना सांगितले... मात्र क्रिप्स मिशनने भारताला स्वराज्य देण्यासंबंधीच्या ब्रिटिश योजनेत काही सुधारणा सुचविल्या, त्या चर्चिल यांनी मान्य केल्या. पण व्हाईसरॉय लिनलिथगो यांना त्या मान्य झाल्या नाहीत. परिणामी, ते मिशन फसले.

पुढल्या काळात जपानच्या फौजा व सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वातील इंडियन नॅशनल आर्मीची पथके भारताच्या पूर्व सीमेवर येऊन थडकली, तेव्हा लिनलिथगो यांनी ‘स्कॉर्च्ड अर्थ पॉलिसी’ अवलंबून भारताच्या पूर्व सीमेवरून माघार घेताना ती भूमी जाळून खाक करण्याचे धोरण राबविले. परिणामी, त्या भागात वीस ते तीस लाख लोक भुकेने तडफडून मृत्यू पावले. त्या वेळी त्या भागात अन्न पाठविण्यासाठी लिनलिथगो यांनी मागितलेली परवानगी चर्चिल यांनी नाकारली. हा सारा प्रकार गांधीजींची अस्वस्थता व काँग्रेसमधील असंतोष वाढविणारा होता. जीनांचे उद्दामपण सुरू होते, चर्चिल काहीएक ऐकायला राजी नव्हते आणि लिनलिथगो ब्रिटिश सरकारच्या आज्ञेबाहेर जाणारा नव्हता. ही स्थिती हतबल होऊन शांत राहण्याची नव्हती.

शिवाय गांधीजी आणि काँग्रेस यांचा जेवढा विरोध इंग्रज सत्तेला होता, त्याहून त्यांचे कडवे वैर जर्मनी व जपानच्या नाझी हुकूमशाहीशी होते... या परिस्थितीत 1942 च्या आंदोलनाची सुरुवात झाली. ‘तुम्ही प्रथम इथून जा. आमचे आम्ही पाहून घेऊ’ ही त्या वेळची गांधी आणि काँग्रेस यांची भूमिका होती. 1942 च्या लढ्याबाबतची एक गोष्ट महत्त्वाची. जगाच्या इतिहासात तेवढा लोकलढा त्याआधी कधी झाला नाही. आपल्या अधिकारासाठी कोणत्याही राजामागे वा सेनापतीमागे न जाता तुरुंगात डांबलेल्या एका निःशस्त्र नेत्यामागे प्राणार्पणाच्या तयारीने जाणारे एवढे लोक त्याआधी कधी कुठे संघटित झाले नाहीत. त्याअगोदर गांधींनी मुलांना शाळा सोडायला सांगितल्या, तेव्हा त्यांनी त्या सोडल्या. सरकारी नोकऱ्या सोडायचे आवाहन केले, तेव्हा लोकांनी त्या नोकऱ्या सोडल्या. वकिलांनी व्यवसाय थांबविले आणि आताच्या लढ्यात त्यांनी लोकांना ‘करा वा मरा’ म्हटले, तेव्हा लोक त्यात मरायलाही उतरलेले दिसले. असा नेता याआधी जगात झाला नाही, असे अनुयायीही याआधी जगात कोणाला मिळाले नाहीत.

या लढ्यात हिंसाचाराच्या काही घटना घडल्या, तेव्हा गांधींनी 21 दिवसांचे उपोषण तुरुंगात आरंभले. त्या उपोषणातून ते जिवंतपणे बाहेर येणार नाहीत याची शंका आल्याने ब्रिटिश सरकारने त्यांच्या अंत्यविधीची तयारीच आगाखान पॅलेस या त्यांच्या तुरुंगात केली. त्यांच्या अस्थी-विसर्जनासाठी सरकारने त्यांच्या मुलांनाही तिथे बोलावून घेतले. (काही काळापूर्वी याच तुरुंगात कस्तुरबांचा मृत्यू झाला होता. महादेवभाई देसाई हे गांधींचे मानसपुत्रही तिथेच मृत्यू पावले होते.) मात्र याच आंदोलनाने भारतीय जनतेची चहूबाजूंनी झालेली कोंडी फोडली. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला असला, तरी भारताला आणखी ताब्यात ठेवण्याचे इंग्लंडचे सामर्थ्य संपले होते.

जपानचा पराभव साऱ्यांना दिसत होता. जीनांची फाळणीची मागणी मान्य झाली तरी संपूर्ण बंगाल व संपूर्ण पंजाब याविषयीचा त्यांचा हट्ट संपला नव्हता. आरंभी चर्चिल यांनी जीनांना प्रोत्साहन देऊन ‘फोडा आणि जोडा’ हे राजकारण काही काळ चालविले. त्यासाठी 1946 मध्ये जीनांना इंग्लंडला बोलवून चर्चिल यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि बरेच दिवस त्यांच्याशी खासगी पत्रव्यवहारही केला. पुढे नवे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी चर्चिल यांना भेटून काँग्रेस पक्षाची ब्रिटिश कॉमनवेल्थमध्ये राहण्याची तयारी असल्याचे सांगितले, तेव्हा चर्चिल निवळले आणि त्यांनी  जीनांना पत्र लिहून भारताच्या फाळणीपूर्वी बंगाल व पंजाबची फाळणी करायला मान्यता द्या, अशी सूचना केली. अन्यथा, त्या प्रांतांचा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा दमही त्यांनी जीनांना दिला. परिणामी, जीना नमले आणि त्या दोन प्रांतांची हिंदू व मुसलमान अशी फाळणी करायला राजी झाले.

येथे माऊंटबॅटन यांनी केलेल्या एका चुकीचा उल्लेखही आवश्यक आहे. भारत कॉमनवेल्थमध्ये राहील ही गोष्ट नेहरूंनी त्यांच्याजवळ मान्य केली, तेव्हा त्यांच्या मनात वसाहतीचे स्वातंत्र्य नव्हते. भारताच्या प्रमुखपदी कॅनडासारखे इंग्लंडच्या राजपदाने राहणेही नेहरूंना मान्य नव्हते. कॉमनवेल्थ हा स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्रांचा एक क्लब असेल आणि त्याच्या अध्यक्षपदी इंग्लंडचे राजपद असेल, एवढेच नेहरूंनी मान्य केले होते. माऊंटबॅटन यांनी मात्र चर्चिल यांना इंग्लंडचे राजपद भारताचेही राज्यप्रमुख राहील, अशी माहिती दिली होती... भारत स्वतंत्र झाल्यानंतरही केवळ तेवढ्यासाठी चर्चिल यांचे त्याविषयीचे दुःख संपले नव्हते. त्यांच्या हुजूर पक्षाचा 1945 च्या निवडणुकीत पराभव करून इंग्लंडमध्ये सत्तेवर आलेले क्लेमंट ॲटली यांच्या लेबर सरकारने भारताला स्वातंत्र्य दिले याचा संताप त्यांच्या मनातून कधी गेलाही नाही.

फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर ज्या दंगली झाल्या, त्यावर बोलताना 17 सप्टेंबर 1947 या दिवशी चर्चिल म्हणाले, ‘‘हे त्या देशाला स्वातंत्र्य दिल्याच्या चुकीचे फळ आहे. मी जी गोष्ट 1931 पासून 34 पर्यंत जगाला सांगत होतो, तेच आज त्याला पाहावे लागत आहे.’’ गांधींनी मात्र चर्चिल यांच्या थोरवीची प्रशंसाच अखेरपर्यंत केली. याच काळात त्यांनी लिहिले, ‘चर्चिल हे थोर नेते आहेत. मार्लबरो या इंग्लंडमधील कमालीच्या प्रतिष्ठित घराण्याचे रक्त त्यांच्या अंगात आहे. आज भारतात जे घडत आहे, त्याची कल्पना त्यांना पूर्वीच आली होती. हेच ब्रह्मदेशातही घडेल, हे त्या द्रष्ट्या माणसाचे म्हणणे आहे. त्यांनी महायुद्ध जिंकले आणि जगातील लोकशाही सुरक्षित केली.’ मात्र त्याच लेखात गांधी म्हणतात, ‘भारताला स्वातंत्र्य मिळाले ते चर्चिल यांच्या हातून नाही; ब्रिटिश जनतेने त्यांचा निवडणुकीत पराभव केल्यानंतर त्या देशात सत्तेवर आलेल्या सरकारने भारताचे स्वातंत्र्य मान्य केले. त्यामुळे हे स्वातंत्र्य ब्रिटिश सरकारने दिले नसून इंग्लंडच्या जनतेने दिले आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. चर्चिल यांना सत्तेत अधिक रस आहे. पंजाब व बंगालमधील जनतेच्या रक्ताहूनही त्यांना सत्तेचे मोल अधिक वाटले आहे.’

गांधीजींचा खून जगाला धक्का देऊन गेला. जगभरच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. इंग्लंडचे सर्वपक्षीय नेतेही त्यात आघाडीवर होते. त्यात फक्त चर्चिल यांचा समावेश नव्हता. गांधींनी आपले साम्राज्य संपविले याचा राग त्यांच्या मनातून अखेरपर्यंत गेला नाही. साम्राज्याचे रक्षण हे त्यांचे जीवितध्येय होते. त्यांची मानसिकता 19 व्या शतकातील राजेशाहीने घडविली होती. शक्तिशाली राष्ट्र हा ब्रिटनचा गौरव त्यांना कायम राखायचा होता. इंग्लंडचा गौरवशाली इतिहास हे त्यांचे दैवत होते. गांधींशी असलेले त्यांचे वैर इंग्लंडचा भूतकाळ आणि भारताचे भविष्य यातील होते.

चर्चिल उत्तरोत्तर सनातनी, तर गांधी क्रांतिकारी होत गेले. चर्चिलचे सगळ्या जुन्या परंपरांवर प्रेम होते, तर गांधी त्या परंपरांचे विनाशक होऊन पुढे आले होते. चर्चिल लोकांत मिसळत पण मनाने एकटेच असत. गांधी लोकांत मिसळत आणि त्यांचेच होत. चर्चिलना समाजातील विषमता आवडायची, गांधींना ती नाहीशी करायची होती. गांधींचे प्रत्येकावर प्रेम होते, समाजातला अखेरचा माणूस हा त्यांच्यासाठी ईश्वराचा पुत्र होता. चर्चिलसाठी सारे भारतीय हे ब्रिटिश साम्राज्याच्या पुतळ्याचे वजन खांद्यावर घेणारे चबुतरेच तेवढे होते. इंग्लंडच्या स्वातंत्र्यासाठी व थोरवीसाठी चर्चिल यांनी प्राण दिले नसते, मात्र भारताला ताब्यात ठेवायलाही प्राण द्यायला ते तयार झाले असते. गांधींच्या मृत्यूची दखल न घेऊन चर्चिल या थोर माणसाने त्याच्या मनाचे कोतेपणच उघड केले. त्यांना गांधी अखेरपर्यंत समजला नाही, त्यांच्या मागे असलेल्या लोकशक्तीचे आत्मबळही त्यांना कधी कळले नाही. त्यामुळे चर्चिल हे त्यांच्या काळाचेच पुत्र राहिले आणि गांधी हा सर्वकालीन थोरवीचा अधिकारी बनला.

(गांधीजी आणि त्यांचे टीकाकार या मालिकेतील हा लेख याआधी अंतर्नादच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता.)

Tags: winston Churchill mahatma gandhiji suresh swadashiwar gandhiji ani winston Churchill gandhiji ani tyanche tikakar 15 gandhiji ani tyanche tikakar weekly sadhana weekly sadhana 13 january 2018 sadhana saptahik विन्स्टन चर्चिल महात्मा गांधीजी सुरेश द्वादशीवार गांधीजी आणि विन्स्टन चर्चिल गांधीजी आणि त्यांचे टीकाकार 15 गांधीजी आणि त्यांचे टीकाकार साधना साधना साप्ताहिक 13 जानेवारी 2018 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात