डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

गांधींच्या विचारात नवे काय, असा प्रश्न अनेकांना अशा वेळी पडणार आहे. सत्याचा आग्रह वा अहिंसेची वाट जुनीच आहे. गांधींनीच सॉक्रेटिसला जगातला पहिला सत्याग्रही म्हटले. तो सनपूर्व 300 वर्षांआधीचा. अहिंसेची देन महावीर व बुद्धाची. ती सनपूर्व 600 वर्षांची. मनुष्यधर्माचा त्यांचा आग्रह प्रत्येक शतकातच नव्हे, तर जगात सर्वत्र धरला गेला... जी मूल्ये सार्वत्रिक आणि सर्वकालिक असतात, त्यांनाच सनातनी म्हटले जाते. गांधी स्वतःला सनातनी म्हणायचे. सबब- ते सार्वत्रिक आहेत आणि सर्वकालीनही राहणार आहेत. वर्ग, समूह, जात, धर्म, पंथ वा देश यांच्याविषयीचे विचार स्वतःसोबतच आपली कालबद्धता घेऊन येतात. गांधींना या मर्यादांनी कधी बाधित केले नाही. ते वैश्विक होते, आहेत आणि राहणारही आहेत. त्याचमुळे गांधी सर्वत्र आहेत, गांधीवादी मात्र त्यांच्या आश्रमांच्या कुंपणात अडकून राहिले आहेत.  

गांधीजींचे टीकाकार त्यांच्या चाहत्यांएवढेच संख्येने मोठे होते. शिवाय त्यांच्यातील अनेकांचा अधिकार व उंचीही मोठी होती. त्याचमुळे त्यांच्या कार्याची व विचारांची दखल एवढ्या विस्ताराने घेणे गरजेचे होते. त्यातल्या काहींशी त्यांच्या एकट्याच्याच नव्हे तर त्यांच्यासोबतच्या लोकांच्या, समुदायांच्या व अनुयायांच्या कहाण्या जुळल्या होत्या. तसेच त्यातील अनेकांच्या मागे त्यांच्या विचारांचे प्रवाहही होते. त्या साऱ्यांचा परामर्श घेताना एक गोष्ट साऱ्यांच्या लक्षात यावी अशी निश्चितच आहे. गांधींनी त्यांच्यावरील टीकेला कधी जाहीर उत्तर दिले नाही. एखाद्या टीकाकाराने पत्रातून आपले मत कळविले, तर त्याची पत्रानेच दखल घेण्याखेरीज त्यांनी काही केले नाही. नथुरामने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्याही वेळी त्यांचे हात त्याला केलेल्या नमस्कारासाठी जोडले गेले होते, हे सत्य यासंदर्भात लक्षात घ्यायचे आहे.

मात्र गांधींचे आणि त्यांच्या विचारप्रवाहाचे जेवढे नुकसान त्यांच्या विरोधकांनी वा टीकाकारांनी केले नाही, तेवढे त्यांना दैवत मानणाऱ्या व स्वतःला गांधीवादी म्हणविणाऱ्या त्यांच्या ‘चेल्यांनी’ केले. त्यांचा उल्लेख जाणीवपूर्वकच अनुयायी असा येथे केला नाही. या चेल्यांत नेहरू-पटेलांचा, राजाजी-राजेंद्रबाबूंचा किंवा मौलानासरहद्द गांधींचा समावेश नाही. ते गांधींचे खरे अनुयायी होते आणि गांधींनी त्यांना दिलेले विचारांचे स्वातंत्र्य ते वापरतही होते. ते गांधींच्या आंदोलनात होते, त्यांच्यासोबत तुरुंगात होते, लढ्यात होते आणि शांततेतही होते. त्यांच्यासोबतची प्रशंसा अनुभवण्यात होते आणि त्यांच्यावर झालेले टीकेचे प्रहार अंगावर घेण्यातही होते. ती पिढी कधीचीच संपली आहे. पुढच्या काळात स्वतःला गांधीवादी म्हणविणारे आणि त्यांच्या विचारपरंपरेवर आपला हक्क सांगणारे, पण त्यांनी दाखविलेल्या सत्य व अहिंसेच्या मार्गाने जाणाऱ्या लोकलढ्यांकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवणारे जे लोक आले व अजून आहेत; त्यांनी गांधी आणि गांधीविचार यांचा पार खुळखुळा केला आहे. आचार्य विनोबांसोबत वा त्यांच्या मागून गेलेल्या, नुसतेच गांधींचे पंचे गुंडाळलेल्या पण गांधींनी केलेले वा दाखविलेले सगळे संघर्ष टाळून जगण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या लोकांनी गांधींना लोकांपासून केवळ दूरच नेले नाही तर लोकांच्या मनातील गांधींची प्रतिमाही त्यांनी पार दुबळी व विकृत करून टाकली. ‘मजबूरी का नाम महात्मा गांधी’ हे वचन त्यांच्याच आचार-विचारातून जन्माला आले. या माणसांना गांधी समजला नाही, तो त्यांना समजून घ्यायचा नव्हता की त्याचे अनुयायीत्व पेलणे त्यांच्या दुबळेपणाला जमणारे नव्हते- हाच काय तो त्यांच्याविषयी मनात येणारा प्रश्न आहे. हे लोक गांधींचे अनुयायी नव्हते, भक्तही नव्हते; ते त्यांच्या पुण्याईवर जमतील तेवढे दिवस आश्रितासारखे राहणारे होते व आहेत. त्यातील एखाददुसरा ज्ञानी माणूस वा कार्यकर्ता अपवाद म्हणून वगळला तरी बाकीचा कळप असा होता आणि आहे. गांधीजींच्या नावाने उभ्या असलेल्या कोणत्याही आश्रमात वा संस्थेत जाऊन तो कोणालाही पाहता येईल असा आहे. दीन दिसणारे, दुबळे असणारे आणि संघर्षाची साधी ठिणगीही अंगात नसणारे हे निस्तेज लोक खुद्द गांधींनीही कधी आपल्यासोबत घेतले नसते, असे आहेत.

एक गोष्ट त्यांच्याविषयीची आणखीही. गांधींना नेहरू भेटले, तेव्हा ते विशीतले होते. पटेल तिशीतले. मौलाना व राजेंद्रबाबूही त्याच वयातले. एकटे राजाजी सोडले तर गांधींचे सारे सहकारी व अनुयायी तरुण होते. नंतरच्या व आताच्या गांधीवाद्यांचा पार वृद्धाश्रम झाला आहे. त्यांच्याकडे तरुणाई फिरकत नाही आणि नवे वर्ग येत नाहीत, कारण त्यांच्याजवळ देण्याजोगे वा सांगण्याजोगे काही उरलेही नाही. गांधीजींच्या नावावर असणाऱ्या इस्टेटी सांभाळणारे काही व्यवस्थापक अजून मजेत आहेत, पण त्यांच्यात गांधी लवमात्रही नाही. त्या गांधींच्या विद्रूप बाहुल्याच तेवढ्या आहेत... हा असा कोसळ का झाला? हा वर्ग गांधींच्या काळातही होता. त्याचे निष्काम असणे व नुसतेच मिरविणे गांधींनाही कळत होते. विदर्भातील एका शहराला गांधीजींनी भेट दिली, तेव्हा त्याच्या नगराध्यक्षांनी शहराच्या सीमेवर त्यांचे स्वागत केले. त्यांनी घातलेला हार बाजूच्या सहकाऱ्याकडे देत गांधींनी त्यांना विचारले, ‘क्या करते हो?’ त्यांनी उत्तर दिले, ‘यहाँ का नगराध्यक्ष हूँ.’ त्यावरची गांधींची उपरोधिक प्रतिक्रिया होती, ‘वो आपका धंदा है क्या?’... याच शहरातील आणखीही एक गोष्ट गांधीजींचे माणसांविषयीचे डोळसपण सांगणारी म्हणून येथे नोंदवायची. त्या शहरातील गुजराती समाजाचे काही लोक त्यांना भेटायला त्यांच्या मुक्कामावर पोहोचले. त्यांनी गांधींना एक लाख रुपयांची थैली देण्याचे मनोगत त्यांच्याजवळ बोलून दाखविले. गांधींच्या कार्याला पैसा हवाच होता. त्यांनीही तो स्वीकारायला मान्यता दिली. पण आलेले लोक म्हणाले, ‘बापू, आमची एक अट आहे. तुम्ही आपल्या गुजराती समाजभवनात येऊन आमची थैली स्वीकारावी.’ गांधी म्हणाले, ‘पण मी गुजराती नाही, मी देशाचा आहे.’ त्यावर हिरमोड झालेले ते लोक परत गेले आणि त्यांनी ते पैसे गांधींना दिलेही नाहीत. मात्र गांधीजींनी त्यावरची आपली जी प्रतिक्रिया तिथल्या कार्यकर्त्यांजवळ बोलून दाखविली, ती गमतीची होती. ते म्हणाले, ‘या घटनेचा अर्थ एवढाच की, स्वराज्य जवळ आले आहे.’... ‘ते कसे?’ या त्यातल्या एकाने विचारलेल्या प्रश्नाला गांधीजींनी उत्तर दिले, ‘त्याखेरीज आमची माणसे एवढे पैसे त्यात गुंतवायला आली नसती.’

 गांधी माणसांध्ये रमणारा नेता होता. तसा तो माणसांना ओळखणारा पुढारीही होता. जेव्हा 1937 च्या निवडणुका जवळ आल्या, तेव्हा त्यांनी पक्षाला खडसावले होते- ‘पक्षाची तिकिटे मागून सरकारात जाणारे आपल्यातले अनेक जण मग सरकारीच होतात. ते जनतेची बूज राखत नाहीत. सत्तेचे मोह फार असतात. ती माणसांना भ्रष्ट बनविते. अशी माणसे पक्षापासून दूर ठेवा, अन्यथा एक दिवस मला आपल्याच माणसांविरुद्ध आंदोलन करावे लागेल...’

गांधी गेले आणि अशी माणसेही मोकळी झाली. मग त्यातल्या अनेकांनी इस्टेटी जमविल्या. काहींनी गांधींच्याच नावावर असणाऱ्या मालमत्ता ताब्यात घेतल्या. त्यांचा मग त्यांनी आतून बंदोबस्तही केला, बाहेरच्यांनी येऊन त्यात वाटा मागू नये म्हणून. गांधींच्या देशभरच्या संस्थांचे आताचे चित्र असे ‘आतून बंद’ असणारे आहे. सत्ताप्राप्तीनंतर काँग्रेस पक्षाचे लोकसेवा संघात विसर्जन करावे, ही त्यांची सूचना त्यांच्या याच दृष्टीतून आली होती. स्वातंत्र्यप्राप्ती हे देशासमोरचे गांधीकालीन ध्येय होते. त्याच्या प्राप्तीसाठी त्यांनी व त्यांच्यासोबतच्या साऱ्यांनी आपली ताकद पणाला लावली होती. हे स्वातंत्र्य लोकांच्या इच्छेतून व लढ्यातून यायचे होते. त्यामुळे या स्वातंत्र्याचीही लोकांविषयीची जबाबदारी मोठी होती... बंगाल प्रांतात 1942 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. तो बराचसा कृत्रिम व व्यापाऱ्यांनी घडवून आणला होता. त्यात 40 लाखांहून अधिक माणसे भुकेने तडफडून मेली. दर दिवशी म्युनिसिपालटीच्या मालमोटारी रस्त्यावर पडलेले उपाशी माणसांचे मृतदेह उचलून ते कलकत्त्याबाहेर नेत होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 मध्ये ओरिसाच्या कालाहांडी या कायम दुष्काळी समजल्या जाणाऱ्या आदिवासी प्रदेशात एक भूकबळी पडल्याची  बातमी आली. त्या वेळी घटना समितीतील काँग्रेसच्याच सभासदांनी नेहरूंना त्यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा मागितला. ‘देश स्वतंत्र आहे आणि तुम्ही त्याचे पंतप्रधान आहात. अशा वेळी देशाचा नागरिक उपासाने मरतो म्हणजे काय?’ असा त्यांचा नेहरूंना प्रश्न होता. त्याला शांतपणे उत्तर देत नेहरू म्हणाले, ‘मला या पदावर राहण्याची हौस नाही. पण तुमच्या मागणीतून प्रगटणारे एक महत्त्वाचे वास्तव मला हलवून गेले आहे. आठ वर्षांपूर्वी बंगालमधील दुष्काळात लक्षावधी माणसे मेली, तेव्हा कुणी कुणाचा राजीनामा मागितला नाही; कारण राज्य परक्यांचे होते. आज आपण स्वतंत्र आहोत आणि एका भूकबळीसाठी तुम्ही पंतप्रधानाला त्याचा राजीनामा मागत आहात. माझ्या मते, हे स्वातंत्र्याने माणसाच्या आयुष्याला दिलेले मोल आहे.’ नेहरूंना, पटेलांना व त्यांच्या सरकारातील काहींना समजलेले हे स्वातंत्र्याने दिलेले मोल त्या लढ्यातील आणखी किती जणांना समजले असेल?

काँग्रेसचे विसर्जन तेव्हाच्या अस्थिर राजकीय स्थितीत शक्य नव्हते. वर्षानुवर्षे स्वातंत्र्यासाठी लढून मिळालेली देशसेवेची संधी सोडायला त्या पक्षातले कोणी राजीही नव्हते. मात्र ते सारे स्वार्थाने लडबडले होते असे समजणे, हा अपराध आहे. काँग्रेसच्या तत्कालीन सरकारात असलेल्या प्रत्येकाने त्याच्या आयुष्याची किमान आठ ते अकरा वर्षे तुरूंगात घालविली होती. मात्र साऱ्यांनाच सरकारात घेणे शक्य नव्हते. अनेकांची तशी प्रकृतीही नव्हती. अशा मोठ्या व गांधीविचारांना वाहून घेतलेल्यांसाठी सर्वोदय संघाची (सर्व सेवा संघ) स्थापना करण्याचा निर्णय तेव्हाच्या नेतृत्वाने घेतला. त्यासाठी नेहरू-पटेल-राजेंद्रबाबू व राजाजी हे नेते सेवाग्रामला आले आणि विधायक लोकसेवेचा वसा घेतलेल्यांसाठी त्यांनी सर्व सेवा संघाची स्थापना केली. त्याची सूत्रे आचार्य विनोबांसारख्या नि:स्पृह व ज्ञानी माणसाकडे सोपविली गेली. विनोबांनी सर्वोदयाची व्याख्या दोन शब्दांत केली. ‘अध्यात्म आणि विज्ञान म्हणजे सर्वोदय’ असे ते म्हणाले.

विनोबांचा अधिकार मोठा होता. व्यक्तिगत सत्याग्रहाच्या आंदोलनात गांधींनी त्यांना पहिला सत्याग्रही निवडले होते. अध्ययन, आकलन, जगत्‌भाव व त्यासोबतच धर्म, तत्त्वज्ञान आणि जगभरच्या संस्कृती अशा विषयांचा त्यांचा अभ्यास व आवाका स्तिमित करणारा होता. माणसाच्या दानवृत्तीला आवाहन करण्याची त्यांची ताकदही फार मोठी होती. त्यांनी 1950 च्या सुमारास भूदानाचे आंदोलन हाती घेतले आणि त्यासाठी 42 हजार मैलांचा देशभरचा पायी प्रवास करण्याएवढे सामर्थ्य त्यांच्या लहानखुऱ्या देहात होते. त्यांच्या गांधीनिष्ठेचा, त्यागाचा व अधिकाराचा प्रभावच एवढा की- विनोबांना त्यांच्या भूदान चळवळीत 45 लाख एकर जमीन मिळविता आली. (केंद्र व राज्य सरकारांनी त्याच काळात देशात साडेचारशेवर जमीन धारणा कायदे केले, पण सरकारला त्यातून फक्त साडेचार लाख एकर जमीनच मिळविता आली. हे गणित विनोबांना साडेचार हजार कायद्यांएवढे मोठे बनविणारे आहे.)

मात्र विनोबांच्या विचारात व आचारात गांधीजींचा लोकसंघर्ष नव्हता. जनतेच्या प्रश्नासाठी प्राणपणाने पुढे होण्याची व प्रसंगी त्याची आहुती देण्याची तयारी नव्हती. वेदातल्या ऋषींना ऋचा दिसत तसे गांधींना लोकांचे प्रश्न दिसायचे. त्यांचे आव्हान त्यांना खुणावायचे. त्यांची उत्तरे शोधण्यात व ती सोडविण्यात मग ते सारी शक्ती पणाला लावायचे. गांधी लोकसंघर्षाचे सैनिक आणि सेनापती होते. कोणत्याही आव्हानासमोर प्रतिआव्हानाच्या रूपाने उभे राहण्याची जिद्द त्यांच्यात होती. त्यांच्या नेतृत्वात झाला तेवढा मोठा लोकसंघर्ष जगाच्या इतिहासात पूर्वी कधी कोठे झाला नाही. गांधी व विनोबा यांच्यातला मूलभूत फरक हा की, गांधी हे संघर्षाचे तर विनोबा हे समन्वयाचे प्रतिनिधी होते. संघर्षाला गांधी सामोरे जात, संघर्षाच्या जागा टाळून विनोबा पुढे जात. त्यांना संघर्ष न आवडण्याचे एक कारण देशात स्वकीयांची सत्ता होती हे, आणि ज्यांच्याविरुद्ध लढायचे ती माणसेही आपलीच होती, हे. संघर्ष आणि समन्वय या दोन संकल्पनांधून गांधी व विनोबा यांच्यातील वेगळेपण पाहता येईल. गांधींच्या मार्गाने जाऊ न शकणाऱ्या अनेकांनी मग विनोबांच्या समन्वयाचा संघर्षशून्य मार्ग पत्करला. विनोबांच्या चष्म्यातून आणि त्यांच्या आचार-विचारातून गांधी समजून घेण्याचा व समजून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. गांधींनी संघर्ष कधी टाळला नाही आणि विनोबांनी संघर्ष कधी केला नाही. ते संघर्षाच्या प्रश्नांना वळसा घालून आपली वाटचाल करीत राहिले. समन्वयी विनोबांमधून गांधींकडे पाहिले की, त्यांच्यातला संघर्षच दिसेनासा होतो. आणि संघर्षावाचून दुसऱ्या कोणत्याही व्यवहाराचे आकर्षण तरुणांना वाटत नाही. गांधींच्या शिकवणुकीपासून तरुणांचा वर्ग दूर होण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. संघर्षावाचूनचा गांधी हा नुसताच सूत कातणारा, शरीरश्रम करणारा आणि  शांतीचा उपदेश करणारा संत असतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जनशक्ती उभी करून लढणारा, तुरुंगात जाणारा आणि त्यासाठी प्राण पणाला लावणारा गांधी मग दिसत नाही... गांधी तरुणांचा आणि त्यांच्या सळसळत्या रक्ताचा नेता होता. विनोबा हे त्यांच्या अनुयायांचे पुढारीच तेवढे राहिले.

 विनोबांबाबत एक-दोन गोष्टी आणखीही येथे नोंदविण्याजोग्या. ते गांधींचे पूर्णावतार नव्हते. असलेच तर ते त्यांचा अंशावतार होते. विनोबांना गांधी पूज्य होते, पण गांधींचा सत्याग्रह त्यांना मान्य नव्हता. त्या सत्याग्रहाचा अर्थही त्यांनी अध्यात्माच्या परिभाषेत मांडला. ‘सत्य म्हणजे ब्रह्मसत्य आणि सत्याग्रह म्हणजे त्या अंतिम सत्याची आराधना’ अशी त्यांची धारणा होती. हा प्रकार जमिनीशी असलेला गांधींच्या सत्याग्रहाचा संबंध तोडणारा आहे. विनोबांचा सत्याग्रह अध्यात्माच्या आणि अंतरिक्षाच्या पातळीवरचा, तर गांधींचा या देशाच्या भूमीवरचा आहे.

काँग्रेसचे विसर्जन करा, असा सल्ला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्या पक्षाच्या नेत्यांना गांधींनी दिला होता. विनोबांचे काँग्रेसप्रेम मात्र कधी कमी झाले नाही. त्यांच्या मनातील सर्वधर्मसमभावामुळे असेल वा सेवाधर्माच्या श्रेष्ठते- विषयीच्या त्यांच्या श्रद्धेुळे असेल; त्यांनी याविषयी लिहिल्याचे वा बोलण्याचे टाळले. तरीही 1964 मध्ये, नेहरूंच्या मृत्यूनंतर काहीशा निराश झालेल्या काँग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेले तेव्हा विनोबा म्हणाले, ‘आता नेहरू नाहीत, तुमची बैलजोडीही उधळली आहे. मी एकटा तुम्हाला कुठवर साथ देणार?’

दुसरा प्रसंग 1975 च्या आणीबाणीच्या काळातला. साऱ्या देशाचा तेव्हा तुरुंग बनला होता. विनोबांचे अनुयायीत्व पत्करताना आपली जुनी समाजवादी निष्ठा बाजूला ठेवणारे व साऱ्या बिहारचे अखंड दान त्यांच्या झोळीत टाकणारे जयप्रकाश नारायण त्या काळात तुरुंगात होते. देशावरील त्या स्वदेशी दमनचक्राबाबत विनोबा काही मत व्यक्त करतील अशी आशा तुरुंगातल्या आणि तुरुंगाबाहेरच्या लोकांनी बाळगली होती. मात्र तेव्हा पवनारमध्ये आयोजित केलेल्या गांधीवादी कार्यकर्त्यांच्या सभेत बोलताना विनोबांनी आणीबाणीची तुलना महाभारतातील अनुशासनपर्वाशी करून तिची प्रशंसा केली. त्या सभेला आलेले बिहारचे प्रतिनिधी तो सभामंडप सोडून तत्काळ बाहेर पडले. तुरूंग निराश झाले आणि देशही हताश झाला. नंतरच्या काळात जयप्रकाश त्यांना भेटले. पण तोवर विनोबाच देशाच्या मनातून उतरले होते. आचार्य दादा धर्माधिकारींसारख्या अनेक सर्वोदयी कार्यकर्त्यांनी त्या काळात जयप्रकाशांना साथ दिली. पण सर्व सेवा संघ मात्र त्या अनुशासनपर्वाची गोळी गिळून गप्पच राहिला.

भारतात वकिलीचा जम बसत नव्हता म्हणून गांधी आफ्रिकेत गेले. अशा मन:स्थितीतील कोणताही माणूस प्रथम आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करील. पण गांधींना तिथल्या भारतीयांची दुरवस्थाच प्रथम दिसली. तिथल्या खाणकामगारांच्या यातनांनी त्यांना खुणावले. भारतीयांवर लादलेले विशेष कर, त्यांना नाकारला जाणारा सामाजिक सन्मान, धनवंत असो वा गरीब- त्यांचा गौरवर्णीयांकडून पदोपदी होणारा अपमान याच गोष्टी त्यांना व्यथित करीत होत्या. दक्षिण आफ्रिका हीदेखील भारतासारखीच ब्रिटिशांची वसाहत होती. मग हे साम्राज्य आपल्याच दोन प्रजाजनांना अशी वेगळी व विषम वागणूक का देते, या प्रश्नाने भंडावलेले गांधी व्यवसाय बाजूला ठेवून तेथील भारतीयांच्या हक्कासाठी साम्राज्याशी लढा द्यायला तयार झाले. त्यासाठी त्यांनी लाठीमार सहन केला, तुरुंगवास भोगला आणि जीवावरचे प्राणघातक हल्लेही अनुभवले.

बोअर युद्धात ब्रिटिश सैनिक जखमी होत, तेव्हा त्यांच्यासाठी शुश्रूषेचे पथक उभारायची त्यांना इच्छा झाली. अनेक जखमी सैनिकांना कधी स्ट्रेचरवर, तर कधी खांद्यावर घेऊन त्यांनी कित्येक मैलांच्या वाऱ्या केल्या. त्यांच्या या भोगात कस्तुरबाही सामील होत्या... भारतात येऊनही त्यांनी तोच वसा पुढे चालविला. त्यांना चंपारण्यातील निळीच्या शेतकऱ्यांच्या करुण कहाण्यांनी तिथे नेले. त्यांच्यासोबत राहून व त्यांचे न्यायालयीन लढे लढवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते झटले. भंगीमुक्तीसाठी, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी, स्त्रियांच्या सबलीकरणासाठी आणि कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठीही ते भारतात सातत्याने परिश्रम करीत राहिले. त्यांना दिसणारे प्रश्न गांधीवादी म्हणविणाऱ्या इतरांनाही दिसतच होते. तेव्हा आणि आताही ते प्रश्न तसेच आहेत. दारिद्य्र होते आणि आहे. विषमता, दलितांवरील अन्याय, आदिवासींची लूट, अल्पसंख्याकांचा संकोच, स्त्रियांच्या हाल-अपेष्टा, शेतकऱ्यांचे हाल व कुपोषण या बाबी तेव्हा होत्या आणि आजही आहेत. पण त्या गांधींना दिसल्या तशा गांधीवादी म्हणविणाऱ्या नंतरच्या लोकांना दिसल्या नाहीत.  

प्रत्येक प्रश्न वेगळा व त्याची उत्तरेही वेगळी असतात. सर्व प्रश्नांवर स्वातंत्र्य हा एकच रामबाण उपाय आहे, असे गांधींना वाटले नाही. प्रत्येक वर्गासाठी व प्रत्येक व्यथेसाठी त्यांच्याजवळ वेगळ्या योजना होत्या आणि ते त्यांच्या पद्धतीने त्या राबवीत होते. विनोबा आणि त्यांच्या अनुयायांना मात्र भूदान हेच सर्व सामाजिक रोगांवरचे एकमेव औषध आहे, असे मग का वाटले? त्यांना गांधी समजला नाही, की समजून घेतल्यानंतरही त्यांची बहुविध दृष्टी आणि एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या अंगावर घेण्याचे सामर्थ्य त्यांना पेलता आले नाही? आपल्या राजकीय हक्कांसाठी सामान्य लोक संघटित होतात आणि सत्तेविरुद्ध लढा देतात, अशी फार थोडी उदाहरणे जगाच्या इतिहासात आहेत. इंग्लंडमधील उमराव व वरिष्ठ वर्गाने राजकीय हक्कांसाठी पहिला जेम्स या राजाविरुद्ध एकत्र येऊन असा लढा 1215 मध्ये दिला. त्यात पराभूत झालेल्या राजाकडून त्यांनी जनतेसाठी एक हक्कांची सनद (मॅग्ना चार्टा) मागून घेतली. कायद्याच्या आधाराखेरीज कुणालाही अटक केली जाणार नाही, हा महत्त्वाचा अधिकार त्यातून जनतेला मिळाला. जेम्सच्या पश्चात त्याचा मुलगा चार्ल्‌स याने या हक्कांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्याविरुद्ध पुन्हा एक लोकलढा उभा राहिला. त्यात पराभूत झालेल्या राजाला लोकांनी सरळ फासावर लटकावले. अशा लोकलढ्याचे एक अतिशय अभिमानास्पद उदाहरण महाराष्ट्राच्या इतिहासात आहे. शिवरायांचा मृत्यू 1680चा. संभाजीराजांचा शेवट 1691चा. नंतर राजाराम जिंजीला जातात आणि मराठ्यांना राजा नसतो, सेनापती नसतात. वेळेवर मिळणारे वेतन नसते आणि मागे वळून लपायला किल्ले उरले नसतात. त्या स्थितीत महाराष्ट्रातले गरीब मावळे 1691 पासून 1707 पर्यंत समोर उभ्या असलेल्या औरंगजेबाच्या सहा लाख सैनिकांशी नेटाने लढत राहतात. अखेर औरंगजेब मरतो आणि मराठ्यांचा विजय होतो. या लढाऊ मावळ्यांना नेतृत्वावाचून 17 वर्षे लढत राहण्याची शिवरायांची प्रेरणा देत असते, हा लोकलढ्यातील भारताचा वाटा. त्यानंतरचा लोकलढा गांधींचाच. ते राजा व सेनापती नसतानाचा. हाती शस्त्र नसलेल्यांचा आणि तोही जगातील सर्वांत मोठ्या साम्राज्यसत्तेविरुद्धचा. तोवरचा आपला इतिहास राजे-रजवाड्यांचा, त्यांच्या लढायांचा आणि तहांचा. राज्ये मोठी होण्याचा किंवा जमीनदोस्त होण्याचा. भारताच्या इतिहासात जनता कधी कुठे दिसत नाही. भारतीय जनतेचा इतिहास गांधींपाशी सुरू होतो. ते चंपारण्यातल्या शेतकऱ्यांना योद्धे बनवितात, बारडोलीच्या दुष्काळपीडितांचे सैन्य बनवितात आणि एक दिवस सारा देशच त्यांची सेना होऊन स्वातंत्र्यासाठी लढताना दिसतो.

आपल्या पुराणात शालिवाहन राजाची एक कथा आहे. तो म्हणे, मातीच्या बाहुल्या बनवायचा आणि त्या विहिरीत टाकायचा. लोक विचारायचे, हे का? तर तो म्हणायचा, एक दिवस यांचा चमत्कार तुम्हाला दिसेल. जेव्हा त्याच्या राज्यावर शत्रूंनी आक्रमण केले, तेव्हा शालिवाहनाने या बाहुल्यांत प्राण फुंकले आणि त्यातून उभ्या झालेल्या सैन्याने शत्रूवर मात केली. गांधींचा चमत्कार असा आहे. तोवर सत्तेशी कधीही झुंज न देणाऱ्या माणसांच्या आयुष्यात त्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा फुंकली आणि ही माणसेच त्यांची सैनिकशक्ती होऊन त्यांच्या पाठीशी उभी राहिली. प्रेरणा गांधींना देता येते, त्यांच्या नावावर जगणाऱ्या परप्रकाशितांना ती कशी देता येईल?

गांधींना दिसणारे प्रश्न त्यांच्या सर्वोदयी म्हणविणाऱ्या सहकाऱ्यांना दिसत नव्हते काय? की नेत्यानेच सारे पाहायचे आणि करायचे, आपण त्याच्यामागून नुसतेच वारकऱ्यासारखे जायचे- अशी त्यांची धारणा असते? लोकमान्यांना पूर्व बंगालमधील मुस्लिम विणकरांच्या वाट्याला आलेले निकृष्ट जिणे व उपासमार महाराष्ट्रात खुणावत होती. त्यांच्या अवस्थेवर त्यांनी लेखमाला लिहिली, तेव्हा तेथील मुसलमानांनी लोकमान्यांना बोलावून त्यांचा जाहीर सत्कार केला. त्यात त्यांना ते ‘बडे दादा’ म्हणाले. लोकमान्यांना जे दिसले, ते बंगालमधील इतर काँग्रेस नेत्यांना वा त्यांच्या सहकारी संघटनांना का दिसले नसावे? प्लेग टिळकांना दिसतो, कुष्ठरोग गांधींना खुणावतो; दलित-पीडित आणि स्त्रिया यांची दुःखे त्यांना दिसतात तशी ती इतरांना का दिसली नसावीत?

गांधींच्या नेतृत्वात भारतात झालेला लोकलढा हा जगाच्या इतिहासातील सर्वांत मोठा होता. त्यांना जेवढे सैनिक लाभले, तेवढे इतिहासात दुसऱ्या कोणत्याही राज्यकर्त्याला व नेत्यालाच नाही तर ईश्वर व धर्म संस्थापकांनाही त्यांच्या हयायीत लाभले नाहीत. बुद्धाच्या भिक्षू संघात किती माणसे होती? येशूच्या अखेरच्या काळात त्याच्यासोबत 12 अनुयायी होते. त्यातलाही एक शेवटी फितूर निघाला. रामकृष्ण किंवा आणखी कोणालाही गांधींएवढे लोकलढ्याचे सैनिक लाभले नाहीत. त्यातून हे  सैनिक निःशस्त्र होते. शस्त्रावाचून विजयी होण्याची प्रेरणा घेतलेले होते. गांधींनी 1942 च्या ऑगस्ट महिन्यात चले जावचा नारा देऊन जगातले सर्वांत मोठे लोकआंदोलन भारतात उभे केले. हे आंदोलन नेतृत्वावाचून झाले. आंदोलनाची घोषणा होताच ब्रिटिश सरकारने गांधी, नेहरू, पटेल, आझाद यांच्यासह काँग्रेस कार्यकारिणीतील सर्व नेत्यांना अटक करून तुरुंगात डांबले. पुढचा लढा जनतेने चालविला. हा लढा प्रामुख्याने शांततामय होता. मात्र काही जागी त्याला हिंसक वळणही लागले. या लढ्यात लोकांनी साडेपाचशेहून अधिक पोलीस ठाणी उद्‌ध्वस्त केली. चारशेहून अधिक रेल्वे स्थानकांचा विध्वंस केला. सरकारने त्यातल्या लाखांहून अधिक लोकांना अटक करून बंदिवान केले. मात्र हा लढा तेवढ्यावरही चालत राहिला. जगातल्या सर्वांत मोठ्या व बलाढ्य सत्तेशी निःशस्त्र माणसे प्राणार्पणाच्या भावनेने प्रेरित होऊन असा लढा देतात, ही गोष्ट त्या वेळी जगाने प्रथम पाहिली. या लढ्याने इंग्लंडएवढेच अमेरिकेच्या सरकारलाही हादरून सोडले. या वेळी इंग्लंडच्या पंतप्रधानपदावर असलेले चर्चिल यांनी ‘साम्राज्याच्या विसर्जनाचे अध्यक्षपद भूषवायला मी प्रधानमंत्री झालो नाही’ असे उद्दाम उद्‌गार त्याही वेळी काढले. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांच्या दबावाखाली ते भारतीय जनतेशी व तिच्या नेत्यांशी आपल्या प्रतिनिधींमार्फत बोलायला राजी झाले. त्याचसाठी त्यांनी भारतात सर स्ट्रॅफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ भारतात पाठविले. हे मंडळ देशाला द्यावयाच्या स्वातंत्र्याची योजनाच हाती घेऊन येथील नेत्यांना भेटले.

गांधींच्या आयुष्यातील सर्वांत मोठी बाब, उपलब्धी आणि मोठेपण त्यांनी उभ्या केलेल्या या लोकसंघर्षात होते. असा लोकसंघर्ष उभा करायचा, तर त्याची प्रेरणा देणारा माणूस फार मोठा असावा लागतो. त्याच्या शब्दांत मंत्राचे सामर्थ्य असावे लागते. गांधींच्या शब्दांत हे सामर्थ्य होते आणि ते त्यांनी समाजासाठी आयुष्यभर केलेल्या त्यागातून व सत्याच्या मार्गावरून केलेल्या वाटचालीतून मिळविले होते. स्वतःला गांधीवादी म्हणविणाऱ्यांनी हा लोकसंघर्ष वजा करून गांधी स्वीकारला आणि तेवढाच तो लोकांना सांगितला. तो खरा नव्हता आणि लोकांना आवडणाराही नव्हता. अनुयायांनी नेतृत्वाचा केलेला असा दारुण पराभवही इतिहासात दुसरा नसावा.

बर्नार्ड शॉने एक मजेशीर गोष्ट यासंदर्भात लिहिली आहे. परमेश्वराने महापुरुष घडवायचे ठरविले आणि तसे ते सर्व सद्‌गुणांनिशी तयारही केले. पण महापुरुषही शेवटी माणूसच असतो आणि माणसांत दोषही असतातच. त्यामुळे महापुरुषांचे माणूसपण दाखवायला त्याच्यातही काही दोष टाकणे ईश्वराला आवश्यक वाटले. तेवढ्यासाठी त्याने त्या महापुरुषांना अनुयायांचे वर्ग चिकटवून दिले.

 येथे आणखीही एका महत्त्वाच्या बाबीचा उल्लेख केला पाहिजे. गांधीवाद या नावाचा कोणताही वाद अस्तित्वात नाही व नव्हता. गांधींनी त्यांच्या वैचारिक बैठकीची सूत्रबद्ध मांडणी कधी केली नाही. त्या विचारांशी बांधील राहण्याच्या प्रतिज्ञा आपल्या अनुयायांना त्यांनी कधी घ्यायला लावल्या नाहीत. गांधी हा काळानुरूप बदलत गेलेला आणि सदैव कालसंगत व लोकसंगत राहिलेला विचारप्रवाह आहे. विचार जोपर्यंत प्रवाही असेल तोपर्यंत त्याचा वाद होत नाही. त्याला पूर्णविराम दिला वा मिळाला, तरच त्याचा वाद होतो. जोवर सत्याचा आग्रह, अहिंसेचे समर्थन, लोकसेवेचे व्रत, स्वातंत्र्याची मागणी, समतेसाठी धडपड, बंधुत्वाचे आवाहन आणि न्यायाचे आकर्षण समाजात राहील, तोवर गांधीही त्याच्यासोबत राहणार आहे. या मूल्यांचे आग्रह कधी संपणार नसल्याने गांधीजी अमरही राहणार आहेत...

गांधींच्या विचारात नवे काय, असा प्रश्न अनेकांना अशा वेळी पडणार आहे. सत्याचा आग्रह वा अहिंसेची वाट जुनीच आहे. गांधींनीच सॉक्रेटिसला जगातला पहिला सत्याग्रही म्हटले. तो सनपूर्व 300 वर्षांआधीचा. अहिंसेची देन महावीर व बुद्धाची. ती सनपूर्व 600 वर्षांची. मनुष्यधर्माचा त्यांचा आग्रह प्रत्येक शतकातच नव्हे, तर जगात सर्वत्र धरला गेला... जी मूल्ये सार्वत्रिक आणि सर्वकालिक असतात, त्यांनाच सनातनी म्हटले जाते. गांधी स्वतःला सनातनी म्हणायचे. सबब- ते सार्वत्रिक आहेत आणि सर्वकालीनही राहणार आहेत. वर्ग, समूह, जात, धर्म, पंथ वा देश यांच्याविषयीचे विचार स्वतःसोबतच आपली कालबद्धता घेऊन येतात. गांधींना या मर्यादांनी कधी बाधित केले नाही. ते वैश्विक होते, आहेत आणि राहणारही आहेत. त्याचमुळे गांधी सर्वत्र आहेत, गांधीवादी मात्र त्यांच्या आश्रमांच्या कुंपणात अडकून राहिले आहेत.

Tags: सुरेश द्वादशीवार गांधी आणि त्यांचे टीकाकार Gandhi Gandhi aani tyanche tikakar Suresh Dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात