डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आतापर्यंतच्या राजकीय खेळीपायी जुने व ज्येष्ठ नेते बाजूला गेले आणि नको त्या नेत्याचे ओझे खांद्यावर घेणे भाग पडले, अशी आताची संघाची मानसिकता आहे. आता मोदींना मागे घेता येत नाही आणि त्यांच्या डोक्यावर दुसऱ्या कोणाला आणून बसविताही येत नाही; शिवाय मोदी आपल्या ताब्यात राहण्याची शक्यताही फारशी नाही, ही संघाची गोची आहे. मोदींचे हात बांधण्याचे आताचे त्याचे डावपेच या कोंडीतून  स्वतःला बाहेर काढण्यासाठी आहेत.-

                            

नरेंद्र मोदी हे संघासाठी धरता न येणारे आणि सोडताही न येणारे प्रकरण आहे. (संघाचा उल्लेख केला की, भारतीय जनता पक्षाचा वेगळा उल्लेख करण्याचे कारण नाही. त्या पक्षाशी असलेले संघाचे जैविक संबंध आणि त्यावरचे त्याचे नियंत्रण पाहिले आणि ‘जो भाजपचा तो संघाचाही’ हे त्याच पक्षाच्या एका तरुण पुढाऱ्याचे वचन लक्षात घेतले की, तसे करण्याचे कारण साऱ्यांना समजावे.) संघाला मोदींचा भाजपतील आजच्याएवढा उदय मानवणारा नाही. तो होऊ नये एवढ्याचसाठी संघाने नितीन गडकरींना भाजपचे अध्यक्षपद देण्याची खेळी करून पाहिली. गडकरींना ते पद सोडावे लागल्यानंतर संघाने राजनाथ सिंहांना त्या जागेवर आणण्याचे राजकारणही त्याचसाठी केले. तसे करताना लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आणि जसवंत सिंहांसारखे त्या पक्षाचे जुने नेते अडगळीत टाकण्याची जोखीमही त्याने पत्करली.

मात्र संघाच्या या डावपेचांचा परिणाम त्याच्यावरच उलटून त्याला मोदींना आता मुकाट्याने मान्यता देणे भाग पडले आहे. अडवाणी वापरून झाले आणि त्यानंतरचे दुसरे नेते वापरावेत, असे नाहीत, म्हणून आता मोदींचे प्यादे पुढे करून देशाची सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करून पाहायचा, हा संघाचा हेतू आहे. मात्र अडवाणी, गडकरी आणि राजनाथ ही संघशासित आणि संघनियंत्रित माणसे आहेत; तसे मोदी नाहीत. मोदींची संघनिष्ठा खोटी नसली, तरी ती त्यांच्या स्वतःवरच्या निष्ठेएवढी मोठीही नाही. संघाचे अनेक आदेश मोदींनी बाजूला सारल्याची व आपलेच राजकारण पुढे रेटल्याची उदाहरणे अलीकडच्या काळात देशाला दिसली आहेत. संघाने दिलेल्या आदेशानुसार भाजपने बोलविलेल्या नेत्यांच्या बैठकीपासून स्वतःला दूर ठेवणे, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क न राखणे आणि आपली वाट वेगळी व स्वतंत्र आहे, ही बाब दर वेळी अधोरेखित करीत राहणे, हे मोदींचे वर्तन संघशिस्तीत न बसणारे आणि संघाच्या आज्ञाधारक स्वयंसेवकांपासूनचे वेगळेपण सांगणारे आहे. नेमकी हीच बाब संघाला न मानवणारी आहे.

आतापर्यंतच्या राजकीय खेळीपायी जुने व ज्येष्ठ नेते बाजूला गेले आणि नको त्या नेत्याचे ओझे खांद्यावर घेणे भाग पडले, अशी आताची संघाची मानसिकता आहे. आता मोदींना मागे घेता येत नाही आणि त्यांच्या डोक्यावर दुसऱ्या कोणाला आणून बसविताही येत नाही; शिवाय मोदी आपल्या ताब्यात राहण्याची शक्यताही फारशी नाही, ही संघाची गोची आहे. मोदींचे हात बांधण्याचे आताचे त्याचे डावपेच या कोंडीतून  स्वतःला बाहेर काढण्यासाठी आहेत. मोदींची भाजपच्या प्रचारप्रमुखपदावर नियुक्ती झाली असली तरी ती पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची पहिली पायरी नाही, हे त्याचमुळे त्या परिवाराला स्पष्ट करणे भाग पडले आहे. तेवढ्यावर न थांबता मोदींना हवा असलेला प्रचारकांचा चमू त्यांना नेमू न देण्याचे राजकारण नागपुरातील संघाच्या मुख्यालयात अलीकडेच आखले गेले. त्यासाठी लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आणि राजनाथ सिंहांसारखे भाजपचे वरिष्ठ नेते नागपुरात दाखल झाले. या बैठकीत मोदींच्याभोवती प्रचारकांचा एक वजनदार व नियंत्रक चमू देण्याचे आणि त्याची मान्यता मोदींच्या प्रत्येक हालचालीला आवश्यक करण्याचे ठरविले गेले. या बैठकीत मुरलीमनोहरांनी पुढे आणलेला एक मुद्दा या संदर्भात आणखी महत्त्वाचा होता.

भाजपतर्फे निवडणूक लढविण्यासाठी (व जमलेच तर सत्तेतील पद घेण्यासाठी) नेत्यांवर वयोर्यादेची अट लादली जाऊ नये, असे मुरलीमनोहरांचे म्हणणे होते आणि ते अडवाणींना आवडणारेही होते. अडवाणींना पक्षाध्यक्षपदावरून बाजूला सारताना संघाने 2009 मधील त्यांच्या नेतृत्वात पक्षाच्या झालेल्या पराभवाचे कारण पुढे न करता त्यांच्या वाढीव वयाचे निमित्त सांगितले होते, हे या संदर्भात महत्त्वाचे.

मुरलीमनोहरांचा आग्रह राखला गेला तर अडवाणी 2014 च्या निवडणुकीत राहतील आणि मिळालीच तर तीत उद्या मिळू शकणाऱ्या सत्तेतही राहतील, हे स्पष्ट झाले. हा सारा मोदींना आळा घालण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे. मोदींची चढण अडवाणींएवढीच मुरलीमनोहरांनाही आवडलेली नाही. जसवंत सिंह, यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या नेत्यांचा तर त्यांच्या नावाला उघडच विरोध आहे. शिवराजसिंह चौहानांना ते आपले प्रतिस्पर्धी वाटतात आणि नितीन गडकरी यांच्याशी त्यांचे बोलणेही मध्यंतरी थांबले होते. शिवाय संघाला मोदींच्या असलेल्या ॲलर्जीची जाणीवही या साऱ्यांना आहेच. या साऱ्या पार्श्वभूमीवर मोदींचा असा बंदोबस्त करण्याचा संघाचा हा प्रयत्न आहे... एक प्रश्र्न येथे संघाबाहेरच्यांसाठी... जो नेता संघालाच डोईजड वाटतो, तो देशाच्या डोक्यावर बसविण्याचा त्याचा हा घाट कशासाठी?

गोविंदाचार्य या भारतीय जनता पक्षाच्या माजी सरचिटणीसाने अटलबिहारी वाजपेयी यांना ते देशाचे पंतप्रधान असताना आपल्या पक्षाचा मुखवटा म्हटले होते. तो मुखवटा सैल असल्याने व तो संघाच्या नियंत्रणाबाहेर असल्याने त्यामागच्या चेहऱ्याला होत असलेल्या त्रासाची ती अभिव्यक्ती होती आणि ती खरी होती. वास्तव हे की, सारा भारतीय जनता पक्ष हाच संघाचा राजकीय मुखवटा आहे. गोविंदाचार्यांनी वाजपेयींना मुखवटा म्हटले, तेव्हा त्यांना अडवाणींना चेहरा म्हणायचे होते आणि ते अडवाणींनाही खरे वाटत होते. संघाने अडवाणींनाच अडगळीत टाकल्यानंतर आपले मुखवटेपण आता त्यांच्याही लक्षात आले असणार. त्यांची संघनिष्ठा वाजपेयींहून कडवी व जबर असल्याने आपली व्यथा ते बोलून दाखवीत नसले, तरी त्यांचे आताचे त्याविषयीचे मौन त्यांची दयनीयता उघड  करण्याएवढे बोलके आहे... वाजपेयी आणि अडवाणी हेच मुखवटे असतील आणि संघाला ते एवढ्या सहजपणे उतरवून अडगळीत टाकता येणार असतील; तर त्यांच्या पक्षातील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फळीतल्या लोकांची त्याच्या लेखी किंमत किती असेल?....

ते शहानवाज आणि नक्वी त्यांच्या खिजगणतीत तरी असतील काय? या माणसांना संघाच्या लेखी असलेल्या मोलाला इतरांनी महत्त्व देण्याचे अर्थातच कारण नाही.. आपल्यासमोर यातून उभा होणारा प्रश्र्न वेगळा, मोठा आणि राष्ट्रीय आहे.

सन 1951 मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी या हिंदू महासभेच्या नेत्याला हाताशी धरून संघाने जनसंघाची स्थापना केली. तो पक्ष 1977 मध्ये जयप्रकाशांच्या जनता पक्षात विलीन झाला आणि 1980 मध्ये भारतीय जनता पक्ष हे नवे नाव घेऊन त्यातून बाहेर पडला. त्याच्या या नव्या अवतारासोबत जयप्रकाशांच्या पक्षात काही संघाबाहेरून आलेली माणसेही चिकटून आली. या नव्या अभ्यागतांना त्या पक्षात आपल्याला वजन असेल, असे तेव्हा वाटले. मात्र त्या पक्षाचे मूळ स्वरूप आणि संघाचे त्याच्याशी असलेले जैविक संबंध त्यांच्या लक्षात जसजसे येऊ लागले तसतसे त्यांना आपले त्यातील उपरेपणही जाणवू लागले. त्यांपैकी ज्यांच्याकडे स्वतःचे बळ नव्हते, ती माणसे मग आपली उपेक्षा पचवीत त्यात राहिली. ज्यांना ते जमले नाही, त्यांनी कधी जसवंत तर कधी जेठमलानी होऊन पाहिले. ज्यांना स्वबळावर काही करणे जमणारेच नव्हते, त्यांनी मग प्रथम पक्षाचे व मग संघाचेही झेंडेकरी होणे पत्करले. अशा झेंडेकऱ्यांची नावे साऱ्यांना बऱ्यापैकी ठाऊक असल्याने येथे ती वेगळी नोंदविण्याचे कारण नाही... मात्र यातून उद्‌भवणाऱ्या वर उल्लेखिलेल्या राष्ट्रीय प्रश्र्नाचे खरे स्वरूप साऱ्यांना गंभीरपणे विचार करायला लावणारे आहे.

लोकसभेच्या 2014 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या नेतृत्वात उभ्या असलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी कुणासाठी मत मागणार आहे? भाजपने त्या आघाडीला दिलेल्या नेत्यासाठी की संघाने भाजपमार्फत त्या आघाडीच्या गळ्यात बांधलेल्या पुढाऱ्यासाठी? ते मत भाजपसाठी मागितले जाणार असले तरी ते प्रत्यक्षात संघाला मिळणारे असेल. त्या स्थितीत उद्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता देशात आलीच, तर तिच्यावर नियंत्रण त्या आघाडीचे असेल, भाजपचे असेल की संघाचे असेल? संघ भाजपवर तेव्हाही आजच्याएवढेच नियंत्रण राखणार असेल, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मत म्हणजे भाजपला मत, म्हणजेच संघाला मत ठरणार आहे. त्यातून संघ ही एकचालकानुवर्ती संघटना आहे. तीत सगळे निर्णय तिच्या प्रमुखांकडून म्हणजे सरसंघचालकांकडून घेतले जातात. त्यामुळे 2014च्या निवडणुकीत भाजप व रालोआ मतांचा जो जोगवा जनतेकडे मागणार आहे, तो प्रत्यक्षात मोदींसाठी (की भाजपच्या दुसऱ्या कुणा नेत्यासाठी) असेल की भागवतांसाठी असेल- हा यातला कळीचा आणि उद्याचा प्रश्र्न आहे.

संघ ही सांस्कृतिक संघटना असून ती धर्मजागरणाचे काम करते, तिचा राजकारणाशी काहीएक संबंध नाही- ही गोष्ट तिचे नेते आजवर समाजाला सांगत आले. प्रत्यक्षात ती तशी कधी नव्हतीच. तिचे राजकीय असणे 1960च्या दशकात काहीसे उघड झाल्याचे दिसले. मात्र ते तसे दिसत असतानाही ती राजकीय नाही, असाच देखावा तिच्या पुढाऱ्यांनी व स्वयंसेवकांनी उभा केला. शिवाय ते तसे साऱ्यांना सांगतही राहिले. गंमत ही की, असे करताना आपण दुसऱ्या कोणाची फसवणूक करीत नसून स्वतःलाच फसवीत आहोत, हेही त्यांतल्या अनेकांनी कधी लक्षात घेतले नाही. बाळासाहेब देवरसांच्या पश्चात सरसंघचालकाच्या पदावर आलेली माणसे उघडपणे राजकारण बोलू व करू लागली. त्याही काळात तिचे सांस्कृतिक असणेच तिच्याशी संबंध असणाऱ्यांकडून सांगितले गेले. आता तो सारा प्रकार इतिहासजमा होऊन संघ सरळसरळ राजकीय बनून राजकारणात उतरला आहे. भाजपच्या माध्यमातून राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर व त्या आघाडीचा वापर करून देशाच्या राजकारणावर स्वार होण्याचा त्याचा आताचा प्रयत्न उघड आहे. नागपूरच्या संघ कार्यालयात भाजपच्या पुढाऱ्यांनी हजेरी लावणे, त्या पुढाऱ्यांतील भांडणे सोडविणारे आदेश संघाकडून दिले जाणे आणि अमरावतीत होत असलेल्या संघाच्या मंथन बैठकीला राजनाथ सिंहांपासून मोदींपर्यंतच्या साऱ्यांनी हजेरी लावणे, हा आताचा प्रकार पूर्वी नव्हता. संघाने आपली सांस्कृतिक कात टाकली असल्याचे व तो आपल्या खऱ्या राजकीय स्वरूपात उभा झाल्याचे हे चित्र आहे. ते अजूनही ज्यांना राजकीय न वाटता सांस्कृतिक वाटते, त्यांच्या झोपेच्या सोंगावर अर्थातच दुसऱ्या कोणाला कोणता उपाय करता येणार नाही.

Tags: भाजप संघ आरएसएस सुरेश द्वादशीवार राजकीय लेख- ‘मोदींसाठी मत की भागवतांसाठी’ bjp modi Suresh Dwadashiwar. Rss Political Articales- ‘Vote for Modi or for Bhagwat’ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके