डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

क्रेमलिनच्या आवारात ऑर्थोडॉक्स चर्चची दोन मोठी प्रार्थनागृहे आहेत. कम्युनिस्टांच्या राजवटीत प्रार्थना हा अपराध व धर्म त्याज्य ठरविला गेला. आता या प्रार्थनागृहात प्रार्थना होतात आणि येणाऱ्या पर्यटकांना ती साभिमान दाखविली जातात. याच चर्चच्या मागे पुतीनचे तीन मजली पण साधेच दिसणारे कार्यालय एका कोपऱ्यात उभे आहे. त्याभोवती एक अनाम दहशत रेंगाळली आहे. मात्र एवढ्या शक्तिशाली अध्यक्षाच्या कार्यालयाच्या आवारात फक्त दोन रक्षक उभे आहेत. बाकीचा परिसर रिकामा...त्या कार्यालयाकडून बाहेर पडायला वळताना डाव्या हाताला कधी काळी वैभवशाली असावी असे वाटायला लावणारी एक भव्य चौकोनी इमारत आहे. निम्म्या जगावर सत्ता गाजविणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या विळ्याकोयत्याची चिन्हे तिच्यावर कोरली आहेत. लेनिन, स्टॅलिन, ख्रुश्चेव्ह आणि त्यांच्या परंपरेतील कम्युनिस्ट हुकूमशहांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दहशतीचे केंद्र बनविलेली ही इमारत आता दुर्लक्षित व ओकीबोकी आहे. सोबतचा गाइडही तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करतो.  

31 मे 2012. सकाळचे 10 वाजले आहेत. मास्कोच्या लाल चौकातील कबरीत पुरेशा इतमामानिशी ठेवलेले लेनिनचे शव पाहून मी बाहेर पडतो. काचेच्या बंद पेटीत उणे अठरा अंश सेल्सिअस एवढ्या गारव्यात ते ठेवले आहे.माझ्या मनातली लेनिनची प्रतिमा त्याच्या पुतळ्यांनी व चित्रांनी घडविलेली, उंच, थोराड आणि काहीशी लष्करी. प्रत्यक्षात लेनिनचा देह लहानखुरा, ठेंगणा आणि त्या प्रतिमेशी काहीसा विसंगत असा. मात्र त्याच्या गोऱ्यापान चर्येवरची क्रांतिकारी हुकूमशहाची ऐट तशीच. सदैव आज्ञा करणाऱ्या लष्करशहाची. लेनिनच्या पांढऱ्याफटक चेहऱ्यावर पावडरीचे थर आणि त्याच्या टोकदार दाढीला गोंदाचे बळ असावे. एवढ्या वर्षांनंतर त्या चेहऱ्यावर उतरू लागलेल्या सुरकुत्या आणि त्याचे जुनेपणही लक्षात येते... 

त्या कबरीमागे रशियाच्या जुन्या कम्युनिस्ट राज्यकर्त्यांचे (म्हणजे हुकूमशहांचे) अर्धपुतळे ओळीने मांडून ठेवले आहेत. त्यांतला स्टॅलिन पांढुरका, बाकीचे ब्रॉन्झच्या वर्णाचे. त्यात ख्रुश्चेव्ह नाही, बुल्‌गानिन नाही. कोसिजीन आहे, ग्रोमिको, ब्रेझनेव्ह, आन्द्रेपोव्ह आणि चेरेनेन्को आहेत. 1917 च्या क्रांतीनंतर रशियाच्या इतिहासातील सर्वाधिक विनम्र झार, निकोलाय दुसरा, त्याची पत्नी आणि त्यांच्या चार लहानग्या मुलामुलींसह आपल्या चाळीस लक्ष विरोधकांची हत्या करणाऱ्या लेनिनचे शव पाहिल्यानंतर चार कोटी रशियनांना निर्दयपणे मारणाऱ्या वा त्यांच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या स्टॅलिनचे सत्तास्थानही पाहिले. हजारो वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या रशियाला पाऊणशे वर्षे टाचेखाली तुडविणाऱ्या सत्ताधीशांच्या स्मारकांजवळून आपण आलो असे मनात येत राहिले...

साऱ्या मॉस्कोत लेनिनचा एकच पुतळा आणि तोही दुर्लक्षित अवस्थेत उभा असलेला दिसला. बाकीचे लोकांनी जमीनदोस्त केलेले. स्टॅलिन कुठे दिसत नाही. इटलीच्या नागरिकांनी मुसोलिनीला रस्त्यात ठेचून मारले, तसा रशियनांनीही स्टॅलिनच्या आठवणींचा मागमूस ठेवला नाही. नाही म्हणायला पिट्‌सबर्ग (पूर्वीचे लेनिनग्राद) या रशियाच्या जुन्या राजधानीत लेनिनचा एक दिमाखदार पुतळा उंच उडणाऱ्या हजारो कारंजांच्या दाट महिरपीत उभा आहे... सोबतच्या गाइडला विचारले ‘हा एकच एवढा येथे कसा आणि मॉस्कोतले ते शव?’...

ती म्हणाली, ‘तसे राज्यकर्ते पुन्हा देशात येऊ नयेत याचे स्मरण करून द्यायला.’

काही वर्षांपूर्वी चीनला गेलो तेव्हाचा अनुभव वेगळा होता. सोबतची गाइड चीनच्या राज्यकर्त्यांनी त्या देशात आणलेल्या सुबत्तेविषयी भरभरून बोलत होती. ‘तियानमेन चौकातल्या विद्यार्थ्यांच्या हत्याकांडाची तुम्ही कधी चर्चा करता काय?’ या प्रश्नावर मात्र ती एकाएकी गप्प झाली. जरा वेळाने ‘आम्ही आमच्या सरकारबाबत समाधानी आहोत’ एवढे सांगून तिने तो विषयच संपविला होता...

रशियातली आताची वर्तमानपत्रे सरकारवर टीका करतात. ब्लादिमीर पुतीन या अध्यक्षांच्या राजवटीतील भ्रष्टाचारावर लिहितात. आताच्या लोकशाहीने त्या देशात आणलेल्या मोकळ्या वातावरणाचा तो पुरावा आहे. हिटलरने साठ लाख ज्यूंना जिवंत जाळले एवढेच वारंवार सांगितले जाते. नाझी विचारांना न जुमानणाऱ्या दोन कोटी जर्मनांचीही त्याने हत्या केली हे मात्र फारसे सांगितले जात नाही. स्टॅलिनने कम्युनिस्ट विचारसरणीच्या अंलबजावणीसाठी चार कोटी माणसे मारली किंवा ती मरतील अशी परिस्थिती निर्माण केली. विचारांसाठी माणसे मारण्याची परंपरा लेनिननेच त्याआधीच सुरू केली होती. विरोधकांना ठार मारणाऱ्या विसाव्या शतकातील हुकूमशहांत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत माओ-त्से-तुंगाचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. त्याच्या नेतृत्वात झालेल्या लाल क्रांतीत व नंतरच्या 27 वर्षांच्या राजवटीत त्याने मारलेल्या वा त्याच्या आज्ञेनुसार मारल्या गेलेल्यांची संख्या 7 कोटींवर जाणारी आहे.

पूर्व युरोप, दक्षिण-पूर्व आशिया, मध्यपूर्वेतील अरब देश आणि आफ्रिका या क्षेत्रांतील हुकूमशाही देशांत राजदूत म्हणून काम केलेल्या मार्क पामर या अभ्यासकाने अनेक वर्षांच्या संशोधनानंतर लिहिलेल्या ‘ब्रेकिंग द रियल ॲक्सिस ऑफ इव्हिल’ या ग्रंथात हिटलर, स्टॅलिन व माओ या तिघांनी ठार मारलेल्या माणसांची संख्या 16 कोटी 90 लाखांवर जाणारी असल्याचे नोंदविले आहे. या संख्येत दुसऱ्या महायुद्धात बळी पडलेल्यांचा समावेश नाही. जगभरच्या राजदूतांसमोर 2003 मध्ये दिलेल्या एका भाषणातही त्याने ही आकडेवारी सप्रमाण ऐकविली आहे. (या आधीच्या संशोधकांनी हिटलरच्या नावावर 2, स्टॅलिनच्या 4 तर माओच्या नावे 7 कोटी बळी टाकले आहेत.) हुकूमशाह्यांची जागा लोकशाह्यांनी घ्यावी असे सांगणाऱ्या या ग्रंथात जगात आज 43 हुकूमशहा सत्तेवर आहेत (आणि ते सारे पुरुष आहेत) अशी नोंद आहे. 

तत्त्वप्रणालीचे नाव पुढे करून हुकूमशाहीचे गोडवे गाणाऱ्या आपल्या जाहिरातबाज विचारवंतांनी हे आकडे कधीतरी डोळ्यासमोर आणले पाहिजेत. त्यात भर घालणारे काही चमत्कारिक पण अंगावर शहारे आणणारे आकडे आणखीही आहेत. क्यूबाचा हुकूमशहा फिडेल कॅस्ट्रो किंवा चीनचा माओ या दोघांनीही असंख्य स्त्रियांना आपल्या उपभोगाचे साधन बनविले. असा निर्वाळा इतिहास देईल, असे अनेक पुरावे आता पुढे येत आहेत.

लोकशाहीतल्या क्लिंटनवर एका लेविन्स्कीने असा आरोप ठेवला तेव्हा त्याच्याविरुद्ध महाभियोग चालविला गेला. लेडी माऊंटबॅटनने नेहरूंशी केलेल्या मैत्रीची चविष्ट चर्चा आम्हा भारतीयांनाही गेली साठ वर्षे करावीशी वाटली. हुकूमशाही व लोकशाही यांच्यातील हा एक किरकोळ दिसणारा पण गंभीर असणारा फरक आहे. आताचे रशियन नागरिक आपल्या ऐतिहासिक वैभवाची चर्चा करण्यात पुन्हा धन्यता मानू लागले आहेत. निकोलाय द्वितीय या शेवटच्या झारची प्रशंसा करणारी पुस्तके बाजारात आली आहेत. कम्युनिस्टांनी रंगविलेल्या त्याच्या राणीच्या रंगतदार चरित्राहून ती वेगळी व चांगली कशी होती, एकुलत्या एका मुलाच्या जीवघेण्या आजाराने तिच्या मनाला पांगळेपण कसे आणले होते आणि चार मुला-मुलींच्या भवितव्याच्या चिंतेने ती कशी खंगली होती याची अतिशय हृदयद्रावक वर्णने त्यात येऊ लागली आहेत. अखेरच्या राजपुत्राला आजारातून बरे करू शकणाऱ्या रासपुतीन या (आजवर रंगविल्या गेलेल्या बेलगाम व भ्रष्ट) वैदूकडे मदतीसाठी सारे राजघराणे कसे लाचार होऊन वळले होते याची सहानुभूतीने भरलेली वर्णनेही त्यात आहेत. 

इतिहासात झालेल्या झारांचे (त्यांची संख्या 42) पुतळे पुन्हा सजविले जात आहेत आणि त्यांच्या वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या वस्तुसंग्रहालयांकडे जगभरच्या प्रवाशांना वळविले जात आहे... लेनिनच्या कबरीमागे क्रेमलिन या रशियाच्या जुन्या भयकारी सत्ताकेंद्राची उंच भिंत उभी आहे. या भिंतीमागच्या मंचावर रशियाचे राज्यकर्ते त्यांच्या अधिकारपद परंपरेनुसार पूर्वी उभे रहायचे. मध्यभागी उभा असणारा नेता हा सर्वांत शक्तिशाली म्हणून देशात व जगात ओळखला जायचा. लेनिन, स्टॅलिन व ख्रुश्चेव्ह यांची तशी छायाचित्रे आजही अनेकांच्या स्मरणात आहेत.

लाल चौकातून लष्कराची भव्य पथके व देशाच्या शस्त्रागारातील भयकारी अण्वस्त्रे समारंभपूर्वक मिरवत जात आहेत आणि ती या नेत्यांना सलामी देत आहेत अशी दृश्ये एके काळी वर्षानुवर्षे जगाला दाखविली गेली...  या भिंतीमागे आता राष्ट्रपती पुतीन यांचे कार्यालय आहे. त्याच्या मार्गावर जुन्या राज्यकर्त्यांचे स्मरण करून देणारे एक मोठे वस्तुसंग्रहालय आहे. त्यात त्या राजांचे पोशाख, ते वापरत असलेली शस्त्रे आणि रथ त्यांच्या इतमामाला साजेशा दिमाखात ठेवले आहेत. 

क्रेमलिनचा परिसर एके काळी प्रवाशांसाठी बंद होता. आता तो खुला झाला आहे. त्यात झारशाहीचे वैभव अभिमानपूर्वक दाखविणारी माणसे आता तैनात आहेत... क्रेमलिनच्या आवारात ऑर्थोडॉक्स चर्चची दोन मोठी प्रार्थनागृहे आहेत. कम्युनिस्टांच्या राजवटीत प्रार्थना हा अपराध व धर्म त्याज्य ठरविला गेला. आता या प्रार्थनागृहात प्रार्थना होतात आणि येणाऱ्या पर्यटकांना ती साभिमान दाखविली जातात. याच चर्चच्या मागे पुतीनचे तीन मजली पण साधेच दिसणारे कार्यालय एका कोपऱ्यात उभे आहे. त्याभोवती एक अनाम दहशत रेंगाळली आहे. मात्र एवढ्या शक्तिशाली अध्यक्षाच्या कार्यालयाच्या आवारात फक्त दोन रक्षक उभे आहेत. बाकीचा परिसर रिकामा... 

त्या कार्यालयाकडून बाहेर पडायला वळताना डाव्या हाताला कधी काळी वैभवशाली असावी असे वाटायला लावणारी एक भव्य चौकोनी इमारत आहे. निम्म्या जगावर सत्ता गाजविणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या विळ्याकोयत्याची चिन्हे तिच्यावर कोरली आहेत. लेनिन, स्टॅलिन, ख्रुश्चेव्ह आणि त्यांच्या परंपरेतील कम्युनिस्ट हुकूमशहांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दहशतीचे केंद्र बनविलेली ही इमारत आता दुर्लक्षित व ओकीबोकी आहे. सोबतचा गाइडही तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करतो. आजवरच्या इतिहासातले दहशतीचे ते सर्वांत मोठे केंद्र त्याच्यासमोरून पुढे गेल्यानंतरच माझ्याही लक्षात येते. 

Tags: क्रेमलिन कम्युनिस्ट हुकूमशहा पुतीन ख्रुश्चेव्ह स्टॅलिन लेनिन Kremlin Communist dictator Putin Khrushchev Stalin Lenin weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके