Diwali_4 नव्यनीती
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

उद्याचे जग लोकशाहीचे असेल आणि ते सुजाण व सुबुद्ध नागरिकांनी केलेल्या कायद्याचे आणि त्या कायद्याने प्रस्थापित केलेल्या न्यायाचे असेल. त्याचा हॉब्ज वा रूसोच्या राज्यविहीन निसर्गावस्थेशी संबंध नसेल. तशा अवस्थेतून जग कधीचेच बाहेर पडले आहे. फिरून ते त्या दिशेने जाईल अशी शक्यता आता उरली नाही. कायदा असल्याने आणि त्याला न्यायाविषयीच्या आग्रहाची जोड मिळाल्याने हे जग गोंधळाचेही असणार नाही. आज कायदा आहे आणि तरीही त्याची न्याय्य अंमलबजावणी नाही याचे कारण समाजात असलेली समूहाधारित वा गर्दीची मानसिकता हे आहे.

जगाचे नागरिकत्व किंवा जगाचा नागरिक ही कल्पना एकट्या रसेलनेच मांडली नाही. त्याच्या अगोदर आलेल्या आणि नंतर झालेल्या अनेक तत्त्वज्ञांनी आणि विचारवंतांनीही या भव्य कल्पनेचा स्वीकार आणि पुरस्कार केला आहे. तत्त्वज्ञ माणसाला कायदा लागू होऊ नये असे म्हणणारा प्लेटो एका वेगळ्या अर्थाने ज्ञानी माणसे जागतिक असण्याची संकल्पनाच मांडत असतो. सॉक्रेटिस, प्लेटो किंवा ॲरिस्टॉटल हे ग्रीक आणि व्यास-बुद्ध वा शंकराचार्य हे भारतीय तत्त्वचिंतक जेव्हा जन्माला आले तेव्हा आजचे देश आणि त्यांचे नागरिकत्व या गोष्टी नव्हत्याही.

इस्रायलच्या निर्मितीपूर्वीचे जगभरच्या ज्यूंचे नागरिकत्व कसे समजून घ्यायचे असते? स्पिनोझाला धर्माने बहिष्कृत केले आणि व्हॉल्टेअरला फ्रान्सने हद्दपार केले तेव्हा त्यांना कोणत्या धर्माचा वा नागरिकत्वाचा आधार होता? याहून महत्त्वाचा प्रश्न, आजचे देश त्यांच्या आताच्या स्वरूपात अस्तित्वात येण्याआधी नागरिकत्व ही आजची कल्पना कोणत्या व कशा स्वरूपात होती? ईश्वराचा देश कोणता? आत्म्याचा धर्म कोणता आणि संस्कृती व कला यांना असणाऱ्या मर्यादा कोणत्या? जगभरचे ज्ञानेश्वर विश्वाच्या कल्याणाची स्वप्ने पाहतात की कोणा एका ज्ञाती वा देशविशेषाची? असले विशेष माणसांना लहान करतात की मोठेपण बहाल करतात?

मार्क्सच्या तत्त्वज्ञानात देश किंवा राष्ट्र या गोष्टी बसणाऱ्या नाहीत. अलीकडच्या काळात आल्बर्ट आईन्स्टाईनने आपल्या शाळकरी अवस्थेतच जर्मनीचे नागरिकत्व आणि ज्यू धर्म या दोन्हींचा त्याग केला होता. देश आणि धर्म या दोन्हींपासून आपल्याला मुक्तता हवी हा हट्ट अल्बर्टने आईवडिलांजवळ लहानपणीच धरला ही बाब येथे महत्त्वाची. वास्तव हे की कोणताही तत्त्वज्ञ वा ज्ञानी पुरुष हा एका समाजाचा, देशाचा वा काळाचा असत नाही. तो आणि त्याचा विचार यांवर साऱ्या जगाचा आणि काळाचा हक्क असतो. गांधी एकट्या भारताचा असतो की जगाचा? देश, धर्म, जाती आणि वंश यांच्या मर्यादा महापुरुषांचे माहात्म्य अधोरेखित करतात की त्यांच्या श्रेष्ठत्वाला कुंपण घालतात?

आपल्या व्यक्तिमत्त्वाला परंपरेने घातलेल्या या मर्यादांचे उल्लंघन करणे सोपे आहे काय, ते करणाऱ्या व्यक्तींना कोणत्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल आणि आजच्या बंदिस्त अवस्थेहून उद्याचे मोकळेपण अधिक भयकारी असेल तर काय, यासारखे प्रश्न या संदर्भात विचारता येतील. तसे ते अनेकांनी विचारलेही आहेत. फिअर ऑफ फ्रीडम या एरिक फ्रॉमच्या पुस्तकात हा प्रश्न विस्ताराने चर्चिला गेला आहे. माणसांच्या जातीसमोरचे असे प्रश्न कधी संपत नाहीत. माणूस विचार करतो तोपर्यंत हे प्रश्न त्याची सोबत करतात. त्यामुळे उद्याच्या अवस्थेत प्रश्न नसतील असे आश्वासन कुणाला देता येणार नाही. उद्याचे प्रश्न आजच्या प्रश्नांहून वेगळे असतील आणि आजच्या एवढे ते भयकारी असणार नाहीत एवढेच या संदर्भात फार तर म्हणता येईल. मार्क्सचा वापर करून सांगायचे तर उद्याचे प्रश्न व्यक्तीचे असतील. ते समूहाचे (वा कळपाचे) असणार नाहीत.

मर्यादा नसणाऱ्या जगाला लागणारे ज्ञान व विज्ञान आज उपलब्ध झाले आहे. जग लहान आणि सपाट होणे याचा अर्थ ज्ञान आणि विज्ञानाच्या अशा उपलब्धीतच शोधता येणार आहे. नव्या जगाच्या स्वीकारासाठी माणसाचे मन तयार होणे हे आजचे खरे आव्हान आहे. हे मन ज्यांना लाभले त्यांच्यापैकी काहींचे उल्लेख वर आले आहेत. ज्ञान आणि विज्ञान ही दोन्ही क्षेत्रे अशीच साऱ्या जगाची असतात. या जगाचा मनाने स्वीकार करायचा तर व्यक्तीला आपल्यावर असलेल्या जुन्या संस्कारांच्या मर्यादाच तेवढ्या बाजूला सारायच्या असतात. म्हटले तर हे काम अवघड आहे आणि मनाने ठरविले तर त्याएवढे सोपे कामही दुसरे नाही. मनाचा असा निर्णय किंवा निर्धार करणे ही व्यक्तिगत बाब आहे व ती साध्याही प्रयत्नाने साध्य होणारी आहे. असा निर्णय करताना व्यक्तीला आपल्या मानसिक व पारंपरिक मर्यादांखेरीज काहीही गमावायचे नाही. आजवरच्या संस्कारांनी व्यक्तीच्या मनाभोवती एक संरक्षक वाटावे असे कवच उभे केले आहे.  या कवचाचे स्वरूप बव्हंशी सामाजिक आहे. या सामाजिकतेची जागा आता व्यक्तिगतता घेत असेल तर हे कवच संरक्षक न राहता जाचक होणार आहे व तसे ते आता झालेही आहे.

ज्या क्षणी व्यक्ती हे कवच झुगारण्याचा आणि स्वतंत्र होण्याचा निर्णय घेईल त्या क्षणी ती स्वतःपुरती मुक्त होईल आणि त्याच वेळी ती मनाने जगाची नागरिकही होईल. हे नागरिकत्व युद्धाच्या भीतीतून आलेले नसेल. स्वातंत्र्याच्या स्वीकारातून ते व्यक्तीला प्राप्त होईल. रसेलने जगाच्या नागरिकत्वाचा पुरस्कार केला तेव्हा त्याच्यासमोर पहिल्या महायुद्धाने केलेला प्रचंड नरसंहार होता. हा संहार टाळण्यासाठी त्याने जगाच्या नागरिकत्वाची मांडणी केली. लीग ऑफ नेशन्स किंवा आताचा संयुक्त राष्ट्र संघ या जागतिक संघटनाही अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानंतर युद्ध नको म्हणूनच जन्माला आल्या. त्यांची निर्मिती एका तऱ्हेच्या भयगंडातून झाली. त्या निर्माण होत असताना जागतिक शांततेच्या प्रस्थापनेचे कारण त्यांच्या निर्मात्यांनी पुढे केले असले तरी त्या निर्मात्यांच्या मनांतही दोन महायुद्धांनी उभा केलेला भयगंड होता हे विसरण्याचे कारण नाही. या संस्थांनाही जग जवळ आणण्याच्या आणि माणसे माणसांना जोडण्याच्या प्रयत्नात अद्याप यश आले नाही. माणसे जोपर्यंत देश, धर्म, वंश वा जात अशा कळपात जगत राहतील तोपर्यंत जागतिक म्हणविणाऱ्या संस्थांना अधांतरीच राहावे लागणार आहे. ज्या दिवशी माणसे आणि जग यांच्यात दुरावा उभा करणारी ही कुंपणे जातील त्या दिवशी जग खऱ्या अर्थाने एक होईल आणि त्यात कायमची शांतता नांदण्याची शक्यताही तेव्हाच निर्माण होईल. झालेच तर त्या दिवशी माणूसही खऱ्या अर्थाने माणूस झालेला असेल. ही प्रक्रिया भयगंडातून घडणार नाही. स्वतंत्र बुद्धीच्या सबळ व्यक्तींनी घेतलेल्या स्वयंनिर्णयातून ती अवतरलेली असेल.

बंधनरहित माणसांचे उद्याचे हे जग हॉब्जने वर्णन केलेल्या बळी तो कान पिळी या न्यायाचे असेल की रूसोने सांगितलेल्या पृथ्वीतलावरील नंदनवनासारखे असेल? माणसाचा मूळ स्वभाव कौटिल्याने सांगितला तसा वाईट असतो की गांधींच्या सांगण्यानुसार तो मूलतः चांगला असतो? उद्याच्या जगात माणसाच्या स्वभावातील यांपैकी कोणती एक वृत्ती उफाळून वर येईल? या जगात सुव्यवस्था नांदेल की त्यात सारा गोंधळच असेल? या जगात माणसे नीतीने जगतील की नीतिमूल्यांचे विस्मरण होऊन मनःपूत वागू लागतील? या प्रश्नांची उत्तरे जरा शांतपणे विचार केला तर कोणालाही गवसावी अशी आहेत.

उद्याचे जग लोकशाहीचे असेल आणि ते सुजाण व सुबुद्ध नागरिकांनी केलेल्या कायद्याचे आणि त्या कायद्याने प्रस्थापित केलेल्या न्यायाचे असेल. त्याचा हॉब्ज वा रूसोच्या राज्यविहीन निसर्गावस्थेशी संबंध नसेल. तशा अवस्थेतून जग कधीचेच बाहेर पडले आहे. फिरून ते त्या दिशेने जाईल अशी शक्यता आता उरली नाही. कायदा असल्याने आणि त्याला न्यायाविषयीच्या आग्रहाची जोड मिळाल्याने हे जग गोंधळाचेही असणार नाही. आज कायदा आहे आणि तरीही त्याची न्याय्य अंमलबजावणी नाही याचे कारण समाजात असलेली समूहाधारित वा गर्दीची मानसिकता हे आहे. गर्दीला हात लावायचा नाही आणि मोठ्या समूहांना दुखवायचे नाही ही आजच्या लोकशाहीची मानसिकता पुन्हा या समूहाधारित व्यवस्थेतूनच येत असते. गट, वर्ग, समूह, जाती आणि धर्म यांनी दिलेल्या श्रद्धा गोंजारण्याच्या गरजेतून आज कायदा वाकवला जातो आणि न्यायही नाकारला जातो. आजची लोकशाही सरकारेही सगळे सार्वभौ सामर्थ्य सोबत असताना या झुंडींसमोर नमत असतात...

उद्याच्या व्यक्तींच्या जगात अशा झुंडशाहीला जागा नसेल. त्यात कायदा आपले काम करील आणि व्यक्तीला न्यायही वेळच्यावेळी मिळेल. गर्दीची हुकूमत मागे पडली की आजचे सामूहिक हिंसाचार इतिहासजमा होतील. महत्त्वाची बाब ही की त्यात माणसे जातिधर्मासारख्या जन्मदत्त निष्ठांच्या वळणाने विचार न करता माणूस म्हणून विचार करणारी असतील. अशी अवस्था हिंसेची आणि हाणामारीची नसेल. ती शांततेची आणि न्यायाची असेल. गर्दी जमा करायला सामान्य बुद्धीची बरीचशी माणसे लागतात आणि त्यांना एकत्र करणारा एक शक्कलबाज लागतो. सामान्य आणि शक्कली हे सध्याचे वर्णच उद्याच्या जगात नसतील तर...

राहता राहिला प्रश्न, नीती-अनीतीचा. आजच्या नीतिव्यवस्थेचे स्वरूपही त्यासाठी एकवार नीट समजून घेतले पाहिजे. नीतीच्या व्यवस्था आणि त्याविषयीचे नियम यांचे स्वरूपही सार्वत्रिक आणि सार्वकालिक नाही. नीती हे मूल्य सामाजिक असण्याहून व्यक्तिगतच अधिक आहे. त्याचा संबंध व्यक्तीच्या विवेकबुद्धीशी आहे. एखादी गोष्ट नैतिक आहे की अनैतिक हे समाजाच्या भीतीमुळे ठरविणे आणि आपल्या विवेकाच्या निर्णयानुसार निश्चित करणे यांतील फरक येथे लक्षात यावा आणि विवेकाच्या निर्णयाचे श्रेष्ठत्वही ध्यानात यावे. धर्मग्रंथांची शिकवण म्हणून, जुन्या आदर्शांनी घालून दिलेला पायंडा म्हणून, परंपरा आणि इतिहास यांचा संस्कार म्हणून किंवा कोणी दुसरे पाहील म्हणून नीतीच्या मार्गाने वाटचाल करणारी माणसे नीतिमान जगतील पण ती नीतिमान असतीलच असे नाही. नीती भीतीतून जन्माला येत नाही. स्वयंभू मूल्य असल्याने नीतीला दुसऱ्या कशाचा, अगदी देवधर्माचाही आधार लागत नाही. खरे तर असल्या आधारांमुळे नीतीचे मूल्य बाधित होण्याचीच शक्यता अधिक असते... अनीतिमान होण्याची संधी नसल्यामुळे नीतिमान राहिलेल्या वा राहू शकणाऱ्या ‘नीनिमानांची-संभावना कशी करायची असते? नीती आणि अनीतीच्या सीमेवर असताना ज्यांना नीतीचा मार्ग स्वेच्छेने निवडता येतो व त्यासाठी प्रलोभनांचा मोह टाळता येतो त्यांनाच नीतीमान म्हणायचे असते... असे नीतिमान होणे ‘व्यक्तीगत जगणाऱ्यांना जमू शकणार असते. ती परीक्षा आहे आणि ती आपले मोल मागतही असते. पण मोलावाचून मूल्य नाही आणि त्यागावाचून नीतीही नाही.

सामूहिक वा सामाजिक म्हणविणारा नीतिव्यवहार स्थलकालसापेक्ष असतो. तो काळानुरूप बदलतो आणि समाजवार त्याचे नियम वेगळे असतात. एके काळी क्युरेश या जमातीत बापाच्या मृत्यूनंतर त्याच्या सगळ्या स्त्रिया (सख्खी आई वगळून) मुलाच्या वाट्याला येत.(त्यामागे त्या स्त्रियांच्या रक्षणाची हमी देण्याचीही एक बाजू होती) पवित्र प्रेषिताने त्या प्रथेला विरोध केला आणि ती विटंबना थांबविली. मुसलमान समाजात चुलत वा मावस बहिणीशी केलेला विवाह धर्मसंत तर हिंदूंमध्ये तो निषिद्ध आहे. सख्ख्या भावाबहिणीचे लग्न एके काळी इजिप्तमध्ये धर्ममान्यच नव्हे तर राज्यमान्यही होते. क्लिओपात्राचा असा विवाह तिच्या भावाशी झाला होता. सत्तेच्या खुर्चीसाठी घरात भांडण नको म्हणून ही प्रथा तेथील राजघराण्यांनी स्वीकारली. मात्र राजांचे अनुकरण करण्याच्या प्रजेच्या मानसिकतेतून तिचे अनुकरण समाजानेही केले. सख्ख्या भावाबहिणीचे लग्न अनैतिक ठरविण्याची काही धर्मांनी पुढे केलेली कारणेही हास्यास्पद व चमत्कारिक आहेत. भावाबहिणीच्या प्रेमात पतिपत्नीचे प्रेम मिसळले तर ते प्रेमाखेरीज दुसरे काहीएक करणार नाहीत म्हणून तशी लग्ने होऊ नयेत असे एका आदरणीय धर्माने म्हटले तर इतरांनी तो वर्णसंकर अतिशय अनिष्ट म्हणून त्यावर निर्बंध घातले आहेत... बहुपत्नीत्वाची चाल जगभरच्या सर्व समाजांत पूर्वी होती आणि आजही आहे.

भारतासारख्या देशात बहुपत्नीत्वाला पायबंद घालणारे कायदे आहेत मात्र तीस आणि पस्तीस लग्ने केलेली माणसे त्याच्या संसदेत राहिली आहेत. ‘आम्ही आमच्या प्रथेनुसारच वागत आहोत- असे सांगून त्या सज्जनांनी आपल्या तेवढ्या सगळ्या विवाहांचे समर्थनही केले आहे. बहुपतीत्वाची चाल नेपाळसह उत्तरभारतातील अनेक जमातीत होती. एका संशोधनाने द्रौपदी ज्या भागातून येते त्या भागात तिच्या काळी बहुपतीत्वाची चाल असणाऱ्या जमाती होत्या व त्यामुळेच तिला पाच पांडवांची पत्नी होणे शक्य झाले असे म्हटले आहे. विवाहबाह्य संबंध हा तर सार्वकालीन आणि सार्वत्रिक म्हणावा असा जागतिक गुणविशेष आहे. तो एकाच वेळी अनैतिक आणि रोमांचक (वा कवित्वमान्य) ठरला आहे. आजही त्याकडे पाहण्याची समाजाची मानसिकता सारखी नाही. कलावंतांनी, नामवंतांनी आणि धनवंतांनी तसा संबंध राखला तर तो स्वाभाविकपणाचा, सामान्यांचा असला तर शौकाचा आणि गरिबांचा असेल तर चैनीचा ठरतो. काहींसाठी तो गरजेचा तर अनेकांसाठी अनैतिकतेचा ठरविला जातो. व्यवसाय शिक्षणाच्या एका मान्यवर पुस्तकात यशस्वी उद्योजकांसाठी एखादा विवाहबाह्य संबंध आवश्यक असल्याचेही अलीकडे म्हटले आहे.

सती जाणे, केशवपन हे वैवाहिक नीतिमत्तेचे गतकालीन आदर्श आता अपराध ठरले आहेत आणि पाश्चात्त्यांनी अवलंबिलेली आधुनिक नीतिमूल्ये आदर्शवत वाटू लागली आहेत. हा काळाचा महिमा नाही. ती समाजाची सहज साधी व प्रगतिशील प्रवृत्ती आहे. धर्मांचे नीतिविषयक निर्बंधही परस्परभिन्न आणि कधीकधी थेट अनीतीच्या पातळीवर जाणारे आहेत. ‘परधर्माच्या लोकांना दिलेला शब्द वा त्यांच्याशी केलेला करार पाळणे तुम्हाला बंधनकारक नाही आणि परधर्माच्या लोकांकडे जाऊन हक्काने राहणे हा तुमचा अधिकार आहे- इथपासून, परधर्माच्या स्त्रियांच्या ठिकाणी सक्तीने संतती उत्पन्न करण्याचा अधिकार स्वधर्मातील पुरुषांना देण्यापर्यंत काही धर्मांची मजल गेली आहे. कोणत्या जातीतील पुरुषांना कोणत्या स्त्रिया चालू शकतात हे सांगणाऱ्या परंपरा भारतालाही ठाऊक आहेत. सरसकट सगळ्या धर्मांनी स्त्रीला दुय्यम दर्जा देण्याचे आणि सामाजिक विषमतेला नीती चिकटवण्याचे काम केले आहे. धर्मांनी नीतिमान माणसांवर अधार्मिकतेचा व पाखंडाचा आरोप ठेवून त्यांना शिक्षा केल्या आहेत. अशा व यांसारख्या उदाहरणांची लांबलचक यादीच येथे देता येईल.

नीतिव्यवहाराचे उपरोक्त चित्र त्याच्या समूहाधारित स्वरूपाचे आहे. समूह संघटित ठेवायचे म्हणून ज्या धार्मिक, सामाजिक, राजकीय व अन्य संरचना याआधी निर्माण झाल्या, त्यांच्या मजबुतीसाठी तत्कालीन नियंत्रकांनी ते स्वरूप निश्चित केले आहे. ते सार्वत्रिक व सर्वकालीन समजण्याचे आणि त्याला सनातनत्वाचा दर्जा देण्याचे कारण नाही. आताचा काळ व्यक्तिगततेचा, विकेंद्रीकरणाचा आणि समूहांचे आधार कोसळण्याचा असल्यामुळे जुन्या व्यवस्था राहणार नाहीत आणि नव्या नीतिमूल्यांचे आगमन त्यांना थोपविताही येणार नाही.

मी, माझा विकास, त्याला हातभार लावू शकणारी मूल्ये यासोबतच माझ्यासोबतचे व बरोबरीचे इतर यांच्याही तशाच कल्याणाला लागणारी तत्त्वे ही आताची गरज आहे. व्यक्तिगततेचा संकोच करणारी, समाजाचा आणि सामाजिकतेचा बडिवार मिरविणारी व्यवहारसूत्रे यापुढे टिकणार नाहीत. त्यांना आजवर चिकटविला गेलेला नीतीचा मुलामाही यापुढे राहायचा नाही. परस्परांचे सामर्थ्य वाढविणारी, उंचीला हातभार लावणारी, सुखात भर घालणारी आणि विकासात अडथळा न ठरणारी नीतिव्यवस्था ही उद्याची गरज असेल. त्यात स्त्री-पुरुष संबंधांएवढाच दोन व्यक्तींच्या समतेवर व परस्परांविषयीच्या समजुतींवर आधारलेल्या संबंधांचा भर अधिक असेल. नवी नीती अशा संबंधांवर उभी असेल आणि तीच त्या संबंधांना आकारही देईल. या नीतीला आधार व्यक्तिगत विवेकाचा असेल. आरंभी हा आधार व्यक्तिपरत्वे कमीअधिक समर्थ असला तरी तो परिपूर्णतेकडे वाटचाल करणारा असेल. त्याचा नात्यांशी संबंध नसल्याने ही नीती नातेनिरपेक्षही असेल. त्याचमुळे ती मूल्यांच्या कसोटीवरही उतरेल. दोन व्यक्तींमधील कमी अधिक प्रभाव या संबंधांचे स्वरूप निश्चित करील आणि या संबंधांना प्रभावांच्या समतोलाकडेही तो नेत राहील.

Tags: नातेसंबंध चिंतन सुरेश द्वादशीवार relationship chintan suresh dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात