डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

पायाखालची सारीच वाळू अशी घसरली आणि हाती धरायला तिनकाही उरला नाही तेव्हा कलामांची वैज्ञानिक बुद्धी जागी झाली व आपले अंतर्मन आपल्याला ही निवडणूक लढविण्याचा सल्ला देत नसल्याचा त्यांना साक्षात्कार झाला... वैज्ञानिकाची दूरदृष्टी येथे हरली आणि सामान्य माणसाच्या मनातील यशापयशाची खरी गणिते त्यांना शहाणपण शिकवायला पुढे झाली. त्यातून त्यांनी घेतलेला धडा अभिनंदनीय व स्वागतार्ह असला तरी त्या आठ दिवसांत त्यांनी चालविलेल्या राजकीय लपंडावाने आणि वक्तव्यांएवढ्याच मौनाने त्यांचेही पाय मातीचे असल्याचेच साऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्याविषयी देशाच्या मनात प्रेम आहे. त्या प्रेमाचा आधार त्यांचे वैज्ञानिक असणे, त्यांच्यामुळे देशाला अणुक्षेत्रात प्रवेश प्राप्त होणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात राजकारणाचा लवलेश नसणारे पारदर्शीपण असल्याचा देशात समज असणे हा आहे. त्याचमुळे वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात तेव्हाच्या राष्ट्रीय लोकशाही या सत्तारुढ आघाडीने त्यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी पुढे केले तेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीनेही त्यांना पाठिंबा देऊन त्यांची निवडणूक अविरोध होईल अशी व्यवस्था केली.

आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीत कलामांनी कोणाला दुखावले नाही, उलट साऱ्यांना सोबत घेऊन चलण्याची स्वतःची विधायक प्रतिमा विद्यार्थी-विद्यार्थिनींपासून सामान्य नागरिकांपर्यंत साऱ्यांच्या मनात उभी केली. आता होत असलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांचे नाव तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनी ज्या तऱ्हेने पुढे आणले त्या प्रकाराने त्यांच्या आजवरच्या स्वच्छ प्रतिमेवर प्रथमच राजकारणाचे रंग चढले.

काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीने अर्थमंत्री प्रणवकुमार मुखर्जी यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर व त्यांच्या पाठीशी मुलायमसिंग, मायावती आणि करुणानिधी यांच्या पाठिंब्यामुळे बहुमत उभे राहिल्यानंतरही कलामांनी त्यांच्या उमेदवारीची चर्चा राजकीय पक्षांच्या कार्यालयांत व माध्यमांत चालू दिली त्यामुळे ते रंग आणखी गडद झाले. पुढे जाऊन 60 टक्के मतदारांचा पाठिंबा सोबत असेल तरच निवडणूक लढविण्याचा विचार आपण करू असे जाहीररीत्या सांगून या वैज्ञानिकाने त्याला असलेली राजकीय महत्त्वाकांक्षा उघडही करून टाकली.

कलामांचा विचार यापुढे केवळ वैज्ञानिक व शैक्षणिक क्षेत्रातील माणूस एवढाच करता येणार नाही. त्यांच्या केसांच्या टोकांना लगडलेल्या राजकीय महत्त्वाकांक्षांचा संदर्भ त्यांना जोडूनच आता तो करावा लागेल....याआधी 2007 मध्ये प्रतिभाताई पाटील आणि भैरोसिंह शेखावत यांच्यात राष्ट्रपतिपदाची निवडणूक होऊन तीत प्रतिभाताई विजयी झाल्या. प्रतिभातार्इंनी राष्ट्रपतिपदाची सूत्रे कलामांकडूनच स्वीकारली. मात्र त्याही निवडणुकीत भैरोसिंहांचे नाव काँग्रेसेतर पक्षांकडून पुढे येतपर्यंत कलामांचे नाव उमेदवार म्हणून चर्चेत येत होते व ते त्यांनी तसे राहू दिले होते. पुढे सगळ्या शक्यता संपल्या तेव्हा त्यांच्या निजधामी जाऊन ते शांत झाले होते...

राजकारणात पदाची आकांक्षा बाळगणे व त्यासाठी प्रयत्नशील असणे हा देशातील प्रत्येकच नागरिकाचा हक्क आहे. त्यासाठी त्याला नावे ठेवण्याचे कारणही नाही. मात्र अशा माणसाने स्वतःला निरिच्छ व राजकारण निरपेक्ष समजण्याचे व तसे म्हणवून घेण्याचे कारण नाही.  कलामांचा धक्का देणारा विशेष, त्यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षांविषयी आजवर चालविलेली ही लपवाछपवी, हा आहे.

जुलै 2002 मध्ये रालोआने त्यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी पुढे केले व त्यांना सर्वसंमतीने त्या पदावर निवडून आणले. त्या वेळी कलामांच्या नावाभोवती त्यांच्या पुढाकार व प्रयत्नाने सिद्ध झालेल्या भारताच्या अणुबॉम्बच्या पाच स्फोटांचे वलय होते. 11 व 13 मे 1998 या दिवशी पोखरणच्या वाळवंटात ते स्फोट घडवून आणल्यानंतर पंतप्रधान, संरक्षणमंत्री व देशाच्या अन्य नेत्यांसोबत त्यांची तेथे काढलेली छायाचित्रे वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर प्रकाशित केली होती. त्यानंतरची त्यांची वक्तव्ये व एकूणच विनम्रपण त्यांच्याविषयीचा आदर उंचावत नेणारे होते.

पुढच्या काळात त्यांची जी पुस्तके लोकांच्या हाती आली, त्यांनीही त्यांचा सन्मान वाढविलेला दिसला. या साऱ्या काळात त्यांना आपली प्रतिमा सर्वपक्षसंमत व सर्वांना हवीहवीशी बनविता येणे मात्र जमले नाही. आरंभापासून अखेरपर्यंत ते भाजपाप्रणीत रालोआचे उमेदवार व राष्ट्रपतीच राहिले.

त्या पदावरून उतरल्यानंतर त्यांचा अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक मंचांवर वावर राहिला तरी ते काँग्रेसप्रणीत संस्था-संघटनांपासून दूरच राहिले. त्यातून त्यांची एक अर्धराजकीय व अर्धसामाजिक प्रतिमा तयार झाली. तिच्यावर काँग्रेसविरोधाची छाप राहिली आणि ती त्यांना समाधान देणारी असावी असेही साऱ्यांना वाटत राहिले. ही प्रतिमा दुरुस्त करण्याचा कोणताही प्रयत्न त्यांनी केला नाही...

एक मात्र खरे, या इसमाला पदाचा, सन्मानाचा वा अधिकाराचा लोभ नाही, हा नुसताच ज्ञानकणांची शिंपण करीत राहणारा ऋषितुल्य माणूस आहे असे त्यांच्याबाबत अनेकांना या काळात वाटू लागले होते. प्रत्यक्षात मात्र कलाम हे येऊ शकणाऱ्या संधीची वाट पाहात होते हे त्यांच्या आताच्या हालचालींतून उघड झाले.

देशाच्या राजकारणात आघाडीचा तणाव आहे. त्यात सगळ्या ओढाताणी आणि शक्यता संभवणाऱ्या आहेत. देवेगौडा आणि गुजराल यांसारखी हलकीफुलकी माणसे अशाच राजकारणात पंतप्रधान होतात आणि संगमासारख्या चिमुकल्या पुढाऱ्यालाही याच काळात राष्ट्रपतिपदाची स्वप्ने पडू लागतात.

मनमोहनसिंगांचे सरकार त्याच्या पाठीशी बहुमत असतानाही संसदेत अडविले जाते, तृणमूल किंवा समाजवादी पक्षासारखे जवळचे व दुरून पाठिंबा देणारे पक्षही सरकारला अडचणीत आणू शकतात आणि रालोआ ही आपली जुनी मित्र आघाडी मजबूत आणि आक्रमक राहिली नाही, ही स्थिती कलामांसारख्या वैज्ञानिकाच्या शास्त्रीय आकलनाला आव्हान देणारी होती.

त्यातून अण्णा-बाबांचा भ्रष्टाचारविरोधी गदारोळ, टीम-अण्णाची पोरकट दगडफेक आणि विदेशी पैशावर देशाची सेवा करायला निघालेले किरण-केजरीवालादिकांचे सरकारविरोधी उंडारणे ही स्थिती त्यांच्या अशा राजकीय समजुतीला खतपाणी देणारीही होती.

रालोआजवळ स्वतःचा उमेदवार नाही, नीतिशकुमार, नवीन पटनायक, चंद्राबाबू नायडू व अण्णाद्रमुकच्या जयललिता यांच्यासमोर पर्याय नाही. मात्र ही माणसे एकेकाळी आपल्यासोबत राहिली आहेत. उत्तरप्रदेशातल्या निवडणूक प्रचाराने मुलायम दुखावले आहेत आणि ममताबाई स्वतःखेरीज कोणासोबत आहे याचा कोणाला पत्ता नाही. कनिमोळी आणि राजा यांच्यामुळे दुखावलेला करुणानिधींचा पक्ष ऐनवेळी काय भूमिका घेतो याचा अंदाज नाही.

झालेच तर करुणानिधींसकट यापैकी कोणत्याही नेत्याचा वा पक्षाचा आपल्यावर राग नाही, असलाच तर तो काँग्रेसवर अधिक आहे... अशा सगळ्या नकारांची बेरीज वैज्ञानिक गणितावर पकड असलेल्या कलामांनी नक्कीच केली असणार. तशात ममताबार्इंनी त्यांना आपल्या पहिल्या पसंतीची उमेदवारी जाहीररीत्या देऊन त्या खालोखाल मनमोहनसिंग आणि सोमनाथ चॅटर्जी यांचीही नावे पुढे केली.

ममताबार्इंचे राजकारण जेवढे बालिश व आक्रस्ताळे तेवढेच ते उघड व उथळ होते. त्यांना चॅटर्जी चालणार होते, ते त्यांच्या कम्युनिस्टविरोधी राजकारणासाठी आणि मनमोहनसिंग चालायचे होते ते दिल्लीतील सत्तारूढ आघाडीची कोंडी करण्यासाठी... कलामांना मात्र त्या पोरकट राजकारणाचाही मोह पडला.

आपल्या नावाची घोषणा ममता बॅनर्जी करतात तेव्हा त्यांनी आपली पूर्वसंमती घेतली असल्याचे जगाला कळणार. तशी आपण ती दिली असेल तर आपली पदाकांक्षा त्यातून उघड होणार, हे कलामांना नक्कीच समजत असणार. ममताबार्इंच्या त्या धक्कादायक घोषणेनंतर कलामांनी बाळगलेले दीर्घकालीन मौन या संदर्भात पुरेसे बोलके होते.

अपेक्षेप्रमाणे रालोआ आणि इतर पक्ष त्या घोषणेबाबतची मते देण्याचे टाळताना दिसले तरी कलामांचे मौन दृढ राहिले, याचा अर्थ त्या पक्षांच्या संभाव्य मतांची गणिते त्यांच्या मनात सुरूच असणार हा आहे.

रालोआ, मुलायम, मायावती, जयललिता, करुणानिधी, चंद्राबाबू, नवीन पटनायक आणि नीतिशकुमार यांच्यासह ममता बॅनर्जी ही बेरीज तशी मोठी व कलामांना विजयाच्या दिशेने नेणारीही होती. त्यांचा पहिला हिरमोड मुलायमसिंग यांनी केला. त्यांनी काँग्रेसच्या प्रणवदांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊन कलामांचीच नव्हे तर ममताबार्इंचीही कोंडी केली. त्या पाठोपाठ मायावतींनी कलामांना नकार दिला. डाव्यांचा तसा नकार अपेक्षित होताच. नीतिशकुमार, नवीन पटनायक या जुन्या साथीदारांनीही कलामांना मदत नाकारली. ठाकरेंची शिवसेना विरोधात गेली. प्रत्यक्ष भाजपच्या मनेका गांधींनीही प्रणवदांचे समर्थन केले...

पायाखालची सारीच वाळू अशी घसरली आणि हाती धरायला तिनकाही उरला नाही तेव्हा कलामांची वैज्ञानिक बुद्धी जागी झाली व आपले अंतर्मन आपल्याला ही निवडणूक लढविण्याचा सल्ला देत नसल्याचा त्यांना साक्षात्कार झाला... वैज्ञानिकाची दूरदृष्टी येथे हरली आणि सामान्य माणसाच्या मनातील यशापयशाची खरी गणिते त्यांना शहाणपण शिकवायला पुढे झाली. त्यातून त्यांनी घेतलेला धडा अभिनंदनीय व स्वागतार्ह असला तरी त्या आठ दिवसांत त्यांनी चालविलेल्या राजकीय लपंडावाने आणि वक्तव्यांएवढ्याच मौनाने त्यांचेही पाय मातीचे असल्याचेच साऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

कलामांसारख्या मोठ्या माणसांनी उद्या राजकारणात प्रवेश करायचे ठरविले तर देश त्यांचे स्वागतच करील. मात्र त्यांनी सामान्य नागरिकांसारखे राजकारणात राजमार्गानेच आले पाहिजे. त्यातल्या एखाद्याला एखादेवेळी आडमार्गाने येऊन सर्वोच्च जागी विराजमान होणे जमेलही. मात्र प्रत्येकच वेळी आपण तसे पदासीन होऊ असे त्यांनीही समजणे चुकीचे आहे. त्यातही विजयाचा आगाऊ अंदाज घेऊन व निरिच्छतेचा आव आणून अशी पावले टाकणे आणि पराभव दिसू लागताच अंतर्मनाचा अज्ञात कौल सांगत माघार घेणे हे ढोंग आहे. ढोंगाचा आरोप राजकारणी माणसांनाही शोभेसा नाही. वैज्ञानिकांना तर तो गुन्हेगारीसारखा चिकटणारा व पाहणाऱ्यांना वेदनादायक ठरावा असा आहे.

Tags: सुरेश द्वादशीवार सेंटर पेज डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम वैज्ञानिक राजकारण राष्ट्रपतीपद देश suresh dwadshiwar center page Criminal Scientist Politics President Country Dr. APJ Abdul Kalam weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात