Diwali_4 धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा धर्मवादी पंतप्रधान?
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा धर्मवादी पंतप्रधान?

सारी युरोपीय राष्टे ख्रिश्चनबहुल आहेत, पण ती स्वतःला ख्रिस्ती म्हणवीत नाहीत. सेक्युलर म्हणविण्याचाच ती अभिमान बाळगतात. अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी व इटली यांसारख्या प्रगल्भ देशांच्या राज्यघटनांनीच ते देश सेक्युलर असतील असे घोषित केले आहे. इंग्लंडवर ब्रिटिश चर्चचा वरचष्मा आहे आणि इंग्लंडची राणी ही त्या देशाची राज्यप्रमुख व धर्मप्रमुखही आहे. मात्र त्याही देशात होणारे कायदे सेक्युलर प्रकृतीचेच असतील याविषयी तेथील पार्लमेंट कमालीचे सतर्क राहत आले आहे. दूरचे कशाला, आपल्या शेजारच्या नेपाळनेही आता स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणणे टाकले आहे. मध्यपूर्वेतील अरब देश आणि पाकिस्तान हीच आता धर्मराज्ये म्हणविणारी राष्ट्रे आहेत... भारताने या देशांचे अनुकरण करावे असे भागवतांना म्हणायचे आहे काय?

देशाचा पंतप्रधान हिंदुत्ववादी असावा (किंवा तो तसा का असू नये) हा प्रश्न पुढे करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोहन भागवतांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी तर तोडलीच शिवाय त्या तडाख्याने संघनिर्मित भाजपलाही भेगा पाडल्या.  भाजपात संघातून आलेले अतिदक्ष आणि संघाबाहेरून आलेले कमीदक्ष असे दोन प्रवाह आहेत.

त्यातल्या अतिदक्षांना सरसंघचालकांचे प्रत्येक वक्तव्य वेदवाक्याएवढे श्रद्धेय वाटणारे तर बाहेरून आलेल्या आणि स्वतंत्र विचार करणाऱ्यांना गोंधळात टाकणारे. तरीही शहानवाज, नकवी, मनेका व वरुण गांधी यांच्यासह सुषमा स्वराज आणि यशवंत सिन्हा या साऱ्यांना त्या वाक्याने नुसता हादराच दिला नाही तर त्यांना उद्याच्या राजकारणातून बादही केले आहे. त्यांच्यातली जी माणसे मिळाले तेवढ्यात समाधान मानणारी आहेत ती या धक्क्यानंतर एकवेळ गप्प राहतील. मात्र त्यांपैकी ज्यांची उमेद अद्याप शाबूत आहे त्यांना या हादऱ्याने नक्कीच अस्वस्थ केले असणार...

राष्ट्रीय लोकशाही आघाडीची गोष्ट आणखी वेगळी आहे. ती आघाडी आणि तिच्यातील पक्ष व नेते स्वयंभू आहेत आणि त्यांच्या उभारणीत संघाचा कोणताही वाटा नाही.  जनता दल (यु) हा त्या आघाडीतील भाजपानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे व त्याचे सरकार बिहारमध्ये सत्तारुढ आहे. भागवतांचे वक्तव्य जाहीर होताच त्या पक्षाचे अध्यक्ष शरद यादव आणि बिहारचे त्याचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी त्या विधानावर जोरदार आक्षेप घेतला.

हिंदुत्ववादी पंतप्रधानाचा आग्रह संघ वा भाजपकडून खरोखरीच धरला जाणार असेल तर रालोआमधून आपण बाहेर पडू अशी धमकीही त्यांनी बोलून दाखविली. भागवतांनी त्यांचे हिंदुत्व लातुरात असे जाहीर करण्याआधीच संघ व भाजपा (आणि पर्यायाने रालोआ) यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातच्या नरेंद्र मोदींच्या नावाची परस्पर घोषणा केली होती. ती करण्याआधी त्यांनी भाजपला विश्वासात घेण्याचे कारण अर्थातच नव्हते. मात्र रालोआच्या नेत्यांना गृहीत धरण्याचे त्यांचे धोरण अनाठायी व अनधिकृत असल्याचे नंतरच्या प्रतिक्रियांनी साऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

त्यांच्या घोषणेला छेद देताना ‘रालोआचा पंतप्रधानपदाचा उमेदवार स्वच्छ प्रतिमेचा व सेक्युलरच असला पाहिजे’ असे सांगून नीतिशकुमारांनी सरसंघचालकांना पहिला फटका लगावला.

नीतिशकुमारांच्या मते नरेंद्र मोदी सेक्युलर तर नाहीतच, शिवाय त्यांची प्रतिमा स्वच्छही नाही. गोधरा-कांडानंतर गुजरातेत उसळलेल्या सरकारपुरस्कृत धार्मिक दंगलीत दोन हजारांवर मुसलमानांची कत्तल झाली आणि त्या गदारोळात शेकडो स्त्रियांवर बलात्कार झाले. त्या वेळी पंतप्रधानपदावर असलेले वाजपेयी या भाजपच्या सर्वमान्य नेत्यानेच त्या दंगलीचे वर्णन ‘देशावरील कलंक’ असे केले. त्याच वेळी राज्यकर्त्यांनी राजधर्माचे पालन केले पाहिजे असा उपदेशही त्यांनी नरेंद्र मोदींना जाहीरपणे केला.

अशा ‘कलंकित’ माणसाला पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची वस्त्रे देणे आणि त्याला हिंदू या पवित्र धर्माच्या वंदनीय नेतृत्वाचा मुकुट चढविणे हे स्वतः हिंदू असलेल्या नीतिशकुमारांना सहन झाले नाही. त्यामुळे त्यांनी व त्यांच्या पक्षाने ‘असे होणार असेल तर आम्ही रालोआतून बाहेर पडू’ असे देशाला आता सांगून टाकले आहे. नितीशकुमारांच्या सरकारात भाजपाचे मंत्री सहभागी आहेत आणि त्यांतले सुशीलकुमार मोदी हे उपमुख्यमंत्र्याच्या पदावर आहेत. या सुशीलकुमारांनीही राओलाचा उमेदवार ‘वाजपेयींसारखा सेक्युलर व स्वच्छ प्रतिमेचा असावा’ असे नेमके याच वेळी सांगून भागवतांची भूमिका आपल्यालाही मान्य नसल्याचे जाहीर केले आहे.

बिहारमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदींनी भाग घेऊ नये अशी भूमिका नीतिशकुमारांनी घेतली होती. त्याही वेळी सुशीलकुमार मोदींनी नीतिशकुमारांची बाजू घेतल्याचेच देशाला दिसले होते.

भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वानेही त्या वेळी सुशील व नीतिशकुमारांची समजूत काढण्याचे वा त्यांनी मोदींवर लादलेली बिहारबंदी मागे घ्यायला लावण्याचे प्रयत्न केलेले दिसले नाहीत. रालोआमध्ये एके काळी फारूख अब्दुल्लांचा नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष सहभागी होता. आज तो तेथे असता तर भागवतांना त्यांनी दिलेले उत्तर कसे व कोणते राहिले असते?

अकाली दल हा शिरोणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या नियंत्रणात असलेला शिखांचा पक्ष हिंदुत्ववादी पंतप्रधान या संकल्पनेला कसा प्रतिसाद देईल?

तेलगु देसम हा चंद्राबाबू नायडूंचा पक्षही पूर्वी रालोआत होता. भाजपच्या संघनियंत्रित हिंदुत्वाला साथ देऊन आपण मोठी चूक केली ही गोष्ट आता नायडूच जाहीरपणे सांगत आहेत. देशाच्या पंतप्रधानपदावर आजवर आलेले सर्वच नेते धर्माने हिंदू होते. पण हिंदू असणे आणि हिंदुत्ववादी असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वाजपेयी आणि मोदी यांच्यात जेवढे अंतर आहे तेवढे ते त्या दोन भूमिकांत आहे.

आजवरच्या पंतप्रधानांनी आपला धर्म दुर्लक्षिला नाही. मात्र त्याच वेळी इतर धर्मांचा त्यांनी अधिक्षेपही केला नाही. सर्वधर्मसमभावाची किंबहुना इतर धर्मांच्या जास्तीच्या सन्मानाचीच त्यांनी काळजी घेतली.

ऑपरेशन ब्ल्यू स्टारनंतर आपला जीव धोक्यात घालून अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील हरमिंदरसाहेबांसमोर नतमस्तक होण्याचे मोठेपण विश्वनाथ प्रताप सिंग यांनी दाखविले.

‘या मंदिरात तुम्हाला प्रवेश नाही’ हे मागासलेले विधान इंदिरा गांधींना ऐकविणाऱ्या जगन्नाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना हात जोडून, भगवान जगन्नाथाचे दर्शन मंदिराबाहेर उभे राहून घेण्याचे मोठेपण इंदिरा गांधींनीही दाखविले.

मंदिरे, मशिदी, गुरुद्वारे आणि चर्चेस्‌ या धर्मस्थळांसमोर श्रद्धेने लीन होणाऱ्या आपल्या राजकीय नेतृत्वाला धर्मांचे गडद रंग चढले ते 1992 च्या बाबरीकांडानंतर...दिल्लीत भाजपाप्रणित रालोआचे सरकार सत्तेवर असताना ओडिशा या राज्याच्या ग्रामीण भागात बाराशेहून अधिक ख्रिस्ती धर्मस्थळांची जाळपोळ नवीनकुमार पटनायकांच्या पहिल्या राजवटीत कोणी व कशी केली याची शहानिशा करणे या देशाने आजवर टाळले आहे.

आपल्या दुसऱ्या कारकीर्दीच्या आरंभी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नवीनकुमारांनी भाजपा व रालोआ या दोघांशीही असलेले आपले संबंध का तोडले याचेही कारण या शहानिशेत सापडणारे आहे. 

जम्मू आणि काश्मीर, प. बंगाल, उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, आंध्र व केरळ या राज्यांत मुसलमान नागरिकांची संख्या मोठी आहे तर अरुणाचल, मेघालय, मिझोरम, नागालँड, मणिपूर आणि त्रिपुरा यांसह केरळात ख्रिश्चन मतदार मोठ्या संख्येने आहेत. पंजाबात शीख धर्माचे अनुयायी बहुसंख्य आहेत आणि आदिवासींनी त्यांचा धर्म शोधायला आता सुरुवात केली आहे.

धर्म, भाषा, संस्कृती आणि लोकजीवन या प्रत्येकच बाबतीत एक व्यापक, चांगले व समन्वयी वैविध्य असलेल्या या देशात ‘एका धर्माचा, भाषेचा वा संस्कृतीचा माणूसच पंतप्रधान असावा किंवा का नसावा’ ही भाषा देश राखणारी नाही. असा पंतप्रधान देशाच्या सीमावर्ती प्रदेशांकडे व त्यांतील सर्व धर्मांच्या नागरिकांकडे कसे पाहील व त्यांना तरी याचा भरवसा कसा वाटेल?

गोधराकांडानंतर गुजरातमध्ये जे घडले त्यातून स्वतःला धर्मवादी म्हणविणारा नेता कसा वागू शकतो याचे अत्यंत भयकारी व हिंस्र चित्र देशासमोर उभे राहिले आहे म्हणून हा प्रश्न. सारी युरोपीय राष्टे ख्रिश्चनबहुल आहेत, पण ती स्वतःला ख्रिस्ती म्हणवीत नाहीत. सेक्युलर म्हणविण्याचाच ती अभिमान बाळगतात. अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी व इटली यांसारख्या प्रगल्भ देशांच्या राज्यघटनांनीच ते देश सेक्युलर असतील असे घोषित केले आहे.

इंग्लंडवर ब्रिटिश चर्चचा वरचष्मा आहे आणि इंग्लंडची राणी ही त्या देशाची राज्यप्रमुख व धर्मप्रमुखही आहे. मात्र त्याही देशात होणारे कायदे सेक्युलर प्रकृतीचेच असतील याविषयी तेथील पार्लमेंट कमालीचे सतर्क राहत आले आहे. दूरचे कशाला, आपल्या शेजारच्या नेपाळनेही आता स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणणे टाकले आहे. मध्यपूर्वेतील अरब देश आणि पाकिस्तान हीच आता धर्मराज्ये म्हणविणारी राष्ट्रे आहेत... भारताने या देशांचे अनुकरण करावे असे भागवतांना म्हणायचे आहे काय?...अमेरिका हे प्रोटेस्टंटबहुल पण धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यात होणारा प्रत्येक कायदा व निघणारा सरकारी आदेश धर्म व वर्णनिरपेक्षतेच्या कसोटीवर प्रथम तपासला जातो.

1960 मध्ये जॉन एफ केनेडी या रोमन कॅथॉलिक पंथाच्या नेत्याने डेमोक्रेटिक पक्षाची अध्यक्षीय उमेदवारी मिळविली. त्या वेळी त्याची पोपनिष्ठा आणि संविधाननिष्ठा यांत अंतराय उभा राहिला तर ते कोणाच्या आज्ञा पाळतील हा प्रश्न ऐरणीवर आणला गेला.

सगळ्या कॅथॉलिक पंथाच्या लोकांना पोपची आज्ञा सर्वश्रेष्ठ व शिरसावंद्य मानावी लागते. ही आज्ञा अमेरिकेच्या संविधानाला छेद देणारी असेल तर काय, हा वाद त्यावेळी उपस्थित झाला. या वादाला आपल्या अडीच तासांच्या दूरचित्रवाणीवरील मुलाखतीतून उत्तर देताना केनेडी निःसंदिग्धपणे म्हणाले, ‘माझी पहिली व अखेरची निष्ठा देशाच्या संविधानावर आहे आणि ती तशीच राहणार आहे. कारण कोणत्याही धर्म वा पंथाहून राष्ट्र श्रेष्ठ आहे’. अमेरिकेचे राजकीय सामंजस्य आपल्याहून बरेच प्रगल्भ व प्रगत आहे. आपण मंदिर-मशिदीच्या वादावर राजकारण पेटविणारे लोक आहोत...

भागवतांच्या हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्याची सशस्त्र कामगिरी आपण पाहिली आणि पचविली आहे. अन्य धर्मांच्या राज्यकर्त्यांनी धर्माच्या नावावर याच देशात केलेल्या कत्तलींचा इतिहासही आपल्याला तोंडपाठ आहे...धर्म आणि राजकारण वेगळे राखण्याचे आधुनिक वळण आपण बोलत असलो तरी ते अजून पचविले मात्र नाही. त्याचमुळे अशा वादापायी समाजात दुही माजविणाऱ्या शक्ती आणि व्यक्तींपासून सावध होणे गरजेचे आहे.

Tags: सुरेश द्वादशीवार सेंटर पेज राजकारण धर्म हिंदुत्ववादी मशिदी मंदिर center page suresh dwadshiwar pro-Hindu mosques temples politics religion weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात