डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

संताप ही माणसाची सहजप्रवृत्ती नाही. कधीमधी उफाळणारा तो वृत्तिविशेष आहे. हिंदुहृदयसम्राटांचे संतापणे बारमाही उडणाऱ्या कारंजासारखे असल्याने त्याला चौकात सतत उडत राहणाऱ्या कारंजासारखी जुन्या शिल्पाची शांत कळा आहे. अशा शिल्पाकडे, मग ते देवाचे का असेना, कोणी पूजेच्या भावनेने पाहात नाही. तो साध्या पाहण्याचा व आनंद घेण्याचा विषय होतो. डॉ.मनमोहन सिंग यांच्याजवळ तसाही अशी कारंजी पाहण्याएवढा वेळ नाही. त्यांच्यासमोरची कार्यक्रम पत्रिका मोठी व अखिल भारतीय आहे. तीत राष्ट्रपतिपदाची निवडणूक आहे, संयुक्त पुरोगामी आघाडी राखण्याचे व तिचे सरकार 2014 पर्यंत पुढे नेण्याचे आव्हान आहे, रुपयाच्या उभारणीची व घसरणारी अर्थव्यवस्था सावरण्याची जबाबदारी आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरची अनेक झेंगटेही त्यांना निस्तरायची आहेत. त्यांच्या समोरच्या पत्रिकेत हिंदुहृदयसम्राटांचा विषयही बहुधा नसणार, त्यांच्या उद्रेकाची नोंद नसणार किंबहुना ते स्वतःही नसणार...

पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग या साध्या माणसाविषयी हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी अमंगल व अभद्र शब्दांत काहीतरी लिहिले आणि त्याची थोडी चर्चा महाराष्ट्राने परवा केली. डॉ.सिंग हे त्यांच्यावरील टीकेला कधी उत्तर देत नाहीत. तिची दखल घेण्याचीही त्यांना गरज वाटत नाही. हिंदुहृदयसम्राटांची टीकाही त्यांच्या लेखी बेदखलच राहील. ती तशी राहण्याचे कारण त्यांचे दुबळेपण असणार नाही. तशी दखल घेण्याने लोकशाहीतील खालसा- सम्राटाच्या शब्दांना एक फुकटचे वजन प्राप्त होते म्हणून...

तशीही हिंदुहृदयसम्राटांची दखल आताशा कुणी घेत नाही. काही माणसांना साधे बोलतानाही त्यात शिव्यांची पेरणी करण्याचा सोस असतो. त्यांना साधे बोलवत नाही. साधे व सरळ बोललो तर आपल्याकडे कोणाचे लक्ष जाणार नाही असा त्यांचा समज असतो. हिंदुहृदयसम्राट त्यातले आहेत.

आपल्या तशा बोलण्याला ‘ठाकरी भाषा’ असे एक नावही त्यांनी दिले आहे. 1960 च्या दशकापासून ती भाषा महाराष्ट्र ऐकत आला आणि आता ती त्याच्याही अंगवळणी पडली आहे. किंबहुना ते तसे बोलले नाहीत तर हे ठाकऱ्यांचे बोलणेच नव्हे असेच त्याला वाटू लागले आहे.

ही ठाकरी वाणी आतापर्यंत अनेकांवर बरसली आहे. त्यात यशवंतरावांपासून शरदरावांपर्यंत आणि आचार्य अत्र्यांपासून पु.ल. देशपांड्यांपर्यंतची माणसे चिंब भिजली आहेत. तसे भिजणे त्यांना आरंभी दुखवून गेले असले तरी हळूहळू ते त्यांनाही आवडू लागल्याचेच नंतर दिसले आहे.

पुढे तर त्यांच्यातल्या काहींनी ती सरबत्ती हा आपल्या जाहिरातीचाही भाग मानला. बरेच दिवसांत तसा शिडकावा झाला नाही तर आपले माहात्म्य एवढ्यात कमी झाले की, काय अशी शंकाही त्यांच्यातल्या अनेकांना मग येऊ लागली...त्यांनी अत्र्यांना कुत्रे म्हटले, पुलंची औकात काढली आणि पवारांना शिव्यांची लाखोली वाहिली. यशवंतराव सुटले नाहीत, वाजपेयी वाचले नाहीत आणि सोनिया गांधीही दूर राहिल्या नाहीत.

त्यांनी दाक्षिणात्यांवर निशाणा साधला, उत्तर भारतीयांना लक्ष्य बनविले आणि मुसलमानांना लांडे म्हटले. उडप्यांची हॉटेले तोडली, हिंदी भाषिकांवर हल्ले चढविले आणि मुंबईतील कामगार संघटना जमेल तेवढ्या मोडीत काढल्या...

तेवढ्यावर ते थांबले नाहीत. काँग्रेसवर नाराज झालेल्या मुंबईकरांनी त्यांच्या पक्षाच्या बाजूने कौल दिला तेव्हा आपल्या पक्षाच्या पुढाऱ्यांचा पाणउतारा करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.

मोरारजींचे स्मारक मुंबईत उभारण्याची मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी गुजरातमध्ये केलेली घोषणा त्यांनी त्यांना तेथेच गिळायला लावली आणि पूर्वी ‘बैलासारखा काम करतो’ म्हणून प्रशंसा केलेल्या नारायण राण्यांना बदडून काढायलाही ते पुढे झाले. भुजबळांवर तोंडसुख घेताना ते थकत नाहीत आणि पत्रकारांवर राग काढताना त्यांच्या प्रतिभेला वेगळी धार चढते...

एके काळी त्यांचे तसे वार वृत्तपत्रांचे रकाने व्यापत. पण मग तो रोजचा प्रकार होत गेला आणि त्यातली बातमी संपली. मात्र तशा प्रसिद्धीचा ध्यास जडलेल्या हिंदुहृदयसम्राटांनी त्यासाठी आणखी आक्रमक क्लृप्त्या शोधून काढल्या.

पाकिस्तानवर बहुसंख्य भारतीयांचा या ना त्या कारणासाठी राग आहे. त्या रागाचे भांडवलच अनेक पक्षांना व संघटनांना आजवर जिवंत ठेवत आले आहे. हिंदुहृदयसम्राटांनी तो धागा हाती धरला.

मात्र त्यासाठी त्यांनी काश्मीरात येणाऱ्या सशस्त्र अतिरेक्यांना लक्ष्य बनविले नाही. हातात क्रिकेटची बॅट घेऊन भारतीयांचे मनोरंजन करण्यासाठी येणाऱ्या निःशस्त्र खेळाडूंना निशाणा बनविले. घुसखोरांना रोखू असे न म्हणता, या खेळाडूंना येऊ देणार नाही अशी गर्जना केली. परकीय खेळाडूंच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या सरकारने त्यांचे मुंबईत येणे थोपविले तेव्हा हिंदुहृदयसम्राटांनी दिल्लीचे मैदान खोदून काढण्याचा पराक्रम केला.  

उद्धव ठाकरे या युवराजांना शिवसेनेचा पट्टाभिषेक करायला ते पुढे झाले तेव्हा राज ठाकरे या पुतण्याने बंड पुकारून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ताज्या पक्षाची स्थापना केली, तेव्हा त्यांचा झालेला तिळपापड महाराष्ट्राने कधी विसरू नये असा होता.

त्या काळात त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रत्येक विधानाला छेद देण्याचा उद्योग करून पाहिला. राज ठाकरे काय बोलतील याचा आगाऊ अंदाज घेऊनही तसा छेद देण्याचा प्रयत्न ते करीत राहिले.

सचिन तेंडुलकरवर याच भरात त्यांनी बॅट उचललेली आपण पाहिली. हिंदुहृदयसम्राटांना संतापायला वेळ वा कारण लागत नाही. संताप ही साध्या बोलण्यासारखीच त्यांची अभिव्यक्ती आहे.

खाजगीत ते प्रेमळपणे बोलतात असे सांगितले जाते. सार्वजनिक क्षेत्रातली त्यांची प्रतिमा मात्र वेगळी आहे. त्यात ते बोलत नाहीत, गर्जत असतात. ‘त्यांची गर्जना ऐकायला या’ अशाच त्यांच्या सभांच्या जाहिराती केल्या जातात. माणसांचीही गंमत असते. तसले काही ऐकायला त्यांनाही आवडत असते.

मराठी आणि हिंदू हे लोकांना भावणारे शब्द आहेत. ती त्यांची धारणाही आहेच. एकदा ती घट्ट धरली की तिच्याआडून केलेला कोणताही वार त्या धारणेला धरून असणाऱ्यांना आवडतो. आपल्या वतीने हिंदुहृदयसम्राट असे बोलताना पाहिले की शिवी देण्याची दाबून धरलेली अनेकांची ऊर्मी सुखावते आणि शांत होते. हिंदुहृदयसम्राटांचे बळ त्यांच्या तशा शांत होण्यात असते. लहान मुलांच्या खोड्यांचे, बोबड्या बोलांचे किंवा वेड्यावाकड्या उड्यांचे जसे कौतुक असते तसेच कौतुक मग हिंदुहृदयसम्राटांच्याही वाट्याला येते. त्यांच्या शिव्यांचा व टीकेचा परिणाम मात्र होत नाही. तसा तो कधीचाच संपला आहे.

संताप ही माणसाची सहजप्रवृत्ती नाही. कधीमधी उफाळणारा तो वृत्तिविशेष आहे. हिंदुहृदयसम्राटांचे संतापणे बारमाही उडणाऱ्या कारंजासारखे असल्याने त्याला चौकात सतत उडत राहणाऱ्या कारंजासारखी जुन्या शिल्पाची शांत कळा आहे.

अशा शिल्पाकडे, मग ते देवाचे का असेना, कोणी पूजेच्या भावनेने पाहात नाही. तो साध्या पाहण्याचा व आनंद घेण्याचा विषय होतो. 

डॉ.मनमोहन सिंग यांच्याजवळ तसाही अशी कारंजी पाहण्याएवढा वेळ नाही. त्यांच्यासमोरची कार्यक्रम पत्रिका मोठी व अखिल भारतीय आहे. तीत राष्ट्रपतिपदाची निवडणूक आहे, संयुक्त पुरोगामी आघाडी राखण्याचे व तिचे सरकार 2014 पर्यंत पुढे नेण्याचे आव्हान आहे, रुपयाच्या उभारणीची व घसरणारी अर्थव्यवस्था सावरण्याची जबाबदारी आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरची अनेक झेंगटेही त्यांना निस्तरायची आहेत.

त्यांच्या समोरच्या पत्रिकेत हिंदुहृदयसम्राटांचा विषयही बहुधा नसणार, त्यांच्या उद्रेकाची नोंद नसणार किंबहुना ते स्वतःही नसणार...

गंमत ही की हिंदुहृदयसम्राट हा आता त्यांच्या मित्रपक्षांच्याही लेखी फारसा गांभीर्याने घ्यावा असा विषय उरला नाही. भारतीय जनता पक्षाचे आताचे पुढारी व त्यांच्या विस्तारित परिवाराचे लोक त्यांची फारशी दखल घेत नाहीत. त्याही बिचाऱ्यांना कर्नाटक सावरायचे आहे, संगमांचे ओझे उचलून न्यायचे आहे आणि नरेंद्र मोदींची रंगसफेदी करायची आहे.

‘हिंदुत्ववादी पंतप्रधान’ ही घोषणा त्यांच्या मूळपीठानेच आता केली असल्याने या जुन्या हिंदुहृदयसम्राटाचे महत्त्व अधोरेखित करणे त्यांना जमणारही नाही.

भाजपा हा स्वतःला अखिल भारतीय म्हणविणारा पक्ष आहे. मुंबईत अडकलेल्या आणि मनसेने तोडलेल्या हिंदुहृदयसम्राटांचे आणि त्यांच्या पक्षाचे म्हणणे त्याने तरी किती काळ ऐकायचे?

प्रमोद महाजन ऐकून घ्यायचे, अडवाणीही कधीमधी यायचे. आताचे मराठी पुढारीही तसे करणे टाळतात. ते दुरून प्रशंसा करतात आणि स्वतःच्या नाटकावर प्रसन्न होतात. बाकी महाराष्ट्राबाहेरचे त्याचे पुढारी मुंबईत आले तरी वांद्य्राकडे फिरकत नाहीत. अगदी नरेंद्र मोदीही येत नाहीत.

शिव्यांनी सोबत आणलेल्या माणसांनाही काही काळानंतर त्यांचा उबग येतो. मग ती माणसेही ‘आम्ही रांगोळी चितारतो, पण ते ती पुसून टाकतात’ असे म्हणताना दिसतात. जुळलेली माणसेही तसल्या वाणीचे समर्थन करीत नाहीत. त्यांच्यामुळे वाट्याला आलेले लाभ अनुभवणारी माणसेही अशा वेळी गप्प राहणे पसंत करतात.

अनुयायांचे गप्प राहणे हीच मग नेत्यांची ताकद होते. त्या बळावर अंगी कोणतेही स्वयंभू मोठेपण नसणारी नेत्यांची उत्तराधिकारी माणसेही मग तशीच बोलू लागतात. ‘अरे, नालायकांनो’ अशी व्याख्यानाची सुरुवात करून आपल्या राजकीय विरोधकांना ती काहीही निरर्थक ऐकविताना दिसतात.

अनेकांना हिंदुहृदयसम्राटांचा थयथयाट प्रामाणिक वाटला आहे. त्यांचे राजकारणही अनेकांना लोकशाही संकेतांना धरून असल्याचे श्रद्धापूर्वक वाटले आहे. हिंदुहृदयसम्राटांची रामपंचायतनासारखी आजवर प्रकाशित झालेली चित्रेही त्यांना तेवढीच पूज्य वाटली आहेत. हिंदुहृदयसम्राट मध्यभागी बसले आहेत, त्यांच्या उजव्या हाताला उद्धव आणि डाव्या हाताला राज हे ठाकरेद्वय विराजमान आहेत आणि लोकसभेच्या सभापतिपदावर असलेले मनोहर जोशी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर राहिलेले नारायण राणे आणि मुंबईचे महापौर अशी लोकनियुक्त बडी माणसे त्यांच्या मागे भालदार-चोपदारासारखी विनम्रभावे उभी आहेत अशी छायाचित्रे त्यांच्या ‘सामना’तच नव्हे तर इतरही वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्राने पाहिली आहेत. ती लोकशाहीची विटंबना करणारी आणि इतिहासजमा झालेल्या राजेशाहीची उजळणी करणारी आहेत, असेही त्यांच्यातल्या कोणाला वाटले नाही. नेत्यांना चालणाऱ्या श्रद्धाखोर सरंजामशाहीचा पण लोकशाहीत न बसणारा हा दुर्दैवी प्रकार आहे.

अशा नेतृत्वाने देशाच्या पंतप्रधानपदावर असणाऱ्या आदरणीय नेत्याविषयी अपशब्द वापरले असतील तर ते अशा या संस्कृतीशी जुळणारेही आहेत. तथापि, हा सारा करमणुकीचा भाग आहे. तो तसाच पाहायचा किंवा पाहून न पाहिल्यासारखा व ऐकून न ऐकल्यासारखा करायचा.

मात्र हे राजकारण नव्हे, मराठीपण नव्हे आणि हिंदू असणेही नव्हे.

Tags: सुरेश द्वादशीवार राज ठाकरे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे डॉ.मनमोहन सिंग सेंटर पेज center page Suresh Dwadshiwar Raj Thackeray Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Dr. Manmohan Singh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके