डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दानधर्मापासून विकासाच्या संकल्पनेपर्यंत

समाजाचे जसे जसे प्रबोधन झाले तसा तसा दानधर्माचा दृष्टिकोन हळूहळू मागे पडू लागला, व समाजकार्य म्हणजे व्यक्तीच्या किंवा समाजाच्या समस्या सोडविणे असा अर्थ दृढ होऊ लागला. यातूनच आपल्या देशात सामाजिक सुधारणेची चळवळ, व्यावसायिक समाजकार्य या संकल्पना निर्माण झाल्या. समाजसुधारणेची यापुढची पायरी म्हणजे प्रतिकारात्मक (प्रिव्हेंटिव्ह) समाजकार्य.

सामाजिक समस्या या विकासाच्या आड येणाऱ्या एक अडसर होत्या. त्यामुळे प्रत्येक समाजात त्या सोडविण्यासाठी काही योजना केलेल्या होत्या. ढोबळमानाने आपण त्याला दानधर्माचा दृष्टिकोन असे म्हणू. दानधर्म ही संकल्पना बऱ्याच मर्यादेपर्यंत धर्माशी निगडीत होती. या दृष्टिकोनातून दान देणारा वरच्या पातळीवरचा व घेणारा त्या दृष्टीने खालच्या पातळीवरचा असे मानले जाई. दान दिल्याने दान देणाऱ्याचे पापक्षालन होते व तो मोक्षाप्रत जातो. दान ही हक्कापेक्षा दान घेणाऱ्याच्या तोंडावर फेकलेली भाकरी या दृष्टिकोनातून दानधर्माकडे पाहिले जाई. थोडक्यात दानधर्म दाताकेंद्रित होते व दान घेणारा हा दुय्यम प्रतीचा मानला जाई. सत्पात्रास दान यामध्येसुद्धा दान देणारा सत्पात्र असतोच असा गर्भित अर्थ.

समाजाचे जसे जसे प्रबोधन झाले तसा तसा दानधर्माचा दृष्टिकोन हळूहळू मागे पडू लागला, व समाजकार्य म्हणजे व्यक्तीच्या किंवा समाजाच्या समस्या सोडविणे असा अर्थ दृढ होऊ लागला. यातूनच आपल्या देशात सामाजिक सुधारणेची चळवळ, व्यावसायिक समाजकार्य या संकल्पना निर्माण झाल्या. समाजसुधारणेची यापुढची पायरी म्हणजे प्रतिकारात्मक (प्रिव्हेंटिव्ह) समाजकार्य. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण करणे की सामाजिक समस्या निर्माणच होणार नाहीत; किंवा कमी निर्माण होतील. यापुढची पायरी म्हणजे विकासाची संकल्पना. म्हणजे समाजकार्यामध्ये किंवा सामाजिक सुधारणांमध्ये दान-धर्म ते समाज किंवा व्यक्ती विकास हा विचार दृढ होऊ लागला.

प्रस्तुत लेखामध्ये आपण विकास या संकल्पनेचा विचार करणार आहोत.

सामाजिक न्याय हा विकासाचा आत्मा आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेसुद्धा विकास ही संकल्पना मांडताना, सामाजिक न्यायावर भर दिला आहे. विकास म्हणजे नुसती संपत्ती निर्माण करणे नव्हे. जर संपत्ती निर्माण करून ती काही लोकांच्याच हातात राहत असेल व समाजरचना अन्यायावर आधारलेली असेल तर विकास साधला असे म्हणता येणार नाही.

यामुळेच विकासासंबंधीच्या आपल्या अहवालात संयुक्त राष्ट्रसंघटनेने म्हटले आहे. It cannot be overemphasised that what development implies for the developing countries is not simply an increase in productive capacity but major Transformation in their social & economic structures."

"विकसनशील देशांच्या संदर्भात विकास या संकल्पनेत फक्त उत्पादन क्षमतेत वाढ एवढाच विचार न येता, त्यांच्या सामाजिक व आर्थिक संरचनेत बदल होणे हेही अभिप्रेत आहे." (United Nations Publications- Towards Accelerated Development Proposals for the second U. N. Development Decade.)

विकासाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे विकासाची प्रक्रिया चालू असताना काही मूल्ये आपणास जोपासावी लागतात. किंबहुना विकास ही संकल्पनाच मूल्याधारीत आहे. मूल्य याचा या ठिकाणी अर्थ आपण मान्य केलेली तत्त्वे, जी आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः भारतासारख्या विकसनशील देशाला मूल्याधारीत विकासाकडे पाठ फिरवून चालणार नाही.

जबाबदारीची जाणीव हे एक मूल्य विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. फुकट मिळते आहे, आपल्या ताटात घ्या, अशी वृत्ती विकासाच्या विरुद्ध आहे. आदिवासी कल्याणासाठी मिळणाऱ्या सवलती व पैसा जर एखादा आदिवासी दारू पिण्यासाठी वापरत असेल तर तो विकासाचा खून होईल. या ठिकाणी आदिवासी क्षेत्र हे वानगीसाठी एक उदाहरण घेतले आहे. आपला क्रिकेट संघ विश्व करंडक स्पर्धेत विजयी होऊ शकत नाही म्हणून स्टेडियम जाळू पाहणारे उच्चभ्रू प्रेक्षकही जबाबदारीची जाणीव नसणारे म्हणावे लागतील.

विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे दुसरे मूल्य म्हणजे सरकारने सर्व केले पाहिजे, माझा यामध्ये काही वाटा नाही, अशी नकारात्मक भूमिका घेणे. याबाबतीत अमेरिकेचे दिवंगत अध्यक्ष जॉन केनेडी यांचे एक वाक्य मार्गदर्शक ठरेल. “My fellow citizens, ask not what America can do for you but think what you do for America." विशेषतः भारतासारख्या, दीडशे वर्षे गुलामगिरीत असलेल्या देशामध्ये सरकारने सर्व करावे ही वृत्ती बळावत जाण्याची शक्यता आहे. या दृष्टीने भारतातील स्वयंसेवी संस्था, भारताच्या विकासातील मोठा वाटा उचलू शकतील. त्याचप्रमाणे स्थानिक नेते व कार्यकर्तेही विकासाच्या कामात महत्त्वाचे योगदान करतील. विशेषतः ग्रामीण भागात शिक्षक, सरपंच, सहकारी सोसायट्यांचे कार्यकर्ते, पारंपरिक नेते वगैरे हे काम जोमाने करू शकतील.

विकासाच्या बाबतीत समतोल विकास हे एक मूल्य महत्त्वाचे आहे. समतोल विकास विशेषतः दोन-तीन प्रकाराचा साधावा लागेल. विकासाने श्रीमंत गरीब हे अंतर नष्ट नाही तरी कमी झाले पाहिजे. प्रत्येक नागरिकाच्या निदान मूलभूत गरजा भागतील याची काळजी घेतली पाहिजे. माणसामाणसांमध्ये फरक होता कामा नये. तसेच देशातील मागास भागांचा विकास झाला पाहिजे. या दृष्टीने दुर्बल घटकांना व मागास भागांना थोडेसे झुकते माप दिले तरी चालेल. सर्वांत शेवटी भौतिक विकास व मानसिक घडण यांचा ताळमेळ साधला पाहिजे. नुसत्या शाळांच्या इमारती बांधून शिक्षणाचा प्रसार होणार नाही. या शाळांमध्ये गरीब पालक आपले पाल्य पाठवितात किंवा नाही हे पाहिले पाहिजे. पाठवीत नसल्यास ते न पाठविण्याच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे. अशा प्रकारे विकासाच्या बाबतीत विकास सर्वकष व सर्वस्पर्शी कसा होईल हे पाहिले पाहिजे.

विकासाच्या संकल्पनेसंबंधी माझे विचार थोडक्यात मांडले आहेत. दानधर्मापासून विकासासंबंधीच्या प्रवासाचा आढावा आपण थोडक्यात घेतला आहे. यापुढील लेखात विकासक्षेत्रात कोणकोणत्या नवीन दिशा आहेत, आज नवीन प्रश्नांमुळे विकासाची दालने कशी विकसित होत आहेत ते पाहू.

Tags: न्याय सामाजिक मूल्य दानधर्म विकास Justice Values Charity Development weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके