डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

निष्कलंक चारित्र्यवान नेत्याची जनता कदर करते. ज्या-ज्या वेळी नानांना सत्तेचा लाभ झाला त्यावेळी सत्तेचा उपयोग त्यांनी समाजासाठी केला. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कायमस्वरूपी सुभेदाऱ्या निर्माण केल्या नाहीत. सत्तेचा वापर कष्टकरी, शेतकरी, कामकरी जनतेच्या भल्यासाठी केला. सतत अस्वस्थ असणारी माणसेच कार्यप्रवण बनून समाजाला प्रेरणा देतात.

प्रा. मधू दंडवते यांची वयाची 75 वर्षे 21 जानेवारीला पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या राजकीय जीवनपटावरील त्यांची विविध रूपे आठवली. समाजवादी चळवळीत एसेम, नानासाहेब यांच्या निधनानंतर आलेले काहीसे पोरकेपण नाना दंडवते यांच्यामुळे भरून निघत आहे . एसेम, नानासाहेबांनंतर स्वपक्षीयांबरोबरच विरोधकांच्याही आदरास पात्र ठरलेले नानांसारखे व्यक्तिमत्त्व तसे विरळेच. स्वातंत्र्याच्या ध्येयप्राप्तीसाठी व त्यानंतर सुराज्य निर्मितीसाठी आपल्या प्राणांची व सर्वस्वाची बाजी लावणारी पिढी आता दिवसेंदिवस अस्तंगत होत आहे. सध्याच्या ओंगळवाण्या व मूल्यहीन राजकारणाच्या पार्श्वभूमीवर नानांसारखी प्रामाणिक सत्शील चारित्र्याची माणसे मिळणे दुरापास्त आणि म्हणून गेली चाळीस वर्षे माझ्या सामाजिक जीवनात नाना दंडवते हे दीपस्तंभ राहिले आहेत. 

नानांची किती रूपे आठवावीत, गोवामुक्ती लढयातील सत्याग्रही, 1942 च्या चलेजाव आंदोलनातील अग्रणी, अभ्यासू वक्ता, उत्तम संसदपटू, मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजातील विद्यार्थिप्रिय प्राध्यापक. 1975 च्या आणीबाणीनंतर दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी जनजागर करणारा नेता, जनता राजवटीतील कार्यक्षम रेल्वेमंत्री, कोकण रेल्वेचा शिल्पकार, पुढे केंद्रीय अर्थमंत्री आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद- नानांचा राजकीय जीवनाचा आलेख चढताच राहिला. या सबंध राजकीय प्रवासात नानांची सामान्य माणसांच्या प्रश्नांविषयी तळमळ कधीच कमी झाली नाही आणि म्हणून माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला नानांचे हेच रूप भावते. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांची स्पंदने जाणण्याचे विलक्षण सामर्थ्य नानांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यांना अष्टावधानी व्यक्तिमत्त्व म्हणणे अपुरे होईल. महाभारतात अष्टावक्र व जनक राजाच्या संवादाला अष्टावक्राची गीता म्हणतात. या गीतेमध्ये दृश्य, दर्शक आणि दृष्टा या शब्दांचे अर्थ सांगताना अष्टावक्र म्हणतो जे आपण पाहतो ते दृश्य, जे दुसऱ्याने पाहावे म्हणून आपण जे करतो ते दर्शक व स्वतःच्या कृत्याकडे त्रयस्थाच्या नजरेने जो पाहतो तो दृष्टा. नानांचे व्यक्तिमत्त्व अष्टावधानी माणसांपेक्षाही अधिक गूढ वाटावे असे मला जाणवले.

‘साधना’ साप्ताहिकात आताचे आमदार हुसेन दलवाई यांचा लेख छापलेला होता. त्यात जनता दलावर प्रखर टीका केली होती. नाना मला म्हणाले, ‘तू साधना वाचलास का? हुसेनने खूपच टीका केली आहे.’ मला त्यांच्या बोलण्यात हुसेनबद्दल कटुता जाणवली नाही. उलट हुसेनच्या नजरेने ते स्वतःकडे बघताहेत असे वाटले. असेच एकदा केंद्रीय अर्थसंकल्पावर नानांचे नेहमीप्रमाणे भाषण होते. नव्या आर्थिक धोरणावर दंडवते यांनी झोड उठविली होती. त्यांचे भाषण प्रभावी झाले, त्यांचे भाषण आणि त्यांनी स्पष्टपणे मांडलेली मते मला आवडली होती आणि दुसऱ्याच दिवशी दंडवते यांच्या वक्तव्यावर त्यांचे परममित्र साथी सदानंद वर्दे यांनी टीका केलेली वाचनात आली.

मला वाईट वाटले त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी अपना बाजारच्या कामानिमित्त मी वर्देसरांना फोन केला तर फोन उचलला तो दंडवते यांनीच. मला आश्चर्य वाटले. मी त्यांना म्हटले, ‘नाना, वर्देसरांनी केलेली टीका वाचलीत का?’ नाना म्हणाले, ‘अरे ते अनुचे स्वतःचे मत आहे. माझ्यापेक्षा वेगळी मते असू शकतात. त्यामुळे माझ्या मैत्रीत फरक पडण्याचे कारण नाही.’ अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारे कित्येक पुढारी स्वतःच्याविरुद्ध बोलणाऱ्यांबद्दल आयुष्यभर मनात अढी बाळगून असतात. या पार्श्वभूमीवर नाना म्हणजे ग्रेट माणूस आहे.

विद्वत्ता आणि रसिकता 

या माणसाकडे विद्वत्ता आणि रसिकता यांचा सुंदर मिलाप आहे. आइन्स्टाइनचा सिद्धांत शिकविताना कुसुमाग्रजांची कविता वाचल्याचा भास होतो. तर कित्येक लेखकांचे उतारेच्या उतारे भाषणात सहजपणे त्यांच्या मुखातून बाहेर पडतात. नाना म्हणजे तत्त्ववेत्ता पण व्यवहारी तडजोडीचे शहाणपणसुद्धा त्यांच्याकडे आहे.

नानांनी अहंपणाला व क्षुद्र व्यक्ति- प्रतिष्ठेला कधीच थारा दिला नाही कोणतीही व्यक्ती जितकी स्वतःच्या विचारात गुरफटते तितकी दुसऱ्यासाठी कार्य करण्याची तिची शक्ती कमी होत जाते. माणूस स्वार्थी बनत चालला की तो अतिबेभान बनत जातो. याची नेमकी जाणीव नानांच्या व्यवहारात दिसून येते 1995 साली लोकसभा निवडणुकीपूर्वी नानांना देण्यासाठी एक निधी जमा केला होता. माझ्या माहितीनुसार तो जवळजवळ सात-आठ लाख रुपये निधी जमा झाला होता. परंतु नानांनी तो स्वीकारण्यास विनम्र नकार दिला आणि तसाच सामाजिक कामासाठी देऊन टाकला. समाजाकडून जमा केलेला पैसा वैयक्तिक लाभासाठी वापरू नये ही त्यांची भूमिका त्यांनी कधीच सोडली नाही. 

कोकणचा आवडता राजा बॅ. नाथ पै यांच्या निधनानंतर राजापूरची लोकसभेची जागा दंडवते सतत जिंकत आले. ही जागा त्यांनी पैशाच्या पाठबळाशिवाय राखली. त्यांच्या सतत निवडून येण्याने एका निष्कलंक चारित्र्यवान नेत्याची जनता कदर करते असेच म्हणावे लागेल. ज्या-ज्या वेळी नानांना सत्तेचा लाभ झाला त्या वेळी सत्तेचा उपयोग त्यांनी समाजासाठी केला. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कायमस्वरूपी सुभेदाऱ्या निर्माण केल्या नाहीत. आपल्या राजकीय सत्तेचा लाभ कष्टकरी, शेतकरी, कामकरी जनतेच्या भल्यासाठी केला. मच्छिमार समाजाला डिझेलमध्ये सवलत देणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आणि चाळीस हजार संपकरी रेल्वे कामगारांना पुन्हा रेल्वेत सामावून घेणे ही त्यांची बोलकी उदाहरणे आहेत. 

सामान्य कार्यकर्त्याशी जवळीक 

नानांचे आणखी एक वैशिष्ट्य की ते सामान्य कार्यकर्त्यांशी जवळिकीने वागतात. फटकून वागत नाहीत. आमच्या नायगावातील कार्यकर्त्यांची घरे त्यांना नावानिशी माहीत आहेत. नायगावात आल्यानंतर बाबा तावडे यांना घेऊनच कोकणात जात. 

अपना बाजाराच्या सुवर्ण महोत्सवी समारंभास देशाचे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल जातीने उपस्थित राहिले आणि याचे श्रेय सर्वस्वी नानांकडे जाते हे वेगळे सांगायला नको . अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगामुळे आमच्या नियोजित समारंभाच्या तारखा सतत बदलत होत्या. त्यामुळे नोकरशाही कार्यपद्धतीचा जवळून अनुभव आलाच पण पोलिसी ससेमिराही मागे लागला. अशावेळी नको तो पंतप्रधानांचा कार्यक्रम असे झाले होते. पण दंडवते यांनीच आमची समजूत काढली. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले. याची प्रचिती आज येत आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे अपना बाजारला अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली. त्याचा लाभ आज मंदीच्या काळातही होत आहे. अपना बजार याबद्दल दंडवते यांचा कायम ऋणी राहील. अपना बाजारचे कार्यकर्ते हे प्रा. मधू दंडवते यांचे अनुयायी आहेत हे माहीत असल्याने विविध पक्षीय कार्यकर्त्यांकडून आम्हाला कधीच कोणते अडथळे आले नाहीत व येणार नाहीत याचेही श्रेय नानांकडेच जाते. 

वैयक्तिक नफ्या-तोटयाच्या मापदंडाने नानांच्या सामाजिक-राजकीय कामाचे मोजमाप करणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांना मधू दंडवते हे रसायन कळणे शक्य नाही असे वाटते . कारण अजून त्यांच्या जवळच्यांनाच ते कळलेत का अशी शंका येते. 

शेवटी पंचाहत्तरी ओलांडली म्हणून नाना स्वस्थ थोडेच बसणार आहेत. स्वस्थ बसणारी, निवृत्त होऊन स्वास्थ्य पत्करणारी माणसे क्रमाक्रमाने गंजतात. प्रभावहीन ठरतात. सतत अस्वस्थ असणारी माणसेच कार्यप्रवण बनून समाजाला प्रेरणा-दिशा देतात. नानांकडून यापुढील काळातही असेच प्रेरणादायी नेतृत्व मिळेल अशा अपेक्षेत माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते असतील यात शंका नाही.
 

Tags: अपना बझार साधना प्रा. मधु दंडवते सुरेश तावडे Apana Bazar Sadhana Madhu Dandavate Suresh Tawade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके