डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

संघर्ष : बिबळ्या आणि मानवातील

मचाणावर आरामात बसून खाली बांधलेल्या बकऱ्यावर येणाऱ्या वाघ किंवा बिबळ्याची शिकार करणं यात कसलंही शौर्य नाही. तर ते मोठं क्रौर्य आहे. 'जगा आणि जगू या' या न्यायाने माणसानं जगावं. अरण्य, पर्यावरण राखणाऱ्या वाघ आणि बिबळ्याच्या रक्षणातच मानव जातीचं खरं हित आहे. जातीय व धार्मिक दंगलीत असंख्य लोकांचे प्राण घेतले जातात. त्याचे कुणाला काही वाटत नाही. मात्र अन्याय झालेल्या एखाद्या बिबळ्याने कुणाला जखमी केले तर लगेच आरडाओरडा होतो, प्रसारमाध्यमे त्यांचे रंजक वृत्त देतात. हा बिबळ्यावरील अन्याय थांबला पाहिजे. त्याचा जगण्याचा हक्क आपण मान्य केला पाहिजे.

मार्जार कुळातील बिबळ्या हा अतिशय देखणा असा शिकारी वन्यजीव आहे. त्याच्या पिवळ्याधमक शरीरावरील काळ्या ठिपक्यांमुळे त्याचे लावण्य अधिक खुलून दिसते. त्याचसाठी या सुंदर जीवाची भारतातील अनेक प्रदेशात हत्या होत आहे. बिबळ्याच्या पृथ्वीवर एकूण चौदा उपजाती आहेत. त्यापैकी भारतीय उपखंडात भारतीय बिबळ्या, सिक्कीम व नेपाळी बिबळ्या, सिंध बिबळ्या, काश्मिरी बिबळ्या या चार उपजाती आढळतात. पाचवी उपजात पर्शियन बिबळ्या क्वचित आढळते. जवळजवळ ती नामशेष झाल्याच्या यादीत आहे. याशिवाय हिमालयातील नेपाळ परिसरात हिमबिबळ्या व अरुणाचल प्रदेशात ढगाळ बिबळ्या या प्रजाती आढळतात. भारतीय बिबळ्या हा भारतात हिमालयात आठ हजार फूट उंचीपर्यंत आढळतो. हिमालयाच्या पायथ्यालगतच्या जंगलात त्याचं वास्तव्य आहे. याशिवाय भारतातील वर्षावने, दलदलीचे पाणथळ जंगल, झुडपी व काटेरी जंगल, दऱ्याखोऱ्यांचा व पहाडी प्रदेश, मैदानी गवताळ प्रदेश या सर्व परिसरात त्याचं वास्तव्य आहे. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, अंध्र प्रदेश, बिहार, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, पश्चिम बंगाल, आसाम, ओरिसा, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, गुजरात, केरळ, जम्मू काश्मीर, मणीपूर, त्रिपुरा, नागालँड, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ या सर्व राज्यात भारतीय बिबळ्याचा वावर आहे.

पट्टेवाल्या भारतीय वाघांची देशातील एकूण संख्या 3750 आहे, तर बिबळ्यांची संख्या 7500 आहे. सर्वांत जास्त विबळे मध्यप्रदेश राज्यात आहेत. त्यांची संख्या 2036 आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात 1995 आहे. प्रदेशातील अरण्यात 821 बिबळे आहेत. गुजरात राज्यात 796 बिबळे आहेत. बिबळ्याच्या संख्येत महाराष्ट्राचा देशात पाचवा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील बिबळ्यांची संख्या 600 आहे. बिबळ्या हा कोणत्याही प्रकारच्या पर्यावरणाशी आणि वातावरणाशी जुळवून घेणारा प्राणी आहे. कुठेही जगण्याची व मिळेल त्याची (मनुष्य वगळता) शिकार करून पोट भरण्याची त्याची तयारी असते. तोंडापासून शेपटीपर्यंत बिबळ्या सात फूट लांब असतो, त्याची शेपटी तीन फुटांपर्यंत लांब असते. नर बिबळ्याचे वजन 68 किलोपर्यंत भरते. मादी नरापेक्षा लहान असते. तिची शेपटीपर्यंत लांबी 6 फूट व वजन 50 किलोपर्यंत असते. बिबळ्याच्या मादीला वर्षभरात कधीही दोन पिल्ले होतात. कधीकधी तीन ते चारही होतात. तीन महिने मादी गर्भावस्थेत असते. जन्मतः पिल्लं अंध असतात. आठ दिवसांनी त्यांचे डोळे उघडतात. चार महिन्यांपर्यंत पिल्ले आईचे दूध पितात. त्यानंतर पिल्लांची आई त्यांना मांस खायला घालते. शिकार करायला शिकविते. मादी पिल्ले अडीच वर्षात व नर पिल्ले चार वर्षांत प्रजननक्षम बनतात. बिबळ्याची वयोमर्यादा तीस वर्षे असते.

सांबर, चितळ, भेकर, ससे, नीलगाय, रानडुक्कर, काळवीट, वानरं, माकडं हे बिबळ्याचं नैसर्गिक खाद्य आहे. काही मिळाले नाहीत तर झाडावर त्याला चढता येत असल्याने रात्री घरट्यातील पक्षी आणि त्यांची पिल्लं पकडून खातो. रानघुशी व रानउंदरांची शिकार करतो. सरडे, खेकडे पकडून खातो. त्याला रोज आठ किलो मांस लागते. हरणाची शिकार त्याला पाचसहा दिवस पुरते. आपलं भक्ष्य तो झाडावर किंवा पालापाचोळ्यात लपवून ठेवतो. त्यावर डल्ला मारण्यासाठी गिधाडं आणि तरस टपलेले असतात.

आज देशातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात जंगलतोड आहे. त्याचबरोबर बिबळ्याचं नैसर्गिक खाद्य असलेली हरणं व इतर वन्यजीवांची माणसानं अंधाधुंद शिकार केली, त्यांच्या खाद्यावर स्वतःचं पोट भरलं. त्यामुळे अनेक भागात बिबळ्याची उपासमार सुरू झाली. त्याला प्यायला पाणी मिळेनासं झालं. त्यामुळे जगण्यासाठी त्याला मनुष्यवस्तीकडे येणं भाग पडलं. मनुष्य वस्तीतील गुरे, शेळ्या-मेंढ्या आणि गावातील कुत्री मारून जगण्याची पाळी त्याच्यावर आली. त्यातूनच बिबळ्या आणि माणसांचा संघर्ष सुरू झाला. रानावनात चरायला जाणाऱ्या गुरांवर बिबळ्या घाड घालू लागला. त्यावेळी गुराखी त्याला प्रतिकार करतात. अशावेळी बिबळ्याकडून ते जखमी होतात. कधीकधी झटापटीत ठारही होतात. त्यावेळी बिबळ्यावर नरभक्षकाचा शिक्का मारला जातो. वृत्तपत्रात चार पाव दुधात पाव पाणी घालून बिबळ्याच्या कपोलकल्पित कथा रंगवल्या जातात. बिबळ्याला बदनाम करण्यात येतं. त्यांना ठार मारण्याच्या गोष्टी केल्या जातात.

बिबळ्या- माणसाचा संघर्ष  1995 साली उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात गाजला. त्यातून त्या परिसरात मनुष्यवस्तीत बिबळ्या दिसला की मारा ही मोहीम राबविण्यात आली. केंद्रीय वन व पर्यावरणाची परवानगी नसताना राज्य सरकारच्या पाठिंब्याने अनेक बिबळ्यांचा संहार करण्यात आला. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यांच्या पश्चिम भागातील परिसरात बिबळ्या व माणसाचा संघर्ष वाढीस लागला आहे. बिबळ्याने माणसावर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. या हल्ल्यात काही माणसांना आपले प्राणही गमवावे लागले. माणसावरील बिबळ्याचे हल्ले हे त्याने आपले संरक्षण करण्यासाठीच केलेले आहेत. माणसावर हल्ला करून खाल्लेल्या घटना घडल्या असतील ते खरेही असेल. परंतु अशा घटना क्वचित घडतात. माणसाकडून जखमी झालेला एखादा बिबळ्या खूप जखमी झाला असेल, विकलांग झाला असेल आणि त्याला तृणभक्षी व इतर वन्यजीवांची शिकार करणे असाध्य झाले असेल तर असा बिबळ्या माणसांची शिकार करतो. नरभक्षक बनतो. मात्र असा एखादा बिबळ्या नरभक्षक बनला म्हणून सर्वच बिबळे नरभक्षक समजून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणे योग्य नाही. हा त्यांच्यावर मोठा अन्याय आहे.

बिबळ्या हा पट्टेवाल्या वाघापेक्षा अधिक सभ्य प्राणी आहे. तो जखमी झाला तर वाघासारखा लगेच अस्वस्थ होत नाही. दिसेल त्या माणसावर मागचा पुढचा विचार न करता हल्ला चढवीत नाही. डरकाळ्या फोडून घाबरवीत नाही. तो धूर्त व गनिमी कावा करण्यात पटाईत आहे. आपल्या शत्रूची ताकद ओळखूनच तो प्रतिहल्ल्यास तयार होतो. बिबळ्याचा स्वभाव तसा गूढरम्य आहे. तो चतुर व लबाड असला तरी हिंस्र नाही. आपल्या प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करण्यासाठी तो अचूक वेळ व अचूक जागेची निवड करून मग हल्ला चढवतो. जंगलातील त्याच्या नैसर्गिक खाद्याची टंचाई निर्माण झाली तरच मानुष्य वस्तीत गुरं व कुत्री पळविण्यासाठी घुसतो. कोणताही जीव उपाशी राहू शकत नाही. उपाशी माणसालाही प्रसंगी चोरीमारी करणं भाग पडतं. त्यानुसार बिबळ्या पोटासाठी पाळीव जनावरं पळवितो. हेच बिबळ्या व माणूस यांच्या संघर्षाचे मूळ कारण आहे. त्याचं नैसर्गिक खाद्य मनुष्यप्राण्यानं शिकार करून संपविल्यानं त्याच्यावर ही पाळी आली. यात बिबळ्याचा दोष नसून आधाशी माणसाचा दोष आहे. पोटासाठी बिबळ्या मनुष्य वस्तीजवळ वावरत असला तरी माणसाचा थेट संबंध टाळतो. मनुष्यप्राणी हे आपलं खाद्य नाही याची जाणीव त्याला असते. मात्र माणसाकडून होणाऱ्या सततच्या उपद्रवाने व उपासमारीने त्याचा स्वभाव अनैसर्गिक बनतो. त्यामुळे माणसावर तो हल्ला करतो. त्यातूनही बिबळ्या नरभक्षक बनल्याच्या घटना कचित घडतात.

अनेक लोक बिबळ्यांची संख्या वाढल्याचा दावा करतात. त्यामुळे ते मनुष्यवस्तीत घुसत असल्याचा दावा करतात. पण हा दावा योग्य नाही. पिढ्यानपिढ्या वाघ आणि बिबळ्या अरण्यात शांत जीवन जगत आहेत. परंतु ज्या ज्या भागात माणसांनी त्यांना शांत जीवन जगणे असह्य केले, त्यांच्या अधिवासात अतिक्रमण सुरू केले व त्यांच्या नैसर्गिक खाद्यांची शिकार करून ते संपविले, त्या त्या भागात बिबळ्या व माणसांचा संघर्ष उभा राहिला असा इतिहास आहे. आजही ज्या भागात बिबळ्यांची संख्या 80% आहे तिथे असा संघर्ष झालेला दिसत नाही. कारण त्या परिसरातील अरण्याची घनता व तृणभक्षी वन्यजीवांची संख्या योग्य प्रमाणात आहे. देशातील अनेक भागातील जंगलांचे आणि जंगलातील तृणभक्षी व इतर प्राण्यांचे संरक्षण करण्यात वनखाते आणि वन्यप्राणी विभागाला अपयश आले आहे. शिकाऱ्यांनी तृणभक्षी हरणासारख्या प्राण्यांची शिकार केली. जगण्यासाठी बिबळ्यांना नवीन आसरा शोधणे भाग पडले. त्याचबरोबर वनखात्याच्या संरक्षणाअभावी बिबळ्यांनाही टिपले. या सर्व प्रकाराने भारतीय बिबळ्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जागतिक वन्यजीव निधीने पाहणी केली असता बिबळ्याच्या कातडीचा व अवयवांचा अवैध व्यापार सुरू असल्याचे त्यांना दिसून आले. ओरिसात 100, उत्तर प्रदेशात 265 बिबळे व 55 वाघांची कातडी विक्रीसाठी आली असता स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पकडली. हिमाचल प्रदेशात 20 बिबळ्यांची कातडी पकडली. हिमाचल प्रदेशात कुलूमनाली व धर्मशाळा येथे बिबळ्याच्या कातडीची राजरोस विक्री होते. परंतु या बेकायदेशीर व्यापारावर कोणतीही ठोस कारवाई होत नही. दार्जिलिंग येथे एक वाघ व 7 बिबळ्यांची कातडी हस्तगत करण्यात आली. महाराष्ट्र व गुजरात राज्यातही चोरट्या शिकारी होतात. ओरिसात त्याचे प्रमाण मोठे आहे. तेथे बिबळ्या व इतर वन्यजीवांची कातडी व अवयव सहज मिळतात. सुरतजवळ कातड्यासाठी बिबळ्याच्या भक्ष्यावर विष टाकून त्यांना मारण्याचे प्रकार सतत घडतात. मागे दोन पिल्लांसह त्याच्या आईला मारण्यात आले. संरक्षित अरण्यापेक्षा असुरक्षित अरण्यात शिकारीचे प्रमाण वाढले आहे.

महाराष्ट्र व उत्तर प्रदेश शासनाने तर आता शेतीपिकास उपद्रव देणाऱ्या नीलगायी व रानडुकरांना ठार मारण्यासाठी त्यांच्या शिकारीस परवानगी देण्याचा आदेश काढला आहे. या आदेशामुळे शिकारीवर्गात आनंदोत्सव साजरा होत आहे. या आदेशामुळे बिबळ्याचे नैसर्गिक खाद्य असलेली रानडुकरं आणि नीलगायींचा विनाश होईल. याशिवाय एकदा शिकारीचा परवाना मिळाल्यावर नीलगायी व रानडुकरांबरोबर बिबळ्या व इतर वन्यजीवांची शिकारी शिकार करतील. त्यामुळे बिबळ्या आणि माणसाचा संघर्ष आणखी वाढणार आहे. त्यात दोष नसताना बिबळ्यालाच जबाबदार धरून शासन बिबळ्याच्या शिकारीचा आदेश काढील. त्यातून सारं अरण्यपर्यावरणच उद्ध्वस्त होईल.

 शंभर कोटींच्यावर लोकसंख्या असलेल्या भारतात केवळ 3500 वाघ व 7500 बिबळे असणं म्हणजे त्यांची संख्या फार आहे असं नाही. माणसाजवळ आधुनिक शस्त्रे आहेत. वन्यप्राण्यांना अंध बनविणारे प्रकाशझोत आहेत. मचाणावर आरामात बसून खाली बांधलेल्या बकऱ्यावर येणाऱ्या वाघ किंवा बिबळ्याची शिकार करणं यात कसलंही शौर्य नाही. तर ते मोठं क्रौर्य आहे. याची जाणीव ठेवून 'जगा आणि जगू द्या' या न्यायाने माणसानं जगावं. अरण्यपर्यावरण राखणाऱ्या वाघ आणि बिबळ्याच्या रक्षणातच मानव जातीचे हित आहे. रस्त्यावर रोज अपघातात अनेक लोक बळी पडतात. माफिया गुंड रोज अनेकांना ठार मारतात. जातीय व धार्मिक दंगलीत असंख्य लोकांचे प्राण घेतले जातात. त्याचे कुणाला काही वाटत नाही. मात्र अन्याय झालेल्या एखाद्या बिबळ्याने कुणाला जखमी केले तर लगेच आरडाओरडा होतो, प्रसारमाध्यमे त्यांचे रंजक वृत्त देतात. हा बिवळ्यावरील अन्याय थांबला पाहिजे. त्याचा जगण्याचा हक्क आपण मान्य केला पाहिजे.

Tags: बिबट्या आणि मानवातील संघर्ष सुरेशचंद्र वारघडे The conflict between leopard and humans Sureshchandra Warghade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके