डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हिमसौंदर्य लाभलेला हिमबिबळ्या

जॅक्सनच्या मोहिमेमुळे हिमबिबळ्याच्या रक्षणाचा संदेश लांगू खोऱ्यातल्या खेड्यापाड्यांत पोहोचला आहे. डोलकू व वांगरी या खेड्यांतली तरुण मुले हिमबिबळ्याच्या रक्षण-मोहिमेत सहभागी झाली आहेत. हिमबिबळ्याला ते साबू म्हणतात. साबू आपला निसर्ग खजिना आहे, हिमालयातील पर्यावरणाचा तो रखवालदार आहे, हिमालयाचा सुपुत्र आहे. याची जाणीव आता मुलांना होऊ लागली आहे. हीच मुलं हिमालयाच्या सुपुत्राचे रक्षक बनतील. त्याचा वंश टिकवून ठेवतील, असा जॅक्सनला विश्वास वाटतो.

भारतीय वन्यजीवांत खूप विविधता आहे. या विविधतेत स्वर्गीय रंगरूपातील सौंदर्याचा आविष्कार आहे. अशी विविधता भारतीय भूमीशिवाय जगात दुसरीकडे आढळत नाही. हिमसौंदर्य लाभलेला हिमबिबळ्या (स्नो लेपर्ड) अशाच वन्यजीवांपैकी एक शिकारी प्राणी आहे. नगाधिराज हिमालय हे त्याचं निवासस्थान, राखट पांढऱ्या रंगाच्या त्याच्या शरिरावर गोलाकार पोकळ ठिपके असतात. शेपटीपासून तोंडापर्यंत तो पावणेसात फूट लांब असतो. त्याची केसाळ शेपटीच तीन फूट लांब असते. बारा ते तेरा हजार फूट उंचीवर सतत हिमरेषेजवळ वावरणारा हा प्राणी आहे. त्याच्या शरीरावरील दाट केसांमुळे रक्त गोठविणाऱ्या बर्फाळ थंडीपासून त्याचे संरक्षण होते. हिमालयातील तृणभक्षी प्राण्यांच्या येण्याजाण्याच्या वाटेवर हिमबिबळ्या दबा धरून बसतो. त्या ठरलेल्या वाटेवरून प्राणी जवळ येताच पाठीवर झेप घालून त्याला पकड़तो. भारल, ताहर व आयबेक्स या जंगली शेळ्यामेंढ्या व कस्तुरीमृग हे त्याचं खाद्य. हिवाळ्यात हिमालयातले वन्यजीव खाली येतात. त्याच बरोबर बिबळ्याही खाली येतो. मात्र सात हजार फुटांपेक्षा कमी उंच प्रदेशात तो खाली उतरत नाही. उन्हाळ्यात तो अधिक उंच प्रदेशात वावरतो. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी अधिक उंचीवर जातात. त्या वेळी बिबळ्या पाळीव मेंढ्या किंवा मेंढपाळाच्या खेचरावरही डल्ला मारतो. दिवसा तो एकांत ठिकाणी खडकाआड किंवा झाडाझुडपांत विश्रांती घेतो. सकाळी व ऊन उतरले की दुपारी शिकारीच्या शोधात फिरायला लागतो. त्याच्या बर्फाळ रंगरूपामुळे तो बसलेला सहसा ओळखू येत नाही. बर्फात राहणाऱ्या व त्याच रंगरूपाच्या या बिबळ्यास म्हणूनच हिमबिबळ्या म्हणतात. हिमालयातले लोक त्याला 'बर्फातले भूत’ अथवा 'राखीभूत' म्हणतात.

एकेकाळी हिमबिबळ्या हिमालयाच्या रांगातल्या सर्व प्रदेशांत दिसायचा. काश्मीर, लडाख, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश, भूतान, तिबेट, नेपाळच्या हिमप्रदेशात त्याचे चांगल्या संख्येने वास्तव्य होतं. परंतु कातडी व नख्यांसाठी त्याची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. अधिक उंचीवरील झाडेझुडपे मनुष्यप्राण्याने तोडली. त्याचे भक्ष्य असलेल्या जंगली शेळ्यामेंढ्यांची शिकार केली. त्याची निवासस्थाने उद्ध्वस्त केली. त्यामुळे हा एकांतप्रिय सुंदर शिकारी वन्यजीव दिसेनासा झाला. भारतीय हद्दीतल्या हिमालयातील प्रदेशात तर तो जवळजवळ दुर्मीळ झाला आहे. भारत सरकारने त्याच्या शिकारीस आता पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच त्याचा अधिक धोक्यात आलेल्या वन्यजीवांच्या यादीत समावेश केला आहे. तिबेटचे पठार, चीनमधील विघेल व सिचौन इलाखा, अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या उत्तरेकडील हिंदुकुश पर्वत, चीन मंगोलियाला भिडलेला रशियाचा पहाड़ी सीमांत प्रदेश ही हिमबिबळ्याच्या ऐतिहासिक अधिवासाची ठिकाणे आहेत.

हिमालयातल्या वन्य हिमबिबळ्याचे दर्शन दुर्मीळ असले तरी जगातल्या अनेक प्राणीसंग्रहालयात हिमबिबळे पाळण्यात आले आहेत. त्यांची प्रजोत्पत्तीही यशस्वीरीत्या झाली आहे. प्राणीसंग्रहालयातील बंदिस्त हिमबिबळ्यांची छायाचित्रे पाहायला मिळतात. परंतु वन्यहिमबिबळ्यांची छायाचित्रे आढळत नाहीत. व्याघ्रकुळांचा अभ्यास करणाऱ्या जॉर्ज शेलुर यानं आपल्या कॅमेऱ्यानं पहिलं हिमबिबळ्याचं छायाचित्र हिमालयात टिपलं होतं. 1971 साली ते नॅशनल जिऑग्राफिकच्या नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित झालं होतं. हिमबिबळ्याचं जगातलं ते पहिलं छायाचित्र होतं.

नेपाळमधील हिमालयातल्या लांगू नदीच्या खोऱ्यात आता हिमबिबळ्यांचं अस्तित्व आहे. तेच आता हिमबिबळ्यांचं माहेरघर बनलं आहे. त्या माहेरघरातही हिमबिबळ्यांचं जीवन धोक्यात आहे. तेथेही ते जगण्यासाठी धडपडत आहेत. त्यांचं संरक्षण आणि अभ्यासाची धाडसी मोहीम काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या डॉ. रॉन्डे जॅक्सन याने आखली. त्यासाठी नेपाळ सरकारसह नॅशनल जिऑग्राफिक सोसायटी, न्यूयॉर्क झूऑलॉजिकल सोसायटी, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड, इंटरनॅशनल ट्रस्ट फॉर नेचर कॉन्झर्वेशन, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंट स्टडीज, नॅशनल स्नो लेपर्ड ट्रस्ट या मान्यवर संस्थांनी त्याला भरघोस मदत केली. तीस नेपाळी हमालांसह आणि आपल्या सहकाऱ्यांसह जॅक्सनने हिमबिबळ्यांचा शोध घेत शेकडो मैल पायपीट केली. लांगू नदीचा उसळता बर्फाळ प्रवाह अनेक वेळा पार केला. तुफान वादळाशी तोंड दिले. 9430 फुटांपासून 14,475 फूट उंच प्रदेश पायदळी तुडवला. नैसर्गिक गुहांत मुक्काम ठोकला. अनेक वेळा जीव धोक्यात घातला. लांगू खोऱ्यातला भूप्रदेश जगातला सर्वाधिक दुर्गम प्रदेश. पावलापावलावर मृत्यू तिथं टपून बसलेला होता. त्याची तमा न बाळगता हिमबिबळ्यासाठी जॅक्सननं रात्रंदिवस परिश्रम केले. हिमबिबळ्याच्या पाऊलखुणा, त्याची खडकावरील बिष्ठा, झाडाझुडपांवरील उग्र गंधाची लघुशंका, खोडावरील नख्यांचे ओरखडे या अरण्यलिपीच्या वाचनातून जॅक्सनला हिमबिबळ्याचा शोध लागला. तिल्लिया नावाच्या कँपकडे जाताना त्याला हिमबिबळ्याच्या खाणाखुणा आढळल्या. त्या परिसरात हिमबिबळ्याचा वापर असल्याची जाणीव त्याला झाली. 'डोलफू' या 200 लोकवस्तीच्या गावातून त्यानं एक पाळीव शेळी विकत घेतली होती. ती त्यानं एका झुडपाला बांधली; आणि तो व त्याचा शेरपा एका खडकाआड लपून बसले. जवळपास वावरणाऱ्या हिमबिबळ्याला शेळीचा वास लागला. दबक्या पावलाने व पोटावर रांगत तो शेळीजवळ आला. शेळीवर झेप घेताच शेरपाने जमिनीवर बसवलेल्या फाश्यात त्याचे पुढील पाय अडकले. त्या क्षणी हातांत भुलीचं इंजेक्शन देणारी चार फूट लांबीची स्टिक असलेला जॅक्सन पुढं धावला आणि हिमबिबळ्याच्या काखेत इंजेक्शन टोचून तो बाजूला सरला. भूल चढताच सुटकेसाठी धडपडणारा हिमबिबळ्या शांत झाला. जॅक्सनने प्रथम त्याचे डोळे कापडाने झाकले. फासात अडकलेले त्याचे पाय सोडवले. त्याच्या गळ्यात रेडिओ कॉलर अडकवली. कानात क्र. 1 आकडा असलेला बिल्ला अडकवला. त्याची लांबी-उंची मोजली. तो शेपटीसह सहा फूट लांब व दोन फूट उंच होता. त्याची शेपटी तीन फूट लांब होती. तो शुद्धीवर यायच्या आत जॅक्सनने सारी कामगिरी पंधरा मिनिटांच्या आत झटपट आवरली. ज्या वेळी हिमबिबळ्या पाय ताणायला लागला, त्या वेळी जॅक्सनने त्याचे हिमसौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात टिपलं आणि तो दूर पळाला. काही वेळातच हिमबिबळ्याची भूल उतरली आणि जमिनीवर लोळण घेऊन तो उभा राहिला. जंगली बीचच्या झाडाकडे चालत गेला. जॅक्सन कँपवर आला त्या वेळी बिबळ्याच्या गळ्यातील रेडिओ कॉलरमधून जॅक्सनच्या हातातल्या स्वयंचलित संदेश वाहन यंत्रावर (टेलिमेटरी रिसिव्हर) संदेश यायला लागला. आपल्या अथक श्रमाचं सार्थक झाल्याचं पाहून त्याला खूप आनंद झाला. वन्य हिमबिबळ्याच्या गळ्यात रेडिओ कॉलर बांधणारा जॅक्सन हा जगातला पहिला वन्यजीव संशोधक ठरला.

लांगू नदीच्या दऱ्याखोऱ्यांत व उंच शिखर प्रदेशात जॅक्सन रात्रीच्या जीवघेण्या थंडीत व दिवसाच्या प्रखर उन्हात दगडधोंड्यांत भटकला. पाच हिमबिबळ्यांच्या गळ्यात रेडिओ कॉलर बांधण्यात तो यशस्वी झाला. एकदा एक हिमबिबळ्या लवकर शुद्धीवर आला; आणि त्याच्या हाताला चावला. हिमबिबळ्याच्या तीक्ष्ण दातांमुळे त्याच्या उजव्या हाताला खोल जखम झाली. त्याच्या सहकाऱ्याने त्याच्या हाताला बँडेज बांधलं. वेदनाशामक व अ‍ॅन्टीबायोटिक्सची औषधं दिली. परंतु बर्फाळ थंडीत त्याची जखम भरेना. जखम अधिक चिघळली. रॅबीज होण्याचा धोका निर्माण झाला. त्या वेळी सहकाऱ्याच्या सूचनेवरून जॅक्सन दोन फूट बर्फावरून पायपीट करून आठ दिवसांनी जुमलाला पोहोचला. तेथून विमानाने काठमांडूला आला. उपचारासाठी आठ दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये पडून राहावं लागलं. नेपाळी लोक त्याला बघायला गर्दी करायचे. हिमबिबळ्या चावल्याबद्दल त्याला शाबासकी द्यायचे. त्याचं अभिनंदन करायचे.

प्रत्येक वर्षातले आठ महिने, याप्रमाणे चार वर्षांतले 32 महिने जॅक्सन व त्याचा साथीदार हिमबिबळ्याच्या माहेरघरी राहिले. रेडिओ कॉलरवरून जॅक्सननं हिमबिबळ्याचा अधिवास, त्याचे भक्ष्य, मीलनकाळ, प्रजननकाळ, त्याचा स्वभाव व सवयी, हावभाव यांचा सखोल अभ्यास व संशोधन केलं. 45 ते 50 पौंड वजनाचा तरुण हिमबिबळ्या 120 पौंड वजनाच्या जंगली मेंढीची सहज शिकार करतो. जंगली शेळ्यामेंढ्यांचा पाठलाग करून तो हिमनग पार करून अठरा हजार फूट उंचीवरही जातो. सकाळी व सायंकाळी तो शिकारीसाठी अधिक क्रियाशील असतो. भरदुपारी शांत एकांत स्थळी विश्रांती घेतो. मानवी शिकाऱ्यांच्या तावडीत सापडू नये यासाठी तो रोज विश्रांतीची ठिकाणं बदलतो. एरवी एकटा जीव सदाशिव असलेले हिमबिबळे नर-मादी जानेवारी ते मार्च या मीलनकाळात एकत्र येतात. मादीला दोन ते चार पिल्लं होतात. पिल्ले झाल्यावर नर मादी पुन्हा विभक्त होतात. इत्यादी नावीन्यपूर्ण माहिती जॅक्सनने गोळा केली.

लांगू नदीच्या खोऱ्यात हिमबिबळ्याचं खाद्य असलेल्या ताहर व भारल या जंगली शेळ्यामेंढयांची शिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शिकार केली. त्यामुळे हिमबिबळ्याला अर्धपोटी राहावं लागत आहे. अशा वेळी खेडयात घुसून त्याला पाळीव शेळ्यामेंढया पळविणं भाग पडतं. हिमबिबळ्या गुरांचं रक्त पितो, या गैरसमजुतीतून नेपाळी खेडूत हिमबिबळ्याला घेरतात. त्याला दगडाने ठेचून मारतात. खेडूत कातड्यासाठी हिमबिबळ्याची शिकार करतात. पर्यटकांना ते कातडें 15-20 डॉलरला विकतात. हिमबिबळ्याचं एक कातडं एका खेडुताकडून जॅक्सनला अवध्या 15 डॉलरला मिळालं. हिमबिबळ्याच्या कातडयाची किंमत आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात साठ हज़ार डॉलर (30 लाख रुपये) आहे. हिमबिबळ्याबाबत आपलं मत व्यक्त करताना जॅक्सन म्हणतो, "मनुष्यप्राण्याला घाबरणारा आज्ञाधारक हिमबिबळ्या पृथ्वीवरील गरीब शिकारी वन्यजीव आहे. स्वतःचं उखळ पांढरं करण्यासाठी स्वार्थी शिकाऱ्यांनी या सुंदर वन्यजीवाला वेठीस धरलं आहे. त्याचा वंश संपवीत आणला आहे." नेपाळमधील लांगू खोऱ्यासह तिबेट, चीन व भारतातील हिमालयाच्या सीमांत पहाडी प्रदेशात हिमबिबळ्याच्या अधिवासाचे सर्वेक्षण होणं गरजेचं आहे. त्यातील हिमबिबळ्यांची गणनाही झाली पाहिजे. आंतरराष्ट्रीय संघटना व त्याकरिता वन्यप्राणी संशोधकांनी ही अवघड कामगिरी पार पाडली पाहिजे, अशी जॅक्सनची सूचना आहे.

आपल्या 32 महिन्यांतील हिमबिबळ्यांच्या अभ्यास संशोधन मोहिमेचा व त्यांच्या संरक्षणाबाबतच्या उपाययोजनेचा अहवाल जॅक्सनने नेपाळ सरकारला सादर केला. तो अहवाल स्वीकारून नेपाळ सरकारने हिमबिबळ्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी 54,362 चौरस किलोमीटर अरण्यक्षेत्रात सहा राष्ट्रीय उद्याने व अनेक राष्ट्रीय वनांची स्थापना केली आहे. लांगू खोऱ्यात हिमबिबळ्या प्रकल्प स्थापन केला आहे. राजे महेंद्र विश्वस्त निधीतून या हिमबिबळ्या प्रकल्पाचा विकास करण्यात येत आहे. जॅक्सनच्या मोहिमेमुळे हिमबिबळ्याच्या रक्षणाचा संदेश लांगू खोऱ्यातल्या खेड्यापाड्यांत पोहोचला आहे. डोलकू व बांगरी या खेड्यांतली तरुण मुले हिमबिबळ्याच्या रक्षण-मोहिमेत सहभागी झाली आहेत. हिमबिबळ्याला ते साबू म्हणतात. त्याला मारून त्याचं कातडं विकून मिळणाऱ्या पैशापेक्षा त्याचं संरक्षण करणं अधिक महत्त्वाचं आहे, हे मुलांना आता कळू लागलं आहे. साबू आपला निसर्ग खजिना आहे, हिमालयातील पर्यावरणाचा तो रखवालदार आहे, हिमालयाचा सुपुत्र आहे, याची जाणीव आता मुलांना होऊ लागली आहे. हीच मुलं हिमालयाच्या सुपुत्राचे रक्षक बनतील. त्याचा वंश टिकवून ठेवतील. असा जॅक्सनला विश्वास वाटतो.

Tags: जॅक्सन डॉ. रॉन्डे जॉर्ज शेलुर जॅक्सनची मोहीम हिम बिबळ्या सुरेशचंद्र वारघडे dr. rondy George shelur Jackson snow leopard Suresh Chandra warghade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके