डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सगळे तिचा आदर, कौतुक करायचे आणि त्याचबरोबर तिचं बालपणही जपू द्यायचे. गाणी ऐकणं, चित्र काढणं असे तिचे छंद त्यामुळंच टिकून राहिले. सुषमा तेराव्या वर्षी M.Sc. झाली. त्यातही पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरमध्ये ती महाविद्यालयात पहिली आली. सुषमाचं शिक्षण चांगलं चालू होतं, पण तिच्या मनात खंत होती की, आपल्या आईला वाचता-लिहिता येत नाही. तिने ठरवलं- आपल्या आईला शिकवायचंच.

इ.स.2000 मध्ये जन्माला आलेली सुषमा वर्मा लखनौमध्ये कृष्णानगर इथल्या बर्गावन मोहल्ल्यात राहते. तिच्या घरी टीव्ही नाही. छोट्या बहिणीसोबत खेळणं हाच तिचा विरंगुळा. इतका अभ्यास आपली मुलगी करते आहे म्हणून तिला ट्युशन्स लावाव्यात, तिला नवनवीन वह्या-पुस्तकं आणून द्यावीत, अभ्यासासाठी तिला वेगळी खोली द्यावी- असं तिच्या आई बाबांना वाटत असणार, पण त्यांना ते शक्य नव्हतं. वडील तेजबहादूर आठवी पास झालेले. रोजंदारीवर काम करणारे. आई छायादेवी गृहिणी. कधीच शाळेत न गेलेली, लिहिता-वाचता न येणारी. रोजंदारीवरच्या कामगाराला असे किती पैसे मिळत असणार? मुलांना अशा सोई-सुविधा देणं त्यांना परवडत नव्हतं. जेमतेम एका खोलीचं त्यांचं छोटं घर. त्यात आई-बाबा, मोठा भाऊ शैलेन्द्र, लहान बहीण अनन्या आणि सुषमा असे पाच जण राहायचे. घरच्या कामात आईला मदत करत, लहान बहिणीकडे बघत सुषमा वरच्या वर्गांचा अभ्यास करत होती.  

अगदी लहानपणापासूनच सुषमा तिच्या वयापेक्षा मोठमोठ्या गोष्टी करायची. 2003 मध्ये एके दिवशी लखनौमधल्या राय उमानाथ बली प्रेक्षागृहात एक कार्यक्रम चालू होता. त्यामध्ये श्रीरामचरितमानसचा पाठ चालला होता. हजारो लोकांसमोर मंचावर उभं राहून सुषमाने त्यातले श्लोक म्हणायला सुरुवात केली. ‘‘वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि। मङ्गलानां च कर्त्तारौ वन्दे वाणीविनायकौ।।’’

प्रेक्षक चकित होऊन सुषमाकडे बघत होते. सुषमा तेव्हा अवघ्या तीन वर्षांची होती. कार्यक्रम संपल्यावर एकाने तिला विचारलं, ‘‘बेटी, सामने इतने सारे लोग बैठे थे. आपको डर नहीं लगा?’’

‘‘नहीं. मुझे तो ये आता है ना, रामायण. तो फिर डर कैसा?’’

भैय्याची पुस्तकं घेऊन सुषमा धडे वाचून बघत होती, स्वाध्याय सोडवत होती, गणितं करून बघत होती. चुकलेली गणितं पुन:पुन्हा न कंटाळता करून बघत होती. तिचे प्रामाणिक प्रयत्न बघून भैय्याही तिला मदत करायला लागला. ती एखादी शंका घेऊन त्याच्याकडे गेली की, तो सोडवून द्यायचा. सुषमाला भैय्याची शिकवणी सुरू झाली. भैय्याही काही साधा नव्हता. त्यानेही चौदाव्या वर्षी BCA ची डिग्री मिळवली होती, जी सामान्यत: विसाव्या वर्षी मिळते.

सुषमा सातत्याने रोज मन लावून अभ्यास करत असे आणि भैय्याला येतं ते आपल्यालाही यायला हवंच, याचा तिने ध्यासच घेतला होता. सहा वर्षांची छोटी मुलगी जर म्हणाली, ‘मला दहावीची परीक्षा द्यायचीय’ तर कोण विेश्वास ठेवणार? पण सुषमाचा आई-बाबांकडे हट्ट चालूच होता. तिची किती तयारी झालीय, हे पाहण्यासाठी भैय्यानं तिच्या काही परीक्षा घेतल्या. त्याच्याच पुस्तकांवरून तर ती अभ्यास करत होती ना! पण त्याची खात्री पटली की, सुषमा दहावीची परीक्षा देऊ शकते. तेव्हा त्याने आई-वडिलांना पटवून दिलं, तिच्या वडिलांनीही शैलेन्द्रच्या मदतीनं सेंट मीराज इंटर कॉलेजमध्ये अर्ज केला. तिला दहावीची परीक्षा देता यावी म्हणून विनंती केली. पहिली ते दहावी आणि अकरावी, बारावी असं ते इंटर कॉलेज होतं.

‘‘बच्ची को डायरेक्टली बोर्ड एक्झाम्स में तो नहीं बिठा सकते. पर बच्ची होशियार मालूम होती है. इसे बढ़ावाभी देना चाहिए. ये नववी कक्षा के एक्झाम दे दे और फिर अगले साल दसवी भी दे सकती है.’’ बाबूजी आणि सुषमा व्हाईस चॅन्सलर आर.व्ही. सोबतीसरांना भेटले. त्यांनी सुषमाला नववीमध्ये प्रवेश तर दिलाच, पण त्यासोबत तिच्या शिक्षणाच्या खर्चाची व्यवस्थाही केली. ‘‘सुनो तेजबहादूर, बच्ची तो होनहार लगती है. पर तुम्हारे काम का कोई ठिकाना नहीं. आज काम है, कल का पता नहीं. ऐसा करो, हमारे युनिव्हर्सिटी में सफाई सुपरवायजर कि पोस्ट खाली है. जॉईन कर लो.’’

मग काय, बाप-लेक दोघे एकाच इंटर कॉलेजमध्ये जायला लागले. वडील साधे सफाई पर्यवेक्षक आणि लेक असामान्य बालक. सोबतीसरांनी नियमात राहूनही तिला मदत केली. आठव्या वर्षी सुषमा दहावी झाली. अचानक एक दिवस लिम्का बुक ऑफ रेकॉडर्‌सचे लोक सुषमाला शोधत लखनौमध्ये आले. चमत्कार वाटाव्यात अशा जगभरातल्या नैसर्गिक घटना आणि माणसांनी केलेले विक्रम यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करतं. तसंच भारतातल्या विक्रमांची नोंदणी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होते. दहावी पास होणारी सर्वांत लहान वयाची मुलगी म्हणून सुषमाचं नाव नोंदवलं गेलं.

सुषमाला अभ्यासासोबतच चित्रं काढायला आवडतात. रेडिओवरील गाणी ऐकायला आवडतात. बारावीत असताना एके दिवशी ती गुणगुणत चित्रं काढत बसली होती. पेन्सिल आणि रंगांमध्ये रमून गेली होती. त्या दिवशी एक गंमतच घडली. कोण कुठली जपानची संस्था सुषमाला शोधत लखनौमध्ये आली. त्यांना  म्हणे, त्यांच्याकडच्या Intelligence Quotient Test (IQ) साठी सुषमाला निमंत्रण द्यायचं होतं. IQ म्हणजे मेंदूची तार्किक क्षमता मोजण्याचे एकक. या टेस्टमध्ये अनेक प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्या सगळ्या परीक्षांचं विश्लेषण करून बुद्‌ध्यांक ठरवला जातो.

असं म्हणतात की, जगातले 95 टक्के लोक 70 ते 130 बुद्‌ध्यांकाचे असतात. स्वतःच्या बुद्धीवर सातत्याने कष्ट घेणारे जे मोजके लोक असतात, त्यांचा बुद्‌ध्यांक 130 हून जास्त असतो. अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग्स यांचा बुद्‌ध्यांक अनुक्रमे 160 आणि 154 एवढा होता.

मग छोट्या गावात, छोट्याशा घरात राहणारी सुषमा एक दिवस विमानात बसून जपानला निघाली. त्या संस्थेने तिची जाण्या-येण्याची, राहण्याची, तिथे फिरण्याची व्यवस्था केली होती. विमान आकाशात झेपावलं तेव्हा सुषमानं खिडकीतून पाहिलं. ‘इतक्या उंचावरून आपलं घर दिसेल का?’ असं तिला वाटत होतं. जपानच्या त्या संस्थेने जपानमधून 35 मुलं गोळा केली होती. त्या वेळी सुषमा 10 वर्षांची होती. इतर मुलं 20-22 वर्षांची. सुषमा त्यांना भेटली. त्यांची भाषा वेगळी होती, खेळ वेगळे होते, खाण्याचे पदार्थ, कपडे सगळं वेगवेगळं होतं. तरी त्या मुलांची एकमेकांशी मैत्री झाली, गप्पा झाल्या. दुसऱ्या दिवशी झालेल्या (IQ) टेस्टमध्ये सगळ्या 35 मुलांतून सुषमा पहिली आली. आत्तापर्यंतचा सर्वोच्च IQ हा 250- 300 विल्यम जेम्स सायडिस याचा होता आणि तो वडील आणि मुलगी एकाच वेळी कॉलेजात जाताना  एक असामान्य बालक म्हणून प्रसिद्ध होता; योगायोग म्हणजे सुषमाची गणतीसुद्धा जगातल्या असामान्य बालकांमध्येच होते.

लिम्का बुकमध्ये नाव आलं, जपानमध्ये पहिला नंबर आला तरी सुषमा हुरळून गेली नाही. तिने जपानहून परत आल्यानंतर परत नव्या जोमाने आणि उत्साहाने अभ्यासाला सुरुवात केली. ती वेळापत्रक आखत नाही. पण तिला अभ्यास करणं, नवनवीन काही तरी शिकणं इतकं आवडतं की, तिचा दिवसातला बराचसा वेळ अभ्यासातच जातो. भरपूर मेहनत आणि मनापासून आनंदाने केलेला अभ्यास यामुळे दहाव्या वर्षीच ती बारावी उत्तीर्ण झाली. इतका अभ्यास करणाऱ्या या मुलीने स्वतःला एका ठरावीक वेळापत्रकात कधी बांधून घेतलेलं नाही. ती घड्याळाच्या काट्यावर जगणं पसंत करत नाही. अधून-मधून ती उशिरापर्यंतही झोपते. स्वत:सोबत बहिणीचंही आवरते. बहिणीसोबत भातुकली खेळण्यातही ती रमून जाते.

एके दिवशी बहीण दुपारी झोपल्यावर सुषमा अभ्यासाला बसली. MBBSला प्रवेश मिळण्यासाठी एक पूर्वपरीक्षा (प्रीमेडिकल टेस्ट) द्यावी लागते. त्याची तयारी सुषमा करत होती. दुपारी बसलेली सुषमा रात्री तिचे बाबूजी घरी आले तरी त्याच जागी बसून अभ्यास करत होती. बाबूजींना बघून सुषमा उठली. तिनं त्यांना पाणी आणून दिलं आणि परत अभ्यास करायला लागली.

‘‘कितना समय हुआ बेटाजी, पढाई कर रहे हो?’’ ‘‘क्या पता बाबूजी, मैने तो घडीही नहीं देखी.’’ बाबूजीनी कपाळावर हात मारला.

‘‘अच्छा है. जब तक तुम्हारा जी कर रहा है पढ लेना. फिर खेलने जाना हाँ. ठीक है?’’

थोड्या दिवसांनी पूर्वपरीक्षा झाली. सुषमाला पेपर सोपा गेला. आता लगेच कोणतीच परीक्षा नव्हती. तरी सुषमाचं काही ना काही वाचन, गणितं सोडवणं चालूच होतं. तिला विचारलं तर ती म्हणे- ‘‘अभी एक्झाम नहीं तो क्या हुआ? कहते है कुछ सिखा हुआ बेकार नहीं जाता.’’ सुषमा पूर्वपरीक्षेच्या निकालाची वाट बघत राहिली. तिला डॉक्टर व्हायचं होतं ना! पण विद्यापीठाने तिचा निकाल जाहीरच केला नाही. चौकशी केल्यावर विद्यापीठाने सांगितलं की, सतरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मेडिकल कॉलेजला प्रवेश देऊ शकत नाही.

पुढे काय शिकावे, काय करावे- समजत नव्हते. इतक्या कमी वयात कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं अवघड होतं. पण तिच्या भैय्याने चौदाव्या वर्षी BCA केलं होतं. त्यामुळे विद्यापीठातून परवानगी घेणं, पुस्तकं घेणं हे त्याला माहिती होतं. तशी लखनौच्या भीमराव आंबेडकर विद्यापीठामधून विशेष परवानगी घेऊन तिने B.Sc. ला प्रवेश घेतला. त्यासाठीची पुस्तकं, वह्या इत्यादींचा खर्च तोकडा पगार असणाऱ्या सुषमाच्या बाबूजींना परवडणारा नव्हता. अजून शैलेंद्रभैयाचं शिक्षणही चालू होतं. त्यामुळे आई म्हणाली, ‘‘देखो जी, हम कुछ कर लेंगे. पैसे तो नहीं है, पर बच्चोंको बतानेकी जरूरत नहीं है. हमे ना मिला पर मेरे बच्चोंको तो पढने दो.’’ त्यावर बाबूजींचे उत्तर, ‘‘बताने कि क्या जरूरत है माताजी! एक बारवी हो रखी है, दुसरा ग्रॅज्युएट हो रहा है. हमसे ज्यादा जानकार है दोनो.’’

B.Sc. करताना कॉलेजमधली मुलं-मुली सुषमापेक्षा सात-आठ वर्षे मोठी होती. सुरुवातीला बोलताना तिला अवघड वाटलं, पण एकदा मैत्री झाली की वय आडवं येत नाही, असं ती म्हणते. तिच्या शिक्षकांनी, वर्गातल्या मित्र-मैत्रिणींनी सामावून घेतलं. सगळे तिचा आदर, कौतुक करायचे आणि त्याचबरोबर तिचं बालपणही जपू द्यायचे. गाणी ऐकणं, चित्र काढणं असे तिचे छंद त्यामुळंच टिकून राहिले. ती तेराव्या वर्षी B.Sc. झाली. त्यातही पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरमध्ये ती महाविद्यालयात पहिली आली.

सुषमाचं शिक्षण चांगलं चालू होतं; पण तिच्या मनात खंत होती की, आपल्या आईला वाचता-लिहिता येत नाही. म्हणून तिने ठरवलं- आपल्या  आईला शिकवायचंच. ‘‘मम्मी, तुम यहा बैठो. कल जो पढाया उसका रिव्हिजन पहले करेंगे. फिर आगेका सिखेंगे.’’ सुषमा आईच्या मागे लागली होती.

‘‘अभी कहॉ सुषमा. अभी मुझे सब्जी पकानी है.’’

‘‘सब्जी मै बना देता हूँ. मम्मी, आप पढ लेना. सुषमा देखो कितने प्यारसे सिखा रही है आपको.’’

भैयानं भाजी फोडणीला टाकली आणि सुषमाची आई पाटीवर अक्षरं गिरवायला लागली. B.Sc. चा अभ्यास करताना सुषमाच्या असं लक्षात आलं की, आता अधिक खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे. तिला रस होता सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये (Microbiology). माणसाला उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत असे सूक्ष्म जीव असतात. हे जीव माती, पाणी, हवा आणि माणसाच्या व प्राण्याच्या शरीरातही असतात. यातील काही सूक्ष्म जीव आपल्याला उपयोगी असतात, काही अपायकारक असतात. त्यांचा शोध घेणे याच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्र.

सुषमाने सूक्ष्म जीवशास्त्र विषयात B.Sc. ला प्रवेश घेतला, तेव्हा ती बातम्यांमध्ये झळकलेली होती. लोक तिला ओळखायला लागले होते. तरीही कॉलेजमध्ये सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे तिने सर्व अभ्यास केला, सगळ्या परीक्षा दिल्या. परीक्षेच्या बरोबरीने दिला जाणारा होमवर्क, प्रात्यक्षिके- सगळं तिने आवडीने केलं. पंधराव्या वर्षी ती सूक्ष्म जीवशास्त्र विषयात M.Sc. झाली. तिच्या पुढच्या शिक्षणासाठी ‘सुलभ’ नावाच्या सामाजिक संस्थेचे प्रमुख डॉक्टर बिन्देश्वरी पाठक यांनी आठ लाख रुपयांची मदत केली. त्यांनीच तिला मोबाईल फोन, लॅपटॉप, कॅमेरा अशा काही वस्तूही बक्षीस म्हणून दिल्या. लॅपटॉपवर वेळ घालवणे आता तिला खूप आवडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2016 मध्ये सुषमाच्या विद्यापीठात आलेले असताना, त्यांच्या हस्ते तिला मेडलही देण्यात आले.  

सुषमा म्हणते, या शिक्षणाच्या प्रवासात तिला हा महत्त्वाचा धडा मिळाला आहे की, ‘तुमच्यामध्ये कौशल्य, बुद्धी असेल आणि त्याच्या सोबतीने जिद्द व चिकाटी असेल तर मदतीचे ओघ आपसूक येतात.’

लखनौच्या आसपासची शेतजमीन कोरडी होत चालली आहे, त्यावर काही तरी उपाय करायला हवा, असं सुषमाला वाटतं. निसर्ग, प्राणी व त्यातील संशोधन या विषयांत तिला रस आहे. प्रदूषण हा तिला विशेष महत्त्वाचा प्रश्न वाटतो. जो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, त्या विषयातलं ज्ञान आपल्याजवळ असायला हवं- त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण असायला हवं - असं ती मानते. म्हणून M.Sc. झाल्यावर तिने कृषी सूक्ष्म जीवशास्त्र (Agricultural Microbilogy) या विषयात Ph.D. साठी प्रवेश घेतला. सध्या तिची Ph.D. अंतिम टप्प्यात आहे.

सुषमा म्हणते, ‘शिक्षण आपल्या विचारांना चालना देतं, आपलं व्यक्तिमत्त्व घडवतं, आपल्या आत कोणती कला-कौशल्ये दडलेली आहेत हे शिक्षणामुळे कळतं. आजूबाजूला काय घडतंय, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे.’’ प्रत्येकाने स्वतःमध्ये सुधारणा केली, तर अख्खं जग बदलेल, असं सुषमाला वाटतं. प्रत्येकाने सृजनाचा ध्यास घ्यावा आणि काही नवं निर्माण करावं, असंही तिला वाटतं.

Tags: शिक्षण Education Mrudgandha Dixit मृदगंधा दीक्षित Sushama Varma सुषमा वर्मा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मृद्‌गंधा दीक्षित
mudra6292@gmail.com

सब एडिटर - कर्तव्य साधना 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके