डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्वामी आनंद गुजरातचे श्रेष्ठ गांधीवादी कार्यकर्ते व लेखक होते. साने गुरुजींसोबत ते नाशिकच्या तुरुंगात होते. गुरुजी त्यांच्या वॉर्डातच राहायचे. 197० साली त्यांनी गुजरातीत लिहिलेला हा आलेख गुरुर्जींची नेमकी ओळख करून देतो. त्या लेखाचा हा अनुवाद-
 

1931 च्या गोलमेज परिषदेनंतर गांधी- आयर्विन करार तुटला आणि देशातील तुरुंग पुन्हा एकदा काठोकाठ भरले. त्या दिवसात एका पागल अँग्लो इंडियन जेलरने काही काळपर्यंत नाशिक तुरुंगाची जबाबदारी घेतली होती. तुरुंगात साबरमती, धुळे, ठाणे इत्यादी ठिकाणचे 7०० सत्याग्रही होते. त्यांना वठणीवर आणण्यासाठीच आलेला तो जेलर कालांतराने स्वत:च तुरुंगात दाखल झाला होता!

त्याचा जुलूम चालू असतानाच एके दिवशी सकाळी अधिकाऱ्यांची मोजदाद झाल्यानंतर दोन वॉर्डरांनी दंडाबंडी ठोकलेल्या एका कैद्याला माझ्या वॉर्डात सोडले. बेड्यांमुळे सोलल्या गेलेल्या पायाच्या घोट्यांना दंडाबेडीपासून वाचवण्याची धडपड करणारा तो कैदी मोठ्या मुश्कीलीने पावले उचलत होता. माझ्याजवळ येताच त्याने दंडाबेडीसहित माझ्या पायावर लोटांगण घातले!

मी लाजलो. दोन्ही खांदे धरून त्यांना उभे केले व म्हणालो, "असे करू नका. इथे या. तुमचे स्वागत आहे. येथे कुणीही नवे-परके नाहीत. अगदी पूर्ण एकांत व आराम आहे आणि मुख्य म्हणजे मी तुमचा मित्र आहे."

माझी नजर अजूनही मुख्यत: त्या कैद्याच्या सोलल्या गेलेल्या घोट्यांवर आणि दंडाबेडीवर स्थिर होती. आता मी त्यांना नीट पाहिले. वय 3०-32 वर्षांचे. ठेंगणा मराठी बांधा. आणि काहीसा रडवेला पण वैष्णव स्त्रियांच्या चेहऱ्यावर असलेली प्रेमळ करुणा ल्यालेला चेहरा. मात्र डोळ्यांत विलक्षण लखलखते तेज. त्यांची वेधक बुद्धिमत्ता जणू त्या डोळ्यांमध्ये मावत नव्हती. मी अवाक् झालो. चेहरा आणि डोळे यात एवढा फरक!

मनात आले हा कुठल्या कोठीतला प्राणी असावा? मग त्या प्राण्याचे नाव कळले- साने गुरुजी!

मी हे ऐकले होते की धुळ्याहून नुकत्याच आलेल्या कैद्यांमध्ये माझे जुने मित्र दास्ताने आणि खानदेशी युवकांचे दीक्षा-गुरू असलेले साने गुरुजी आहेत म्हणून.

हळूहळू मी सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. आठवडी इन्स्पेक्शनच्या वेळी आम्हा सर्वांना कमरेला टॉवेल गुंडाळून उभे राहण्याचे सुचवण्यात आले. त्याप्रमाणे आम्ही सर्व उभे राहिलो. जेलर सारखा धमकावत होता, गुरुजींनी त्याला शांतपणे पण दृढतापूर्वक उत्तर दिले. "मी नवा आहे, येथले कायदे-कानून माहीत नाहीत. एकदा समजावून सांगितले की त्याप्रमाणे वर्तन करीन. त्यात फरक पडणार नाही."

जेलरचे डोके फिरले. म्हणाला,

"मुजोरी करतोस काय? कोण आहे रे तिकडे? इसके खटलेपर लाओ। फिर देखता हूं!"

त्यांना दरबाज्यावर नेले. सुपरिटेंडटने- 

नियाव न किन्ह, किहिन ठकुराई 

बिनु बुझे लिख दिन्ह बुराई! 

एक अक्षरही न बोलता त्याने सजा ठोठावली! दंडाबेडी ठोकण्यात आली व ते माझ्या वॉर्डात दाखल झाले!

त्यांनी मला विचारले, "मी जे काही सांगितले त्यात उद्धटपणा किंवा गैरशिस्तीसारखे काही होते का?"

मी त्यांची समजूत घातली. त्यांना खूप बरे वाटले. ते माझ्यासोबत राहिले, पण त्या दिवसात त्यांनी तो एकच प्रश्न वारंवार विचारला.

त्या दिवशी दुपारी व दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांच्या घोट्यावर बांधण्यासाठी चिंध्या मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. खरे तर दंडाबेडीची सजा झालेल्यांना चिंध्या मागण्याचा हक्क होता. पण चिंध्या मिळाल्या नाहीत. जेलरचे उत्तर होते- "झाडाची पाने बांधा!"

आमच्या वॉर्डात एकही झाड नाही हे तो जाणत होता. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर रोशने (त्या जेलरचे नाव) त्यांना बोलावले. ते पुन्हा परत आले नाहीत. संध्याकाळी मला कळलं की, जेलरने त्यांच्याकडून 'मी आदर्श सत्याग्रही नाही असे काहीसे लिहवून घेतले व नंतर त्यांना स्वत:सोबत प्रत्येक बरॅकमध्ये फिरवून याची दवंडी दिली की 'साने ने माफी मागितली आहे!

पण नंतर काही दिवसातच त्या शिशुपालाची शंभर पापे भरली. बारडोलीच्या एका युवकाला त्याने मरेपर्यंत मारल्याची तक्रार बाहेर पडली. खटला चालला व जेलरला तुरुंगाची हवा खवा लागली.

नाशिक तुरुंगातले वातावरण बदलले. अधिकारी थोडे धास्तावले होते व सत्याग्रहींना सुखशांती लाभली होती. मी सुपरिटेंडेंटला विनंती केली की, साने गुरुजींना माझ्या वॉर्डात परत पाठवा. विनंती मान्य करण्यात आली, ते आले. त्यांना लेखन-साहित्य मिळावे असे मी सुचवले. पण तुरुंगाच्या वहीत त्यांची जी सजा नोंदवली गेली होती, त्यात नियमाप्रमाणे त्यांना तीन महिने लेखनसाहित्य मिळू नये असे होते. तोपर्यंत त्यांनी माझ्या लेखनसाहित्याचा उपयोग करावा असे ठरले.

°°°

त्यानंतर अनेक महिने आम्ही एकत्र राहिलो. हळूहळू बरेच तरुण आमच्या वॉर्डात यायला लागले, त्यात त्यांचे विद्यार्थीही होते. गुरुजींना त्यांचे शिष्य भेटले. ते आता खूप प्रसन्न होते, दिवसभर ते विद्यार्थ्यांमध्ये वावरत. त्यांना शिकवत, कथा सांगत व मग्न करून टाकीत. युवकही भ्रमरासारखे त्यांच्या चारी बाजूला डोलत. गोष्टी सांगताना गुरुजी पूर्णपणे त्यात डुंबत. त्यांना त्यांचे बालपण आठवे. कोकणच्या स्मृती जाग्या होत, काजू, फणस, आंब्याचे जग आठवे आणि त्यांचा रोम न रोम, शब्द न शब्द हापूस आंब्यासारखा मधाळ होई! आयुष्यातल्या त्या स्मृतिचित्रांनी व वातावरणाने त्यांचे साहित्य पूर्णतः लगडलेले आहे.

संध्याकाळी तासभर माझ्यासोबत वॉर्डच्या कंपाऊंडमध्ये ते फेऱ्या मारीत. पुष्कळदा दुपारी पण मी त्यांच्याशी गप्पागोष्टी किंवा चर्चा करीत असे. पण मी हे जाणले की विद्यार्थी आणि युवकांमध्ये ते सोळा कलांनी विकसित होतात. आपल्या बरोबरीच्या किंवा मोठ्या लोकांमध्ये ते विलक्षण लाजरे व संकोचशील बनतात. लाजाळूची पाने मिटावीत तसे स्वत:ला मिटवून घेतात. तरीपण हळूहळू आमचा परिचय वाढत गेला. त्यांची प्रतिभा तर मी खूप आधीपासून ओळखून होतो. संध्याकाळी कोठडीत बंद होण्याआधी ते 12० पानांची कोरी वही माझ्याकडून मागून नेत. दुसऱ्या दिवशी सकाळी विचारले की 'काय लिहिले?' तर एखाद्या नववधूसारखे लाजून ती 12० पानांची भरलेली वही माझ्या हातात ठेवीत! त्यांचे अक्षर हिरकणीसारखे चमकदार व ओळी मोत्याच्या माळेसारख्या असत. 

सगळी वही उलटून-पालटून बघितली तर एकही शब्द कुठे खोडलेला किंवा दुरुस्त केलेला आढळत नसे! सरस्वती जणू त्यांच्या लेखणीतून हिमालयातील गंगेसारखी आतुर होऊन वाहत राही. अक्षरांपाठोपाठ अर्थ, उपमा व सुभाषितांनी लगडून येत असे. त्यांच्या जन्माच्या सहाव्या दिवशी जेव्हा जिवती तिचा लेख लिहिण्यासाठी आली असेल तेव्हा तिच्या मागोमाग सरस्वतीही कुतूहलाने, जिवतीने काय लिहिले हे पाहण्यासाठी आली असावी व तिने लिहिलेला लेख वाचून इतकी प्रसन्न झाली असाबी की आनंदाने मग्न होत गुरुजींच्या बोटातच कायमची विसावली! त्या बोटातून जे काही पाझरे ते मराठी वाङ्मयात अमर बनण्याची सनद घेऊनच अवतरत असे. 

माझ्याआधी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. सुटण्याच्या आदल्या दिवशी मी त्यांना माझ्या जाडशा नोंदवहीत काही सुभाषिते व आठवणी लिहून देण्याची विनंती केली. अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी अत्यंत सुरेख अक्षरात 211 संस्कृत सुभाषिते लिहून वही माझ्या हातात ठेवली! आज अठरा वर्षे ती माझी सोबत करीत आहेत. मी रोज साने गुरुजींच्या स्पर्शाचा अनुभव घेत असतो.

°°°

मला आठवते तोपर्यंत म्हणजे सन 1932 पर्यंत त्यांचे कुठलेही लिखाण प्रकाशित झाले नव्हते. तरीपण निबंध, चरित्र, कथा, कविता असे नाही नाही म्हणता चार पाच हजार पाने भरेल इतका मजकूर त्यांच्या गाठी असल्याचे ते स्वत:च म्हणाले होते.

त्यांचे पहिले पुस्तक 'श्यामची आई' प्रकाशित झाल्याबरोबर सगळ्या महाराष्ट्रात खळबळ माजली. नंतर सगळ्या प्रांतभर त्यांच्या साहित्याचा गंगौघ सुरू झाला. भावना, भक्ती आणि शुचितेच्या महापुरात त्यांनी युवकवर्गाला आरपार बुडवले, त्यांना बेचैन केले. त्यांच्या पायाखालची जमीनच त्यांनी जणू काढून घेतली, आणि एकापेक्षा एक वरच्या असलेल्या उदात्त भावनांच्या महापुरात स्वत:बरोबर त्यांनाही खेचून घेतले. त्यांच्या लेखणीच्या प्रसादाने प्रांतभर भावभक्तीचे उधाण आले आणि महाराष्ट्राच्या शुष्क, निब्बर आणि निरस म्हणवणाऱ्या जीवनात जागोजागी अमृतवेलीच्या बागा फुलल्या. प्रजेच्या जीवनात त्यांनी वसंत फुलवला आणि एका अनोख्या मार्दवाने ते भारून टाकले. त्यांची सर्वदेशी, सर्वगामी प्रतिभा दश दिशांनी प्रेरणा घेत असे. टिळक, गांधी, टागोर, नेहरू, अरविंद, गोखले, राममोहन, दयानंद, रामकृष्ण, विवेकानंद, काँग्रेस, समाजवाद या सगळ्यांचेच आदेश-उपदेश त्यांनी अविरोध भावनेने पचवले. परिणामी अनेकदा आपल्या कित्येक पक्षाभिमानी सोबत्यांना व प्रशंसकांना त्यांनी बुचकळ्यात पाडले.

लोकमान्यानंतर महाराष्ट्रात त्याग- बलिदानाच्या राजकारणाने थकलेल्या व जवळपास अर्धशतक इंग्रजवैराने पछाडलेला बुद्धिवादी वर्ग हिंसा, द्वेष व वैरभावनेने एका विशिष्ट मनोवृत्तीच्या आहारी जाऊन श्रद्धाविहीन, आदर्शविरोधी व संकुचित झाला होता. साने गुरुजी त्या हीन, नास्तिक, भौतिकवादी जीवनशैलीचे जागते प्रत्युत्तर होते. ते जीवनभर या प्रवृत्तीशी लढत राहिले.

केवळ प्रतिभाशाली लेखक, कवी आणि संतपुरुष म्हणून नव्हे तर एक प्रखर समाजसेवक, सेनानी आणि अग्रगामी नेते म्हणून त्यांनी काँग्रेस आणि जनतेची अनन्य सेवा केली. त्यासाठी ते जगले; वृत्तपत्रे चालवली. दुर्बळ, दलित, शोषित, दीन दुःखी, श्रमजीवी मजूर व हरिजनांच्या पाठीशी ते सदैव उभे राहात. त्यांच्याविरुद्ध असणाऱ्या मोठ्यातल्या मोठ्या शक्तीशी ते बिनदिक्कतपणे झुंज घेत. त्यांच्यासमोर सत्याग्रह करीत, उपवास मांडत. गांधीहत्येच्या पापाच्या विरोधात प्रायश्चित्त म्हणून त्यांनी 21 दिवसांचा उपवास केला. पंढरपूरचे विठोबाचे मंदिर हरिजनांसाठी मोकळे व्हावे म्हणून त्यांनी आपले प्राण पणाला लावले व महाराष्ट्र, मुंबई आणि सगळा देश गदगदून हलवला. आयुष्यभर सत्ता आणि अधिकारापासून दूर राहिले. ते प्रसिद्धीविन्मुख असलेले गुरुजी नेत्यांबरोबर असत त्यावेळी स्वत:ला जणू मिटवून ठेवत.

०००  

कितीतरी वर्षे खानदेश हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. शेवटीशेवटी मुंबईतून त्यांनी 'साधना'चे संपादन केले. सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसची शिथिलता व पतन पाहून त्यांचे मन आतल्या आत रडत असे. वाढत असलेल्या प्रांतवादामुळे ते खूप कळकळत. त्यावरचा उपाय म्हणूनच त्यांनी 'आंतरभारती'ची संकल्पना प्रजेसमोर ठेवली व सगळ्या महाराष्ट्रभर तिचा प्रचार करण्याचे व्रत घेतले. त्यांची ही घोषणा राष्ट्रजीवन अधिक सुदृढ बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचा शेवटचा भाग होती! त्यांची लेखणी, वाणी व करणी या सगळ्यांमध्ये सौजन्य आणि संस्कृतीचा गंध दरवळत असे. कटू वचन उच्चारण्याची किंवा लिहिण्याची शक्तीच त्यांच्यात नव्हती. 

मातेचे वात्सल्य, स्त्री-स्वभावातली कोमलता आणि मुग्ध बालिकेचे लाजरेपण त्यांच्यात एकत्रित झाले होते. तरी माणसाने माणसावर केलेला अन्याय त्यांना अजिबात सहन होत नसे. त्याच्या प्रतिकारासाठी काय करू व काय नको असे त्यांना होई.

प्राण पणाला लावून त्याचा प्रतिकार करण्याचा निश्चय ते करीत आणि मानवी जीवन विसंवादी असण्याचे नेमके कारण कुणालाच कसे सापडत नाही, याविषयी सतत खंत व्यक्त करीत. 15-2० वर्षांपूर्वी माझे एक सन्मान्य साधू मित्र होते. 'जगात इतका अन्याय आणि असत्य माजलेले आहे, मला ते सहन होत नाही' या मुद्यावर तुरुंगात त्यांनी उपवास सुरू केला व आपल्या साथीदारांना संकटात टाकले. उदात्त भावनांचे ते एक तीव्र आरोहण होते. तुरुंगाबाहेरच्या एका ज्येष्ठ गुरुजनांनी त्यांना समजावले व प्रकरण मिटले.

उदात्त भावनांचा असाच उद्रेक साने गुरुजी जणू जन्मताच आपल्यासोबत घेऊन आले आहेत असे वाटायचे. ते त्यांच्या अंतरंगाचे अभिन्न अंग बनले. जगात अन्याय कुठेही घडलेला असो तो त्यांना इतक्या वेगाने पकडायचा की त्यामुळे अनेकदा उपवास किंवा आत्महत्येचा विचार करून ते जवळपासच्या लोकांची तारांबळ उडवायचे. थेट नाशिक तुरुंगातल्या सहवासापासून मी त्यांना पाहात होतो. माणसाने माणसावर केलेला अन्याय ही कल्पनाच त्यांना मनापासून आवडत नसे. थोरो हे सांगायचा की 'अन्यायी सत्तेसमोर उभ्या ठाकलेल्या सज्जन माणसाचे शेवटचे आश्रयस्थान म्हणजे तुरुंग होय.' गुरुजींनासुद्धा असे वाटायचे की, या जगात अन्यायाचे कायमचे परिमार्जन शक्यच नाही. सज्जन माणसाने दुष्टतेसमोर लढून, खपून क्रमाक्रमाने शेवटी बस्स मरून जाणे एवढेच शक्य आहे! या जगात माणसाच्या हातून होणाऱ्या अन्यायासमोर विरोध नोंदवण्याचा सर्वात सचोटीचा मार्ग म्हणजे सज्जनाने मरून जाणे हाच आहे, असा ध्वनी त्यांच्या लिहिण्या-बोलण्यात अनेकदा उमटायचा.

निर्मितीचा तो आश्चर्यकारक प्रवाह किंवा अनिद्रा त्यांना प्रच्छन्नपणे जाळत होती. शेवटी त्या अनिद्रेनेच त्यांना चिरनिद्रेचा घोट घ्यायला लावला!

°°°

गेल्या अनेक वर्षांपासून एक मान्यता माझ्या मनात कायमचे घर करून बसली आहे की अतिरिक्त भावनांचा प्रसार किंवा वारसा मिळणारी माणसे अल्पायुषी ठरतात किंवा अकाली मृत्यू पावतात. भावनांची भट्टी रात्रंदिवस त्यांच्या अंतर्मनाला जाळत असते व त्यात त्यांचे हिरण्य हळूहळू भस्म होऊन जाते. त्यांचे प्राण पखेरू पिंजऱ्याच्या गजावर सतत धडका देऊन सुटण्यासाठी धडपडत असते! येशू, मीरा, विवेकानंद, निवेदिता ही त्याची प्राचीन अर्वाचीन उदाहरणे माझ्या मनाने कल्पिली आहेत. साने गुरुजी त्याच टोळीतले एक पाखरू होते, असे मला सतत वाटे.

या जगाने अनेक शास्त्रज्ञ, ज्ञानी स्त्री पुरुष व पीर-पैगंबरांना निर्माण केले. त्यातही दोन प्रवाह दिसून येतात. एक ज्ञानवंतांचा व दुसरा संत-पैगंबरांचा. ज्ञानी लोक स्थितप्रज्ञ, सुख-दुःखात अविचल, गुण-विवेकाचे समर्थक तरीही या जगाला साक्षीभूत राहून जलकमलवत् राहतात. संत पैगंबर आतल्या धकधकत्या संवेदनांमुळे जगातील अगदी सूक्ष्म जीवाशीसुद्धा संपर्क साधून त्याच्या दुःखाने दुःखी होणारे आणि काही घेणे-देणे नसतानासुद्धा जवळपासच्या जगात प्रकाश पसरवणारे असतात! 

स्थितप्रज्ञ ज्ञानी लोकांनी भावनांच्या तीव्रतम सृष्टीमध्येसुद्धा जीवन समजून घेण्याचा एक समंजस मार्ग शोधलेला असतो. त्यामुळे ते दीर्घ जीवन जगू शकतात. पण संत-पैगंबर स्वत:च्या कल्पनेतले स्वर्गीय राज्य पृथ्वीवर आणण्यासाठी आणि जगातील सर्वाधिक गरीब, पीडित अशा सामान्य जीवांशी प्रेम करीत, आपल्या अंतर्गत आस्थेची उष्मा प्रदान करीत त्यांचे उत्थान करण्यासाठी इतके अधिर झालेले असतात की ते या जगाला स्वत:च्या बेचैनीचे वरदान देऊन, असंख्य जीवांच्या जीवनात उलथापालथ घडवीत, या जगाला रडत ठेवून लवकरात लवकर स्वर्गलोकी प्रयाण करतात!

सुखिया सब संसार, खावे और सोवे 

दुखिया दास कबीर, जागे और रोवे

आणि जर 'या जगात सुखापेक्षा दुःखाची मात्रा दहापट जास्त आहे व राहील' हे मतलबी कविवचन खरे असेल, तर गुण- विवेक जाणकार व स्टोनिक ज्ञानीयांपेक्षा जगातील आधीव्याधींशी पुण्यप्रकोपपूर्वक झगडणारे, वेडेबावळे संतच जगाला अधिक प्रिय वाटतील. मग भले या संत- पैगंबरांच्या कपाळी काळाच्या अंतापर्यंत निरंतर तळमळण्याचे, संकटांशी सामना करण्याचे, जे जे काही शक्य असेल ते ते सर्व चांगले करूनही विषाचा प्याला पिण्याचे, सुळावर चढण्याचे, खांबावर खिळे ठोकून घेण्याचे व त्यातच मरण्याचे भाग्य लिहिलेले का असेना! आपल्या मानवी दृष्टीला हे भाग्य कितीही दारुण वाटो, पण ईश्वर योजना बहुदा तेच योग्य व सुंदर असावे.

है रीत आशिकोंकी तनमन निसार करना रोना, सितम उठाना और उनको प्यार करना साने गुरुजी याच संतमाळेचे मणी होते. ते कुठल्याही मुक्तिधामात जाऊन बसले असतील असे मला वाटत नाही. ते आपल्या मध्येच परत येण्याच्या धडपडीत मग्न असावेत.

(अनुवाद : डॉ. मु. ब. शहा)

Tags: समाजवाद काँग्रेस विवेकानंद रामकृष्ण दयानंद राममोहन गोखले अरविंद नेहरू टागोर महाराष्ट्रात खळबळ 'श्यामची आई' शिष्य साने गुरुजी! गोलमेज weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके