डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

एलिट असणाऱ्यांच्या अंगावर जाता येत नाही, फक्त त्यांच्या आर्थिकावरच जाता येतं का?- असा प्रश्न सामान्यांना यातून पडू शकतो. यातला तिसरा मुद्दा हा की, यावर एआयबी ग्रुपने एका पत्रकाद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. त्या पत्रकानुसार ‘त्यांनी जे केले तो विनोद आहे, त्याला विनोदाच्या अंगाने घ्यावे’ अशा आशयाचे तारे तोडत असतानाच, इतरांना (थोडक्यात आक्षेप घेणाऱ्यांना) विनोद कळत नसावा, असा आशयही आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘एआयबी’ या यू-ट्यूबच्या नेलच्या मुंबईतील एका कार्यक्रमावरून गदारोळ माजलेला आहे. या घटनेविषयी थोडक्यात सांगायचे म्हटले तर, एआयबी ग्रुपच्या एआयबी नॉकआउट या कार्यक्रमात हिंदी सिनेमा तयार करणारे, त्यात कामं करणारे आणि ते ‘विकणारे’ अशी करण जोहर, रणवीर सिंग, अर्जुन कपूर यांनी तसेच सर्वसामान्यांना फारसे माहीत नसणारे राजीव मसंद, रोडीजचा रघु, तन्मय भट, आदिती मित्तल आणि इतर (खरे तर यांची नाव लेखात घेणं आवश्यक नाही, पण कोण आहेत हे लोक; आपण कोणाविषयी बोलतोय याचा थोडा संदर्भ माहीत असावा म्हणून दिलीत) चित्रपट- समीक्षक, विनोदवीर इत्यादी. या सर्वांनी मिळून यात ‘विनोद’ या संज्ञेखाली (ज्याला ते रोस्टिंग असं म्हणतात) सभ्य समाजाला वर्ज्य असणारे सर्व (कमरेखालचे म्हणणे कमी होईल असे) विनोद(?), भ ची बाराखडी, अश्लील अंगविक्षेप, पोर्नोग्राफीसदृश हरकती असे सर्व काही यात केले आहे.

(अर्थात हीसुद्धा इंग्रजी कार्यक्रमाची नक्कल आहे, पण तो भाग अलाहिदा). यातला पोर्नोग्राफी हा शब्द मी अतिरंजितपणे वापरत नसून, पूर्ण गांभीर्याने वापरतो आहे. मी तो कार्यक्रम पाहिला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनीही तो शब्द वापरला आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकवर्गात हिंदी सिनेमातले पडेल, उभरते नट-नट्या आणि तब्बल चार हजार रुपये प्रति माणूस तिकिटाने गेलेले प्रेक्षक या सर्वांनी खाली पडपडून याला प्रतिसाद दिला. आता हे सर्व त्यांनी त्या बंद सभागृहात परवानगी घेऊन केले की कसे, हे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे चौकशी करून पाहणार आहेत.

पण प्रश्न उरतो तो- हा कार्यक्रम यू-ट्यूबवरून उघडपणे प्रदर्शित केल्यावर, त्यावर बऱ्याच जणांनी आयटी ॲक्ट, आयपीसी, घटनेतील कलम १९ अशी वेगवेगळी कलमे आणि गुन्ह्याखाली पीआयएल व तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याची आता काय कार्यवाही व्हायची किंवा न व्हायची ती होईल. एकंदरीत याबद्दल ग्रामीण भागातील एक तरुण म्हणून माझी काही मते यासंदर्भात साधनाच्या माध्यमातून मांडू पाहतो आहे. यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या कार्यक्रमाच्या व्हिडिओला तरुणाईकडून मिळालेला कोटींच्या घरातला प्रतिसाद व लाइक्स!

हा व्हिडिओ मेट्रो, शहरी, निमशहरी अशा सर्व भागांतील तरुणांकडून आवडीने पाहिला गेलाय आणि जातोय. मी ठामपणे हे विधान करतो की, अशा व्हिडिओला आजच्या भाषेत कूल मानून आवडीने पाहणाऱ्या वर्गाला पोर्नोग्राफी व आंबट विनोद या सर्वांची सवय आणि त्याबद्दल वेड असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मेट्रोतला घडी-घडी मेणबत्त्या घेऊन निघणारा तरुण या सांस्कृतिक भ्रष्टाचाराला कोटींनी लाइक्स देतो, हे चित्र विदारक आहे. त्यातही तरुणाईचे रॉकस्टार म्हणवले जाणारे हे दोन नट यात मुक्त लैंगिकता नव्हे तर विकृत लैगिकता याला फॅशन व कूलनेस म्हणून पुढे आणू पाहत आहेत आणि आजच्या बहुसंख्य तरुणांना ते स्वीकारार्ह वाटते आहे, हे भयानक आहे.

या नटांना परंपरागत भारतीयांसमोर आपली इमेज अशी होतेय याचा खेद नसून, अभिमान आहे. हे तरुणांच्या किंवा एकंदर बहुसंख्य प्रेक्षकांच्या ढासळणाऱ्या अभिरुचीचे दर्शन आहे, असे मला वाटते. याची सुरुवात साधारणपणे आमची- म्हणजे सन १९९० च्या सुमारास जन्मलेली पिढी ही सतरा-अठरा वयाची होताना आणि सन २००५ नंतर किंवा त्याच्या आसपास हिंदी सिनेमातला नायक बदलू लागला तेव्हापासून दिसू शकते. आधीच्या म्हणजे ज्याला आपण मेनस्ट्रीम सिनेमा म्हणतो, त्यातले नायक-नायिकेबरोबर सिनेमाच्या सुरुवातीपासून एकनिष्ठ असत. या काळानंतरच्या सिनेमात सुरुवातीला मोठ्या प्रमाणात बदफैली किंवा त्यांच्या भाषेत स्वैर असणारा नायक उत्तरार्धात नायिकेसाठी एकनिष्ठ होतो.

१९९० च्या आधी किंवा आसपास हे इतक्या प्रमाणात स्वीकारले जात नसावे- अपवाद वगळता. सिनेमॅटिक लिबर्टी हा त्यांचा अधिकार आहे; पण चारित्र्यहीनता ही लिबर्टी न ठरता त्याचा ट्रेंड सेट होऊ पाहतोय, इथे मेख आहे. आणि हे आवडणारा तरुणवर्ग हाच या एआयबीचा दर्शक आहे. यातला दुसरा मुद्दा असा की- पेरूमल मुरुगनच्या घरावर दगड मारणारे आता गप्प बसून आहेत. त्यांची   संस्कृती अशा वेळी अभेद्य होत असावी. करण जोहरच्या ‘वेक अप सिड’मधील बॉम्बे या शब्दावरून तोडफोड करणारी मनसे आणि चुलतभगिनी शिवसेना या दोन सेनाही शांतच आहेत. हे सांगण्यामागचा उद्देश हा नाही की, त्यांनी यातल्या व्यक्तींवर हल्ले करावेत, तोडफोड करावी. ते जे करतात, याला कुणीही समंजस विरोधच करेल; परंतु नको त्या वेळी कैवार घेणारे अशा बाबतीत तितकी तीव्रता दाखवीत नाहीत, एवढंच यातून सुचवायचंय.

एलिट असणाऱ्यांच्या अंगावर जाता येत नाही, फक्त त्यांच्या आर्थिकावरच जाता येतं का?- असा प्रश्न सामान्यांना यातून पडू शकतो. यातला तिसरा मुद्दा हा की, यावर एआयबी ग्रुपने एका पत्रकाद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. त्या पत्रकानुसार ‘त्यांनी जे केले तो विनोद आहे, त्याला विनोदाच्या अंगाने घ्यावे’ अशा आशयाचे तारे तोडत असतानाच, इतरांना (थोडक्यात आक्षेप घेणाऱ्यांना) विनोद कळत नसावा, असा आशयही आहे. त्यात चार बुकं आणि तीही इंग्रजीतून शिकलेली असल्याने फ्रीडम ऑफ स्पीचचा वापर आहेच. अशांना त्या कलमातील restrictive Clauses समजावणे तसे अवघडच.

आपल्या बेमुर्वत वागण्यासाठी ही तृतीयपानी मंडळी संविधान, कायदे, विनोद यांची आपल्यालाच काय ती समज- असा आव आणू पाहतायत. शिरजोरी यापेक्षा वेगळी काय असू शकते? समर्थांच्या विनोदातील टवाळ बहुधा हेच असावेत. फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारांच्या वेळी शालीनतेचा बुरखा पांघरणारा, सरंजामी श्रीमंतीतील संस्कारांचे सिनेमे बनवणारा करण जोहर या कार्यक्रमात शेवटी त्याच्याच एका गाण्याची एक बीभत्स प्यारोडी गातो. त्यांच्याच रोस्ट विनोदातल्या किश्श्याप्रमाणे हे सर्व या मंडळींची खरीखुरी व्यक्तित्वे दाखवणारे आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांच्या टीकेवर उत्तर म्हणून tweeter वर अश्लील बोलता येत नाही, म्हणून धन्यता मानणारे हे लोक काय सिद्ध करू पाहतायत, हे आपण जाणायला हवे. यात आपली भूमिका काय असावी, याबाबत माझ्या मनात गोंधळ आहे- भूमिकेविषयी (standpoint) नव्हे, कृतीविषयी. त्यातल्या त्यात वाटते की, आपण सर्वांनी नैतिकतेच्या मुद्‌द्यात सरसकट सर्वांना त्यांची मते विचारणे सोडायला हवे. थेट त्यांना दुर्लक्षून पुढे जाणे योग्य होईल. यात स्त्रियांविषयी विचित्र विधाने करणाऱ्या युफोरियापासून सगळेच येतात.

दुसरे हे की, या सगळ्याविरुद्ध संविधानिक आखाड्यात उतरण्याबरोबरच वैयक्तिक पातळीवर counter attack, नकार, negligence अशा स्वरूपात उत्तर देण्याची गरज आहे- तेही ताकदीने; नाही तर असे एआयबीचे अनेक संघ संवेदनशील समाजाला या सामन्यात नॉकआउट करून अभिरुची घेऊन जायचे.

Tags: अहमदनगर नेवासा स्वप्नील शेळके समर्थांच्या विनोदातील टवाळ अभिव्यक्ती ahamadnagar nevasa swapnil shelke samrthanchya vinodatil taval bhivyakti weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके