डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या वर्षीचे बालकुमार साहित्य संमेलन 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या काळात पुणे येथे झाले. संमेलनाचे अध्यक्ष राजीव तांबे यांची मुलांच्या लेखनाविषयीची भूमिका मांडणारा, त्यांच्या अध्यक्षीय भाषणातील काही भाग 7 डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केला होता. या अंकातील मुलाखतीतून राजीव तांबे यांनी मुलांसाठी केलेल्या काही प्रयोगशील उपक्रमांची माहिती मिळते.

प्रसाद : सगळं सुरळीत सुरू असताना तुम्ही अचानक मेळघाटात गेलात. तिथे एक वर्ष राहिलात...

राजीव : हो. माझे वडील गांधीवादी. त्यांनी आयुष्यभर खादी वापरली. ते काही दिवस विनोबांच्या पदयात्रेत पण सामील झाले होते. साधनेच्या पहिल्या अंकापासून ते गुरुजींसोबत काम करायचे. त्यानंतर राष्ट्रसेवादल. माझी आई पण सेवादलातलीच. वडील नंतर अण्णासाहेब सहस्रबुद्धेंसोबत काम करायचे. गावात जाऊन, तिथे राहून काम करावं, अशी त्यांची फार इच्छा होती; पण प्रकृतीमुळे त्यांना जमत नव्हतं. त्यांच्या मनातली ही सल मला कळत होती. मी एक पूर्णवर्ष आदिवासी गावात जाऊन राहीन आणि तिथे काम करीन, असं मी जेव्हा त्यांना सांगितलं; तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. मी असं केलं, कारण मी घरात नेहमीच बंडखोरी केली होती. वडिलांना आनंद होईल, असं फारच कमी वेळा मी वागलो असेन. त्यांच्या ऋणातून थोड’ तरी उतराई व्हावी, म्हणून मी हा निर्णय घेतला.

जाण्याअगोदर अनेकांना भेटलो. चर्चा केली. कुठलाही तयार कार्यक्रम घेऊन मी तिथे गेलो नाही. तिथे जाऊनच तेथील गरजेनुसार कार्यक्रम तयार करून सर्वांसोबत त्यांना चालना दिली. ‘गावातला माणूस गावात, गावातला पैसा गावात आणि गावातलं पाणी गावात’ हे सूत्र समोर ठेवलं. गावात परसबागा सुरू केल्या, महिला साक्षरता वर्ग, बचत गटांची पुनर्बांधणी, बंधारे घालून पाणी अडवणे व जुन्या तळ्यांचे पुनरज्जीवन, गावातल्या आठवडी बाजारात सहकारी तत्त्वावर छोटी दुकानं सुरू केली. तेथील मुलांच्या गरजा लक्षात घेऊन वेगळा अभ्यासक्रम तयार केला. विशेष म्हणजे, आम्ही मेळघाटात चरखे आणले व सूत कातून खादी वापरायला सुरुवात केली. हे एकट्याने करण्याचे काम नाही; यासाठी मला अनेकांनी अनेक प्रकारे मदत केली. म्हणूनच यातील कुठल्याच कामाचे श्रेय माझे नाही. मी तिथे केवळ एक ‘पूर्णवेळ कार्यकर्ता’ म्हणूनच वावरलो. हां-हां म्हणता माझं एक वर्ष संपलं आणि मी परत आलो.

प्रसाद : गेली 25 वर्षं तुम्ही सातत्याने मुलांसाठीच विविध साहित्यप्रकार लिहीत आहात. बालसाहित्याचं नेमकं प्रयोजन काय, असं तुम्हाला वाटतं?

राजीव : बालसाहित्याचे किंवा साहित्याचे नेमके प्रयोजन- मुलांना शिकवणं, उपदेश करणं, तात्पर्य सांगणं, संस्कार करणं किंवा त्यांना घडवणं हे तर नव्हे आणि नव्हेच. बालसाहित्याचं प्रयोजन आहे- मुलांना दृष्टी देणं आणि मुलांना आनंद देत विविध संकल्पनांबाबतच्या त्यांच्या कक्षा रुंदावत नेणं. बालसाहित्य हे मुलांना शिकवत नाही; तर शिकण्याच्या अनेकानेक पद्धती, विविध पर्याय मुलांसमोर सहजी उलगडून ठेवतं आणि मुलांना त्यांच्यातील सुप्त शक्ती व सर्जनशीलता यांची जाणीव करून देतं. कारण बालसाहित्याचा पाया हा ‘मुलांना गृहीत धरणे’ हा नसून ‘मुलांवरचा अपार विेशास आणि मुलांवर निरपेक्ष प्रेम’ हा आहे.

प्रसाद : आज मुलांसाठी जाणीवपूर्वक लिहिणारे, विविध साहित्यप्रकार हाताळणारे लेखक जेमतेम हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच आहेत. बालसाहित्याला ग्लॅमर नाही, म्हणून असं होत असेल का?

राजीव : बालसाहित्याला ग्लॅमर नाही किंवा त्यात पैसा नाही म्हणून कुणी लिहीत नाही, हे कारण मला अतिशय तकलादू वाटतं. मला वाटतं, समोरचं मूल समजून घेण्याची त्यांना आंस नाही; समाजातील मुलांच्या शिक्षणाचा, वाचनाचा त्यांना ध्यास नाही. कारण ती माणसं मुलांचं भावविश्व जाणून घेण्यासाठी ‘अपग्रेड’ झालीच नाहीत. ही सगळी मोठी माणसं नेहमीच चाळिशीच्या पुढच्यांचा विचार करत आली, त्यांच्यासाठीच लिहीत आली, त्यांच्यासाठीच लेखनाच्या आणि वाचनाच्या विविध योजना आणीत गेली. आपल्याच कोशात गुरफटून राहिली. थोडक्यात सांगायचं तर, ही मोठी माणसं सतत कापणी करत गेली... पेरणीचा विचार न करता. ह्या मोठ्या माणसांनी जर आपल्या बालपणात डोकावून पाहिलं, तर ती नक्कीच ‘यू टर्न’ घेतील.

काही मोठ्या माणसांचं बालपण हे करपून गेलेलं असतं. त्यामुळे त्यांच्यात दडलेलं मूल हे एक तर चिरचिरं-किरकिरं तरी असतं किवा अपार नॉस्टॅल्‌जिक. अशी माणसं मुलांसाठी नाही लिहू शकत. किंबहुना, कुठलाही मोठा माणूस तो ‘मोठा’ आहे म्हणून मुलांसाठी नाही लिहू शकत.

समोरचं मूल गुण-दोषांसकट स्वीकारण्याची तयारी आणि मुलांना उपदेश न करता सर्व पूर्वग्रह बाजूला सारून मुलांकडून शिकण्याची आंतरिक इच्छा असेल, तरंच तो मोठा माणूस लहान मुलांत मूल होऊन मिसळू शकतो.

पण... तुम्ही तुमचं मोठेपण आणि पूर्वग्रह बाजूला भिरकावून दिले आहेत, याची जेव्हा खात्री मुलांना तुमच्या कृतीतून पटते; तेव्हाच ती तुमच्याशी दोस्ती करतात आणि त्यांच्या कृतीमागील कार्यकारणभाव तुम्हाला समजावा यासाठी त्यांच्या भावविश्वात तुम्हाला सामावून घेतात. जी माणसं मुलाचं बोट धरून मुलांत मिसळू शकतात, तीच माणसं मुलांसाठी लिहू शकतात, कारण त्यांच्यात लपलेलं मूल फक्त चौकसच नाही, तर खट्याळही असतं. थंड हवेच्या ठिकाणी जाऊन आणि बंद खोलीत बसून मुलांसाठी नाही लिहिता येत.

मुलांसाठी चांगलं लिहू लागलं, तर पैसा आणि तथाकथित ग्लॅमर मागून येतंच. मुलांसाठी चांगलं लिहिणं कठीणच आहे, पण अशक्य मात्र नाही.

प्रसाद : पण मग यातून मार्ग कसा काढायचा?

राजीव : यातून मार्ग काढण्यासाठी शाळांशाळांतून वाचकांसाठी व इतरत्र लेखकांसाठी पण ‘लेखनकौशल्य कार्यशाळा’ व ‘वाचनकौशल्य कार्यशाळा’ यांचे आयोजन करावे लागेल. विविध लेखकांनी हाताळलेले विविध साहित्य-प्रकार, वेगवेगळ्या भाषांतील अनुवादित पुस्तकं मुलांसमोर मांडली गेली पाहिजेत. वाचलेल्या साहित्यातील आवडलेल्या व न आवडलेल्या गोष्टींबाबत मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी. चित्रकारांनी मुलांसमोर ‘चित्र आणि मजकूर’ यातील नातेसंबंध सप्रयोग उलगडून दाखवला पाहिजे. मुलांनी लेखकांशी लेखनप्रक्रिया, विषयातील वैविध्य आणि शैली याबाबत गप्पा मारल्या पाहिजे. वेगवेगळे लेखनप्रकार मुलांनी हाताळून पाहिले पाहिजेत. या कार्यशाळांचं प्रयोजन इतकंच आहे की, मुलांना लेखनातल्या व पुस्तकातल्या गमती-जमती समजाव्यात. लेखनवाचनाबाबत त्यांनी अधिक सजग व्हावं. त्यांनी समजून वाचावं आणि आनंदानं लिहावं- बस्स, इतकंच.

प्रसाद : तुमचं ‘छोटीसी बात’ हे पुस्तक सुजाण पालकत्वाविषयी आहे. आणि आता संमेलनात त्याची नववी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. मुलांकडून तुम्ही पालकत्वाकडे कसे काय आलात?

राजीव : व्वा! फक्त मुलांचाच विचार नाही करता येत, तर त्यांच्यासोबत पालक व शिक्षक यांचा एकत्रितपणेच विचार करावा लागतो. माझ्या मुलींनी माझ्या पालकत्वाचा कस पाहणाऱ्या खडतर चाचण्या घेतल्या. मुलींनी शिकताना कितीही चुका केल्या तरी मी न चिडता, न रागवता व न शिक्षा करता अत्यंत सहृदयतेने फक्त मूलकेंद्री विचार करू शकतो का- याची परीक्षा मुलींनी वारंवार घेतली. आणि अनेक वेळा माझ्या चुका समजून घेत त्यांच्यासोबत वाढण्याचं अवकाश मला दिलं. आमच्या गंमतशाळेतल्या पालकांनी मला त्यांच्या मुलांबाबत हज्जार प्रश्न विचारून माझ्याकडून पालकत्वाची उजळणीच नकळत करून घेतली. मुले आणि पालक यांच्यासोबतच्या सहजसंवादातून व आंतरक्रियांतून माझी पालकत्वाबाबतची भूमिका तयार होऊ लागली.

त्याच सुमारास मी सुजाण पालकत्वाबाबत लोकसत्तेत ‘छोटीसी बात’ नावाचे सदर लिहू लागलो. त्याला उदंड  प्रतिसाद मिळू लागला. या सदराचे पुस्तक ‘मैत्रेय प्रकाशना’ने प्रकाशित केले आणि एका वर्षांतच त्याच्या तीन आवृत्त्या संपल्या. मला गावागावांतून कार्यक्रमांसाठी निमंत्रणे येऊ लागली. मुलांबाबत पालक किती जागरूक आहेत, हे मोठ्या प्रमाणात समजू लागलं. या प्रश्नाचा आवाका लक्षात घेऊन राजीव खांडेकर यांनी ‘एबीपी माझा’ या चॅनेलवर दर शनिवारी पालकांसाठी ‘मुलांच्या विश्वात’ हा माझा लाइव्ह कार्यक्रम सुरू केला आणि जगभरचे मराठी पालक आपल्या मुलांबाबत, त्यांच्या शिकण्याबाबत प्रश्न विचारू लागले. खरं तर मराठी चॅनेलवरचा असा हा पहिलाच प्रयोग होता. मुलांच्या प्रश्नांना व बालक-पालक संबंधांना शनिवार रविवारचा प्राईम टाईम देण्याचं धाडस आजपर्यंत कुठल्याही चॅनेलने दाखवलं नव्हतं. पण खांडेकरांनी हाही धोका पत्करला. ‘मुलांच्या विश्वात’ हा लाइव्ह कार्यक्रम सुपर-डुपर यशस्वी झाला. मी याचे सारे श्रेय त्यांना व मुलांबाबत कळकळीने प्रश्न विचारणाऱ्या पालकांना देईन.

प्रसाद : तुमच्या गंमतशाळेविषयी आम्हा सर्वांना उत्सुकता आहे. याविषयी जरा सविस्तर सांगाच.

राजीव : हो. मी शाळेत कधीच आनंदाने गेल्याचं व सुखा-समाधानाने शाळेतून घरी परत आल्याचं मला आठवतच नाही.

मला वाटलं- आपल्या नशिबी जे आलं, ते किमान आपल्या मुलांच्या नशिबी नको. म्हणून मग मी माझ्या मुली लहान असताना गंमतशाळा सुरू केली. शनिवार-रविवारची गंमतशाळा. माझ्या मुलींसोबत ‘तोत्तोचान’ आणि ‘दिवास्वप्न’ ही पुस्तकं वाचत असताना आपण पण गंमतशाळा सुरू करू या, अशी मुलींनी भुणभुण सुरूच केली होती. पण गांधींच्या ‘त्या’ (पुढे दिलेल्या) गोष्टीनंतर घरातूनच गंमतशाळेला मुलींनी सुरुवात केली. आधी घराची प्रयोगशाळा झाली आणि मग त्यातून गंमतशाळा.

एकदा गांधीजींना भेटायला काही मुले गेली. गांधींनी मुलांना विचारले, तुमचे शिकण्याचे माध्यम काय? काही मुले म्हणाली, इंग्रजी तर काही म्हणाली, हिंदी.

गांधी म्हणाले, कमाल आहे! मी तुम्हाला शिकण्याच्या माध्यमाविषयी विचारत आहे आणि तुम्ही तर मला भाषेविषयी सांगत आहात. मुले गोंधळली. तेव्हा मुलांना जवळ घेत गांधी म्हणाले- अरे गणित, भाषा, विज्ञान असे कुठलेही विषय शिकण्यासाठी तुम्ही तुमचे हात वापरता का? प्रत्यक्ष अनुभव घेता का? ही शिकण्याची प्रभावी माध्यमं आहेत. आता मुलांना कळलं की, इतके दिवस आपण भाषेलाच माध्यम समजत होतो; जे काही शिकायचं, ते हाताने. प्रत्यक्ष अनुभव घेऊन. केवळ पाठांतर नव्हे, तर स्वत:हून समजून घेऊन. गंमतशाळेचं हेच गाभातत्त्व आहे.

गंमतशाळेत मुलांना चुका करण्याचं जसं स्वातंत्र्य आहे तसं चुकांतून शिकण्याची संधी ही आहे. मुले त्यांच्या मनातला कुठलाही प्रश्न विचारू शकतात, असं निर्भय वातावरण ही आहे. इथे आम्ही मुलांना शिकवत नाही तर शिकण्यासाठी उत्सुक करणं, यासाठी मुलांनी प्रयोग करून पाहणं, निरीक्षणं करणं, अनुभव घेणं व स्वत:हून शिकणं यावर अधिक भर आहे. गंमतशाळेतील मुलांसाठी भाषा, गणित, विज्ञान, सामान्यज्ञान, भूगोल या विषयांचे सुमारे 100 खेळ व विविध उपक्रम तयार केले. मजेत निबंध लिहिण्याच्या वेगवेगळ्या 10 पद्धती विकसित केल्या. आकलनावर आधारित मजेशीर आणि बहुआयामी स्वाध्याय तयार केले. गंमतशाळेत तिसऱ्या रविवारी समाजातील निरनिराळ्या स्तरांतील व्यक्ती मुलांशी गप्पा मारायला येऊ लागल्या. गावातले भाजीवाले, डॉक्टर, पोलीस, कचरा वेचणाऱ्याला महिला, तृतीयपंथी, नगरसेविका असे खूप जणं मुलांशी गप्पा मारून गेले. समाजासोबत संवाद साधत त्यातून शिकण्याची पद्धत गंमतशाळेने विकसित केली. डॉक्टरांसोबत गप्पा मारताना मुलांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली, पपई आणि दुधी भोपळ्याला इंजेक्शन्स दिली. खेळता-खेळता मुले नकळत शिकू लागली. यामुळे मुले आनंदाने शाळेत येऊ लागली आणि वेळ संपला तरी शाळेत रेंगाळू लागली. ही आमची गंमतशाळा 8 वर्षे चालली. मी अध्यापनशास्त्राचे औपचारिक शिक्षण न घेतल्याचा मला फायदा झालाच, पण गंमतशाळेत मुलांसोबत शिकण्याचा मला अधिक फायदा झाला. मुलांच्या आनंददायी शिक्षणाचा ध्यास मनात रुजला आणि बालकेंद्री विचारांचा मार्ग स्वच्छ दिसू लागला. ‘गरिबातल्या गरीब मुलाला मस्त मजेत शिकता यावं’ यासाठी शून्य खर्चाचे शैक्षणिक खेळ तयार केले. ते गावांतल्या व शहरांतल्या अनेक शाळांतून वापरले, त्यात आवश्यक बदल केले आणि मग ते लिहिले.

विज्ञानाचे शून्य खर्चाचे 89 प्रयोग तयार करून युनिसेफच्या मदतीने ग्रामीण भागातील शाळा-शाळांतून ‘शून्य खर्चाच्या प्रयोगशाळा’ सुरू केल्या. दर सोमवारी शाळेतल्या सर्व मुलांनी जादू करायची, असं सुरू झाल्यावर शाळेतील मुलांची गळती कमी झाली. मुले स्वत:हून प्रयोग करत एकमेकांच्या मदतीने शिकू लागली. मग हे सारे प्रयोग गोष्टीरूपात लिहिले. गोष्ट वाचता-वाचताच प्रयोग उलगडत  जातो आणि प्रयोगामागचं विज्ञान अलगद उमजत जातं. वाचायच्या आणि करायच्या गोष्टी म्हणजे या विज्ञान प्रयोगकथा. याच प्रकारे इतिहास म्हणजे ‘देशाची गोष्ट’ आणि भूगोल म्हणजे ‘पृथ्वीची गोष्ट’ अशी पुस्तकं लिहिली, तर मुलांच्या आनंदात भर पडेल. आता कुणाला तरी हे काम करावंच लागणार आहे.

विज्ञानाची एक अनामिक भीती आपल्या समाजात आहे. पालकांना वाटतं, शिक्षकांनी मुलांना विज्ञान शिकवावं. शिक्षकांना वाटतं- पाठ्यपुस्तकात विज्ञान आहेच की, आणखी आपण काय शिकवायचं? खरा घोळ इथेच आहे. विज्ञान नावाची अशी काही खास गोष्ट नाही की- जी फक्त पाठ्यपुस्तकात आहे; विज्ञान तर आपल्या सभोवती आहे. दैनंदिन जीवन आणि विज्ञान यांचा सहसंबंध जोडून दाखविणे हे खरे काम आहे.

आमच्या गंमतशाळेतील एक उदाहरण पाहू. इयत्ता तिसरीच्या विज्ञानाच्या पुस्तकात ज्ञानेंद्रियांची ओळख आहे. त्यात नाकाने वास समजतो व हाताला स्पर्श समजतो, असे एक ‘बालभारतीय’ वाक्य आहे. त्याखाली स्मरणशक्तीवर आधारित रटाळ स्वाध्याय आहे.

यासाठी एका प्रयोगाचं आयोजन केलं. एक सुती रुमाल आणला व त्याचे तीन सारखे तुकडे केले. मग मेणबत्ती पेटवली. एक तुकडा हातात घेऊन मुलांना विचारलं, हा तुकडा जळायला किती वेळ लागेल? मुलांनी काहीही उत्तरे दिली. एक तास, अर्धा तास, दहा मिनिटं वगैरे. प्रत्येकाने आपापले अनुमान वहीत लिहून ठेवले. आत्तापर्यंत कापड जाळण्याची मुलांना मुभा नसल्याने कापड जळण्यासठी किती वेळ लागेल, हे मुलांनी सांगणे अपेक्षितच नव्हते.

तो तुकडा अकरा सेकंदांत जळला. मग आम्ही सर्वांनी जळलेल्या कापडाचा वास घेतला. दुसरा तुकडा पाण्यात भिजवला व पिळला. आता हा तुकडा जळायला किती वेळ लागेल? या प्रश्नाला सगळ्या मुलांनी सेकंदात उत्तरे दिली. हा तुकडा जळण्यासाठी वीस सेकंद लागले. या तुकड्याचा वास पहिल्यापेक्षा वेगळा होता.

तिसरा तुकडा तेलात भिजवून मग मेणबत्तीवर धरला. हा तुकडा जळायला बत्तीस सेकंदं लागली. कारण आधी तेल जळते, मग कापड. हा वासही वेगळाच होता. मग मुलांनी अशा पदार्थांची यादी केली- जे सुके, ओले व तेलात भिजून जळले असता वेगवेगळा वास येतो. त्यानंतर अशा पदार्थांची यादी केली की, पदार्थ एकच पण वेगवेगळ्या स्टेजेसवर त्याचे वेगवेगळे वास येतात. उदा- उतू जाणारं दूध, लागलेलं दूध आणि आटणारं दूध इ. आणि मग डोळे बंद करून ओळखता येणारे वास. तिसरीतल्या मुलांनी सुमारे 182 वासांची यादी तयार केली.

नाकाने आपल्याला फक्त वास समजत नाही, तर त्या वासामुळे आपल्याला खूप माहिती समजते आणि तीच खरी महत्त्वाची असते. अशी विविध प्रकारची माहिती मिळविण्यासाठी वास हे केवळ एक माध्यम आहे आणि त्यासाठी नाक हे एक साधन आहे. पण त्या वासामागे दडलेली माहिती शोधणं, हे आपलं खरं साध्य आहे. हे सर्जन शिक्षणामध्येही किती उपयुक्त आहे, पण शिक्षण स्वतःच या बाबतीत गोंधळलेलं आहे. शिक्षणात असा मूलभूत विचार केलाच जात नाही. मुलांनी स्वत:हून काही शोधायचं नाही, तर पाठ्यपुस्तकातील स्मरणशक्तीवर आधारित रटाळ स्वाध्याय सोडवणं व चाकोरीबद्ध लिहिणं म्हणजे शिक्षण असं झालं आहे. या शिक्षणात मुलांना जे वाटतं ते त्यांच्या भाषेत आणि त्यांना हव्या त्या माध्यमातून मांडण्याचं स्वातंत्र्य तर नाहीच; पण त्यांच्या जिज्ञासेचा, शोधकवृत्तीचा, आकलनशक्तीचा, सर्जनशीलतेचा कसही लागत नाही. या सगळ्यांचं मुलांच्या संपूर्ण जीवनाशीच नातं असतं, पण हे पालकांना कुणी सांगतंच नाही. ‘आता घोका आणि ओका’ ही अत्याचारी पद्धत बाद करून, ‘शोधा, समजून घ्या आणि सांगा’ ही स्वतःहून शोधण्यास प्रेरित करणारी, समोरच्या गोष्टीतला आशय समजून घेण्यास उत्सुक करणारी आणि सर्जनशीलतेला मुक्त वाव देणारी शिक्षणपद्धती आणायला हवी. मुलांसाठी किमान गावागावांतून, वस्तीपातळीवर गंमतशाळा सुरू करण्याचं स्वप्न मी यासाठीच पाहतो आहे. यासाठी केवळ दोन दिवसांच्या प्रशिक्षणाची जरुरी आहे. आणि ज्याला समाजातल्या मुलांच्या शिक्षणाचा ध्यास आहे, यासाठी काही नवीन शिकण्याची आंस आहे- असं कुणीही हे प्रशिक्षण घेऊ शकतं.

आपण नव्याने शिकू लागलो, स्वत:त सकारात्मक बदल घडवू लागलो; तर अशा वेळी मुले आपल्या पाठी नाही, तर आपल्यासोबत असतील यावर विश्वास ठेवा.

Tags: प्रसाद मणेरीकर राजीव तांबे महात्मा गांधी एबीपी माझा पालक मुल छोटीसी बात भाषा बालसाहित्य गंमतशाळा विज्ञान मुलाखत Mahtma Gandhi ABP Majha Palak Mul Chotisi Baat Bhasha Balsahitya Gamatshala Science Mulkhat Rajiv Tambe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके