पण रत्नागिरीच्या ‘समानता’ सारखी (आणि वैनतेय, विकास, राष्ट्रसेवक आणि ओपिनियन संपा.) वृत्तपत्रे सांगतील की गोखले-आगरकरांच्या वरील मताला, आज अठ्ठ्याऐंशी वर्षांनी स्वतंत्र लोकशाही गणराज्य असणाऱ्या भारतात मान आहे कोठे?
अभिनंदन आणि स्मरण
साधनेने काढलेला पीटर अल्वारीसचा विशेषांक वाचला. साथी अल्वारीस यांचे व्यक्तित्व, व्यक्तिमत्व संघटनाचातुर्य, दलित मजुरांबद्दलची कळकळ, सभ्य गृहस्थ म्हणून त्यांचा सर्वत्र अनुभवास येणारा जिव्हाळा यांचे यथातथ्य चित्रण सदर अंकातील लेखांतून झाले आहे.
गेले अकरा महिने देशात नांदणाऱ्या हट्टाग्रही नियंत्रणाच्या कैचीतही साधना आपला दर्जा, बाणा व स्पष्टोक्ती टिकवून पूज्य साने गुरुजींचे ब्रीद चालवत आहे, याबद्दल मोकळ्या मनाने कोणीही विचारवंत अभिनंदन करील.
श्री कुरुंदकरांचा ‘स्वातंत्र्य आणि जबाबदारी’ हा लेख देशाच्या प्रत्येक हितचिंतकाने मनन करण्यासारखाच आहे मतस्वातंत्र्याचा फायदा उठवून हिंसाचारच काय हिंसाप्रचार चालू न देण्याचा शासकीय निर्धार निश्चितार्थाने स्वागतार्ह असला तरी महाराष्ट्रात त्याचे काहीच वाटणार नाही. कारण 1888 सालीच सुधारकांचे जाहीरपत्रक काढताना गोपाळराव आगरकर व ना. गोपाळराव गोखले यांनी विचारवन्त महाराष्ट्रीयांचे प्रतिनिधी म्हणून सांगूनच टाकले होते की ‘’शियर फिजिकल फोर्स ॲज अॅन इन्स्ट्रूमेंट ऑफ पोलिटिकल सोशल ऑर मॉरल कन्व्हर्जन हॅज सिझ्ड टू एक्झिस्ट अँड द डेज ऑफ इंटलेक्चुअल पर्सूएशन हॅव कम. दोज देअरफोर, वॅट वॉन्ट टू कॉन्ट्रिब्यूट व्हेनेव्हर दे कॅन, टू ए राइट अंडरस्टैंडिंग ऑफ मेनी प्रॉब्लेम्स लाइंग बिफोर द इंडियन पब्लिक नीड ऑफर अपॉलॉजी फॉर अव्हेलिंग देमसेल्व्हज् ऑफ वन् ऑफ द बेस्ट मीन्स ऑफ इंत्लेक्चूअली रिचिंग द पीपल– द न्यूजपेपर.
[राजकीय, सामाजिक वा नैतिक परिवर्तनासाठी निव्वळ शक्तीचा किंवा बळाचा वापर करण्याचे दिवस संपले. त्यासाठी आता बुद्धीचा वापर करून लोकांची मने वळवावी लागतील. भारतीय जनतेपुढचे असंख्य प्रश्न बुद्धीच्या बळावर सोडवण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी मागेपुढे पहाता कामा नये. लोकांपर्यंत पोचण्यासाठी बुद्धी हे सर्वोत्तम साधन आहे.]
पण रत्नागिरीच्या ‘समानता’ सारखी (आणि वैनतेय, विकास, राष्ट्रसेवक आणि ओपिनियन संपा.) वृत्तपत्रे सांगतील की गोखले-आगरकरांच्या वरील मताला, आज अठ्ठ्याऐंशी वर्षांनी स्वतंत्र लोकशाही गणराज्य असणाऱ्या भारतात मान आहे कोठे?
पु. पां. गोखले, कऱ्हाड
----------
पत्र्यांचे घर
सरकार सुधारणेच्या गोष्टी खूप बोलत आहे. कायदे करत आहे. शिक्षा देत आहे. शिक्षा देण्याच्या गोष्टी बोलत आहे. खर्च करत आहे, काही करण्याचे बाकी ठेवत नाही. आणीबाणीपासून हुंडाबंदीपर्यंत सर्व कायद्याने करण्याची खटपट चालू आहे. सर्व शक्ती एकवटून, सर्व हक्क आपल्या हातात घेऊन काही तरी दंगल उठवण्याचे विचारात आहे. या सर्व खटपटीमागे हेतू एकच दिसत आहे. काही चांगले झाले तर ते आम्हीच केले असे दिसले पाहिजे. आमच्याखेरीज आता दुसरा नाही!
परंतु होत आहे काय? राज्यकर्ते सत्ताधिष्टित पक्ष, राजकारणी, नोकरशाही, पुढारी हे सर्व इतके चारित्र्यशून्य झाले आहेत की हे लोक आपले काही चांगले करतील असे लोकांस वाटत नाही. लोकांचा त्यांच्यावर विश्वासच नाही. जे स्वतः चारित्र्यहीन आहेत त्यांना दुसऱ्यास सुधारता येणार नाही. संधिसाधूंनी उभारलेले हे पत्यांचे घर आहे.
सी. वा. किर्लोस्कर, बेळगाव
----------
किशोरकुमार कुठे आहेत?
आकाशवाणीवर सध्या फिल्मी गीते एवढा एकच एक कार्यक्रम त्यातला त्यात ऐकण्याजोगा असतो. परंतु अलीकडे किशोरकुमारची गीते आकाशवाणीवरून एकदम नाहीशी झाली.
कारणांची चौकशी करता असे कानांवर आले की, सस्ती प्रचारकी गाणी मोफत गाण्याचे त्याने नाकारले म्हणून त्याला, नव्हे आकाशवाणीच्या ग्राहकांना ही सजा फर्मावण्यात आली आहे. अर्थात किशोरकुमारने सस्ती प्रचारकी गीते गायली असती तर जी सजा ग्राहकांना झाली असती, त्यापेक्षा ही सजा परवडली म्हणायची! असेही कानांवर आले की, आज्ञाभंगाचे प्रायश्चित म्हणून त्यांना बंदिगृहाचीही वाट दाखवण्यात आली आहे.
पत्रांच्या उत्तराची साप्ताहिक पोपटपंची करणारी आकाशवाणी या पत्राचे उत्तर देईल काय?
आकाशवाणीचा श्रोता, मुंबई
----------
आम्ही पाठीशी आहोत
लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करून लोकशाही सतेज ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या साधनेस लक्ष प्रणाम! प्रत्येक अंक शिक्षणाचा नवीन पाठ घेऊनच अवतरतो.
आणीबाणी जाहीर झाल्यापासून साधनेला धार पडत आहे. देशात ‘साधना’, ‘भूमि-पुत्र’ ही दोनच वार्तापत्रे अशी आहेत की, जी जनतेशी संवाद साधून वस्तुस्थितीचे चित्रण करताहेत.
‘भूमि-पुत्र’ प्रकरणी तर सरकारचे वाभाडे निघाले.
अशा एक ना अनेक प्रकरणांतून सरकार जनतेत बदनाम होत आहे. पण जनमताची कदर आहे कुणाला?
‘गजांपलिकडून’ हे सदर सुरु केल्याबद्दल आभार.
लोकशाहीचा मुक्तपणे श्वास घेऊ इच्छिणारे सर्व भारतीय आपल्या पाठीशी आहेत.
अंकुश काळदाते, इस्थळ
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या