डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आसाम हा सोमा प्रांत आहे. हे ओळखून हा प्रश्न ताबडतोब सोडवला पाहिजे. आसामियांना धंद्यात, शेतकीत, सरकारी कारभारात, नोकऱ्यांत प्राधान्य मिळाले पाहिजे. विशेष तंत्रज्ञ बाहेरून येतील, पण रोजचे व्यवहार आसामीच करील, या तत्त्वावर त्यांनी गेले दहा महिने अडचणी सोसून शांततेच्या मार्गाने लढा चालवला आहे. मकवानापेक्षा श्री एस्. एम्. जोशींसारखा या प्रश्नाकडे सहानुभूतीने पाहणारा लवाद सरकार का नेमत नाही?

 

क्रांती

व्यासपिठावर माझ्याकडून

आश्वासने फेकणाऱ्या

त्या धूर्त सहकाऱ्यांना

मी शोधतो आहे.

आता व्यासपिठाखाली

श्रोता म्हणून उभा आहे,

त्या रंगीत मुखवटयांची

चाहूल घ्यायला,

ज्यांनी माझ्या आश्वासनातील

भावना कोंडल्या आहेत,

बहुरूपी मुखवट्यांना

हात घालून

सत्य जगात आणणाऱ्या

बलशाली बाहूच्या

मी शोधार्थ आहे,

धुंडाळीत आहे,

एक क्रांतीची मशाल

जिच्याने मुरबाड जग

किंवा मी

पेटणार आहे.

- पंडित वा. पाटील

फळे, ता. पन्हाळा

*****

सर्वकाही माणसासाठी

17 सप्टें. 80 च्या 'साधना' मधील "उसाच्या भावाचे गौडबंगाल" हा सुधाकर मायदेव यांचा लेख फारच मार्मिक असून दिशाभूल करणाऱ्यांच्या डोळयांत झणझणीत अंजन घालणारा आहे. खर्च व उत्पादन याचा वास्तव हिशेब दाखवून दिलेला आहे. परंतु जनतेला लुबाडायचे किंवा लुटायचे ठरवल्यानंतर राष्ट्रीय विचार कोठून सुचणार?' दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये' असे चित्र स्पष्ट दिसते. सत्याची कास धरणाऱ्यास साथ लवकर मिळत नाही आणि मिळाली तरी त्यांच्यांत फाटाफूट करून स्वार्थ नेमका साधून घेतात. स्वार्थासाठी पाप झाले तर त्यास ते पाप कसे म्हणणार?

- डॉ. र. ना. आचार्य, एरंडोल, जि. जळगाव

*****

(हिंदू) संशोधकांचा नवा पंथ

20 सप्टेंबरच्या साधनेतील श्री गौतम शिंदे यांच्यावर जळफळाट करणाऱ्या एका हिंदुत्वनिष्ठ संशोधकाचे पत्र वाचले. इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या नावाखाली आपलीच टिमकी वाजवणाऱ्या संशोधकांचा नवा पंथ उदयाला येत आहे. भरभक्कम संदर्भासहित लिहिलेल्या गौतम शिंद्यांच्या लेखाला भयानक म्हणणारे हे विद्वान बदलत्या काळाची कधी दखल घेणार? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उत्तर द्यावयास निघालेल्या या महाभागांना एवढेच सांगावेसे वाटते की, जगातील कोणताच वैचारिक झंझावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाला जमीनदोस्त करू शकणार नाही. आंबेडकरभक्त आंबेडकर विरोधकांच्या विचारांच्या चिंध्या केल्याशिवाय थांबणार नाहीत.

- सतीश वि. कुलकर्णी, वाई

*****

'साधने' त मधू लिमये!

साधनेचा ताजा अंक उघडून बघताच, हा साधनाच, आहे यावर क्षणभर विश्वासच बसेना! 'फूटपाडे', दूरदृष्टे?, 'करंटे', 'रशियन दलाल' इत्यादी इत्यादी असलेल्या मधु लिमयांच्या भाषणाचा सविस्तर वृत्तांत साधनेमध्ये प्रसिद्ध झाला आहे हे खरेच वाटेना. गेले वर्ष दीड वर्ष साधना आणि साधना परिवाराने मधु लिमयांना लाखोली वाहिल्याशिवाय आपल्या लिखाणातील वाक्यही पुरे केले नाही. त्या साधनेत त्यांच्या भाषणाचा इतका सुरेख वृत्तांत छापून येतो, ह्यावर इतका सहजासहजी विश्वास कसा बासावा? साधना परिवाराने तर 'रक्तापलीकडची' लिमये यांच्या बरोबरची नाती तडाडकन तोडून टाकली होती, अगदी जाहीरपणे!

तेव्हा हा साधनाच आहे का, हा माझा संभ्रम सुधा वर्दे यांचा असामवरील लेख वाचताना दूर झाला. आसामच्या प्रश्नांचा त्यांनी इतका चांगला उहापोह करताना 'कंसमामा'चा वापर करून गेल्या लोकसभा निवडणुका ह्या 'चरणांसिंगांच्या कृपेने आणि लीलेने आल्या' हे वाक्य वाचून माझा संभ्रम दूर झाला. हा साधनाचा आहे, आणि हाच साधनेचा खरा सूर आहे. पट्टीचा पायकसुद्धा कधीतरी एखादी बेसूरी तान घेऊन जातो, तसा मधु लिमयांच्या भाषणाचा साधनेमधील वृत्तांत आहे, याची खात्री पटली. लोकसभा निवडणुकीची कृपा आणि लीला चरणसिंगांची किती होती आणि मोरारजी आणि इतर जनता नेत्यांची किती होती, हे आपणच प्रसिद्ध केलेल्या मधु लिमये यांच्या भाषणातुन सुधा वर्दे यांच्या लक्षात येईल अशी आशा आहे.

काहीही असो, मधु लिमये यांच्या भाषणाचा सविस्तर आणि योग्य वत्तांत साधनेत वाचून, समाजवादी ऐक्याचे भाबडे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात आशेचा अंकुर उगवल्याशिवाय राहणार नाही.

- जयंत धर्माधिकारी, मुंबई

*****

मनाच्या वेदना

समाजजीवनाला दुःखाच्या नि अशांततेच्या गर्तेत लोटणाऱ्या भ्रष्टाचाराला निपटून काढण्यासाठी लोकनायक जयप्रकाशांनी स्वकीय राज्यकर्त्यांविरुद्ध अभूतपूर्व आंदोलन उभं केलं होतं. संपूर्ण जीवनमरच्या चिंतनातून आकारास आलेली संपूर्ण क्रांतीची कल्पना त्यांनी आमच्यापुढे ठेवली व तिच्या पूर्ततेसाठी त्यांनी परिश्रमपूर्वक जनता पक्ष उभा केला. राजसत्ता प्राप्त करून दिली, पण आम्ही करंटे! सर्वालाच सुरंग लावला व वाटोळे केले. जयप्रकाशजी व्यथित झाले. "मृत्यू येईल तर बरे!" असे त्यांचे शेवटचे शब्द हृदयावर सुरी फिरवून गेले. देशाच्या इतिहासाची ही शोकांतिकाच म्हणायची!

माझ्या वडिलांची वडिलोपार्जित मालकीची फलटण (जि. सातारा) जमीन असून, आज पर्यंत ते ती स्वतः पिकवत, परवा ते वृद्धापकाळाने आजारी पडले व माझ्याकडे आलेत. जमीन माझ्या व भावाच्या नावावर व्हावी म्हणून त्यांनी संबंधित तलाठयाकडे रजिस्टर पोस्टाने अर्ज करून त्याची एक प्रत मामलेदाराकडे पाठवली आहे, पण मला अनेकांचा हिताचा सल्ला आहे की "तलाठ्यास पैसे देऊन काम करून घेणं शहाणपणाचं. सध्या सर्वत्र तेच चाललंय. व्यवहारात असंच चालतं".

जयप्रकाशांच्या संपूर्ण क्रांतीच्या कल्पनेनं व भ्रष्टाचार विरोधी आंदोलनानं प्रभावित झालेल्या माझ्या मनाला या सल्ल्यानं असह्य वेदना होतात.

- वि. ना. शहा, वालचंदनगर

*****

बलात्कार संबंधीचा लेख उत्कृष्ट

आपला दि. 20 सप्टेंबरचा अंक उत्कृष्ट आहे. संपादकीय त्यातील सडेतोडपणामुळे लक्षात राहील. आणि बलात्कार-बाहेरील व आतील' हा प्रा. लीला पाटील यांचा त्यांच्यातल्या तळमळीने व एका वेदनामय सत्याने 1978 च्या दिवाळी अंकातल्या 'सीता' ह्या स्नेहलता रेड्डीच्या नाटिकेची आठवण करून देतो. सध्याच्या स्त्रियांवरील अत्याचारांच्या संदर्भात ती नाटिका पुनर्मुद्रित करायला हरकत नसावी.

परत एकदा आपल्या उत्कृष्ट अंकाबद्दल अभिनंदन!

- विजय बामणे, जालना

*****

आसाम आंदोलनांसंबंधी

ता. 6 सप्टेंबर 1980 च्या साधनेतील श्री पाटील यांचा आसाम आंदोलनाबाबतचा लेख मुळीच पटणारा नाही. आंदोलनवाल्यांची मागणी काय, तर 1951 नंतर जे पूर्व पाकिस्तानातील नागरिक आसामात घुसले. त्यांना बाहेर काढावे. निदान त्यांचा नागरिकत्वाचा हक्क रद्द करावा. या मागणीत अन्याय असे काय आहे? आमची संस्कृती, परंपरा, जीवनपद्धती, भाषा, लिपी, धर्म सर्व काही हिंदूंपासून निराळे आहेत; आमचे वैशिष्टय राखण्याकरता आमचे निराळे राष्ट्र बनले पाहिजे, अशी मुस्लिम लीगने 1934 पासून मागणी केली. मुस्लिम लीगचे म्हणणे मान्य करून हिंदुस्तान सोडताना ब्रिटिशांनी भारताचे विघटन करून भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्र निर्माण केली.

पूर्वेकडे पश्चिम बंगालमधील बहुसंख्य हिंदू वस्तीचे जिल्हे सोडून उरलेला सर्व बंगाल आणि आसाममधील सिल्हेट जिल्हा पाकिस्थानकडे गेले. परकीय मुलखात घुसणारे मुसलमान असोत वा हिंदू असोत, त्यांना घुसण्याचा काय अधिकार?

आसाम हा सोमा प्रांत आहे. हे ओळखून हा प्रश्न ताबडतोब सोडवला पाहिजे. आसामियांना धंद्यात, शेतकीत, सरकारी कारभारात, नोकऱ्यांत प्राधान्य मिळाले पाहिजे. विशेष तंत्रज्ञ बाहेरून येतील, पण रोजचे व्यवहार आसामीच करील, या तत्त्वावर त्यांनी गेले दहा महिने अडचणी सोसून शांततेच्या मार्गाने लढा चालवला आहे. मकवानापेक्षा श्री एस्. एम्. जोशींसारखा या प्रश्नाकडे सहानुभूतीने पाहणारा लवाद सरकार का नेमत नाही?

- डाॅ.वि.गो.दिधे,दादर

*****

सर्वच कोसळत आहे!

सध्या मी समता युवजन सभेचे काम दिल्लीच्या परिसरात करतो.

देशातील जातीयताविरोधी वातावरण प्रभावी करण्याची जरूरी आहे. जनजागरणाच्या हेतूने आम्ही एक दिवसाच्या उपवासाचा कार्यक्रम ठरवला आहे.

इंदिरा गांधींचे अपयश आणि विरोधी पक्षांमधील आत्मविश्वासाचा अभाव, यामुळे देशात संकटाची अवस्था निर्माण झाली आहे. संजयच्या पाण्यामुळे वाहवत जाण्याची दिशा अस्पष्ट झाल्याचा भ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

सर्वच काही कोसळत असल्यागट वाटत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक पाऊल अत्यंत जबाबदारीने टाकण्याची गरज आहे. 'जनता' नेते या बाबतीत आपली 'योग्यता' दाखवून चुकले आहेत.

पुढे काय?

- विजय प्रताप,दिल्ली

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके