संसदेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नाथ पै, मधु लिमये, मधु दंडवते, पुरुषोत्तम मावळंकर इत्यादी खासदारांनी व विधिमंडळात श्री धोंडगे, आठल्ये गुरुजी, डॉ. मंडलिक, डॉ. बापू काळदाते, मृणाल गोरे प्रभृतींनी अशीच भाषणे केली आहेत. तीही हवेतच विरून गेली ! अर्थात संसदीय संस्थांच्या कार्यवृत्तांत ती नोंदलेली असतात.
ही भव्य नदी
तीर्थक्षेत्राजवळची ही भव्य नदी श्रदाळू लोकांचे यात्रास्थान
सूर्योदयापूर्वी उबकी मारून नदीतले पाणी नदीत सोडून
पहाटेच्या वेळी अर्घ्य देतात भगव्या कफनीतले कुणी मुनी
प्रातर्विधीपासून अंत्यविधीपर्यंत सर्व सोय करते ही भव्य नदी
दिंड्या पताका कल्लोळ होतो सुबक दगडी घाट ओथंबतो
तीर्थ म्हणून पाणी पितात निर्माल्य आणि अस्थीही टाकतात
जन्मभर पापे करून थकल्यावर क्षणार्धात पुण्यवान करण्याची करामत करते ही भव्य नदी.
महेश विश्वनाथ ताराबादकर, पुणे
----------
स्मरण
श्री अप्पा गोरे यांच्या दु:खद निधनाची वार्ता साधनेवरून (ता. 25 नोव्हेंबर 1978) कळली. अतीव दु:ख झाले. ते सतत धडपड करणारे कार्यकर्ते होते. गागोद्याला पूज्य विनोबांच्या जन्मगावी काही कार्यक्रम असला की ते खालापूरहून यायचे. मग आमच्या गप्पा रंगायच्या, आदिवासींबद्दल त्यांना किती आत्मीयता ! गागोद्याजवळच्या हेमडी या कातकऱ्यांच्या वाडीवर सामुदायिक शेतीचा प्रयोग आम्ही करत होतो, तेथे येऊन ते राहायचे. त्यांचा परिचय झाला आणीबाणीच्या काळात. ते धडपडत होतेच. आम्ही लोक हिंडतोय असे कळल्यावर एक दिवस पुण्यात येऊन भेटले, म्हणाले, ‘‘चला, खालापुराला आपण हिंडू."
मी चार दिवस त्यांच्या सोबत खालापूर भागात खेड्यापाड्यांत हिंडलो. त्या वेळी अप्पांच्या अफाट लोकसंग्रहाचे दर्शन झाले. मग एस. एम. जोशींचा दौराही त्यांच्या भागात दोन दिवस झाला. त्या वेळी खोडकिड्यांमुळे त्या भागातले शेतकरी त्रस्त झाले होते. म्हणून खोडकिडा निर्मूलन परिषद त्या भागात आम्ही संघटित केली. एस. एम. व आबा करमरकर आले होते. 100 पोलिसांच्या गराड्यांत 300 शेतकऱ्यांची परिषद त्या वेळी झाली. अलीकडे त्यांची प्रकृती ठीक नसायची. म्हणायचे, ‘‘स्मरण राहत नाही, जगणे नको वाटते!’’ गेल्या वर्षी लोणावळ्याला एका शिबिरासाठी एस. एम. ना मुंबईहून घेऊन चाललो होतो. एक गाडी मिळाली होती. खालापूरजवळ आल्यावर अप्पांचे स्मरण झाले. ते आजारी आहेत असेही कळले होते. आम्ही त्यांना भेटायला गेलो. अण्णांना पाहताच त्यांना खूप आनंद झाला. तासभर त्यांच्याशी गप्पा मारून आम्ही निघालो. शहादे भागात आदिवासींत आम्ही काम करतो तेथे एकदा यायचे आहे, असे ते नेहमी म्हणत. पण त्यांचे येणे मात्र होऊ शकले नाही. श्री अप्पा गोरे यांच्यासारखे तळमळीने व सोशीकतेने काम करणारे कार्यकर्ते विरळाच!
गोविंद का. शिंदे, शहादा
----------
शरीयत बदलू शकते
सव्वीस नोव्हेंबरच्या सण्डे साप्ताहिकात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे जनरल सेक्रेटरी मौलाना मिनातुल्लाह रहमान ह्यांची जनाब परवेज अहमद ह्यांनी घेतलेली मुलाखत वाचली. शरीयत जाणि दीन ह्या संबंधात कुराण फरक करतो. कुराणातील एका वचनानुसार लोकांलोकांनुसार शरीयत बदलत राहते. पण दीन हयात बदल होणे असंभव. म्हणजे इस्लाम धर्मात शरीयतमध्ये बदल होऊ देण्याची मुभा आहे तर? अशा अर्थाच्या, जनाब परवेज अहमद ह्यांनी विचारलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांना मौलाना मिनातुल्लाहनी दिलेल्या उत्तराकडे साधनेच्या वाचकांचे मी लक्ष वेधू इच्छितो. मौलाना कबूल करतात की दीन आणि शरीयतमध्ये स्पष्ट फरक आहे. दीन धर्माच्या मूलतत्त्वांवर आधारित असल्यामुळे त्यात बदल होणे असंभव. काळ मोजेसजचा असू द्या की प्रेषित मोहम्मदाचा, दीनचे स्वरूप तेच राहते. ह्याउलट प्रेषिताला तीच शरीयत लागू नव्हती जी इसाहला (जीससला) होती. प्रेषितानंतरही त्याच्या अनुयायांनी, काळाच्या गरजेअनुसार शरीयतचे नवीन नियम स्वीकारले आहेत. उदाहरणार्थ, पूर्वी इमाम अबू हनीफांनी दिलेला एक निवाडा प्रचलित होता. ह्या निवाड्यानुसार, परागंदा झालेल्या नवऱ्याच्या बायकोला पुनर्विवाहासाठी नव्वद वर्षे थांबावं लागत असे. आधुनिक युगात ह्याची अवास्तवता जेव्हा जाणवली तेव्हा तो निवाडा बाजूस सारून इमाम मलीक ह्यांचा निवाडा आपण अंगीकारला. हया निवाड्यानुसार अशा स्त्रियांना फक्त साडेचार वर्ष थांबावं लागतं. म्हणून शरीयत बदलू शकतच नाही असं मानणं चुकीचं आहे. नवीन परिस्थितीअनुसार त्यात बदल घडवता येतात. मात्र असे बदल सर्व शक्तिमानाच्या आज्ञेला पूरक असे असले पाहिजेत.
अनिल एकबोटे, नवी दिल्ली
----------
परीक्षण आणि धन्यतापत्र
इंदूताई केळकरांचे परीक्षण वाचले. अपेक्षेअनुसार लोहियावादी इंदूताई यापेक्षा वेगळे परीक्षण करू शकणार नाहीत. लोहियांनी काही एकांतिक माणसं जरूर निर्माण केली. त्यापैकी एकांड्या इंदूताईंबद्दल कोणालाही आदर वाटेल. त्यांच्या लेखाचे सार स्पर्धा ठेवून 'संघवाल्यांनी आत्मवंचना व परवंचना दोन्हीही साधली नाही,' असे आहे. त्या लेखातल्या सर्व मतांची परीक्षा घेण्याचा विचार नाही. पण ‘संघवाले म्हणजे सरधोपट जातीय व संकुचित आणि प्राचीन संस्कृतीतल्या चांगल्याचा आग्रह धरणारे पापी’ असा पुरोगाम्यांचा लाडका सिद्धान्त इंदूताईंनाही सोडत नाही. त्यामुळे त्या सुखवादी संघीयांवर तुटून पडतात व सुखवादी समाजवाद्यांची ‘आपल्या सुखवादाची आत कुठंतरी खंत आहे-' म्हणून भलावण करतात. तात्पर्य, सुखवाद आपणां सर्वांना जडलेला रोग आहे. संघवाल्यांनी मंत्रिपदे उपटली हे त्यांचे विधान खरे बालिश. पाश्चात्त्य संस्कृतीचा निषेध, त्यातल्या टाकाऊ भागाचा जरूर करायला हवा. पण त्यामुळे आपण मान्य केलेली संसदीय लोकशाही कशी काय संघवाल्यांनी त्याज्य मानावी? खरी गोष्ट अशी आहे की समाजवाद्यांचा अहंकार कमी होत नाही. त्यामुळे समाजउत्थानाचे कार्य आणखी कोणी करूच शकणार नाही असा समज. जाता जाता ज्ञान प्रबोधिनीला लाथाऱ्या मारताना तिला भेट देण्याची तसदी केळकरांनी घेतली असणारच. पेंडशांनी सगळी मुलं 'बुक' केली नाही. समाजवाद्यांनी कमी बुद्धीच्या मुलांसाठी जरूर प्रयत्न करावेत. मुलांचा या समाजात तोटा नाही. लोहियांनी फाळणीनंतर खंत व्यक्त केली म्हणून त्यांची आठवण कशाला? तशी खंत व्यक्त करणारे संघात हजारोंनी आहेत, एक सत्य की हजारो कार्यकर्त्यांना ध्येयवादाची स्फूर्ती देणाऱ्या दीनदयालांना विचारात न घेता चालणार नाही. आता ल. के. देशपांडे यांचे धन्यतापत्र. पी. बी. पाटील यांचे परखड (हे तर जनसंघीय विशेषण) उद्गार, ‘इंदूताईंनी बरे झाडले’ याबद्दलचे पत्र. 'आणीबाणीनंतर संघीयांची प्रतिमा झपाट्याने ढासळत आहे' या देशपांड्यांच्या गंभीर इशाऱ्याचा गंभीरतर विचार करण्याचे संघीयांचे काम. पी. बी. चे कौतुक. पुरोगामी विचार बोलणायची जाण दुदैवाने समाजात कमी नाही. आगरकरांपासून या बोलक्या सुधारकांची संख्या वाढतेच आहे. देशपांड्यांनी गांधी, नेहरू, लोहिया, जयप्रकाश यांच्या विचारांचा ध्यास घ्यायला सुचवले आहे. हे सगळे एकाच वाणाचे कसे काय ठरतात! त्यापेक्षा दंडवते, नारगोलकर, प्रधान यांना देशपांडे अहेर देतात. अहेर असा- ‘हे सगळे आसुसलेले, उच्च वर्णीय पुरोगामी विचारवंत आहेत.’ मी संघाबद्दल आपुलकी असणारा. तरीही ज्यांनी आपल्या आयुष्यभर शुद्ध विचारांच्यावर जाऊन काय केलं आणि त्याची किमत दिली त्यांना आसुसलेले म्हणणे आणि त्यापेक्षाही उच्च वर्णीय ही तूर्तासची चलनी शिवी देणे.
देशपांडे, कमाल करता बुबा! मी संघीय असून हे वर्णबिर्णं सर्व झूट मानतो. तुम्ही तर पुरोगामी दिसताय. पण वर्णाची भाषा करताच आहात. आणि तीही समाजवाद्यांना व सर्वोदयवाद्यांना झोडण्यासाठी. मग संघीयांची तर तुमच्यापुढे गच्छंतीच. तेव्हा कृपया तुमचा हा सुरक्षित वर्ण जाहीर करा बुवा. म्हणजे माझ्यासारखे जातीय आणि दंडवते, नारगोलकर, प्रधान हे उच्च वर्णीय त्या वर्गात दाखल तरी होतील. म्हणजे देशपांड्यांप्रमाणे या सुरक्षित वर्णात मग विजयच विजय. माझ्यासारखे अनेक वर्णाभिलाषी तुमच्या दाराशी रांगा लावतील. तिथून फक्त शरसंधानच करायचे असते.
र. वि. जोगळेकर, मडगाव
----------
कडक शासन हवे!
तेलंग बंधूंचे डोळे काढले त्याची श्री भालचंद्र देशपांडे (साधना ता. 9 डिसेंबर 1978) यांनी दिलेली हकिकत अंगावर शहारे आणणारी आहे. या अन्यायाबाबतचा थंडपणा पाहून संताप येतो. तेलंग दलित नसून परीट आहे म्हणून हा थंडपणा आहे का? आमची अन्यायाची चीडदेखील जातीच्या विचाराने भ्रष्ट होणार आहे काय? समाजकंटकांच्या कृत्यांवर पांघरूण घालण्याची जबाबदारी जातीच्या मंडळींनी घेणे अनिष्ट होय. नांदेडच्या डॉक्टरांनी अशा रोग्याला जागेच्या अभावी परत पाठवले हे वाचून धक्का बसला. वजिराबादच्या अंमलदारांनी निदान तक्रार तरी नोंदवून घेतली. त्यांना त्याबद्दल धन्यवाद! भानामतीसारख्या अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी युवा शक्तीने कंबर कसली पाहिजे. त्यातूनच असले प्रकार थांबतील. या प्रकरणातील गुन्हेगारांना आणि त्यांच्या बाबत हलगर्जीपणा करणारांना कडक शासन हवे. गवई बंधू प्रकरणी धावाधाव करणाऱ्यांनी आता गप्प बसू नये.
ग. कृ. माळवदे, मिरज
----------
उपेक्षित मुद्दा
लोकशाही : ‘सोय की मूल्यनिष्ठा' हा साधनेतील अग्रलेख (ता. 16 डिसेंबर) उद्बोधक आहे. त्या लेखात उत्तमराव पाटील आणि एन. डी. पाटील या दोघांचा रास्त उल्लेख आला आहे. पण या संदर्भात डॉ. कुमार सप्तर्षी यांचे झालेले भाषण काँग्रेसच्या आमदारांचा बेगडीपणा अधिक उघड करणारे होते. चप्पलफेकीच्या प्रकाराचा निषेध करता करताच कारेमोरे यांना आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी मखलाशी यशवंतराव मोहिते यांनी केली तेव्हा डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘‘न्यायालयात, न्यायाधीशांसमक्ष गुन्हा घडला असताना साक्षी-पुरावे आणि गुन्हेगाराला बाजू मांडण्याची संधी या गोष्टींची तरफदारी करणे गैर आहे.’’ असे त्यांनी बजावताच मोहितेसाहेबांच्या मेंदूला झिणझिण्या आल्या आणि त्यांनी सभात्याग केला! विधिमंडळातील आमदार पुष्कळदा फार चांगली आणि समर्पक भाषणे करतात. पण ती वाऱ्यावर जातात. अशा निवडक भाषणांचा संग्रह प्रसिद्ध करण्याची प्रथा हवी. संसदेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नाथ पै, मधु लिमये, मधु दंडवते, पुरुषोत्तम मावळंकर इत्यादी खासदारांनी व विधिमंडळात श्री धोंडगे, आठल्ये गुरुजी, डॉ. मंडलिक, डॉ. बापू काळदाते, मृणाल गोरे प्रभृतींनी अशीच भाषणे केली आहेत. तीही हवेतच विरून गेली ! अर्थात संसदीय संस्थांच्या कार्यवृत्तांत ती नोंदलेली असतात. संसदीय संस्थांनी किंवा कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनसारख्या संस्थांनी अशा भाषणांच्या संग्रहाच्या प्रकाशनांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
संदीप मोरे, मुंबई
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या