डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधना निवडणूक विषयक अंक (ता. 5-1-80) वाचकांच्या हाती निवडणुकीच्या आधी पोचता करण्यात आलेला आहे, हे राष्ट्रप्रेमाचे द्योतक आहे. आचार्य दादा धर्माधिकारी यांनी इंदिराजींच्या व्यक्तिमत्वाविषयी तीन अवगुणांचे यथोचित वर्णन केले आहे. संपादकीयामध्ये इंदिरा गांधींचे वास्तववादी वर्णन आणि मत देण्याऱ्यांनी कोणते उद्दिष्ट बाळगून मत द्यावे याचे समयोचित वर्णन आले आहे. इंदिरा गांधींच्या तथाकथित प्रगती दशकात उद्योगपतींची मालमत्ता दुप्पटीपेक्षा अधिक कशी वाढली याविषयी खुशाल चौधरीचा लेख उद्बोधक आहे.

फिनिक्स

आता झाड बहरले पक्ष्यांनी

त्यांच्या किलबिलाटाच्या पानाफुलांनी

सारेच पक्षी सोनेरी रंगाचे,..

सोनेरी अंगाचे

झाड झाले पक्ष्यांचे

पण सारेच पक्षी फिनिक्स नसतात

त्यांच्या सोनेरी पंखांवर

आपल्या राखेचे कण नसतात

काही पक्षी राखेत लोळून येतात

काही राखेतले सुवर्णकण वेचतात

राखेतून पुन्हा जन्मल्यावर

फिनिक्स सरळ झेप घेतो

निळ्या आकाशाकडे

स्वातंत्र्याची गाणी गात

झाड बहरलेय

आता झाड बहरलेय!

- श्रीरंग विष्णू जोशी

*****

हे प्रश्न मोडायलाच हवे

सध्या खानदेशमध्ये विशेषत: ‘लेवा पाटीदार’ समाजात हुंड्याचे प्रस्थ फारच वाढले आहे. त्या भागात काही वर्षांपूर्वी एकदा उठाव झाला होता. पुन्हा एकदा अशाच प्रकारचा उठाव होण्याची गरज आहे. त्यासाठी कॉलेजच्या तरुण-तरुणींना संघर्षाच्या भूमिकेपर्यंत नेता आले तर हा उपक्रम निश्चितच यशस्वी होईल. या संदर्भात अनेकांचे सहकार्य अपेक्षित आहे; संबंधित कार्यकर्त्यांचे ‘पत्ते’ मला हवे आहेत. यासाठी मुद्दाम हे पत्र लिहीत आहे. मार्च-एप्रिल-मे मध्ये खानदेशमध्ये जाऊन राहण्याचा माझा विचार आहे. टी. के. चौधरी वगैरेंना मी याबाबत लिहिले आहे. निवडणुकीत ‘पुणेकरांनी’ अपेक्षाभंग केल्याने सध्या मी स्वतःला मुंबईकरच समजतो!

- अरुण लिमये,

मुंबई

*****

माझाही एक हिशेब

जनता पक्षाने नाकर्तेपणाने आपल्या हातातील सत्ता गमावली व देशावर मुदतपूर्व निवडणुका लादल्या. निवडणुका जाहीर झाल्यावर तरी रिंगणात उतरू पाहणाऱ्या पक्षांनी साधा मतांचा हिशोब करायला हवा होता. सर्व पक्षाचा विरोध इंदिरा पक्षाला होता. इंदिरा पक्ष विरुद्ध इतर पक्ष असा सामना होणार हे ठरले असताना, सरळ सामने घडवून आणणे अपरिहार्य होते. तसे झाले असते तर आजचा प्रसंग उद्भवला नसता. इंदिरा गांधींबाबत हरिजन व तळाच्या जातीजमातीत सदाकाळ अनुकूल कौल होताच. त्यात त्यांनी या खेपेला मुस्लिम बांधवांना ‘आपण निवडून आल्यास मुस्लिम जनसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्या व अन्य सवलती; व अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे प्रति स्वरूप पुन्हा प्रस्थापित करून’ द्यायचे आश्वासन अब्दुल्ला बुखारींना देऊन त्या समाजाची गठ्ठा मतेही आपल्याकडे वळवून घेतली. अंदाजे हरिजन गिरीजनांची 10 टक्के मते व मुस्लिम समाजाची 10 टक्के मते जणू इंदिराजींनी आपल्या पोतडीत घालूनच ठेवलेली होती. मतदार संख्येच्या फार फार तर 60 टक्के मतदान होते हा आजचा ठरलेला हिशेब. त्यात वरील 20 टक्के गठ्ठा मते नेहमीच मतदानात असतात हे गृहीत उरलेल्या 40 टक्के मतांमध्येच इंदिरा पक्ष उमेदवार धरून इतर उमेदवारांची मतांची वाटणी व्हायची.

असा हा हिशेब असताना एक इंदिरा उमेदवाराविरुद्ध जनता, लोकदल, काँग्रेस (अर्स) व इतर अनेक उमेदवार यांनी उडी घेतली तर निकाल काय होणार, हे जवळ जवळ नक्कीच ठरलेले. 20 टक्के इंदिरा पक्षाला ठरलेली, उरलेल्या 40 टक्क्यांत सर्वांची वाटणी. यामुळे सर्व भारतभर इंदिरा पक्ष या खेपेस निवडून येणे संभव झाले. परस्पर मतभेद व सत्तेत वाटणी हा जनता पक्षाचा स्थायीभाव. निवडणूका उंबरठ्यावर आल्यातरी परस्पर मतभेद तसेच राहिले. व एक विरुद्ध अनेक उमेदवार अशी स्थिती झाली

माझं हे गणित सर्वत्र लागू पडून जनता, लोकदल काँग्रेस (अर्स), खलास झाले आहेत. पक्षफोडे राजनारायण, मधू लिमये, मृणाल गोरे आदी मंडळी याचे कोणालाच वाईट वाटले नाही, पण वाळलेल्या बरोबर ओलेही जाळून जाते, तसे नानासाहेब गोरे आदी लोकांनाही पराभव अनुभवावा लागला; याचेच फार वाईट वाटते.

- श्याम वाटवे,

जमखंडी

*****

भाकितांचे भाकित!

निवडणुकीचे निकाल पुन्हा एकदा मतपेटीचा चमत्कार दाखवीत आहेत आणि चमत्कार दिसला की नमस्कार करणारा सामान्य भारतीय माणूस या चमत्काराची चिकित्सा न करता, चमत्कार करणाऱ्या नेत्यांपुढे लोटांगण घालायला लागला तर त्यात आश्चर्य वाटायला नको! निवडणुकीपूर्वी अनेकांनी अनेक प्रकारचे अंदाज वर्तवले. ज्योतिष्यांचे अंदाज काही वर्तमानपत्रांत ठळकपणे प्रसिद्ध झाले; राजकीय निरीक्षकांचे अंदाज प्रसिद्ध झाले, मोठया वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी दोरे करून अंदाज वर्तवले, राजकीय नेत्यांनी आपल्या मुलाखतीत आत्मविश्वासाने (?) अंदाज व्यक्त केले. यातले किती खरे ठरले? या जाणत्या (?) प्रमाणेच सामान्य माणूसही आपापल्या मतदार संघाबद्दल अंदाज व्यक्त करीत होता, त्यातले किती खरे ठरले? मध्यमवर्गीय शिक्षितांचे अंदाज धडधडीत चुकलेले आपण अनुभवतो आहोत!

लोकमताचा अंदाज कोणालाच लागू नये, असे ते ‘गूढ’ आहे काय? असे असेल तर निवडणुका हा मोठा जुगारच म्हणायला हवा! ज्या आपल्या लोकशाहीत असा जुगार खेळावा लागतो त्या लोकशाहीला कोणत्या प्रकारची लोकशाही म्हणावी? भारतीय माणूस जसा दैववादी असतो तशी भारतीय लोकशाही देवाची लीला दाखवणारी ठरणार आहे काय? म्हणून तर दिल्लीत वावरणारे नेते निरनिराळया देवतांची पूजा करणारे आणि निरनिराळया बाबांचा आशीर्वाद मागत फिरणारे व ज्योतिषांचे सल्ले मागणारे झाले आहेत. लोकशाहीची ही लीला पाहाणारे हताश प्रेक्षक हीच भूमिका सामान्य नागरिकांकडे येणार काय? जाती, धर्म, वर्ग, प्रांत, भाषा यामुळे विघटित झालेले भारतीय समाजाचे वेगवेगळे स्तर पाहिले की हा समाज एकजिनसी कधी काळी होऊ शकेल का, असा प्रश्न पडतो. एकमेकांची मने समजून यायला या समाजातल्या विविध स्थरांतील घटकांत काही जवळीकच उरलेली नाही काय? भारतीय समाजही माया व जात हेच सत्य, असे तर नाही ना? म्हणूनच या समाजाबद्दलचे अनेकांचे निवडणूक अंदाज एवढ्या प्रमाणात चुकतात! सर्वांनी चिंता करावी असे हे प्रश्न आहेत!

- मनोहर दिघे,

जळगाव

*****

मला शंका नाही

इंदिरा गांधी या फॅसिस्ट मनोवृत्तीच्या आहेत यात तिळमात्र शंका नाही. त्यांच्या पाठीमागे असलेले भगतगण हे एकजात सत्तापिपासू आहेत. ते सत्तेच्या लोभामुळे अफगाणमार्गे भारतात रशियन्स आले तरी त्यांच्या स्वागतासाठीपुढे जातील! त्यांनी कधीच लोकशिक्षण करून निवडणुका जिंकल्या नाहीत. इंदिरा काँग्रेसच्या विजयामुळे व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूल्याचा पराभव झाला. आपला पराभव झाला नाही तर व्यक्तिस्वातंत्र्य इ. मूल्ये व ध्येयवाद यांचा पराभव झाला. हा दुःखाचा दिवस जिव्हारी बसत आहे. अलाहाबाद हायकोर्टाचा निवाडा पायदळी तुडवून घटनेची विटंबना करून आणीबाणीतील अन्यायांची बरसात करून इंदिराजींनी कोणते पाप केले व ते कदापि विसरता येणार नाही, हे जनसमूहास पुरते समजलेलेच नाही. आता लोकशाहीरूपी गाजराची पुंगी हाती आली ती जोपर्यंत वाजत आहे तोपर्यंत इंदिरा-संजय वाजवणार, न वाजेल त्या दिवशी हे माता-पुत्र मोडून खाणार, हे अनुभवावरून लोकांना समजले नाही ही फार मोठी दुर्दैवी घटना आहे. सत्ता, पैसा, वैभव यांनाच जीवनातील सर्वोच्च गोष्टी मानण्याचे संस्कार मिळतात, त्यामुळे समाजाचा असा अधःपात होतो.

- अ. मा. जोशी,

कन्नड

*****

समयोचित विशेषांक

साधना निवडणूक विषयक अंक (ता. 5-1-80) वाचकांच्या हाती निवडणुकीच्या आधी पोचता करण्यात आलेला आहे, हे राष्ट्रप्रेमाचे द्योतक आहे. आचार्य दादा धर्माधिकारी यांनी इंदिराजींच्या व्यक्तिमत्वाविषयी तीन अवगुणांचे यथोचित वर्णन केले आहे. संपादकीयामध्ये इंदिरा गांधींचे वास्तववादी वर्णन आणि मत देण्याऱ्यांनी कोणते उद्दिष्ट बाळगून मत द्यावे याचे समयोचित वर्णन आले आहे. इंदिरा गांधींच्या तथाकथित प्रगती दशकात उद्योगपतींची मालमत्ता दुप्पटीपेक्षा अधिक कशी वाढली याविषयी खुशाल चौधरीचा लेख उद्बोधक आहे. नरहर कुरुंदकर यांचा फॅसिझम विषयी निःसंदिग्ध लेख आणि श्री एस. एम्. जोशी यांचा ‘मनोमत' मथळ्याखाली वास्तववादी लेख सावध करणारा आहे. या सर्व लिखाणावरून मराठी वाचकांना जागृत राहाण्याचा संदेश मिळाला आहे. हा अंक वाचनीय व मननीय आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा आहे.

- अ‍ॅडव्होकेट बालचंद कोठारी,

गुलबर्गा

*****

समाधान

साधनेचा अंक एअर मेलने येतो. प्रत्येक अंक वाचल्यावर भारतात एक चक्कर मारून आल्याचे समाधान मिळते.

- सुरेश लिमये,

व्हर्जिनिया

*****

माणसांत गुंतवणूक

आजच्या व्यापार उद्योगाच्या जगात पैसा गुंतवण्याचे प्रकार ठरलेले आहेत, कारण त्यामागे प्रेरणा सांचयाची असते. पण सर्वात उत्तम गुंतवणूक असते ती माणसात केलेली गुंतवणूक. या दृष्टीने पुण्यात एक प्रतिष्ठान स्थापन झाले आहे. ‘इन्व्हेसटमेंट इन मॅन’ असे अन्वर्थक नाव सदर प्रतिष्ठानाला देण्यात आले असून त्याची एक दशकाची वाटचाल पूर्ण झाली आहे. प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री अच्युतराव पटवर्धन, श्रीमती मीनाक्षी आपटे आणि मॅथ्यू लेदर्ले.

ग्रामीण भागात ही माणसातली गुंतवणूक करायची असे संस्थेने ठरवले आहे. सामान्यतः गुंतवणूक करणारे अविलंब परतफेडीची अपेक्षा करतात. माणसात होणारी गुंतवणूक अशी शीघ्र फळ देणारी नसते. त्यातून दुष्काळी ग्रामीण भागात गुंतवणूक करण्याकडे प्रतिष्ठानाचा कल असल्याने त्यांनी पुणे जिल्ह्याच्या अशा भागातील मुलांमध्ये गुंतवणूक करायचे ठरवले आहे. वस्तूंचा दुष्काळ हा मानवी मनाच्या दारिद्र्यामुळे आणखीनच भीषण बनतो. तो दूर करण्याची ही दिशा आहे.

निराधार बालकांना परिवार जीवन उपलब्ध करून देणाऱ्या बालग्राम योजनेप्रमाणे फुलगाव येथे ज्ञानेश बालसदन चार वर्षांपूर्वी सुरू केले. गावकऱ्यांनी सहा एकर जमीन बालग्रामसाठी उपलब्ध करून दिली आहे. फुलगावलाच कृषिसेवा आणि सल्ला केंद्र सुरू करण्यात आले. शेतीला आधुनिकतेचे वरदान मिळावे आणि जीवनातील रूढीग्रस्तता, अंधश्रद्धा, दैववाद यांचा विळखा सुटावा असा प्रयत्न केंद्रातर्फे होतो. शिरूर, तुळजापूर, परफळ, भाबडी, शिक्रापूर जातेगाव, दरकेवाडी, बालवाड्या सुरू करण्यात आल्या असून मानसिक घडणीच्या कळत मुलांना योग्य ती बेगमी करून दिली जाईल. याशिवाय विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी ठिकठिकाणी संस्थेतर्फे सुट्टीच्या कालावधीत शिबिरे आयोजित केली जातात. लोकशाही जीवन लोकांच्या आधारवरच उभे राहाते, पण त्यांच्यासाठी योजनापूर्वक गुंतवणूक क्वचितच होते. इन्व्हेसटमेंट इन मॅन हे प्रतिष्ठान ह्या दृष्टीने अभिनव म्हणावे लागेल.

संस्थेचा पत्ता - इन्व्हेसटमेंट इन मॅन ट्रस्ट, स्नेहसदन 250 शनिवार पेठ, पुणे 411030

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके