डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भविष्यात धर्म म्हटलं जावं म्हणून कर्मकांडं व व्रतवैकल्ये असतात!

परंपराशील जीवन जगत असताना मला बऱ्याच वेळा बंडखोरीही करावी लागली. पण ही बंडखोरी करत असताना मला परंपरेनेच खूप मोठा आधार दिला असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल. कारण पुढच्या काळात मी जेव्हा मी संस्कृतीचा आणि मिथकांचा अभ्यास करायला लागले तेव्हा त्या क्षेत्रात मला जे मार्गदर्शक मिळाले त्यांच्यामध्ये रामचंद्र चिंतामण ढेरे हे अतिशय महत्त्वाचं नाव होतं. त्यांनी एक सूत्र मांडलं होतं, ‘देवाचा प्रवास हा देवाचा नसतो तर देवविषयक मानवी धारणांचा तो प्रवास असतो.’ आदिम काळामधील दैवतं उग्र होती. नंतर ती सौम्य होत गेली. माणूस जसजसा बदलत गेला तसतसा त्याचा देव सर्वार्थाने बदलत गेला. त्या देवाचं दिसणं, त्याची मूर्ती, त्याचा नैवेद्य, त्याच्या पूजाअर्चा, त्याच्या उपासनेच्या पद्धती हे सगळं बदलत गेलं.

‘धर्माने मला काय दिले’ हा विषय प्रामुख्याने तीन टप्प्यांमध्ये मांडण्याचा माझा विचार आहे. माझी धर्मविषयक जडणघडण कशी झाली हा पहिला टप्पा थोडा आत्मपर आहे. पुढे माझं वाचन, माझे विचार यांच्यानुसार आणि मी समाजामध्ये वावरायला लागल्यानंतर वयानुसार त्यात होत गेलेले बदल हा दुसरा टप्पा आहे. आणि तिसरा टप्पा, आज माझ्या आयुष्याच्या उत्तरायणात, विद्यमान समाजामध्ये असलेल्या सांस्कृतिक-राजकीय वातावरणात, माझी धर्मविषयक भूमिका काय आहे, याच्याशी निगडित आहे.

मी महाराष्ट्रामध्ये रूढार्थाने ज्याला हिंदू धर्म म्हटलं जातं त्यातल्या उच्चवर्णीय कुटुंबात जन्माला आलेली 80 वर्षांपूर्वीची एक मुलगी. माझं घर अत्यंत परंपराशील पद्धतीने चालणारं होतं. अर्धकृषिनिष्ठ अवस्थेत म्हणता येईल अशी, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ठिकाणी माझी मुळं रुजलेली होती. इंग्रज राजवटीच्या उत्तर काळामध्ये भारतात शिक्षणाचा प्रसार सुरू झाला होता. त्या काळात बऱ्याच शेतकरी घरांतील एक कुटुंब शहरांमध्ये असायचं आणि एक कुटुंब गावामध्ये असायचं, तसं आमच्या कुटुंबाचं होतं. त्यामुळे मी लहानपणी काही दिवस गावाकडे असायचे आणि काही दिवस पुण्यामध्ये असायचे. पुण्यातलं आमचं घरही मंदिरांनी आणि परंपराशील वातावरणाने वेढलेल्या अस्सल शनिवार पेठेत होतं. आज जिथे साधनाचं कार्यालय आहे, तिथून हाकेच्या अंतरावर असलेला विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा वाडा म्हणजे आमचं घर. एकीकडे अमृतेश्वर तर दुसरीकडे सिद्धेश्वर, एकीकडे प्रभुरामचंद्र तर दुसरीकडे रुक्मिणी-श्रीकृष्ण, अशी मंदिरं आणि दारामध्ये पहाऱ्याला असल्यासारखा मारुतीराया! तिथेच एका बाजूला वडाचं झाडही होतं, जिथे वटसावित्रीची जोरदार पूजा चालत असे. गावामधलं आणि घरामधलं वातावरण असं अतिशय परंपरानिष्ठ होतं. घरात व्रतवैकल्यं, पूजाअर्चा हे सगळं चालायचं आणि मी घरातली मोठी मुलगी असल्यामुळे मला त्याच्यात सहभाग घेणं आवश्यक असायचं. स्वतंत्र विचार करण्याची ताकद त्या वेळेला आलेली नव्हती; परंतु तरीसुद्धा काही गोष्टी त्याही वयात मला जाणवत राहायच्या...

पुढे मला असं जाणवायला लागलं की, बहुधा आपल्या परंपराशील कुटुंबव्यवस्थेतच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये काही धर्मविषयक गोष्टी रुजतात आणि त्या प्रामुख्याने घरांमधली विधिविधानं, चालीरीती, रूढी, कर्मकांडं यांच्याशी बांधलेल्या असतात. आपल्याकडचा प्रत्येक सणही ऋतुबदलांशी बांधलेला असतो. त्यामुळे देवदेवतांपासून खाण्यापिण्यापर्यंत सगळ्यांमध्ये विविधताही असते. ही विधिविधानं कधी नितांत वैयक्तिक असतात, कधी कौटुंबिक असतात तर कधी सामाजिक असतात. उदा., श्रावणातले उपासतापास, बायकांची व्रतं या गोष्टी वैयक्तिक असतात; सण साजरे करणं, डोहाळजेवण, बारसं वगैरे कौटुंबिक असतात. तिसरा प्रकार सामूहिक उत्सवांचा- गणेशोत्सव सामूहिक होण्यापूर्वी गावच्या जत्रा हाच सामूहिक उत्सवाचा भाग असायचा. स्त्रिया वडपूजा, नागपूजा करण्यासाठी जात; तोही काही प्रमाणात सामूहिकतेचा भाग होता. कर्मकांडांमध्ये दोन-तीन प्रकार होते. ‘नित्य’ म्हणजे नेहमीची पूजा-अर्चा, स्तोत्रपठण इत्यादी. आणि ‘नैमित्तिक’ म्हणजे जी काही तरी निमित्ताने साजरी होत. ही कर्मकांडंसुद्धा कौटुंबिकतेशी आणि सामाजिकतेशी बांधलेली असत.

धर्माचा तात्त्विक दृष्टीने विचार केला जातो तेव्हा आपल्याला असं सांगितलं जातं की, धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नाही. कर्मकांड हा आचारधर्माचा भाग असेल तर तत्त्वज्ञान हा विचारधर्माचा भाग असतो. पौर्वात्य धर्माचं किंवा रूढार्थाने हिंदू धर्माचं (मला हा शब्द वापरायला आवडत नाही) तत्त्वज्ञान- म्हणजे त्याचा विचारधर्म- अंतिम सत्याकडे नेणारा आहे. मोक्ष किंवा मुक्ती मिळवण्यामध्ये जीवनाची सार्थकता आहे हे अंतिम सत्य आहे असं सांगितलं गेलं आहे. पण आपल्या धार्मिक कर्मकांडांमध्ये मुक्तीची मागणी किती व्रतवैकल्यांमध्ये होते? सामान्यतः असं दिसतं की, मुक्तीची मागणी कोणीही करत नाही. उलट ऐहिक किंवा भौतिक जीवन जास्तीत जास्त सुखी आणि स्वास्थ्यपूर्ण कसं व्हावं याचाच विचार सगळ्या कर्मकांडांमध्ये केलेला असतो आणि त्यासाठी उपास्य दैवताशी सौदे केले जातात. ‘माझं अमुक झालं तर मी तमुक करीन’ याच्यामध्ये मोक्षाचा आणि मुक्तीचा संबंध कुठे येतो? हे सर्व मला लहानपणापासून जाणवत होतं.

पुढे अधिक वाचनानंतर माझ्या असं लक्षात आलं की, या तत्त्वज्ञानानुसार माणसाला मोक्ष कशातून मिळवायचा आहे? तर जन्म आणि मृत्यू यांच्या चक्रामधून मिळवायचा आहे. म्हणजे या धर्मात पुनर्जन्मावर विश्वास ठेवणे ही पूर्वअट आहे. एका जन्मामध्ये देह संपतो. पण देहामध्ये असणाऱ्या आत्म्याला पुनर्जन्म मिळतो असं म्हटलं जातं. पण पुढे मी भगवद्‌गीता वाचायला लागले. (चित्रावशास्त्रींनीच आम्हांला संथा दिलेली होती आणि गीतेचा बारावा अध्याय आमच्याकडून पाठ करून घेतला होता.) त्यामध्ये ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः’ असं आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. पण असा जर तो निर्लेप आत्मा असेल तर त्याला परत जन्म कसा काय मिळतो, असा प्रश्न त्याही काळात माझ्या मनात येत असे. एका जन्मामध्ये माणूस जे काम करतो त्याला ‘सुकृत’ म्हटलं जातं, आणि चालू कर्म म्हणजे ‘क्रियमाण कर्म’. ही सगळी तात्त्विक परिभाषा मी शिकत गेले. पण या सगळ्यांसाठी आत्मा या गोष्टीवरती श्रद्धा असणं आवश्यक होतं. भगवद्गीतासुद्धा सांगते, ‘श्रद्धावान लभते ज्ञानम्‌’. आपल्याकडे ज्ञानाची संकल्पना धर्माशी, मोक्षाशी आणि पुनर्जन्माशी बांधलेली आहे. ही ज्ञानाची संकल्पना आज वैज्ञानिक दृष्ट्या आपण ज्याला ‘ज्ञान’ म्हणतो त्या अर्थाची नाही.

या निरनिराळ्या कर्मकांडांमध्ये वैयक्तिक, कौटुंबिक किंवा सामूहिक भावनांची गुंतवणूक सर्वाधिक असते. त्यामुळे या कर्मकांडयुक्त धर्माचरणाला भावात्मकतेची बैठक आहे. बुद्धिनिष्ठेशी किंवा ज्ञाननिष्ठेशी बऱ्याचदा या भावात्मकतेचा विरोध झालेला दिसतो. समाजामध्ये कर्मकांडांची रुजवण व्हावी आणि त्यालाच पुढे धर्म म्हटलं जावं म्हणून पिढ्यान्‌पिढ्या त्यांचं आचरण करण्यासाठीच व्रतवैकल्यं असतात आणि त्यांच्या जोडीला कथा असतात. पुराणकथा, प्राक्कथा, प्राचीन कथा असे निरनिराळे शब्द त्यांसाठी वापरले जातात. नाटकांच्या निमित्ताने व इतरही निमित्तांनी मी जेव्हा अशा पुराणकथांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला, त्या वेळी माझ्या लक्षात आलं की, कोणे एके काळी, आदिम अवस्थेत एखादं व्रत किंवा आचरण कोणी तरी केलेलं होतं आणि ते केलं नाही तर अमुक त्रास होतो किंवा केलं तर तमुक लाभ होतो- अशा पद्धतीची लाभहानीची गणितं या कथांमधून आपल्या मनामध्ये पक्की रुजवली जातात. या प्रकारचं ‘मिथ मेकिंग’ हे आदिम काळात केलेल्या कुठल्यातरी कृतीची अनुकृती किंवा नाटक/नक्कल असते. त्या नकलेसाठी मग सोबत प्रतीकांचा पसारा येतो. एखाद्या व्रतात पूजेसाठी अमुक फुलं, अमुक फळं अशी वस्तूरूप प्रतीकं असतात, विशिष्ट मंत्रांसारखी शब्दरूप प्रतीकं असतात. हे मंत्रदेखील दर खेपेला संस्कृतच असतात असं नाही, स्त्रियांसाठी किंवा बहुजन समाजासाठी त्यांच्या त्यांच्या बोलीभाषेतलेही मंत्र असतात. ही सगळी आचरणं दोन हेतू डोळ्यांसमोर ठेवून केलेली असतात. त्यातला एक हेतू कल्याणकारी असतो, त्याला तात्त्विक भाषेत ‘शुक्ल यातु’ म्हटलं जातं आणि दुसरा कुणाचं तरी वाईट व्हावं असा असतो, त्याला ‘कृष्ण यातु’ म्हटलं जातं. ‘यातु’ ही सर्वत्र भरून राहिलेली, स्वतंत्र, आदिम शक्ती आहे आणि माणसाने प्रयत्न केला तर त्याच्या शरीरामध्ये ती त्याला खेचून घेता येते आणि मग माणसाला तो जे म्हणेल ते करवून घेता येतं- अशी त्यामागची धारणा आहे. आणि या धारणेतूनच कर्मकांडांचा, मिथकांचा आणि प्रतीकांचा पसारा निर्माण झालेला आहे. यातलं सगळ्यांत मोठं प्रतीक असतं ते म्हणजे दैवताची मूर्ती. मूर्ती आली की मंदिर आलं; मूर्तीची, मंदिराची गरज आली की, त्या मूर्तीच्या पूजेसाठी लागणारं साहित्य, उपासनेच्या निरनिराळ्या पद्धती, नैवेद्य अशा असंख्य प्रतीकांचा पसारा तयार होतो. या सगळ्यांमागे असलेला तर्क भावनेशी बांधलेला असतो.

आपल्या ऋषी-मुनींनी अमुक वेळेला अमुक खावं असा वैज्ञानिक विचार केलेला आहे; असा अभिमान आपण बाळगतो. पण वस्तुतः या कर्मकांडांमागे ऋषी-मुनींनी काही वैज्ञानिक विचार केलेला नाही, ती निसर्ग-प्रवाहामध्ये आपोआप घडत आलेली कर्मकांडं आपण आजतागायत करतो आहोत. या कर्मकांडांमागचा तर्क बुद्धिनिष्ठ नसतो, तो भावनांशी बांधलेला तर्क असतो. माझी विदुषी मैत्रीण कमल देसाई मला एकदा म्हणाली होती, ‘‘मी अगदी साधार सांगते की, आपला समाज ‘मॅजिकल फेज’च्या (यातुश्रद्धा अवस्थेच्या) पलीकडे अजून गेलेला नाही.’’ चांगल्यातून चांगलं निघतं, वाइटातून वाईट निघतं. त्यामुळे आपल्याला अन्नधान्य हवं असेल तर देवाला ते अर्पण करावं आणि जर कोणाचं वाटोळं करायचं असेल तर काळ्या बाहुलीला टाचण्या टोचून तिला जाळावं. या कृती मनामधल्या भावनांचं विरेचन करण्यासाठी प्रतीकांना हाताशी धरून केल्या जातात, हे पुढच्या काळामध्ये माझ्या लक्षात येत गेलं. याचं खूप विस्ताराने विश्लेषण करणं शक्य आहे.

परंपराशील जीवन जगत असताना मला बऱ्याच वेळा बंडखोरीही करावी लागली. पण ही बंडखोरी करत असताना मला परंपरेनेच खूप मोठा आधार दिला असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल. कारण पुढच्या काळात मी जेव्हा मी संस्कृतीचा आणि मिथकांचा अभ्यास करायला लागले तेव्हा त्या क्षेत्रात मला जे मार्गदर्शक मिळाले त्यांच्यामध्ये रामचंद्र चिंतामण ढेरे हे अतिशय महत्त्वाचं नाव होतं. त्यांनी एक सूत्र मांडलं होतं, ‘देवाचा प्रवास हा देवाचा नसतो तर देवविषयक मानवी धारणांचा तो प्रवास असतो.’ आदिम काळामधील दैवतं उग्र होती. नंतर ती सौम्य होत गेली. माणूस जसजसा बदलत गेला तसतसा त्याचा देव सर्वार्थाने बदलत गेला. त्या देवाचं दिसणं, त्याची मूर्ती, त्याचा नैवेद्य, त्याच्या पूजाअर्चा, त्याच्या उपासनेच्या पद्धती हे सगळं बदलत गेलं. उग्र दैवतांच्या उपासनेसाठी मोठमोठ्याने आरडाओरडा करून आदिम माणसं नृत्य करत असतील; तर आता हळुवारपणे गरब्यासारखं नृत्य केलं जातं. राजवाड्यांनी म्हटलेलं होतं, ‘‘जसा समाज तसं त्याचं हत्यार’’. त्याचप्रमाणे ‘‘जसा माणूस तसा त्याचा देव,’’ असंही आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे माणूस बदलत आला तसा त्याच्या दैवतांच्या बाह्य स्वरूपात बदल झालेला आहे. पण ‘मी परवश आहे आणि माझ्यासाठी करणारं कुणी तरी आहे’, ही मूळ धारणा म्हणजेच त्याची यातुश्रद्धा अजून टिकून आहे. ‘माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी तरी आहे आणि त्याच्या हातात माझ्या आयुष्याच्या नाड्या आहेत,’ या आदिम श्रद्धेमुळे माणूस अगतिक होऊन धर्मशरण होतो असं आपल्याला दिसतं.

आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर माझ्या असं लक्षात आलं की, धर्माच्या नावावर सत्ताधारी आणि मत्ताधारी वर्ग यांनी सतत श्रमजीवी आणि स्त्रिया यांच्या श्रमांवर आणि निरनिराळ्या क्षमतांवर कधी उघड तर कधी गौरवाचा दांभिक मुखवटा चढवत आधिपत्य मिळवलेलं आहे. सौभाग्य, सतीत्व हे शब्द वापरून स्त्रीला पूर्णपणे अंकित करून परावलंबी बनवलं आहे. ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’मध्ये राजवाड्यांनी याचं विश्लेषण करताना लिहिलं आहे की, सौभाग्याचा नवऱ्याशी संबंध नाही. ‘सुभगधारिणी’ म्हणजे जी चांगली अपत्ये जन्माला घालते ती. सर जेम्स फ्रेझरनी त्यांच्या The Golden Bough नावाच्या पुस्तकात आदिम लोकांच्या धारणा आणि रीती सांगितलेल्या आहेत. स्त्रीचं सगळ्यांत मोठं सामर्थ्य ‘अपत्य जन्माला घालणं’ हे आहे आणि जी चांगली आणि भरपूर अपत्य जन्माला घालते ती बाई ‘बाईपणा’मध्ये पीएचडी झालेली आहे असं मानायला हरकत नाही; अशा भाषेत त्यांनी लिहिलं आहे. अपत्यजन्माचा संबंध पतीशी घालून दिल्यानंतर मात्र स्त्रीची प्रतिष्ठा दुय्यम होते आणि पतीची प्रतिष्ठा वाढते. यावर विचार करायला लागल्यानंतर मला असं लक्षात आलं की, एखादी लग्न झालेली मुलगी जर आई झाली तर ती पवित्र मानली जाते का? विधवा स्त्रीने अपत्य जन्माला घातलं तर ती पवित्र मानली जाते का? चालीरीतीप्रमाणे आईबापांनी निवडून दिलेल्या पुरुषापासून झालेल्या अपत्यांची माताच केवळ पवित्र मानली जाते. मग हा गौरव मातृत्वाचा की पितृत्वाचा? मातृत्वाच्या गौरवाच्या बुरख्याआड, सतीत्व आणि सौभाग्य या शब्दांच्या आड पुरुषप्रधान व्यवस्था घट्ट करण्याचे काम आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात झालेलं आहे.

भाऊ बहिणीचं रक्षण करतो अशी आपल्याकडे परंपरागत धारणा आहे. लग्नानंतर नवरा बायकोचं रक्षण करतो अशीही धारणा आहे. पण एक सोडून पाच नवरे असताना द्रौपदीचं रक्षण पांडवांनी केलं नाही असंही उदाहरण दिसतं. सीतेच्या आणीबाणीच्या काळामध्ये राम आणि लक्ष्मण तिच्यासाठी धावून आले नाहीत. मग भाऊ रक्षण करतो हे कुठून आलं? याचा विचार करताना माझ्या लक्षात आलं की, आपल्याकडच्या धर्मविषयक प्राचीन साहित्याचं विश्लेषण आपण कसं करतो हे फार महत्त्वाचं आहे. धर्मातील मिथकांच्या मुळाशी जाणं, त्या वेळच्या परिस्थितीनुसार स्वतः त्यांचं विश्लेषण करणं आणि मग त्यांचे आजचे अन्वयार्थ निश्चित करणं हा महत्त्वाचा भाग आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलामध्ये ‘यम-यमी संवादसूक्त’ आहे. त्यात भावाविषयीच्या या धारणेचं मूळ आहे. यम आणि यमी ही सख्खी भावंडं आहेत. यमीला संभोगाची इच्छा झाली म्हणून ती यमाकडे गेली. तिने आपली इच्छा व्यक्त केली. पण यमाने ती इच्छा अमान्य केली. तेव्हा ती म्हणाली की, आजपर्यंत तर असंच चालत आलेलं आहे. यम म्हणाला की, चालत आलं असेल; पण इथून पुढे आपण हे बंद करू. तिथे भाऊबीजेचा जन्म झाला.  निदान हे एक नातं असं राहो ज्यामध्ये स्त्रीला लैंगिक आक्रमणाची भीती नाही, या हेतूने यमाने स्वतःवर घालून घेतलेलं, हे आत्मस्वीकृत बंधन आहे. ते स्त्रीने पुरुषावर घातलेलं बंधन नाही. पावित्र्याची मूळ संकल्पना ही आहे की, स्त्रीचं रक्षण करायचं झालं तर निदान एक नातं तरी तिला सुरक्षित ठेवेल अशी हमी, विश्वास, खात्री, श्रद्धा तिला असली पाहिजे. पुढे ते बापाच्या आणि मुलाच्या बाबतीत झालं. पण आदिम अवस्थेमध्ये ही बंधनं नव्हती. त्यामुळे ‘रक्षणकर्ता बंधू’ असं आपण म्हणतो तेव्हा बंधूने ते स्वतःवरती घालून घेतलेलं बंधन आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्वतःवर बंधन घालण्यानेच संस्कृती जन्माला येते. संस्कृती जतन करण्याची जबाबदारी एकट्या बाईचीच नाही.

वटसावित्रीची कथा सर्वांना माहीत आहे. त्या कथेतला महत्त्वाचा भाग असा आहे की, मी सत्यवानाला मनाने वरलेलं आहे आणि आता जर मी इतर कुणाशी लग्न केलं तर तो व्यभिचार होईल; हे सावित्रीने आपल्या बापाला ठामपणे सांगितलं आणि बापानेही मुलीचं पतीच्या निवडीचं स्वातंत्र्य पूर्णपणे मान्य केलं. हे आपण आज करतो का? हे जर आपण कृतीत आणणार नसू तर त्या वटसावित्रीला काय अर्थ आहे? निवड करण्याचं माझं स्वातंत्र्य अबाधित असलं पाहिजे हे सावित्रीचं मूळ ब्रीद आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

पण या कथांपेक्षासुद्धा मी ज्या लोकसंस्कृतीचा आणि लोकसाहित्याचा ध्यास जन्मभर घेतला त्यांनी मला पुष्कळदा थक्क करून टाकलं आहे. ज्यांना आम्ही अनक्षर, अडाणी बाया म्हणतो त्यांना तसं म्हणणं हा आमचा महाअडाणीपणा आहे. त्या शहाण्या आहेत, खोलवर जाऊन विचार करणाऱ्या आहेत याची मला शेकडो उदाहरणं देता येतील.

बाईचं हे सामर्थ्य बाईला आदिम काळापासून माहीत होतं. पण ते पुन्हा पुन्हा नाकारून तिला अबला करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे मला लोकसंस्कृतीतून आणि मिथकांच्या अभ्यासातून शिकायला मिळालं.

त्यामुळे आपल्या परंपराशीलतेमध्ये काहीच उपयुक्त नाही असं नाही. आमच्या सर्व कलांचं मूळ आदिम धर्मनिष्ठेशी बांधलेलं आहे. नाट्य, शिल्प, चित्र, गीत, क्रीडा हे सगळं धर्माच्या विधिविधानांमध्ये आहे. परंतु पुढच्या काळात त्यांचंही ‘विपरीतीकरण’ झालेलं आहे. आदिम अवस्थेपासून आजच्या तंत्रयुगापर्यंत आपण आलेलो आहोत. पण भूतकाळाचे काही अवशेष आपल्यात अजूनही टिकून आहेत. कलात्मकता आणि क्रीडात्मकता हा त्याचा एक मोठा भाग आहे. परंपरेचं रक्षण करायचंच असेल तर आपल्या परंपरेतील या कलात्मकतेकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे आणि आपण जी उसनवारी करत आलेलो आहोत तीही अधिक डोळसपणे केली पाहिजे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाशी जोडली गेल्यानंतर समाज, परंपरा आणि संस्कृती यांच्याकडे पाहण्याची एक दृष्टी मला मिळत गेली. लोकसंस्कृतीच्या माझ्या अभ्यासाने ती अधिक डोळस झाली. त्यातून मला ठामपणे असं विधान करावंसं वाटतं की, लोकसंस्कृतीच्या डोळस अभ्यासामधून या समाजाच्या सांस्कृतिक इतिहासाकडे एका नव्या दृष्टीने पाहता येईल आणि सांस्कृतिक इतिहासाचं पुनर्लेखन करता येईल. परंपराशीलतेतली कलात्मकता, सौंदर्य, भावात्मकता जतन करूनसुद्धा विवेकनिष्ठ, बुद्धिनिष्ठ, शोषणविरहित समाजनिर्मिती शक्य आहे.

डॉ. दाभोलकर माझे खूप वर्षांपासूनचे स्नेही होते. या विषयावर आमच्यात अनेकदा चर्चा होत असत आणि मला असं वाटतं, त्यांचंही मत हेच होतं. या विचारांच्या निमित्ताने डॉक्टर तुमच्या-माझ्या मनात अखंड आहेत.

(शब्दांकन : सुहास पाटील)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके