डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दिनांक 24 डिसेंबर रोजी साने गुरुजी आरोग्य मंदिराने 'कवी वसंत बापट गीतगौरव मानचिन्ह आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धा’ घेऊन साने गुरुजी जयंती साजरी केली. स्पर्धेत एकूण 14 शाळा उतरल्या होत्या. स्पर्धेला बरोबर 11.30 वाजता सुरुवात झाली. श्री. लीलाधर हेगडे यांनी स्पर्धांचा इतिहास सांगितला आणि स्पर्धा सुरू होत असल्याचे जाहीर केले.

दिनांक 24 डिसेंबर रोजी साने गुरुजी आरोग्य मंदिराने 'कवी वसंत बापट गीतगौरव मानचिन्ह आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धा’ घेऊन साने गुरुजी जयंती साजरी केली. स्पर्धेत एकूण 14 शाळा उतरल्या होत्या. स्पर्धेला बरोबर 11.30 वाजता सुरुवात झाली. श्री. लीलाधर हेगडे यांनी स्पर्धांचा इतिहास सांगितला आणि स्पर्धा सुरू होत असल्याचे जाहीर केले. परीक्षक म्हणून श्री. शशी मेहता, श्रीमती विजया धुमाळे आणि डॉ. संगीता बापट यांनी काम केले. स्पर्धेत कोणतेही राष्ट्रीय गीत अथवा लोकगीत- हिंदी अथवा मराठी भाषेतील- गायचे होते. स्पर्धा 2 तास चालली. परीक्षकांना शाळेचे नाव कळू नये म्हणून फक्त नंबर पुकारण्यात येत होता. परीक्षकांनी एकमताने निर्णय दिला. प्रथम क्रमांक- साने गुरुजी विद्या मंदिर, सांताकूझ, द्वितीय क्रमांक- योजना विद्यालय, बोरीवली तर तृतीय क्रमांक- चिल्ड्रेन वेलफेअर सेंटर हायस्कूल, वेसावा यांना मिळाला. ठरल्याप्रमाणे पहिल्या क्रमांकाला फिरती ट्रॉफी (मानचिन्ह), कायमची ट्रॉफी आणि अडीचशे रुपये, दुसऱ्या क्रमांकाला ट्रॉफी व दीडशे रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला शंभर रुपये आणि ट्रॉफी मिळाली. सरस्वती हायस्कूल, नायगाव आणि विलेपार्ले पश्चिम म्युनिसिपल सेकंडरी स्कूल या शाळांना परीक्षकांच्या विनंतीवरून प्रत्येकी रुपये 50 चे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

बक्षीस समारंभासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री. वसंत सबनीस हे पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्या हस्ते बक्षिसे देण्याचा कार्यक्रम पार पडला. श्री. सबनीस यांनी प्रसंगोचित भाषण केले. परीक्षकांच्या वतीने श्री. शशी मेहता बोलले. स्पर्धा अतिशय चुरशीची झाल्याचे त्यांनी सांगितले. समूह गीत गायनाचे किती महत्व आहे आणि तेही देशभक्तीपर गीतांचे, याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सांताक्रुझच्या साने गुरुजी विद्या मंदिराच्या गायन पथकाचे नेतृत्व करणारी कुमारी प्रीती नागुळकर हिचा खास उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. गाण्याचा अर्थ समजून ती जे हातवारे करत होती. चेहऱ्यावर भाव दाखवीत होती, त्यांत सामर्थ्य होते. म्हणून तिला संस्थेने खास बक्षीस देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रीतीला रोख रुपये पन्नास संस्थेने बक्षीस दिले.

भाऊसाहेब रानडे जन्मशताब्दी वर्षाची सांगता 

साने गुरुजी आरोग्य मंदिराने 1993 साल हे भाऊसाहेब रानडे जन्मशताब्दी साल असल्याने हे वर्ष "क्रीडा वर्ष" म्हणून साजरे करायचे असे ठरविले होते. त्यानुसार ह्या वर्षी 14, 15, 16 एप्रिल 6 नोव्हेंबर, 21, 22 , 23 व 28, 29, 30 डिसेंबर ह्या तारखांना विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. ह्या क्रीडा-वर्षाचा शेयट 28, 29 व 30 डिसेंबर रोजी आठवी ते दहावीच्या क्रीडा स्पर्धा घेऊन करण्यात आला. गोळा-फेक, शंभर मीटर धावणे, उंच-उडी, मंदगती सायकल चालवणे ह्या क्रीडा प्रकारांतील वैयक्तिक स्पर्धा आणि कबड्डी सारखा सांघिक खेळ स्पर्धेसाठी घेण्यात आला. 21 ते 23 डिसेंबर या काळात पाचवी ते सातवीचे वैयक्तिक व सांघिक खेळ घेण्यात आले. एकूण 1450 विद्यार्थ्यांपैकी 867 विद्यार्थी-विद्यार्थीनींनी कुठल्या ना कुठल्या खेळात भाग घेतला.

बक्षीस समारंभ दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता पार पडला. पाहुणे म्हणून सर्वश्री विकास आमटे, वि. वि. करमरकर आणि लायन्स जुहूच्या क्रीडा विभागाचे अध्यक्ष हेमंत वहालिया, नरेंद्र मेस्त्री हे हजर होते. या प्रसंगी श्री. विकास आमटे यांचे भाषण झाले. ह्या संस्थेत विद्यार्थ्यांना ज्या सोयी-सवलती उपलब्ध आहेत त्यामुळे ह्या शाळेतील विद्यार्थी भाग्यवान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जुने आणि नवे यांचा सुंदर मेळ येथे घालण्यात आला असल्याचे ते म्हणाले. पुढचा जन्म असल्यास ह्या शाळेत प्रवेश मिळावा अशी इच्छाही त्यांनी अभिप्रायाच्या पुस्तकात नमूद करून ठेवली. श्री. वि. वि. करमरकर यांनी सुमारे 60% मुलांनी क्रीडास्पर्धेत भाग घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि खेळाडूंचे प्रबोधन करण्यासाठी वारंवार संस्थेत येण्याचे आश्वासन दिले. लायन श्री. हेमंतभाई यांनी क्रीडास्पर्धांसाठी जुहूचा लायन्स क्लब रुपये पाच हजार देईल असे जाहीर केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लॅमिनेशन केलेल्या तसबिरी देण्यात आल्या.

भाऊसाहेब रानडे मल्लखांब स्पर्धा 

दिनांक 5 डिसेंबर रोजी नवोदितांसाठी 'भाऊसाहेब रानडे मानचिन्ह मल्लखांब स्पर्धा’ घेण्यात आल्या. या स्पर्धेत एकुण 17 संस्था सामील झाल्या होत्या. 89 मुले व 82 मुली असे एकूण 171 खेळाडू स्पर्धेत उतरले होते. मुलांच्या व मुलींच्या प्रत्येकी चार गटांत पहिल्या तीन क्रमांकांना म्हणजे एकूण 24 बक्षिसे दिली. त्यात पेल्याबरोबर महात्मा गांधींचे आत्मचरित्र तसेच पु. ल. देशपांडे व ग. प्र. प्रधान लिखित ‘गांधीजी’ ही पुस्तकेही बक्षीस दिली. साने गुरुजी आरोग्य मंदिरास वरीलपैकी एकूण सहा बक्षिसे मिळाली. तसेच नवोदितांतील सर्वोत्तम मल्लखांब पटू म्हणून आरोग्य मंदिराचा किशोर बोरले आणि मुलींमधील सर्वोत्तम मल्लखांब पटू म्हणून चेंबूरच्या जवाहर विद्याभवनची जागृती वर्तक या दोघांची निवड झाली. या दोघांनाही खास बक्षिसे देण्यात आली. मुलांसाठी व मुलींसाठी ठेवलेल्या भाऊसाहेब रानडे मल्लखांब ट्रॉफीज समर्थ व्यायाम शाळेने जिंकल्या.

जवळ जवळ सबंध वर्षभर खेळाचे वातावरण असल्याने गोरेगाव येथील प्रबोधन या संस्थेने आयोजित केलेल्या 50 किलोच्या गटात 32 संघ उतरले असतानाही साने गुरुजी आरोग्य मंदिर, सांताक्रूझचा संघ अजिंक्य ठरला.

साने गुरुजींच्या 94 व्या जयंतीनिमित्त साजरे झालेले कार्यक्रम 

साने गुरुजी बालविकास मंदिराचा यशस्वी कोकण दौरा

पू. साने गुरुजींच्या 94 व्या जयंतीच्या निमिताने मुंबईमध्ये गेली 34 वर्षे पू. साने गुरुजींच्या विचारांनी प्रभावित होऊन विशेषतः मुलांच्यामध्ये कार्य करणाऱ्या साने गुरुजी बालविकास मंदिराच्या वतीने मालवण येथे होणाऱ्या अ. भा. साने गुरुजी कथामालेच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी दि. 23 ते 27 डिसेंबर रोजी संस्थेच्या कार्यकर्त्यांचा व हितचिंतकांचा कोकण दौरा आयोजित करण्यात आला होता. दौऱ्याच्या कार्यक्रमात सुरुवातीस दि. 23 रोजी चिपळूण येथील पोफळी येथे मुलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष श्रीपतराव पवार हे होते. पू. साने गुरुजीच्या 94 व्या जयंतीच्या दिवशी दि. 24।12।93 रोजी संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे सेवाकार्य करणाऱ्या पू. साने गुरुजी सेवा मंडळाच्या कार्यालयात पू. साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच नुकतेच दिवंगत झालेले रत्नागिरी जिल्ह्यातील विधायक, सेवाभावी कार्यकर्ते कै. नानासाहेब शेटये यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेस हार घालून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले. त्यानंतर साखरपा येथील जिल्हा परिषद शाळा क्र. 1 आणि रयत शिक्षण संस्थेचे म. गांधी विद्यालय येथे विद्यार्थ्यांचे मेळावे भरविले. त्याचप्रमाणे भडकंबा येथे साने गुरुजी सेवा मंडळ भडकंबा शाखेच्या वतीने जाहीर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या सुरुवातीला खास परिश्रमपूर्वक बसविण्यात आलेली गाणी मुलांनी म्हटली. विशेष म्हणजे कवि वसंत बापट लिखित 'आली कोकण गाडी' हे गीत सादर करण्यात आले. गीताची चाल इतकी उत्तम तऱ्हेने लावण्यात आल्यामुळे ते पुन्हा म्हणण्याविषयी प्रेक्षकांनी आग्रह धरला.

मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजयी स्पर्धकांना अध्यक्षांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. वरील सर्व कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान साने गुरुजी बालविकास मंदिराचे अध्यक्ष व गेली 24 वर्षे सातत्याने प्रसिद्ध होणाऱ्या बालविकास मासिकाचे संपादक यशवंत ब. क्षीरसागर यांनी स्वीकारले होते.

'मातृमंदिर' देवरुख व भडकंबा येथे श्यामची आई चित्रपट दाखविण्यात आला.

मालवण येथील साने गुरुजी कथामाला अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी सदर दौऱ्यात श्री. परशुराम मंदिर, मातृमंदिर, देवरुख, मालेश्वर देवस्थान, गणपतीपुळे, कवि केशवसुत स्मारक, मालगुंड रत्नागिरी येथील अपना बाजार डिपार्टमेंट स्टोअर, लोकमान्य टिळक जन्मस्थान पतित पावन मंदिर, पावस येथील स्वामी स्वरूपानंद मंदिर, सिंधुदुर्ग किल्ला इ. स्थानांना भेटी देण्यात आल्या. सदर दौऱ्यात साने गुरुजींच्या साहित्याची व बालविकास' विशेषांकाची विक्री करण्यात आली. तसेच सद्यःपरिस्थितीत गुरुजींच्या विचारांची आवश्यकता यासंबंधी संस्थने काढलेले पत्रक गावोगावी वाटण्यात आले. दौरा यशस्वी होण्यास मातृमंदिर देवरुख, अपना बाजार रत्नागिरी यांचे बहुमोल साहाय्य झाले.

बालावधूत हायस्कूलमध्ये कार्यक्रम 

बालावधूत हायस्कूल मौजे वडगाव ता. हातकणंगले येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही साने गुरुजी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी साने गुरुजी आणि बालावधूत महाराज यांच्या प्रतिमेस कोल्हापूरच्या लायन्स क्लबचे सेक्रेटरी श्री. बलदोटा यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. चौगुले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुणे लायन्स क्लबचे प्रेसिडेंट श्री. जयंत कुलकर्णी यांनी साने गुरुजींच्या जीवनावर उद्बोधनपर भाषण केले. कार्यक्रमाची सांगता 'खरा तो एकच धर्म' या गीताने झाली.

कोरगावकर हायस्कूलमध्ये कार्यक्रम 

कोरगावकर हायस्कूल व प्रतापसिंह विद्या मंदिर यांच्या वतीने मराठी बालकुमार साहित्यासभा कोल्हापूर यांच्या सहकार्याने साने गुरुजी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी श्री. भरत लाटकर यांनी प्रार्थना सादर केल्यानंतर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मा. कुलकर्णी यांचे हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर श्री. टोळ यांनी प्रास्ताविक केल्यानंतर श्री. महाडेश्वर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शाळेतील पाच बालकवींनी आपल्या कविता सादर केल्यानंतर श्री. वसंत निगवेकर डॉ. म. स. नगरकर व शशिकांत महाडेश्वर यांनी आपल्या कथा कथन केल्या. सौ. प्रेमा कुलकर्णी आणि सौ. वासंती इनामदार जोशी यांनी आपल्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जमने यांनी केले.

एस. एम. जोशी अध्यापक विद्यालयाचे श्रमसंस्कार शिबीर 

साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित एस.एम जोशी अध्यापक विद्यालय नाशिक रोडचे श्रमसंस्कार शिबीर नुकतेच संपन्न झाले. उद्घाटन प्राचार्य सुभाषचंद्र वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य बी. एस. वाडेकर यांनी केले. या शिबिरात 
प्रा. नंदकुमार रासने : परिसराची ओळख. 
डॉ. प्रकाश गिरी : आजच्या युगात नैतिक शिक्षणाची आवश्यकता, 
प्रा. सुभाषचंद्र वैद्य : लोकसंख्या शिक्षण, 
राष्ट्र सेवा दल तालुकाध्यक्ष प्रा. विजय देशमुख : मनोरंजनातून प्रबोधन का व कसे. 
प्रा.शीतल गिरी राष्ट्रीय : एकात्मतेतील अडथळे कारणे व उपाय, 
गणपत हुलवळे : म. फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य, 
अशा प्रकारे विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने झाली. डॉ. उल्हास कुलकर्णी व डॉ. रमा कुलकर्णी यांनी सर्व शिबिरार्थींची वैद्यकीय तपासणी करून व्यक्तिगत व सामाजिक आरोग्याबाबत चर्चा केली. राष्ट्र सेवा दलाच्या 21 व्या सैनिकांनी सामाजिक प्रबोधनपर कलापथकाचा बहारदार कार्यक्रम सादर केला. शाळा भेट, श्रमदार सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी ग्रामभेट, व्यायाम, बौद्धिक, स्वावलंबन असे विविधांगी शिबिरानुभव छात्रशिक्षकांना देण्यात आले.

Tags: कार्यक्रम उपक्रम Programme #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके