डिजिटल अर्काईव्ह

चिंतनशील माणूस सांसारिक पसाऱ्यात असला तरी हिमालयात जाऊन तप करणाऱ्या सारखीच त्यांची स्थिती असते. आइन्स्टाइन आपल्या संशोधनात व शिक्षणकार्यात इतके गढून गेले होते की, पहिले महायुद्ध आले आणि गेले तरी त्यांना खबर नव्हती. परंतु पहिल्या महायुद्धानंतर विजयी दोस्तांनी जर्मनीची लांडगेतोड सुरू केल्याने जर्मन जनता हैराण झाली. हिटलरला देवदूत समजून त्यांनी त्यांचे स्वागत केले. अधिकारावर येताच हिटलरने ज्यूची ससेहोलपट सुरू केली. रसायनाच्या क्षेत्रात जर्मनीला अग्रस्थान मिळवून देणारा शास्त्रज्ञ हावर हा ज्यू होता. त्याला हिटलरच्या सेनेने सळो की पळो करून सोडले. शेवटी त्याने आत्महत्या केली. आइन्स्टाइना आपण ज्यू आहोत याची जाणीव देखील नव्हती.

जगद्विख्यात शास्त्रज्ञ आस्बर्ट आइन्स्टाइन गेल्या आठवड्यात वयाच्या 76 व्या वर्षी कालवश झाले. त्यानी विज्ञानाची केलेली सेवा थोर आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात अव्वल दर्जाचे स्थान त्यांना प्राप्त झाले होते. खऱ्या ज्ञानी पुरुषाप्रमाणे विज्ञानाची निरपेक्ष सेवा त्यांनी आजन्म बजावली असल्यामुळे जगातील सर्व देशात त्यांच्याबद्दल गौरवाची भावना वसत होती. धंदेवाईक वैज्ञानिकापेक्षा मानवाच्या प्रगतीची चिंता वाहणारा तत्त्वज्ञ अशी त्यांची ख्याती होती. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या जगाबाहेरच त्यांचा खरा चाहता वर्ग आहे. 'सापेक्षतावाद' म्हणजे काय किंवा अणु आणि ऊर्जा यांच्या संघाबाबत आइन्स्टाइन यांनी कोणता शोध लावला याची साधी तोंड ओळखही ज्यांना नाही असे शेकडो लोक आइन्स्टाइन यांची थोरवी गातांना आढळतील. 

एखाद्या प्राचीन ऋषिमुनीप्रमाणे त्यांचे स्थान भारतात केव्हाच मान्यता पावले आहे. आपल्या देशातला एखादा वयोवृद्ध तत्वचिंतक किंवा मार्गदर्शक कालवश झाला तर जितके दुःख आणि हळहळ वाटेल तितके दुःख आणि हळहळ आइन्स्टाइन यांच्या निधनाने भारताला वाटले. बर्नार्ड शॉ, बर्ट्रांड रसेल, ब्यूलियन हक्सले, रोमा रोला वगैरे थोर पाश्चात्यांप्रमाणे आल्वर्ट आइन्स्टाइन यांच्या विचारांचा संस्कार भारतीयांवर घडलेला आहे. या श्रेष्ठ तत्वचितकाचे वैचारिक पण अनेक सुशिक्षित भारतीय कृतज्ञतापूर्वक कबूल करतात. 

थोर मानवतावादी

जर्मनीतून निर्वासित होऊन अमेरिकेत स्थायिक झाल्यापासून, महात्मा गांधींनी भारतात सुरू केलेल्या राजकीय क्रांतीच्या अहिंसक प्रयोगाबद्दल त्यांना विशेषच जिव्हाळा वाटू लागला. गांधींच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त तयार करण्यात आलेल्या गौरव ग्रंथांत लेख लिहून गांधींना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. महात्मा गांधींनी दाखविलेला मार्ग मान्य केल्याशिवाय जगाला तरणोपाय नाही असे त्यांनी सांगितले आहे. अलीकडे भारतातून अमेरिकेत गेलेला कोणीही बुद्धिमान माणूस त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्याशी विचार विनिमय केल्याशिवाय परत येत नसे. मग ते पंडित नेहरू असोत की, विश्वविद्यालयांतील एखादा विद्यार्थी असो. त्यांच्या निधनाबद्दल बोलतांना श्री कृष्ण मेनन बांडुंगमध्ये म्हणाले,"मी त्यांना गेल्या महिन्यांतच भेटलो होतो. आशिया-आफ्रिका परिषदेविषयी त्यांनी आस्थापूर्वक चौकशी केली." ते कट्टर लोकशाहीवादी होते. 

व्यक्तिस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी डोळ्यांत तेल घालून सतत जागृत राहिले पाहिजे व झगडले पाहिजे ते नेहमी सांगत, विज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या अणुशक्तीचा उपयोग मानव संहारासाठी सुसज्ज राष्ट्र करीत आहेत ह्याचे त्यांना फार दुःख वाटत असे. युद्धकाळी प्रे. रूझवेल्ट यांना पत्र उपयोग करण्यासाठी पाठवून अणुशक्ति उपयोग 'मॅनहॅटन योजना' अमलात आणावी म्हणून त्यांनीच खटपट केली होती. पण तिला आलेले फळ पाहून त्याना वेदना होत होत्या. ओपन हायमर, सारख्या विरुद्ध अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने जे काहूर उठवले व वैज्ञानिकांच्या राजकीय मतांची तपासणी सुरू केली तिच्याविरुद्ध आइन्स्टाईन यांनी आवाज उठवला. वैज्ञानिकांनी सरकारचे दास बनता कामा नये, त्यांनी आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे असे ते तळमळून लिहीत व सांगत. अणुशक्तीचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठीच झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.

शास्त्रीय मानवतावाद

ज्यूलियन इक्स्ले ज्याला 'सायन्टिफिक ह्युमॅनिझम' म्हणजे शास्त्रीय मानवतावाद असे म्हणतात तो आइन्स्टाइन यांना सर्वसाधारपणे मान्य होता. ते म्हणत : "The most beautiful thing we can ex patience is the mysterious; it is the source of all true art and science. He to whom this emotion. is a stranger, who can no longer pause to wonder and stand rapt in awe, is as good as dead" तुझी या विश्वामागे एक अतर्क्य चेतना आहे. विश्व हे एक महान गूढ आहे. ते आपल्याला सतत आवाहन करीत असते. त्याची ही चाललेली लीला पाहून जो मनुष्य दंग होत नाही तो जिवंत कसला? परमेश्वर म्हणजे स्पष्ट आस्तिक्य-प्रेम-कर्म, असे ते सांगत. या त्यांच्या विचारांमुळे भारतीयांना त्यांचे आकर्षण वाटे. त्यांनी प्रस्थापित केलेला सापेक्षतावाद गणिती मानव दृष्टीने ज्यांना आकलन झाला नाही अशांना ही पाश्चात्य विज्ञानावर त्यामुळे झालेला आघात हे समजू शकला. 

आइन्स्टाइनपूर्वी पाश्चात्य दोन विज्ञानाची इमारत न्यूटनच्या सिद्धान्तावर उभी होती. विज्ञानाच्या वाढीबरोबर केवळ भौतिक मूल्य प्रस्थापित झाली. प्रयोगसिद्ध सत्य म्हणजे वैज्ञानिक सत्य, हेच एक सत्य हा विचार मान्यता पावला. जे मोजता मापता येत नाही ते सर्व काल्पनिक व झूट अशी वृत्ती बनली. यालाच आणि मेकॅनिस्टिक ऑफ लाईफ म्हणजे जड व भौतिकवाद असे नाव आहे. वैज्ञानिक मूल्य तेवढीं चिरंतन व प्रत्यक्ष आहेत. बाकीची सर्व क्षणभंगुर व काल्पनिक आहेत असा लोक विज्ञानशास्त्राचा दावा होता. आइन्स्टाइन यांनी न्यूटनच्या मूळ सिद्धान्तांनाच सापेक्ष ठरवले गांधी व विज्ञान त्रिकालाबाधित आहे हा दावा खोटा ठरवला. आइन्स्टाइनबरोबर जीन, एडिंग्टन,व्हाइटहेड प्रभृती थोर वैज्ञानिक हीच मेटॅफिजिक्सची भाषा बोलू लागले. त्यामुळे आध्यात्मिक विचाराला एक नवा आधार मिळाला. आइन्स्टाइनना भारतात जी लोकप्रियता मिळाली व त्याचे कारण त्यांनी शास्त्रीय मानवतावाद, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य यांचा अंतःकरणपूर्वक सतत पाठपुरावा केला हेच आहे. गांधीजींच्या मृत्यूनंतर ते म्हणाले,"अशी थोर विभूती भूतलावर होऊन गेली यावर पुढच्या पिढ्यांचा सहज विश्वासही बसणार नाही.' गांधीजींच्या अवतार कृत्याने ते किती प्रभावित झाले होते याचे ह्या एका वाक्यावरून प्रत्यंतर येते.

पराधीन वैज्ञानिक

या पृथ्वीवर मानवाचा उद्भव झाल्याला सुमारे दहा लाख वर्षे झाली असतील. लिहिण्या-वाचण्याची कला मानवाला अवगत होऊन जेमतेम सहा हजार वर्षे झाली. यापूर्वी हजार दोन हजार वर्षीच शेतीला प्रारंभ झाला असेल. सुशिक्षित मानवाच्या जीवनात विज्ञान दाखल झाल्याला तीनशे वर्षांवर काळ लोटलेला नाही. विज्ञानामुळे व्यावहारिक जीवनात फेरबदल होऊ लागल्याला दीडदोनशे वर्षे झाली असतील. विज्ञान ही अधुनिक जगांतील एक क्रांतिकारी शक्ती आहे. विज्ञानामुळे मानवाच्या विचारात व समाजव्यवस्थेत फार बदल झाले आहेत. प्रारंभी विज्ञान हा अलौकिक बुद्धिमत्तेच्या जिज्ञासूचा एक बौद्धिक विलास होता. प्रयोगासाठींआवश्यक असलली उपकरणे, साधने कोणा मात्तबर सघन गृहस्थाकडून मिळवून आत्मरंजनासाठी प्रयोग करणारांनी विज्ञानाचा पाया घातला. पण आज विज्ञानामागील प्रेरणा वैयक्तिक राहिली नसून तिला मोठ्या व्यवसायाचे रूप आले आहे. धनाढ्य व्यापारी संघ आणि सरकार यांच्यावरच विज्ञानाची आज दारमदार आहे. वैज्ञानिकाचे वैयक्तिक महत्त्व त्यामुळे कमी झाले आहे. वैज्ञानिक हा आज एखाद्या सनदी नोकरासारखा पराधीन बनला आहे. वैयक्तिक व स्वतंत्र असे फार लहान क्षेत्र त्याला आज उपलब्ध आहे. आइन्स्टाइननी हा झालेला बदल प्रत्यक्ष अनुभवला.

दगडात विश्ववंद्य विभूती 

आल्बर्ट आइन्स्टाइन याचा जन्म 14 मार्च 1879 मध्ये जर्मनीत झाला. त्याचे बालपण जर्मनीत गेले आणि शिक्षणही तथेच झाले. त्याच्या स्वयंप्रज्ञेची चमक शालेय जीवनात कधी दिसली नाही. त्याच्या चिंतनशील वृत्तीमुळे त्याची हुशारी कुठे चमकली नाही. तो एक मट्ठ मुलगाच समजला जात असे. त्याच्या नावाची फोड करून तो Einstein म्हणजे 'एक दगड' आहे असे शिक्षक विनोदाने म्हणत. या दगडात एक विश्ववंद्य विभूती लपलेली आहे याची त्यावेळी कोणाला कल्पनाही नव्हती. आईन्स्टाइनला त्याच्या वडिलांनी एक छोटेसे होकायंत्र आणून दिले. ह्या होकायंत्राने त्याच्या वृत्तींतील जिज्ञासा जागी केली. होकायंत्रांतील चुंबक सुई उत्तर दक्षिण स्थिर होते याचा त्याला मोठा अचंबा वाटला व तो याच एका गोष्टीचा विचार करू लागला. टॉलमी नावाचा एक गरीब विद्यार्थी त्याच्या वडिलांनी घरी ठेवला होता. त्यांने आल्बर्टला गणिताची गोडी लावली. अल्प काळात ह्या क्षेत्रात त्याने प्रगती करून घेतली.

काळ हे नवे परिमाण

न्यूटनचे शोध हा विज्ञानाचा पाया होता. आइन्स्टाइन पूर्वीच्या सर्व वैज्ञानिकांनी गृहीतकृत्यांप्रमाणे त्याचे सिद्धांत मान्य करून आपले प्रयोग केले. ह्या गृहीतकृत्यांची फेरतपासणी आवश्यक आहे ही जाणीव होऊन धैर्याने ते काम हाती घेणारा आइन्स्टाइन हाच पहिला वैज्ञानिक. त्याच्या बुद्धीची लोकोत्तरता ह्यांतच सिद्ध होते. तो एक विज्ञानक्षेत्रातील द्रष्टा होता. वयाच्या चोविसाव्या वर्षी सापेक्षतावादाचा आपला सिद्धांत त्याने जगापुढे मांडला. त्याने मांडलेला हा विचार किती क्रांतिकारक आहे व त्यामुळे विज्ञानात किती मूलभूत बदल घडून येणार आहेत याची त्यावेळी फारच थोड्यांना कल्पना होती. आइन्स्टाइनने अवकाशाच्या (space) जोडीला 'काळ' हे नवे परिमाण आणून जोडले. एवढाच ह्या सिद्धांताचा तज्ज्ञांनी प्रथम अर्थ लावला. ह्या पण सिद्धांताची दूरगामी व्याप्ती हळूहळू त्यांच्या निदर्शनाला येऊ लागली.

गुरुत्वाकर्षणाची नवी कल्पना

गुरुत्वाकर्षणाचा शोध हा न्यूटनच्या शोधापैकी सर्वात महत्त्वाचा शोध मानला जातो. न्यूटनच्या या शोधाच्या आधारावर वेगवेगळ्या ग्रहांमधील संबंधांचा छडा शास्त्रज्ञ लावू पाहात होते. बुधाच्या गतीमधील अनियमितपणा न्यूटनच्या सिद्धांताच्या आधारावर स्पष्ट करता येईना. गुरुत्वाकर्षणाची वेगळी कल्पना आइन्स्टाइन यांनी पुढे मांडली. काही अंतराने दोन दगड पाण्यात टाकले तर त्यांच्यासभोवती वलये निर्माण होतात. त्यांच्या संयोगाच्या ठिकाण जी प्रक्रिया होते त्या तऱ्हेची प्रक्रिया म्हणजे गुरुत्वाकर्षण. Gravitation is the distortion of space and time in the presence of matter पदार्थांच्या सान्निध्यांत अवकाश काल व यांच्यात घडणारा म्हणजे गुरुत्वाकर्षण अशी नवी व्याख्या आइन्स्टाइन यांनी केली. न्यूटनच्या शाश्वत वाटणाऱ्या सिद्धांतातील ही दुरुस्ती अन्य शास्त्रज्ञ सहजासहज पचवू शकले नाहीत.

नव्या शास्त्राचा पाया 

डाल्टन या शास्त्रज्ञाने अणु हा सर्वव्यापी अभंग, अविनाशी आहे अशी कल्पना मांडली. रासायनिक प्रक्रियेत असे अणू भाग घेतात असे मानून रसायनाचा विकास होत होता. विश्वांतील वस्तुमान आणि ऊर्जा (Matter and Energy) या शाश्वत आहेत, त्या निर्माण करता येत नाहीत किंवा त्यांचा विनाश करता येत नाही, असे शास्त्रज्ञ मानीत होते. परंतु किरणोत्सर्जनाचा (Radioactivity) शोध बेक्वेरेलला लागला आणि अणूही भंग पावत असावा असा शास्त्रज्ञांना संशय येऊ लागला. पुढे इलेक्ट्रॉन ऋणकण या मूलकणाचा शोध लागला. ह्या कणाचे मोजमाप करतांना असे आढळले की त्याचे वस्तुमान (Mass) अस्थिर आहे. शास्त्रज्ञ मोठ्याच बुचकळ्यात पडले. परंतु आइन्स्टाइनला यांच्या सापेक्षतावादाने त्याचे‌स्पष्टीकरण मिळते. इलेक्ट्रॉनचे मोजमाप करतांना काल परिमाणाचाही विचार केला पाहिजे. 

वस्तुमान प्रकाशाच्या गतीने प्रवास करू लागले की वस्तुमानाचे रूपांतर ऊजत होते. आज विश्वरचनेबाबत कणवाद व ऊर्जावाद असे दोन विचारप्रवाह आहेत. आइन्स्टाइन यांच्या सिद्धांतामुळे ह्या दोन वादाचा समन्वय साधला गेला आहे. इलेक्ट्रॉन या ऋणकणांचा उपयोग प्रकाशकिरणाप्रमाणे करून अतिसूक्ष्मदर्शक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. मूलकणांना गती देऊन त्यांचा आघात वेगवेगळ्या अणूंवर करण्याचे जे शास्त्र आहे त्याचा पाया आइन्स्टाइन यांनी घातला असे म्हणावे लागेल.

सापेक्षतेचा सिद्धांत

या संशोधनानंतरही ते स्वस्थ बसले नव्हते. निरलसपणे अखंड ज्ञानसाधना ते करीत होते. विविध वैज्ञानिक क्रियांसाठी एकच एक समीकरण शोधण्याचा व ते सिद्ध करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न चालू होता. आइन्स्टाइन यांचा सापेक्षतेचा सिद्धांत प्रथम गणिताने सिद्ध झाला असल्याने प्रयोगी शास्त्रज्ञांना तो केवळ एक बुद्धिविलास वाटत होता. त्याची दखल उत्साहाने घेतली गेली नाही. मायकेलसन मल यांनीं 'इथर' या व्यावहारिकदृष्ट्या उपयोगी म्हणून मान्य केलेल्या माध्यमाचे अस्तित्व शोधण्याचा केलेला अपेशी प्रयत्न आइन्टाइन यांचे सापेक्षतेचे तत्त्व सिद्ध करण्याला उपयोगी पडला. खगोल शास्त्रांतील अनेक कूट आणि विवाद्य प्रश्न त्यांच्या सापेक्षतेच्या सिद्धांताने सुटले सापेक्षता सिद्ध करणारे पुरावेही सादर झाले. त्यांच्या संशोधनामुळे विश्वाचे विज्ञानाचे क्षेत्र अधिक व्यापक झाले आहे ही गोष्ट मान्य होऊं लागली. मूळ शोध लागल्यानंतर दीड तपाने 1921 साली त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.

विज्ञानाचा त्याग हा दुबळेपणा

चिंतनशील माणूस सांसारिक पसाऱ्यात असला तरी हिमालयात जाऊन तप करणाऱ्या सारखीच त्यांची स्थिती असते. आइन्स्टाइन आपल्या संशोधनात व शिक्षणकार्यात इतके गढून गेले होते की, पहिले महायुद्ध आले आणि गेले तरी त्यांना खबर नव्हती. परंतु पहिल्या महायुद्धानंतर विजयी दोस्तांनी जर्मनीची लांडगेतोड सुरू केल्याने जर्मन जनता हैराण झाली. हिटलरला देवदूत समजून त्यांनी त्यांचे स्वागत केले. अधिकारावर येताच हिटलरने ज्यूची ससेहोलपट सुरू केली. रसायनाच्या क्षेत्रात जर्मनीला अग्रस्थान मिळवून देणारा शास्त्रज्ञ हावर हा ज्यू होता. त्याला हिटलरच्या सेनेने सळो की पळो करून सोडले. शेवटी त्याने आत्महत्या केली. आइन्स्टाइना आपण ज्यू आहोत याची जाणीव देखील नव्हती. स्वतःला ते जर्मन समजत होते. परंतु त्यांच्यावरही घाट आली. त्यांना स्वस्थपणे आपले काम करणे अशक्य झाले. नाना आरोप चिकटवून शेवटी त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली आणि त्यांचे जर्मन नागरिकत्व ही काढून घेण्यात आले. आइन्स्टाइन निर्वासित झाले. 

इंग्लड, फ्रान्स, बेल्बम या देशात ते काही काळ राहिले. जगाची सफरही त्यांनी केली; आणि 1932 साली ते अमेरिकेत आले. तेथील प्रिन्स्टन विद्यापीठात ते अखेरपर्यंत होते. जर्मनीतून झालेले निर्वासन आणि दुसऱ्या महायुद्धानंतर वेगवेगळ्या राष्ट्रात अतिसंहारक अण्वस्त्रे तयार करण्यासाठी लागलेली स्पर्धा यामुळे त्यांच्या मनातील सामाजिक भावना तीव्र होत गेली. वैज्ञानिकांनी संहारक शस्त्रास्त्रांच्या शोधाबाबत राजकारणी मुत्सद्यांशी सहकार्य करू नये, जागतिक शांततेसाठी व लोकांच्या समृद्धीसाठी झटावे असे ते सांगू लागले होते. विज्ञान ही एक शक्ती आहे, ती शिव किंवा संहारक बनविणे मानवाच्या हाती आहे. ती शिव बनविण्याचा प्रयत्न करण्यात पुरुषार्थ आहे, ती संहारक बनू शकते म्हणून विज्ञानाचाच त्याग करणे हा दुबळेपणा आहे असे त्यांचे मत होते. परवा विनोबाजींनी हेच सांगितले,"विज्ञान अध्यात्मज्ञानाच्या अधीन असले पाहिजे. विज्ञान हे दात आहेत आणि अध्यात्म हे डोळे आहेत. जड अणूमधील शक्ती संहारक ठरू नये असे वाटत असेल तर मनुष्यमात्रांतील चैतन्यपरमाणु जागृत केला पाहिजे. पूर्ण अहिंसा म्हणजे सर्वोदय प्रस्थापित झाला नाही तर सर्वनाश ठेवलेलाच आहे." समतेवर आधारलेल्या उद्यांच्या सुखी मानवसमाजाचे आइन्स्टाइनसारखे तत्त्वचिंतक हे अग्रदूत आहेत. विज्ञानाचा उपयोग व्हावयाचा असला तर मानवाचे अंत:करण अधिक शुद्ध व प्रेममय झाले पाहिजे हाच त्यांचा जीवनसंदेश आहे.

Tags: सापेक्षतावाद ज्यूलियन इक्स्ले कृष्ण मेनन महात्मा गांधी अमेरिका डाल्टन गुरूत्वाकर्षण न्यूटन जर्मनी अल्बर्ट आइन्स्टाईन Relativism Julian Ixley Krishna Menon Mahatma Gandhi America Dalton Gravitation Newton Germany Albert Einstein weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी