डिजिटल अर्काईव्ह

मराठी विज्ञान संमेलनाच्या अध्यक्षांचे मननीय विचार 

महाराष्ट्रात कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकन्यांचे जीवन अतिशय विकट जाहे. त्यांच्यापैकी अनेक जण आज रोजगार हमी योजनांमध्ये मजुरी करीत आहेत. या शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी डॉ. उदास यांनी आग्रहपूर्वक मांडलेला शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारून, उपलब्ध होणाच्या पाण्याचे समान वाटप करावे लागेल.

डॉ. ग. रा. उदास हे भारतातील एक श्रेष्ठ शास्त्रज्ञ आहेत. यंदाच्या सतराव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. उदास यांनी जे भाषण केले ते अत्यंत रेखीव, आणि भारताच्या व विशेषतः महाराष्ट्राच्या नैसर्गिक संपत्तीच्या उपयोगा. बाबत सुस्पष्ट, शास्त्रीय दृष्टिकोन मांडणारे व अनेक मौलिक सूचना करणारे होय.

त्यांच्या भाषणाचा परामर्ष घेण्यापूर्वी डॉ. उदास यांची थोडी ओळख करून घेणे उचित ठरेल. डॉ. उदास मूळचे अहमदनगरचे. घरची परिस्थिती गरिबीचीच, मॅट्रिक झाल्यावर ते फर्गुसन कॉलेजमध्ये शिकावयास आले व प्रा. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या जिऑलॉजी या विभागाकडे ते आकृष्ट झाले. इंटर सायन्स पासूनच तो विषय त्यांनी घेतला.194 2 सालची स्वातंत्र्य चळवळ सुरू होताच श्री. उदास यांनी धडाडीने या चळवळीत भाग घेऊन कारावासही भोगला. जिऑलॉजीमध्ये पदवी संपादन केल्यावर भूशास्त्राच्या खास संशोधनासाठी ते भारताच्या उत्तर सीमेवरील वित्रळ या संस्थानात गेले सध्याच्या माझाद काश्मीर जवळ असलेल्या चित्रळमध्ये मिठाचे डोंगर असून शास्त्रीय दृष्टीने या भूस्तराची पाहणी करण्यासाठी डॉ उदास तेथे गेले होते. फाळणीच्या दिवसात परत येताना धी उदास यांनी काही काळ पठाणाच्या देशात प्रवास केला. अनेक संकटांना तोंड देत ते भारतात परत आले. नंतर पुनश्च ते भूशास्त्राच्या अभ्यासाकडेच वळले. दीर्घकाल निष्ठापूर्वक व्यासंग आणि संशोधन करून त्यांनी भारतीय शास्त्रामध्ये स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे.

डॉ. उदास यांनी अ. भा. मराठी विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष म्हणून केलेले भाषण त्यांच्या व्यक्तिमत्त्वास साजेसेच आहे. या भाषणात पांडित्याचा गर्व नाही. कारण फापट पसारा नाही. काही महत्त्वाच्या मुद्यांबाबत डॉ. उदास यांनी त्यांची मते स्पष्टपणे मांडली आहेत. भूस्तरीय जलसंचय हा भूशास्त्राचा महत्त्वाचा विभाग आहे. पिण्याच्या पाण्याची आपल्याकडे अनेक खेड्यातून तीव्र टंचाई आहे तसेच शेती, कारखानदारी, स्वच्छता वगैरेसाठी लागणारे पाणीही आज अपुरे आहे. काही भागात उपलब्ध असलेल्या पाण्याचा पुरेपूर वापर केलेला आहे. तर अनेक ठिकाणी जमिनीखाली पाणी किती उपलब्ध आहे याची पाहणी चालू आहे. या संदर्भात डॉ. उदास यांनी त्यांच्या भाषणात पुढील माहिती दिलेली आहे : 'तापी-पूर्णा या नद्यांच्या आसपासच्या क्षेत्राचा भूस्तरीय पाणी बाहेर काढण्याबाबतीत पूर्ण विकास झाला आहे. तेथे अधिक कूपनलिका खोदू नयेत. अधिक कूपनलिका खोदल्यास व पंप बसविल्यास अंतर्गत पाणी-पुरवठ्यापेक्षा अधिक पाणी वापरले जाईल आणि याचा परिणाम काही कालानंतर कूपनलिका निकामी होतील.' जळगाव जिल्हयात केळीच्या बागांसाठी जे पाणी घेतले जाते त्यामुळे तेथील विहिरीतील पाण्याची पातळी खाली जाऊ लागली आहे. या संदर्भात डॉ. उवास यांनी दिलेला इशारा महत्वाचा आहे. निसर्ग संपत्तीचा वापर करताना हावरेपणाने ओरबाडून खाऊन चालणार नाही. अन्यथा निसर्गाची लय (एकॉलॉजि- कल् बॅलन्स) बिघडेल व पश्चात्तापाची पाळी येईल.

डॉ. उदास यांनी भूस्तरीय पाण्याच्या संदर्भात महाराष्ट्रातील दुसऱ्या विभागाची पुढोल माहिती दिलेली आहे :

'हा विभाग खडकांचा बनलेल्या आहे. यात कोकण व दक्षिण देश हा लाव्हारसाने बनलेला भूभाग आहे व त्याचे क्षेत्र 81 टक्के आहे. नागपूर-चंद्रपूर या विदर्भातील विभागात काही रूपांतरित खडक आहेत व त्यांचे क्षेत्र 10 टक्के आहे'

महाराष्ट्रातील या 91 टक्के भूभागात ज्या कूपनलिका 1973 मध्ये खोदल्या, त्यांच्यापैकी 95 टक्के यशस्वी झाल्या. पतु 198 2 मध्ये खोदल्या गेलेल्या कुपनलिकांपैकी 65 टक्केच यशस्वी झाल्या. यावरून हे उघड होते को शासकीय तज्ज्ञांनी जे अंदाज बांधले त्यांत काही चुका आहेत. भूस्तरीय पाण्यासंबंधी महाराष्ट्र अॅडमी ऑफ सायन्सेस् तर्फे डॉ. उदास व अन्य तज्ज्ञांनी शासनाला एक संशोधनपत्रिका 1977 मध्ये सादर केली. परंतु ही महत्त्वाची संशोधनपत्रिका अद्याप शासनाच्या विचाराधीन आहे! मुख्यमंत्री कोणी व्हायचे याबद्दल पुंडोबांच्या मारामाऱ्या चालू आहेत आणि शेतकरी मात्र पाण्यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

डॉ. उदास व त्यांच्या सहकाऱ्यानी सादर केलेल्या संशोधनपत्रिकेत महाराष्ट्रातील भूस्तरीय पाण्याचे वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण कसे करावे याबाबत तपशीलवार सूचना केल्या आहेत. शासनाच्या अहवालातील त्रुटो दाखविताना डॉ. उदास यांनी पुढील उद्गार काढले: ' खेड्यातील तलाठ्याने सांगितलेली विहिरींची संख्या व शेतातील पिकाचे उत्पन्न पाहून त्यासाठी पाणी फिती लागले असावे याचा अंदाज घेऊन शासनातर्फे पाणीविषयक अहवाल प्रसिद्ध होतो. भूपृष्ठावर पडणाऱ्या पाण्यापैकी नऊ टक्के पाणो जमिनीत झिरपते ही मूळ समजूतदेखील साधार नव्हती. आता वैज्ञानिक पहाणी न करता शासनाने नऊ टक्क्याऐवजी पंधरा टक्के पाणी जमिनीत झिरपते असा नवा निराधार अंदाज केला आहे.'

विहीर ही राष्ट्रीय संपत्ती आहे. परंतु राजकीय दबावाखाली विहिरी इष्ट ठिकाणी खोदल्या जात नाहीत. तसेच अनेक खोदलेल्या विहिरी अपयशी ठरल्या, असे जाहीर करून खास व्यक्तींना कर्जमाफी मिळते, हा भ्रष्टाचार तर महशूरच आहे. या बाबतीत डॉ उदास यांनी पुढील सूचना केली आहे : 'शेतकऱ्यांना विहिरीसाठी, पंपासाठी कर्ज न देता, शासनाने भूशास्त्रज्ञांच्या शिफारशीनुसार हजारों विहिरी ठिकठिकाणी खोदाव्यात. ही विहीर यशस्वी ठरली तरच त्या विहिरीची व पंपाची किंमत त्या जमीन मालकास दिलेल्या कर्जाचा माफ समजावी. कर्ज वसूल होईपर्यंत विहीर राष्ट्रीय मालकीची समजून तिच्यातील पाणी अन्य शेतकरी बंधूंनाही मिळावे.' शेवटच्या भागाबाबत पाणी-पंचायतीची भूमिका अधिक योग्य आहे. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती मानून पाण्याचे समान वाटप करावे हा पाणी पंचायतीने मांडलेला दृष्टिकोनच सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. भाषणाच्या शेवटी डॉ. उदास यांनी 'पाणीवाले महाराज' वगैरे बुवाबाजीपासून अलिप्त रहावे असाही इषारा दिला आहे. ते म्हणतात: 'विद्युतप्रवाहावर आधारलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून भूस्तरीय पाण्याचा शोध घेता येतो. पाण्याच्या बाबतीत अंधश्रद्धा व राजकारण यापासून आपण मुक्त होऊ तो सुदिन ठरेल.'

महाराष्ट्रात कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन अतिशय बिकट आहे. त्यांच्यापैकी अनेक जण आज रोजगार हमी योजनांमध्ये मजुरी करीत आहेत. या शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी डॉ. उदास यांनी आग्रहपूर्वक मांडलेला शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारून, उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे समान वाटप करावे लागेल. लोभीपणाने जादा पाणी वापरल्यामुळे सांगली जिल्हयातील हजारो एकर उत्तम जमीन क्षार वर येऊन निकामी झाली आहे. एका बाजूस लक्षावधी शेतकऱ्यांनी चातकाप्रमाणे पावसाची वाट पहायची आणि दुसऱ्या बाजूस पाणी-वाटपातील भ्रष्टाचारामुळे जमीन खारावून जायची ही परिस्थिती भयावह आहे. योग्य दृष्टिकोन असलेले राज्यकर्ते शास्त्रज्ञांच्या मदतीने ही परिस्थिती बदलू शकतील. परंतु आज तरी महाराष्ट्रात मंत्रीमंडळाला या "फालतू गोष्टी" साठी वेळ नाही असे दिसते!

Tags: पर्यावरण महाराष्ट्र भूस्तरीय पाणी डॉ. ग. रा. उदास Environment Water Leval Earth Water Water Dr. G. R. Udaas #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी