डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हे प्रचंड व दीर्घकालावर्ती कृत्य साधणार कसे ? कोणता उपाय योजला असता व कोणते यंत्र निर्मिले असता, हे कार्य तडीस लागण्याच्या मार्गाला लागेल?

वि. का. राजवाडे
31 डिसे. 2005 : 79 वा स्मृतिदिन 
विनम्र अभिवादन.

हे प्रचंड व दीर्घकालावर्ती कृत्य साधणार कसे ? कोणता उपाय योजला असता व कोणते यंत्र निर्मिले असता, हे कार्य तडीस लागण्याच्या मार्गाला लागेल? आमच्यासारख्या एकट्या-दुकट्या भुकेकंगालाच्या जिवापाड परिश्रमाने ह्या कामाचा प्रारंभही झाला म्हणणे हास्यास्पद आहे. कीर्तन्यांनी सहा महिने खपून दोन बखरी, सान्यांनी बारा वर्षे खपून चाळीस बखरी, खऱ्यांनी वीस वर्षे खपून दोन हजार पृष्ठे व मी पंधरा वर्षे खपून चवेचाळीसशे पृष्ठे प्रसिद्ध केली. ह्या सर्वांनी केलेले काम एखाद्या राजाने, महाराजाने किंवा सार्वभौमाने दोन रखेल्यांचा वर्षाभराचा मेहनताना ह्या कामी खर्चिण्याने मनात आणले असते तर, पंधरा हजार रुपयांच्या व्ययाने सहा महिन्यांत सहज आटोपले असते. पण वेलिफाचे शिक्षण मिळालेले व पोलीस शिपायाचे विलास भोगू इच्छिणारे नृपाधम जोपर्यंत गायांवरून लोळत आहेत, तोपर्यंत त्यांच्यापासून प्रोत्साहन राहू द्याथ; सामान्य साहाय्यही मिळण्याची आशा करणे व्यर्थ आहे. बेलिफांनी न्यायमीमांसा व पोलीस शिपायांनी राजनीती कशाशी तोंडी लावावयाची? राजांचा खालचा जो जमीनदार, इनामदार, वगैरेंचा वर्ग तोही अद्याप निद्रापद भोगीत आहे. शेतकरी, उदमी, कारकून व पंतोजी हे बोलून-चालून काबाडकष्ट करणारे लोक, त्यांच्यापासून ह्या कामाला साहाय्य कसे मिळणार? राहाता राहिले आंग्ल शिक्षित लोक. मास्तर, वकील, हायकोर्ट वकील, मुन्सफ, जज्ज, इंजिनेर, डॉक्तर वगैरे जे बूटपाटलोणवाले बडे बडे महंत आहेत, त्यांची तर ह्या कृत्यावर बहुत खपा मर्जी झालेली दिसते. वडधा बडधा विद्वानांचे व महान् महान् देशहितकऱ्यांचे निवासस्थान जे मुंबई शहर त्या राजधानीत पाचपन्नास पृष्ठांचे एखादे ऐतिहासिक मासिक पुस्तक सहज चालेल, ह्या आशेने आमच्या एका हायकोर्ट वर्कील मित्राने एक मासिक पुस्तक मोठ्या उत्साहाने सुरू केले. महंतांच्या व ऋषींच्या कर्णरंध्रावर आरंभिलेली वार्ता आदळली, व कित्येक विद्वद्रत्नांकडून द्रव्यसाहाय्याची आश्वासनेही मिळविली. आणि एवढा थोरला कडेकोट बंदोबस्त, होऊन ह्या मासिकाला सात महिन्यांतच गाभाटावे लागले! पुरे शंभरही वर्गणीदार मिळाले नाहीत आणि जे मिळाले त्यांपैकी शेकडा नव्वद भिडेखातर मिळाले. केवळ स्वदेशाच्या चरित्रप्रेमाने झालेला वर्गणीदार ह्या संतमहंतांतून एखाद-दुसरा झाला असल्यास न कळे. विद्वान व देशहितकर्ते म्हणून ज्यांना म्हणतात त्यांची कळकळ असली आहे. केवळ ज्ञानार्जनांत नव्हे, तर खाण्यापिण्यात व वस्त्र-प्रावरणात सुधारलेल्या पाश्चात्त्यांचे सर्वस्वी अनुकरण करण्याचा बाणा बाळगणाऱ्या ह्या मुंबईतील देशभक्तांनाही औदासीन्याने व संन्यासप्रवणतेने सोडले नाही. प्रपंच, इतिहास, समाज ह्यांचे हित करण्याचा उपदेश ज्यांनी पाश्चात्त्यांपासून घेतला, त्यांनी स्वसमाजाच्या चरित्राच्या प्रसिद्धीकरणार्थ वर्षातून शांपेनच्या एका अर्ध्या बोतलचीही किंमत देऊ नये ? परंतु स्वार्थाचा त्याग करण्याला ज्यांना पार्चात्यांनी शिकविले त्यांनी स्वेतिहासाचा व स्वत्वाचा त्याग करू नये तर काय करावे? येणेप्रमाणे समाजातील बहुतेक सर्व वर्ग आंग्लभाषाकोविद व अकोविद औदासीन्याने घेरलेला आहे. तेव्हा आता हे काम व्हावे कसे ?

इतिहासाचार्य-वि. का. राजवाडे (मॉडर्न बुक डेपो प्रकाशनाच्या राजवाडे दर्शन' या पुस्तकातून...)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके