डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माईकच्या नवख्या स्पर्शानं पावड्याचं अंग फुलारलं. त्यानं तोंड माईकजवळ नेतच ओरडायला सुरुवात केली- हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आपोआप पोरं जमायला लागली. नानाचे लोक घिरट्या घालायला लागले. पावड्या न दमता, न थकता ओरडत होता. त्याचा आवाज गावभर घुत होता. अशात त्याच्या हातातला माईक एका थोराड  माणसानं घेतला. त्यानं सुरू केलं- ‘बिरनाळे थोड्याच वेळात येत आहेत.’ पावड्या पोरांच्या घोळक्यात गेला तर सगळ्या पोरांचा एकच प्रश्न- ‘पुकारतानं कसं वाटतंय?’ त्याची छाती फुगली. एवढ्यात नाना ओरडला- ‘चला रं पोरानु- फेरी काढू. घोषणा द्यायच्या- यीऊन यीऊन येणार कोण?ऽऽ आण्णाशिवाय हाय कोण?’ सगळी गल्ली पोरांच्या आवाजानं दणाणून गेली. हळूहळू पसरणारा अंधार दाट झाला. मध्येच कुणीतरी बातमी आणली. आण्णा आले. सगळे पंचायतीकडं पळायला लागले. पळता-पळताच पावडूनं विचारलं, ‘टी-शर्ट आता वाटतील न्हवं?’ चवडू म्हणाला, ‘नाना म्हण्लाय म्हणजे वाटणारच. सभा सुरू झाली. ओरडून ओरडून भाषणं. मध्येच घोषणा. पुन्हा भाषणं. टाळ्या. हुर्योऽऽ पावड्या चेकाळून गेला. ओरडायचं. टाळ्या वाजवायच्या. टाळ्याच टाळ्या- विजय असोऽऽ सभा संपली. आलेले लोक गाडीत बसून भुर्रकन उडाले. त्यांच्याबरोबर नानाही. स्पीकरवाले, लाईटवाले आवरायला लागले. हळूहळू सगळी पांगापांग.

पावडूचं घर. घर कसलं खोपाटच. चार मेढी. त्यावर टेकवलेलं आडं. आड्यापासून पावळणीपर्यंत उसाचा पाला. भोतेभोर तुरकट्याचा कूड, शेणानं लिंपलेला. त्या घराच्या भिंती, खोपटाचं पत्र्याचं दार, खोपटात मधोमध दगडं रोवून तयार केलेली रेघ. दगडाच्या एका बाजूला गोठा. गोठ्यात म्हैस. शेजारी शेळी. त्यांच्या शेणामुताचा वास. दुसऱ्या बाजूला चुलभानुशी. कुडाला लागून गाडग्याची उतरंड. उतरंडीला लागून मंदान. खोपड्यात चुलीसाठी जळण. बाकीची जागा शेणानं स्वच्छ सारवलेली. आई-वडील, बहीण-भाऊ असा सगळा गोतावळा. आड्याच्या मेढीला टांगलेला बल्ब. गल्लीच्या दूरच्या घरातून आणलेली वायर. बल्ब गरजेपुरता रात्री पेटलेला असतो, इतरवेळी धुरानं काळवंडलेला असतो. पावडूची आणि सुमीची पुस्तकं खोपट्यातल्या कणगीला लागून. पावडूची सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने होते; पण त्याला अंथरूणातून बाहेरच पडवत नाही. वाकळ गच्च लपेटून तो तसाच पडून राहतो. कितीतरी वेळ. अशात त्याला स्वप्न पडतं- पावडू भरधाव मोटारसायकल पळवत असतो. सुसाट- अचानक आई सर्रकन वाकळ ओढते. घडी घालते. दांडीवर टाकते. दांडीवर अंथरूण-पांघरूण आणि सगळ्या घराचे कपडे. पावडू डोळे चोळत उठतो. खोपटाच्या बाहेर येतो.

समोरच्या गल्लीत बायकांची धांदल. नळाला पाणी आलेलं. सगळ्यांची पाण्यासाठी मारामार. सगळ्या गल्लीला मिळून दोन चाव्या. पावडूसारख्या तीन-चार खोपटातले लोकही तिथंच पाणी भरत. पावडूची आई लगबगीनं दोन प्लॅस्टिक कळशा घेऊन नळावर धावते. तिला अजून बक्कळ काम पडलेलं. पावडूनं गोठ्यातून बाहेर बांधलेल्या शेळीकडं बघितलं. ती उगाचंच इकडून-तिकडं उड्या घालत होती. त्याचा टाग्या कुत्रा त्या पेंडरींना अंग घासत होता. आई चावीवरूनच ओरडली. पावडूनं आवरायला सुरुवात केली. पावडूची बहीण- सुमी- चुलीसमोर स्वयंपाक करत बसलेली. गोठ्यातली म्हैस निवांत. आई घागरी भरून घेऊन आली. म्हणाली- ‘पावड्या, आवरलं का नाही? म्हशीला सोड. गोठा लोटून शेताला जायला पाहिजे.’ पावडूची घाई सुरू झाली. त्यानं म्हशीचं दावं सोडलं. म्हैस खोपटातनं बाहेर पडली. तळ्याच्या दिशेला लागली. ‘तिकडंच नको बसू गोठणावर. शाळंचा टाईम आत्ता व्हईल.’ पावडू काहीच बोलला नाही. हातात काठी घेऊन गोठणाकडं चालू लागला. 

गोठण गावाच्या लगतच. त्याचे नेहमीचे सवंगडी आधीच जमलेले. त्यांच्या म्हशी गोठणावर दातलत होत्या. पावडूची म्हैस गोठणावर हारगाल सुटली. पावडूनं पळत जाऊन थांबवलं. ती शहाण्यासारखं चरायला  लागली. ‘पावड्या, आज शाळंला दांडी!’ चवडू ओरडत त्याच्याजवळ आला. ‘काऽऽ रेऽऽ?’ ‘का म्हणजे? आरंऽऽ आज गावात प्रचारफेरी. तालुक्याची माणसं येणार.’ ‘कोण्ती? देवळाजवळच्या पोस्टरवरची?’ ‘ती नव्हं. चावडीवरच्या पोस्टरवरची! टी-शर्ट वाटणार हाईत.’ ‘कुणाला?’ ‘प्रचारात येणाऱ्याला. आरंऽऽ नुस्तं जायचं, आरडायचं. तू आलास तर तुला बी छापलेला टीशर्ट .’ चवडूच्या बोलण्यानं पावड्याच्या डोळ्यांसमोर नवा टी-शर्ट तरळायला लागला. शाळेत घालायची एकच शर्ट-पँट. शाळेतून आलं की फाटका शर्ट. फाटकी पँट. आईनं सतरा ठिगळं लावलेली.

पावड्यानं मनातच ठरवून टाकलं- आज आपलीही शाळेला दांडी. त्यानं चवड्याला काय काय विचारून घेतलं. म्हशीला तळ्याकडं हाकललं. म्हैस पाण्यात उतरली. चकोट धुवून काढली. म्हैस शहाण्यासारखी घरच्या वाटेला लागली. आई शेळी घेऊन कधीच शेताकडं गेली होती. सुमीची शाळेची तयारी झालेली. तिनं पावड्याला ताट वाढलं. सुमी पावड्यापेक्षा मोठी. हायस्कूलात शिकणारी. ताटावर बसल्या बसल्या पावड्याला वाटलं, सांगावं सुमीला. पण नक्कोच. ती फुक्कट तोंड वाजवणार. शहाणपण शिकवणार. तिला काय दोन ड्रेस आहेत. त्यानं गडबडीनं घास गिळायला सुरुवात केली. सुमी दप्तर घेऊन बाहेर पडली. त्यानं सुस्कारा सोडला. घास चावता चावता त्याला गाडेकर गुरुजी आठवले. उद्या बदडणार. नाही तरी रोज कशाबद्दल तरी मारतातच ते. आणखी दोन छड्या जास्त. टीशर्ट साठी. त्यानं जेवलेलं ताट धुवून फळीवर उपडी ठेवलं. शाळेचा ड्रेस घातला. दप्तर पाठीवर घेतलं. म्हशीसमोरच्या गोरणीत माळ्यावरच्या गवताच्या चार पेंड्या टाकल्या. खोपटाचं दार बंद केलं. कुलूप घातलं. किल्ली नेहमीच्या ठिकाणी वाश्यात कोंबली. त्यानं चवड्याचं घर गाठलं. तर तो आधीच उधळलेला. म्हणजे तो चावडीजवळ असणार. पण सगळे मास्तर चावडीजवळूनच शाळेकडं जातात. त्यांना सापडलो तर? पावडूनं डोकं खाजवलं. सापडलो तर सापडलो. दप्तर आहेच पाठीवर.

तो चावडीजवळ आला. चवड्या नाहीच. तो नाईलाजानं शाळेकडं वळला. प्रार्थना सुरू होती. चवड्या एकदम पहिल्या रांगेत. प्रार्थना संपल्यावर पावडू वर्गात घुसला. प्रार्थनेला गैरहजेरीची एक छडी. त्यानं चवड्याकडं बघितलं. तर तो तशातही म्हणाला- पाच वाजता- पाच. त्याचं वर्गात लक्षच लागत नव्हतं. बाराची घंटा. दोनची घंटा. ताट घेऊन जेवणाच्या रांगेत. भात-आमटी खाता खाता तो चवड्याला म्हणाला, ‘आत्ताच जाऊ की!’ ‘अरे, ते येणार पाचला. आत्ता जाऊन काय करायचं?’ त्याला चवड्याचं म्हणणं पटलं. चारची बेल. मग मात्र त्यानं दप्तर पाठीला लावलं. चवड्याला फितवलं. मास्तरांची नजर चुकवली. दोघे चावडीजवळ. पाटलाचा तुकानाना आणि तिघे- चौघे तयारीला लागलेले. चवड्याला नाना म्हणाला, ‘सुटली का रं शाळा? बरं झालं. पंधरा-वीस पोरं गोळा घाल.’ ‘अजून सुटली नाही शाळा.’ चवड्या कसंबसं बोलला. ‘पळा. दप्तर ठेवून या. हाताखालची तरी कामं करशीला.’ नानानं हुकूम सोडला. दोघेही चवड्याच्या घरात दप्तर टाकून आले.

चावडीजवळच्या पोस्टरवर नजर रुतवून फोटो न्याहाळत थांबले. एक दाढीवाला आरबाट चेहरा. त्याचं नाव. पुढं ‘प्रचंड मतांनी निवडून द्या.’ असं लिहिलेलं.  ‘हे निवडून जाऊन काय करत्यात?’ पावड्याचा भाबडा प्रश्न. ‘लई पैसे मिळीवत्यात.’ चवड्यानं त्याला माहिती पुरवली. पावड्याला आपणही असं निवडून जायला हवं, असं वाटायला लागलं. तसं तो चवड्याला म्हणाला. तर चवड्या हसायला लागला. म्हणाला, ‘लेको, निवडून जायला आधी पैसे वाटाय लागत्यात. नानाकडं आल्यात म्हणं वाटाय. घरात बोलाल्ती.’ पावड्या एकदम गप्प. एवढ्यात नानानं हाक मारली. ‘खुर्च्या पुसा. टेबल लावा. पाण्याचा तांब्या.’ स्पीकरवाला स्पीकर लावत होता. मध्येच तो माईकवर फुंकून बघत होता. शाळेची घंटा झाली. तसा स्पीकरवरून नानाचा सोबती पुकारू लागला. ‘विधानसभेचे उमेदवार आण्णा बिरनाळे यांची जाहीर सभा. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा.’ पावड्याला वाटलं, आपल्यालाही पुकारायला मिळावं. तो माईकवाल्याजवळ गेला. ‘मी पुकारूऽऽ?’ ‘पुकार की. काय पुकारतोस?’ ‘हेच की. विधानसभेचे उमेदवार आण्णा बिरनाळे यांची जाहीर सभा. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा.’ ‘येतंय की रंऽऽ तुला. कुणाचा तू?’ ‘शिवा करवळचा.’ ‘हांऽऽ हांऽऽ पुकार तू.’ म्हणत त्यानं पावड्याच्या हातात माईक दिला.

माईकच्या नवख्या स्पर्शानं पावड्याचं अंग फुलारलं. त्यानं तोंड माईकजवळ नेतच ओरडायला सुरुवात केली- हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आपोआप पोरं जमायला लागली. नानाचे लोक घिरट्या घालायला लागले. पावड्या न दमता, न थकता ओरडत होता. त्याचा आवाज गावभर घुत होता. अशात त्याच्या हातातला माईक एका थोराड  माणसानं घेतला. त्यानं सुरू केलं- ‘बिरनाळे थोड्याच वेळात येत आहेत.’ पावड्या पोरांच्या घोळक्यात गेला तर सगळ्या पोरांचा एकच प्रश्न- ‘पुकारतानं कसं वाटतंय?’ त्याची छाती फुगली. एवढ्यात नाना ओरडला- ‘चला रं पोरानु- फेरी काढू. घोषणा द्यायच्या- यीऊन यीऊन येणार कोण?ऽऽ आण्णाशिवाय हाय कोण?’ सगळी गल्ली पोरांच्या आवाजानं दणाणून गेली. हळूहळू पसरणारा अंधार दाट झाला. मध्येच कुणीतरी बातमी आणली. आण्णा आले. सगळे पंचायतीकडं पळायला लागले. पळता-पळताच पावडूनं विचारलं, ‘टी-शर्ट आता वाटतील न्हवं?’ चवडू म्हणाला, ‘नाना म्हण्लाय म्हणजे वाटणारच. सभा सुरू झाली. ओरडून ओरडून भाषणं. मध्येच घोषणा. पुन्हा भाषणं. टाळ्या. हुर्योऽऽ पावड्या चेकाळून गेला. ओरडायचं. टाळ्या वाजवायच्या. टाळ्याच टाळ्या- विजय असोऽऽ सभा संपली. आलेले लोक गाडीत बसून भुर्रकन उडाले. त्यांच्याबरोबर नानाही. स्पीकरवाले, लाईटवाले आवरायला लागले. हळूहळू सगळी पांगापांग.

पावडू चवडूला म्हणाला, ‘फशीवलं वाटतं आपल्याला.’ चवडू एकदम हिरमुसला. काही न बोलताच चालायला लागला. पावड्यानं त्याच्या घरातलं दप्तर पाठीला लावलं. जड पावलानं तो खोपटाच्या दारात आला. सुमी अभ्यास करीत बसलेली. त्याला बघितल्या बघितल्या आई चवताळली- ‘कुठं होतास?’ तो काहीच बोलला नाही. सुमी म्हणाली, ‘पुकाराय बसलाता.’ आईचं डोकं चढलं. म्हणाली, ‘भाड्या, ती गळोंड्या लोकांची कामं. आमा गरीबाला काय करायची सभा नि फिबा. ते काय पोटालं देत्यात? उलटं आमचंच चिलटून खात्यात.’ आईचा आवाज चढला. पावड्याला जोराचं रडू कोसळलं. तो खोपटाच्या मेढीला टेकून मुसमुसायला लागला. एवढ्यात वडील आले. तो रडताना बघून त्यांनी खुणेनंच सुमीला ‘काय झालं?’ म्हणून विचारलं. तिनं आईकडं बोट दाखवलं. आईचं तोंड पुन्हा सुरू- ‘प्रचार करतोय भाड्या, प्रचार. सभा ऐकून आलाय.’ ‘हितं म्हशीला पाणी कोण दावणार, त्येचा आमदार?’ वडिलांनी त्याला जवळ घेतलं. समजावीत म्हणाले- ‘पावडू’, आपलं न्हवं गड्या काम त्ये. ऊठ. तोंड धू. अभ्यास कर.’ पावडू धीर एकवटून उठला. तोंडावर पाणी मारलं. पुस्तक उघडलं. त्याला पुस्तकाच्या पानावर टी-शर्ट दिसायला लागला. त्यानं गप्पकन पुस्तक मिटवलं आणि मनात ठरवलं- ‘आता नाही जायचं अशा ठिकाणी. काहीही झालं तरी!’

Tags: gosthi balkatha rajan gawas गोष्टी T-shirt बालकथा राजन गवस टी शर्ट weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके