डिजिटल अर्काईव्ह

आपण काय गमावले आहे हे हळूहळू समजायला लागले. संस्थात्मक कार्याचे झालेले नुकसान, बाबांनी समर्थन केलेल्या आणि पाठिंबा दिलेल्या उदारमतवादी पुरोगामी चळवळींची झालेली हानी, व्याकूळ विद्यार्थी आणि पोरके झालेले तरुण लेखक; साहित्य, सांस्कृतिक, वैचारिक जगताची भरून न येऊ शकणारी हानी या सगळ्यांबद्दल इतके लिहिले गेले आहे की याच्या आड आमचे वैयक्तिक दु:ख, न भरून येणारे पोरकेपण दबलेलेच राहिले. कधीकधी वाटायचे की त्यांचे स्नेही, विद्यार्थी त्यांच्याबद्दल भरभरून बोलताना ते स्वत: कसे बाबांचे लाडके होते, आम्हां कुटुंबीयांपेक्षा बाबांच्या सहवासात जास्त होते, त्यांना बाबा जास्त समजत होते हेच चढाओढीने सांगू पाहत असतात. आश्चर्य याचे वाटे की यापैकी कुणालाही आपल्या वैयक्तिक हानीपेक्षा कुटुंबीयांची हानी न भरून येणारी असेल याची जाणीवही नव्हती.

माझ्या आठवणीतले बाबा म्हणजे पांढरे धोतर आणि पांढरा सदरा घातलेले, कायम लोकांच्या गराड्यात, त्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले, हास्यविनोद, चर्चेत रमलेले, एक उंच, मध्यम वयीन गृहस्थ असे होते. जेव्हा त्यांना भेटायला कोणी आलेले नसे; तेव्हा ते आमच्या बैठकीतील त्यांच्या डेस्कसमोर बसून लिहीत किंवा वाचत असत. त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता अत्यंत विलक्षण होती. घरातल्या रहाटगाडग्याने निर्माण होणारे आवाज असोत वा आगंतुक पाहुण्याच्या आगमनाने आलेला अडथळा, ते सहजतेने परत आपल्या वाचनात गढून जात किंवा लेखनिकाला सांगितलेल्या शेवटच्या शब्दापासून अचूकतेने सुरुवात करीत. महत्त्वाच्या कामासाठी किंवा अभ्यासासाठी आपण जसे दार बंद करून एकांत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तसे करताना मी त्यांना कधीही पाहिले नाही. त्यांच्या लांबसडक, निमुळत्या, मऊसूत, सुंदर बोटांशी खेळायला मला खूप आवडत असे. मला त्यांचे हात खूप लांब वाटत असत. आणि मी जेव्हा जेव्हा त्यांची बोटे माझ्या छोट्याश्या मुठीत घेऊन घेऊन बसे तेव्हा कोणी तरी आवर्जून सांगे, की लांबसडक बोटे ही त्या व्यक्तीच्या कलात्मकतेची आणि सर्जनशीलतेची लक्षणे असतात. अशा वेळी मी त्यांच्याकडे अभिमानाने पाहत असल्याचे मला अजून आठवते.

माझी पहिली आठवण मी प्राथमिक शाळेत असतानाची असेल. एके दिवशी आमच्या घरी खूप सारे लोक मोठेमोठे फुलांचे हार, गुच्छ घेऊन आले आणि बाबांचे अभिनंदन करायला लागले, तेव्हा कळले की ते जिथे शिकवत असत त्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवडले गेले आहेत. खरे तर त्यापूर्वीच ते शहरातील दोन-तीन शिक्षणसंस्थांच्या कार्यकारिणीवर महत्त्वाच्या पदांवर होते. त्या संस्थांच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. सोबतच ते एक विचारवंत, लेखक आणि समीक्षक म्हणून प्रस्थापित झाले होते. मराठी सारस्वतात त्यांच्या नावाचा आदरयुक्त दरारा होता. त्यांच्या अनेक पुस्तकांना प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविले गेले होते. अनेक साहित्य संमेलनांतील परिसंवादात आणि प्रतिष्ठित व्याख्यानमालांमधून त्यांची भाषणे होत असत.

 मराठवाड्यातल्या आणि बाहेरच्या अनेक साहित्य चळवळींना त्यांचा आधार होता. आडबाजूला असलेल्या मराठवाड्यातील अनेक नवीन लेखक आणि कवी यांच्या पुस्तकांना प्रस्तावना देत, प्रकाशक शोधून देण्याचा त्यांचा अविरत प्रयत्न चालू असे. ते एक विद्यार्थिप्रिय शिक्षक होते. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासोबत विद्यार्थ्यांना त्यांच्या अडीअडचणीच्या काळात वैयक्तिक पत वापरून आणि आर्थिक झीज सोसून मदत करीत. या बाबतीत आयुष्यभर ते एखाद्या शाळेतल्या मास्तरासारखेच वागले. आपल्या विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्यासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या. त्यांच्या आधाराने अनेक विद्यार्थी व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक संकटांना धीराने सामोरे जाऊ शकले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वक्तृत्वशैलीत राजकारण, इतिहास, संस्कृती ते शास्त्रीय संगीतापर्यंत अनेक विषयांवर सहजतेने आणि अधिकारवाणीने मांडणी करत, त्यातील मूलभूत विचार आणि नावीन्यपूर्ण विश्लेषणाने श्रोेते भारावून जात असत. खरे तर हे सगळे मला तेव्हा माहीत नव्हते आणि कळत नव्हते. इतके मात्र नक्की लक्षात आले होते की, आपले बाबा इतरांपेक्षा वेगळे आणि महत्त्वाची व्यक्ती आहेत. कधी कधी वाटते की विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर केलेले प्रेम आणि बाबांचा शिकवण्यातला आनंद पाहूनच माझ्या मनावरही प्राध्यापक बनायची मोहिनी पडली असेल का?

दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत बहुतेक वेळा ते एकटेच बरेच दिवस बाहेरगावी जात असत. एकदा ते आईला घेऊन मुंबईला गेल्याचे मला आठवते. मुंबई मराठी साहित्य संघाने आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. त्या वेळी पहिल्यांदा आणि बहुधा एकदाच आमची आई त्यांच्या सोबत व्यासपीठावर बसली होती आणि बाबांचा सत्कार व मोठेपणा यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा योग तिला आला असावा. इतर कोणत्याही कार्यक्रमाला आई-बाबा एकत्र गेल्याचे आठवत नाही. मी आईला सोडून पहिल्यांदाच एकटी, भावंडांसोबत राहिली असल्याने हा प्रसंग माझ्या आठवणीत राहिला.

बाबा लिहीत किंवा वाचत असताना काही तरी अत्यंत महत्त्वाचे कारण असल्याशिवाय त्यात व्यत्यय आणायचा नाही, हा आमच्या घराचा एक सर्वसामान्य नियम होता. आमच्या शंका ते अत्यंत शांतपणे ऐकत असत. त्यावर लगेचच त्यांचे मत सांगत किंवा कधीकधी ‘नंतर आठवण कर मी समजावून सांगीन,’ असे म्हणायचे. पण आमच्या शंका, अडचणी ते नेहमीच सोडवत असत. त्यांच्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल बाबा आमच्यावर कधीही ओरडले किंवा रागावल्याचे मला आठवत नाही. ते घरात असताना त्यांना काही त्रास होणार नाही याची आमची आई कटाक्षाने काळजी घेत असे, म्हणून बाबा रागवण्याचा प्रसंग कधी आला नसावा. आम्ही भावंडे तशी शिस्तीची होतो. मला मात्र त्यांचे लक्ष वेधून घ्यायला आवडत असे. ते माझे आहेत, त्यांच्याशी गप्पा माराव्यात, गोष्टी शेअर कराव्यात असेही वाटे. पण विनाकारण त्यांचा वेळ खाऊ नये अशी कुठेतरी जाणीवही असायचीच! त्यांना शंका विचारणे, अवघड शब्दांचे (साधे शब्दही तेव्हा माझ्यासाठी अवघड होऊन जात) अर्थ विचारणे यासाठी मी बऱ्याच वेळा त्यांच्याकडे जाई. ते नेहमीच लिहीत किंवा वाचत असतात नाही का? त्यात काय वेगळे, असे मला वाटे आणि ते सहसा नाराज करायचे नाहीत- काहीही फुसके प्रश्न विचारले तरीही.

एखादी पाणी भरलेली जड बादली स्वयंपाकघरात उचलून नेऊन देणे किंवा घट्ट बसलेल्या डब्यांची झाकणे कधीमधी उघडून देणे याशिवाय त्यांना घरात काही काम करताना मी कधी पाहिले नाही. पण दोऱ्याच्या रिळाचा झालेला गुंता सोडवायला आम्ही त्यांना देत असू आणि तेही अत्यंत चिकाटीने तो गुंता सोडवून देत असत हे मला आठवते. माझ्या आईला त्यांच्या या चिकाटीने व संयमाने अवघड समस्या सोडवण्याच्या क्षमतेचे फार कौतुक होते. माझ्या भावाला (विश्वासला) सायकल चालवताना झालेल्या एका अपघातात, जेव्हा त्याच्या टाचेवरून बैलगाडी गेली होती; तो प्रसंग त्यांनी अत्यंत ममतेने आणि हळुवारपणे हाताळल्याचे मला आठवते.

मी बाबांना अनाठायी त्रास देणार नाही; याची काळजी घेण्यास माझी सगळ्यांत थोरली बहीण आणि आई अत्यंत दक्ष असत. बैठकीत कोणी बाबांना भेटायला आले असतील, बाबा लिहीत असतील किंवा लेखनिकाला सांगत असतील तर अगदी हळू, शांतपणे प्रवेश करायचा किंवा बैठकीतून न येता मागल्या दाराने घरात यायचे अशी आम्हाला सूचना असे. पण बऱ्याच वेळा ही सूचना पूर्णपणे विसरून मी सर्वांसमोरून धावत-पळत, गोंधळ घालत बैठकीतून घरात येत असे. बैठक ओलांडली की समोर माझी थोरली बहीण ‘‘आता या बेशिस्त मुलीचं काय करायचं?’’ अशा आविर्भावात माझ्याकडे रागाने पाहत असल्याचे दिसायचे.

बाबांच्या चहा, जेवणाच्या वेळा ठरलेल्या असत. ते आपल्या वस्तू / पुस्तक विशिष्ट जागी ठेवत असत आणि त्या तशाच राहाव्यात असा त्यांचा कटाक्ष होता. त्यांना विचारल्याशिवाय त्यांच्या वस्तूंना आणि पुस्तकांना अजिबात हात लावायचा नाही, अशी आमच्या आईची आग्रही सूचना असे. तरीही मी मात्र बऱ्याच वेळा त्यांच्या दाढी करण्याच्या ब्लेडने पेन्सिलींना टोक करून त्या ब्लेड खराब करे, कधीकधी लिहिण्यासाठी त्यांचे फाउंटन पेन वापरत असे. मी वापरल्यानंतर त्या पेनचे वळण कसे बदले आणि बाबांच्या ते कसे लक्षात येई, हे मला नेहमीच कोडे होते. पेन्सिल, पेन पाहिजे तेव्हा मिळतील अशा ठिकाणी ठेवण्याइतकी व्यवस्थित आम्ही मुले नव्हतो. कोणी पाहत नसताना त्यांच्या खोलीत गुपचूप जाऊन पाहिजे ती वस्तू उचलून आणणे खूपच सोयीचे होते. या एकमेव बाबतीत बाबांनी मला रागवल्याचे मला आठवते. इतर सर्व खोड्या ते खपवून घेत असत. अशा प्रसंगी त्यांच्या नजरेचा तीक्ष्ण कटाक्ष आणि आवाजातील तीव्र नाराजी- ‘‘तुला किती वेळा सांगितले की माझ्या वस्तूंना हात लावू नकोस म्हणून? तू वस्तू कधी परत जागच्या जागी ठेवत नाहीस,’’ असे म्हणणे मनाला एकदम अपराधी करून टाके! मग थोडा वेळ तोंड पाडून इकडे तिकडे फिरायचे की आई म्हणायची ‘‘जाऊ दे पुन्हा नको करूस, बस आपण निवांत खेळायला मोकळे!’’ परत काही दिवसांनी, ‘ये रे माझ्या मागल्या’ या उक्तीप्रमाणे. मला वाटे की फक्त पेन, ब्लेड किंवा नेलकटर तर आहे. आपण घेऊ, वापरू आणि परत ठेवून देऊ, त्यांच्या पेनचे वळण खूप छान असे, बाबांना कळणारसुद्धा नाही. पण त्यांना ते लक्षात येत असे आणि परत बोलणी खावी लागत. त्यांची पुस्तके आणि कागदपत्रे विस्कटायची नाहीत याची आम्हाला जाणीव होती. एक मात्र आवर्जून सांगितले पाहिजे की घरातील सर्व पुस्तकांना हात लावायला, वाचायला आम्हाला मोकळीक होती. फक्त अट एवढीच होती की, विचारून घ्यायचे आणि वाचून झाले की त्याच जागी ठेवायचे.

माझे बालपण अक्षरशः पुस्तकांच्या गराड्यात गेले. वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके वाचणे ही एक जणू नैसर्गिक बाब होती. काही गंभीर आणि जाडजूड ग्रंथ, कथासंग्रह, कवितासंग्रह, आणि ललित साहित्य असे सगळे साहित्यप्रकार होते. परीक्षण करण्यासाठी प्रकाशकांनी पाठवलेली पुस्तके, प्रस्तावना लिहिण्यासाठी आलेली लेखकांची हस्तलिखिते, साधना, अनुष्टुभसारखी साप्ताहिके/नियतकालिके, मासिके, या सगळ्यांसोबत आम्हा भावंडांसाठी ‘किशोर’ आणि ‘चांदोबा’ मागवले जात असत. या सगळ्यांत वेगळी दिसणारी मराठीत भाषांतरित केलेली रशियन पुस्तकेही मला आठवतात. याशिवाय मग दिवाळी अंकांची रेलचेल असेच! एके वर्षी सुट्ट्यात मी शरदचंद्र चटर्जी यांच्या सहा-सात कादंबऱ्या वाचून काढल्या होत्या. मला फार काही कळले नव्हते, तरीही त्या नायक- नायिकांची चांगलीच भुरळ पडली होती. या कादंबऱ्यांनी माझी थोरली बहीण श्यामल खूप भारावून गेल्याचे मला आठवते.

बाबांनी आमच्यासाठी साने गुरुजी, राजा मंगळवेढेकरांनी लिहिलेला बिरबल, टारझनचा संच, इसापच्या कथांचे संच मागवले होते. विविध साहित्यप्रकारांत दरवर्षी प्रकाशित होणारी सर्वोत्तम पुस्तके ठरवणाऱ्या शासकीय समितीच्या मंडळावर ते होते. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या घरी पोते भरून नवीन, कोऱ्या पुस्तकांचे गठ्ठे येऊन पडले. त्यांत कविता, कादंबऱ्या, नाटके, वैचारिक, बाल-कुमार साहित्य असे सर्व काही ठासून भरलेले होते. त्या कोऱ्या करकरीत पुस्तकांचा गंध अजून माझ्या मनात दरवळतो. मला आठवते की, आमच्या बैठकीच्या गार फरशीवर लोळत संपूर्ण दुपारभर पुस्तके वाचली होती. जोपर्यंत पुस्तके काळजीपूर्वक हाताळली जातील आणि योग्यरीत्या परत ठेवली जातील, तोपर्यंत कोणालाही ज्यात स्वारस्य वाटेल ते वाचू शकत असे. खरे तर ही एक मोठी पर्वणीच होती. पण त्या वेळी ही एक सामान्य गोष्ट वाटत असे. आम्हां चौघांही भावंडांना वाचायला आवडत असे. आणि मला आठवते की कधीकधी आमच्या प्रत्येकाच्या नाकासमोर कायम, अगदी जेवतानाही पुस्तक पाहून माझ्या आईला फार राग येत असे, ती म्हणायची ‘‘कायम थोबाडापुढे पुस्तक, नाकात घास जायचा... जेवणाकडे लक्ष द्या!’’

कधी कधी सायंकाळी शाळेतून घरी परतताना माझे वडील त्यांच्या महाविद्यालयातून परतीच्या रस्त्यावर चालत घरी जाताना दिसायचे. एका खांद्यावर त्यांची शबनम पिशवी लटकत असे आणि दुसऱ्या हातात एक पुस्तक. ते रस्त्यावर चालत जात असताना पुस्तक वाचत जायचे. माझ्या मैत्रिणींना ते कोणीतरी मोठे ‘गुरुजी’ आहेत हे माहीत होते तरी अशा पद्धतीने रस्त्याने वाचत जाण्याची गम्मत वाटत असे. आणि जणू मला दिसलेच नाहीत असे समजून त्या सगळ्या त्यांच्याकडे बोट दाखवून मला सांगत, ‘‘हे बघ, बघ, तुझे बाबा!’’ पण खरे सांगू का? त्यांना असे जाताना पाहून मला खूप अभिमान वाटत असे. हे असे रस्त्यावरून वाचत जाणे विचित्र आहे असे मला कधीच वाटले नाही.

माझे बालपण अत्यंत आनंदी, सुरक्षित आणि मजेचे होते. सगळे आयुष्य शाळा, पुस्तके, मैत्रिणी, भावंडे यांच्या भोवती फिरत होते. आमच्या प्रत्येक गोष्टीत सहसा माझी आईच निर्णय घेत असे, तरी बाबांचे आमच्यावर लक्ष असायचेच. ते संध्याकाळी घरी पोहोचेपर्यंत आम्ही सर्वांनी घरी असावे अशी त्यांची अपेक्षा असे. आमच्यापैकी कोणीही अंधार पडल्यानंतर जर घरात गेले तर बैठकीत बसलेल्या लोकांसमोर ते बोलले जरी नाहीत तरीही त्याच्या डोळ्यांत एक प्रश्नचिन्ह नक्कीच असे. आमच्या बंगल्याचा अर्धा भाग भाड्याने दिला होता. पण घराभोवती एक मोठी बाग आणि गच्ची असल्याने मैत्रिणी जमा करून खेळत बसणे फारच सोपे होते.

भाग्यनगर हा त्या वेळचा शांत आणि निवांत परिसर होता. जवळजवळ प्रत्येक जण इतर सर्वांना ओळखत होता. आम्ही दररोज संध्याकाळी मित्रमैत्रिणी एकत्र खेळत होतो. त्यामुळे आमची खूप चांगली मैत्री झाली होती. मैत्रिणींच्या घरी पोहोचण्यासाठी आम्ही एकीच्या अंगणातून दुसरीच्या अंगणात जाताना कुंपणाच्या तारा फाकवून सहजपणे ओलांडून जात असू आणि कोणी आम्हाला रागवायचे नाही. गणेशोत्सव आणि शारदोत्सव साजरे करताना सगळ्यांच्या बागांमध्ये आम्हांला मुक्त प्रवेश होता. या दहा दिवसांत पूजेसाठी हार बनवायला कोणाच्याही बागेत जाऊन सुवासिक फुले जमा करायचो. या उत्सवांत सोसायटीच्या लहानथोरांच्या सहभागातून संपूर्ण होणाऱ्या एकांकिका आणि नाच या सांस्कृतिक कार्यक्रमांत मी नेहमीच पुढे असायचे. महिनाभर प्रॅक्टिस चालायची. बाबा आवर्जून माझा कार्यक्रम बघायला येत. दूरदर्शन सुरू होण्याआधीचे दिवस होते. त्या दिवसांत आजूबाजूचे बरेच नागरिक असे सांस्कृतिक कार्यक्रम बघायला जमायचे. मला आठवते की त्यांनी एकदा माझे नाटक रस्त्यावर, शेवटच्या प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये उभे राहून पाहिले होते. मला वाटले की ते आलेच नाहीत. ते कार्यक्रमाला आले होते याची खात्री देण्यासाठी त्यांनी जेव्हा नाटकातील माझे संवाद उद्धृत केले तेव्हा मला झालेला आनंद आठवतो. त्यांना गर्दीत उभे राहावे लागल्याबद्दल मला वाईटही वाटले होते. मी त्यांना म्हणाले होते की जर ते थोडे आधी आले असते तर त्यांना बसण्याची एक छान जागा सापडली असती. पण त्यांच्या मागे असलेल्या अनेक व्यवधानातून वेळ काढून ते कसे आले असतील याची मला अजिबातच जाणीव नव्हती. (मला वाटे, यांची कामे नेहमीच असतात, माझे नाटक तर फक्त गणपतीतच!)

आता आपल्या बहुतेकांच्या घरी पोस्टमन येत नाही. पण त्या काळी आमच्या घरी पोस्टमन रोज येत असे. कधीकधी तरी तर ते गमतीने म्हणत असत की, तुमच्या घरी येऊन गेलो की माझे निम्मे ओझे कमी होते. बाबांना पत्रे खूपच येत असत. पण अगदी अपुरा पत्ता असलेली पत्रेसुद्धा आमच्या घरी पोहोचत. फक्त बाबांचे नाव आणि नांदेड एवढेच लिहिलेली अनेक पत्रे आलेली मी स्वतः पाहिली आहेत. आम्हांला गम्मत वाटत असे, पण अभिमानही होता की सगळे बाबांना ओळखतात. आलेली मासिके उघडून वाचण्याची आम्हां भावंडांत चढाओढ असे, पण पत्र मात्र कोणीही फोडत नसे. इतरांची पत्रे वाचायची नसतात हे वेगळे शिकवावे लागले असे कधी वाटले नाही.

घरचा बाजारहाट करण्याची जबाबदारी आईकडेच होती. बाबांनी त्यात कधी लक्ष घातले नाही. कधीकधी तर त्यांच्या सदऱ्यासाठी कापड आणून शिंप्याकडे आईच नेऊन देत असे. बाबांचे माप त्याच्याकडे सांभाळून ठेवलेले असेच! कपडे शिवून घरी येत. पण दिवाळीचे फटाके आणण्याचे काम त्यांच्याकडे होते. बाबा मला आणि विश्वासला घेऊन फटाके आणायला जात. त्यांना खूप लोक ओळखायचे, दुकानदार वाकून नमस्कार करायचे आणि स्वतः उठून सामान काढून द्यायचे हेही नवलाईचेच वाटायचे. त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला जायचे प्रसंग वर्षातून दोन/तीन वेळाच येत असावेत. महालक्ष्मीचा सण, दसरा, दिवाळी, या सणांना आमच्या आजी-आजोबांना भेटायला आम्ही बाबांसोबत बसने वसमतला जात असू. याशिवाय बाबांबरोबर आमचा एक आइस्क्रीम खाण्याचा वार्षिक कार्यक्रम असे. नांदेड येथील जनता कोल्ड ड्रिंक हाऊसमध्येे जाऊन आम्ही सगळे आम्हाला पाहिजे ते आणि वाटेल तितके आइस्क्रीम बिना रोकटोक खात असू. आइस्क्रीम खाणे झाल्यानंतर कधीकधी सिनेमा पाहायला जात असू. बाबांसोबत मी एकदा गणेश टॉकीजमध्ये ‘लॉरेल अँड हार्डी’, कधीतरी दादा कोंडकेंचा एक सिनेमा, आणि एकदा बाकी सगळी भावंडे दुसरा सिनेमा पाहायला गेले असताना मी आई-बाबांसोबत ‘धर्मात्मा’ पाहिल्याचे आठवते.

आईबाबांनी क्वचितच एकत्र प्रवास केला असेल. बाबा कधीकधी दोन-तीन आठवडे प्रवासात असायचे, त्यांचे कार्यक्रम, व्याख्याने आधीच ठरलेली असायची. बाबांच्या साताऱ्याच्या मित्रांच्या आग्रहाखातर असेल किंवा त्यांनाच आईला घेऊन जावे वाटले असेल, पण एक दुर्मिळ आठवण आईबाबा एकत्र सहलीला गेल्याची आहे. सगळ्यांत लहान असल्याने मलाही न्यायचे ठरले असावे. पंढरपूर, कोल्हापूर, सांगली आणि शेवटी सातारा असा आमचा प्रवास ठरला. पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेतले. सकाळी सकाळी चंद्रभागा नदी पाहिली. पण साताऱ्याला येईपर्यंत मला अचानक चांगलाच ताप चढला. मग आई आणि ज्यांच्या घरी आम्ही गेलो होतो त्या (विश्वास दांडेकर यांच्या पत्नी) दांडेकर काकू, दोघीही जणी माझी शुश्रूषा करण्यात अडकल्या. मग कुठचे फिरणे आणि कुठची मौजमजा! माझ्या शेजारी बसून दांडेकर काकूंनी- त्यांनी केलेले किती तरी बेत मला सांगितले. कोणते किल्ले पाहायचे ठरले होते, कोणती पक्वान्ने खाऊ घालायचे ठरवले होते, ‘‘पण आता तू आजारी पडल्याने ते काही होणार नाही, तू पुढच्या वेळी आलीस ना की आपण हे करू’’, अशी त्यांनी माझी समजूत घातली. त्या माझी समजूत घालत असतील का स्वतःची आणि आईची- असा मला आता प्रश्न पडतो. खैर, ती पुढची वेळ अर्थातच कधी आलीच नाही. तेव्हा मला जाणवले नाही, पण नंतर मोठे होताना समजले की माझ्या आईने या सहलीची किती वाट पहिली असेल, बेत केले असतील. माझ्या अचानक आजारी पडण्याने सगळ्यांचाच हिरमोड झाला. बाबा गेल्यानंतर कधी बोलता बोलता हा विषय निघाला की मला जाम अपराधी वाटायचे. एरवी मी चांगली धडधाकट होते. तेव्हाच नेमके काय झाले देव जाणे!

मघाशी वर्णन केलेले बाबांसोबत प्रवास, पाहिलेले सिनेमे आणि फटाके आणणे या बहुतेक सगळ्या घटना माझी थोरली बहीण श्यामल हिच्या 1979 मध्ये झालेल्या लग्नाआधीच्या होत्या. यानंतर त्यांची व्यवधाने आणि कामे खूपच वाढली, त्यांना वेळ मिळत नसे. श्यामलचे लग्न हे आमच्या घरचे पहिले कार्य आणि माझ्यासाठी एक अत्यंत आनंदाचा समारोह होता. या लग्नानंतर जवळपास एक महिनाभर मी आणि माझ्या तीन-चार मैत्रिणी उरलेल्या बुंदीच्या लाडवांवर ताव मारत होतो. या कार्यक्रमाला आलेले हजारो लोक, त्या सोबत एक मैत्रीपूर्ण व सौहार्दाच्या वातावरणात, हास्यविनोदात रमत, गाण्यांच्या भेंड्या खेळत केलेली सगळी कामे आणि पाहुण्यांना सोयी पुरवण्यासाठी आपल्या घराचे कार्य म्हणून काम करणारा मित्रपरिवार याबद्दल इतर अनेक जणांनी बरेच लिहिले आहे, म्हणून मी परत त्याबद्दल लिहीत नाही. तेव्हा मला प्रत्येक फोटोत मी असायलाच हवे अशी काय हौस होती देव जाणे! पण त्या लग्नात प्रत्येक ग्रुप फोटोत कुठे ना कुठे मी डोकावताना दिसतोच. माझी दुसरी बहीण रेवा, तिच्या 1981 मधील लग्नापर्यंत माझी फोटोची अपूर्वाई खूपच कमी झाली होती. आजकाल सगळ्यांना फोटो काढणे, शेअर करणे इतके नित्याचे झाले आहे, किती तरी मित्रमैत्रिणी त्यांचे वडिलांसोबतचे फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट करतात, भरभरून लिहितात तेव्हा मनाच्या कोपऱ्यात ईर्षा वाटते आणि बाबांसोबत आपला एकटीचाच असा एकही फोटो नाही याचे खूपच वाईट वाटते.

श्यामलच्या लग्नानंतर आम्ही सगळे, अगदी आजी-आजोबा आणि काकांच्या कुटुंबीयांसमवेत कुलाचार करायला आंब्याची आई, टोकाची आई या ग्रामदेवता आणि पोखर्णी येथील आमचे कुलदैवत असलेल्या नृसिंहाच्या मंदिरात गेलो होतो. यातल्या प्रवासाचा काही भाग अगदी बैलगाडीतून केला होता. या सहलीतील प्रत्येक क्षण नि क्षण माझ्यासाठी फारच आनंददायी होता. पहिल्यांदाच मी बाबांना सगळ्यांसोबत खेळताना, हास्यविनोदात रमलेले पाहत होते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे, लवकरच रेवतीचे लग्न झाले आणि त्यानंतर ते वाढत्या जबाबदारीमुळे फारसे आमच्या वाट्याला आले नाहीत आणि त्यानंतर वर्षभरात त्यांचे आकस्मिक निधन झाले नि मग आमचे जगच बदलून गेले.

बाबांचे दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्‌ट्यांचे कार्यक्रम खूप आधीपासून ठरलेले असत. या काळात ते महाराष्ट्रभर व्याख्यान देण्यासाठी फिरत असत. प्रवासात असताना बाबा आम्हांला नियमितपणे पत्र पाठवत असत. आपल्या पत्रात ते पुढच्या मुक्कामाचा पत्ताही देत असत आणि तिथे आम्हीही पत्र पाठवावे अशी त्यांची अपेक्षा असे. जर तीन /चार दिवसांत आमच्याकडून पत्र मिळाले नाही तर त्यांचे आईला जरा रागात किंवा कुरकुरवजा पोस्टकार्ड येई. फोन, इंटरनेटसारख्या सुविधा नसलेल्या आणि रेल्वे, बससहित एकूणच जीवनाचा संथ वेग असलेल्या त्या काळात बाबांची पत्रे हा आमच्या जीवनाचा एक मोठा भावनिक आधार होता. ते मजेशीर पत्र लिहायचे, त्यांची खुशाली कळायची आणि आम्हांला करमणूकही व्हायची.

 वेगवेगळे विषय अगदी मुळातून, तासन्‌तास समजून सांगणे हा त्यांच्या आवडीचा भाग होता. कधीकधी आई काळजीपोटी त्यांना विचारे, ‘‘तुम्ही इतकं का समजून सांगता? ज्या माणसाने प्रश्न विचारला त्याला तरी ही सगळी माहिती समजून घेण्यात रस असतो का?’’ बाबा म्हणत की माझ्या विद्यार्थ्यांनी यातील 10 टक्के जरी समजून घेतले तरी मला आनंद आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी, नवोदित लेखकांसाठी आमच्या घराची दारे कायम उघडी असत. बाबांच्या सगळ्या उपक्रमांमधून त्यांची मराठवाड्यातील समाजाला सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या उभारी देण्याची तळमळ आणि बांधिलकी जाणवत असे. लोक कॉलेजमध्ये, घरी येऊन बोलत असतच, पण बाबांना घरी वेळ नसेल तर कॉलेज ते घर किंवा घर ते कॉलेजला त्यांच्या सोबत चालत चालत आपली कामे, अडचणी शेअर करत जायचे.

बाबा घरी असताना त्यांच्या असण्याचे दडपण किंवा धाक कधीच नसायचा. उलट त्यांच्या भोवती आम्ही सगळे खुशीत असायचो. बाबा लिहीत किंवा वाचत असतील तर तेव्हा आम्ही सगळे आवर्जून शांतता राहील याची काळजी घेत असू. ही शांतता भारावून टाकणारी असे. लेखनिकाला डिक्टेशन देत असताना बाबांचा धीर-गंभीर स्वर वातावरणात भरून जात असे. बाबा लिहीत किंवा वाचत नसतील तर घर चैतन्याने सळसळत असे. त्यांचे लाडके विद्यार्थी, नवलेखक किंवा प्रथितयश साहित्यिक, इतिहासकार, असे वेगवेगळ्या विषयांत रस असलेले लोक बाबांच्या बैठकीत समोर बसलेले असत. त्यांच्यात होणाऱ्या हजरजबाबी आणि मिस्कील चर्चांमधून हास्याचे फवारे उडत असत. या चर्चांमधून बाबा आपले विचार मांडत, त्यांच्या प्रवासातील रंगतदार अनुभव सांगत. आलेले लोक तासन्‌तास बसून राहत. रात्री उशीर व्हायला लागला, तर घरातील सगळ्यांत लहान मुलगी म्हणून मला बैठकीत जाऊन जांभया देणे, कंटाळा आला असे दाखवण्याचे काम, आई किंवा मोठी बहीण देत असे. ते लक्षात येऊन लोक नाइलाजाने उठून जायला लागत.

बाबा आमच्या सर्वांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होते. मी लहानच होते. पण त्या काळातल्या माझ्या आठवणी मनात अत्यंत ताज्या आहेत. कारण बैठकीत बाबांच्या बाजूच्या एका कोपऱ्यात बसून मी एकाग्रतेने सगळ्या चर्चा ऐकत असे. कदाचित आम्हां कुटुंबीयांना आणि मी सगळ्यांत धाकटी म्हणून ते आमच्या वाट्याला न येण्यातून काढलेला, त्यांच्या सहवासात राहण्याचा हा माझा मार्ग असावा. कधी सहज बोललेले काही वाक्य, एखादा विनोद किंवा लाडाने माझ्या टोपण नावाने बोलवून पाणी आणायला सांगणे याचे मला अप्रूप होते. मी एक हुशार मुलगी होतेच, बाबांकडे आलेला एखादा पाहुणा किंवा विद्यार्थ्याने जर माझ्या वाचनाचे कौतुक केले आणि म्हटले, ‘‘ही एक दिवस तुमचं नाव नक्की मोठं करणार आहे,’’ की मी फुशारून जायचे.

 इतिहास असो, विज्ञान असो किंवा राजकारण वा साहित्य- मला शाळेतील वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धेत भाग घ्यायचा असला की बाबांशी अर्धा तास गप्पा मारल्या की झाले... डार्विनच्या उत्क्रांतीपासून ते रशियन राज्यक्रांती, मार्क्स, लेनिन, लोकमान्य टिळक, शिवाजी, बी. रघुनाथ, केशवसुत ते देसाई अथवा खांडेकर कोणताही विषय असला तरी त्यांच्याकडे नेहमीच काहीतरी इंटरेस्टिंग डिटेल्स असायचे, जे नेहमीच्या पुस्तकांत कधी मिळायचे नाहीत. शाळेत मित्रमैत्रिणी माझ्यावर जळत असतील, कदाचित हेवा करत असतील. मला मात्र तयारी करायची, नोट्‌स बनवायच्या आणि मग वेगवेगळ्या शाळांमध्ये स्टेजवर जाऊन आत्मविश्वासात वादविवाद वगैरे करायचे ही अगदी सहज आणि आनंदाची गोष्ट होती.

बाबांचे साहित्यातील योगदान किंवा मराठवाड्यातील नवोदित साहित्यिक, चळवळीतील कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले प्रेरणादायी काम यांबद्दल मी लिहिले पाहिजे असे मला वाटत नाही. इतर लोकांनी याबद्दल विस्ताराने लिहिले आहे. मी ह्या घरगुती आठवणी लिहायचे कारण म्हणजे विचारवंत, विद्वान आणि प्रसिद्ध व्यक्तीबद्दल साधारण एक प्रवाद असतो की ते आपल्या जवळच्या लोकांकडे, कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करून, फक्त अभ्यास, लिखाण, भाषण करून प्रसिद्ध झाले आहेत. अडीअडचणींच्या प्रसंगी कुटुंबीयांना किंवा इतरांना जेव्हा त्यांची अत्यंत आवश्यकता असते; तेव्हा ते मदतीला उपलब्ध नसतात. बाबांच्या बाबतीत अशी परिस्थिती अजिबात नव्हती. ते निश्चितच खूप कामात असत, एक प्राचार्य, एक प्रसिद्ध साहित्यिक, स्थानिक संस्थांच्या कार्यकारिणीवर विविध भूमिका करणारे माझे बाबा माझ्यासारख्या प्राथमिक/माध्यमिक शाळेतल्या मुलींच्या शंका-समाधानासाठी आवर्जून वेळ काढत, कधीही एखादी क्षुल्लक बाब म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले किंवा टाळले असे झाले नाही. ते गेल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांकडून आणि सहकाऱ्यांच्या आठवणीतून समजले की ते त्यांच्या वैयक्तिक अडचणी आणि सुख-दुःखातसुद्धा त्यांच्या सोबत, त्यांच्या मागे ठामपणे उभे असत. इतर कुटुंबीयांप्रमाणे आम्ही रोज गप्पा मारत बसलो, एकत्र जेवलो, किंवा आजकालच्या पालकांप्रमाणे बाबांनी आम्हांला खेळायला नेले, आमच्या सोबत आठवड्याच्या शेवटी सहलीला गेले असे मात्र कधी झाले नाही. खरे तर त्या काळी इतर मुलांचे पालकही असे काही करत असतील असे वाटत नाही. आमचे मित्रमंडळही खूप मोठे होते, त्यामुळे पालकांना मित्रांच्या भूमिकेत शिरण्याची आणि आमच्या करमणुकीची काळजी करण्याचे काही कारण नव्हते. त्यामुळे आम्हांला आमच्या सोबत काही वेगळे घडले असे कधी वाटले नाही. पण जेव्हा एकत्र वेळ मिळायचा तो खरेच मोलाचा वाटायचा.

एकंदरीत आयुष्य आनंदात चालले होते. दोन्ही मोठ्या बहिणी आपापल्या संसारात रुळायला लागल्या होत्या, भाऊ बारावी आणि मी पौगंडावस्थेच्या अर्धवट वयात, नववीत शिकत असताना अचानक ते कोसळले, गेले! ऐन उमेदीच्या काळात, प्रसिद्धीच्या शिखराकडे जात असताना त्यांचा प्रवास अचानक खंडित झाला. त्या दिवशीचे त्यांचे पहाटेच्या गाडीने औरंगाबादला भाषण द्यायला जाणे ही आमच्या घरची एक सर्वसाधारण घटना, आणि संध्याकाळ होता होता कार्यक्रमाच्या व्यासपीठावर त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका काय आला आणि श्रोत्यांमध्ये डॉक्टर असूनही कोणी काही मदत करायच्या आत ते गेले हा आमच्यासाठी फार मोठा धक्का होता आणि जे घडले यावर विश्वास बसत नव्हता. त्यांना दिवसभर ॲसिडिटी वाटत होती म्हणे. बाकी काहीच त्रास किंवा लक्षण नाही, नंतर विचार केला की मला खूप अस्वस्थ वाटायचे की जेव्हा माझ्या बाबांना स्टेजवर हॉर्टअटॅक येत होता, त्यांच्या शेवटच्या क्षणीच्या वेदना होत होत्या तेव्हा मला काहीच संकेत, intuition नाही झाली का? मी जवळपास त्याच वेळी रोजच्यासारखे घरासमोर जोशात बॅडमिंटन खेळत होते. घरी बहिणीच्या मुलीच्या बारशाची तयारी चालू होती.

रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ते आजारी असल्याचे आणि त्यांना नांदेडला परत आणण्याची सोय केल्याचा फोन आला असा निरोप बहुतेक सुधाकर डोईफोडे काकांकडून कुणीतरी सांगितला. आम्ही सारे अस्वस्थ झालो, वाट पाहत राहिलो; पण इतके वाईट काही होईल याची शंकाही आम्हांला आली नव्हती. थोड्या वेळाने आईला प्रश्न पडला की ते खरेच इतके आजारी असतील तर औरंगाबादमधील उत्तम इस्पितळात इलाज करण्याऐवजी नांदेडला का घेऊन येत आहेत? साधारण मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा घराच्या आसपास लोकांची गर्दी व्हायला लागली तेव्हा कुठे लक्षात आले की काहीतरी भयंकर विपरीत झाले आहे. तरी विश्वास बसत नव्हताच! रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयविकाराच्या त्रासाचा कोणताही पूर्वइतिहास नसलेल्या बाबांचा मृत्यू जेमतेम पन्नाशीत पहिल्याच हृदयविकाराच्या धक्क्याने, कोणताही इलाज करण्याची संधी न देता व्हावा यासारखी दुर्दैवी घटना कोणती असेल?

बाबांच्या अंत्ययात्रेचे दृश्य, मला आपल्या कुशीत कवटाळून घेतलेली इंदू मावशी, आजूबाजूला सगळे अश्रूभरलेले डोळे, कोणते डोळे कोणाचे- काय फरक? त्यामागचे चेहरे अगदीच अर्थहीन. माझ्या मनात ही दृश्ये कोरली गेली आहेत. पुढचे काही दिवस एक भ्रमिष्ट, गोंधळलेल्या आणि भान हरपलेल्या मानसिकतेचे, सर्व जाणिवांच्या पलीकडचे होते. पूर्ण विस्कटलेल्या घरात धक्का बसलेल्या, दुःखावेगाने व्याकूळ माणसांच्या गर्दीच्या लाटा डोळ्यांसमोर फक्त मागेपुढे होत राहिल्या... प्रत्येकाला खरे तर आधी आपल्याच दुःखाला सावरता येत नसेल; पण ज्या कुटुंबाच्या डोक्यावर आकाश कोसळले आहे, त्यांचे सांत्वन करणे हा प्रयत्नही ही सगळी मंडळी करत होती. पण सगळेच व्यर्थ! काहीच कुठे पोहोचत नव्हते. पुढचे अनेक दिवस हे असेच चालू होते. रोजचे चहा, खाणे शेजारी-पाजारी, बाबांचे विद्यार्थी आणि सहकारी अनेक दिवस आणून देत होते. मी अत्यंत कृतज्ञतेने याचा उल्लेख करते. कारण आजकालच्या धावपळीच्या शहरी जीवनात इतकी आपुलकी दुर्मिळ होत चालली आहे. या सर्वांनी आमच्या अत्यंत वाईट काळात आमची खूप काळजी घेतली.

बाबांच्या अशा अचानक जाण्याने माझी आई एकदम सुन्न झाली होती आणि मी पारच गोंधळून गेले होते. आईला नेहमीच खंबीरपणे, उत्साहात सगळे घरकाम आणि व्यवहार सांभाळताना पाहिले होते. गाणी गुणगुणत, उत्साहात आणि झपाट्याने घरकाम, बाजारहाट, स्वतःच्या हाताने सगळे बागकाम- अशी जास्तीत जास्त कामे तीच करायची. हेतू हा की बाकी सर्वांना त्यांचे अभ्यास आणि नाद जोपासता यावेत. आई मधल्या एका खोलीत, सांत्वन करण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या गर्दीत नुसती बसून होती, कितीतरी दिवस लोक भेटायला यायचे. कुणी आठवणी सांगत, कुणी बाबांनी त्यांना कशी मदत केली ते सांगत, कुणी आम्ही पोरके झाले म्हणून रडायचे. सगळ्यांनाच हा अनपेक्षित धक्का होता. आई काहीच बोलत नव्हती. दिवसभरात आणि रात्रीही नुसते लांब सुस्कारे! तिला ह्या धक्क्यातून सावरायला बरेच दिवस लागले, खरे तर ती कधीच त्यातून बाहेर आली नाही. रोजच्या कामाला जेव्हा तिने सुरुवात केली तेव्हा ती पूर्णपणे बदलली होती. तिच्या डोळ्यांतील चमक, चालीतली धमक आणि ओठावरली गाणी कायमची हरवली होती. त्या पंधरवड्यात माझा भाऊसुद्धा लक्षात येईल एवढा बदलून गेला. बाबांचे अंत्यविधी करून गोवर्धन घाटावरून परत आलेला माझा भाऊ अचानक मोठा, जबाबदार झालेला दिसायला लागला. आजी रात्री झोपेतही रडत असल्याचे मला आठवते. आजोबा सांत्वनाला येणाऱ्या लोकांना आयुष्यभर वाचलेल्या भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सांगत बसायचे. कदाचित तो त्यांचा आपले दुःख लपवण्याचा मार्ग होता, किंवा स्थितप्रज्ञ बनायचा प्रयास असावा. त्यांचा शब्द न्‌ शब्द मला पोकळ वाटायचा, उसने अवसान म्हणतात ना तसे! असे वाटायचे की या मोठ्या मोठ्या शब्दांऐवजी कोणी फक्त जवळ घ्यावे, हातात हात घेऊन सगळे ठीक होईल म्हणावे! सगळेच मनाने कोलमडून पडले होते वर वर काहीही आव आणला तरी, हेच खरे! पुढच्या दीड वर्षातच माझे आजोबाही गेले. बाबा त्यांचा अभिमान होते; आधार, गौरव सगळेच होते, दाखवायचे नाही म्हटले तरी हे दु:ख पचवू शकले नाहीत ते.

यानंतर सगळे घर झपाट्याने बदलून गेले. भाऊ पुढील शिक्षणासाठी गोव्याला निघून गेला, मी आणि आई दोघीच त्या रिकाम्या, सुनसान घरात राहिलो. माझी आई, जिला घरातले आणि बाहेरचे काम, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची सरबराई करायला दिवस पुरा पडत नसे. तिला हे अचानक आलेले रिकामपण आणि जिम्मेदारीचा ताण... सगळेच किती जड गेले असेल. तेव्हा आई फक्त शेहेचाळीस वर्षांची होती. बाबांनी कधी तिच्या (नवरा बिलकूल वाट्याला न येण्याच्या) तक्रारीची समजूत घालताना त्यांच्या संसारातले मोलाचे दिवस, प्रवास, अभ्यास, भाषण, लिखाण, चर्चा वगैरे गोष्टींसाठी देताना म्हातारपणी ह्या सगळ्यांची पुरेपूर भरपाई करायचे आश्वासन दिले होते. निवृत्तीनंतर असणाऱ्या भरपूर वेळेत सोबत प्रवास करण्याचे ठरवले होते, ती म्हणेल तिथे तिला घेऊन जाण्याचे आणि दोघांनी मिळून शांत-निवांत आयुष्य घालवायचे ठरवले होते. बाबा अनेक वेळा आईला तिच्या मुलांकडे अति लक्ष देण्यावरून, त्यांच्यात गुंतण्यावरून चिडवायचे. ते म्हणत की म्हातारपणी फक्त तेच सोबत असतील, मुले मोठी झाली की जातील पळून! तिला आता आपली फसणूक झाल्यासारखे वाटत होते. मी तिला आपल्या वयाला न शोभणाऱ्या भाषेत; या गोष्टी कशा आपल्या हातात नसतात, आपण खंबीर होऊन आयुष्याला सामोरे जायला पाहिले असे काही लंबे-चौडे उपदेशाचे डोस पाजत होते. मी फारतर 13 वर्षांची असेन, तिला कितीही समजावून सांगण्याचा आव आणला तरी मलाही आपली फसवणूक झाल्यासारखेच वाटत होते, जणू काही ते आम्हांला मुद्दाम सोडून गेले होते. नवीन वास्तवाशी जुळवून घ्यायला बरीच वर्षे जावी लागली.

आपण काय गमावले आहे हे हळूहळू समजायला लागले. संस्थात्मक कार्याचे झालेले नुकसान, बाबांनी समर्थन केलेल्या आणि पाठिंबा दिलेल्या उदारमतवादी पुरोगामी चळवळींची झालेली हानी, व्याकूळ विद्यार्थी आणि पोरके झालेले तरुण लेखक; साहित्य, सांस्कृतिक, वैचारिक जगताची भरून न येऊ शकणारी हानी या सगळ्यांबद्दल इतके लिहिले गेले आहे की याच्या आड आमचे वैयक्तिक दु:ख, न भरून येणारे पोरकेपण दबलेलेच राहिले. कधी कधी वाटायचे की त्यांचे स्नेही, विद्यार्थी त्यांच्याबद्दल भरभरून बोलताना ते स्वत: कसे बाबांचे लाडके होते, आम्हां कुटुंबीयांपेक्षा बाबांच्या सहवासात जास्त होते, त्यांना बाबा जास्त समजत होते हेच चढाओढीने सांगू पाहत असतात. आश्चर्य याचे वाटे की यापैकी कुणालाही आपल्या वैयक्तिक हानीपेक्षा कुटुंबीयांची हानी न भरून येणारी असेल याची जाणीवही नव्हती. एकूण आविर्भाव असा की बाबांवर पहिला हक्क त्यांचाच होता, आम्ही तर आनुषंगिक, योगायोगाने तिथे होतो बस्स!

यानंतरचे रस्ते आणि केलेला प्रवास पूर्णपणे वेगळा आणि डोळे उघडणारा होता. त्या प्रवासात वेळोवेळी जाणवले ते हे की बाबांवर प्रेम करणारे आमच्याशीही आपुलकीनेच वागले, सोबत राहिले. पण काही वेळा अनपेक्षितपणे, कधी वाटले नव्हते तिथून खोटेपणा, मत्सर, कोतेपणाला सामोरे जावे लागले. सुरुवातीला जेव्हा दुःख ताजे ताजे होते, आणि जगरहाटीची कल्पना नव्हती तेव्हा अशा अनुभवांनी ठेच लागल्यासारखे झाले, कडवटपणाही आला. नंतर या सगळ्यांकडे आम्ही दुर्लक्ष करायला शिकलो. पण त्या कसोटीच्या दिवसांत मार्ग काढताना आणि नंतरही मला नेहमीच असे वाटले की बाबांच्या माघारी त्यांच्या आशीर्वादाची अदृश्य ढाल नेहमीच माझी पाठराखण करत आली आहे. मी नांदेड आणि महाराष्ट्रापासून इतक्या दूर, दिल्लीत राहते तरीही कायम सगळ्या चॅलेंजिंग प्रसंगी नेहमीच हा विश्वास वाटला की त्यांनी मनापासून इतक्या लोकांसाठी धडपड केली, त्या सगळ्यांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत, मग आपलेही चांगलेच होईल. हा भोळसटपणाच वाटेल कुणाला, पण मला बळ मिळते खरे! इतक्या लहान वयात बाबांसारख्या पित्याचे छत्र गमावण्यातील वेदना इतकी तीव्र होती की, ती विसरणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे फारच अवघड होते. यातून आम्ही सगळे अंतर्बाह्य बदलून गेलो, अनेक गोष्टी बदलल्या, त्या सोबत आम्ही पुढील आयुष्यात घेतलेले निर्णय वेगळे झाले. पण खरी गोष्ट ही आहे की इतक्या शक्यता असलेला, त्यांच्यासारखा विविध क्षेत्रांत सामर्थ्याने संचार करणारा विचारवंत जेव्हा अचानक कोसळतो तेव्हा त्याच्या बरोबरच त्याच्या आजूबाजूच्या किती तरी शक्यताही कोलमडून पडतात. आमची जी काही वैयक्तिक हानी होती त्यापेक्षा किती तरी मोठी हानी त्या प्रदेशाची झाली, त्या भाषेची, सांस्कृतिक वारश्याची झाली... इतक्या कमी वेळात त्यांनी एवढे प्रभावित केले, ती बौद्धिक झेप, त्यांचे अफाट वाचन, आकलन... किती अर्धवट राहून गेले सगळे. जेव्हा कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार, किंवा सरस्वती सन्मानाने गौरविल्याची बातमी येते तेव्हा वाटते, नियतीने अजून निदान पंधरा-वीस वर्षे दिली असती तर...?

(अनुवाद : विश्वास कुरुंदकर)

(1932 ते 82 असे जेमतेम 50 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या नरहर कुरुंदकर यांनी जेमतेम 25 वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात इतके दर्जेदार वैचारिक लेखन केले आहे की, त्यांच्या हयातीत दोन दशके आणि त्यांच्या मृत्यूनंतरची चार दशके ते महाराष्ट्राच्या वैचारिकतेचा मानबिंदू म्हणूनच ओळखले जातात. त्यांच्यातील लेखक व विचारवंत याविषयी आतापर्यंत अनेक लहान-थोरांनी विपुल लेखन केले आहे. मात्र एक माणूस म्हणून ते कसे होते, हे सांगणारा अप्रतिम असा दीर्घ लेख त्यांची कन्या प्राध्यापक तेजस्विनी देव यांनी अलीकडेच लिहिला आहे. कुरुंदकर यांचा 40 वा स्मृतिदिवस येत्या 10 फेब्रुवारीला येत आहे. त्या निमित्ताने, मुळात अहमदपूर येथील अक्षरवाङ्‌मय या मराठी त्रैमासिकाने हा लेख त्यांना लिहायला सांगितला आणि त्यांच्या ताज्या अंकात घेतला आहे. अर्थात, त्यांनी तो इंग्रजीत लिहिला आणि त्याचा उत्तम मराठी अनुवाद त्यांचे बंधू विश्वास यांनी केला आहे. विषयाचे महत्त्व आणि कुरुंदकर व साधना यांचे नाते लक्षात घेऊन, तो मराठी लेख साधना साप्ताहिकातही प्रसिद्ध करीत आहोत. आणि मूळ इंग्रजी लेख www.kartavyasadhana.in या डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. SHIVAJI PITALEWAD- 10 Feb 2022

    खूपच वाईट आणी वेदना देणारा अनुभव

    save

  1. SHIVAJI PITALEWAD- 10 Feb 2022

    खूपच वाईट आणी वेदना देणारा अनुभव

    save

  1. Snehal Kulkarni- 15 Jul 2023

    खूप सुंदर आणि समृद्ध करणारा लेख. भाषांतर पण अगदी साजेसे.

    save

  1. Vandana Karambelkar- 17 Jun 2024

    लेख वाचताना काल,परवाच सर गेले. असं वाटत राहिलं.सतत डोळे भरून, घसा दाटून येत राहिला.पण ते त्यांच्या अक्षर साहित्य रुपात कायम आपल्या बरोबर आहेत, याचं समाधान आहे.

    save

  1. subhash Athale- 25 Aug 2024

    तेजस्विनी देव यांनी उत्तम लेख लिहून आपला अनुभव,भावना, आणि कुरुंदकरांचे व्यक्तिमत्व वाचकांपर्यंत पोचवले आहे. पण त्यांनी इंग्रजीत मूळ लेख लिहावा याचे आश्चर्य वाटले, खेद ही वाटला.

    save



साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके