डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पदार्थ विज्ञानाचे नोबेल मिळालेली अँड्रिया गेझ

ग्रॅव्हिटी इंटरफेरोमीटर आणि चार शक्तिशाली दुर्बिणी वापरून बनवलेल्या 130 मीटर व्यासाच्या आभासी दुर्बिणीद्वारे केलेल्या निरीक्षणांमध्ये प्रकाशाच्या गतीच्या 30 टक्के गतीने जाणारे वायुगोळे सापडले, तेव्हा अत्युच्च ऊर्जा अवस्थेतील इलेक्ट्रॉन्सचा उद्रेक दिसून आला. हे प्रायोगिक निरीक्षण कृष्णविवरांच्या सिद्धांतावरून केलेल्या भाकिताशी जुळणारे होते. ऑक्टोबर 2018 मध्ये सॅजिटारीस ए. हे कृष्णविवर आहे असे जाहीर करणारा शोधनिबंध प्रकाशित झाला. या संशोधनासाठी अँड्रिया गेझ, राईनहार्ड गेन्झल आणि ‘कृष्णविवर आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे भाकीत आहे’ हे सांगणाऱ्या संशोधनासाठी रॉजर पेनरोज (Roger Penrose) यांना सन 2020 चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला.

महिला वैज्ञानिकांच्या इतिहासात 2020 हे वर्ष सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. सन 2020 या वर्षाचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले आणि काय आश्चर्य? या यादीत चक्क चार महिलांनी स्थान पटकावले आणि त्यातही तीन महिला विज्ञान शाखेमधील. विश्वाचे रहस्य शोधण्याच्या ध्यासाने झपाटलेली आणि आपली आकाशगंगा ‘मंदाकिनी’च्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराचा वेध घेणारी वैज्ञानिक म्हणजेच सन 2020 ची पदार्थविज्ञान शास्त्रातील नोबेल विजेती अँड्रिया गेझ, पदार्थविज्ञान शाखेत हा पुरस्कार मिळवणारी केवळ चौथी महिला. (पेरोज व गेन्झल यांच्यासह तिला हा पुरस्कार मिळाला आहे.)

अँड्रियाचा जन्म 16 जून 1965 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला. सुसान आणि गिल्बर्ट गेझ या दांपत्याची ही सुकन्या. ती लहान असतानाच गेझ परिवार शिकागो येथे स्थलांतरित झाला आणि तिचे बालपण शिकागोत गेले. चंद्रावर स्वारी करणाऱ्या अमेरिकेच्या ‘अपोलो’ या कार्यक्रमाने तिच्या बालमनावर भुरळ घातली आणि तिने अंतराळवीर होण्याचे ठरवले. तिच्या आईनेही तिच्या या स्वप्नाला पाठबळ दिले. पदवीच्या अभ्यासासाठी तिने प्रथम गणित या विषयाची निवड केली, पण पुन्हा बदलून पदार्थविज्ञान हा विषय घेतला. 1987 मध्ये ‘मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ मधून तिने भौतिकशास्त्राची पदवी घेतली. 1992 मध्ये ‘कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ मधून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. डॉ. गेरी नौगेबाऊर (Dr. Gerry Neugebauer) हे तिचे मार्गदर्शक होते. अँड्रियाचे संशोधन समजून घेण्यापूर्वी खगोलशास्त्र विषयाच्या संशोधन इतिहासाचा थोडक्यात आढावा घेऊ.

माणूस आणि त्याची जिज्ञासा यांचा जन्म एकदमच झाला. जन्मापासूनच भोवतालच्या परिसराविषयी, निसर्गाच्या करामतींविषयी त्याला कुतूहल वाटू लागले. निरीक्षणांतून, अनुभवांतून तो स्वतःचे काही अंदाज बांधू लागला. जसजशा त्याच्या संवेदना विकसित होत गेल्या, तसे ग्रह-ताऱ्यांचे त्यांला आकर्षण वाटू लागले. सूर्यासारखे आणखी तारे, ग्रहमाला या ब्रह्मांडात अस्तित्वात आहेत का? सूर्याला एवढी ऊर्जा कुठून प्राप्त होते? सूर्याचा जन्म कसा झाला? मुळात या विश्वाचाच जन्म का व कसा झाला? असे अनेक प्रश्न त्याला पडू लागले. ग्रह-ताऱ्यांच्या स्थानात होणाऱ्या नियमित बदलांविषयी त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा त्याने आपल्या परीने प्रयत्न केला आणि त्यातून काही अद्‌भुत कथांनाही जन्म घातला. जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते, तेव्हा अवकाशातील ग्रह-ताऱ्यांच्या बदलत्या स्थानांचे निरीक्षण करून, त्याला गणिताची जोड देऊन माणसाने अनेक गूढ रहस्ये उकलली आणि विश्वाविषयीच्या त्याच्या ज्ञानात भर पडत गेली. पुढे दुर्बिणीचा जन्म झाला आणि जणू त्याच्या ज्ञानाकांक्षेला पंख फुटले. आपला सूर्य हा एक सामान्य तारा असून, त्याच्या हजारपट तेजस्वी तारे अस्तित्वात आहेत, हे त्याला समजले. ताऱ्यांनासुद्धा जीवन-मृत्यू असतो. ताऱ्यांच्या जीवनचक्राचा मानवाने सखोल अभ्यास केला. ग्रह-तारे याबरोबरच धूमकेतू, न्यूट्रॉन स्टार अशा अनेक अद्भुत विभूती या विश्वात वास करून आहेत, हे त्याने प्रत्यक्ष पाहिले. विश्वाचे रहस्य शोधण्याचा त्याचा प्रयत्न हजारों वर्षांपासून अव्याहतपणे चालू आहे आणि तो पुढेही असाच चालू राहील. निरीक्षणातील सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर काही कोड्यांची उकलही झाली. पण या विश्वाची रचना व कार्य इतकं चमत्कारिक आहे की, एक कोडे सुटले की दुसरे कोडे तयार होते, नव्हे पहिले कोडे दुसऱ्या कोड्यास जन्म देते.    
 
‘मंदाकिनी’च्या केंद्राचा वेध पूर्वीपासूनच माणूस घेत आला आहे. 1775 मध्ये प्रसिद्ध तत्त्वज्ञ इमॅन्युएल कान्ट याने मंदाकिनीच्या केंद्रस्थानी अतिभव्य तारा असल्याचे प्रतिपादन केले होते आणि तो व्याध तारा (Sirius star) असल्याची शक्यता व्यक्त केली होती. 1918 मध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ हर्लोव शापले (Harlow Shapley) यांनी केंद्रस्थानी काही ताऱ्यांचे गोलाकार समूह असल्याचे सांगितले, पण वायूंच्या ढगांमुळे त्यांचे निरीक्षण करता येत नव्हते. 40 च्या दशकाच्या सुरुवातीला प्रसिद्ध शास्त्रज्ञ वॉल्टर बाडे (Walter Baade) यांनी 100 इंच दुर्बीण वापरून या केंद्राचे निरीक्षण केले असता, पृथ्वीशी एक अंश कोन करणारे विवर आढळले ज्यातून आत डोकावले असता ताऱ्यांचा मोठा गट केंद्राभोवती परिभ्रमण करताना आढळला. 1931 मध्ये कार्ल जान्स्की (Karl Jansky) यांना दीर्घिकेच्या केंद्रातून धनु तारकापुंजच्या दिशेने रेडिओ लहरी उत्सर्जित करणारा स्रोत आढळला. हा रेडिओ स्त्रोत म्हणजे सॅजिटारीस ए. (Sagittarius A.). 1958 मध्ये इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने सॅजिटारीस ए.चे स्थान दीर्घिकेचे केंद्रस्थान म्हणून निश्चित केले. नंतरच्या निरीक्षणातून असे आढळले की, हा स्रोत एकमेकांना जवळजवळ किंवा चिकटून असलेल्या अनेक घटकांचा बनला आहे. प्रसिद्ध खगोलवैज्ञानिक ब्रुस बलीक (Bruce balick) आणि रॉबर्ट ब्राऊन (Robert Brown) यांनी अतिशय तेजस्वी आणि आकाराने लहान असा घटक शोधला आणि त्याला सॅजिटारीस ए. असे नाव दिले. हा शोध शास्त्रज्ञांना उत्तेजित करणारा होता आणि शास्त्रानुसार उत्तेजित पातळीवर असलेल्या अणूला स्टारने दर्शवतात म्हणून हा सॅजिटारीस ए*. 1974 मध्ये सर मार्टिन रीस (Sir Martin Rees) यांनी दीर्घिकेच्या केंद्रस्थानी अतिविशाल कृष्णविवर असण्याची शक्यता व्यक्त केली. 

कृष्णविवराचे वस्तुमान अतिभव्य असल्याने त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी तीव्र असते की, त्यातून प्रकाशकिरणसुद्धा सुटत नाहीत. कृष्णविवराची कल्पना प्रथम जॉन मिशेल (John Michell) यांनी अठराव्या शतकात मांडली. अतिविशाल आणि अतिजड असे महाकाय तारे (सूर्याच्या जवळजवळ तिप्पट किंवा जास्त वस्तुमान असलेले तारे) त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामुळे संकुचन पावतात. त्यांचा आकार लहान होऊन घनता वाढत जाते आणि शेवटी अंतःस्फोट होतो. शून्य आकार आणि घनता इतकी प्रचंड असते की, त्याच्या गुरुत्वाकर्षणातून प्रकाशकिरण निसटू शकत नाहीत. कृष्णविवराची घनता अनंत असते, म्हणून त्यांना आकारमान नसते. पण आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतामधील समीकरण सोडवून श्वाट्‌र्झचिल्डने (Schwarzschild) कृष्णविवराच्या आकाराची व्याप्ती सांगितली, त्यास श्वाट्‌र्झचिल्ड त्रिज्या म्हणतात. पृथ्वीचे वस्तुमान जर एका साखरेच्या दाण्याएवढ्या आकारात एकवटले तर कृष्णविवर तयार होईल. म्हणजे पृथ्वीची श्वाट्‌र्झचिल्ड त्रिज्या साखरेच्या एका दाण्याएवढी आहे. 

तर 1995 पासून अँड्रिया गेझ ‘मंदाकिनी’च्या केंद्राचा अभ्यास करत आहे. उच्च विलगीकरण क्षमता असलेली दुर्बीण व इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कॉपी वापरून सॅजिटारीस ए*.च्या सभोवती असलेल्या ताऱ्यांचा तिने अभ्यास केला. हवाई येथील केक ऑब्जर्वेटरीद्वारे अतिशय सूक्ष्म निरीक्षण केले. अतिशय उच्च विलगीकरण क्षमता असलेली जगातील सर्वात मोठी दुर्बीण वापरून जवळजवळ पंधरा वर्षे अँड्रिया आणि तिच्या सहकाऱ्यांनी दीर्घिकेच्या केंद्रस्थानाविषयी निरीक्षणे नोंदवली. एखादे चित्र पाहताना त्याच्या जितके जवळ जाऊन पाहू, तसे त्या चित्रातील बारकावे समजतात; अगदी त्याचप्रमाणे मोठी दुर्बिण असेल तर, विलगीकरण क्षमता जास्त आणि मिळणारी प्रतिमाही सुस्पष्ट असते. अवकाशीय पोकळीत धूलिकण पसरलेले असल्याने दृश्य, अतिनील किंवा क्ष-किरण वापरून अवकाशीय वस्तूंचा अभ्यास करणे शक्य नसते. या अभ्यासासाठी अवरक्त किरणांचा वापर करतात. दीर्घिकेतून उत्सर्जित होणारा प्रचंड ऊर्जेचा झोत, त्याचे गतिमापन असे दर्शवते की, तेथे नक्कीच अतिशय प्रभावशाली असे काहीतरी असले पाहिजे, ज्यातून इतकी प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. तसेच केंद्रातून येणारी प्रारणे इतर सामान्य ताऱ्यांमधून बाहेर पडणाऱ्या प्रारणांपेक्षा वेगळी होती.

अँड्रिया म्हणते, ‘दुर्बिणीतून अवकाशीय वस्तूंचा अभ्यास करणे म्हणजे वाहत्या पाण्याच्या तळाशी असलेल्या दगडांचा अभ्यास करण्यासारखे होते, त्याचे कारण आपले वातावरण. जीवसृष्टीसाठी अत्यावश्यक असलेले वातावरण खगोल वैज्ञानिकांसाठी मात्र खूप मोठा अडथळा असतो.’ या वातावरणाचा परिणाम म्हणून मिळणाऱ्या प्रतिमा अस्पष्ट असतात. केक ऑब्जर्वेटरी समुद्रसपाटीपासून 14 हजार फूट उंचीवर आहे. अँड्रिया नेहमी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याबाबत आग्रही असे. अँड्रियाला नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतर केक ऑब्जर्वेटरीचे संचालक हिल्टन लुईस (Hilton Lewis)  यांनी अँड्रीयाविषयीची एक आठवण सांगितली आहे, ‘पंचवीस वर्षांपूर्वी एक अगदी नवागत खगोलतज्ज्ञ माझ्या कक्षात आली आणि तिने विनंतीवजा आदेश दिला की मंदाकिनीच्या केंद्रस्थानाचा अभ्यास करण्यासाठी आम्ही विकसित केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये बदल केला पाहिजे.’ खरं तर हे सॉफ्टवेअर अतिशय परिश्रमपूर्वक विकसित केले होते आणि त्याचे संपूर्ण परीक्षणही झाले होते आणि आता या नवख्या तरुणीचे म्हणणे होते की, त्यात बदल करून मूलतः ज्या कामासाठी त्याची रचना केलेली नाही त्या कामासाठी तयार करावे. सहाजिकच हिल्टन यांची पहिली तीव्र प्रतिक्रिया होती ‘कदापि शक्य नाही.’ अँड्रियाला दुर्बिणीने घेतलेल्या प्रतिमांचे जलद वाचन करून त्या योग्य पद्धतीने जुळवणाऱ्या, (ज्यामुळे वातावरणाचा परिणाम कमी होईल, अशा) सॉफ्टवेअरची गरज होती. अर्थातच तिला नकार देता आला नाही. अँड्रिया तिच्या यशाचे श्रेय खगोलतज्ज्ञ आणि अभियंते यांच्यातील योग्य समन्वयाला देते. अभियंत्यांनी खगोलतज्ज्ञांच्या मागणीला प्रतिसाद देत त्यांच्या गरजेनुसार तंत्रज्ञान विकसित करण्याचे आव्हान समर्थपणे पेलले. लेसर तंत्रज्ञानाच्या साह्याने वातावरणाचा परिणाम वजा करून सुस्पष्ट प्रतिमा मिळवणे आता शक्य आहे.

2002 मध्ये ‘मंदाकिनी’च्या केंद्रकाच्या प्रतिमांमध्ये पृथ्वीच्या तिप्पट वस्तुमान असलेला प्रचंड वायूगोळ्याचे (जी-2) सॅजिटारीस ए*.च्या प्रभावक्षेत्रात एक्रिशन झोनमध्ये रूपांतर होताना आढळले. सापेक्षता सिद्धांतानुसार हे विश्व म्हणजे अवकाश-काळ यांची गुंफण असलेली अवाढव्य जाळी असून तारे या जाळीवर वसलेले असतात. तारे जाळीवर ज्या ठिकाणी वसलेले असतात, त्या ठिकाणी जाळीला वक्रता प्राप्त होते. एका ताणलेल्या चौकोनी कापडावर चेंडू टाकला असता चेंडूच्या ओझ्यामुळे कापड खाली दबले जाते अगदी त्याचप्रमाणे अवकाश-काळ वस्त्राला वक्रता येते तारा जेवढा मोठा तेवढी वक्रता जास्त. कृष्णविवर म्हणजे तर तळ नसलेली विहीरच. या विहिरीपासून दूर असलेल्या वस्तूंवर त्याचा फारसा प्रभाव जाणवत नाही. पण या विहिरीच्या प्रभावक्षेत्रात सापडलेली वस्तू मात्र या विहिरीत ढकलली जाते आणि पुन्हा तिचा थांगपत्ता लागत नाही. पण जर ताऱ्याभोवती असलेले वायू आवरण या विहिरीच्या प्रभावक्षेत्रात आले तर, ते थेट विहिरीत न पडता अतिशय जलद गतीने सर्पिल मार्गाने ओढले जाऊन त्याचे तापमान वाढत जाते व या विहिरीभोवतीअतिशय तेजस्वी तबकडी तयार होते, हीच ती एक्रिशन डिस्क. या वायू गोळ्याच्या कक्षेवरून असे अनुमान निघत होते की जी-2 सन 2014 मध्ये कृष्णविवराच्या सर्वाधिक जवळ जाईल. 2009 पासून त्याचे विदारण होताना दिसू लागले व शास्त्रज्ञांनी 2014 पर्यंत जी-2 संपूर्णपणे लयाला जाईल, असे भाकीत केले. अँड्रियाने मात्र जी-2 हा तप्त वायूगोळा नसून तो एक तारा आहे, असे प्रतिपादन केले. तप्त वायूगोळा की तारा, यावरून शास्त्रज्ञांमध्ये मतभेद होते. 2014 ला जेव्हा जी-2 केंद्राच्या सर्वाधिक जवळ जाईल तेव्हाच या वादविवादाचा निकाल लागेल, असे शास्त्रज्ञांना वाटत होते. जर तो वायू गोळा असेल तर तो नामशेष होईल, पण जर तो तारा असेल तर, तो सर्वाधिक जवळ असूनही त्याचे अस्तित्व टिकून राहील. तज्ञांचे अनेक गट ही चित्तथरारक घटना ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी सज्ज होते. काही तरी अद्‌भुत घडेल आणि खूप मोठे माहितीचे घबाड हाती येईल, अशी आस लावून ते बसले होते, पण काहीच घडले नाही. शास्त्रज्ञांनी याचे वर्णन ‘न फुटलेले फटाके’ असे केले आहे. ज्याअर्थी जी-2 हा पूर्ण सुरक्षित राहिला त्याअर्थी तो तारा असला पाहिजे असा निष्कर्ष सांगणारा शोधनिबंध अँड्रियाचा चमू युसीएलए ने मार्च 2014 मध्ये प्रकाशित केला. 

पंधरा वर्षांच्या निरीक्षणानंतर सॅजिटारीस ए*.चे वस्तुमान व त्रिज्या यांची किंमत काढली. वस्तुमान सूर्याच्या चाळीस लाखपट तर, आकारमान फक्त 4 कोटी 40 लाख किमी (सूर्यापासून पृथ्वीचे अंतर 15 कोटी किमी आहे). पृथ्वीपासून सॅजिटारीस एचे अंतर 2600 प्रकाशवर्ष इतके आहे. अँड्रिया आणि तिच्या चमूने या अभ्यासासाठी केंद्राभोवती फिरणाऱ्या ताऱ्यांच्या कक्षांचा अभ्यास केला. अँड्रियाने निरीक्षणासाठी एसओ 2 या ताऱ्याची निवड केली. हा तारा केंद्राभोवती फक्त सोळा वर्षांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. आता प्रश्न असा होता की, दीर्घिकेच्या केंद्रस्थानी असलेली ही अतिशय गहन, तेजस्वी वस्तू सॅजिटारीस ए*. कृष्णविवरच आहे का? हा एक अतिशय तेजपुंज तारा ही असू शकतो. इतरही अनेक पर्याय आहेत. पण राईनहार्ड गेन्झल (Reinhard Genzel) यांनी मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूटमधून घेतलेली निरीक्षणे आणि अँड्रियाच्या गटाने नोंदवलेली निरीक्षणे इतर शक्यता फेटाळून लावतात. अँड्रियाच्या मते सध्याची निरीक्षणे हे कृष्णविवर आहे, यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात.

ताऱ्यांच्या उत्क्रांती सिद्धांतानुसार दीर्घिकेच्या केंद्रासभोवती वयांनी ज्येष्ठ अथवा म्हातारे तारे असले पाहिजेत आणि तरुण तारे अथवा नुकतेच जन्माला आलेले बाल्यावस्थेतील तारे तेथे आढळणार नाहीत. कारण प्रचंड वस्तुमान व घनता असलेल्या केंद्रकासभोवती नवीन ताऱ्यांचा जन्म किंवा वाढीसाठी पोषक वातावरण नसते. ताऱ्याचा जन्म होण्यासाठी मोठा वायूगोळा निर्माण होण्याची आवश्यकता असते. हा नवनिर्मित वायूगोळा नाजूक प्रकृतीमुळे केंद्राच्या तीव्र गुरुत्वाकर्षणापुढे टिकू शकत नाही व तारा जन्म घेण्यापूर्वी केंद्र त्याला गिळून टाकेल. पण प्रायोगिक निरीक्षणे याच्या विरुद्ध होती. प्रत्यक्षात मात्र तरुण तारे विपुल प्रमाणात आढळले तर, ज्येष्ठ ताऱ्यांची वानवा होती. अँड्रिया गमतीने म्हणते, ‘प्रायोगिक निरीक्षणे सिद्धांताशी न जुळणे म्हणजे खगोलशास्त्रज्ञासाठी नोकरीची हमी.’ या विरोधाभासाचे स्पष्टीकरण अँड्रियाने देण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या मते, आता आपल्या निरीक्षणास आलेल्या ताऱ्यांची सुरुवात दुहेरी ताऱ्यांपासून पासून झाली. दुहेरी तारे कृष्णविवराच्या सान्निध्यात आल्यानंतर कृष्णविवराच्या प्रभावामुळे त्यांचे एकत्रीकरण होते व दोन ताऱ्यांचा मिळून एकच तारा बनतो. या मिलनावेळी काळ जणू पुन्हा नव्याने सुरू होतो आणि या नव्या तार्याचा नव्याने जन्म होतो. गुरुत्वीय लहरींचा शोधही या दुहेरी ताऱ्यांच्या संकल्पनेला पुष्टी देतो. या सिद्धांतानुसार ज्येष्ठ तारे संख्येने जास्त असायला हवेत पण, प्रत्यक्षात तसे दिसत नाही. याचे स्पष्टीकरणही अँड्रियाने दिले आहे. तिच्या मतानुसार या ज्येष्ठ ताऱ्यांच्या सभोवती हलकेसे आवरण असले पाहिजे. दुहेरी तारे एकमेकांत विलीन होताना हे आवरण ओढून घेत असावेत, परिणामी हे तारे मंद भासतात. ज्येष्ठ ताऱ्यांचा अभाव प्रत्यक्षात या दुहेरी ताऱ्यांच्या प्रक्रियेचा परिणाम आहे. ग्रॅव्हिटी इंटरफेरोमीटर आणि चार शक्तिशाली दुर्बिणी वापरून बनवलेल्या 130 मीटर व्यासाच्या आभासी दुर्बिणीद्वारे केलेल्या निरीक्षणांमध्ये प्रकाशाच्या गतीच्या 30 टक्के गतीने जाणारे वायुगोळे सापडले, तेव्हा अत्युच्च ऊर्जा अवस्थेतील इलेक्ट्रॉन्सचा उद्रेक दिसून आला. हे प्रायोगिक निरीक्षण कृष्णविवरांच्या सिद्धांतावरून केलेल्या भाकिताशी जुळणारे होते. ऑक्टोबर 2018 मध्ये सॅजिटारीस ए*.हे कृष्णविवर आहे असे जाहीर करणारा शोधनिबंध प्रकाशित झाला. या संशोधनासाठी अँड्रिया गेझ, राईनहार्ड गेन्झल आणि ‘कृष्णविवर आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे भाकीत आहे’ हे सांगणाऱ्या संशोधनासाठी रॉजर पेनरोज (Roger Penrose) यांना सन 2020 चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. 

अँड्रियाचे संशोधन पुढे चालू आहे. अजूनही अनेक रहस्ये शोधायची आहेत. तिच्या मते आता उपलब्ध असलेली निरीक्षणे निश्चित अनुमान काढण्यासाठी अपुरी आहेत. कारण सध्या आपण फक्त अतिशय तेजस्वी ताऱ्यांचा अभ्यास करतो. तारकासमूह पूर्णपणे समजण्यासाठी सूर्यासारख्या सामान्य ताऱ्यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. या ताऱ्यांची प्रखरता कमी वस्तुमानामुळे जड ताऱ्यांच्या तुलनेत क्षीण असते. यासाठी तंत्रज्ञान आणखी सुधारणे आवश्यक आहे. अँड्रिया आपल्या व्याख्यानातून अतिशय साध्या-सोप्या, रसाळ भाषेत आपल्या प्रयोगांची माहिती देते. तिचे व्याख्यान ऐकणे ही खगोलप्रेमींसाठी मेजवानी असते.

Tags: अँड्रिया गेझ कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डॉ. गेरी नौगेबाऊर गिल्बर्ट गेझ मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Sudhir Phakatkar- 07 Jan 2021

    Great article......

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके