डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तेंडुलकरच्या नावाची ट्रॉफी अनेक पाकिस्तानी खेळाडूंनाही पसंत पडेल असे मला वाटते, कारण त्यांचे चाहते आणि खेळाडूही तेंडुलकरचा आदर करतात आणि त्याचा खेळ गौरवतात. 1999 च्या वर्ल्ड कपनंतर बकिंगहॅम पॅलेसमध्ये आमंत्रित स्वागत समारंभातील हकीगत राजसिंग डुंगरपूर यांनी मला सांगितली होती, त्या समारंभात तरुण पाकिस्तानी खेळाडूंना फक्त सचिनचे आकर्षण होते. त्याची उपस्थिती, त्याचा स्पर्श आणि त्याच्याबरोबर घेतलेले फोटोग्राफ्स त्यांना मोहरून टाकत होते. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या सदस्यांनाही हे माहीत आहे की, सचिन त्याच्याबरोबरच्या खेळाडूंइतकाच किंवा त्यांच्यापेक्षाही निष्णात असला तरी वैयक्तिक वर्तनाबद्दलही वादातीत आहे. मला वाटते तेंडुलकर ट्रॉफीचा हा पर्याय सर्वांनीच भारदस्तपणे स्वीकारणे योग्य ठरेल. त्यासाठीची घोषणा लवकरच व्हावी अशी अपेक्षा आहे.

भारत पाकिस्तानची एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका प्रेक्षकांच्या उत्साही प्रतिसादासह (आणि कोणताही वाद अगर दुर्घटना न होता) नुकतीच संपली. नोव्हेंबर 2008 मधील मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर झालेले हे पहिलेच भारत-पाकिस्तान सामने. या सामन्यांनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन झाका अश्रफ यांनी असे सुचवले की, ‘या दोन देशांध्ये असेच सामने वरचेवर नियमितपणे होत राहावेत- ‘जीना- गांधी’ ट्रॉफीसाठी- असे म्हणू हवे तर!’ हे वृत्त वाचून काही दशकांपूर्वी ‘डॉन’ वृत्तपत्रामध्ये अशाच प्रकारचा मजकूर वाचल्याचे आठवले. मी माझी जुनी टिपणे चाळली आणि मला खालील हकीगत सापडली.

1955 मध्ये विनू मंकडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानमध्ये गेला होता. त्या वेळी फाळणी होऊन सात वर्षे उलटलेली होती. फाळणीच्या जखमा सुकत चालल्या होत्या. कराचीमधील एका वृत्तपत्रात तेथील एका हिंदूने लिहिले, ‘भारतीय संघाचे पाकिस्तानमध्ये झालेले स्वागत भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध सुधारत चालल्याचे चिन्ह आहे. ही गोष्ट चांगली आहे; दोनही राष्ट्रांना उपकारक अशीच आहे.’ या बदलत्या मनोवृत्तीचे प्रतीक म्हणून की काय, लाहोरचा कसोटी सामना पाहण्यासाठी 10,000 भारतीय प्रेक्षक वाघा सरहद्द ओलांडून पाकिस्तानात आले होते. त्यांत 1947 साली पश्चिम पंजाबमधून भारतामध्ये निराश्रित होऊन आलेले शीख आणि हिंदू यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.

दुर्दैवाने ते क्रिकेट सामने तसे कंटाळवाणेच झाले. दोनही संघांच्या लढतींचा शेवट पाच रूक्ष ‘ड्रॉ’मध्ये झाला. तरीसुद्धा सरहद्दीच्या दोनही बाजूंना असणाऱ्या क्रिकेटप्रेींना भारतपाकिस्तान संघांधील सामने नियमितपणे चालू राहावेत याबद्दल प्रचंड कळकळ होती. स्वत:वर कायम खूष असलेले ऐटबाज भारतीय क्रिकेट कॉमेंटेटर ‘विझी’ यांनी भारत व पाकिस्तान यांना स्वत:चे ‘अँशेस’ म्हणजे दोनही देशांधील माती एकत्र करून बनविलेली ट्रॉफी बनविण्याची सूचना मांडली. शेख खान बहादूर या क्रिकेटप्रेी प्रेक्षकाची सूचना याहीपेक्षा मूलगामी म्हणावी अशी होती. ‘डॉन’मध्ये लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, या दोनही संघांनी ‘गांधी-जीना’ ट्रॉफीसाठी खेळावे. ढालीच्या आकाराच्या या ट्रॉफीवर ह्या दोन थोर मुत्सद्‌द्यांच्या तैलचित्रांचे किंवा परस्परांबरोबरच्या त्यांच्या खास लकबीतील छायाचित्रांचे मुद्रण असावे.

या शेख खान बहादुरांचे पत्र आणि त्यामागील संघर्ष यांचा उल्लेख मी माझ्या ‘ए कॉर्नर ऑफ ए फॉरिन फील्ड’ या पुस्तकात केलेला आहे. पण माझा अनुभव असा आहे की थोड्याच क्रिकेटपटूंना वाचनाचा नाद असतो आणि त्याहीपेक्षा कमी प्रमाण क्रिकेट व्यवस्थापकांचे असते. म्हणून झाका अश्रफनाही माहिती नसावे की त्यांचा हा प्रस्ताव 67 वर्षांपूर्वीच मांडला गेला होता. काहीही असले तरी एक फरक सांगण्याजोगा आहे. पाकिस्तानी आम आदमी या ट्रॉफीला जेव्हा ‘गांधी-जीना’ ट्रॉफी म्हणतो, (कदाचित ‘जी’ हे अक्षर ‘जे) या अक्षराच्या पूर्वी येते म्हणून...?) तेव्हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा चेअरमन त्या ट्रॉफीच्या नावात जीनांचा उल्लेख प्रथम करून त्याला ‘जीना-गांधी’ ट्रॉफी म्हणतो.

1950 च्या दशकाच्या मध्यवर्षांत मांडलेला हा प्रस्ताव मग असाच वाऱ्यावर विरला. पाकिस्तानच्या संघाने 1960-61 मध्ये भारताला भेट देऊन सामने खेळले. त्यानंतर दोन देशांत दोन युद्धे झाली. 1978 साली पुन्हा क्रिकेटचे धागे जुळले तरी दोन देशांध्ये खोलवर दुष्मनी रुजल्यामुळे या खेळाची अवस्था ओलिताप्रमाणेच राहिली. 1980 व 1990 च्या दशकांत जेव्हा जेव्हा भारतपाकिस्तान सामने झाले तेव्हा दोनही बाजूंच्या प्रेक्षकांनी आपली उदंड देशभक्ती दाखवत दुसऱ्या पक्षाला यथेच्छ गालिप्रदान जाहीरपणे केले. बंगलोरमधील एका सामन्याची घटना माझ्या स्मरणात आहे. त्या सामन्यात मी उभे राहून टाळ्या वाजवून जावेद मियाँदादची प्रशंसा केली होती; कारण आंतरराष्ट्रीय सामन्यांमधली ती त्याची अखेरची खेळी होती. मी बसलो होतो त्या स्टँडमध्ये त्याचे कौतुक करणारा मी एकटाच होतो. इतरांच्या भावना तेथील एका प्रेक्षकाच्या उद्‌गारातून प्रकट झाल्या. ‘दया देवाची, की पुन्हा या अक्करमाशाचे (बास्टर्ड) थोबाड पहावे लागणार नाही!’’ (मला या ठिकाणी मुद्दाम नमूद केले पाहिजे की, त्या वेळी म्हणजे 1996 मध्ये जावेद दाऊद इब्राहिमचा ‘संबंधी’ झालेला नव्हता. तो फक्त एक उमदा क्रिकेटपटूच होता).

अलीकडील वर्षांत भारतीय क्रिकेटप्रेमी अधिक सुज्ञ झालेले दिसतात. कारण क्रिकेट हाच केवळ त्यांचा लक्ष्यबिंदू बनला आहे.राजकारणाचा किंवा संघर्षाचा पर्याय नव्हे. 2005 साली बंगलोरमध्ये पाकिस्तानने कसोटी सामना जिंकला तेव्हा चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी इंझमाम आणि त्याचे साथी यांचे टाळ्या वाजवून मन:पूर्वक अभिनंदन केले. संजय मांजरेकर या माझ्या मते अत्यंत हुषार आणि स्वतंत्र वृत्तीच्या भारतीय खेळाडू निवेदकाने त्या वेळी असे म्हटले की, भारतीय आता त्यांच्या राष्ट्रीय अस्तित्वाबद्दल थोडेफार निश्चिंत झाले आहेत आणि त्यांच्या व्यक्तिगत भविष्याचीही त्यांना विशेष चिंता उरलेली नाही ही वस्तुस्थिती या घटनेागे असावी. भारतीय संघराज्य पाकिस्तानच्या मत्सरी आणि घातक कारवायांमुळे तुटून जाईल ही भीती त्यांना राहिलेली नाही. खलिस्तान संपले आहे आणि काश्मीर मामलाही थंडावला आहे. मध्यंतरीच्या दशक-दीड दशकाच्या काळातील सातत्यपूर्ण आर्थिक विकासामुळे मध्यम वर्गात हजारो भारतीय नव्याने ओढले गेले आहेत.

मला वाटते मांजरेकरचे हे विश्लेषण विचार करण्यासारखे आहे, आताही पाकिस्तानने केलेला भारतीय संघाचा पराभव भारतीय प्रेक्षक आणि क्रिकेटप्रेमी लोकांनी ज्या शांतपणे स्वीकारला, त्यामुळे खेळ आणि राष्ट्रीय अभिमान या दोन गोष्टींचा अलगपणे विचार करण्याची नवीन क्षमता लोकांध्ये आली आहे असे म्हणावे लागते. धोनीच्या साथींना मिसबाहच्या संघाने खेळात हरवले ही घटना दूरान्वयानेही पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याचा पराभव केला असे सुचवीत नाही. बंद क्रीडांगणात खेळली जाणारी ही लढाई हिमशिखरांच्या परिसरातील नाही. तिची आयुधे बॅट आणि बॉल ही आहेत; बाँब आणि रणगाडे नाहीत.

या बदलत्या वातावरणात दोनही बाजूंकडून नियमित दौऱ्यांची आखणी व्हायला हवी. साठ वर्षांपूर्वी भारत-पाकिस्तान कसोटी सामन्यांना सुरुवात झाली, आता त्यांचे अधिकृत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी एका ट्रॉफीची योजनाही करणे जरुरीचे आहे, पण झाका अश्रफ यांच्याशी माझा या ट्रॉफीच्या नावाबाबत मतभेद आहे. या ट्रॉफीचे नाव आपल्या देशांच्या राष्ट्रपित्यांच्या नावावरून ठेवण्याची जी कल्पना आहे तिला दोन प्रकारच्या गंभीर हरकती आहेत. पहिली म्हणजे गांधी किंवा जीना या दोघांपैकी कोणालाही क्रिकेटमध्ये स्वारस्य नव्हते आणि दुसरी हरकत आहे ती राजकीय- ट्रॉफीत पहिले नाव कोणाचे घालायचे?

भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट- हवे तर पाकिस्तान-भारतमधील क्रिकेट सामने चांगले खेळायला आणि त्यांचा आनंद अनुभवण्यासाठी त्यांच्यावरील राजकारणाचे सावट दूर झाले पाहिजे. म्हणून गांधी व जीना किंवा जीना आणि गांधी ही नावे दूर ठेवू या. मग या ट्रॉफीला नाव कोणते द्यायचे? ‘लता-नूरजहाँ’ हे दोनही देशांमधली त्यांची प्रगाढ लोकप्रियता व आपलेपणा व्यक्त करणारे नाव; की ‘इक्बाल-टागोर’ ट्रॉफी हे त्या दोन साहित्यिक विचारवंतांचा सन्मान करणारे नाव?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या चेअरमनने सुचविलेल्या नावापेक्षा ट्रॉफीसाठी सुचवलेली वरील नावे कमी वादग्रस्त आहेत; पण ती पुरती समाधानकारक नाहीत. त्यामुळे क्रिकेटच्या ट्रॉफीसाठी क्रिकेटपटूचे नाव सुचविणेच अधिक उचित ठरेल. ऑस्ट्रेलिया-भारत सामना साखळीसाठी योजिलेले बोर्डर-गावस्कर; किंवा ऑस्ट्रेलिया-श्रीलंका सामन्यांसाठी सुचविलेले वॉर्न-मुरलीधरन ट्रॉफी ही दोनही नावे त्या त्या संदर्भात चपखल बसतात. मग त्याच धर्तीवर आपण ‘इम्रान-कपिलदेव’ ट्रॉफी किंवा ‘कुंबळे-वासिम’ ट्रॉफी अशी नामांकने का करू नयेत? भारत-पाकिस्तान सामन्यांतील या ट्रॉफीसाठी योजिलेले पहिले नाव त्या खेळातील थोर ऑलराऊंडरचे तर दुसरे नाव मॅचविनर ठरलेल्या बोलरचे आहे. किंवा एखाद्या सर्वांगीण कुशल खेळाडूच्या नावानेही ही ट्रॉफी प्रदर्शित होऊ शकेल. ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडीज सामन्यांसाठी फ्रँक वॉरेलच्या नावाची ट्रॉफी किंवा इंग्लंड-साऊथ आफ्रिका सामना मालिकांसाठी ‘बेसिल-डी-ऑलिव्हेरिया’ ट्रॉफी अशी परंपरा अस्तित्वात आहेच. 

मला वाटते याचेच अनुकरण आपण सचिन तेंडुलकरच्या नावे ट्रॉफी ठेवून का करू नये? भारत-पाक क्रिकेटमधील नेमका फरक त्याच्याइतका कोणी ओळखू शकलेला नाही. 1989 साली पाकिस्तानविरुद्ध तो पहिला सामना खेळला. मार्च 2011 मध्ये वर्ल्ड कप उपांत्य सामन्यामध्येही तो पाकिस्तानविरुद्ध खेळला. तब्बल बावीस वर्षे वेगवेगळ्या प्रकारच्या विकेटस्‌वर आणि खेळाच्या निरनिराळ्या फॉर्म्सध्ये तो जिंकत-धावांचा विक्रम करीत राहिला आणि मैदानातून परतताना सामन्याचा कलही निश्चित करत राहिला. पाकिस्तानविरुद्ध खेळताना त्याने काही अतिशय सुरेख इनिंग्स्‌ केल्या- पण बऱ्याचशा त्या सामन्यात हरण्यासाठी! मद्रासमधील एका सामन्यात त्याने एक ऐतिहासिक म्हणता येईल असे धावांचे शतक पूर्ण केले, पण वासिम व त्यांचा संघ यांनी केवळ तेरा धावांनी सामना जिंकून स्टेडियममधील प्रेक्षकांची मानवंदना घेतली.

तेंडुलकरच्या नावाची ट्रॉफी अनेक पाकिस्तानी खेळाडूंनाही पसंत पडेल असे मला वाटते, कारण त्यांचे चाहते आणि खेळाडूही तेंडुलकरचा आदर करतात आणि त्याचा खेळ गौरवतात. 1999 च्या वर्ल्ड कपनंतर बकिंगहॅम पॅलेसमध्ये आमंत्रित स्वागत समारंभातील हकीगत राजसिंग डुंगरपूर यांनी मला सांगितली होती, त्या समारंभात तरुण पाकिस्तानी खेळाडूंना फक्त सचिनचे आकर्षण होते. त्याची उपस्थिती, त्याचा स्पर्श आणि त्याच्याबरोबर घेतलेले फोटोग्राफ्स त्यांना मोहरून टाकत होते. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या सदस्यांनाही हे माहीत आहे की, सचिन त्याच्याबरोबरच्या खेळाडूंइतकाच किंवा त्यांच्यापेक्षाही निष्णात असला तरी वैयक्तिक वर्तनाबद्दलही वादातीत आहे. मला वाटते तेंडुलकर ट्रॉफीचा हा पर्याय सर्वांनीच भारदस्तपणे स्वीकारणे योग्य ठरेल. त्यासाठीची घोषणा लवकरच व्हावी अशी अपेक्षा आहे.

(अनुवाद: कुमुद करकरे)

Tags: कुमुद करकरे ट्रॉफी सचिन तेंडुलकर गांधी-जीना झाका अश्रफ भारत-पाकिस्तान क्रिकेट रामचंद्र गुहा तेंडुलकर ट्रॉफी कालपरवा KUmud Karkare Sachin Tendulkar Gandhi-Jina India-Pakistan Cricket Tendulkar Trophy Ramchandra Guha weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके