डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

15 ऑगस्ट 1985 हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या 38 व्या जयंतीचा. साधना साप्ताहिकाचा हा 37 वा वर्धापन दिन. याप्रसंगी आमच्या सर्व ग्राहकांना, वाचकांना, हितचिंतकांना, जाहिरातदारांना, ज्ञात-अज्ञात साहाय्यकर्त्यांना आम्ही अभिवादन करतो आणि अंगीकृत कार्य यापुढेही चालू ठेवण्याच्या आमच्या निर्धाराचा निःशब्दपणे पुनरुच्चार करतो.

हा विशेषांक म्हणजे साधना साप्ताहिकाचे 38 व्या वर्षात पदार्पण. वास्तविक एका वर्षाची वाटचाल संपून पुढल्या वर्षात पाऊल टाकताना कृतार्थतेच्या आनंदाने मन भरून जायला हवे. पण तूर्ततरी तशी काही शक्यता दिसत नाही. गेल्या वर्षी राष्ट्रीय जीवनात घडलेल्या भीषण घटना सुन्न करणार्‍याच होत्या. पंतप्रधानांची निर्घृण हत्या काय आणि अतिरेकी अत्याचारी गटांनी घेतलेले शेकडो निरपराध्यांचे बळी काय, या घटनांमुळे आपल्या सर्वांच्या मनाची उभारीच कोसळली. माणुसकीवरचा विश्वास उडावा, इतक्या या गोष्टी भयानक होत्या. नवजात भारतीय लोकशाहीचे, इतकेच नव्हे तर मानवी संस्कृतीचे भवितव्य फारसे उज्ज्वल दिसत नाही, असाच विचार सुजाण माणसांच्या मर्मात एखाद्या शल्यासारखा रुतून बसलेला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत सत्तापिपासेची कमान सतत चढती राहिली आहे आणि तिच्यापोटी आलेली ढोंग, भ्रष्टाचार आणि भाटगिरी, ही राक्षसी संताने आपल्या समाजाला अष्टांगी पोखरून काढीत आहेत. याशिवाय कुठे अवर्षण तर कुठे अतिवृष्टी, कुठे अपघात तर कुठे घातपात, अशा अनेक संकटांनी आपल्याला चहुबाजूंनी घेरलेले आहे. अशा स्थितीत ज्याला त्याला ‘दे माय धरणी ठाय’ होऊन गेले असले, तर त्यात आश्चर्य ते कसले?

हालाहल पचविणार्‍या शिवशंकराप्रमाणे आपल्याला हे सर्व पचविले पाहिजे, असे आम्ही अवश्य मानतो. पण दिवसेंदिवस हे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. गांगरून जाऊन आम्ही शस्त्र टाकून देत नसलो, तर त्याचे कारणही एकच, प्रतिकूल परिस्थितीशी आणि असाध्य व्याधीशी झगडत-झगडत, आमच्यापेक्षा वयोवृद्ध असलेली मंडळी अजूनही पाय ठाम रोवून उभी आहेत, हे आम्ही पहातो. त्यांचे आदर्श समोर असल्यामुळेच आम्हीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची उमेद जागी ठेवतो.

काळ तर खरेच, मोठा कठीण आला. खाणारी तोंडे फार आणि अन्नोदक तुलनेने कमी असलेल्या या देशात महागाई भडकली नाही, तरच नवल! आहे ती भाकर नीटपणे वाटून खावी, अशी दानतही आमच्या जवळ आहे कोठे? उलट निलाजरा लोभ आणि नैतिक अधःपात यांच्यामुळे वस्तू अचानक गडप होणे, मानवनिर्मित टंचाईचा मूठभरांनी गैरफायदा घेणे, आणि सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या स्वार्थी लोकांनी जनतेची लूट चालू ठेवणे, हे सर्रास चाललेले आपण पहात आहोत.

साधना साप्ताहिकाची अवस्था दिवसमास जात आहेत तशी सुधारण्याऐवजी खालावत चालली आहे. महागाईने चौफेर घेरा घातला आहे. कागद, शाई, वेतन- सारांश, नियतकालिकाला लागणाऱ्या यच्चयावत् गोष्टींचे दर कडाडत आहेत. अजूनही काही थोड्या लोकांच्या मनात त्यागाविषयी उदात्त भावना असल्यामुळेच ‘साधना’चा संसार रूटुखुटू चालला आहे, एवढेच. कर्ज करावे लागते आणि ते वारता धारता नाकी नऊ येतात. यंदा मंजूर झालेला असूनही कागदाचा कोटा पदरात पडला नाही. साप्ताहिकाचे स्वरूप अधिक वाचनीय व्हावे, छापून येणारा सर्व मजकूर साभिप्राय आणि लक्षणीय असावा, त्याचे दर्शन प्रसन्न असावे, अशीच सर्वांची अपेक्षा असते. पण यासाठी लागणारी किमान गुंतवणूकही करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पूर्वीपासून ‘साधना’ला पाठबळ दिले, ते काही बांधिलकी मानणार्‍या मित्रांनी. हितचिंतकांनी, परंतु त्यांच्यापुढेही पुन्हापुन्हा हात पसरायला संकोच वाटतो. वर्गणी वाढविली, किंमत वाढविली, तर ग्राहकांची संख्या कमी होऊ लागते. साने गुरुजींच्या कर्मरत हातांनी लावलेले झाड त्यांच्या नंतरही ज्या बागवानांनी कष्ट घेऊन जोपासले, त्यांची परंपरा खंडित होऊ देता कामा नये, असा निर्धार आम्हीही वारंवार करतो. परंतु सर्व सोंगे आणता आली तरी पैशांचे सोंग आणता येत नाही, या कटू सत्याला शेवटी सामोरे जावेच लागते. 

हे सारे आमच्या वाचकांशिवाय आणखी कोणाला सांगणार? हे निवेदन म्हणजे कैफियत नव्हे. आप्तमित्रांना सांगून चिंतेचे ओझे कमी होते, म्हणून ते सांगणे आले. ‘साधना’ जगावी आणि आपल्या समाजाच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर तिने बोलत रहावे, अशी अनेकांची उत्कट सदिच्छा आहे, तिचा आम्ही मनोमन आदर करतो. परंतु आता सदिच्छांनी भागणार नाही. काही निश्चित योजना करावी लागेल आणि तीही अल्पप्रमाण असल्यास निभणार नाही. खरे म्हणजे अशा पत्राला एक मोठा संचित निधी असला पाहिजे आणि त्याच्या व्याजावर हे पत्र चालले पाहिजे, तरच त्याच्या दीर्घायुष्याची हमी देता येईल. सारखेच जर आर्थिक प्रश्न छळू लागले, आणि तात्पुरत्या धावपळीने जमा केलेल्या तुटपुंज्या भांडवलावर हा प्रपंच चालवायचा म्हटले, तर अवघड आहे. न संपणारी चणचण हे केवळ आर्थिक संकट नसते, तर सगळी उत्साहशक्ती नष्ट करणारे मानसिक दुबळेपण त्यातून निर्माण होते.

स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना ही कर्मकहाणी कशाला सांगितली, असे कोणी म्हणेल. आम्हालाही ती सांगताना हुरूप थोडाच वाटतो? पण ती सांगितलीच पाहिजे, असे वाटल्यामुळे तर हे निःसंकोच निवेदन आम्ही केले आहे. एरवी, याप्रसंगी या विशेषांकापुरतेच बोलायचे तर आमच्या हितचिंतक मित्रांनी जाहिरातींच्या रूपाने आम्हाला भरघोस पाठिंबा दिला आहे, हे सानंद आणि साभिमान सांगून आम्ही थांबलो असतो. खरोखर हे साह्य देणार्‍या सर्वांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत, या अंकाला मिळाला तसा चौफेर पाठिंबा आम्हाला वारंवार मिळत राहिला तर आम्ही आर्थिक चणचणीवर सहज मात करू आणि सध्यापेक्षा साप्ताहिक अधिक मौलिक करण्याची हिंमत धरू. ‘साधना ट्रस्ट’चे विश्वस्त चिटणीस श्री. नाना डेंगळे यांनी याकामी विलक्षण मेहनत घेऊन संपादकांना जो दिलासा दिला आहे, त्याची किंमत आभाराच्या शब्दांनी करता येणार नाही. हे एवढे होऊनही पुढे काय, या प्रश्नचिन्हाची सावली एखाद्या अशुभ मळभासारखी मनावर पडलेलीच आहे.

आमचे मित्र आणि हितचिंतक मिळून ‘साधना’साठी काही व्यापक आणि भक्कम आर्थिक उपाययोजना करून देतील, तर आम्ही त्यांचे ऋणी राहू. अर्थात कोणीतरी हरी आमच्या हाकेला धावत यावा आणि त्याने गडगंज डबोले आमच्या स्वाधीन करावे, अशी जराही इच्छा आमच्या मनात नाही. ‘माझी विपत्ती दूर करू नकोस’ असे दुसर्‍या संदर्भात साने गुरुजींनी देवाला विनविले आहे. आम्हीही जनताजनार्दनाजवळ हेच मागणे मागतो की आमच्या संस्थेचे संस्थान होऊ देऊ नकोस, पण अतिघोर विपत्तीने ही बाग पुरती कोळपूही देऊ नकोस. मोठी योजना करणारे समर्थ लोक पुढेमागे हे मनावर घेतीलही; परंतु आमची सर्वच लहानथोर मित्रांपाशी 1 विनवणी आहे; अगदी तत्काळ करण्यासारख्या काही गोष्टी आहेत, त्या त्यांनी कराव्या. आपली वर्गणी वेळेवर पाठवावी आणि त्यासाठी पत्रव्यवहाराचा खटाटोप आम्हाला परवडणार नाही, याची काळजी घ्यावी.

‘एकसे दो भले’ या न्यायाने प्रत्येकाने दोन वर्गणीदार साधनाला मिळवून द्यावेत. विशिष्ट परिस्थितीत केलेली कायम ग्राहक योजना आता अपुरी ठरली आहे. त्यामुळेच साधनेने ती स्थगित केली. रुपयाची किंमत सतत घसरत असल्याने हे करावे लागले. जे मित्र फार पूर्वी कायम ग्राहक झाले, त्यांना आम्ही विनंती केली होती की त्यांची वर्गणी 500 रु. पेक्षा कमी असल्यास त्यांनी असेल ती खूट भरून काढावी. काही सन्मान्य अपवाद वगळल्यास आमच्या आवाहनास प्रतिसाद मिळाला नाही, हे खेदाने नमूद करावे लागते. आता तर कायम ग्राहक वर्गणीच्या रूपाने साधनेला साह्य करू इच्छिणाऱ्या मित्रांनी किमान एक हजार रुपये पाठवून साधनेचे कायम ग्राहक व्हावे. साधनेचे अंक फुटकळ विक्रीसाठी उपलब्ध होत नाहीत, हे खरे आहे. पण त्यासाठी आवश्यक ती हमीची रक्कम आधी भरणा करू शकणारे विक्रेते आम्हाला हवेच आहेत. जाहिरातदारांचाही मोठा पाठिंबा हवा आहे आणि त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशीलही आहोत. परंतु गावोगावच्या आमच्या हितचिंतकांनीही आम्हाला प्रयत्नपूर्वक या बाबतीत साह्य केले तर पुष्कळ काम होऊन जाईल. अशा अनेक गोष्टी. त्या आम्ही सांगण्यापेक्षा सर्व साधनाप्रेमी मंडळींना अधिक माहीत असण्याची शक्यता आहे. सारांशरूपाने सांगायचे ते एवढेच की, सर्वांनी आता खरोखरीच मनावर घेतले, तरच हाती घेतलेले हे काम हुरूपाने आणि हुन्नराने आपण चालू ठेवू शकू.

अधिक काय लिहिणे? आमचे वाचक सर्व जाणतात. आमच्याकडून आम्ही शक्य तेवढे करीतच राहणार आहोत, याचा हवाला, हा विशेषांकच देईल. परिस्थिती कशीही असली, तरी देशाच्या स्वातंत्र्यदिनी उदासवाणे होण्याइतके आम्ही कचदिल नाही. शिवाय आमच्या दृष्टीने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला अधिक अर्थपूर्णता येण्यासाठी अजूनही अनेक आघाड्यांवर लढत रहावे लागणार आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई हीच भारताची औद्योगिक आणि आर्थिक राजधानी आहे. आशिया खंडातल्या या विराट महानगरापासून अवघ्या 50 मैलांवर आदिवासी कष्टाचे जीवन कंठत आहेत, याची दाद फिर्याद बहुसंख्य महानगरवासीयांना नाही. मग दूरदूरच्या रानांत राहणार्‍या या नामधारी रानच्या राजांची ससेहोलपट कोण लक्षात घेतो? आदिवासीही भारतीय जनतेचा एक भाग आहेत, याची जाणीव नसलेल्या तुम्हा-आम्हा नागर आणि ग्रामीण भारतीयांची जाणीव थोडीतरी चेतवावी, हा या विशेषांकाचा उद्देश आहे. अर्थात् हे काम संपादक करणार नसून या अंकाचे मानकरी असणारे लेखक करू पहात आहेत, याचे भान आम्हाला आहे.

हा विशेषांक सिद्ध करायला साह्य करणार्‍या सर्वांचे सविनय आभार.
 

Tags: श्री. नाना डेंगळे साने गुरुजी संपादक नियतकालिक लोकशाही भारत अतिरेकी पंतप्रधान विशेषांक वर्धापनदिन स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट साधना साप्ताहिक Shri. Nana Dengle Sane Guruji Editorial Democracy India Bharat Terrorist Prime Minister Magazine Special Issue Independence Day 15th August Sadhana Weekly weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके