डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

जयप्रकाशजींची धडपड विफल ठरली का? हे आव्हान कोण स्वीकारणार? कोण हे काम पुढे नेणार? हे सगळे प्रश्न आज आपल्यापुढे आहेत व याचे उत्तर प्रत्येकाला द्यायचे आहे. अथक परिश्रम करणारी सामान्य जनताच हे काम पुढे नेऊ शकेल. कारण अशा पुरुषार्थी लोकांच्यापर्यंत विचार पोचवण्याचे काम जयप्रकाशजींनी केले आहे.

 

एक काळ असा होता की भारतातील सर्वात महत्त्वाची व्यती म्हणून लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे नाव घेतले जात होते. देशात आलेल्या एक प्रकारच्या हुकुमशाहीला परतवून लावण्यासाठी त्यांनी देशातील सामान्य माणसाला उभे केले. त्यांची प्रकृती चांगली राहिली असती व देशभर ते हिंडू शकले असते तर आज परिस्थिती निराळी दिसली असती. परंतु भारताच्या नशिबी तसे नव्हते की काय म्हणूनच आजची एक निराळी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे. या परिस्थितीतूनही पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा असेल तर लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सांगितलेल्या 'संपूर्ण क्रांती' च्या मार्गानेच पुढे जावे लागेल. त्यासाठी सतत झटणाऱ्या सामान्य देशबांधवांची एक सेनाच उभी करावी लागेल.

लोकनायकांचे कर्तत्व अपूर्व असे होते. विविध पैलूंनी ते तेजाळलेले होते. त्यांचे मन नेहमी सत्याचा शोध घेत असे सामान्य जनतेला ते श्रद्धा व प्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून माहिती होते. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी देशाला काही देण्याचाच प्रयत्न केला. स्वत: करता त्यांनी काहीच घेतलेले नाही. त्यांच्या आयुष्याचा पट उलगडत जावे तसतशी त्यांची राष्ट्रभक्ती, पददलित आणि पीडित यांच्याबद्दल असलेली कळकळ, लोकशाही आणि जनशक्तीच्या रक्षणासाठी आढळणारी समर्पण वृत्ती, महात्मा गांधींच्या कल्पनेतील भारत घडवण्यासाठी झटण्याच्या त्यांच्या तयारीचे दर्शन, या सर्व वृत्तीमुळे मार्क्सवादातून लोकशाही समाजवाद, समाजवादातून सर्वोदय व त्यातून संपूर्ण क्रांती या दिशेने ते वाटचाल करीत राहिले. युवाशक्तीकडे त्यांचे विशेष लक्ष होते.

बेचाळीसचा स्वातंत्र्यसंग्राम, भारतामध्ये समाजवादाची उभारणी, भूदान-ग्रामदान, शांतीसेना, सर्वोदय चळवळीसाठी जीवनदान, चवळ खोऱ्यातील दरोडेखोरांनी केलेला दरोडेखोरी व्यवसायाचा त्याग, नागा प्रदेशात केलेले कार्य, भारत-पाक मैत्रीसाठी केलेले प्रयत्न, बांगला देशमुक्तीसाठी जगभर केलेले आव्हान, बिहार दुष्काळाच्या काळात घेतलेले कष्ट, हे सर्व जनता विसरू शकणार नाही. कोणत्याही पदावर ते नव्हते. त्यामुळे पदांच्या झगड्यात ते कधीच पडले नाहीत. आलेली पदे त्यांनी झिडकारून लावली. सामान्य जनता संघटित करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी सतत संघर्ष केला, त्यांची क्रांतीची कल्पना रूढ कल्पनेहून वेगळी होती. क्रांतीही जशी आयात-निर्यात करायची वस्तू नाही तशीच क्रांती ही दुसऱ्याने आपल्यासाठी करायची वस्तू नाही. देवाण-घेवाणीच्या क्रांत्या ज्या घडल्या त्या कुणी ना कुणी बळकावून बसलेले आज दिसतात. जगाचा इतिहास त्याची साक्ष देत आहे. बंदुकीच्या नळीतून ज्यांनी क्रांती येईल असे म्हटले त्यांनी आणलेल्या क्रांतीवर बंदुकवल्यांनीच कब्जा केलेला दिसतो. दहशतीने मिळवलेले राखण्यासाठी दहशतीचा वापर करण्यात आला आणि सर्व जनतेला वेठीला धरण्यात आले. कुणी तरी क्रांतीचा आराखडा तयार करावा आणि त्या आराखडयावरहुकूम काम करावे अशी जयप्रकाश नारायण यांची कल्पनाच नव्हती. क्रांतीच्या नुसत्या बांधणीतच नव्हे तर आखणीत लोकांचा सहभाग व्हावा अशी त्यांची कल्पना होती. संपूर्ण क्रांतीची मांडणी सुद्धा त्यांनी त्याच दिशेनेच केली होती. जयप्रकाशजींना अपेक्षित असलेली क्रांती ही लोकपुरुषार्थाने घडावी अशी त्यांची अपेक्षा होती. लोकांनी आपल्या मतशक्तीने सत्तेला दाती तृण धरायला लावावे असा त्यांचा प्रयत्न, म्हणून तसे त्यांनी घडवून दाखवले. केवळ मतांची चिठ्ठी टाकली की आपली जबाबदारी संपली असे समजणे व आपल्यावरील जबाबदारी झटकून टाकणे तेही जयप्रकाशजींना मान्य नव्हते. भारतासारख्या हजारो वर्षांचा वारसा असणाऱ्या देशात मतपेटीने क्रांती घडल्याचा इतिहास आपण पाहिलेला आहे.

जयप्रकाश नारायण यांनी बिहार आंदोलनात शैक्षणिक क्रांतीवर विशेष भर दिला. कारण शिक्षणामुळे जीवनाचे नवीन क्षितिज समोर दिसते. परंतु आपल्या शिक्षणाला वाचिकतेचा व औपचारिकतेचा शाप आहे. आपल्या शिक्षणात शोधक बुद्धीचा पूर्ण अभाव आहे. त्यात नवनिर्माणाची क्षमता नाही. ते कृतिहीन बनलेले आहे. शिक्षणात अनुशासन निर्माण करावे अशी कल्पना आहे. परंतु शिक्षण क्षेत्रात इतकी अनुशासनहीनता आहे की स्वतःच्या विस्तारावाली ते चेंगरले जात आहे. त्यांची विद्यापीठे नकारात्मक विचाराचे व नास्तिकतेचे अड्डे बनली आहेत. आजचे शिक्षण प्रमाणपत्रे निर्माण करते, परंतु आत्मविश्वास निर्माण करू शकत नाही. ते हक्काची जाणीव देते परंतु कर्तव्याचे धडे घालून देत नाही. आजच्या शिक्षणाचा पाया जमिनीपासून सुटलेला आहे आणि त्यामुळे शिक्षणाचे क्षेत्र भयाने व लाचारीने व्यापलेले आहे.

बिहार आंदोलनात जयप्रकाशजींनी याच दृष्टीने वर्षभर शिक्षण सोडून ग्रामीण भागात जा असे तरुणांना सांगितले. जयप्रकाशजींना आजचे राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण बदलून राजकारणात शुचिता, समाजकारणात प्रेम आणि अर्थकारणात साम्य पाहिजे होते. भ्रष्टाचाराचा बुजबुजाट असलेले राजकारण, विषमतेने विदीर्ण झालेले समाजकारण आणि वर्गीय जाणिवेने जनतेत क्षोभ निर्माण करणारे अर्थकारण हे मनुष्याला त्याच्या पाशवी गरजांच्या बेडयातच जखडून ठेवते. जयप्रकाशजींना मानवाला आपल्या प्राथमिक गरजातून मुक्त करून अन्य क्षेत्रातील उपक्रमाला अवकाश देणारे राजकारण, समाजकारण व अर्थकारण अभिप्रेत होते.

जयप्रकाशजींची धडपड विफल ठरली का? हे आव्हान कोण स्वीकारणार? कोण हे काम पुढे नेणार? हे सगळे प्रश्न आज आपल्यापुढे आहेत व याचे उत्तर प्रत्येकाला द्यायचे आहे. अथक परिश्रम करणारी सामान्य जनताच हे काम पुढे नेऊ शकेल. कारण अशा पुरुषार्थी लोकांच्यापर्यंत विचार पोचवण्याचे काम जयप्रकाशजींनी केले आहे.

त्यांच्याशी अनेक वेळा बोलण्याची व चर्चा करण्याची वेळ आली. शहाड्यामध्ये शेतमजुरांत व कष्टकरी जनतेमध्ये काम करायला दहा वर्षांपूर्वी आम्ही तरुणांनी सुरवात केली. त्याची माहिती मी एकदा त्यांना सांगितली. त्या वेळी त्यांना खूपच आनंद झाला. त्या शेतमजुरांची, गरिबांची शक्ती कशी उभी राहील त्यासंबंधी त्यांनी अनेक सूचना केल्या. त्यांच्या सूचनांप्रमाणे आम्ही धडपडत राहिलो. त्यामुळे त्या भागात गरिबांची शक्ती उभी राहू शकली व आमच्या संघटित शक्तीने, आम्ही आमचे प्रश्न सोडवू शकतो असा विश्वास त्यांच्यामध्ये आला. आज देशामध्ये दारिद्रयरेषेखालचे लोक 60 टक्क्यावर आहेत असे म्हटले जाते. हे सगळे लोक संघटित झाले व आपल्या प्रश्नासाठी उभे राहिले तर आपले प्रश्न आपण सोडवू शकतो असा विश्वास त्यांना वाटू लागेल. अशा प्रकारचे काम ठिकठिकाणी होणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्या दृष्टीने सधन क्षेत्रात काम व्हायला हवे. जयप्रकाशजींचे स्मरण करताना अशा प्रकारच्या कामांची रचना करणे व त्याप्रमाणे कामाला लागणे ही त्यांना खरी आदरांजली होऊ शकेल.

Tags: महात्मा गांधी लोकशाही मार्क्सवाद समाजवाद बेचाळीसचा स्वातंत्र्यसंग्राम भूदान चळवळ सर्वोदय चळवळ शैक्षणिक क्रांती बिहार आंदोलन लोकनायक जयप्रकाश नारायण क्रांती Mahatma gandhi Democracy Bihar Movement Marxism Socialism Bhudan movement Sarvodaya movement Educational revolution Revolution Loknayak jayprakash narayan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके