डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दि सॅनिटरी पॅड मॅन : एक भन्नाट उद्योजक

उद्योजकता आणि संशोधन कुठे व कसं उमलेल व फुलेल हे सांगता येत नाही. पण अशा हजारो/लाखो मुरुंगनंथम्‌ना सरकारने प्रोत्साहन, प्रशिक्षण, भांडवल आणि बाजारपेठ मिळवून देण्यात मदत केली, तर अशा शेकडो वस्तू लघु/मध्यम क्षेत्रात तयार होऊ शकतील. त्यामुळे रोजगारही निर्माण होईलच; पण त्यामुळे उगाचंच मल्टिनॅशनलकडून आपण शर्टस, पँट्‌स, चड्ड्या, पेन-ड्राइव्हज, मोबाईल फोन्स, त्याच्या ॲक्ससरीज, आरोग्याला हानिकारक नसलेली अनेक शीत पेयं, खाण्याचे पदार्थ, सौंदर्यप्रसाधनं अशा असंख्य गोष्टी ज्या जास्त किमतीला विकत घेतो; ते थांबेल.

पूर्वीपासून स्त्रीच्या ‘मासिक पाळी’कडे जरी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून पाहिलं गेलं असलं, तरीही काही माणसांना मात्र यानं नवं काही तरी निर्माण करण्याची प्रेरणा दिली. मुरुगनंथम्‌ नावाच्या भारतीय तरुणाला ‘दि सॅनिटरी पॅड मॅन’ म्हणून ओळखलं जातं. ‘टाईम’ मासिकानं 2014 मध्ये जगातल्या सर्वांत जास्त प्रभावशाली अशा 100 माणसांच्या नावांची यादी प्रकाशित केली. त्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, सुप्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय अशा नावांबरोबरच अरुणाचलम मुरुगनंथम्‌ हे नाव झळकलं. तमिळनाडूतल्या कोइमतूर इथं एका गरीब कुटुंबात वाढलेल्या मुरुगनंथम्‌नं जगातलं अत्यंत स्वस्त दराचं सॅनिटरी पॅड्‌स बनवणारं मशीन तयार केलं. यातून भारतातल्या खेड्यातल्या लाखो गरीब स्त्रियांना रोजगार तर मिळालाच; पण याशिवाय सॅनिटरी पॅड्‌सचा पर्याय त्यांच्यासाठी आरोग्याला सोपा, स्वस्त व सुरक्षित ठरला. 

खरं तर स्त्रियांच्या मासिक पाळीसारख्या अत्यंत खासगी बाबतीत सहसा कुणी ढवळाढवळ करत नाही. त्यामुळं मुरुगनंथम्‌नं जे केलं, त्याचा त्याला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पत, प्रतिष्ठा, पैसे असं सगळं त्यानं या वेडापायी गमावलं. त्याचं कुटुंब त्याला सोडून गेलं, पण त्यानं हार मानली नाही. त्याच्या या नवनिर्माणाची गोष्ट अत्यंत थक्क करणारी आहे. 

सन 1962 मध्ये एका विणकराच्या कुटुंबात मुरुगनंथम्‌चा जन्म झाला. लहानपणीच वडिलांचं अपघातात निधन झाल्यानं मुरुगनंथम्‌ अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढला. त्याची आई शेतावर मजुरी करून पैसे मिळवायची. तिनं मुरुगनंथम्‌ला शाळेतही घातलं होतं. पण शाळेची फी भरणं शक्य नसल्यानं वयाच्या 14 व्या वर्षीच त्याला शाळा सोडावी लागली. त्यानंतर कंपनीतील कामगारांना जेवणाचे डबे पोचव, कुठे मशिन्स चालव, शेतावर मजुरी कर, वेल्डिंग कर- अशी छोटी-मोठी कामं करत तो मोठा झाला. शांती नावाच्या मुलीशी त्यानं 1998 मध्ये लग्न केलं. त्याची बायको मासिक पाळीच्या वेळी जुनी कळकट फडकी, वर्तमानपत्रं अशा गोष्टी वापरायची, असं त्याच्या लक्षात आलं. बायकोला त्यानं याबद्दल विचारल्यावर तिनं सुरुवातीला काहीच सांगितलं नाही. नंतर मात्र सत्य काय ते त्याला समजलं. 

त्या वेळी काही कंपन्या सॅनिटरी पॅड्‌स विकत असत, पण ती महाग असल्यानं विकत घेणं तिला परवडत नसे. त्यानं तिला दुकानातून सॅनिटरी पॅड विकत आणून दिल्यावर तर तिनं ते झिडकारलंच. कारण सॅनिटरी पॅड्‌सवर खर्च केला तर एका वेळच्या जेवणाला काही दिवस तरी मुकावं लागणार होतं, हे तिला पक्कं ठाऊक होतं. पण मुरुगनंथम्‌ला हा प्रश्न सतत भंडावून सोडत होता. बाजारात विकत मिळणारं एक सॅनिटरी पॅड 10 ग्रॅम कापसाचं असूनही ते चार रुपयांना विकलं जात होतं. 10 ग्रॅम कापसाची त्या वेळी किंमत फक्त 10 पैसे होती. म्हणजे कंपनी 40 पट किमतीत हे पॅड विकत होती. त्यामुळं आपण स्वत:च स्त्रियांसाठी अत्यंत स्वस्त आणि परवडणारं सॅनिटरी पॅड बनवलं पाहिजे, असं त्याला वाटायला लागलं. त्या विचारानं त्याचं मन पछाडून गेलं. 

त्यानं स्वत: एक पॅड बनवण्यासाठी बरीच खटपट केली. अनेकदा त्यात अपयश आलं. शांती आणि आजूबाजूचे लोक त्याला हसायचे. पण अथक प्रयत्न करून त्यानं शेवटी तसं पॅड बनवलं आणि शांतीला ते वापरून त्याचा किती फायदा होतो, हे सांगायला सांगितलं. परंतु तिची पाळी नुकतीच होऊन गेल्यामुळे यासाठी त्याला एक महिनाभर थांबावं लागणार होतं. 

शिवाय ती ते पॅड वापरायला फारशी उत्सुक नव्हती. मग त्यानं त्याच्या गावातल्या काही स्त्रियांना याबद्दल विचारल्यावर एक भयंकर सत्य समोर आलं. 10 पैकी जेमतेम एखादी स्त्री मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड वापरायची. उरलेल्या बहुतेक स्त्रिया जुनी फडकी, झाडाची पानं, लाकडाचा भुसा किंवा राख- असं काहीही वापरत असत. शिवाय ही फडकी सर्वांसमोर उन्हात वाळत टाकण्याची बायकांना लाज वाटत असल्यानं ती कडकडीत वाळलेली नसायची. तसंच तीच फडकी पुन:पुन्हा वापरल्यामुळं ते वापरणाऱ्या स्त्रियांना जंतुसंसर्ग होण्याचं प्रमाणही खूपच जास्त होतं. 

सन 2011 मध्ये जेव्हा भारत सरकारच्या वतीनं भारतीय स्त्रियांचं सर्वेक्षण केलं गेलं, तेव्हा संपूर्ण देशात फक्त 12 टक्के स्त्रिया सॅनिटरी पॅड्‌स वापरत असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं प्रजननसंस्थेचे 70 टक्के रोग, कॅन्सरसारखे गंभीर आजार मासिक पाळीदरम्यानच्या अस्वच्छतमुळे होतात, हे सिद्ध झालं. तरीही गावातल्या स्त्रिया मुरुगनंथम्‌नं तयार केलेल्या पॅडचा वापर करण्यासाठी चट्‌कन तयार होईनात. मग मुरुगनंथम्‌नं आपल्या सख्ख्या बहिणींना आपण तयार केलेली सॅनिटरी पॅड्‌स वापरून बघायला सांगितली, पण त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. 

शेवटी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींना त्यानं या प्रयोगासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यात अनेक अडचणी आल्या. शेवटी बऱ्याच प्रयत्नांनंतर 20 विद्यार्थिनी त्याच्या उपक्रमात सहभागी व्हायला तयार झाल्या. स्वत: तयार केलेल्या सॅनिटरी पॅड्‌सबरोबरच त्यानं या मुलींना ‘फीडबॅक फॉर्मस्‌’ही दिले होते. पण फक्त तीन जणींनी आपल्या प्रतिक्रिया व्यवस्थित लिहून दिल्या. या सगळ्या गोंधळात मुरुगनंथम्‌ उगाचच संशोधन करण्याचा बहाणा करून कॉलेजमधल्या मुलींना नादी लावून त्यांच्या पाठीमागं लागतोय, असं शांतीला वाटलं आणि त्या दोघांत बरंच वितुष्ट निर्माण झालं. 

पण त्याच्यापुढे आणखी एक मोठी अडचण होती. त्यानं तयार केलेली पॅड्‌स जोपर्यंत बराच काळ मोठ्या प्रमाणावर वापरून बघितली जात नव्हती तोपर्यंत त्याला काहीच करता येत नव्हतं. पण यासाठी पुन्हा कोण तयार होणार? विचार करून-करून त्याचं डोकं चक्रावून गेलं तेव्हा त्याच्यासमोर एकच भन्नाट पर्याय शिल्लक होता. यानंतर त्यानं जे केलं, ते करण्याचं धाडस आणि तशी कल्पना त्याच्यासारख्याच ध्येयवेड्या, विचित्र व विक्षिप्त माणसाला सुचू शकते. यानंतर मुरुगनंथम्‌ चक्क स्वत: एक ‘मेन्स्ट्रुअल मॅन’ बनला. पाळीव डुकराचं मूत्राशय चामड्याच्या पिशवीत भरून पूर्वी फुटबॉल तयार करत असत. त्यावरून त्याला एक कल्पना सुचली. 

त्यानं एक ‘फुटबॉल ब्लॅडर’ घेतलं. मुरुगनंथम्‌नं मग त्याला थोडी भोकं पाडून त्याचं कृत्रिम गर्भाशय तयार केलं आणि त्याच्या आतमध्ये बोकडाचं रक्त भरलं. त्याचा शाळेपासूनचा एक मित्र खाटिक होता. तो जेव्हा बोकड कापायचा, त्याअगोदर सायकलवरून मुरुगनंथम्‌च्या घरासमोर जाऊन घंटी वाजवायचा. त्यामुळं मुरुगनंथम्‌ला त्याच्या प्रयोगासाठी रक्त गोळा करता यायचं. या रक्ताची गुठळी होऊ नये म्हणून ब्लड बँकेत काम करत असलेला त्याचा दुसरा मित्र त्याला रक्तात मिसळण्यासाठी रसायनं द्यायचा. मग मुरुगनंथम्‌ आपल्या कपड्यांच्या आत रक्तानं भरलेलं हे कृत्रिम गर्भाशय व्यवस्थित जोडून आणि आपण स्वत: बनवलेलं सॅनिटरी पॅड अंतर्वस्त्राच्या आत अडकवून रस्त्यावर फिरायचा. एका बारीक ट्यूबच्या साह्यानं या गर्भाशयातलं रक्त त्या सॅनिटरी पॅडवर सतत खाली गळेल, अशी त्यानं व्यवस्था केली होती. सॅनिटरी पॅड किती रक्त शोषून घेतं, हे त्याला पाहायचं होतं. 

हे करत असताना तो सोडून प्रत्येकाला मुरुगनंथम्‌ला वेड लागलंय असंच वाटायचं. त्याचं सॅनिटरी पॅड अजून परफेक्ट नसल्यामुळे त्यात सगळं रक्त शोषून घेतलं जायचं नाही आणि ते बाहेरही गळायला लागायचं. मग त्याचे रक्तानं भरलेले आपले कपडे तो गावात विहिरीवर धुवायचा. ते पाहून त्याला एखादा गुप्तरोग झाला असल्याची लोकांची खात्रीच झाली. त्याचे मित्रही त्याला टाळायला लागले. तो येताना दिसला की, लोक दुसऱ्या वाटेनं जाणं पसंत करत. इतकंच कशाला- पण जिच्यासाठी हा अट्टहास तो करत होता, ती शांती 18 महिन्यांत मुरुगनंथम्‌च्या या उपक्रमांना कंटाळून त्याला सोडून गेली! 

पण मुरुगनंथम्‌चा निश्चय पक्का होता. त्यानं बनवलेली पॅड्‌स त्याच्या मनासारखी होत नव्हती, त्यातले दोष काढण्याची गरज होती. पण हे करायचं कसं? यासाठी मुरुगनंथम्‌च्या डोक्यात आणखी एक याहून भयानक कल्पना आली. मुलींनी वापरलेली सॅनिटरी पॅड्‌स गोळा करून त्यांचा अभ्यास करायचं त्यानं ठरवलं. मग पुन्हा त्यानं मेडिकलच्या विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड्‌स दिली, वापरून झालेली पॅड्‌स त्यांच्याकडून परत घेतली आणि घराच्या मागच्या अंगणात त्याचा अभ्यास सुरू झाला. आपल्या मुलाचा हा भयंकर पसारा बघून त्याच्या आईनं गाठोडंच बांधलं आणि रडत-रडत तीही घर सोडून गेली! इतकं होऊनही मुरुगनंथम्‌चा उत्साह जराही कमी झाला नव्हता. 

बायको तर आधीच गेली होती, आता आईही सोडून गेल्यानं स्वयंपाक स्वत:च करावा लागणार, एवढीच काय ती खंत त्याला वाटली. आता मुरुगनंथमवर कुणी तरी करणी किंवा जादूटोणा केलाय, असंच गावातल्या माणसांना वाटायला लागलं. मांत्रिकाकरवी त्याला झाडाला उलटा टांगून धुरी देऊन बरा करायचा घाट घालण्याच्याच बेतात ही मंडळी होती. पण याची कुणकुण लागताच मुरुगनंथम्‌नं स्वत:च गाव सोडून जायचा निर्णय घेतला आणि या सामुदायिक उपचारातून(!) आपली सुटका करून घेतली. 

दरम्यान, आपण बनवलेली काही पॅड्‌स त्यानं एका प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली होती आणि या प्रयोगशाळेनं त्याला हे कॉटन आहे, इतकाच रिपोर्ट दिला. तरीही मल्टिनॅशनल कंपन्या ही पॅड्‌स कशी बनवतात, हे त्याला जाणून घ्यायचं होतं. पण तुम्ही सॅनिटरी पॅड्‌स कशी बनवता असं मल्टिनॅशनल कंपनीला हे विचारणं म्हणजे त्याच्याच शब्दांत ‘कोकचं दार ठोठावून त्यांना तुम्ही कोका-कोला कसा बुवा बनवता?’ असं विचारण्यासारखं होतं! मग त्यानं यासाठी एक शक्कल लढवली. त्यानं कॉलेजमधल्या एका प्रोफेसरच्या घरी चक्क घरगडी म्हणून कामाला सुरुवात केली! 

त्या वेळी त्याला इंग्रजी विशेष बोलता येत नव्हतं. परंतु या प्रोफेसरवर छाप पाडून, त्याला पटवून देऊन त्यानं त्याच्यातर्फे बऱ्याच कंपन्यांना पत्रं लिहिली. शिवाय ठिकठिकाणी फोन करण्यात त्यानं स्वत:चे जवळजवळ 7000 रुपये खर्च केले. आपण कोइमतूर इथे एका कापड गिरणीचे मालक आहोत आणि आपल्याला आपला धंदा वाढवायचाय, असं सांगून त्यानं कंपन्यांना त्यांच्याजवळच्या धाग्यांचे काही नमुने आपल्याला देण्याची विनंती केली. यानंतर काही आठवड्यांनी त्याला एका कंपनीकडून चक्क एक पार्सल आलं. त्यात सेल्युलोजपासून बनवलेले जाड पुठ्ठे होते. 

या सेल्युलोजचे गुणधर्मही खूपच मजेदार आहेत. वनस्पती जेव्हा सूर्यप्रकाशात अन्न तयार करतात, तेव्हा साखरेचं रूपांतर त्या सेल्युलोज नावाच्या पॉलिमरमध्ये करतात. ऊन, वारा, पाऊस अशा सगळ्या बदलांना वनस्पतींचं खोड भक्कम तोंड देत उभं राहतं, त्यामागं सेल्युलोजनं पुरवलेली प्रचंड ताकद व लवचिकता असते. सॅनिटरी पॅड्‌स कशापासून बनवतात, हे समजायला त्याला दोन वर्षं लागली. आता मुख्य प्रश्न होता तो महागडं मशीन आणून ती बनवण्याचा! त्यासाठी त्याला हजारो डॉलर्स मोजावे लागणार होते. हे तर त्याच्यासाठी अशक्य आणि आचरटपणाचंच होतं. मग स्वत:च यंत्र बनवून सॅनिटरी पॅड्‌स तयार करायची, असं त्यानं ठरवलं. 

त्यासाठी घरघंटीसारखं एक यंत्र त्यानं तयार केलं. यात सेल्युलोजच्या धाग्यांचं मऊ, हलक्या आणि फ्लफी पदार्थांमध्ये रूपांतर होतं. मग दुसऱ्या एका यंत्रात या पदार्थाच्या आयताकृती वड्या (केक्स) बनतात. नंतर या वड्यांना एका कापडात गुंडाळलं जातं आणि अतिनील प्रकाशकिरणांच्या मदतीनं त्या निर्जंतुक केल्या जातात. मुरुगनंथम्‌नं हे यंत्र व तंत्र कुणालाही वापरता येईल इतकं सोपं, स्वस्त आणि यशस्वी केलं. त्यानं सुरुवातीला लाकडाचं मशीन बनवलं. मद्रास आयआयटीत त्यानं हे यंत्र जेव्हा दाखवलं, तेव्हा तिथले शास्त्रज्ञ ते बघून अवाक्‌ झाले! पण प्रस्थापित मल्टिनॅशनल कंपन्यांशी स्पर्धा करणं हे काही खायचं काम नव्हतं. तरीही आयआयटीयन्सनी त्याचं मॉडेल ‘नॅशनल इनोव्हेशन’च्या स्पर्धेत ठेवलं. 

एकूण 943 जणांनी या स्पर्धेत आपापली संशोधनं ठेवली होती. त्यातून मुरुगनंथम्‌च्या मॉडेलला पहिलं बक्षीस मिळालं. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार देण्यात आला आणि तो एका दिवसात प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आला. वार्ताहर आणि प्रतिष्ठित मंडळी साऱ्यांनी त्याला गराडा घातला. नंतर त्याची बायको, आई सगळेच त्याच्याकडे परत आले. गावकऱ्यांना आता त्याला कुठे ठेवू कुठे नको असं झालं. मुरुगनंथम्‌ला त्याच्या या नवनिर्माणाचं पेटंटही घेता येत होतं. त्यामुळे तो कोट्यधीश होऊ शकला असता. पण त्यानं पेटंट घेणं नाकारलं. लहानपणापासूनच दारिद्य्र आणि अज्ञान यामुळं माणसं मरतात, हे त्यानं बघितलं होतं. म्हणूनच त्यानं आपलं संशोधन सर्वांसाठी खुलं केलं. 

दीड वर्षात त्यानं अडीचशे मशिन्स्‌ बनवली. जिथं सर्वांत जास्त गरिबी आणि सर्वांत जास्त आजारी माणसं होती- अशा भारतातल्या बिमारू (बिहार, मध्यादेश, राजस्थान व उत्तर प्रदेश) राज्यांत यंत्रं आपली त्यानं नेली. ‘मी जर बिहारमधल्या लोकांना पटवून देऊ शकलो, तर मी देशात कुठंही यंत्रं देऊ शकतो, असा मला विश्वास आहे’ असं त्यानं बीबीसीला 4 मार्च 2014 रोजी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. हे यंत्र वापरायला सरसकट सर्वांनी तयारी दाखवली असं नव्हे, परंतु खेडोपाडी प्रचार करून हळूहळू 23 राज्यांतल्या 1,300 खेड्यांतल्या स्त्रियांना यामुळं रोजगार मिळाला. 

आजच्या घडीला बऱ्याचशा एनजीओ आणि महिला गटांकडून मुरुगनंथम्‌च्या मशिन्सना मागणी आहे. संपूर्ण स्वयंचलित मशीन 75,000 रुपयांना आहे. प्रत्येक मशिनमुळं 3000 स्त्रिया सॅनिटरी पॅड्‌स वापरायला लागतात आणि 10 स्त्रियांना रोजगार मिळतो. एका मशीनमधून दिवसाला 200 ते 250 पॅड्‌स बनवता येतात. प्रत्येक सॅनिटरी पॅडची किंमत सरासरी अडीच रुपये आहे. आजही भारतातल्या दुर्गम भागात मुलींना पाळी आल्यामुळं त्यांचं शाळा सोडण्याचं प्रमाण खूप आहे. पण मुरुंगनंथम्‌च्या प्रयत्नांमुळं आज शाळेतल्या विद्यार्थिनी स्वत:च पॅड्‌स तयार करून वापरू शकतात. भारत सरकारनं स्त्रियांना पुरवल्या जाणाऱ्या पॅड्‌सवर सबसिडी घोषित केली, तेव्हा मुरुगनंथम्‌ला या योजनेत सहभागी करून घेतलं नाही. तरीही भारतातल्या एक कोटी गरीब स्त्रियांना रोजगार मिळवून देणं हे त्याचं उद्दिष्टं आहे आणि आता केनिया, नायजेरिया, मॉरिशस, फिलिपिन्स व बांगलादेश इथं त्यानं या यंत्राचा प्रचार करून जगभरातल्या एक कोटी स्त्रियांना रोजगार मिळवून देण्याचं निश्चित केलंय.
 
आज आयआयएममध्ये त्याला मोठ्या गौरवानं भाषण देण्यासाठी बोलवण्यात येतं. त्याचं यू- ट्यूबवरचं भाषणही प्रसिद्ध आहे. ते जरूर ऐकावं. बीबीसीनं घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी त्याला ‘भारताच्या राष्ट्रपतींकडून गौरवलं गेलं तो क्षण तुझ्या आयुष्यातला सर्वांत आनंदाचा होता का?’ असं विचारल्यावर ‘‘उत्तराखंडातल्या अत्यंत दुर्गम खेड्यात कित्येक पिढ्यांमध्ये मुलींना शाळेत पाठवण्याइतकी परिस्थिती नाही. तिथे जेव्हा मी सॅनिटरी पॅड बनवणारं यंत्र बसवून दिलं, त्यानंतर एक वर्षानं तिथल्या एका महिलेचा मला फोन आला आणि हे यंत्र आल्यामुळं तिनं तिची मुलगी शाळेत जायला लागलीये हे सांगितलं; तेव्हा जिथं नेहरूंना अपयश आलं तिथं एक यंत्र यशस्वी झालं, हा क्षण माझ्या आयुष्यातला सर्वांत अभिमानाचा व आनंदाचा होता’’ असं तो म्हणाला होता! 

उद्योजकता आणि संशोधन कुठे व कसं उमलेल व फुलेल हे सांगता येत नाही. पण अशा हजारो/लाखो मुरुंगनंथम्‌ना सरकारने प्रोत्साहन, प्रशिक्षण, भांडवल आणि बाजारपेठ मिळवून देण्यात मदत केली, तर अशा शेकडो वस्तू लघु/मध्यम क्षेत्रात तयार होऊ शकतील. त्यामुळे रोजगारही निर्माण होईलच; पण त्यामुळे उगाचंच मल्टिनॅशनलकडून आपण शर्टस, पँट्‌स, चड्ड्या, पेनड्राइव्हज, मोबाईल फोन्स, त्याच्या ॲक्ससरीज, आरोग्याला हानिकारक नसलेली अनेक शीत पेयं, खाण्याचे पदार्थ, सौंदर्यप्रसाधनं अशा असंख्य गोष्टी ज्या जास्त किमतीला विकत घेतो ते थांबेल; त्या गोष्टी भारतात कमी दरानं मिळायला लागतील. त्यामुळे खऱ्या अर्थानं ‘मेक इन इंडिया’ सुरू होऊन परकीय चलन वाचेल आणि रुपया वधारेल. तसं झालं तर, उद्याचा भारत कुठल्या कुठे जाईल! 

(आगामी ‘रक्त’ या पुस्तकातून.) 

अच्युत गोडबोले 
achyut.godbole@gmail.com  
वैदेही लिमये
vaidehi1in@yahoo.com 
 

Tags: सॅनिटरी पॅड सॅनिटरी पॅड मॅन मुरुगनंथम्‌ मासिक पाळी blood rakta book make in india pratibha patil madras iit selulose arunachalam muruganantham womens’ health health koimatur tamilnadu arundhati roy barak obama narendra modi sanitary pad sanitary pad man murugnantham periods रक्त मेक इन इंडिया प्रतिभा पाटील मद्रास आयआयटी सेल्युलोज अरुणाचलम मुरुगनंथम्‌ आरोग्य कोइमतूर तमिळनाडू अरुंधती रॉय बराक ओबामा नरेंद्र मोदी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अच्युत गोडबोले
achyut.godbole@gmail.com

तंत्रज्ञ, मराठीतील लेखक आणि वक्ते 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके