डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बर्मिंगहॅम अधिवेशनातील भाषण

या वर्षी साधना साप्ताहिकाच्या तिन्ही दिवाळी अंकांत चार अतिशय कर्तबगार स्त्रियांची महत्त्वाची भाषणे अनुवादित करून घेतलेली आहेत. बालकुमार अंकात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन व मिशेल ओबामा तर युवा अंकात म्यानमारमधील लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की यांची भाषणे घेतलेली आहेत. या मुख्य दिवाळी अंकात ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांचे भाषण अनुवादित करून घेतलेले आहे. थेरेसा मे म्हणजे ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर आलेली दुसरी महिला. त्यांना पाहून कोणालाही मार्गारेट थॅचर यांची आठवण होऊ शकते. कणखरपणा आणि कर्तबगारी या दोन्ही घटकांबाबत दोघींमध्ये अनेक साम्यस्थळे दाखवता येतील. थेरेसा मे यांचे हे भाषण 5 ऑक्टोबर 2016 रोजी हुजूर पक्षाच्या अधिवेशनात झाले आहे. भाषणाची पार्श्वभूमी समजून घेतली तर त्यातील कंटेंटचा अर्थ लावणे सोपे जाईल. 

ब्रिटनमध्ये जून महिन्यात सार्वमत झाले आणि त्यामध्ये कोणालाही अपेक्षित नसलेला असा (ब्रिटनने युरोपीय युनियनमधून बाहेर पडायला हवे) कौल लागला. सार्वमतानंतर ब्रिटनचे आणि युरोपीय युनियनचे काय होणार असा प्रश्न विचारला जात आहे. अजूनही त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर कोणालाही देता येत नाही. मात्र ब्रिटन आता आर्थिक अडचणी आणि राजकीय निष्क्रियता यांच्या दिशेने वाटचाल करू लागेल अशी भीती व्यक्त केली जात होती. अशा वेळी थेरेसा मे यांनी देशाची आणि पक्षाची सूत्रे हाती घेतली आहेत. या भाषणात थेरेसा मे यांनी एकाच वेळी अनेकविध घटकांना मेसेज देत ब्रिटनसाठी आपली काय व्हिजन असणार आहे, याची चुणूक दाखवून दिली आहे. ब्रिटनच्या दृष्टीने जरी येणारा काळ कठीण असला तरी आपण या संकटाचे रूपांतर संधीत करणार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. ब्रिटनच्या सर्वंकष अंतर्गत सुधारणेच्या दिशेने पावले टाकायला हवीत आणि ती काय असतील याचे सुतोवाच त्यांनी या भाषणात केले आहे. एकाच वेळी उद्योगपती आणि सर्वसामान्य जनता, मध्यमवर्ग आणि विरोधी राजकीय पक्ष, युरोपातील मित्र आणि स्कॉटलंडमधील फुटीरतावादी अशा सर्वांबाबत त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. या नेमक्या काय भूमिका आहेत, हे भाषणात आले आहे. मात्र हे भाषण वाचताना सातत्याने जाणवत राहते ते म्हणजे समजूतदार आणि शहाणपणा अंगी मुरलेल्या लोकशाहीतील नेते किती जबाबदार असू शकतात. विशेषतः भारताशी तुलना केली तर ते फारच तीव्रतेने जाणवते. गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाचे पूर्ण बहुमतातले सरकार पंचवीस वर्षांनी आले आहे. मजूर पक्षाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. थेरेसा मे आपल्या भाषणात मजूर पक्षावर टीका करतात, त्यांचे दोष दाखवतात आणि तरीही आपल्या पक्षातल्या लोकांना सांगतात की, मजूर पक्ष अशा अवस्थेत असल्यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे! शासन आणि जनता अशा दोन्ही स्तरांवर हुजूर पक्षाला लोकांचे प्रतिनिधित्व करणे आणि राज्यकारभार चालवणे अशी दुहेरी कसरत आता पार पाडायची आहे. ब्रिटनला कायमचे ‘मजूर पक्ष मुक्त’ करण्याची उन्मादी हाक त्या देत नाहीत. तसेच ब्रिटन युरोपीय गटातून बाहेर पडणे म्हणजे एक प्रकारे युरोपात आंतरराष्ट्रीयवादाचा पराभव झालेला आहे. अशा वेळी अतिरेकी राष्ट्रवादी आणि संकुचित लोकानुयायी भूमिका घेणे फारच सोयीचे असते. मात्र थेरेसा मे चुकूनही तसा अतिरेक किंवा संकुचितपणा करताना दिसत नाहीत. उलट आपल्याला मध्यममार्गावरून जायचे आहे आणि सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे असा आश्वासक सूर त्या लावतात. त्यामुळे ब्रिटनपुढे कठीण कालखंड असला तरी ब्रिटिश राजकीय व्यवस्था त्यातून नक्कीच मार्ग काढेल आणि पुन्हा एकदा ब्रिटन नव्याने भरारी घेईल असा विश्वास हे भाषण जसजसे वाचत जावे तसा मनात येतो. आणि थेरेसा मे यांच्याविषयीचा आदर क्रमाक्रमाने वाढत जातो!

 -संकल्प गुर्जर  

या आठवड्यात जेव्हा आम्ही बर्मिंगहॅमला आलो, तेव्हा लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. या वर्षीच्या जून महिन्यात ब्रिटनने युरोपीय गटातून बाहेर पडावे, असा कौल सार्वमतात जनतेने दिल्यानंतर तयार झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरील हे प्रश्न होते. युरोपीय गटातून बाहेर कसे पडावे याच्यासाठी आमच्या सरकारकडे काही योजना आहे काय? हो, आहे. ती योजना पार पाडण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील, त्याला आमची तयारी आहे काय? याचेही उत्तर ‘हो’ असेच आहे. बोरिस जॉन्सन हे परराष्ट्रमंत्री कोणत्याही विषयावरील आपल्या मतावर सलग चार दिवस ठाम राहू शकतात का? काही वेळा! पण मला हे माहीत आहे की, आणखी एक मोठा प्रश्न आहे- ज्याविषयीचे माझे उत्तर लोकांना हवे आहे. ‘ब्रिटनच्या भविष्याकडे मी कोणत्या दृष्टीने पाहते?’ हा तो प्रश्न आहे. या प्रश्नाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन कसा आहे, मी कोणत्या दिशेने ब्रिटनला नेऊ इच्छिते, हे जाणून घेण्यात लोकांना रस आहे, हे मला माहीत आहे. आज मी त्या प्रश्नाचे थेट उत्तर देणार आहे.

युरोपीय गटातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटन कसे असेल, याविषयीची माझी ‘व्हिजन’ मी तुमच्यासमोर मांडणार आहे. एखादा देश सर्व जनतेला आपलासा का वाटतो, याचे उत्तर मी देणार आहे. आपला पक्ष आणि आपला देश ब्रिटिश राजकारणाच्या एका नव्या केंद्रबिंदूच्या दिशेला नेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ही अशी दिशा असेल, जी संधी आणि प्रामाणिकपणा या दोन मूल्यांवर आधारलेली असेल. जिथे प्रत्येकाला समान नियम लागू असतील आणि प्रत्येक व्यक्तीला तिची किंवा तिच्या पालकांची पार्श्वभूमी काहीही असली तरी हवे ते करण्याची संधी मिळू शकेल, अशी ही दिशा असेल. आणि हे सर्व करीत असताना मला याची पूर्ण जाणीव आहे की- अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्ती नसेल, तर कोणत्याही व्हिजनला काहीही अर्थ नसतो.

कोणतीही व्हिजन पूर्णत्वास नेण्यासाठी आपला वेळ आणि प्रयत्न यांची आवश्यकता असते. तसे जर आपण करू शकलो, तर मोठ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. मोठे बदल घडून येऊ शकतात. ब्रिटनला याचीच आज गरज आहे. कारण जून महिन्यात लोकांनी बदलाच्या दिशेने कौल दिला आहे आणि मला हे खात्रीपूर्वक सांगायला हवं की, बदल नक्कीच घडून येणार आहे. ब्रिटनमध्ये नक्कीच बदल घडून येणार आहे, कारण आता आपण युरोपीय गटातून बाहेर पडणार आहोत आणि आपल्या भविष्याचे नियंत्रण आपल्या हाती घेणार आहोत.

ब्रिटनसमोर दीर्घ काळापासून असलेल्या आव्हानांकडे आपल्याला नव्याने लक्ष द्यावे लागणार आहे. उदा. भविष्यकाळातील कामाचे स्वरूप लक्षात घेता, आवश्यक त्या प्रमाणात लोकांना प्रशिक्षित करणे. ब्रिटनने युरोपीय गटात राहू नये असे मत तीन महिन्यांपूर्वी आपल्या देशातील लक्षावधी लोकांनी व्यक्त करून हे दाखवून दिले की, आपल्याकडे झालेले दुर्लक्ष सहन करण्यास लोक तयार नाहीत. असे मतदान होणे ही एक शांतपणे घडून आलेली अशी क्रांतीच आहे. आपल्या देशाच्या दृष्टीने पाहता, हा एक टर्निंग पॉइंट आहे. त्यामुळेसुद्धा देशात बदल घडून येणार आहे. देशाचे मार्गक्रमण ज्या दिशेने होत आहे, त्या दिशेत देशाच्या भवितव्यासाठीच बदल करता येईल अशी अनेक पिढ्यांमधून एकदाच येणारी संधी आज आपल्यासमोर आहे.

आज आपण जरा शांत राहून असा विचार करायला हवा की, आपल्याला कशा प्रकारचा देश हवा आहे? असा विचार करताना हे लक्षात असू द्या की, गेल्या सहा वर्षांत आपण फार मोठी मजल मारलेली आहे. आपण आर्थिक तूट कमी करण्यात यशस्वी झालो आहोत. कधीही नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना आपण रोजगार दिलेला आहे. अल्प उत्पन्न गटातल्या जनतेला कराच्या जाळ्यातून बाहेर काढले आहे. किमान राहणीमानासाठी आवश्यक असे नवे मापदंड आपण तयार केले आहेत. साधारणतः दहा लाखांच्या आसपास नवे उद्योग स्थापन करण्यात आणि त्यांची वाढ घडवून आणण्यात आम्ही मदत केली आहे. जवळपास पंधरा लाख मुलांना चांगल्या किंवा उत्तम शाळांमध्ये आपण दाखल केले आहे. राष्ट्रीय आरोग्य योजनेमध्ये विक्रमी म्हणावी इतकी गुंतवणूक केली आहे. तीस लाख तरुणांना संधी मिळावी अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले आहेत. गुन्हेगारीमध्ये पंचवीस टक्क्यांहून अधिक मोठ्या प्रमाणात घट घडवून आणलेली आहे. यापूर्वी कधीही नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आज कमी झालेली आहे, हे असे रेकॉर्ड आहे ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटायला हवा.

हे सर्व अभिमानास्पद रेकॉर्ड ज्याच्यामुळे शक्य झाले, अशा व्यक्तीचे आज आपण इथे आभार मानणार आहोत. ह्या व्यक्तीने आपण बदल करावेत यासाठी आपल्या विचारप्रक्रियेला आवाहन केले आणि असे स्वप्न दाखवले की, जर आपण बदललो तर आपण पुन्हा जिंकू शकू. इथे हे सांगते की, ती व्यक्ती योग्य होती. आपण आपल्यात बदल घडवून आणले आणि आपण खरेच जिंकलोसुद्धा. पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच हुजूर पक्षाचे पूर्ण बहुमतातले सरकार केवळ त्या व्यक्तीमुळे सत्तेत येऊ शकले. आपल्या पक्षाचे नेते आणि आपल्या देशाचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचे मी आज आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानते. आता आपल्याला पुन्हा एकदा बदलाच्या दिशेने वाटचाल करायची आहे.

जूनमधील सार्वमत हे काही केवळ युरोपीय गटातून बाहेर पडावे यासाठीचे नव्हते. युरोपीय गट ज्याचे प्रतीक बनले आहे, अशा प्रतीकात्मक गोष्टींच्या विरुद्धसुद्धा हे मत होते. युरोपीय गटाच्या अनुभवामुळे अनेक जणांचा खोलवर रुजलेला, ठाम झालेला आणि बऱ्याचदा योग्य असलेला असा समज झाला आहे की- हे जग केवळ काही निवडक जणांसाठीच चांगल्या रीतीने काम करते. इतरांसाठी काहीही करत नाही. त्यामुळे जूनमधले मतदान हे ब्रिटन आणि युरोपीय युनियन यांचे परस्परांतील  संबंध बदलले जावेत एवढ्याचसाठी मर्यादित नसून, बदल घडून यावा यासाठी दिलेली ती एक हाक आहे. आपला देश कसा काम करतो आणि तो कोणासाठी काम करतो, यात कायमचा बदल घडवून यायला हवा यासाठीचेसुद्धा ते मत आहे. देशातील कोणत्याही घरी गेलात तरी तुम्हाला थोड्याफार फरकाने हीच भावना व्यक्त झालेली आढळेल. क्रांतीची बीजे असलेली अशी ही भावना सार्वत्रिक आहे.

सर्वांचे भले व्हावे, या दिशेने आपला समाज जायला हवा. परंतु तुम्हाला घर विकत घेता येत नसेल किंवा तुमच्या मुलाला उत्तम शाळेत पाठवता येत नसेल तर असे वाटते की, हा समाज तुमच्या भल्याच्या दिशेने चाललेला नाही. आपली आर्थिक व्यवस्थासुद्धा सर्वांच्या हितासाठी काम करत राहायला हवी. पण जर सलग अनेक वर्षे तुमच्या पगारात वाढ होत नसेल आणि खर्च वाढत चालला असेल, तर ती आर्थिक व्यवस्था सर्वांसाठी काम करत नाही असे वाटते. सर्व जनतेचे हित साधले जावे या दिशेने आपल्या लोकशाहीचीसुद्धा वाटचाल होत राहायला हवी. परंतु जर अनेक वर्षे तुम्ही बदल व्हायला हवा अशी तक्रार करत असाल आणि तरीही तुमचे म्हणणे ऐकले जात नसेल, तर तुमची लोकशाही तुमच्यासाठी काम करत नाहीये, असे वाटते.

या पार्श्वभूमीवर आपण हे समजून घ्यायला हवे की, क्रांतीची बीजे तर खोलवर रुजलेली आहेत. कारण 2008 च्या आर्थिक मंदीमध्ये श्रीमंतांचे फारसे नुकसान झालेच नाही. खरे नुकसान तर सर्वसामान्य, कष्टकरी वर्गातून आलेल्या जनतेचे झाले. मंदीच्या काळात तुमची नोकरी गेली असेल किंवा कामावर आहात परंतु कमी काम दिले जात आहे किंवा एका बाजूला खर्च वाढत असतानाच पगारात घट झाली असेल, असे अनेक जण असू शकतात. मला हे माहीत आहे की, लोकांना हे मान्य करायला आवडणार नाही, पण जर अनेकांना केवळ स्थलांतरित कामगारांमुळे नोकरी गमवावी लागली असेल किंवा पगार कमी झाला असेल, तर अशा वेळेस आयुष्याचा खेळ हा अन्यायकारक नियमांनी खेळला जातोय, असे वाटते. असे वाटत राहते की, इतरांच्या हितासाठी आमच्या स्वप्नांचा बळी दिला जातोय. त्यामुळे बदल होणे तर अपरिहार्य आहे. कारण जर आपण आज प्रतिसाद दिला नाही, लोकांच्या इच्छेला अनुसरून आवश्यक ते बदल केले नाहीत, तर अन्यायाची भावना वाढतच जाईल. समाजातील भेदाभेद अधिक ठळक होत जातील. असे होणे ब्रिटनसाठी एखाद्या संकटासारखे असेल.

ब्रिटनचा धडा असा आहे की- आपला देश हा कुटुंब, समाज, नागरिकत्व आणि भक्कम संस्थात्मक जाळे यांच्यावर आधारलेला आहे. माझ्या आई-वडिलांच्या पिढीने जो ब्रिटन घडवला होता, त्यात सार्वजनिक हितासाठी काही तरी काम करायला हवे असा माझ्यावर संस्कार केला गेला. तसेच हा असा देश होता, जिथे समाजाला काही तरी परत द्यायला हवे या भावनेने काम करणारे लोक आजूबाजूला सर्वत्र दिसत असत. उदा.- मला असे पालक माहीत होते, जे आठवडाभर भरपूर काम करत असत आणि तरीही हौसेने सुट्टीच्या दिवशी आपल्या मुलाच्या फुटबॉल टीमला प्रशिक्षण द्यायला जात असत. माझ्या मतदारसंघातील स्थानिक व्यापारी मला माहीत आहेत, जे गेली पन्नास वर्षे समाजासाठी काही तरी काम करीत आहेत. गेल्याच आठवड्यात माझी ज्यांच्याशी भेट झाली असे आपल्या संरक्षणदलांतील लोक आहेत, जे देशात आणि देशभर सेवा करताना आपला गणवेश अतिशय अभिमानाने घालतात.

ब्रिटन हा एक असा देश मानला जात होता की- जिथे सौजन्य, प्रामाणिकपणा आणि संयत खंबीरपणा यांचे मिश्रण झालेले आहे. एक असा देश- जो यशस्वीसुद्धा आहे. आकाराने लहान असूनसुद्धा ज्याची प्रतिष्ठा मोठी आहे, असा देश. जगातील एक टक्क्याहून कमी लोकसंख्या असूनही अमेरिकेच्या खालोखाल नोबेल पारितोषिके मिळवणारा देश. (नोबेल पारितोषिकांच्या संख्येत कालच आणखी तीनने वाढ झाली, ज्यापैकी दोघे जण तर तुमच्या या बर्मिंगहॅम शहरात काम करत होते.) एक असा देश- जिथे जगातील दहांपैकी तीन सर्वोत्तम विद्यापीठे आहेत. जगाचे मोठे आर्थिक केंद्र असलेला हा देश. तसेच असा देश- जेथील बीबीसी आणि राष्ट्रीय आरोग्य योजना यांसारख्या संस्था जगभरात नावाजल्या जातात. हे सर्व शक्य झाले, कारण आपण एक युनायटेड किंग्डम आहोत. इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड असे चार घटक एकत्र असलेले युनायटेड किंग्डम. आपली ही ऐतिहासिक काळापासून चालत आलेली एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी मी कायम प्रयत्न करेन, फुटीरतावादी राष्ट्रवाद्यांना आपल्यात फूट पाडू देणार नाही.

मात्र असे असले तरीही आज आपल्या समाजात मला सर्वत्र भेदाभेद आणि अप्रामाणिकपणा दिसत आहे. आपल्यातील हे भेद सुखी व संपन्न अशी जुनी पिढी आणि  संघर्ष करणारी नवी पिढी यात आहेत. तसेच लंडन शहराची श्रीमंती आणि देशाच्या इतर भागातील तुलनेने असलेली गरिबी यात दिसून येत आहेत. परंतु कदाचित सर्वांत मोठा भेद हा श्रीमंत, यशस्वी व सामर्थ्यवान लोक आणि देशातील इतर सर्वसामान्य जनता यांच्यात आहे. माझ्या मताचा तुम्ही विपर्यास करून घेऊ नका. आपण यशाला महत्त्व देतो, आपल्याला अधिकाधिक लोक यशस्वी व्हायला हवे आहेत. परंतु यशाबरोबरच आपण आणखी एका मूल्याला महत्त्व देतो आणि ते म्हणजे नागरिकत्वाचे स्पिरिट. नागरिकत्वाचे स्पिरिट म्हणजे आपल्या समाजाला कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक असे नियम आणि जबाबदाऱ्या होत. ते स्पिरिट म्हणजे आपल्या आजूबाजूस असलेल्या, तुमच्यासाठी काम करणाऱ्या, तुम्ही विक्री केलेल्या वस्तू आणि सेवा जे तुमच्याकडून विकत घेतात त्यांच्याप्रति असलेले उत्तरदायित्व होय. नागरिकत्वाचे स्पिरिट असणे म्हणजे तुम्ही बाहेरच्या देशातून आलेल्या स्वस्त आणि स्थलांतरित कामगारांना कामावर ठेवण्याआधी आपल्या देशातील स्थानिकांना प्रशिक्षित करणे. समाजाचे इतर घटक जसे वागतात तसेच तुम्हीसुद्धा वागणे आणि तुमचे कर प्रामाणिकपणे भरणे.

पण आज असे दिसते की, सत्तास्थानी असलेले असंख्य लोक असे वागतात, जसे काही त्यांचे देशातील सर्वसामान्य जनतेपेक्षा आंतरराष्ट्रीय उच्चभ्रू वर्तुळाशी जास्त साम्य आहे. पण जर तुम्हाला असे वाटत असेल की आम्ही जगाचे नागरिक आहोत, तर अशा वेळी तुम्ही कुठल्याच देशाचे नागरिक नसता. नागरिकत्व या संकल्पनेचा अर्थ काय, हेच तुम्हाला कळलेले नसते. त्यामुळे जर तुम्ही कंपनीचे मालक असूनसुद्धा तुमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे हित पाहत नसाल, एखादी आंतरराष्ट्रीय कंपनी चालवत असाल जिला स्थानिक कर भरण्यात रस नसेल, एखादे घरोघरी पोहोचलेले नाव असाल आणि तरीही दहशतवादाशी लढायलासुद्धा शासनाशी सहकार्य करत नसाल किंवा एखाद्या कंपनीचे डायरेक्टर असाल आणि कंपनीतील लोकांच्या पेन्शनसाठी ठेवलेले पैसे बुडालेले आहेत याची जाणीव असूनही कंपनीद्वारेच भरपूर अतिरिक्त उत्पन्न कमावणार असाल, तर इथून पुढे हे चालणार नाही. मी ते होऊ देणार नाही याची आताच वॉर्निंग देत आहे.

एक बदल होणे अपरिहार्य आहे आणि आपला हुजूर पक्ष तो बदल घडवून आणणार आहे. ब्रिटनसाठी माझी काय व्हिजन आहे, हे तुमच्यासमोर आज मला मांडायचे आहे. मी असा ब्रिटन पाहते आहे, जिथे सर्वांना समान नियम लागू असतील आणि प्रत्येकाला आपली स्वप्ने साकार करायची संधी मिळू शकेल. अशी एक योजना आपल्याला आखायची आहे, जिच्या माध्यमातून आपल्यामध्ये भेदाभेद करणारा अन्याय आणि अप्रामाणिकपणा यांचा सामना करून नवा ब्रिटन घडवता येईल. अशी योजना जिच्यामध्ये सरकार मोठी जबाबदारी उचलेल. चुकीच्या गोष्टी थांबवणे, तयार झालेल्या हितसंबंधांना आळा घालणे, महत्त्वाचे निर्णय घेणे, आपल्याला जे योग्य वाटते त्या दृष्टीने पावले उचलणे. थोडक्यात म्हणजे, कामे करणे. कारण प्रत्येक सरकार अशा पद्धतीने चांगली कामे करू शकते आणि तशी कामे करता यावीत यासाठीच मी राजकारणात-सत्ताकारणात आहे.

अशक्तांसाठी त्यांच्या बाजूने उभे राहणे आणि सशक्तांच्या दबावासमोर न झुकता काम करणे, हेच कोणत्याही चांगल्या शासनाकडून अपेक्षित असते. सरकारी सामर्थ्य सामान्य जनतेच्या हितासाठी वापरता यावे, हेच माझ्या नजरेसमोर असलेले उद्दिष्ट आहे. कारण अनेकदा असे लक्षात येते की, आपल्याला तसे होताना दिसत नाही. याचे उदाहरणच हवे असेल तर- राजकीय नेते आणि राजकारणावर भाष्य करणारे लेखक सामान्य जनतेविषयी कशा प्रकारे बोलतात ते पाहा. त्यांना तुमचा राष्ट्रवाद आवडत नाही. स्थलांतरित लोकांविषयी तुम्हाला वाटणारी चिंता हे त्यांना तुमच्या संकुचित वृत्तीचे द्योतक वाटते. गुन्हेगारीविषयीचे तुमचे मत उदारमतवादी नाही, असे त्यांना वाटते. नोकरीच्या सुरक्षेविषयी असलेली तुमची चिंता त्यांना अडचणीची वाटते. दीड कोटीहून अधिक जनतेने युरोपीय गटातून बाहेर पडावे असा कौल कसा दिला, याचेच त्यांना आश्चर्य वाटते. असे का होत असावे यामागील कारणमीमांसा मला तुमच्यासमोर मांडू दे.

जर तुम्ही चांगल्यापैकी कमावणारे आणि संपन्न घरातून आलेले असाल, तर तुम्हाला दिसणारे ब्रिटन वेगळे आहे. वर मांडलेल्या चिंता या तुमच्यासाठी नाहीत. त्यामुळे अशा गटातील लोकांच्या दृष्टीने या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे चालू शकते. सरकारने अधिकाधिक क्षेत्रांतून माघार घ्यावी आणि लोकांना जास्तीत जास्त स्वातंत्र्याचा उपभोग घेता यावा, असे म्हणणे फार सोपे आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिले तर असे दिसते की, एक बदल येऊ घातलेला आहे. सरकार काय काय प्रकारे चांगले काम करू शकते याची आपण आता दखल घेणे आवश्यक  आहे. आपल्याला असा दृष्टिकोन विकसित करायला हवा की, ज्यानुसार सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे जरी नसली तरी सरकार समाजाच्या हितासाठी काम करू शकते, हे आपण मान्य करू शकतो. असा दृष्टिकोन- ज्यानुसार एखादी व्यक्ती, समूह किंवा मार्केट जे देऊ शकत नाही ते सरकार देऊ शकते. सरकारी सामर्थ्याचा वापर सामान्य लोकांच्या हितासाठी करता येऊ शकेल, असा तो दृष्टिकोन असेल.

समाजवादी डावे आणि अतिरेकी स्वातंत्र्यवादी उजवे या दोन्हींना नाकारण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला असा मध्यम मार्ग निवडायचा आहे, ज्यानुसार सरकार माघार घेणार नाही तर उलट पुढाकार घेईल. आपल्या सर्वांच्या वतीने चांगले काम करण्यासाठी सरकार पुढाकार घेईल. गुन्हेगारीपासून तर सरकार संरक्षण देईलच, पण त्याचबरोबर आरोग्यसुविधा आणि रोजगार देण्यासाठीही सरकार काम करेल. आम्ही खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थक तर आहोतच; पण जेव्हा जेव्हा मार्केट्‌स योग्य रीतीने काम करीत नाहीयेत असे लक्षात येईल, तेव्हा आम्ही मार्केटमध्ये हस्तक्षेप करू. जरी आम्ही उदारमतवादी आर्थिक धोरण स्वीकारलेले असले आणि उद्योगांना प्रोत्साहन देत असलो तरी याचा अर्थ असा नव्हे की, काही लोकांसाठी वेगळे नियम लागू होतील.

जर आम्ही अन्याय व अप्रामाणिकपणा रोखण्यात यशस्वी झालो आणि सरकारी सामर्थ्य सामान्य लोकांसाठी वापरू शकलो, तर नवा ब्रिटन घडवण्यात आपण यशस्वी होऊ. असा ब्रिटन- जिथे सर्वांना समान नियम लागू होतील, जिथे सामर्थ्यवान आणि सशक्त लोकांसाठी सामान्य लोकांचे हितसंबंध बाजूला टाकले जाणार नाहीत. मला हे माहीत आहे की, फक्त आम्हीच हे करू शकतो. मागील आठवड्यात मजूर पक्षाचे जे अधिवेशन झाले त्यावरून मला जाणवले की- मजूर पक्षात केवळ गट-तट पडले आहेत असे नव्हे, तर ते फुटीचेच राजकारण करीत आहेत. एकाला दुसऱ्याविरुद्ध लढवणे, सूडबुद्धीने वागणे, एकमेकांचे जुने हिशेब चुकते करणे आणि लोकांमध्ये अधिक फाटाफूट होईल अशी उद्देशहीन आंदोलने करणे, हे करण्यात मजूर पक्ष गुंतलेला आहे. पक्षांतर्गत लढाई करण्यात, स्वत:च्याच खासदारांना नावे ठेवण्यात आणि त्यांची कारकीर्द संपवण्याच्या धमक्या देण्यात, सेमेटिक धर्मांच्या विरोधी होणारा प्रचार खपवून घेण्यात आणि द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना पाठिंबा देण्यात मजूर पक्ष मश्गूल झालेला आहे. काही लोक त्यांना काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे काय? मजूर पक्षाला ते ‘खोडसाळपणा करणारा पक्ष’ असे म्हणतात.

आज अशी परिस्थिती आलेली आहे की- मजूर पक्ष अंतर्गतरीत्या विभागलेला, फाटाफुटीचे राजकारण करणारा आणि वस्तुस्थितीपासून फार बाजूला फेकला गेलेला असल्याने आपल्यावर असलेली जबाबदारी वाढली आहे. सर्व देशाचे प्रतिनिधित्व करण्याची आणि सर्व देशाचा राज्यकारभार नीट हाकण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. जिथे मजूर पक्ष लोकांना एकमेकांपासून तोडतो आहे, त्याच वेळी आपला हुजूर पक्ष लोकांना जोडण्याचे काम करतो आहे.

आपले हे लोकांना जोडण्याचे काम म्हणजे ब्रिटनला सर्वसामान्य लोकांसाठी सुसह्य बनवता येणे, लंबक सर्वसामान्य लोकांच्या दिशेने झुकवणे, श्रीमंत व निवडक लोकांनाच ज्या संधी मिळत आहेत त्या सर्वांसाठी उपलब्ध होतील अशी व्यवस्था करणे, आपल्या उद्दिष्टांच्या केंद्रस्थानी प्रामाणिकपणा व वाजवीपणा आणणे... असा देश उभा करणे जिथे कष्टाचे चीज होईल आणि गुणवत्तेचे स्वागत केले जाईल, असा देश जिथे काही तरी घेण्यापेक्षा काही तरी परत देण्याला जास्त महत्त्व प्राप्त होईल. संपत्तीपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिले जाईल, असा देश आपल्याला उभा करायचा आहे. असा ग्लोबल ब्रिटन- जो आत्मविश्वासाने भारलेला असेल; जो ग्लोबलायझेशनकडे पाठ फिरवणार नाही, तर उलट त्याचे फायदे सर्वांना कसे मिळू शकतील याची व्यवस्था करेल. तो एक संपन्न व सुरक्षित देश असेल जिथे प्रत्येकाला देशाच्या समृद्धीचा फायदा घेता येईल आणि आपले आयुष्य कोणत्याही प्रकारच्या भीतीशिवाय व्यतीत करता येईल. सर्वांना आपलासा वाटणारा, सर्वांसाठी काम करणारा देश असे मी म्हणते, तेव्हा हे चित्र मला अभिप्रेत आहे.

सरकार समाजाच्या हितासाठी काम करू शकते असा विश्वास जर आपण ठेवणार असू, तर लोकांना हवा असलेला बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी आपल्यावर विेश्वास टाकायला हवा. जसे मी रविवारी म्हणाले होते तशी अगदी साध्या-साध्या गोष्टींपासून आपण सुरुवात करू शकतो. उदा.- आपण आता तरी आपल्यातील वादावादी थांबवायला हवी आणि 23 जूनच्या सार्वमताद्वारे लोकांनी आपल्याला जे सांगितले आहे, त्याचा आदर करायला हवा. त्यानुसार ब्रिटनला युरोपियन युनियनच्या बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी. कारण प्रस्थापित मताच्या विरोधात जाणे, धमक्यांना भीक न घालणे आणि मताच्या माध्यमातून आपला आवाज उठवणे हा ब्रिटिश स्थायिभाव मानला जाईल अशा संयत निर्धाराशिवाय शक्य नाही. आता तोच निर्धार आपण आपल्याशी बाळगायला हवा. इथून पुढे काय होणार आहे, याबाबत आपल्या मनात कोणताही किंतु असायला नको.

ब्रिटनला युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे यासाठी आवश्यक असलेले युरोपीय कायद्यातील 50 वे कलम मार्च 2017 च्या पूर्वी लागू केले जाईल. संसदेच्या पुढच्या अधिवेशनात युरोपियन समूहविषयक कायदा रद्द करावा, यासाठी आवश्यक असलेले बिल आणले जाईल. इथून पुढे आपले कायदे ब्रुसेल्समध्ये न बनता, ब्रिटनमध्येच बनतील. आपले न्यायाधीश आता लक्झेम्बर्गमध्ये न बनता आपल्याच देशात बनतील. युरोपियन युनियनचे कायदे या देशाला इथून पुढे कधीही लागू केले जाणार नाहीत. लोकांनी आपल्याला सार्वमतातून असे व्हायला सांगितले आहे आणि आपले हे हुजूर पक्षाचे सरकार त्यानुसार वागणार आहे. पण अर्थात युरोपीय गटाबरोबर कोणत्या प्रकारचे करार केले जातील, हे आताच नेमके सांगता येणे अवघड आहे. होणाऱ्या वाटाघाटी अतिशय कठीण असतील, हे नक्की. त्यात देवाण-घेवाण या दोन्हींचा समावेश असेल. आणि या वाटाघाटी चालू असताना नेमके काय होत आहे हे जाणून घेण्यासाठी खूपच दबाव असेल, मात्र तसे जाहीर करणे राष्ट्रीय हिताचे नसेल.

काय प्रकारचे करार आम्ही करू इच्छितो, आमची विचारप्रक्रिया कशी असेल याबाबत मी तुम्हाला काही मार्गदर्शक तत्त्वे सांगू शकते. आपल्या युरोपीय मित्रांबरोबर ज्या प्रकारचे घनिष्ठ आणि समजूतदारपणाचे नाते आपण इतकी वर्षे जपले आहे, ते कायम रहायला हवे. कायद्याचे पालन आणि दहशतवादविरोध या क्षेत्रांतील सहकार्य चालूच राहावे, या दृष्टीने काही तरतुदी असायला हव्यात. वस्तू आणि सेवा यांमध्ये खुला व्यापार चालू राहायला हवा. ब्रिटिश कंपन्यांना युरोपीय सामाइक मार्केटमध्ये आणि युरोपीय उद्योजकांनासुद्धा ब्रिटिश मार्केटमध्ये अधिकाधिक खुलेपणाने सहभागी होता यावे. एकूणात, जो काही करार होईल, तो ब्रिटनच्या दृष्टीने फायद्याचा असायला हवा. पण असे जरी असले तरी एक गोष्ट मला इथे अगदी स्पष्टपणे सांगायला हवी.

वरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थलांतर कसे असावे, हे ठरवण्याचे नियम आम्ही पुन्हा युरोपीय गटाकडे देणार नाही; तसेच युरोपीय कोर्टाचे आधिपत्य ब्रिटिश भूमीवर लागू होणार नाही. या दोन्ही  बाबी आता कायमच्या पडद्याआड गेलेल्या आहेत. आपण एक पूर्णतः स्वतंत्र आणि सार्वभौम ब्रिटन उभा राहावा यासाठी युरोपियन युनियनचा निरोप घेत आहोत. युरोपीय गटातून बाहेर पडलेला जो ब्रिटन आपण उभा करणार आहोत, तो खऱ्या अर्थाने ग्लोबल ब्रिटन असेल. जरी आपण युरोपीय युनियन सोडत असलो तरी आपण युरोप खंडाचे भाग म्हणून राहणार आहोतच. आपले मित्र आणि सहकारी यांना ब्रिटन वाऱ्यावर सोडणार नाही. आपण जगाकडे पाठ फिरवणार नसून, जगात काय घडते यामध्ये आपण सहभागी होणारच आहोत. खरे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनसाठी एक नवी, धाडसी, आत्मविश्वासपूर्ण अशी भूमिका साकारता यावी याची हीच वेळ आहे.

जगातील गरीब लोकांना दारिद्य्रातून बाहेर काढण्याची दिलेली आश्वासने पूर्ण करणे, गरज असेल तिथे निर्वासितांसाठी मदत देणे, आधुनिक स्वरूपातील गुलामगिरी जिथे असेल त्याविरोधात लढणे, वातावरणबदल रोखता यावा यासाठी केलेला पॅरिस करार पारित करणे, खुल्या व्यापाराचे तत्त्व जगभरात मान्य व्हावे यासाठी पुढाकार घेणे, देशाचे उत्तमरीत्या संरक्षण करणे आणि मानवाला माहीत असलेले असे सर्वोत्तम लष्करी सामर्थ्य जपणे इत्यादी घटकांवर ही नवी भूमिका आधारलेली असेल.

याच आठवड्यात आपले कार्यक्षम संरक्षणमंत्री मायकेल फालोन यांनी सिद्ध केले की, आपल्या संरक्षण दलांना आपण सर्व प्रकारे पाठिंबा देत राहू. आपला राष्ट्रीय संरक्षणावरचा खर्च एकूण अर्थसंकल्पाच्या दोन टक्के पातळीवर कायमच केला जाईल. पण इथून पुढे आपण भविष्यातील संघर्षात सामाजिक कार्यकर्ते, डाव्या विचारांचे मानवी हक्कवाले वकील यांना आपल्या संरक्षण दलांची झाडाझडती घेण्याची संधी कधीही देणार नाही.

आता मी अर्थव्यवस्था या विषयावर तुमच्याशी थोडे बोलणार आहे. आपल्याला अशी आर्थिक व्यवस्था हवी आहे, जी सर्वांसाठी काम करेल. तशी अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी आपल्याला प्रामाणिकपणाच्या तत्त्वाला आपल्या कृतींच्या केंद्रस्थानी ठेवावे लागेल. तसेच जे लोक समाजाच्या हिताच्या दृष्टीने, काही तरी परत देण्याच्या भावनेने काम करीत आहेत, त्यांना पाठबळ द्यावे लागेल. युरोपीय गटातून बाहेर पडलेल्या ब्रिटनची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी माझी हीच योजना आहे. अशी अर्थव्यवस्था जिथे सगळे समान असतील, कोणालाही विशेष वागणूक मिळणार नाही. याचाच अर्थ असा की, अर्थव्यवस्थेत दीर्घ काळापासून चालत आलेल्या मूलभूत अशा पायाभूत प्रश्नांना हात घालणे. उदा. लोकांना परवडू शकतील अशा किमतीत घरे उपलब्ध करून देणे. पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी आवश्यक ते महत्त्वाचे निर्णय घेणे. समृद्धी आणि संपत्ती यांचे देशभर वाटप व्हावे या दृष्टीने आवश्यक त्या पद्धतीने अर्थव्यवस्थेला आकार देणे.

राजकीय नेते या विषयावर वर्षानुवर्षे बोलत आले आहेत, परंतु लक्षात घ्यावा असा मुद्दा हा आहे की, या स्वरूपाचे बदल घडवून येण्यासाठी ठोस कृतीची आवश्यकता असते. तसे बदल घडून यावे असे आपल्याला वाटत असेल, तर बदल व्हावेत यासाठी आवश्यक ती व्हिजन आणि निर्धार आपण उराशी बाळगला पाहिजे. त्यामुळेच ब्रिटिश अर्थव्यवस्थेचे मूलभूत प्रश्न सोडवले जावेत आणि ब्रिटिश अर्थकारणाने नव्या जोमाने भरारी घ्यावी यासाठी माझे सहकारी फिलीप हेमंड आणि ग्रेग क्लार्क नव्या औद्योगिक धोरणाची आखणी करीत आहेत. या प्रक्रियेत कोणी तरी विजेता आहे; नुकसानीतील उद्योगांना आम्ही मदत करणार आहोत किंवा जुन्या, मृतप्राय कंपन्या पुनर्जिवित करणार आहोत, असे नव्हे.

उलट अर्थव्यवस्थेला सर्वाधिक उपयुक्त ठरू शकणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहक अशी व्यापार, कर, पायाभूत सुविधा, कौशल्ये, प्रशिक्षण आणि संशोधनविषयक धोरणे आखून त्यांचा विकास घडवून आणणे आवश्यक आहे. जगातील इतर मोठ्या आणि वाढ होणाऱ्या अर्थव्यवस्था जे करीत आहेत, तेच आम्ही करणार आहोत. काहीही न करता, होणाऱ्या घटना केवळ पाहणे असे न करता, आम्ही योजना आखून आवश्यक ते करत राहणार आहोत. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील आर्थिक सेवा, जैवविज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश, वाहननिर्मिती, कलाविषयक क्षेत्रे अशा महत्त्वाच्या क्षेत्रांची निवड करून त्यांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत आम्ही करू. त्याच बरोबरीने आम्ही अशा जागांचीसुद्धा निवड करू, ज्या उद्योगांना पोषक असू शकतील आणि जिथे लक्षावधी लोकांना रोजगार देता येऊ शकेल.

याचाच अर्थ असा की- आपल्या देशातील प्रादेशिक पातळीवरील शहरांचे आर्थिक आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवन घडवून आणणे आवश्यक आहे. आम्ही त्या दिशेने सुरुवात केलेली आहे. जॉर्ज ओस्बोर्न यांच्या धोरणांमुळे गेल्या वर्षभरात स्कॉटलंडमध्ये होणारी गुंतवणूक ही एकूण देशात होणाऱ्या गुंतवणुकीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. इथे बर्मिंगहॅममध्ये जग्वार या  कारनिर्मिती करणाऱ्या कंपनीमुळे चीनबरोबर होणाऱ्या या प्रदेशाच्या व्यापारात तूट शिल्लक राहिलेली नाही. उलट चीनकडून होणाऱ्या आयातीपेक्षा चीनला केली जाणारी निर्यात जास्त आहे. तसेच या प्रदेशात मिडलँडस इंजिन या कंपनीमुळे 2020 पर्यंत तीन लाख अधिक नोकऱ्या उपलब्ध होतील. आता बर्मिंगहॅम आणि मँचेस्टर शहरांतील या यशाला पुढे नेण्याची गरज आहे.

आज आपण बर्मिंगहॅम शहरात जमलेलो आहोत. इथे पुढील वर्षी स्थानिक निवडणुका होणार आहेत. हुजूर पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवाराला आपण आपला पाठिंबा याच व्यासपीठावरून व्यक्त करू या. यशस्वी उद्योजक, शहराच्या विकासात योगदान दिलेले आणि काम करवून घेण्याची हातोटी असलेले असे जॉन लुईस हे हुजूर पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार असतील. ते महापौर नक्कीच होतील, असा मला विश्वास आहे.

जसे आर्थिक व्यवस्थेबाबत मी आता बोलले, तसे मी आता थोडे मार्केटविषयीसुद्धा बोलणार आहे. मला हे माहीत आहे की, जेव्हा श्रीमंत व सामर्थ्यवान लोक आपल्या ताकदीच्या बळावर हवे तसे वागतात आणि उलट सर्वसामान्य लोक मात्र तसे वागू शकत नाहीत, वागले तरी पकडले जातात; हे जेव्हा आजूबाजूला दिसते, तेव्हा वैफल्याची भावना येऊ शकते. मी हे समजू शकते, कारण मलाही तसेच वाटते. कोणतेही काम करायचे नसेल, तर त्यासाठी अनेक करणे देता येतात. पण हीच कारणे देण्याची वृत्ती जेव्हा काहीच न करण्याचे समर्थन म्हणून वापरली जाते, तेव्हा भांडवलशाही आणि मार्केट यावरील विश्वास डळमळीत होतो.

हुजूर पक्ष कायमच खुल्या आर्थिक धोरणाचा समर्थक राहिलेला आहे. त्यामुळे खुले आर्थिक धोरण टिकून राहावे यासाठी हा पक्ष कटिबद्ध आहे. एडमंड बर्कच्या काळापासून हुजूर पक्षीयांना हे माहीत आहे की- जर एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीचे जतन करायचे असेल, तर तिच्यात बदल घडवून आणला पाहिजे. तोच दृष्टिकोन आपल्याला आज स्वीकारायचा आहे. त्यामुळेच जिथे मार्केट्‌स काम करू शकणार नाहीत, तिथे सरकारी हस्तक्षेप करायची आपली तयारी असायला हवी. कंपन्या मार्केट्‌सच्या मर्यादांचा गैरफायदा घेत असतील, ग्राहकांना सहज समजणार नाही अशा पद्धतीने किमती ठरवणार असतील आणि ग्राहकांच्या निवडीच्या अधिकारावर बंधने घालणार असतील; तर ते इथून पुढे चालवून घेतले जाणार नाही.

अर्धा ब्रिटन ग्रामीण भागात राहतो. तिथे राहणाऱ्या लोकांना आणि छोट्या उद्योगांना चांगले इंटरनेट कनेक्शन देता येत नसेल, तर ती परिस्थिती काही चांगली आहे असे म्हणता येत नाही. किंवा दोनतृतीयांशाहून अधिक ग्राहकांना अतिशय महाग अशी वीज खरेदी करावी लागणे किंवा सर्वसामान्य नागरिकांना विकतच घेता येणार नाही इतकी महाग घरे असणे हेसुद्धा योग्य नाही. आपल्या अर्थव्यवस्थेशी संबंधित किंवा सामाजिक क्षेत्रातील कोणताही प्रश्न असो, त्याचा संबंध घर विकत घेता येणे इथे येऊन थांबतो. महाग घरे असल्याने ज्यांच्याकडे घरे आहेत ते आणि ज्यांच्याकडे घरे नाहीत ते यांच्यातील दरी वाढतच चालली आहे. सामाजिक गतिमानता, ढासळणारी बचत आणि कमी उत्पादकता यांचा संबंध पुन्हा स्वतःचे घर विकत घेण्याची क्षमता इथे येतो. लोकांना स्वतःची घरे विकत घेता यावीत यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची आर्थिक मदत आम्ही करू. त्यामुळेच या दृष्टीने आम्ही आखलेल्या योजना महत्त्वाच्या आहेत, परंतु या प्रश्नाला आणखी एक बाजू आहे.

आपल्या पक्षाचे नेते साजिद यांनी सोमवारी केलेल्या भाषणात म्हटले, त्यानुसार आपण एक सत्य प्रामाणिकपणे स्वीकारले पाहिजे. ते म्हणजे, आपण अधिक घरे बांधायला हवीत. त्यासाठी सरकारला गृहनिर्मिती क्षेत्रात हस्तक्षेप करावा लागेल. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील जागेचा वापर अधिकाधिक प्रमाणात वेगाने घरे बांधता यावीत यासाठी करावा लागेल. घरे वेगाने बांधता यावीत यासाठी आवश्यक त्या नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन द्यावे लागेल, तसेच अधिक प्रमाणात आर्थिक गुंतवणूकही करावी लागेल. याचाच अर्थ असा की, ब्रिटनसाठी जे योग्य आहे ते करण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे. मार्केट्‌सने सर्वसामान्य लोकांसाठी कामे करावीत यासाठी सरकारने उचललेली पावले याच स्वरूपाची असतील, कारण अशी पावले केवळ सरकारच उचलू शकते.

हे करताना दुसऱ्या बाजूला देशात पायाभूत सुविधा उभ्या रहाव्यात यासाठी महत्त्वाचे आणि काही वेळा वादग्रस्त वाटणारे निर्णय घ्यावे लागतील. कारण ब्रिटनला सर्व क्षेत्रांत वेगाने प्रगती करता यावी असे वातावरण आपल्याला निर्माण करायचे आहे. त्यामुळेच आम्ही लंडन आणि बर्मिंगहॅम यांना जोडणाऱ्या वेगवान हायवेचे काम सुरू करणार आहोत. पुढे जाऊन स्कॉटलंडमधील शहरेसुद्धा या हायवेला जोडली जातील. तसेच ब्रिटिश विमानतळांची क्षमता वाढावी या दृष्टीनेसुद्धा आम्ही निर्णय घेणार आहोत. ब्रिटनच्या राष्ट्रीय हिताच्या  दृष्टीने सर्व पुरावे तपासून आम्ही नवा अणुप्रकल्पसुद्धा उभारणार आहोत. ब्रिटनसाठी गरज पडेल तेव्हा आवश्यक ते निर्णय घ्यायला आमचे सरकार कच खाणार नाही. आम्ही हे सर्व निर्णय घेऊ शकतो, कारण गेली सहा वर्षे आपण आर्थिक शिस्त पाळली आहे आणि आज आपली अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. आपला अर्थसंकल्प तुटीचा नसावा, हे लक्ष्य समोर ठेवायला हवे. परंतु सर्वांसाठी उपयुक्त अशी अर्थव्यवस्था निर्माण करताना दीर्घकालीन हित समोर ठेवून आवश्यक तेव्हा आपण गुंतवणूक केली पाहिजे. अशाच प्रकारे आम्ही अर्थव्यवस्था सुदृढ बनवू. तिच्यातील दोष दूर करू, उत्पादकता वाढवू, आर्थिक वाढ घडवून आणू आणि प्रत्येकाला त्याच्या योग्य वाट्याचे मिळेल याची व्यवस्था करू.

सन 2008 मधील आर्थिक मंदीनंतर आणीबाणीचे उपाय म्हणून आपण व्याजाचे दर अतिशय कमी केले. तसेच चलन पुरवठ्यावर फारशी बंधने येणार नाहीत अशीही धोरणे आखली. त्यामुळे ती परिस्थिती हाताळणे जरी सोपे गेले असले, तरी त्याचे काही नकारात्मक परिणामसुद्धा झाले. ज्यांच्याकडे काही साधनसंपत्ती होती ते अधिक श्रीमंत झाले, तर ज्यांच्याकडे काहीच संपत्ती नव्हती त्यांचे नुकसान झाले. ज्यांनी कर्जे घेतली होती त्यांची कर्जे स्वस्त झाली, तर ज्यांनी उत्पन्न वाचवून बचत केली होती त्यांच्या बचतीचे मूल्य घसरले. त्यामुळेच बदल होणे अपरिहार्य आहे. आणि तेच आम्ही करणार आहोत, कारण हुजूर पक्षीय सरकार ते करू शकते.

वरील विवेचनावरून तुमच्या हे लक्षात आले असेलच की, मोठ्या प्रमाणावर बदल घडून यायला हवेत. ते होणे आवश्यकसुद्धा आहे. सर्व समाजाच्या हिताचे होईल अशा पद्धतीने अर्थव्यवस्था काम करत राहील हे पाहणे, ही सरकारची जबाबदारी आहे. सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या सेवा आणि संस्थात्मक कामे यात सरकारने गुंतवणूक करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आरोग्य योजना ही सरकारी खर्चाने चालणा-या जगातील सर्वोत्तम योजनांपैकी एक आहे. अशा योजनांमध्ये आपली मूल्ये, आपला प्रामाणिकपणावरील विश्वास याचे प्रतिबिंब पडते. आपल्याला त्याचा अभिमान वाटावा अशी ही योजना आहे. जेव्हा मी असे म्हणते, तेव्हा मला सर्व देश अभिप्रेत आहे, कारण या योजनेला सर्व पक्षांचा पाठिंबा आहे. या योजनेनुसार जेव्हा गरज भासेल तेव्हा अगदी घरापर्यंत आरोग्यसेवा दिली जाते. तसेच हजारो डॉक्टर्स आणि नर्सेस चोवीस तास इथे उपलब्ध असतात. त्यामुळे एखाद्या नर्सने आपली काळजी कशी घेतली किंवा एखाद्या डॉक्टरने आपल्या मित्रावर कसे ऑपरेशन केले, याची आपल्या प्रत्येकाकडे सांगण्यासारखी एक गोष्ट नक्कीच आहे. त्यामुळे या व्यासपीठावरून असे उत्तम काम करणाऱ्या लोकांचे मी आभार मानते.

खरे तर यांसारख्या योजनांमुळे आपण एकत्र व्हायला हवे. मात्र मजूर पक्षाने निवडणुकांमागून निवडणुकांनंतर भेदाभेदाचे राजकारण वर्षानुवर्षे केले आहे. राष्ट्रीय आरोग्य योजनेची सुरुवात झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीत मजूर पक्षाने असा प्रचार केला की, हुजूर पक्ष या योजनेसाठी केलेली आर्थिक तरतूद कमी-कमी करत जाईल. प्रत्येक वेळी ते असे म्हणत राहिले की, आम्ही हिचे खासगीकरण करू. उलट, आम्ही प्रत्येक वेळी सत्तेत आल्यावर तिचे रक्षणच केले आहे. खरे तर या योजनेत खासगी पक्षाचा सहभाग हुजूर पक्षाने नाही, तर मजूर पक्षानेच वाढवला आहे. या योजनेवरील खर्चात आतापर्यंत एकदाच कपात करण्याचे कृत्य झाले आहे, पण ते हुजूर पक्षाचे नसून मजूर पक्षाचे आहे. त्यांनी वेल्स या प्रांतात तसे केले होते.

मागील वर्षी झालेल्या निवडणुकांत राष्ट्रीय आरोग्य सेवा योजनेला आपली पाच वर्षांची उद्दिष्टे पूर्ण करता यावीत यासाठी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन मजूर पक्षाने नाही तर हुजूर पक्षाने दिले होते. हुजूर पक्षाने असे म्हटले होते की, आम्ही एक हजार कोटी पौंड या योजनेसाठी देऊ. ही रक्कम गरजेपेक्षा बरीच जास्त आहे. त्यामुळेच या वेळीही कधीही झाले नव्हते इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार सुरू आहेत, कधीही झाले नव्हते इतक्या मोठ्या प्रमाणात ऑपरेशन्स केली जात आहेत. राष्ट्रीय आरोग्य सेवा योजनेत काम करणाऱ्या प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी ही बाब आहे. तितकीच ही अभिमानाची बाब आहे जेरेमी हंट यांच्यासाठीसुद्धा. ते राष्ट्रीय आरोग्य योजनेचे अतिशय खंदे पुरस्कर्ते आहेत.

सहानुभूती या भावनेवर केवळ मजूर पक्षाची मक्तेदारी असण्याचे काही कारण नाही. नैतिक वर्चस्वाच्या त्यांच्या भावनेला कायमचा रामराम ठोकण्याची वेळ आता आली आहे. त्यांनी स्वतःला राष्ट्रीय आरोग्य योजनेचा पुरस्कर्ता, कामगारांची बाजू घेणारा आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा पक्ष असे म्हणवून घेण्याचा अधिकार गमावला आहे. ज्या दिवशी त्यांनी फाटाफुटीचे राजकारण सुरू केले, त्याच दिवशी त्यांनी हा अधिकार गमावलेला आहे. आपल्या या वर्तनामुळे आणि विचारधारेच्या अतिरेकी आग्रहामुळे ते देशाला काय हवे आहे याची दखल घेण्यापासून थांबले. त्यांनी मध्यममार्ग सोडला. आपण आज ही संधी घेऊ या आणि जगाला दाखवून देऊ या की, हुजूर पक्ष हाच कसा कामगारांची बाजू घेणारा, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा आणि राष्ट्रीय आरोग्य योजनेचा पुरस्कार करणारा पक्ष आहे. कारण समाजासाठी काम करण्यावर आमचा विश्वास आहे.

ज्या संस्थांमुळे आपला देश टिकून राहिला आहे व ग्रेट झाला आहे, त्या संस्थांमध्ये गुंतवणूक करण्यावर आणि त्यांना लागेल ती मदत देण्यावर आमचा विश्वास आहे. सरकार चांगले काम करू शकते यावर आमचा विश्वास आहे. जेव्हा सामाजिक अन्याय आणि अप्रामाणिकपणा दिसतो, तेव्हा सरकार केवळ हातावर हात ठेवून गप्प बसू शकत नाही. जर ब्रिटिश समाजाच्या सर्व घटकांचे हित साधायचे असेल, तर संधीचे वाटप योग्य पद्धतीने व्हायला हवे. मला ब्रिटनला असा देश बनवायचे आहे जिथे- तुम्ही कुठे जन्माला आलात, तुमचे पालक आणि शाळा यांची पार्श्वभूमी, तुमचे उच्चार आणि तुमचे देव, तुम्ही स्त्री आहात की पुरुष, काळे आहात की गोरे, तुम्ही समलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होता की भिन्नलिंगी व्यक्तीकडे यापैकी कोणत्याही प्रकारच्या भेदाला कोणतेही स्थान राहणार नाही. तुम्ही किती हुशार आहात आणि किती मेहनत करायला तयार आहात, याच आधारे तुमची पात्रता सिद्ध होईल.

जर आपण प्रामाणिक असू, तर आपल्याला हे जाणवेल- आज तसे वातावरण नाही. आजसुद्धा ब्रिटनमध्ये प्रगतीसाठी तुमची सांपत्तिक परिस्थिती किंवा अन्य परिस्थितीजन्य घटक महत्त्वाचे ठरतात. हुशारीपेक्षा तुमचा जन्म कोणत्या कुटुंबात झाला आहे, गुणवत्तेपेक्षा तुमची पार्श्वभूमी जास्त महत्त्वाची ठरते आहे. आर्थिक व्यवस्थेला नव्याने आकार देणे हा नव्या ब्रिटनच्या उभारणीतला केवळ एक घटक आहे. जर आपल्याला खरोखरच बदल घडवायचे असतील, लोकांच्या प्रगतीच्या मार्गातले अडथळे दूर करायचे असतील; तर आर्थिक व्यवस्थेबरोबरच सामाजिक क्षेत्रातसुद्धा सुधारणा व्हायला हव्यात. तुमच्या कष्टाचे चीज होईल असा समाज घडवायचा असेल, तर सामाजिक सुधारणा घडवणे अपरिहार्य आहे. खऱ्या सामाजिक सुधारणा घडवणे म्हणजे अधिकाधिक लोकांना घरे विकत घेता येतील, आपल्या मुलांना चांगल्या शाळेत पाठवता येईल अशा संधी निर्माण करणे. हा असा समाज असेल जिथे- ज्याची काम करण्याची पात्रता आहे त्याला कामासमवेत आयुष्यभर पुरतील असे काही आनुषंगिक फायदे मिळतील. कधीही कामावरून काढून टाकू दिले जाणार नाही. उलट, काम करण्याची संधी देऊन स्वतःचे काम चांगले झाले तर येणारी प्रतिष्ठा एन्जॉय करण्याची व्यवस्था असायला हवी. पण जे काम करू शकत नाहीत, त्यांना आपण सर्व प्रकारची मदत करायला हवी. त्यामुळेच डेमियन ग्रीन यांनी शनिवारी असे जाहीर केले की- ज्यांची तब्येत चांगली नाही, त्यांना सक्तीची विश्रांती देण्याचा प्रकार बंद केला जाईल. कारण त्यातून फक्त अधिक ताणतणाव निर्माण होतात.

खऱ्या सामाजिक सुधारणा म्हणजे असंख्य लोकांना ज्यामुळे मागे राहावे लागते, असे ऐतिहासिक अन्याय दूर करणे. जेव्हा मी गृहमंत्री होते, तेव्हा यापूर्वी कधीही हात न लावल्या गेलेल्या, खोलवर रुजलेल्या आणि दीर्घ काळ शिल्लक राहिलेल्या प्रश्नांना सोडवायचे प्रयत्न केले होते, ते काही क्षण माझ्या आयुष्यात अतिशय अभिमानाचे होते. आम्ही पहिल्यांदा आधुनिक काळातील गुलामगिरी  रोखता यावी यासाठीही कायदा आणला आणि त्यात अगदी जन्मठेपसुद्धा होऊ शकेल इतकी कठोर तरतूद केली. नागरिकांना थांबवून त्यांची झडती घेण्याचा पोलिसांचा प्रकार माझ्या काळात मी दोनतृतीयांशाने कमी केला. तसेच कारण नसताना कृष्णवर्णीय तरुणांचे केले जाणारे चेकिंग वगैरेसुद्धा मी कमी केले. मला याची खात्री आहे की, आपले नवे गृहमंत्रीसुद्धा हेच काम पुढे चालू ठेवतील.

परंतु कितीही उत्तम काम केले तरीही काही अन्याय शिल्लक राहतातच. उदा. तुम्ही कृष्णवर्णीय असाल तर गौरवर्णीय मुलांच्या तुलनेत कधीही शाळेत न जाण्याची शक्यता तिपटीने वाढते. जर तुम्ही कृष्णवर्णीय स्त्री असाल, तर मानसिक दृष्ट्या आजारी आहात आणि म्हणून तुमच्यावर बंधने घालण्याची शक्यता गौरवर्णीय स्त्रीच्या तुलनेत सात पट अधिक वाढते. गौरेतर व्यक्ती दारिद्य्रात राहण्याची शक्यता गौरवर्णीय व्यक्तींच्या तुलनेत दुप्पट अधिक असते. पण केवळ अल्पसंख्य समूहातील व्यक्तींनाच या प्रकारे भेदाभेदाचा सामना करावा लागतो असे नव्हे. समाजातील इतर कोणत्याही घटकापेक्षा गौरवर्णीय कामगारांच्या कुटुंबातून आलेल्या मुलांची विद्यापीठात जाण्याची शक्यता इतर कोणत्याही समाजघटकांपेक्षा कमी असते. असे होत राहणे हे समाजाच्या हिताच्या दृष्टीने स्वीकारार्ह नाही.

त्यामुळेच यापूर्वी कधीही झाले नव्हते असे सार्वजनिक सेवांचे मी ऑडिट करायला घेतले आहे. वांशिक भेदाभेद हा त्याचा मुख्य फोकस असणार आहे आणि ते कमी व्हावेत यासाठी काही उपाय योजायला हवेत. कारण अशा भेदाभेदामुळे समाजात विविध प्रकारचा अन्याय चालूच राहतो. आमचे हे सरकार त्या प्रत्येक प्रकारच्या अन्यायाचा सामना करणार आहे. ज्या समाजात सर्वांचे हित साधले जाते, असा समाज संधीची समानता आणि केलेल्या कष्टांचा प्रामाणिक मोबदला देण्यावर आधारित असतो. तिथे प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेनुसार प्रगती करण्याची संधी मिळते. त्यामुळेच पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अगदी सुरुवातीला मी जी काही भाषणे दिली, त्यामध्ये मी जाहीर केले होते की, ब्रिटनचे रूपांतर एका मेरिटोक्रसीमध्ये (जिथे फक्त गुणवत्तेला प्राधान्य मिळेल) व्हावे यासाठीची योजना आखायला सुरुवात केली आहे.

याची सुरुवात आपल्या शाळांपासून होते. मला असा देश इथे उभारायचा आहे, जिथे चांगल्या शाळेत शिकणे हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क असेल. कारण युरोपीय गटातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनला आपल्या देशात उपलब्ध असलेल्या गुणवत्तेच्या आधारेच मार्गक्रमण करायचे आहे. अर्थात असे करताना आपण खूप मोठा पल्ला गाठला आहे, हेसुद्धा लक्षात ठेवायला हवे. शाळा, शिक्षक आणि शिक्षणाशी संबंधित इतर घटक यांच्यामुळे आज 2010 च्या तुलनेत 14 लाख अधिक मुले शाळेत जात आहेत. पण आपल्याला याहूनही पुढे जायचे आहे. अजूनही साडेबारा लाख मुले चांगला दर्जा नसलेल्या शाळांमध्ये शिकत आहेत. तसेच वेल्स किंवा स्कॉटलंडमधील मुलांची इंग्लंडच्या तुलनेत शाळेत शिकायला जाण्याची शक्यता कमी-कमी होत जाते. असे भेदाभेद इथून पुढे आम्ही चालू देणार नाही. त्यामुळे मायकेल गोव्ह यांच्या प्रयत्नांना पुढे घेऊन जात, मी आणि जस्टीन ग्रिनिंग यांनी नव्या सुधारणांचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार देशातील चांगल्या शाळांची संख्या वाढत जाईल. त्यामुळे प्रत्येक मुलाला केवळ शाळा उपलब्ध असेल असे नव्हे, तर त्याला चांगली शाळा उपलब्ध झालेली असेल. अशी शाळा जिथे मुलांची आवड, कौशल्ये आणि क्षमता लक्षात घेऊन शिकवले जाईल. त्यामुळेच आमची अशी इच्छा आहे की, अधिकाधिक विद्यापीठांनी सार्वजनिक क्षेत्रात अशा उत्तम शाळा स्थापन करण्यात आणि चालवण्यात पुढाकार घ्यावा.

येथून काही मैलांवरच असलेल्या आणि बर्मिंगहॅम विद्यापीठातर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळेचे उदाहरण आपण लक्षात घ्यायला हवे. चांगल्या खासगी शाळांना करात सवलती देतानासुद्धा आमची अशी अपेक्षा आहे की, त्यांनी गरीब घरांतून आलेल्या मुलांना आपल्या शाळांमध्ये संधी द्यावी किंवा सार्वजनिक क्षेत्रात चांगल्या शाळा उभाराव्यात, चालवाव्यात. अशी मागणी अधिकाधिक प्रमाणात पालक आणि विद्यार्थी अशा दोन्ही घटकांकडून यायला हवी. जर अधिकाधिक पालकांकडून मागणी आली, जर शाळा सर्व प्रकारच्या मुलांना घ्यायला तयार असतील, तसेच त्यात्या भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी पुढाकार घेतला जाणार असेल; तर फक्त व्याकरण शिकवले जाणाऱ्या शाळा स्थापन करण्यावर आज जी बंदी आहे, तीसुद्धा आम्ही उठवू.

इथेच खरे आव्हान आहे. समाजाला शिक्षणात जो बदल दीर्घ काळापासून हवा आहे, त्याला राजकीय नेत्यांनी विरोध केला आहे. शिक्षणाबाबत ज्या सुविधा आम्ही आज उपभोगत आहोत, त्याच सुविधा  तुम्हाला मात्र मिळू दिल्या जाणार नाहीत, असा त्यांचा दृष्टिकोन राहिलेला आहे. त्यामुळे केवळ व्याकरण शिकवणाऱ्या शाळा सुरू करण्यास कायद्यानेच आडकाठी घातलेली आहे. याचा काय अर्थ होतो, हे तुम्ही लक्षात घ्या. श्रीमंत घरातील मुलांना हवे ते शिक्षण मिळेल, त्यांना हव्या त्या खासगी शाळांत प्रवेश घेता येईल किंवा शिकण्यासाठी दूर अंतरावरील चांगल्या शाळेत जाता येईल, पण जर तुम्ही श्रीमंत नसाल तर मात्र तुम्हाला तसे करता येणार नाही. त्यामुळे आपल्याबाबत भेदभाव होतो असे सर्वसामान्य लोकांना का वाटत असावे याचे याहून दुसरे चांगले उदाहरण सापडणार नाही. असे सतत होऊ देणे हे काही चांगले लक्षण नाही. हुजूर पक्ष तसे कधीही होऊ देणार नाही.

वर सांगितल्याप्रमाणे माझे स्वप्न हे आहे की, ब्रिटन एक उत्तम मेरिटोक्रेटिक समाज बनायला हवा तो बनेल, यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच आतापर्यंत राजकारणात मी जे काही केले, ते सर्व याच उद्देशाने. गुणवत्तेवर आधारित समाज हा खऱ्या अर्थाने न्यायी समाज असतो. जेव्हा आपण सर्व प्रकारच्या अन्यायाचे उच्चाटन करू, तेव्हाच नवा आणि ग्रेट असा ब्रिटन उभा करू शकू. आपण एकत्र आलो तर अनेक उत्तम गोष्टी साध्य करू शकतो. या वर्षी झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आपण ते पाहिले. सांघिक प्रयत्नांमुळे वैयक्तिक यश कसे मिळवता येते, याचा वस्तुपाठच आपल्याला तिथे दिसून आला. जॉन मेजर यांच्या हुजूर पक्षीय सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न करून खेळांकडे लक्ष दिले होते. त्याची फळे आपण आता चाखत आहोत. रिओ ऑलिम्पिकला गेलेल्या ब्रिटिश संघातील चार खेळाडू सोमवारी इथे उपस्थित होते. त्यांचे स्वागत करणे, हा मी माझा सन्मान समजते. आज मी त्यांचे आणि ऑलिम्पिकला गेलेल्या इतर सर्व खेळाडूंचे आभार मानते. तुम्ही आपल्या कामगिरीने देशाची मान जगात उंचावली आहे. ब्रिटिश क्रीडाक्षेत्रासाठी खास लक्षात राहावा असा हा काळ होता.

परंतु माझ्या दृष्टीने विशेष लक्षात राहावा असा क्षण ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर आला. दोन आठवड्यांपूर्वी मेक्सिकोमध्ये कोझुमेल शहरात झालेल्या क्रीडास्पर्धांत जॉनी ब्राऊनली हा आपला लोकप्रिय खेळाडू, ट्रायथलॉनची स्पर्धा जिंकत असतानाच त्याचा तोल गेला आणि तो थांबला. मैदानावर बसला. तो दमला आहे, हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. त्याचा भाऊ ॲलिस्टर त्याच्या मागेच होता. जॉनीचा तोल गेल्यानंतर ॲलिस्टरला स्पर्धा जिंकण्याची संधी होती. एखादा खेळाडू आपला विजय असा सहजासहजी हातातून निसटू देत नाही. मात्र आपला भाऊ पडला आहे हे लक्षात येताच इतर स्पर्धक ज्याप्रमाणे पुढे गेले त्यांच्याप्रमाणे न जाता तो थांबला. त्याने आपल्या भावाला हात दिला आणि त्याला तो शांतपणे घरी घेऊन आला. त्या क्षणी आपण एकत्रितपणेच जिंकू किंवा हरू शकतो, हे एक सार्वकालिक सत्य त्याने अनुभवले.

त्यामुळे जेव्हा आपल्यातील कोणी तरी अडखळते किंवा स्पर्धेतून बाजूला होते, तेव्हा आपली सर्वांत मूलभूत मानवी प्रेरणा ही स्वार्थ बाजूला ठेवून अशांना फिनिश लाईनच्या पलीकडे न्यायला मदत करणे ही असते. त्यामुळे मला असे वाटते की, व्यक्तिवाद आणि स्वार्थ यांच्या पलीकडेसुद्धा आयुष्य आहे हा माझ्या वैयक्तिक धारणेचा सर्वांत मूलभूत घटक आहे. आपण कुटुंब, समाज, शहरे, प्रांत आणि देश यांचे घटक असतो. आपली एकमेकांप्रति काही जबाबदारी असते. तसेच मला असे वाटते की, सरकारचीसुद्धा जबाबदारी असते. त्यामुळे समाजात राहताना तयार झालेले हे नातेसंबंध, नेटवर्क आणि संस्था यांची जपणूक करणे आवश्यक असते. हे सरकारचे काम आहे. त्यामुळे मी नेहमीच म्हणत आले आहे- जे माझे आणि आपल्या पक्षाचे ध्येय आहे ते हे आहे- की, आपण केवळ काही जणांचा फायदा होईल असा समाज उभारणार नसून, सर्वांना आपलासा वाटेल असा समाज उभारणार आहोत. त्यामुळे 84 दिवसांपूर्वी जेव्हा मी पक्षाची सूत्रे हाती घेतली तेव्हा म्हणाले होते, आमचे सरकार हे मूठभर श्रीमंत व्यक्तींसाठी नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी काम करेल.

या आठवड्यात आपण देशाला हे दाखवून दिले आहे की, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आपण केवळ कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणार नसून, त्यांच्या व्यापक हिताचे निर्णय घेणार आहोत. अधिकाधिक घरे बांधणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य योजनेत अधिकाधिक डॉक्टर्सना सामावून घेणार आहोत. आर्थिक प्रगती होईल अशा घटकांमध्ये आपण गुंतवणूक करणार आहोत. शेकडो नव्या शाळा, कॉलेजेस उभारणार आहोत. जर पालकांची इच्छा असेल आणि एकूण शिक्षणाचा दर्जा  सुधारणार असेल, तर इंग्लंडमध्ये गेल्या पन्नास वर्षांत बंद झालेल्या व्याकरण शिकवणाऱ्या शाळा आम्ही पहिल्यांदाच उभारणार आहोत. ब्रिटनला एकत्र आणण्याची ही योजना आहे. मध्यम मार्गाकडे झुकलेला नवा ब्रिटन उभा करणे, हे आमचे उद्दिष्ट असणार आहे. एक नवी आधुनिक व परंपरावादी अशी विचारसरणी हुजूर पक्षाला आम्ही देणार आहोत. असा विचार- ज्यामध्ये सरकार लोकांचे हित साधू शकते यावर विश्वास ठेवला जाईल. गरज पडेल तेव्हा श्रीमंतांना ठणकावू शकेल आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताची काळजी नेहमीच घेईल, असे हे सरकार असेल.

अन्याय शोधून त्याचे निराकरण करणे, प्रश्नांना उत्तरे शोधणे, बदलांच्या दिशेने जाणे, महत्त्वाचे निर्णय न कचरता घेणे, सुरू केलेले प्रकल्प शेवटपर्यंत तडीस नेणे हे सरकारने करणे अपेक्षित असते. हे काम कदाचित कधी कधी ग्लॅमरस वाटणार नाही, पण तेच योग्य काम आहे. जिथे अनेकांना असे वाटते की, सरकार हीच एक समस्या आहे; तिथे मी लोकांना दाखवून देऊ इच्छिते की, सरकार हे प्रश्नांवर उत्तरेसुद्धा देऊ शकते. माझ्या ऑफिसमधून मी जेव्हा बाहेर येते तेव्हा मला जिन्याच्या दोन्ही बाजूला माजी पंतप्रधानांची पोर्ट्रेटस दिसतात. असे पंतप्रधान- ज्यांनी अतिशय बिकट कालखंडातून देशाला पुढे नेले आणि आपत्तीतून मार्ग काढत असतानाच देशात चांगले बदलसुद्धा घडवून आणले. तिथे बेन्जामिन डिझरायली आहेत, ज्यांनी आजूबाजूस असलेले भेदाभेद पाहिले आणि त्यांना अजिबात न जुमानता ते कमी कसे करता येतील यासाठी काम केले. तिथे चर्चिल आहेत, ज्यांनी दुष्टांचा सामना केला आणि आपल्या सामर्थ्याने त्यांच्यावर विजय मिळवला. तिथे क्लेमंट ॲटली आहेत, ज्यांच्याकडे मोठी संस्थात्मक उभारणी करण्याची दूरदृष्टी होती. आणि अखेर तिथे मार्गारेट थॅचर आहेत, ज्यांनी आपल्याला पुन्हा मोठी स्वप्ने पाहायला शिकवले. सरकार नेमके काय चांगले करू शकते याची मला ती पोर्ट्रेट्‌स आठवण करून देत असतात.

पण मला हेही माहीत आहे की, कोणतीही चांगली गोष्ट सहज मिळत नाही. योग्य दिशेने प्रयत्न करून आपल्याला हवे ते साध्य करता येते. मी रोज जेव्हा या व्यक्तींची पोर्ट्रेट्‌स पाहते, तेव्हा मला हे जाणवते की, या व्यक्तींनी कठीणप्रसंगी ठाम भूमिका घेऊन मार्गक्रमण केले. आपण आज जसे आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. आज आपण जशा कठीण कालखंडातून जात आहोत, असे कठीण प्रसंग क्वचितच येतात. अनेक पिढ्यांमधून एकदाच येणारा असा हा प्रसंग आहे. आपल्या देशाची नव्याने उभारणी करण्याची संधी आपल्यासमोर या प्रसंगी आहे. प्रत्येक पिढीला ती मिळत नाही. आपल्या पिढीला तशी संधी मिळालेली आहे. नवा भविष्यकाळ आपल्याला घडवायचा आहे. आपले निर्णय इथेच ब्रिटनमध्येच घेण्याची, आपले भविष्य कसे असेल हे ब्रिटनमध्येच ठरवण्याची, आत्मविश्वासाने भारलेले व स्वतःपुरतेच मर्यादित न राहता देशाच्या सीमांच्या बाहेर लक्ष देणारे व्यापारी राष्ट्र घडवण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. या संधीचा उपयोग करून घेण्याची जबाबदारी आपली आहे.

त्यामुळे मी इथे उपस्थित सर्वांना आणि उपस्थित नसलेल्या इतर लाखो जणांना आवाहन करते की, माझ्याबरोबर या. आपण देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवू या, आवश्यक असलेले बदल घडवून आणू या, कसोटीच्या प्रसंगी निर्धाराने उभे राहू या आणि आपल्यासमोर चालून आलेल्या संधीचा योग्य रीतीने लाभ घेऊ या.

अनुवाद : संकल्प गुर्जर

Tags: अनुवाद संकल्प गुर्जर ब्रेक्झिट थेरेसा मे बर्मिंगहॅम अधिवेशन साधना दिवाळी अंक translation anuwad sankalp gurjar brexit Theresa may burkingham adhiveshan burkingham conference diwali ank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

थेरेसा मे

 युनायटेड किंग्डम देशातील राजकारणी, देशाची माजी पंतप्रधान व हुजूर पक्षाची पक्षाध्यक्ष 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके