डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

एका फटक्यात बत्तीस रन!

‘वन मॅन, वन नाईट मॅच’ असल्याने मी बॉल पायावर घासला. ऊंच उडवला आणि टाsssणकन एकच फटका मारला. हा! हा! आनंदच आनंद! मोठा आनंद! पण हा आनंद काही क्षणच टिकला. कारण, आजोबांनी माझ्या पाठीत एकच धपका घातला. आजोबा खू खू हसत म्हणाले, “अले शंभ्या, काय ले हे? आता उद्या मी जेवनाल कसा?”

 

मला क्रिकेट खेळायला खूप म्हणजे, खूप खूप आवडतं आणि... घरातल्या माणसांना पण क्रिकेट खूप खूप आवडतं... पण फक्त पहायला! कारण, माझे आई-बाबा, काका-काकू, आजी-आजोबा, मामा-मामी हे कुण्णी कुण्णीसुद्धा माझ्याशी घरात क्रिकेट खेळत नाहीत. माझ्याशी गल्लीत क्रिकेट खेळत नाहीत. मैदानात खेळत नाहीत. अगदी गच्चीवरसुद्धा खेळत नाहीत.

मला समजत नाही, असं का? मी खूप विचार केला, तेव्हा मला कळलं. ‘अहो! ह्या मोठ्या माणसांना क्रिकेट खेळताच येत नाही ना... म्हणून क्रिकेट पहायला आवडतं! काय?’ पण मी हे कुणाला सांगितलं नाही. माझ्या मनातच ठेवलं.

परवा बाबा म्हणाले, “अरे, जरा नीट वाग.” आजोबा म्हणाले, “अरे, जरा चांगलं वागावं.”  काकू म्हणाली, “किती रे धडपड तुझी?”  मामी म्हणाली, “हा जरा नीट वागेल, तर शप्पथ!”

तेव्हा मी विचार केला. सर्व मोठ्या माणसांना आवडेल असं आपण वागलं पाहिजे. मोठी माणसं आनंदी होतील असं आपण आता काहीतरी केलं पाहिजे. पण, मोठ्यामोठ्या माणसांना, मोठामोठा आनंद होईल, असं काय-काय करावं बरं?

अंsss सुचलं. “विचार करावा, मार्ग शोधावा.” (असं कधी-कधी आजोबा म्हणताना मी ऐकलं होतं.)

“मी, किती विचार करायचा?” ह्याचा पण विचार केला. तर फुस् ठुस्!

मी कंटाळलो. रात्री मजबूत जेवलो. थोडावेळ गादीवर लोळलो. पुन्हा उठलो. आईजवळ झोपलो. बाबांनी दिवे बंद केले आणि एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला. ‘विचार न करताच मार्ग मिळाला हो.’ (असं आजी एकदा आजोबांना म्हणाल्याचं मला आठवतं.)

मी बाबांना विचारलं, “बाबा, बाबा, तुम्हांला क्रिकेट पहायला आवडतं ना?”

बाबा आनंदाने म्हणाले, “हो! खूप म्हणजे खूपच आवडतं.”

मी खुश झालो. मी झोपलेले किंवा झोपेला आलेले काका-काकू, मामा-मामी, आजी-आजोबा ह्या सगळ्यांना उठवून विचारलं, “सांगा-सांगा. तुम्हांला क्रिकेट पहायला आवडतं का हो?”

डोळे उघडून, सगळे आनंदाने म्हणाले, “होss होss!”

मी टुणकन् उडी मारली. धडपडत जाऊन लाईट लावला.

ऐटीत उभा राहून म्हणालो, “आई-बाबा, काका-काकू, मामा-मामी, आजी-आजोबा, आता पहा क्रिकेट. आणि व्हा खूप खूप आनंदी.”

आजोबा झोपताना उशीजवळ चश्मा आणि गोल डब्यात दात काढून ठेवतात.

लाईट लावताच आजोबा म्हणाले, “हे काय? लाईट लावून क्रिकेट? आता? रात्री?” मी दोन्ही हात कंबरेवर ठेवून म्हणालो, “अहो आजोबा, सचिन तर मैदानावर लाईट लावून क्रिकेट खेळतो. तो चष्मा लावा, मी तुम्हांला फोर मारून दाखवतो.”

बाकीची मोठी माणसं अर्धवट झोपेत. माझ्याकडे, जांभया देत ‘आss’ करून पहात होती. माझ्याकडे वेळ नव्हता.

सर्व मोठ्या माणसांना आवडेल असं मला वागायचं होतं. मोठ्या माणसांना आनंदी करायचं होतं.

मी झटकन मामाच्या अंगावरून उडी मारली. मामीला ओलांडून काकूच्या डोक्याच्या बाजूला पाय ठेवला. खाली वाकून, हात लांब करून, कपाटाला टेकून ठेवलेली बॅट घेतली.

मी विचार करू लागलो. हातात बॅट घेऊन सगळं मैदान नीट पाहिलं. मैदानावर क्षेत्ररक्षक आडवे झोपले होते. कपाटावर रद्दीचा ढीग, समोर टी.व्ही., ऑफ साईडला आरशाचं कपाट, ऑन ला शोकेस, सिली पॉईंटला घड्याळ आणि पंच म्हणून भिंतीवरचे तीन फोटो...

मोठ्या माणसांना मोठा आनंद व्हावा, म्हणून, ह्या सगळयांना चुकवून, मला एक सणसणित चौकार मारायचा होता. मी विचार करतच बॅटजवळचा बॉल घेतला. बॉल नीट पहायला वेळच नव्हता. कारण, आडवे पडलेले क्षेत्ररक्षक एव्हाना चुळबूळ करू लागले होते.

‘वन मॅन, वन नाईट मॅच’ असल्याने मी बॉल पायावर घासला. ऊंच उडवला आणि टाsssणकन एकच फटका मारला. हा! हा! आनंदच आनंद! मोठा आनंद! पण हा आनंद काही क्षणच टिकला. कारण, आजोबांनी माझ्या पाठीत एकच धपका घातला. आजोबा खू खू हसत म्हणाले, “अले शंभ्या, काय ले हे? आता उद्या मी जेवनाल कसा?”

मी विचार करता करता, बॉल घेण्याऐवजी, आजोबांचा दात ठेवायचा गोल डबाच, चुकून घेतला होता... आणि एक फटका मारताच, सगळ्या घरभर दात पसरले होते.

मी घाबरलो. मला वाटलं, आता आजोबा आणि बाकीचे क्षेत्ररक्षक माझ्या पाठीवर फोर किंवा सिक्स मारणार...

पण आजी हसतच म्हणाली, “व्वा! एका फटक्यात बत्तीस रन्! कम्माल आहे बाई... तेंडुलकरांच्या सचिनला पण नाही जमणार हो हे!”

तोंडाचा चंबू करत आजोबा म्हणाले, “आता सकाळी उठल्यावर, सगळे रन गोळा करा. आता मॅच संपलीय...”

“कारण रन जरा जास्तीच झालेत...” असं आजीने हळूच म्हणताच, बाकी सगळे ‘रन लपवून हसले!’

Tags: राजीव तांबे डोंबिवली चौकार पंच सिली पॉईंट ऑन साईड ऑफ साईड क्षेत्ररक्षक आजी-आजोबा आई-बाबा सचिन तेंडुलकर क्रिकेट Rajiv Tambe Dombivali Four Umpire Silly Point On Side Off Side Fielders Grandparents Mom-Dad Sachin Tendulkar #Cricket weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके