डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

टिलीचं बोलणं संपायच्या आत ती पाण्याची भिंत किनाऱ्यावरून आत वेगाने घुसली आणि काही क्षणांत दोन किलोमीटर्सपर्यंतचा भूभाग संपूर्णत: जलमय झाला. पाठोपाठ अशाच अजस्त्र भिंतीसारख्या लाटा आणखी दोन वेळा येऊन थडकल्या. सर्वत्र हाहा:कार उडाला. मोठ-मोठ्या बोटी उलट्या-सुलट्या करून समुद्र आपल्या पोटात घेत होता. प्रचंड मोठ्या भूभागावरचं सर्व काही जमीनदोस्त आणि जलमय झालं होतं. पोहायला गेलेले लोक, तरंगणाऱ्या वस्तू, उन्मळलेली झाडं, इत्यादी प्रचंड वेगाने येऊन किनाऱ्यावर आपटत होते. समुद्रातलं तांडव संपल्यानंतर एक भयाण अशी स्मशान शांतता सर्वत्र पसरली होती. 

२००४ सालचा डिसेंबर महिना संपत आला होता. जगाच्या काना-कोपऱ्यांतले हौशी लोक आपली नाताळची सुट्टी मजेत घालवण्यासाठी देश-विदेशांतल्या पर्यटनस्थळी पोहोचले होते. त्यापैकी अनेक पर्यटक थायलंडच्या निसर्गरम्य किनारपट्ट्यांवरही दाखल झाले होते. तिथली सगळी हॉटेल्स पर्यटकांनी भरून गेली होती. अथांग पसरलेल्या हिंदी महासागराच्या किनारपट्टीवर भटकंती करण्यात आणि कुटुंबियांसोबत, मित्र-मंडळींबरोबर लाटांशी मनसोक्त खेळण्यात ते दंग झाले होते. मनमुराद आनंद लुटत होते. या पर्यटकांमध्ये इंग्लंडची टिली स्मिथ ही सहावीची विद्यार्थीनीही होती. जेमतेम ११ वर्षांची ही चिमुरडी तिची आई पेनी, वडील कॉलिन आणि धाकट्या बहिणीबरोबर आली होती.  

थायलंडच्या दक्षिणेकडील फुकेट बेटाच्या मैखाव किनाऱ्यावर स्मिथ कुटुंब सुट्टी घालवणार होते.  २५ डिसेंबरच्या रात्री त्यांनी मोठ्या उत्साहाने ख्रिसमस सण साजरा केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ डिसेंबरच्या सकाळी ते सर्वजण समुद्रकिनाऱ्यावर आले. मात्र समुद्रात खेळता-खेळता टिली एकाएकी बेचैन होऊ लागली. ती पाण्यातून किनाऱ्याकडे धावत आली. समुद्रात काहीतरी अस्वाभाविक, विचित्र आणि भयंकर घडत असल्याची तीव्र जाणीव तिला झाली.  

टिलीला इंग्लंडमधील तिच्या ‘डेन्स हिल’ शाळेतल्या भूगोलाच्या ॲन्ड्र्यु कर्नेसरांनी दोनच आठवड्यांपूर्वी शिकवलेल्या एका धड्याची राहूनराहून आठवण येऊ लागली. समुद्रतळाशी होणाऱ्या शक्तिशाली भूकंपांविषयी आणि समुद्राखालच्या भूपृष्ठात होणाऱ्या प्रचंड उलथा-पालथींविषयी त्या धड्यात माहिती सांगितली होती. ती माहिती टिली आपल्या आईला सांगू लागली. आई हसून म्हणाली, ‘टिली, मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस, समुद्रावर अशा लाटा येतच असतात.’

पुढच्या काही सेकंदांतच टिली कमालीची अस्वस्थ होऊ लागली, भयभीत होऊन (समुद्राकडे बोट दाखवून) सारखी किंचाळू लागली. आईला ती समुद्राकडे बघायला भाग पाडत होती. आईला मात्र समुद्रात काय होतंय, हे कळत नव्हतं. आता टिली बेभान झाली होती, तिचा मानसिक उद्रेक अनावर होत होता. आई-वडिलांना, बहिणीला आणि इतर पर्यटकांना जिवाच्या आकांताने मोठ-मोठ्याने ओरडून ती सांगू लागली... ‘‘किनाऱ्यापासून ताबडतोब खूप-खूप दूर पळून जा, दूर पळून जा, तुमचा जीव वाचवा.’’ 

आता किनाऱ्यापासून खूप आत आत गेलेल्या समुद्राच्या पाण्याला फुगवटा यायला सुरुवात झाली होती. आत गेलेला पाण्याचा प्रवाह विरुद्ध दिशेला वळल्याने पाणी किनाऱ्याकडे शिरू लागलं होतं, पाण्यावर प्रचंड बुडबुडे दिसू लागलं होतं, सर्वत्र फेस तयार होत होता आणि पाण्यात मोठमोठे भोवरे तयार व्हायला सुरुवात झाली होती.

नक्की काय होतंय किंवा होणार आहे, हे टिली सोडून अन्य कोणालाच कळलं नव्हतं. तरी एव्हाना ही चिमुरडी जे ओरडून ओरडून सांगतेय, त्यातलं गांभीर्य लोकांना कळायला लागले होते. केवळ ती लहान आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, हे तिच्या आईने ठरवले. टिलीची आर्तता तिला भावली होती. आपण वयाने मोठे असलो तरी (आपल्या मुलीच्या भूगोलाच्या आकलनावर विश्वास ठेवला पाहिजे) आपल्या मुलीला कुठल्यातरी महाभयंकर धोक्याची चाहूल लागली आहे, असं तिच्या आईला मनोमन वाटलं. त्यामुळे अखेर टिली, तिचे आई- वडील, बहीण यांच्याबरोबरच आजूबाजूचे सारे पर्यटकही समुद्रकिनाऱ्यापासून खूप दूर असलेल्या आपापल्या हॉटेल्सकडे सुसाट वेगाने पळत सुटले. 

धापा टाकत ते सर्वजण कसेबसे एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले, श्वास रोखून समुद्राकडे बघू लागले. आणि क्षणार्धात जे घडलं- त्यांना जे दिसलं- त्यामुळे त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. जणू काही आख्खा समुद्रच एका महाकाय लाटेची अजस्त्र भिंत बनला होता आणि किनाऱ्यावरचा सारा आसमंत गिळंकृत करायला प्रचंड वेगाने बाहेर येत होता. ते पाहून टिली किंचाळली, ‘‘आई  ही महाभयकंर त्सुनामी आहे, त्सुनामी !'' 

टिलीचं बोलणं संपायच्या आत ती पाण्याची भिंत किनाऱ्यावरून आत वेगाने घुसली आणि काही क्षणांत दोन किलोमीटर्सपर्यंतचा भूभाग संपूर्णत: जलमय झाला. पाठोपाठ अशाच अजस्त्र भिंतीसारख्या लाटा आणखी दोन वेळा येऊन थडकल्या. सर्वत्र हाहा:कार उडाला. मोठ-मोठ्या बोटी उलट्या-सुलट्या करून समुद्र आपल्या पोटात घेत होता. प्रचंड मोठ्या भूभागावरचं सर्व काही जमीनदोस्त आणि जलमय झालं होतं. पोहायला गेलेले लोक, तरंगणाऱ्या वस्तू, उन्मळलेली झाडं, इत्यादी प्रचंड वेगाने येऊन किनाऱ्यावर आपटत होते. समुद्रातलं तांडव संपल्यानंतर एक भयाण अशी स्मशान शांतता सर्वत्र पसरली होती. 

हे सर्व बघताना टिली सुन्न झाली होती. कर्नेसरांचा भूगोलाचा पाठ तिच्या डोळ्यांसमोरून सरकत होता.. सर सांगत होते...‘‘महासागरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लाटा. या लाटांचा उल्लेख असलेल्या कथा, कविता, गाणी तुम्ही ऐकली असतील. लाटांच्या हेलकाव्यांवर वर-खाली डोलणाऱ्या होड्यांमध्ये बसण्याची मजाही तुमच्यापैकी काहींनी लुटलेली असेल.  समुद्रकिनाऱ्यांवर या लाटांशी खेळण्यात मोठी मौज असते. हो, पण तिथे सावध असावं लागतं. 

कशा काय तयार होतात या लाटा समुद्रावर? काही लाटा वाऱ्यांमुळे तयार होतात. पण बऱ्याचशा लाटा भरती-ओहोटीमुळे तयार होतात. भरती- ओहोटी का होते? सूर्याभोवतीची प्रदक्षिणा करताना पृथ्वी कधी सूर्याच्या जवळ येते, तर कधी दूर जाते. आणि पृथ्वीभोवती फिरताना चंद्र कधी पृथ्वीच्या जवळ येतो, तर कधी दूर जातो. त्यामुळे सूर्य आणि चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षण बलाचा पृथ्वीवरील प्रभाव कमी-जास्त होत राहतो. परिणामी, समुद्रातील पाणी सूर्याकडे व चंद्राकडे म्हणजेच आकाशाकडे खेचले जाते आणि लाटा तयार होतात व ओसरतात...

पण या दरराजे निमार्ण होणाऱ्या लाटांपेक्षा वेगळ्या अशा राक्षसी लाटा कधीकधी समुद्रात तयार होतात. त्या इतक्या उंच असतात की, पाण्याच्या काही मीटर उंचीच्या भिंतीच वाटतात. त्या जेव्हा किनाऱ्यावरून आत घुसतात तेंव्हा तिथल्या मानवी वस्त्या, जनावरं, निसर्गसंपत्ती या सर्वांना उद्‌ध्वस्त करतात. अशा प्रलयंकारी लाटांना ‘त्सुनामी’ असं म्हणतात. 

या लाटा आकाशातल्या चंद्र-सूर्यामुळे तयार होत नाहीत. त्या तयार होतात, समुद्रतळाशी भूगर्भात होणाऱ्या प्रचंड शक्तीच्या भूकंपामुळे किंवा ज्वालामुखीमुळे. म्हणजे समुद्राखालचा पृथ्वीच्या पोटातला भाग सरकल्यामुळे किंवा दुभंगल्यामुळे प्रचंड ऊर्जा पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडते, ती ऊर्जा पाण्यामध्ये शिरते आणि म्हणून पाण्याचा मोठा भाग विस्थापित होतो. हे विस्थापित झालेले पाणी समुद्राच्या तळाकडून पृष्ठभागाकडे वेगाने येते आणि लाटांच्या मालिकेचे स्वरूप धारण करते. किनाऱ्यापासून आतमध्ये दूरवर खोल समुद्रात या लाटा तयार होतात, तेव्हा त्यांची उंची जेमतेम एक मीटर असते, पण त्यांचा विस्तार मोठा असतो. अशा दोन लाटांमधलं अंतर सुमारे २०० किलोमीटर असतं. या लाटा जेट विमानाच्या वेगाने म्हणजे ताशी सुमारे ८०० किलोमीटर इतक्या वेगाने किनाऱ्याकडे प्रवास करतात. या लाटा जसजश्या किनाऱ्याच्या जवळ येतात, तस-तशी पाण्याची खोली कमी होते आणि लाटांचा वेग ताशी ८० किलोमीटरपर्यंत कमी होतो. मात्र त्यामुळेच, त्या लाटांची उंची वाढत जाते आणि त्यांची विध्वंसक शक्तीदेखील.’’

टिलीच्या कर्नेसरांनी असं क्रमिक पुस्तकाच्या पलीकडे जाऊन शिकवलं होतं. खरं तर सहावीच्या अभ्यासक्रमात फक्त भूकंपावर धडा होता. सरांनी मात्र भूकंपाचे भीषण परिणाम काय होऊ शकतात, हेही मुद्दाम शिकवलं होतं. समुद्राच्या तळाशी विशिष्ट प्रकारचा भूकंप झाला तर त्सुनामी येते, हेही शिकवलं होतं. इतकेच नव्हे तर १९४६ साली, हवाई बेटांवर जी त्सुनामी आली होती, त्यावेळची एक चित्रफित इंटरनेटवरून शोधून काढली होती आणि आपल्या संगणकावरून (वर्गातल्या स्मार्ट बोर्डवर) विद्यार्थ्यांना दाखवली होती. ती चित्रफित बघतांना वर्गातील मुलांना प्रत्यक्ष त्सुनामी पाहिल्याचा भास झाला होता. त्या विद्यार्थ्यांनी जणू काही त्सुनामीचा जिवंत अनुभव घेतला होता. भूगोलविषयक पुस्तकी माहिती नव्हे, तर चक्क भूगोलच त्या वर्गखोलीत अवतरला होता.

किनाऱ्याकडे प्रचंड वेगाने येणाऱ्या अक्राळ- विक्राळ लाटांचे उंचच उंच कडे दाखवून मुलांचे डोळे दिपवून टाकायचे आणि त्यांच्या मनात भीतीची त्सुनामी आणायची, हा मोह कर्नेसरांनी टाळला होता. लाटांच्या भिंतीपाठोपाठ येणाऱ्या भिंती आणि जीवघेण्या कानठळ्या बसवणारा आवाज यांचे केवळ थैमान दाखवले आणि थरार निर्माण करून मुलांना घाबरवून टाकले, अशा पद्धतीने त्यांनी शिकवले नव्हते. तर त्सुनामी येण्यापूर्वी समुद्राच्या लाटांमध्ये हळूहळू कसे बदल होऊ लागतात, किनाऱ्यावर उभे राहिल्यावर कोणते बदल स्पष्ट दिसू लागतात, त्यावरून महाभयंकर त्सुनामी येणार असल्याचा  अंदाज (काही तास आधीच) कसा बांधता येतो आणि लोकांचे प्राण कसे वाचवता येऊ शकतात, हे सर्व चित्रफितीचा चपखल उपयोग करून कर्नेसरांनी नीट समजावून सांगितले होते. त्सुनामीचा आगाऊ इशारा देणाऱ्या संकेतस्थळांचा अभ्यासही मुलांकडून त्यांनी करून घेतला होता.  

लक्षात घ्या, चित्रफिती दाखवून आभासी अनुभव देणं वेगळं आणि त्यातून शिकायला लावणं वेगळं! पदोपदी येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवांनी जीवन भरलेलं असतं. ते अनुभव टाळता येत नाहीत, पण त्यांतून शिकणं होतंच असं नाही. अनुभवांतून शिकायचं असतं, त्यांचं सोनं करायचं असतं, हे टिली शिकली होती. समुद्राचा फुगवटा वाढतोय हे बघून तिनं त्सुनामी येणार, हे अचूक हेरलं होतं. सरांनी उत्तम शिकवलं होतं, पण तितकंच उत्तम टिली शिकली होती, हे फार महत्त्वाचं आहे. यावरून टिलीची बुद्धिमत्ता अव्वल दर्जाची होती, हे तर निर्विवाद सिद्ध झालंच. पण आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग याक्षणी केलाच पाहिजे आणि पराकोटीचा आग्रह धरून सर्व पर्यटकांना किनारा सोडायला भाग पाडले पाहिजे (त्यांचे प्राण वाचवलेच पाहिजेत), ही तिची इच्छाशक्ती व कृतिशीलता सर्वांना प्रभावित करून गेली. ‘काहीही झालं तरी माझ्या ज्ञानावर माझा पूर्ण विेशास आहे, ते न वापरल्यास होणाऱ्या परिणामांची स्पष्ट कल्पना मला आहे आणि म्हणून (या क्षणी आणि या इथे) योग्य ती कृती करणारच’, असं तिला वाटलं असावं. हे कर्तव्याचं ज्ञान आणि भान टिलीनं कुठल्या शाळेत मिळवलं कोण जाणे? पण त्यामुळे टिली हिरो बनली होती.  

युनोसह साऱ्या जगातून टिलीवर अभिनंदनाचा आणि पुरस्कारांचा वर्षाव होत होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी तिला बोलावून घेतलं होतं, तिच्याशी गप्पा मारल्या होत्या. तिच्या सरांना तर जगभरातल्या शिक्षकांकडून अभिनंदनाच्या आणि कौतुकाच्या हजारो इमेल्स आल्या. चांगले शिक्षक व विद्यार्थी वर्गखोलीतलं ज्ञान वापरून जगात बदल घडवू शकतात, समाजाचे प्रश्न सोडवू शकतात, हे जगाला दिसलं. 

शाळेत शिकताना मिळते ती माहिती. पण त्या माहितीचा योग्य वेळी योग्य उपयोग करून, उपयुक्त अशी कृती करून समाजाचा छोटा किंवा मोठा प्रश्न सोडवला, तर त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर होतं. या अर्थाने टिली केवळ हुशार नव्हे तर ज्ञानी ठरते. त्सुनामीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ सेंबर २००४ रोजी, जगाशी संपर्क सुरू झाल्यावर टिलीच्या आई-वडिलांना हे समजलं की, टिलीच्या प्रसंगावधानामुळे त्यांच्या किनाऱ्यावर एकही मृत्यू झाला नव्हता! थायलंडच्या इतर किनाऱ्यांवर मिळून ८५०० लोक मृत किंवा बेपत्ता झाले होते!! धन्य ती टिली आणि धन्य तिचे कर्नेसर!!! 

टिलीला नंतर समजलं की,  २६ डिसेंबर २००४ या दिवशी हिंदी महासागरात इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ (समुद्राच्या तळाशी) ९.२ रिश्टर स्केलचा महाप्रचंड भूकंप झाला होता.  त्यामुळे विनाशकारी त्सुनामीच्या लाटा तयार झाल्या होत्या. ती जेव्हा ओरडून सर्वांना किनाऱ्यापासून दूर पळून जायला सांगत होती, तेव्हा त्या लाटा ताशी ८०० किलोमीटर वेगाने थायलंडच्या मैकाव किनाऱ्याकडे झेपावत होत्या!! बाप रे!! दक्षिण आशियातल्या १४ देशांच्या किनाऱ्यांवर त्या लाटा धडकल्या, तेव्हा त्यांची उंची होती १५ ते ३० मिटर्स, म्हणजे ४ ते ८ मजली इमारतीएवढी. 

त्या त्सुनामीमुळे सर्व देशांत मिळून २,३०,००० ते २,८०,००० लोक मृत्युमुखी पडले होते. एकट्या इंडोनेशियात २,२५,००० मृत किंवा बेपत्ता झाले होते. त्सुनामीचे खारे पाणी किनाऱ्यापासून दोन किलोमीटर्सपेक्षा जास्त आत घुसले होते. त्यामुळे हिंदी महासागराचे सुंदर किनारे उद्‌ध्वस्त झाले होते, तेथील शेती कायमची नष्ट झाली होती. भारताच्या दक्षिण किनाऱ्यांवरची व लगतच्या बेटांवरची ११००० माणसंही दगावली आणि ५००० लोक बेपत्ता झाले. त्या दिवशी अंदमान-निकोबार बेटांवरही त्सुनामीने असाच हाहा:कार माजवला. हजारो पर्यटक मृत्यू पावले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या बेटांवर शतकानुशतके राहणाऱ्या आदिवासींपैकी कोणीही मृत्यू पावले नाहीत. कारणाचा शोध घेतल्यावर कळलं की, त्सुनामी येण्यापूर्वी त्यांना त्या दिवशी किनाऱ्याजवळ अनपेक्षितरीत्या जास्त मासे दिसून आले होते. आणि पारंपारिक निरीक्षणातून त्यांना हे पक्कं माहित होतं की, असं झालं तर मोठ्ठं वादळ येतं. त्यामुळे त्या दिवशी आदिवासी लोक समुद्रापासून दूरवर पळाले होते. पर्यटक मात्र हव्यासापोटी मासे गोळा करायला समुद्राकडे धावत सुटले होते. आदिवासींनी त्यांना बजावले होते, पण त्यांचं कोणीही ऐकलं नाही.  

त्सुनामी येणार हे टिलीला शाळेतल्या पुस्तकी नसलेल्या अपारंपरिक उत्कृष्ट शिक्षणातून अचूक समजलं आणि आदिवासींना टोळीतल्या पारंपारिक शिकवणुकीतून ते समजलं होतं. म्हणजे आपापल्या पद्धतीने निसर्गाला समजून घेणारे व त्यानुसार संयम जपणारे (टिली आणि आदिवासी) वाचले. मात्र पर्यटक म्हणून निसर्गाला समजून घेण्याऐवजी त्याचा केवळ उपभोग घ्यायला आतुर झालेले आणि आदिवासींचं न ऐकणारे ‘सुशिक्षित’ अज्ञानी बुडाले.  म्हणजे निसर्गाचा भाग बनून, तो नीट समजून घेऊन, त्याच्या कुशीत बिनधास्त राहायचं? की त्याच्यापासून आपण वेगळे आहोत, आपण त्याचे उपभोक्ते आहोत आणि तो आपल्या उपभोगासाठीच आहे, असं मानून सर्वनाश ओढवून घ्यायचा? 

मुलांनो, थायलंडमधील फुकेटच्या किनाऱ्यावर चिमुरड्या टिलीचं पर्यटकांनी ऐकलं, पण अंदमानच्या किनाऱ्यावर प्रौढ अनुभवी आदिवासींचं तिथं गेलेल्या पर्यटकांनी ऐकलं नाही. असं का झालं असेल? आपण विचार करायला हवा. 

-विवेक सावंत
md@mkcl.org
-डॉ. संगीता सावंत
sawantsangeeta@gmail.com
 

Tags: बालकुमार दिवाळी अंक विवेक सावंत समुद्र टिली स्मिथ भूगोल पर्यटन त्सुनामी शिक्षकदिवस शौर्यदिवस बालदिन-१४ नोव्हेंबर भूगोल दिवस Teacher Toruism teenage Inspiratioal story २०१७ Balkumar Diwali ank Vidnyan Sunami Vivek sawant Bhugol Konwledge Science Gegraphy Tili Smith Tsunami weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके