डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विद्यार्थ्यांना केवळ विषय माहीत होणे अपेक्षित नसून त्यातील संकल्पना त्यांना स्पष्टपणे कळायला हव्यात, किंबहुना त्या संकल्पनांचे त्यांना आकलन व्हायला हवे. यासाठी शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित आहे.  वर्गातील शिक्षण विद्यार्थ्यांच्या सहभागाने व्हायला हवे, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची पूर्ण मुभा असायला हवी. त्यांच्या प्रश्नांचे निरसन चर्चेद्वारे आणि शिक्षकांना अवगत असलेल्या ज्ञानाच्या आधारे व्हायला हवे.  असे झाले नाही तर 21 व्या शतकामध्ये शिक्षकांची गरजच काय असा प्रश्न उपस्थित होईल. परंतु माहितीची उपलब्धता असली तरी विषयाच्या आकलनासाठी विद्यार्थ्यांना चांगल्या आणि व्यासंगी शिक्षकांची निश्चितच गरज भासणार आहे, पण त्यासाठी शिक्षकांनी व्यासंग जोपासायला हवा.  

सजीवांमध्ये शिकण्याची प्रक्रिया ही अंगभूतच असते. अमीबासारख्या एकपेशीय प्राण्यामध्येसुद्धा ती आढळून येते. विषाणू आणि जीवाणू हे प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणतात, हासुद्धा शिकण्याच एक प्रकार आहे. अधिक विकसित प्राण्यांमध्ये ही प्रक्रिया अधिक व्यापक आणि गुंतागुंतीची असल्याचे दिसून येते. मानव हा बौद्धिकदृष्ट्या अधिक विकसित असलेला प्राणी आहे. मानवी मेंदू हा सभोवतालच्या परिस्थितीचे आकलन अगदी प्राथमिक अवस्थेत असल्यापासून सुरू करतो. 

मानव जन्मानंतर निसर्गाशी संपर्क आल्यानंतर त्याला जे अनुभव येतात त्या अनुभवांचे संकलन आणि त्यातून निघालेल्या निष्कर्षांचे जतन करीत असतो. अनुभवातून शिक्षण घेत असताना त्याला ज्ञानेंद्रियांची मदत होत असते. अनुभवाला शिक्षणाची जोड दिली तर त्याच्या आकलनाची व्यापकता वाढते. पारंपरिक पद्धतीचे शिक्षण न घेतलेल्या आणि पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेतलेल्या व्यक्तीमध्ये एक महत्त्वाचा फरक असतो. तो म्हणजे शिक्षित व्यक्तीला आपल्या क्षमतांचा उपयोग चांगल्या प्रकारे कसा करून घ्यावा याची जाण असते. शिवाय योग्य प्रकारे शिक्षण घेण्याची क्षमताही त्याला प्राप्त होते. 
पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये अर्थातच शिकविणाऱ्याची गरज असते. ही गरज शिक्षकांकडून भागविली जाणे अपेक्षित असते. शिकणाऱ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, त्याचप्रमाणे एखाद्या विषयात पारंगत होण्यासाठी चांगल्या शिक्षकाची गरज असते.  निसर्ग, पुस्तक, अनुभव यांनाही गुरू मानले गेले आहे. प्राण्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करूनही अनेक गोष्टी शिकता येतात. परंतु या प्रकारचे शिक्षण हे अनेक दृष्ट्या अपूर्ण असण्याचा धोका असतो. याचे मुख्य कारण एखादी गोष्ट आत्मसात करण्यात निरीक्षणाची साठवण, त्याचे विश्लेषण, विश्लेषणातून निघणारे निष्कर्ष आणि त्या निष्कर्षातून निघणाऱ्या संकल्पनांची निर्मिती या घटकांचा समावेश होतो.

निष्कर्ष, विश्लेषण आणि संकल्पनानिर्मिती यासाठी योग्य त्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्यामुळेच शिक्षक अथवा गुरू यांचे स्थान औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये अधोरेखित होते.  मानवी संस्कृतीचा विकास होत असताना ज्या संस्था उदयास आल्या त्यांमध्ये शिक्षणसंस्था ही महत्त्वाची मानली जाते. या संस्थेचा उदय प्राचीन काळामध्ये झाला असला तरी त्याची व्याप्ती खूपच सीमित होती. कारण शिक्षण हे काही लोकांपर्यंतच सीमित होते. मुख्यतः राजपुत्र आणि काही धनिक व्यक्ती यांनाच सुनियोजित पद्धतीने शिक्षण घेणे शक्य होते. इतर कला कौशल्ये वंशपरंपरागत पद्धतीने शिकविली जात. 

इ.स.पूर्वी आणि त्यानंतर अनेक थोर विभूती होऊन गेल्या. त्यांनी आपल्या विचारांमधून समाजामध्ये प्रचंड परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या विचारांची परिणती मुख्यतः धर्मसंस्था स्थापन होण्यामध्ये झाली. या विभूतींमध्ये गौतम बुद्ध, आद्य शंकराचार्य, महावीर वर्धमान, येशू-ख्रिस्त, महम्मद पैगंबर या व्यक्तींचा समावेश होतो, हे एका अर्थाने समाजशिक्षकच होते. त्यांच्या ठायी असणारे सखोल ज्ञान, वैचारिक बैठक, समाजापर्यंत जाण्याची क्षमता आणि विचारांतून परिवर्तन घडवून आणण्याची ताकद असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसताना व प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी आपल्या विचारांची छाप समाजावर प्रस्थापित केली. 

त्यानंतरच्या काळातही शिक्षण हे बहुजनांपर्यंत काही प्रमाणात पोहोचले असले तरी त्याची व्याप्ती खूपच मर्यादित होती. त्या काळात होऊन गेलेले अनेक शास्त्रज्ञ, संत आणि इतर विचारप्रवर्तन करणारे लोक यांनी शिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. पारंपरिक शिक्षण पद्धतीचा उदय हा गेल्या 300 ते 400 वर्षांत अधिक प्रमाणात झालेला दिसून येतो. इंग्लंडसारख्या प्रगत देशामध्ये 400 वर्षांपूर्वी विद्यापीठाची स्थापना झालेली नव्हती. त्यामुळे आज आपण ज्या शिक्षकांचा विचार करू इच्छितो ते शिक्षक ही अगदी अलीकडच्या काळाची देणं आहे. 

शिक्षणाचे संस्थात्मक रूप तयार झाल्यानंतर शिक्षक हा त्यातील महत्त्वाचा घटक बनतो. संस्थात्मक स्वरूपामुळे शिक्षणाला साचेबद्ध स्वरूप आले. त्याचे अनेक फायदे आहेतच. परंतु या साचेबद्ध स्वरूपामुळे आजच्या शिक्षण आणि शिक्षकांमध्ये ज्या त्रुटी निर्माण झाल्या त्याचा परिणाम आजच्या शिक्षणावर झाल्याचे दिसून येते. 

शिक्षकांपुढील आव्हाने

विसाव्या शतकाच्या पार्श्वभूमीवर विचार केला असता 21 व्या शतकात शिक्षकांच्या पुढे असणारी आव्हाने ही वेगळ्या प्रकारची आणि अधिक आव्हानात्मक आहेत. 20 व्या शतकातील शिक्षणामध्ये माहिती वितरित करण्यावर अधिक भर होता. त्याचे कारण माहितीची उपलब्धता तितक्याशा प्रमाणात नव्हती. विशेषतः भारतात शिक्षण त्या मानाने अविस्तारित स्वरूपात आणि निम्न स्तरावर उपलब्ध होते.

शिक्षणाकडे वळणारे विद्यार्थी प्रामुख्याने शिक्षणाची आवड आणि क्षमता असणारे होते त्यामुळे शिक्षकांकडून मिळालेल्या थोड्याशा प्रोत्साहनावरही ते आपले ध्येय गाठण्यात यशस्वी झाले. याचा अर्थ 20 व्या शतकामध्ये सक्षम, व्यासंगी, उच्च दर्जाचे शिक्षक नव्हते असा होत नाही. परंतु अशा शिक्षकांची संख्या मर्यादित होती. शिक्षणाबद्दल असणारी आस्था आणि आचरणामध्ये असणारी शुद्धता यांचा परिणाम विद्यार्थ्यांवर चांगला होत असे.

याउलट 21 व्या शतकामध्ये माहितीची प्रचंड प्रमाणामध्ये उपलब्धता आहे. शिक्षणाचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शिक्षकांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शिक्षकांची लागणारी पात्रता ही आता उच्च दर्जाची असून त्यांना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण घेणेही बंधनकारक आहे. परंतु त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढली आहे काय, या प्रश्नाचे उत्तर मात्र दुर्दैवाने नकारात्मक आहे.

शहरी आणि ग्रामीण दोन्ही पातळ्यांवर शिक्षणाची गुणवत्ता खालावलेली दिसून येते, या परिस्थितीला शिक्षक पूर्णपणे जबाबदार नसला तरी त्याचा वाटा 70 टक्के एवढा निश्चित आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांमध्ये शिकवण्याकडे असणारा कल कमी होत आहे. पूर्वी शिक्षक हा राजकीय, सामाजिक आणि इतर वादविवादांपासून अलिप्त असे. समाजामध्ये त्याचे स्थान मार्गदर्शकाचे असल्यामुळे समाजाचा त्याला आधार आणि पाठिंबा असे. 

अलीकडच्या काळात शिक्षणाचे अयोग्यरीत्या सरकारीकरण झाल्यामुळे शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यातच समाजाचा शिक्षकांविषयी असणारा दृष्टिकोन बदलल्यामुळे राजकीय आणि सामाजिक दबावापासून आपले संरक्षण त्यांना स्वतःलाच करावे लागते. शिक्षकांची गुणवत्ता आणि ते त्यांच्या कर्तव्यात करत असणाऱ्या कसुरीबद्दल समाज त्यांच्यावर टीका करत असला तरी समाजाकडून अपेक्षित असणाऱ्या मूल्यांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. या मूल्य ऱ्हासांचा परिणामही शिक्षकांवर होणे साहजिकच आहे. 

या गोष्टी तूर्त बाजूला ठेवू. तरी त्या शिक्षकांचा कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. माहितीच्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देणे हा शिक्षणाचा उद्देश मागे पडला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः माहिती गोळा करून त्यावर विचार करणे अपेक्षित आहे. वर्गामध्ये शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना तो विषय अधिक चांगला कसा आत्मसात करता येईल याविषयी मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.  याचाच अर्थ असा की शिक्षकांना तो विषय नीटपणे समजायला हवा एवढेच नव्हे तर त्या विषयाशी आनुषंगिक अशा इतर गोष्टींचे त्याला ज्ञान हवे. 

आपण जो विषय शिकतो त्या विषयाची उपयोगिता, त्याचा तात्कालिक संदर्भ आणि त्या विषयामध्ये पुढे होऊ घातलेले बदल यांचे ज्ञान शिक्षकाला हवे. विद्यार्थ्यांना केवळ विषय माहीत होणे अपेक्षित नसून त्यातील संकल्पना त्यांना स्पष्टपणे कळायला हव्यात, किंबहुना त्या संकल्पनांचे त्यांना आकलन व्हायला हवे. यासाठी शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित आहे. 

वर्गातील शिक्षण विद्यार्थ्यांच्या सहभागाने व्हायला हवे, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची पूर्ण मुभा असायला हवी. त्यांच्या प्रश्नांचे निरसन चर्चेद्वारे आणि शिक्षकांना अवगत असलेल्या ज्ञानाच्या आधारे व्हायला हवे. असे झाले नाही तर 21 व्या शतकामध्ये शिक्षकांची गरजच काय असा प्रश्न उपस्थित होईल. परंतु माहितीची उपलब्धता असली तरी विषयाच्या आकलनासाठी विद्यार्थ्यांना चांगल्या आणि व्यासंगी शिक्षकांची निश्चितच गरज भासणार आहे, पण त्यासाठी शिक्षकांनी व्यासंग जोपासायला हवा. शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी असायला हवे. परंतु  शिक्षकांचे या गोष्टींकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष होते. 

विद्यार्थी हा वर्गात आणि वर्गाबाहेर शिक्षकांचे निरीक्षण करीत असतो. शिक्षकांच्या शिकवण्यामधून व त्याचप्रमाणे त्यांच्या वर्तनातून विद्यार्थी प्रेरणा घेतात. जगातील 93 उच्च प्रतीच्या संशोधकांनी आम्ही संशोधक कसे झालो याबद्दलचे अनुभव कथन ‘वन हंड्रेड रीझन्स टु बी अ सायंटिस्ट’ या अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्स या पुस्तकात ट्रिएस्टे इटली येथील जग प्रसिद्ध संस्थेने प्रकाशित केले आहे. याचा अनुवाद ‘आम्ही शास्त्रज्ञ असे झालो’ या पुस्तकाच्या रूपात मी केला आहे. या महान शास्त्रज्ञांच्या अनुभव कथनांमधून त्यांना घडविण्यामध्ये आई वडील, चांगले पुस्तक यांबरोबरच शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे दिसून येते. 

शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनावर दूरगामी परिणाम करतात. त्यांना ध्येयनिश्चितीसाठी आणि ते ध्येय साध्य करताना येणाऱ्या संकटांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी सक्षम बनवितात. एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात संपूर्ण परिवर्तन घडवून आणतो.  आज शिक्षण पद्धतीमध्ये अनेक बदल होत आहेत. शिक्षण हे आता त्यागवृत्तीने सेवा करण्याचे क्षेत्र राहिले नाही, त्याची वाटचाल ही सेवावृत्तीपासून व्यवसायाकडे आणि व्यवसायाकडून आर्थिक उत्पन्नाच्या साधनाकडे होऊ लागली आहे. त्यामुळे आजच्या शिक्षणपद्धतीत अनेक अनिष्ट प्रवृत्तींनी शिरकाव केला आहे. विद्यार्थी हा ग्राहक आहे ही संकल्पना रूढ होऊ लागली आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मात्र शिक्षणक्षेत्राची अवस्था ही त्रिशंकूप्रमाणे अधांतरी लोंबकळत असताना दिसते. 

खाजगी शिक्षण संस्था कोणतेच निश्चित तत्त्व बाळगताना दिसत नाहीत. शिक्षणातून पैसा मिळविणे आणि त्याचा वापर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा पुरविण्याकडे न करता, त्याचप्रमाणे गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून शिक्षणसंस्थेची वाढ करण्यासाठी अथवा राजकीय किंवा तत्सम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केला जात आहे. शासन शिक्षणाबद्दलची आपली जबाबदारी झटकू पाहत आहे. सरकारी आणि महापालिकेच्या शाळांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे खाजगी शिक्षणसंस्थांतून शिक्षण घेणे सर्वसामान्य माणसाला परवडणारे नाही, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

महाविद्यालयीन पातळीवर कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थी महाविद्यालयात क्वचितच हजर राहताना आढळतात तर विज्ञान शाखेतून दिले जाणारे विज्ञानशिक्षण हे दिवसेंदिवस निकृष्ट दर्जाचे होत आहे. प्रयोगशाळांकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, अव्यासंगी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भरमसाठ गुण देऊन वरच्या वर्गात ढकलण्याची वृत्ती. त्यामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊनही विद्यार्थी नोकरी मिळवण्यासाठी सक्षम होत नाही. 

अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या भरमसाठ वाढली आहे आणि दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. अभियांत्रिकी पदवी मिळवल्यानंतर रोजीरोटीचा प्रश्न निश्चित सुटेल, यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा कल अभियांत्रिकी शाखेकडे दिवसेंदिवस वाढतो आहे. भरमसाठ संख्या असलेल्या महाविद्यालयांची गरज भागविण्यासाठी प्रवेश पात्रता दिवसेंदिवस कमी टक्केवारीवर आणून ती आता 40 टक्यांपर्यंत पोहोचली आहे. अभियांत्रिकी पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 25 टक्केच विद्यार्थी नोकरी मिळवण्यासाठी लायक असतात, ही वस्तुस्थिती आहे. परंतु याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले जाते. 

एम.बी.ए.सारख्या पदवीसाठी प्रचंड प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राजकीय सोयीसाठी अनेक संस्थांना त्यांच्याकडे कुठल्याही सुविधा उपलब्ध नसताना परवानगी दिली जाते, त्यामुळे या पदवीचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे. या सर्व प्रकारात प्रचंड प्रमाणात नफा मिळवणारे संस्थाचालक शिक्षकांना मात्र कमी पगारावर राबवून त्यांची उपेक्षा करतात. समाज मात्र शिक्षकांकडून उच्च दर्जाच्या गुणवत्तेची अपेक्षा करतो. हा आजचा विरोधाभास आहे. 

याउलट ज्या शिक्षकांना भरपूर वेतन मिळते आणि ज्यांची सेवा ही संरक्षित आहे असे शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. शिक्षकांनी कृतिशील असणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या प्रतिपादनाला कृतीची जोड असेल तर त्याचा विद्यार्थ्यांना अधिक लाभ होतो. त्यासाठी शिक्षकांनी संशोधन करणे आवश्यक आहे. संशोधनामुळे शिक्षकांना अद्ययावत माहिती मिळते. परंतु त्याचबरोबर त्यांचे आकलन आणि त्यांच्या शिकवण्याचा दर्जा आपोआपच उंचावतो. संशोधनामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षक त्या विषयाची आवड निर्माण करू शकतो, शिवाय विषय अधिक चांगल्या प्रकारे शिकविल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याचा आनंद लुटता येतो. 

विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये, व्यावहारिक ज्ञान, विषयाचे सखोल आकलन, प्रायोगिक कौशल्ये, विषयाची आवड यांचा अभाव आणि कुठलीही दिशा नसणारे अध्ययन अशा शिक्षणामुळे तरुण पिढीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. शिकून निष्क्रिय आणि निकामी झालेल्या तरुणांची संख्या समाजात वाढू लागली तर सर्वसामान्य माणसाच्या मनातील शिक्षणाविषयीची आस्था कमी होईल. असे झाले तर भारतासारख्या विकासाकडे वाटचाल करणाऱ्या राष्ट्रावर त्याचा विपरीत परिणाम होईल, त्यामुळे आजचे शिक्षण आणि शिक्षक याविषयी सखोल विचार करून त्यामध्ये योग्य ते बदल घडून आणणे ही काळाची गरज आहे. 

उच्च शिक्षणाचा विचार करता प्रामुख्याने तीन बाबींचा समावेश करणे जरुरीचे आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्देशित केलेल्या या तीन बाबी म्हणजे उपलब्धता, समानता आणि गुणवत्ता  या होत. भारतामध्ये अद्यापही उच्च शिक्षणाची उपलब्धता हव्या तेवढ्या प्रमाणात नाही. उच्च शिक्षणाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण देशात ती सरासरी 14 टक्के एवढी आहे असे मानले जाते. ही संख्या 20 टक्यांपर्यंत वाढविण्याची योजना आहे.  केवळ उच्च शिक्षणाची उपलब्धता वाढवून चालणार नाही तर जे घटक उच्च शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले घटक, स्त्रिया आणि अल्पसंख्याक यांना उच्च शिक्षणामध्ये विशेष संधी मिळणे आवश्यक आहे, अर्थात याचे नियोजन राज्यनिहाय होणे आवश्यक आहे. अन्यथा एखाद्या घटकाला दिलेल्या विशेष संधीमुळे इतर घटकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रासारख्या शिक्षणप्रगत असणाऱ्या राज्यात मुलींसाठी 30 टक्के वेगळे आरक्षण ठेवणे आवश्यक आहे का? यांसारख्या बाबींचाही विचार व्हायला हवा.  शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यासाठी नवीन महाविद्यालये आणि विद्यापीठांची गरज भासणार आहे. परंतु ही महाविद्यालये कोणत्या भागात आहेत याचा विचार व्हायला हवा, अन्यथा शहरात महाविद्यालयांची संख्या खूपच प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. 

वाणिज्य आणि कला या विद्याशाखांचे शिक्षण हे अधिक व्यवसायाभिमुख होणे तितकेच गरजेचे आहे. विज्ञान विषयामध्ये व्यवसायाभिमुखतेचा समावेश असला तरी विज्ञानशिक्षणाच्या गुणवत्तेविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. एकूणच उच्च शिक्षणाची गुणवत्ता हा एक कळीचा मुद्दा आहे. अभियांत्रिकी शाखांकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येतो. अभियांत्रिकी पदवीमुळे रोजगारांची उपलब्धता सहजपणे होते असा एक सर्वसाधारण समज आहे. परंतु अभियांत्रिकीची पदवी घेतलेले केवळ 25 टक्केच विद्यार्थी रोजगार मिळविण्यासाठी सक्षम असतात ही वस्तुस्थिती आहे. 

उच्च शिक्षणामध्ये गुणवत्तावाढीसाठी आणि शिक्षणपद्धतीत लवचिकता आणण्यासाठी श्रेयांक पद्धत आपणे जरुरीचे आहे. दिवसेंदिवस शासन उच्च शिक्षणाची जबाबदारी झटकू पाहत आहे. त्यामुळेच अभिमत आणि खाजगी विद्यापीठांना परवानगी देण्याचा शासनाचा कल दिसून येतो. या विद्यापीठांच्या गुणवत्तेबद्दल साशंकता आहेच, त्याचबरोबर अशा विद्यापीठांधून शिक्षण घेणे हे दिवसेंदिवस सामान्य माणसाला शक्य होणारे नाही. त्यामुळे शिक्षणाची उपलब्धता वाढली तरी समाज मात्र उच्च शिक्षणापासून वंचित राहणार की काय अशी शंका उपस्थित करण्यास भरपूर वाव आहे. एकूणच भारतातील उच्च शिक्षण हे एका संक्रमण अवस्थेतून जात आहे. या संक्रमणाची परिणती समाजासाठी लाभदायक अशा स्थितीमध्ये व्हावी यासाठी समाज आणि शिक्षक यांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. 

Tags: अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्स वन हंड्रेड रीझन्स टु बी अ सायंटिस्ट उच्च शिक्षणापासून वंचित उच्च शिक्षण भारत Abdus Salam International Center for Theoretical Physics One Hundred Reasons to be a Scientist Deprived of Higher Education Higher Education India weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके