डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आजच्या दिवसांत दुसऱ्याच्या घरांत काय चालले आहे, याकडे तटस्थपणे बघण्याची वृत्ती बळावली आहे. पूर्वी मोठी कुटुंबे असत आणि परस्पर संबंधही वारंवार येत. पण शेजारच्या घरातली एखादी आजी, मावशी, काकू, आत्या किंवा आई काही दिवसांनी दिसेनाशी झाली, तर ती कुठे गेली- हा प्रश्नही आज विचारला जात नाही. असे प्रश्न विचारणारे आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्यास, संशय आल्यास त्याचा पाठपुरावा करणारे कोणी न भेटण्याची खात्री असल्यानेच माणसे निर्ढावत असतात.

‘खाक में, क्या सूरतें होंगी, कि पिनहां हो गई!’
मातीत मिसळून गेलेल्या असंख्य चेहऱ्यांबद्दलची गालिबच्या एका शेरची ही ओळ म्हणजे सामान्य, अनाम जीवन जगून लुप्त होणाऱ्या सर्वसामान्य माणसांचे स्मारकच आहे. गुजरातेतील गेल्या महिन्यातल्या भूकंपानंतर असे अनेक जीव मातीच्या विटांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ही आपत्ती नैसर्गिक होती. पण तिचे जे परिणाम झाले ते मात्र मानवी चुकांमुळे झालेले आहेत. माणूस स्वार्थापायी आपला आणि दुसऱ्यांचा नाश कसा ओढवून घेतो याचे उदाहरण म्हणून भूकंपाच्या या घटनेकडे पाहता येईल. आता पुढचे मदतकार्य जोरात सुरू झाले असून, चारी दिशांनी मदतीचा ओघ भूकंपस्थळाकडे वाहू लागला आहे. या भूकंपानंतर अनेक आयुष्ये नाहक अर्ध्यावरच तुटली. माणसे कशा विचित्र परिस्थितीमध्ये सापडली; आणि अनेक जण कसे या आपत्तीकडे ओढले गेले यांच्या हकिकती हळूहळू बाहेर येऊ लागल्या आहेत. भूकपग्रस्तांमध्ये ज्या स्त्रिया आहेत, त्यांचे प्रश्न आणि वेगळ्या अडचणी- यांबद्दलही बातम्या प्रसृत होत आहेत, चर्चा होत आहेत. अशा आपत्तीच्या प्रसंगी आपली माणसे जीवित आहेत की नाहीत, हेही समजणे कठीण होऊन बसते. सगळ्या पसाऱ्यातून हव्या त्या व्यक्तींचा शोध लावणे त्रासदायक ठरते, ते वेदनादायकही असते. भूकंपाच्या वेळी किंवा अशा इतर नैसर्गिक आपत्तींच्या वेळी परागंदा झालेल्या माणसांचा शोध घेणे जिकिरीचे काम होऊन बसते. पण निदान या माणसांना कुठे कुठे शोधायचे हे तरी स्पष्ट असते. मात्र कधी कधी माणसे घरातून अचानक निघून जातात, गायब होतात त्या वेळी घरातल्या माणसांना त्यांचा शोध कसा आणि कुठे घ्यायचा हेच कळेनासे होते. आधी आसपास शोध घेऊन, मग पोलिसांकडे धाव घेतली जाते. वर्तमानपत्रे आणि टी.व्ही.वरून ‘आपण यांना पाहिलंत का?’ अशा स्वरूपाच्या जाहिराती दिल्या जातात. त्यांचा कितपत उपयोग होतो माहीत नाही, कदाचित होत असावा. मात्र कधी कधी असेही घडते की, माणसे हरवतात, पण त्यांचा शोध घ्यायला कोणीच पुढे येत नाही. त्यांना स्वतःलाही आपला ठावठिकाणा नेमकेपणाने सांगता येत नाही. 

अशा परागंदा व्यक्तींचे जीवन फारच दुःसह बनते. जिवंतपणी असे अनाम आयुष्य वाट्याला येणे, घर असून बेघर जगायला लागणे यासारखे दुःख नाही. घर उद्ध्वस्त झाले तर ते परत बांधता येते, पण घरानेच जर दार बंद केले तर डोक्यावरचाच काय, पण पायाखालचा आधारही हरवतो. अशी हरवलेली माणसे आपल्याला मुंबई-पुण्यासारख्या शहरांतूनही रस्त्यांवर भटकताना दिसतात. काही वेळा ही माणसे स्मृतिभ्रंशासारखा विकार झालेली असतात, काही वेळा त्राग्याने घर सोडून आलेली आणि परतायचे कसे हे न समजणारी असतात. अशा माणसांची विचारपूस करून त्यांची घरे गाठून देणारी देवमाणसेही कधी त्यांना भेटतात. आजच्या काळातही असे काम करणाऱ्या माणसांचे अस्तित्व आहे ही गोष्ट मनाला दिलासा देणारी आहे. पण हे सारे झाले हरवलेल्या, घरी परतू इच्छिणाऱ्या आणि ज्यांची वाट पाहणारे कोणी आहे, अशा व्यक्तींबद्दल. कधी कधी मात्र घरातलेच कुणीतरी नको असलेल्या व्यक्तीला भलत्या ठिकाणी सोडून येते. इतक्या अनोळखी ठिकाणी, की या व्यक्तींना घरी परतण्याचा मार्गही उपलब्ध होणे कठीण होऊन बसते. आपल्या देशात अशा घटना घडतात हे समजल्यावर मनाला धक्का बसतो आणि शरमेने मान खाली जाते. कोणताही अन्याय-अत्याचार स्त्रियांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर होतो हे ओघाने आलेच. आपली धार्मिक स्थळे अशा गोष्टींकरिता उत्तम ठिकाणे मानली जातात. गेल्या वर्षी ‘वॉटर’ चित्रपटाच्या निमित्ताने गदारोळ उठला. त्यानंतर, काशी-मथुरा येथील विधवांच्या प्रत्यक्ष स्थितीबद्दलची बरीच माहिती उजेडात आली होती. घरात या विधवांचा भार नको म्हणून त्यांना या ना त्या मार्गाने बाहेर काढले जाते आणि मग त्यांना मथुरा-वृंदावनसारख्या ठिकाणी आश्रय घेण्याला पर्याय उरत नाही. विशेषतः बंगालमधून वृंदावनला येणाऱ्या विधवांची संख्या मोठी आहे, हेही आता उघड झाले आहे. तिथल्या सरकारने या संदर्भात अधिक चौकशी करण्याचा आदेशही काढला होता. त्याचे पुढे काय झाले हे  मात्र अजून प्रकाशात यायचे आहे.

आता अलाहाबाद येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या निमित्तानेही आणखी धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या आहेत. गंगेच्या तीरावर अशा अनेक निराधार स्त्रिया सापडल्या आहेत. या स्त्रियांना कुंभमेळ्याच्या पर्वणीवर गंगास्नान करण्याच्या निमित्ताने तेथे आणण्यात आले आणि तसेच सोडून देण्यात आले. हे कृत्य अर्थातच त्यांच्या अगदी घरच्या माणसांनी केले आहे. कोणाच्या भाच्याने, दिराने तर कोणाच्या अगदी पोटच्या मुलानेसुद्धा. संबंधित वृत्त वाचतानाही अंगावर काटा उभा राहतो. गिरिजादेवी नावाची अगदी कमरेत वाकलेली वृद्धा आपल्या मुलांबरोबर आणि इतर कुटुंबीयांसह महाकुंभाच्या स्नानाचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी तेथे आली होती. रात्रभर नदीकाठच्या वाळवंटात राहिल्यानंतर सकाळी गंगास्नान करायचे, असा त्यांचा बेत होता. पण सकाळी उठून बघितल्यावर तिच्या लक्षात आले की आपण एकट्याच आहोत. इतर सर्व जण निघून गेले आहेत. तिला एका पोलिसाने नदीकाठी उभारण्यात आलेल्या आधारगृहात आणले.

ही वृद्धा एकटेपणाच्या भीतीने रडत असलेली त्याला सापडली. तिच्याप्रमाणे इतरही अनेक जणी गंगेच्या तीरावर जवळपास अशाच अवस्थेत सापडल्या. कुंभमेळ्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी माणसांची चुकामूक होते. म्हणूनच स्वयंसेवी संघटना आणि सरकार मदत केंद्र उभारत असते. तिथे उभारण्यात आलेले कुंभनगरातील आधार केंद्र रणजित पंडित शिक्षा समिती आणि हेमवतीनंदन बहुगुणा स्मृती समिती यांनी मिळून सुरू केले आहे. हरवलेल्या स्त्रिया व मुलांसाठी हे आधारगृह काम करते. यंदाच्या कुंभमेळ्याच्या सुरुवातीच्या 15-20 दिवसांतच त्या केंद्रात दहा हजार स्त्रियांनी आश्रय घेतला होता. तिथल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यांपैकी सुमारे तीन हजार स्त्रिया खरोखरच हरवल्या असतील. आज ना उद्या त्यांचे कुटुंबीय त्यांना शोधत त्यांच्यापर्यंत पोहोचतीलच. लहान मुलांच्या शोधातही घरचे लोक येतील. पण उरलेल्या स्त्रियांची चौकशीही करायला कोणी येणार नाही. या स्त्रिया सत्तरीच्या, साठीच्या आणि काही तर त्याहीपेक्षा अलीकडच्या वयातल्या आहेत. अशा प्रकारे दर कुंभमेळ्यात नको असलेल्या स्त्रियांना सोडून देण्यात येते. म्हाताऱ्या, आजारी, काही काम करू न शकणाऱ्या पन्नाशीपुढच्या स्त्रिया सर्वसाधारणपणे यांमध्ये असतात. अशा स्त्रियांपासून स्वतःची सुटका करून घेण्याचा एक राजरोस मार्ग म्हणून कुंभमेळ्याचा वापर केला जातो.

खरे तर या स्त्रियांना उपचारांची व काळजीची गरज असते; पण त्यांच्या वाट्याला मात्र असे उपेक्षेचे आयुष्य येते. कुंभ संपल्यावर मग अशा स्त्रियांची रवानगी वृद्धाश्रम, अनाथाश्रम अशा संस्थांमध्ये केली जाते. या वर्षी सापडलेल्या स्त्रियांमध्ये बऱ्याचशा गरीब कुटुंबांमधल्या आहेत. पण काही जणी बऱ्या घरांमधल्याही आहेत. प्रेम, संवेदनशीलता हरवून बसलेल्या कुटुंबीयांनी त्यांना असे वाऱ्यावर सोडून दिले आहे. वृद्ध पुरुषांनाही या प्रकारे सोडून देण्यात येते, पण त्यांचे प्रमाण स्त्रियांच्या मानाने खूपच कमी आहे. आधीच म्हातारपणामुळे त्रासलेल्या या वृद्धांना खोकला, सर्दी, रक्तदाब- अशा आजारांपासून अल्झायमरसारख्या विकारापर्यंतच्या विकारांनी ग्रासलेले असते. तशात नदीकाठच्या उघड्या जागेवर, थंडीच्या दिवसांमध्ये त्यांचे फारच हाल होतात. पुरेसे पांघरूण काय, कपडेही त्यांच्याजवळ नसतात. आपण यापुढे काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याजवळ नसते. आपल्या घरचे कोणीही आपल्याला न्यायला येत नाही, हे स्वीकारणेही त्यांना जड जाते. आपण वाट चुकलेल्या आहोत, आपल्या घरचे कोणीतरी नक्की आपल्या शोधात येतील, अशी आशा आणि खात्री त्यांना वाटत असते. ‘‘माझा मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो हो. तो मला असा कधी सोडून देणार नाही. घरचे सगळे जण माझ्याबद्दल चिंताच करत असतील.’’ अशा आशयाची भावना या स्त्रिया आश्रय केंद्राच्या लोकांजवळ बोलून दाखवत असतात. पण त्यांच्या शोधात कोणीही कधीच येणार नसते, हे वास्तव आहे. आपल्या या महान देशात धार्मिकांच्या ज्या भाऊगर्दीचा उपयोग अशा कामासाठी केला जातो, त्याच पर्वणीवर लाखो लोक स्नानाचे पुण्य कमावत असतात. आपल्या आया-बहिणींना असे वाऱ्यावर सोडून जाणारे नदीत डुबकी तरी मारतात की नाही कोण जाणे! एकीकडे हे चित्र असताना, कुंभमेळ्याचे निमित्त साधून थ्री स्टार हॉटेलचा दर्जा असलेले तंबू, सेल्फ कंटेंट ब्लॉकप्रमाणे सुविधा पुरवणाऱ्या खोल्या, गरम पाण्याचे शॉवर्स, हीटर- अशा सोयी इत्यादी उपलब्ध करून देण्याचा धंदाही जोरात चालवला जातो. केवळ खासगी कंपन्या नव्हेत, तर राज्य सरकारही या पर्वणीचा लाभ घेत असते. आपल्या माणसांना वाऱ्यावर सोडून देणे हा माणसांमधली संवेदनशीलता, प्रेम, माया आटत चालल्याचाच परिणाम आहे. आत्मकेंद्रितपणा वाढत गेल्यामुळे दुसऱ्याचा विचार करण्याची प्रवृत्ती कमी होत आहे. केवळ स्वतःचे सुख महत्त्वाचे वाटत असल्याने, दुसऱ्याच्या अडचणी, दुःखे समजून घेण्याची गरजच आज अनेकांना वाटत नाही. 

ज्या कुटुंबव्यवस्थेबद्दल आपण अभिमान मिरवतो, त्यातले मर्मच जर असे हरवले असेल तर त्याचा दोष कोणाकडे? प्रत्यक्ष आपल्या आईला परक्या ठिकाणी सोडून द्यायला माणसे कचरत नाहीत, अशी आज परिस्थिती आहे. संवेदनहीनता या प्रकाराच्या मुळाशी आहे हे खरेच. त्याचबरोबर, वृद्धांना सन्मानाने जगता येईल यासाठी पुरेसे कडक कायदेही आवश्यक आहेत. या सोडून दिलेल्या स्त्रियांना जगण्याचे आधार नसतीलच असे नाही, पण हे आधार आज त्यांचेच नातलग त्यांच्यापासून हिरावून घेत आहेत. स्त्रीचा मालमत्ताविषयक अधिकार मुळातच आपल्या देशात दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिला आहे. नवऱ्याने आपली संपत्ती इतर कुणाच्याही नावे केली तरी ती त्याला तसे करण्यापासून रोखू शकत नाही; किंबहुना अनेकदा तिला त्याविषयी काहीच माहीत नसते. त्याच्या माघारीच तिला आपल्या नावावर नवऱ्याने काहीही ठेवलेले नाही; सर्व काही मुलांच्या नावाने केले आहे असे कळते. अनेकदा यामागे हेतू हाही असतो की, पत्नीला या गोष्टींमधले फारसे कळत नाही, म्हणून नवरा तिच्या नावे आपली संपत्ती करत नाही. पण मुलांनी जर आईची देखभाल करण्यात चालढकल केली, तर परिणाम त्या स्त्रीलाच भोगावे लागतात. म्हातारपणीचा आधार म्हणून स्वतःच्या मुलांकडेही आज खात्रीने बघता येत नाही. आईवडिलांचा सांभाळ करणे हे मुलांचे कर्तव्य आहे, असे मानले जाते. एका बाजूने कायदाही तसे सांगतो, पण त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना काहीच आळा बसत नाही. तुमच्या-आमच्या जवळपास किंवा अगदी घरांमधूनही नजर टाकली तरी अशी अनेक उदाहरणे दिसून येतील. विशेषतः स्त्रियांच्या वाट्याला हे दुःख येत असते. कारण स्त्रीचा फक्त उपयुक्ततेच्या दृष्टीनेच विचार करण्याची प्रवृत्ती खोलवर रुजली आहे. जिचा काही उपयोग नाही, अशी स्त्री आर्थिक पाठबळ नसेल तर अगदी एकाकी पडते. त्यातही, अशिक्षित, अडाणी स्त्रियांची अवस्था फारच बिकट बनू शकते.

वृद्धाश्रम हा घराला पर्याय नसला, तरी आजच्या काळात ती एक गरज बनली आहे. वृद्धाश्रमांची अवस्था आणि व्यवस्था हा एक स्वतंत्रच विषय आहे. वृद्धाश्रमांतूनही स्त्रियांचा वेगळा विचार करून त्यांची देखभाल केली जात नाही. तिथेही पुरुषांनाच थोडे झुकते माप मिळते, असे काहीसे चित्र जाणवते. वृद्धांच्या देखभालीसाठी संस्थात्मक - पातळीवर काम अधिक चांगल्या प्रकारे होण्याची गरज आहे एवढे खरे.

अर्थातच शेवटी प्रश्न माणुसकीचा आहे. कुंभमेळ्यातल्या एकाकी स्त्रियांना तुटपुंजा का होईना, पण आधार द्यायला कोणीतरी भेटतेच. शेवटी, माणुसकीच्या नात्याने तरी अशी मदत व्हायला हवी. जवळचे लोक दूर जातात, अत्याचार करतात तेव्हा परक्यांचाच आधार मिळत असतो. आपल्याकडे अनेक नामवंतांवरही एकाकी आयुष्य जगण्याची पाळी आल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी घडलेले अत्यंत करुण उदाहरण म्हणजे प्रसिद्ध लेखिका डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांचे. त्यांच्या जवळच्या नातलगाने त्यांना फसवले. लुबाडले आणि नवी मुंबईच्या एका वृद्धाश्रमात नेऊन सोडले. त्यांची चौकशीही फिरून केली नाही, की आर्थिक मदतही पाठवली नाही. स्वतःच्या मालकीची संपत्ती - घर सारे असूनही बाई वाईट अवस्येत मरण पावल्या. त्यांचा गुन्हेगार असलेला, त्यांचा भाचा म्हणवणारा मनुष्य आजही उजळ माथ्याने जगत आहे. महाकुंभाच्या स्थळी हजारो स्त्रियांना सोडून घरी परतणाऱ्यांनाही त्याचा जाब विचारणारे कोणी नाही याची खात्री आहे; म्हणूनच असे कृत्य ते करू धजावतात. आजच्या दिवसांत दुसऱ्याच्या घरात काय चालले आहे. याकडे तटस्थपणे बघण्याची वृत्ती बळावली आहे. पूर्वी मोठी कुटुंबे असत आणि परस्पर संबंधही वारंवार येत. पण शेजारच्या घरातली एखादी आजी, मावशी, काकू, आत्या किंवा आई काही दिवसांनी दिसेनाशी झाली, तर ती कुठे गेली, हा प्रश्नही आज विचारला जात नाही. असे प्रश्न विचारणारे आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्यास, संशय आल्यास त्याचा पाठपुरावा करणारे कोणी न भेटण्याची खात्री असल्यानेच माणसे निर्ढावत असतात. असा सामाजिक दबावही असणे आवश्यक आहे. कायदे आज नाहीत असे नाही, पण त्यांची माहितीही अनेकांना नसते. वर्षानुवर्षे घरात राहणाऱ्या स्त्रीला असे घरातून हाकलता येत नाही; पण आपला घरात राहण्याचा हक्क आहे हे त्या स्त्रीला माहीतच नसते. एकीकडे ज्येष्ठ नागरिकांच्या सन्माननीय जीवनाबद्दल जागरूकता वाढीस लागल्याचे चित्रही दिसते. पण मूठभर लोकांपुरतीच ही गोष्ट मर्यादित आहे.

शहरांतून आजी-आजोबा उद्याने निर्माण झाली, म्हणजे सर्व वृद्धांचे प्रश्न सुटत नसतात. खरी गरज आहे ती वृद्धांना सुरक्षित आणि मानाचे आयुष्य हक्काने जगता यावे अशी परिस्थिती निर्माण होण्याची. कुंभमेळ्यातील वृद्ध स्त्रियांबद्दल वाचनात आले, तेव्हा पूर्वी वाचलेली एक कथा आठवली. एका वृद्ध व निराधारांच्या निवाऱ्यात राहणारी एक स्त्री तिथल्या इतर स्त्रियांशी कधी फारसे बोलत नसते. तिला भेटायलाही कोणी कधी येत नाही. अगदी एकटेपणात ती दिवस कंठत असते. एरवी टी.व्ही.वरचे कार्यक्रमही न बघणारी ही स्त्री हरवलेल्या व्यक्तींबद्दल निवेदन करणारा कार्यक्रम मात्र आवर्जून बघते. तिला त्याबद्दल एकदा कोणीतरी खोदून खोदून विचारते. तेव्हा ती सांगते, ‘‘मला मुलगा आहे, सून-नातवंडं आहेत. काही भांडण झाल्याने मी घराबाहेर पडले आणि इथे येऊन पोचले. मी हरवले आहे. याबद्दल या कार्यक्रमात कधी काळी निवेदन बघायला मिळेल, अशा आशेने मी हा कार्यक्रम बघत असते...’’ कुंभमेळ्यात हरवलेल्या स्त्रियांच्या मनातही हीच आशा जागी असेल, असे राहून राहून मनात येते.
 

Tags: माणुसकी वृद्धाश्रम निराधार वृद्ध कुंभमेळा सामाजिक humanity old age home helpless seniours kumbhmela social weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदिनी आत्मसिद्ध

पत्रकार, स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक, अनुवादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके