डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तबलावादनाच्या महाद्वाराकडून कौतुक

तबलावादनाची किंवा श्रवणाचीही आवड असणाऱ्या प्रत्येकालाच झाकिर हुसेन नावाच्या महाद्वारामधूनच जावं लागतं. जगभरातल्या तालरसिकांचे ताईत असणारे झाकिरभाई तृप्तराजचेही आदर्श आहेत. झाकिरभाईंची स्वतःची प्रतिभाही अशीच अगदी नकळत्या वयातच उमलू लागली होती. त्यांचा तर जन्म आणि संगोपनच उस्ताद अल्लारखाँसाहेबांसारख्या वटवृक्षाच्या छायेखाली झालं होतं. त्यामुळं झाकिरभाईंना तृप्तराजचं विशेष कौतुक आहे आणि त्याच्या भविष्याविषयी मोठ्या आशाही आहेत.

स्वर आणि लय ही संगीताची प्राणतत्त्वं! काही वेळा संगीताचा ध्यास घेतलेल्या एखाद्याला अख्खं आयुष्य वेचूनही ती गवसत नाही, तर काही वेळा अगदी अनाहूतपणे ती एखाद्याच्या ठिकाणी प्रकटतात आणि मग थक्क व्हायला होतं. भारतीय शास्त्रीय संगीताच्या अवकाशातही अगदी लहान वयात अशी अचाट प्रतिभाशक्ती लाभलेली नक्षत्रं काही कमी नाहीत. तबलावादनाच्या क्षेत्रात उगवू पाहणाऱ्या अशाच एका ताऱ्याची ही गोष्ट आहे. त्याचं नाव आहे तृप्तराज अतुल पांड्या.

तृप्तराजला भारत सरकारचा बालशक्ती पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकताच मिळाला. पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याचं विशेष कौतुक केलं. त्यामुळे तृप्तराजचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. गेली सहा वर्षे, सर्वांत लहान वयाच्या तबलावादकाचं गिनीज बुक रेकॉर्ड तृप्तराजच्या नावावर आहे. बारा वर्षांच्या लहानग्या तृप्तराजची कामगिरी भल्याभल्यांना चकित करून टाकणारी आहे.

मुंबईतील पश्चिम मुलुंडमध्ये 23 ऑक्टोबर 2006 रोजी तृप्तराजचा जन्म झाला. त्याचे वडील अतुल पांड्या पेशाने टॅक्स कन्सल्टंट. पण त्यांना गाणं ऐकण्याची, स्वतः म्हणण्याची अतिशय आवड. हिंदी गझल, भजनं हार्मोनियमवर स्वतः वाजवत ते गातात. तृप्तराजची आई वीणा यांनाही गाणं ऐकायला, गायला आवडतं. तृप्तराजच्या जन्मापूर्वी- तो पोटात असताना त्या शास्त्रीय संगीतापासून हिंदी गझलांपर्यंत निरनिराळ्या प्रकारचं संगीत आवर्जून ऐकत असत. संगीताची मनापासून आवड असणाऱ्या अशा घरातच तृप्तराजचा जन्म झाला. मात्र तृप्तराजचं कौशल्य खऱ्या अर्थानं ओळखलं ते त्याच्या आजीने..

तृप्तराजच्या आजीला स्वयंपाकघरात काम करताना गुणगुणायची सवय होती. दीडेक वर्षाचा लहानगा तृप्तराज दुडक्या चालीनं आजीपाशी यायचा. स्वयंपाकघरात हाताला मिळतील ती भांडी, डबे घेऊन त्यावर ठेका धरायचा. अवघ्या दीड वर्षाच्या या नातवाचं आजीला भारी कौतुक होतं. तो भांड्यांवर ठेका धरून साथ करू लागला की, आजीही दुप्पट उत्साहानं गाऊ लागायची. आजी चपात्या लाटतेय, लाटता-लाटता गाणी म्हणतेय आणि तृप्तराज ॲल्युमिनियमचे-स्टीलचे डबे हुडकून काढून त्यावर ठेका धरून साथ करतोय- असं चित्र घरी हमखास दिसायचं. तृप्तराजचे आई-बाबा घरी आले की, आजी त्यांना सांगायची, ‘‘मी आणि तृप्तने खूप मजा केली. मी भजनं म्हणत होते आणि त्यानं ताल धरला होता.’’

हळूहळू घरात सगळ्यांच्याच हे लक्षात येऊ लागलं की, तृप्तराजला उपजतच तालाची जाणीव फार चांगली आहे. बोलू लागण्याच्याही आधी त्याने आपलं हे कौशल्य दाखवायला सुरुवात केली होती. पण ‘इतक्या लहान वयातील मुलाच्या या कौशल्याचं नक्की करायचं तरी काय?’ असा प्रश्नच घरातल्यांना पडला होता. थोड्याच दिवसांनी सगळ्यांना अचंबित करून टाकणारा प्रकार घडला आणि हा प्रश्न कायमचाच सुटला...

झालं असं की, एके दिवशी तृप्तराजचे वडील घरातला तबला दुरुस्त करून घेऊन आले. लहानग्या तृप्तराजने ते पाहिलं आणि त्याने आईकडे त्या तबल्यासाठी हट्ट करायला सुरुवात केली. आईने काहीबाही सांगून विषय टाळला. तृप्तराज मात्र राहूनराहून हट्ट करतच होता. रात्री निजानीज झाल्यावर पुन्हा आईपाशी तृप्तराजची भुणभुण सुरू झाली. रात्रीचा दीड वाजला. तृप्तराजचे बाबा एव्हाना झोपी गेले होते. शेवटी नाइलाजाने आईने त्यांना उठवलं आणि म्हटलं, ‘‘आता तुम्हीच सांगा काय करायचं... हा हट्टाला पेटलाय त्या तबल्यासाठी!’’  बाबा आईला म्हणाले, ‘‘दे त्याला तो तबला.’’ आईने त्याला तबला काढून दिला. तबला हातात मिळताच तृप्तराज हरखून गेला. त्यानं आईला खुणा करून गायला सांगितलं. चटकन आठवलं ते भजन आई गाऊ लागली. आणि त्या चिमुकल्या हातांनी तबल्यावर ठेका धरून साथ करायला सुरुवात केली. 18 महिन्यांच्या तृप्तराजला तबल्यावर ठेका धरताना पाहून त्याच्या आई-वडिलांच्याही अंगावर रोमांच उभे राहत होते.

त्याच क्षणी त्यांना जाणवलं की, तृप्तराजच्या अंगभूत गुणांना आता योग्य वळण देऊन ते वाढवायला हवेत. तृप्तराजच्या बाबांनी त्याच्याकडून रोज रियाझ करून घ्यायला सुरुवात केली. तृप्तराजही अगदी आवडीनं तबला शिकू लागला. आपापलं वाजवू लागला. त्याने अगदी पहिलावहिला पब्लिक परफॉर्मन्स दिला तो वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी! मुंबईतल्या सोमैया कॉलेजमध्ये त्याने सर्वांसमोर आपली कला सादर केली आणि तो सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय ठरला. जाहीर कार्यक्रमांबरोबरच त्याने हरियाना रेडिओ स्टेशनमधून ऑल इंडिया रेडिओवर लाइव्ह कार्यक्रमही सादर केला. एवढंच नाही, तर वयाच्या चौथ्या वर्षी त्याने दूरदर्शनवरही कार्यक्रम सादर केला. आता तृप्तराजचे जाहीर कार्यक्रम होऊ लागले होते. तो सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय बनला होता.

पण तृप्तराजच्या आई-वडिलांना याचंही भान होतं की, तृप्तराज अजून लहान आहे. या वयात त्याने त्याचं बालपणही मुक्तपणे अनुभवलं पाहिजे. त्याच्या आवडीचे खेळ खेळले पाहिजेत. वयाला शोभेल अशी दंगामस्ती केली पाहिजे. त्यामुळं लहान वयात अशी सिद्धी लाभूनही तृप्तराजला त्याचं बालपण मनमुराद उपभोगता आलं. Child Prodigy समजली जाणारी मुलं सहसा त्यांच्या पालकांच्या दट्‌ट्याखाली दबून जातात आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील आनंद हरवून जातो. त्यांची वाढ थांबून ती खुरटतात. अशी मुलं लहानपणी अचाट प्रतिभा तर दाखवतात, पण तिची मशागत योग्य तऱ्हेनं न झाल्यामुळं ती  आयुष्यभर त्याच पातळीवर राहते. तृप्तराजच्या आई-वडिलांनी त्याच्याबाबतीत हे घडू नये याची पुरेपूर काळजी घेतली.

तृप्तराजच्या वडिलांना असंही वाटलं की, इतक्या लहान वयात तृप्तराजकडे जे कौशल्य आहे, त्याची नोंद घेतली जायला हवी. त्यामुळं त्यांनी तबला वाजवतानाचा तृप्तराजचा व्हिडिओ शूट केला आणि ती व्हिडिओ क्लिप ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडे पाठवून दिली. ‘लिम्का बुक’च्या मुख्य संपादक विजया घोष यांचा त्यांना उत्तरादाखल लगेचच संदेश आला की, तुमचा मुलगा अद्‌भुत आहे! पण आमच्या पॉलिसीनुसार आम्ही बारा वर्षांखालील मुलांचं रेकॉर्ड रजिस्टर करत नाही. त्यामुळं तुम्ही कृपया ‘गिनीज बुक’शी संपर्क साधा...

तृप्तराजच्या बाबांनी तो व्हिडिओ ‘गिनीज बुक’कडे पाठवून दिला. आणि त्या क्लिपमुळे चारच दिवसांत तृप्तराजला ‘जगातील सर्वांत लहान वयाचा तबलावादक’ म्हणून घोषित करण्यात आलं. गिनीज बुकने नोंद घेतल्यामुळे तृप्तराजचं नाव जगभरातल्या लोकांना माहिती झालं. ही अव्वल दर्जाची प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष तबलावादनातही प्रगती साधणं, नवी कौशल्यं हस्तगत करणं तितकंच आवश्यक होतं. त्यासाठी ज्ञानेश्वर पोपलगढ आणि सत्यप्रकाश मिश्रा यांच्याकडं तृप्तराज तबला शिकू लागला. गाण्याप्रमाणेच तबलावादनाचीही काही घराणी आहेत. प्रत्येक घराणं स्वतःची स्वतंत्र वैशिष्ट्यं, वादनाची शैली, रियाजाच्या पद्धती बाळगून असतं. ज्ञानेश्वर पोपलगढ हे उस्ताद झाकिर हुसेन यांच्या शिष्य परिवारातले. तृप्तराज दोन वर्षांचा असल्यापासून त्यांनी त्याला पंजाब घराण्याची तालीम दिली आहे.

तर, सत्यप्रकाश हे सुप्रसिद्ध तबलावादक कालिनाथ मिश्रा यांचे सुपुत्र. त्यांच्याकडून तृप्तराजला बनारस घराण्याची तालीम मिळते आहे. याशिवाय सध्या तो ज्येष्ठ तबलावादक नयन घोष यांच्याकडूनही शिक्षण घेतो आहे.

या सर्वांकडे तृप्तराजचं प्रत्यक्ष शिक्षण होत असलं तरी तृप्तराजचा आणखीही एक गुरू आहे. तो म्हणजे YouTube! तृप्तराज YouTubeचा भरपूर वापर करतो. तबलावादकांच्या मुलाखती, मैफिली, त्यांची प्रात्यक्षिकं पाहायला त्याला आवडतं. तिथून मिळणाऱ्या गोष्टी तो स्वतःच्या रियाझातही करून पाहतो. तृप्तराजसारख्या स्वयंप्रेरणेने स्वतःच्या कलेत प्रगती करू पाहणाऱ्या मुलांना YouTube मुळे मोठंच घबाड खुलं झालं आहे. अशा मुलांच्या विकसनामध्ये या समाजमाध्यमांचा वाटा मोठा असणार आहे.

तबलावादनाची किंवा श्रवणाचीही आवड असणाऱ्या प्रत्येकालाच झाकिर हुसेन नावाच्या महाद्वारामधूनच जावं लागतं. जगभरातल्या तालरसिकांचे ताईत असणारे झाकिरभाई तृप्तराजचेही आदर्श आहेत. झाकिरभाईंची स्वतःची प्रतिभाही अशीच अगदी  नकळत्या वयातच उमलू लागली होती. त्यांचा तर जन्म आणि संगोपनच उस्ताद अल्लारखाँसाहेबांसारख्या वटवृक्षाच्या छायेखाली झालं होतं. त्यामुळं झाकिरभाईंना तृप्तराजचं विशेष कौतुक आहे आणि त्याच्या भविष्याविषयी मोठ्या आशाही आहेत.

तृप्तराजचे वडील हौसेने त्याला संगीताच्या मैफिलींना घेऊन जातात. तिथे कलावंतांना भेटून तृप्तराजशी त्यांची ओळखही करून देतात. त्यामुळे झाकिरभाईंप्रमाणेच हरिप्रसाद चौरासिया, शिवकुमार शर्मा, इक्बाल अहमद खाँ अशा संगीतक्षेत्रातील दिग्गजांचे आशीर्वाद तृप्तराजला मिळाले आहेत. आपापल्या क्षेत्रांमध्ये अव्वल स्थानी पोहोचलेल्या या बुजुर्गांनाही तृप्तराजच्या कलेबद्दल आस्था आहे. ते त्याच्या रियाझाची चौकशी करतात, त्याला प्रोत्साहन देतात. त्यांचं प्रेम ही तृप्तराजसाठी आयुष्यभरासाठीची ठेव आहे.

तबला हे तालवाद्यांमधील अतिशय प्रगत वाद्यांपैकी एक आहे. तबल्यासोबत आकाराने फुगीर रुंद असतो तो डग्गा. तो धातूच्या पत्र्यापासून बनवलेला असतो. तबला आणि डग्ग्यावर जे कातडं चढवलेलं असतं, त्याच्या मधोमध गोलाकार शाई लावलेली असते. त्या भागाच्या आसपास विशिष्ट ठिकाणी बोटांनी आघात केले की, विशिष्ट नाद (ज्यांना ‘बोल’ म्हणतात) निघतात. विशिष्ट बोल, विशिष्ट अंतराने रचून ताल तयार झालेले आहेत. उदा.- धा धि ना। धा ति ना। या तालाचं नाव दादरा. किंवा धिं धिं धागे तिरकिट तू ना। कत्‌ तिन्‌ धागे तिरकिट धी ना। हा एकताल. असे अनेक..

जगातील फार कमी संगीतप्रकारांत इतकं तालवैविध्य आढळतं. तबल्याचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते मुख्यतः तालवाद्य असलं तरी, तबल्यासोबत गाणाऱ्या गायकाचा स्वर किंवा वादकाचं वाद्य यांच्या स्वराशी तबला जुळवून (‘लावून’) घ्यावा लागतो. त्यामुळं तबलावादकाला नुसतं तालज्ञान असून भागत नाही, त्याला स्वरांचंही चांगलंच ज्ञान असावं लागतं. गेल्या शंभरेक वर्षांत तबल्याला साथीच्या वादनासोबतच एकलवादनासाठी म्हणजेच स्वतंत्रपणे वाजवायचं वाद्य म्हणूनही लोकप्रियता लाभली आहे. साथ करतानाचे आणि स्वतंत्र तबलावादनाचे उसूल, त्यासाठीची कौशल्यं वेगवेगळी आहेत. तृप्तराज रोज दीड ते दोन तास तबल्यावर रियाझ करतो. सुट्टीच्या दिवसांतही तो स्वतःहून थोडा जास्त वेळ तबलावादनात घालवतो. यासाठी रियाझ करताना तृप्तराजला मदत होते त्याच्या वडिलांची. वडील त्याला गाऊन किंवा पेटीवर लेहरा धरून साथ करतात. कधी कधी ते स्वतः गातात आणि तृप्तराज त्यांना तबल्याची साथ करतो.

तबलावादनासोबतच हार्मोनियम, ढोलक, ड्रम्स, काँगो इत्यादी वाद्यांमध्येही तृप्तराजला गती आहे. त्याला क्रिकेट आणि फुटबॉल खेळायलाही खूप आवडतं. त्याला त्याच्या स्वप्नांविषयी विचारलं तर तो  सांगतो, ‘‘मला सध्या तबलावादनात नैपुण्य मिळवायचं आहे आणि पुढे संगीतातच करियर करायचं आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात उल्लेखनीय ठरेल, असं काही तरी काम मला करायचं आहे.’’

तृप्तराज मुंबई येथील ऐरोलीतील न्यू हॉरिझॉन पब्लिक स्कूल या शाळेत शिकतो. तो म्हणतो, ‘‘या वयात सगळ्याच गोष्टी करणं गरजेचं असतं, त्यामुळं रियाझ करताना शाळेत दिलेला होमवर्कही सांभाळावा लागतो.’’ आजघडीला त्याने सादर केलेल्या कार्यक्रमांची संख्या दोनशेहूनही अधिक आहे. त्याच्या शाळेतल्या गॅदरिंगपासून दिल्लीच्या युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेपर्यंत देशभरात त्याचे कार्यक्रम झाले आहेत. त्याला त्याच्याबद्दल, त्याच्या तबलावादनाबद्दल बोलायला ठिकठिकाणांहून आमंत्रणं येतात. मुंबईत झालेल्या दोन TEDx इव्हेंट्‌समध्येही त्याने सादरीकरण केलं आहे. त्याचे अनेक व्हिडिओज आता YouTube वरही उपलब्ध आहेत.

तालाची जाणीव तृप्तराजला निसर्गतःच मिळाली आहे. त्यामुळं तबल्यासारखं- एरवी भरपूर मेहनतीनेच साध्य होणारं वाद्य त्याला दुरापास्त राहिलेलं नाही. ज्या वयात त्याच्या वयाची इतर मुलं तबला आणि डग्ग्यावर कुठला बोल, कुठं आणि कसा वाजवायचा हे धुंडाळत असतील; नक्की कुठं थाप दिली की, ‘धाऽ’ वाजतो? कुठं टिचकी दिली की, ‘कत्‌’ वाजतं? याचे धडे गिरवत असतील- त्या वयात हा बहाद्दर एखाद्या इंग्रजी पॉप गाण्याला तबल्यावर ठेका धरून लोकांच्या टाळ्या घेतो आहे. त्यामुळं आता यापुढे त्याच्याकडून असणाऱ्या अपेक्षाही मोठ्या आहेत. कितीही नाही म्हटलं तरी आता त्याच्याकडे असणारी कौशल्यं ही त्याच्या प्रगत बौद्धिक क्षमतेचा भाग आहेत. ती केवळ मशागत केलेली जमीन आहे. सृजनाची खरी सुरुवात आता त्याला साधायची आहे. पण त्याचं वय, त्याचं कर्तृत्व आणि त्याची जिद्द पाहता, यशाची असंख्य क्षितिजं तो गाठू शकेल यात शंका नाही. कारण 12 वर्षांच्या तृप्तराजचं स्वतःसाठीचं ब्रीदवाक्य काय आहे, ठाऊक आहे? ते आहे- I am passionate for passion!

Tags: Tabla तबला सुहास पाटील Suhas Patil तृप्तराज पांड्या Truptraj Pandya weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुहास पाटील
suhasp455@gmail.com

सब एडिटर - कर्तव्य साधना 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके