डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आगामी वर्षात सामान्य माणसाला आर्थिक आघाडीवर विलक्षण काटकसर करण्याबरोबरच सावधगिरीनेच सर्व आर्थिक व्यवहार करावे लागणार आहेत. दुसरे आव्हान अंतर्गत सुरक्षिततेबद्दलचे आहे. मुंबईवरील हल्ल्यानंतर हे आव्हान अतिशय ठळकपणे सर्वांसमोर उभे ठाकले आहे. मुंबईवरील हल्ल्यांनी सुरक्षा यंत्रणांची अकार्यक्षमता सिद्ध झाली. त्यावरून सुरू झालेल्या वादाचे ध्वनी-प्रतिध्वनी अजूनही ऐकायला येत आहेत. परंतु हे निररर्थक वाद करण्या ऐवजी भविष्यात असले हे पुन्हा होऊ नयेत यासाठी काम करता येईल आणि या हल्ल्यांपासून कोणता धडा देशाने शिकला आहे यावर फार कमी विद्वानांनी चर्चा केलेली आहे. भारताला साडेसातहजार किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. एका सुरक्षातज्ञांनी म्हटल्याप्रमाणे एवढी मोठी किनारपट्टीसील बंद करणे अमेरिकेसारख्या देशालाही शक्य नाही.

2009 वर्ष सुरू झाले आहे. या वर्षात भारतवासीयांसाठी काम वाढून ठेवले आहे असा विचार केल्यास दहशतवाद आणि आर्थिक मंदी या दोन प्रमुख आव्हानांचा विचार करावा लागेल. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह त्यांच्या आर्थिक सल्लागारांनी कमीतकमी आणखी 12 ते 15 महिने तरी आर्थिक मंदीचा सामना देशाला करावा लागेल असे सांगतानाच मंदीचा खरा फटका अद्याप बसायचा आहे असा इशाराही दिला आहे. आर्थिक मंदीचा काळ साधारणपणे वीस ते चोवीस महिन्यांचा असेल असे सांगितले जात होते व अर्थतज्ञांच्या मते त्यातले सहामहिने तर पार पडले आहेत. अद्याप बारा ते पंधरा महिन्यांचा काळ शिल्लक आहे. याचाच अर्थ 2010च्या मार्चपर्यंत मंदीचे फटके कोणत्याना कोणत्या स्वरुपात सहन करावे लागणार आहेत. मुंबई हल्ल्यांनी दहशतवादाचे एक नवे अक्राळविक्राळ रूपच सर्वासमोर प्रकट केले आहे. या हल्ल्मांचे सर्वंकष स्वरुप लक्षात घेऊन भविष्यात देखील कोणत्या प्रकारच्या दहशतवादास तोंड द्यावे लागेल याचे चित्र लोकांसमोर ठेवले आहे. त्याच बरोबर दहशतवादाचा मुकाबला ही केवळ सरकारचीच जबाबदारी आहे हा समजही कसा अयोग्य आहे हेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. दहशतवादाच्या मुकाबल्यात सरकारला जनतेची साथ-संगत व सहभाग प्राप्त न झाल्यास एकटे सरकार दहशतवादाचा मुकाबला करण्यास पुरे पडू शकणार नाही. दिवसेंदिवस दहशतवादाच्या नांग्या लांबलांब होताना आढळत आहेत. हे संकट किंवा समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नाही तर जगाला त्याचा धोका आहे. जगात इतरत्र या धोक्याचा मुकाबला कसा होतो हे लक्षात घेऊनच सामान्य नागरिकांनाही स्वत:ला तयार करावे लागणार आहे.

दहशतवादाच्या आघाती स्वरूपापेक्षा देशाला पोखरणारे आर्थिक संकट अधिक त्रासदायक आहे. काही चटकन समजेल अशी आकडेवारी पाहिली तरी त्याचे गंभीर स्वरूप लक्षात येईल. वस्त्रोद्योग क्षेत्राचे उदाहरण घेऊ. भारतीय निर्मातीच्या क्षेत्रातील हा एक प्रमुख घटक असून देशाला परकीय चलन मिळवून देणारे हे क्षेत्र आहे. जागतिक मंदीमुळेही निर्यात स्थगित अवस्थेत आहे किंवा मंदावलेली आहे. प्रामुख्याने लघुउद्योग क्षेत्रातील हा उद्योग आहे आणि व्यापक रोजगाराचे साधन म्हणून त्याकडे पाहिले जाते. निर्यात यंदा वल्याने या उद्योगाकडील मागणी थंडावली आहे, परिणामी हे लहान उद्योग बंद पडत आहेत आणि गेल्या सहा महिन्यांचा आढावा घेतल्यास पाच लाखांपेक्षा अधिक लोक यात बेकार झाले आहेत. आगामी काळात आणखी किती बेकार होतील याचा अंदाज लावता येणार नाही. साधारणपणे देशात या उद्योगात चाळीस ते पन्नासलाख लोकांना रोजगार मिळतो.निर्मात क्षेत्रातले वस्त्रोद्योग हे एक उदाहरण झाले. इतर क्षेत्रांमध्ये देखील मंदीमुळे उद्योग बंद पडून लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. गेल्या वर्षी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यानंतर निर्मात क्षेत्राला मोठाफटका बसला होता आणि त्यामुळे देखील बेकारी झाली होती. त्याच्या पाठोपाठ मंदीची लाट आल्याने या क्षेत्राची आणखी वाताहात होताना दिसत आहे. बेकारी हा मंदीचा एकप्रमुख परिणाम आहे. इतरही परिणाम आहेत. परंतु सामान्य माणसाला त्याचा सर्वांगीण फटका बसतो. नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी मंदीवरील उपाययोजनांचे पॅकेज जाहीर करताना देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासदरात सुमारे दीड ते दोन टक्क्यांनी कपात होणार असल्याने त्याची परिणती उद्योग बंद पडण्यात आणि बेकारीत होणे अटळ आहे असे सांगितले होते. सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचे झाल्यास मंदीमुळे एकतर उद्योग बंद पडतील किंवा मोडकळीस येतील, तसेच लोकांना नोकरकपात किंवा वेतनकपात या समस्यांचाही मुकाबला करावा लागेल. मंदीला तोंड देण्यासाठी सामान्य माणसाला ‘बचत, बचत आणि बचत’ हा एकच मार्ग उपलब्ध आहे असे तज्ञांतर्फे सांगितले जात आहे. परंतु नव्या आर्थिक धोरणानुसार बाजारात मागणी निर्माण करण्यासाठी स्वस्त व्याजदराची कर्जे उपलब्ध करून देण्याच्या योजना जाहीर केल्या जात आहेत. म्हणजेच घरे विकत घेण्यासाठी कमी व्याजदरात कर्जे उपलब्ध करून दिल्यास लोक घरे विकत घेऊ लागतील आणि त्यातून बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल. परिणामी, सिमेंट, लोखंड-पोलाद व बांधकामाशी निगडित उद्योगांना गती मिळेल, परिणामी अर्थव्यवस्था गतिमान होईल अशी अटकळ बांधून उपाययोजना जाहीर केल्या गेल्या आहेत. परंतु पंतप्रधानांच्या आर्थिक सागारपरिषदेचे प्रमुख सुरेश तेंडुलकर यांनी पुढील किमान बारामहिने तरी मंदीचे प्रतिकूल परिणाम सहन करावे लागतील असा इशारा दिलेला आहे. थोडक्यात, आगामी वर्षात सामान्य माणसाला आर्थिक आघाडीवर विलक्षण काटकसर करण्याबरोबरच सावधगिरीनेच सर्व आर्थिक व्यवहार करावे लागणार आहेत.

दुसरे आव्हान अंतर्गत सुरक्षिततेबद्दलचे आहे. मुंबईवरील हल्ल्यानंतर हे आव्हान अतिशय ठळकपणे सर्वांसमोर उभे ठाकले आहे. मुंबईवरील हल्ल्यांनी सुरक्षायंत्रणांची अकार्यक्षमता सिद्ध झाली. त्यावरून सुरू झालेल्या वादाचे ध्वनी-प्रतिध्वनी अजूनही ऐकायला येत आहेत. परंतु हे निररर्थक वाद करण्याऐवजी भविष्यात असले हे पुन्हा होऊ नयेत यासाठी काम करता येईल आणि या हल्ल्यांपासून कोणता धडा देशाने शिकला आहे यावर फार कमी विद्वानांनी चर्चा केलेली आहे. भारताला साडेसात हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. एका सुरक्षा तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे एवढी मोठी किनारपट्टी सीलबंद करणे अमेरिकेसारख्या देशालाही शक्य नाही. याचा आशय असा की समुद्रकिनाऱ्याच्या गस्तीसाठी केवळ कोस्टगार्ड किंवा नौदल हे पुरेसे पडणार नाही. त्यासाठी तेथे राहणारे मच्छिमार, नागरिक यांचाही सहभाग आवश्यक असेल. केवळ समुद्रकिनाऱ्यापुरतीच ही बाब मर्यादित नाही तर शहरांमध्ये व विशेषत: दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेल्या संभाव्य शहरांमधील नागरिकांनीही सावध असणे आणि सुरक्षा यंत्रणांना साथ देणे अपेक्षित आहे. सुरक्षा यंत्रणांना नावे ठेवून किंवा शिव्या देऊन दहशतवादी हे थांबणार नाहीत. अमेरिकेत न्यूयार्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर पुन्हा तसा हा झाला नाही असे सातत्याने काही मंडळी सांगत असतात. परंतु अमेरिकेत लागू केलेले अंतर्गत सुरक्षाविषयक कायदे भारतात लागू केल्यास मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करीत अनेक संघटना उभ्या राहतील. काही अत्यावश्यक असे सुरक्षाविषयक कामदे लागू केल्यास नागरिकांना काही प्रमाणात आपल्या व्यक्ति स्वातंत्र्याला मुरड घालावी लागेल. त्याची तयारी आहे का हे प्रथम भारतीय नागरिकांना ठरवावे लागेल. भारतात कोणाला ओळखपत्र मागितले तर राग येतो. परंतु ओळखपत्र मागणारा सुरक्षा रक्षक सुरक्षेच्या कारणास्तवच आपले कर्तव्य बजावीत असतो हे लोकांना कळत नाही. अमेरिकेत विमानतळांवर अतिशय कडक अशा शारीरिक झडतीतून जावे लागते. जॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री असताना त्यांना याचा प्रत्यय आला होता. परंतु सामान्य माणसाला तेथे तक्रार करायलाही जागा ठेवली जात नाही. सुरक्षेचे नियम पाळायचे म्हणजे पाळायचे, त्यात कोणतीही तडजोड चालणार नाही असा दंडकच केला जातो. अर्थात केवळ या गोष्टींमुळेच तेथे दहशतवादी हे रोखले गेले असे नव्हे. त्याला इतरही कारणे आहेत. त्यामध्ये अमेरिकेची आंतरराष्ट्रीय दहशत व धाक हे प्रमुख कारण आहे. पण लोकांनी साथ दिली तरच सुरक्षा यंत्रणा कार्य क्षमतेने काम करू शकतील ही बाब महत्वाची आहे.

भारतात दहशतवादी हे रोखण्यासाठी गुप्तचर यंत्रणा प्रभावी करणे ही प्रमुख गरज आहे आणि नवे गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी त्यावरच धडाका लावला आहे. राष्ट्रीय सुरक्षासागार एम.के. नारायणन यांना अंतर्गत सुरक्षेच्या जबाबदारीतून मुक्त करून चिदंबरम यांनी त्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे व आता या प्रक्रियेला आपण काहीतरी वेगळे वळण लावू इच्छितो हे त्यांनी स्पष्ट केले आहे. गुप्तचरयंत्रणा सक्षम करण्यासाठी ‘ह्युमन इंटेलिजन्स’ किंवा ‘खबऱ्यां’चे जाळे अतिशय प्रभावी असावे लागते, चिदंबरम यांनी त्यावर भर दिला आहे. त्याचबरोबर सुरक्षा दलांच्या आधुनिकीकरणाचा धडाकेबाज कार्यक्रमही त्यांनी चालू केला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांचे त्यांना पूर्ण पाठबळ मिळाले आहे.

2009 मध्ये हीच दोन प्रमुख आव्हाने आहेत. पाकिस्तानमधील अस्थिरता भारताच्या मुळावर येऊ पहात आहे. तेथे कट्टरपंथीयांच्या हाती कारभार जाणे हाच भारताला सर्वाधिक धोका आहे आणि तसे घडल्यास या उपखंडात काहीही होऊ शकते. अमेरिकेत आलेले नवे अध्यक्ष त्यामुळे त्यांचे आसन स्थिरस्थावर होईपर्यंत लागणारा वेळ पाहता पाकिस्तानच्या दृष्टीने येणारा प्रत्येक दिवस निर्णायक आहे. भारतालाही पाकिस्तानातील घडामोडींवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अत्यंत बेभरवशाची अशी परिस्थिती पाकिस्तानात आहे. तेथील नेतेही बेभरवशाचे आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर व्यवहार करणे ही अतिशम कठीण बाब होऊन बसली आहे. स्थिती नाजुक असल्यानेच संयम व सबुरीनेच गोष्टी घ्याव्या लागतील, आततायी पावले उचलून चालणार नाही. 2009ची आव्हाने हीच आहेत.

Tags: दिल्ली 2009 मधील दोन प्रमुख आव्हाने निरीक्षक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके